शेगाव येथे आजपासून तीन दिवसीय 'पीएम विश्वकर्मा' प्रदर्शनी व विक्री मेळावा
बुलढाणा, (जिमाका) दि.
15 : भारत
सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयांतर्गत, एमएसएमई विकास कार्यालय,
नागपूर आणि जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथे
भव्य 'पीएम विश्वकर्मा प्रदर्शनी व विक्री' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा
मेळावा दि. १६, १७ आणि १८ जानेवारी २०२६ रोजी शेगाव येथील अग्रसेन भवन येथे संपन्न
होणार आहे.
या प्रदर्शनीचे उद्घाटन
शुक्रवार, १६ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय
कुटे आणि बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच
एमएसएमई नागपूरचे संचालक व्ही. आर. सिरसाठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह विविध बँकांचे व प्रशासकीय अधिकारी उपस्थित
राहणार आहेत.
प्रधानमंत्री विश्वकर्मा
योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या १८ विविध प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना आपल्या
उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून
देण्यात आले आहे. यामध्ये सुतार, लोहार, कुंभार, मूर्तिकार, चर्मकार आणि इतर
ग्रामीण कारागिरांच्या हस्तकलेचे नमुने पाहायला मिळतील. कारागिरांना आधुनिक
बाजारपेठेची ओळख करून देणे आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीला चालना देणे हा या
प्रदर्शनीचा मुख्य उद्देश आहे.
जिल्हा उद्योग केंद्र,
बुलढाणाचे महाव्यवस्थापक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना या प्रदर्शनीला जास्तीत
जास्त संख्येने भेट देण्याचे आवाहन केले आहे. "आपल्या जिल्ह्यातील स्थानिक
कारागिरांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि 'व्होकल फॉर लोकल' या
संकल्पनेला बळकटी देण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे," असे
त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
हे प्रदर्शन सकाळी १० ते
रात्री ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार असून जास्तीत जास्त
नागरिकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment