खेलो इंडिया ट्रायबल गेम्स: 13 जानेवारीला राज्यस्तरीय निवड चाचणी
बुलढाणा, (जिमाका) दि. 9 : केंद्र शासनाच्या
निर्देशानुसार छत्तीसगड राज्यामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या 'पहिली खेलो इंडिया ट्रायबल
गेम्स 2025-26' साठी महाराष्ट्र राज्यस्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या
स्पर्धेअंतर्गत फुटबॉल, हॉकी, आर्चरी, ॲथलेटिक्स, जलतरण, वेटलिफ्टिंग व कुस्ती या खेळांचा
समावेश असून ही स्पर्धा खुल्या वयोगटात पार पडणार आहे.
सदर स्पर्धेसाठी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचण्यांचे
आयोजन करण्यात येणार असून राज्यस्तरीय निवड चाचणीतून निवड झालेल्या खेळाडू व संघांना
राष्ट्रीय निवड चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय निवड चाचणी व स्पर्धेमधून
निवड झालेले खेळाडू व संघ पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2025-26 करीता पात्र ठरणार
आहेत.
राज्यस्तरीय निवड चाचणी अंतर्गत दि. 13 जानेवारी 2026 रोजी विविध
ठिकाणी निवड चाचण्या आयोजित करण्यात येणार आहेत. अमरावती येथे आर्चरी, कुस्ती व वेटलिफ्टिंग
या खेळ प्रकारांच्या निवड चाचण्या जिल्हा क्रीडा संकुल, तपोवन गेट, अमरावती येथे होणार
असून खेळाडूंनी दि. 12 जानेवारी 2026 रोजी सायं. 6 वाजेपर्यंत विभागीय क्रीडा संकुल,
मोर्शी रोड, अमरावती येथे उपस्थित राहावे.
हॉकी, अॅथलेटिक्स, जलतरण व फुटबॉल या खेळासाठी दि. 13 जानेवारी
2026 रोजी निवड होणार असून हॉकी खेळासाठी मुळा एज्युकेशन सोसायटी, यश ॲकेडमी, सोनई,
ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे निवड चाचणी होणार आहे. अॅथलेटिक्स खेळासाठी दि. पोलिस
ग्राऊंड, पालघर, जि. पालघर येथे, जलतरण खेळासाठी श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी,
पुणे येथे, आईस हॉकीसाठी स्व. मिनाताई ठाकरे स्केटींग क्रीडा संकुल, निगडी पुणे येथे
(संपर्क- सुरेश काकड मो.नं.8888806158) तर फुटबॉल खेळासाठी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर,
कोराडी रोड, नागपूर येथे निवड चाचणी होणार आहे.
निवड चाचणीसाठी जाणाऱ्या खेळाडूंनी दि. 12 जानेवारी 2026 पूर्वी
संबंधित खेळाच्या संपर्क प्रमुखांशी संपर्क साधून आपली नावे नोंदणी करणे अनिवार्य आहे.
राज्यस्तरीय निवड चाचणीकरीता उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंनी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाचे
जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र व आधार कार्ड सोबत
आणणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित खेळ प्रकारासाठी आवश्यक साहित्य व संरक्षक साधने स्वतः
आणावीत.
वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये आर्चरी खेळासाठी गुणानुक्रमे पहिले
3 खेळाडू, तर कुस्ती व वेटलिफ्टिंग या खेळ प्रकारांमध्ये गुणानुक्रमे पहिले 2 खेळाडू
राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत. सर्व खेळाडूंनी या निवड चाचणीत
स्वखर्चाने व स्वतःच्या जोखमीवर सहभागी व्हावे. मात्र, फक्त खेळाडूंसाठी निवास व भोजनाची
व्यवस्था कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. या निवड चाचणीत सहभागी खेळाडूंना कोणत्याही
प्रकारचे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. तरी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील
खुल्या वयोगटातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या राज्यस्तरीय निवड चाचणीत सहभागी व्हावे,
असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment