Saturday 30 July 2016

sant gajanan maharaj palakhi

संत श्री गजानन महाराज यांची पालखी 1 ऑगस्ट रोजी सिंदखेडराजात
  • मेहकर ते जालना रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने
  • रूग्णवाहीका, शववाहिका व अग्नीशमन दलाच्या वाहनांना सूट
  • 31 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 2 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू
बुलडाणा, दि. 30 -  श्री. संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथून शेगांवच्या परतीच्या मार्गावर आहे. ही पालखी 1 ऑगस्ट 2016 रोजी सिंदखेड राजा येथे येत आहे. नाव्हामार्गे सिंदखेड राजा शहरात या पालखीचे आगमन होणार आहे. तरी पालखीतील भाविकांची संख्या व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी बघता मेहकर ते जालना या राज्य महामार्ग क्रमांक 186 रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
  सध्याचा मार्ग मेहकर-सुलतानपूर-सिंदखेड राजा- न्हावा- जालना आहे, तर परतीचा जालना-न्हावा-सिंदखेड राजा- सुलतानपूर-मेहकर आहे. या मार्गामध्ये 31 जुलै 2016 रोजी रात्री 12 ते 2 ऑगस्ट 2016 रोजीच्या रात्री 12 पर्यंत सदर वाहतूक मेहकर-चिखली-देऊळगाव राजा-जालना मार्गे वळविण्यात आली असून परतीची जालना-दे.राजा-चिखली-मेहकर मार्गे वळविली आहे.
  मुंबई पोलीस कायद्याचे कलम 33 सह कलम 36 अन्वये जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी ही अधिसूचना काढली आहे. या आदेशातून सर्व शासकीय वाहने, सर्व अतिमहत्वाच्या/महत्वाच्या व्यक्तींची वाहने, तात्काळ सेवेची रूग्णवाहिका, शववाहिनी, अग्नीशमन दलाची वाहने वच जिवनावश्यक वस्तूंची वाहने वगळण्यात आली आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक संजीवकुमार बावीस्कर यांनी कळविले आहे.

****

news 30.7.2016 dio buldana

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
बस स्थानकासमोर,  प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001
दूरध्वनी- 242341,      फॅक्स- 242741           E-Mail : diobuldana@gmail.com
वृतक्रमांक- 564                                                                           दि. 30 जुलै 2016

पंतप्रधान पिक विमा योजनेला मुदतवाढ
  • 2 ऑगस्ट 2016 पर्यंत पिक विमा भरावा
  • प्रति हेक्टरी कापसाला 1800, तर सोयाबीनला 720 रूपये हप्ता
बुलडाणा, दि. 30 -  खरीप हंगाम 2016 साठी जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस या नऊ पिकांकरिता पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार  पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येणार आहे. तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखून कृषि क्षेत्राच्या पतपुरवठ्यात सातत्य राखता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना यापूर्वी 31 जुलै अंतिम मुदत होती. यामध्ये शासनाने मुदतवाढ दिली असून आता 2 ऑगस्ट 2016 पर्यंत पिक विमा भरता येणार आहे.
     जिल्ह्यातील कर्जदार शेतकाऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पिक विमा बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याच्या भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के मर्यादीत ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा प्रस्ताव नजीकच्या बँकेत सादर करावयाचा आहे.   बँकेकडे सादर करण्याची अंतिम तारिख 2 ऑगस्ट 2016  आहे.याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
-असा आहे विम्याचा हप्ता
  पिक विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर खालीलप्रमाणे -
खरीप ज्वारी : विमा संरक्षीत रक्कम 24 हजार, हप्ता 480 रूपये (प्रति हेक्टर), मका: विमा संरक्षीत रक्कम 25 हजार, हप्ता 500 रूपये, तुर : विमा संरक्षीत रक्कम 28 हजार, हप्ता 560 रूपये, मुग : विमा संरक्षीत रक्कम 18 हजार, हप्ता 360 रूपये, उडीद : विमा संरक्षीत रक्कम 18 हजार, हप्ता 360 रूपये, भुईमुग : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600 रूपये, सोयाबीन : विमा संरक्षीत रक्कम 36 हजार, हप्ता 720 रूपये, तीळ : विमा संरक्षीत रक्कम 22 हजार, हप्ता 440 रूपये आणि कापूस पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 36 हजार, हप्ता 1800  रूपये राहणार आहे.
*******
व्यायामशाळा व क्रीडांगण विकासासाठी अनुदानाचे प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करावी
* नविन प्रस्ताव 15 ऑगस्अ 2016 पर्यंत द्यावे
बुलडाणा, दि. 30 -  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत विविध योजनेकरिता अनुदान वितरीत करण्यात येते. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सद्यस्थितीत व्यायामशाळा अनुदानाचे प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून आमंत्रित करण्यात आले आहे. युवक कल्याण विषयक उपक्रम राबविण्यासाठी अनुदानाचे प्रस्ताव प्रलंबित असून सदर प्रस्ताव निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
   ज्या संस्थांचे प्रस्ताव कार्यालयामध्ये प्रलंबित आहे. अशा संस्थांनी  प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात येवून 5 ऑगस्ट 2016 पूर्वी करावी. तसेच संबंधित कार्यालयाकडे प्रस्ताव प्रलंबितची संख्या जास्त असल्यामुळे केवळ व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदानाचे द्वीतीय आणि अंतिम हप्त्याचे बांधकाम पूर्ण झालेल्या संस्थांकरिता व्यायाम साहित्य खरेदी प्रस्ताव सादर करावे. व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदानाचे प्रथम हप्त्याचे प्रस्ताव डिसेंबर 2016 अखेर स्वीकारण्यात येणार आहे.
   त्याचप्रमाणे युवक कल्याण विषयक उपक्रम राबविणेकरिता नविन प्रस्ताव 15 ऑगस्ट 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकूल, क्रीडानगरी, जांभरून रोड, बुलडाणा येथे सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी कळविले आहे.
********
मासेमार संकट निवारण निधी योजनेतंर्गत धनादेश वाटप
बुलडाणा, दि. 30 -  राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत्‍ा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासकीय भागभांडवल मासळीचे संरक्षण, वाहतुक व पणन मार्केटींग या योजनेखाली प्रथमच जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.  कोराडी प्रकल्प मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. हिवरा बु, ता. मेहकर या संस्थेस 10 लक्ष रूपये भाग भांडवल मंजूर करण्यात आले. या भांडवलीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्याहस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आला.
   तसेच पुजा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. कंडारी-भंडारी, ता. नांदुराचे तत्कालीन अध्यक्ष गजानन पुंडलीक साटोटे 17 मे 2015 रोजी कंडारी तलावात मासेमारी करीत असताना हृदयविकाराचा झटका येवून निधन झाले. शासन निर्णयातील अटी-शर्तींचे अधिन राहून त्यांचे वारसदार पत्नी श्रीमती ज्योती गजानन साटोटे, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगांव यांना मासेमार संकट निवारण निधीतून रक्कम 1 लाख अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. सदर दोन्ही धनादेशांचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिकबुलडाणा या कार्यालयामार्फत सदर धनादेश वाटप जिल्हाधिकारी यांचेहस्ते वितरीत करण्यात आले.

*****

Friday 29 July 2016

minister tour

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
बस स्थानकासमोर,  प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001
दूरध्वनी- 242341,      फॅक्स- 242741           E-Mail : diobuldana@gmail.com
वृतक्रमांक- 562                                                                           दि. 29 जुलै 2016
        
कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा, दि. 29 कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर 30 व 31  जुलै 2016 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा खालीलप्रमाणे : दि. 30 जुलै 2016 रोजी पहाटे 5.25 वाजता शेगाव रेल्वेस्थानक येथे आगमन, पहाटे 5.25 वाजता शेगव येथून खामगांवकडे प्रयाण, सकाळी 6 वाजता खामगांव येथे आगमन व निवासस्थानी राखीव, सकाळी 10 वाजता खामगांव येथे शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 2.45 वा. श्रीहरी लॉन्स नांदुरा रोडकडे प्रयाण, दुपारी 3 श्रीहरी लॉन्स येथे आगमन व नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती, रात्री 8 वा. निवासस्थानी आगमन व राखीव.
  दि 31 जुलै 2016 रोजी दुपारी 12 वाजता खामगांव येथून अकोलाकडे प्रयाण, दुपारी 1 वाजता आगमन व अकोला जिल्हा सावकलार/कलाल समाज मंडळ यांच्या गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभास प्रमिलाताई ओक हॉल येथे उपस्थिती,  दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 4 वाजता खामगांवकडे प्रयाण, सायं 5 वाजता खामगांव येथे आगमन व राखीव, सायं 7 वाजता नांदुरा रेल्वे स्थानकाकडे प्रयाण, सायं 7.35 वाजता नांदुरा रेल्वे स्थानक येथे आगमन व मेल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
****
वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा दौरा
बुलडाणा, दि. 29 वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर दि 30 व 31 जुलै 2016 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 30 जुलै 2016 रोजी सकाळी 11 वाजता परतवाडा येथून शासकीय मोटारीने शेगांवकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता शेगांव येथील रवि शेजोळे यांच्या गजानन गो-गॅस एजन्सीला भेट, दुपारी 3 वाजता शेगांव येथून खामगांवकडे प्रयाण, दुपारी 3.30 वाजता सुटाळा येथे कृषि मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थिती, सायं 6 ते 8 शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांसोबत चर्चा, रात्री 8 वाजता खामगांव येथून बुलडाणाकडे प्रयाण, रात्री 10 वाजता बुलडाणा येथे आगमन व मुक्काम.
 दि. 31 जुलै 2016 रोजी सकाळी 11 वाजता विश्रामगृह येथे वन विभागाचे अधिकारी व शेतकऱ्यांसोबत वन्य प्राण्यांच्या त्रासाबाबत बैठक, दुपारी 1.30 वाजता सागवण येथे ओमसिंग राजपूत यांच्या निवासस्थानी भेट, दुपारी 2 वाजता सागवन येथून चिखलीकडे प्रयाण, दुपारी 2.30 वाजता चिखली येथे स्वाभिमानीच्या कार्यालयात उपस्थिती, दु 2.30 ते 5.30 दरम्यान शेतकरी व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी स्वाभिमानी कार्यालयात राखीव, सायं 5.30 ते 6.30 दरम्यान चिखली शहरातील काही प्रतिष्ठितांच्या घरी सदीच्छा भेटी, सायं 6.30 वाजता चिखली येथून बुलडाणाकडे प्रयाण, सायं 7 वाजता बुलडाणा निवासस्थानी आगमन, रात्री 8.30 वाजता बुलडाणा येथून मलकापूर रेल्वे स्थानकाकडे प्रयाण, रात्री 9.30 मलकापूर रेल्वे स्थानक येथे आगमन, रात्री 9.45 वाजता मलकापूर येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

******

news 29.7.2016 dio buldana

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
बस स्थानकासमोर,  प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001
दूरध्वनी- 242341,      फॅक्स- 242741           E-Mail : diobuldana@gmail.com
वृतक्रमांक- 556                                                                           दि. 29 जुलै 2016
        
मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी सर्वकष प्रयत्न करावेत
- जिल्हाधिकारी
·                    बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाची आढावा बैठक
·                    जास्त जन्मदर असलेल्या गावांचा गौरव करणार
·                    गर्भवती महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करणार
बुलडाणा, दि. 29 -  जिल्ह्यात मुलींचा जन्म दर वाढण्यासाठी आणि मुलींबद्दल सहानूभुतीपूर्वक विचार होवून समाज व्यवस्थेत मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासठी जिल्ह्यात बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत्‍ा विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी दिल्या आहेत.
   बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेमाने, अप्पर पोलीस अधिक्षक श्वेता खेडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, महिला व बालविकास अधिकारी श्री. येंडोले आदींसह संबंधित यंत्रणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
  मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी गावातील गर्भवती महिलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, गर्भवती महिलांच्या अडी-अडचणी सोडविण्यसाठी एक हेल्पलाईन क्रमांक बी.एस.एन.एलच्या सहकार्याने जारी करण्यात येणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रशासन गर्भवती महिलांच्या अडचणी सोडविण्यास सहकार्य करेल. तसेच गावातील आशा कार्यकर्ता व आरोग्यसेविका गर्भवती महिलांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्याची माहिती ठेवील. आशांनी याबाबत सक्रीय सहभाग घेवून गावामध्ये गर्भवती महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करतील. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा गुड्डा-गुड्डी कट आऊट ग्रामपचांयतीच्या आवारात दर्शनी भागात लावावेत. त्यामध्ये गावातील मुलींच्या जन्मदराची मागील पाच वर्षाची माहिती प्रसारित करावी. तसेच जनजागृतीपर चलचित्रही प्रसारीत करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
   ते पुढे म्हणाले, प्रत्येक गावात ग्रामपंचायतीला सहभागी करून गावातील मुलीचा वाढदिवस साजरा करावा. यासाठी एक निश्चित होर्डींग्ज बनवून त्यावर मुलीचा फोटो, शुभेच्छूकांची नावे व ग्रा.पं पदाधिकारी यांची नावे असावी. जेणेकरून मुलीचा वाढदिवस साजरा होवून मुलीच्या जन्माबाबत जनजागृती निर्माण होईल. ज्या गावांमध्ये मागील दोन वर्षात मुलींचा जन्मदर मुलांच्या जन्मदरापेक्षा जास्त आहे, अशा गावांचा सन्मान केल्या जाईल. स्वातंत्र्य दिनी अशा गावांच्या सरपंचांचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा स्तरावर आणि उपविभागीय स्तरावर गौरव करण्यात येईल.
    यावेळी मुलींच्या जन्म दराबाबत जनजागृती करण्यासाठी अंमलात येवू शकणाऱ्या बाबींवर चर्चा करण्यात आली. बैठकीला संबंधीत यंत्रणांचे कर्मचारीही उपस्थित होते.
****
बालचित्रकला स्पर्धा परीक्षेचे आयोज
बुलडाणा दि. 29 - शिक्षण विभाग (माध्यमिक) च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही बालचित्रका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शनिवार, 13 ऑगस्ट 2016 रोजी संपुर्ण जिल्हयात एकाच दिवशी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बालचित्रकला स्पर्धा परीक्षेसाठी वेळ थोडा असल्यामुळे स्वत: लक्ष देवून बालचित्रकला स्पर्धा परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी बसविण्यासाठी प्रयत्न करावे.  ही परीक्षा 4 गटात घेण्यात येणार असून परीक्षेची प्रवेश शुल्क 5 रुपये ठेवण्यात आली आहे.  तालुका व जिल्हास्तरावर निवड झाल्यास प्रमाणपत्र देण्यात येतील. त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धाकांनी परीक्षेस बसावे असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी केले आहे.
****
बुलडाणा तालुक्यातील मका पिकाची पाहणी
  • मका पिकात झिंक अन्नद्रव्याची कमतरता
  • शेतकऱ्यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे
बुलडाणा दि. 29- बुलडाणा तालूक्यातील धाड, वरुड, डोमरुळ, धामणगाव, परिसरातील मका पिकाची पाहणी करण्याकरिता उपविभागातील कृषि अधिकारी तालूका कृषि अधिकारी,  कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.सी.पी. जायभाये, विषयतज्ज्ञ डॉ. गीरी यांनी मका पिकाची पाहणी केली. त्यावेळी पिकामध्ये झिंक या अन्नद्रव्याची कमरता दिसून आली. शेतकऱ्यांनी सततच्या पावसामुळे मका पिकास एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थपनेचा अवंलब करावा. त्यामध्ये मका पिकासाठी प्रति हेक्टरी 120 किलो. नत्र,  60 किलो स्फूरद, 30 किलो पालाश देणे गरजेचे आहे. त्यापैंकी 40 किलो नत्र, संपूर्ण स्फूरद व पालाश प्रती. हेक्टरी पेरणी सोबत दयावे व राहिलेले 80 किलो नत्र, संपूर्ण स्फूरद व पालश प्रती . हेक्टरी पेरणी सोबत देण्यात यावे. त्याचप्रमाणे राहिलेले 80 किलो नत्र दोन समान हप्त्यात पेरणीनंतर अनुक्रमे 30 किलो नत्र  45 दिवसानंतर द्यावे.  
जिल्हयाच्या बऱ्याच भागात मका पिकात झिंक या मुलद्रव्याची कमतरता दिसून येत असून अशा परिस्थीतीत झिंक सल्फेट 25 किलो प्रती.हेक्टरी या प्रमाणात दयावे. तसेच काही प्रमाणात पिकांवर खोड किडयाचा प्रादूर्भाव आढळून आल्यास शेतकरी बंधूनी ताबडतोब 3 टक्के दाणेदार कार्बोफयूरॉन 10 किलो प्रती हेक्टरी याप्रमाणे मक्याच्या पोंग्यात टाकावे. या व्यक्तिरिक्त आंतरमशागत, कोळपणी करावी. खोलगट भागात पाणी साचल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा. पिक तणविरहित ठेवावे. जेणे करुन किड व रोगांचे पादूर्भाव होणार नाही,  असे उपविभागीय कृषि अधिकारी एस.जी. डाबरे यांनी कळविले आहे.
*********
जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल विभागाचा महसूल आठवडा
  • महिला सक्षमीकरणासाठी मेळावे आयोजित होणार
  • गावपातळीवर महिलांसाठी असलेल्या योजनांवर मार्गदर्शन शिबिरे
बुलडाणा दि. 29- जिल्ह्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2016 दरम्यान महसूल विभागाच्यावतीने महसूल आठवडा राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्हा ते गाव पातळीपर्यंत महिला सक्षमीकरणासाठी विविध मेळावे आयोजित केल्या जाणार आहे. महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्याचे नियोजन आहे.
  गावपातळीवर महिलांसाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. लक्ष्मी मुक्ती योजनेतंर्गत 7/12 उताऱ्यावर पुरूषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काच्या नोंदी केल्या जाणार आहे. वारसांच्या नोंदी करताना कुटूंबातील महिला वारसदारांची नावे वगळली गेली असल्यास नव्याने वारसांचे नोंदी घेवून त्यामध्ये महिलांचा समावेश केल्या जाणार आहे. महिला खातेदारांच्या पांदण रस्ते तक्रारींवर प्राधान्याने कारवाई करणे, महिला खातेदारांच्या अधिकार अभिलेख विषयांचे अर्ज प्राधान्याने कारवाई करणे, आधार कार्ड नोंदणीसाठी महिलांकरिता विशेष मोहिम राबविणे, निराधार व कुटूंब निवृत्ती वेतन योजनांची माहिती महिलांना पुरविणे, मनोधैर्य, शुभमंगल सामुहिक विवाह योजना, बाल संगोपन योजनांची माहिती पुरविणे व अर्ज स्वीकारणे, महिलांविषयक विविध कायद्यांचे मार्गदर्शन देणे, जिल्हा परिषदेच्या विशेष घटक योजनेतंर्गत महिला खातेदारांना विहीर व स्वयंरोजगारासाठी शिलाई मशिन पुरविणे, आदी उपक्रम राबविले जाणार  आहे.
   तरी या महसूल आठवड्यात महिलांनी सहभाग घेवून आपल्या अडी-अडचणी सोडवाव्यात व  योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
*****







महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जिल्ह्यात  1440 परीक्षार्थी
  • रविवार, 31 जुलै 2016 रोजी परीक्षा
  • 4 परीक्षा केंद्रांचे नियोजन
  • सहायक कक्ष अधिकारी पदाची पूर्व परीक्षा
बुलडाणा दि. 29- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी पूर्व परीक्षा रविवार, 31 जुलै 2016 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सकाळी 10.30 ते 12 वाजे दरम्यान होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून 1440 उमेदवार बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा येथील चार परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
  यामध्ये शिवाजी विद्यालय, सुवर्ण नगर येथील परीक्षा केंद्रात 504 परीक्षार्थी, एडेड हायस्कूल चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 312, शारदा ज्ञानपीठ चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 312 व भारत विद्यालय चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 312 परीक्षार्थी परीक्षेस बसणार आहे.
  परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा कक्षात सकाळी 10.30 वाजता प्रवेश देण्यात येणार असून परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र व काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कॅलक्युलेटर, भ्रमणध्वनी, वह्या, पुस्तके, पेजर, मायक्रोफोन, डिजीटल डायरी आदी आक्षेपार्ह वस्तू व साहित्य परीक्षा कक्षात आणण्यास व स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. याबाबत सर्व परीक्षार्थी उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच संबंधीत परीक्षार्थींनी त्यांचेसोबत स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा चालक परवाना यापैकी एकाची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे, असे केंद्र प्रमुख तथा आरडीसी नरेंद्र टापरे यांनी कळविले आहे.
****
मानसेवी होमगार्डची होणार सदस्य नोंदणी
  • पुरूष होमगार्डची 140 व महिला सदस्यांची 74 पदांसाठी नोंदणी
  • शिक्षण कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असावे
  • 13 ऑगस्ट 2016 रोजी पोलीस मुख्यालय मैदानावर चाचणी
बुलडाणा दि. 29- जिल्ह्यातील 7 तालुका पथकानुसार रिक्त अनुशेषाप्रमाणे मानसेवी पुरूष/ महिला होमगार्ड्सची सदस्य नोंदणी 13 ऑगस्ट 2016 रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 7 वाजेपासून करण्यात येणार आहे. होमगार्डच्या 140 पुरूष व 74 महिला सदस्यांसाठी ही नोंदणी आयोजित केली जाणार आहे. यासाठी शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे.
   होमगार्ड्ससाठी शिक्षण कमीत कमी 10 उत्तीर्ण असावे, वय 20 ते 50 वर्ष दरम्यान असावे, पुरूषांसाठी 1600 मीटर व महिलांसाठी 800 मीटर धावणे पात्रता असावी, उंची पुरूषांसाठी 162 से.मी आणि महिलांसाठी 150 से.मी असावी. गोळाफेकमध्ये पुरूषांसाठी 07.260 किलोग्राम व महिलांसाठी 4 किलो वजनाचा गोळा फेक पात्रता गाठणे आवश्यक राहणार आहे. निवड होवून पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवेत असतील तर त्यांना वेतनी सेवेत असलेल्या कार्यालयाचे अथवा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल व सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे शारिरीक सुदृढतेचे प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्र धारक असल्यास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवारास नोंदणीचे वेळेस स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे. तसेच नोंदणीचे वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची असेल.
  नोंदणीसाठी बुलडाणा तालुका पथकात पुरूष 27 व महिला 11, चिखली पुरूष 23 व महिला 8, खामगांव पुरूष 8 व महिला 20, जळगाव जामोद पुरूष 11 व महिला 9, मलकापूर पुरूष 38 व महिला 8, मेहकर पुरूष 5 व महिला 8 आणि दे.राजा पथकात पुरूष 28 व महिला सदस्यांच्या 10 जागा उपलब्ध आहेत. तरी उमेदवारांची निवड पुर्णपणे गुणवत्तेनुसार करण्यात येणार असून उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील होमगार्ड पथकाचे कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड श्वेता खेडेकर यांनी केले आहे.
*******

        

Thursday 28 July 2016

dio buldana news 28 july 2016

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
बस स्थानकासमोर,  प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001
दूरध्वनी- 242341,      फॅक्स- 242741           E-Mail : diobuldana@gmail.com
वृतक्रमांक- 553                                                                           दि. 28 जुलै 2016
        
मुसळधार पावसाने जिल्हा चिंब....
·                    सिंदखेड राजा, मेहकर व देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी
·                    सिंदखेड राजा तालुक्यात सर्वात जास्त 196 मि.मी पावसाची नोंद
बुलडाणा, दि. 28 -  जिल्ह्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली असून सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. घाटावरील तालुक्यांमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी झाली, तर घाटाखालील तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.  या पावसामुळे पुर्णा नदीला पूर आला असून नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पुलावर पाणी आले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सिंदखेड राजा, मेहकर व देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे जिल्हा मात्र चिंब झाला आहे.
      जिल्ह्यात आज 28 जुलै 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद खालीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची सर्वात जास्त पाऊस सिंदखेड राजा: 196 मि.ली (833.8 मि.ली), दे.राजा : 93 (565), मेहकर : 69 (505), जळगाव जामोद : 52 (528), लोणार: 50 (516), मलकापूर:42(449), संग्रामपूर : 30 (385), चिखली : 26 (391), शेगांव : 18 (425), खामगांव : 13.6 (506.8), मोताळा : 11 (399), बुलडाणा: 10 (406) आणि सर्वात कमी  नांदुरा तालुक्यात : 5 (527.6) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.  अशाप्रकारे  जिल्ह्यात एकूण 615.6  मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 47.4  मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस  सिंदखेड राजा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2016 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची  सरासरी 495.2  मि.ली आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रकल्पनिहाय जलसाठा द.ल.घ.मी नुसार  पुढीलप्रमाणे आहे :
नळगंगा प्रकल्पीय संकल्पीत साठा : 69.32 टक्के, आजचा पाणीसाठा : 13.59 टक्के, पेनटाकळी प्रकल्पीय संकल्पीत साठा : 59.97 टक्के, आजचा पाणीसाठा : 15.42 टक्के, खडकपूर्णा प्रकल्पीय संकल्पीत साठा : 93.47, आजचा पाणीसाठा : 4.71, पलढग प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.51 टक्के, आजचा पाणीसाठा: 24.23 टक्के, ज्ञानगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 33.93 टक्के, आजचा पाणीसाठा: 31.48 टक्के, मस : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.04 टक्के, आजचा पाणीसाठा: 100 टक्के, कोराडी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.12  टक्के, आजचा पाणीसाठा: 32.08 टक्के, मन : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 36.83 टक्के, आजचा पाणीसाठा: 49.92 टक्के, तोरणा : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.89 टक्के, आजचा पाणीसाठा: 29.53 टक्के, उतावळी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 19.79 टक्के, आजचा पाणीसाठा: 66.50 टक्के.
जिल्ह्यातील 6 प्रकल्‍प 100 टक्के भरले
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील पाच लघु पाटबंधारे प्रकल्प व एक मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे. लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये नांदुरा तालुक्यातील कंडारी, खामगाव तालुक्यातील टाकळी, पिंप्री गवळी, रायधर व लोणार तालुक्यातील पिंपळनेर प्रकल्पांचा समावेश आहे. तर मध्यम प्रकल्पामध्ये खामगाव तालुक्यातील मस प्रकल्प पूर्ण भरला आहे.  या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग 2 से.मी ने 0.51 घ.मी प्रति सेकंद सुरू आहे.
**********



मस प्रकल्प 100 टक्के भरला, पाण्याचा विसर्ग सुरू
* नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
बुलडाणा, दि. 28 -  पाटबंधारे उपविभाग खामगांव अंतर्गत मस प्रकल्प 27 जुलै 2016 रोजी 100 टक्के भरला. मस धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास पावसामुळे धरणात येणारा पाणी प्रवाह (येवा) पूर्णपणे धरणाच्या सांडव्यावरून वाहून धरणाखाली नदीपात्रास पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यातील हिंगणा, कारेगांव, चितोडा, शेंद्री, संभापूर, लासूरा जहा, उमरा लासूरा व बाळापूर तालुक्यातील बाळापूर शहर ही नदी काठची गावे पूराने प्रभावीत होऊ शकतात. तरी सदर गावातील गावकऱ्यांना सर्तकता बाळगणेबाबत इशारा देण्यात येत आहे.
  याबाबत पाटबंधारे खात्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी सर्व मस नदीकाठावरील गावातील नागरिकांना केले आहे.
                                                                       ********
अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना साखरेचे परिमाण जाहीर
बुलडाणा, दि. 28 -  सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शासनाकडून स्वस्त्‍ा धान्य दुकानदारामार्फत अंत्योदय व दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती 500 ग्रॅम 13.50 रूपये दराने वितरीत करण्यात येणार आहे. साखर अधिकृत दरापेक्षा अधिक दराने विक्री होत असल्यास व साखर मिळत नसल्यास संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
****
नगर परिषद भरतीचे निकाल जाहीर
बुलडाणा, दि. 28 -  नगर परिषद संवर्ग कर्मचारी भरती प्रक्रिया 2016 चे अनुषंगाने 17 जुलै 2016 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल संवर्ग निहाय www.buldhana.nic.in  या जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलाआहे. तरी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

****

Wednesday 27 July 2016

news dio buldana

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
बस स्थानकासमोर,  प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001
दूरध्वनी- 242341,      फॅक्स- 242741           E-Mail : diobuldana@gmail.com
वृतक्रमांक- 550                                                                           दि. 27 जुलै 2016
        
आदिवासी विकास विभागाची  चौकशी होणार
·        30 जुलै 2016 पर्यंत अमरावती शासकीय विश्राम गृह येथे येणार समिती
·        सन 2004-05 ते 2008-09 कालावधीतील करणार चौकशी
·        वित्तीय अनियमितता तपासणार
बुलडाणा, 27-  मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहीत याचिका प्रकरणी अर्जदाराने याचिकेत नमूद केलेल्या प्रत्येक आरोपाची शहानिशा करून त्यामध्ये काही वित्तीय व अन्य अनियमितता तपासण्यात येणार आहे. तपासणीअंती संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याची शिफारस करणे व भविष्यात अशा घटना घडू नये याकरिता उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने निवृत्ती न्यायमूर्ती एम. जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती अकोला आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची चौकशी करण्यासाठी समितीचे सहायक निवृत्त जिल्हा न्यायाधीश जे. सी शिरसाळे  30 जुलै 2016 पर्यंत अरावती येथील शासकीय विश्राम गृह येथे येणार आहे.
   समिती सन 2004-05 ते 2008-09 दरम्यानच्या आदिवासी विकास विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची चौकशी करणार आहे. त्यामध्ये अकोला येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा समावेश आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुर झालेल्या लाभार्थ्यांच्या यादीत नावे असुनही लाभ न मिळाल्याबद्दल तक्रारी आहेत, अशा लाभार्थ्यांनी 30 जुलै 2016 पर्यंत दुपारी 3 ते 5 या वेळेत अमरावती येथील शासकीय विश्राम गृह येथे आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात सादर करण्यात याव्यात. तसेच इतर संघटना किंवा व्यक्ती ज्यांना या योजनेच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्याबद्दल प्रत्यक्ष माहिती आहे. त्या संघटना किंवा व्यक्ती सुद्धा समितीच्या अधिकाऱ्यांसमोर 30 जुलै 2016 पर्यंत येवून लेखी स्वरूपात तक्रारी करू शकतात. तरी लाभार्थ्यांनी व संघटना, व्यक्तींनी तक्रारी असल्यास द्याव्यात, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, अकोला यांनी केले आहे.
*****
अपंग व्यक्तींना मोफत स्कुटरचे वाटप
बुलडाणा, 27-  जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातंर्गत 100 टक्के पायाने अपंग असलेल्या व्यक्तींना वैधानिक विकास महामंडळ यांच्याकडून सन 2015-16 या वित्तीय वर्षात प्राप्त निधीनुसार जिल्ह्यातील अपंग व्यक्तींना मोफत विशेष स्कुटरचे वाटप जिल्हा परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी जि.प अध्यक्षा श्रीमती अलकाताई खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, समाज कल्याण सभापती गणेश बस्सी, बांधकाम सभापती अंकुश वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, शरद पाटील, चित्रांगण खंडारे आदींसह समाज कल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
******
जिल्हाधिकारी कार्यालयात
1 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि. 27 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन सोमवार, दि. 1 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 1 वाजता लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
*******
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन

     बुलडाणा, दि. 27 :  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्या अध्यक्षतेखाली 1 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी 1.30 वाजता  करण्यात आले आहे. तरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारी पुराव्यासह दोन प्रतीत लेखी स्वरूपात बैठकीत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

*******