सिकलसेल मुक्तीसाठी ‘अरुणोदय’ विशेष अभियान प्रभावी
बुलढाणा,
(जिमाका) दि. 23 : सिकलसेल ॲनिमिया हा आनुवंशिक आजार
असून विशेषतः आदिवासी व काही विशिष्ट समाजघटकांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आढळते.
वेळेत निदान व योग्य उपचार केल्यास या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. याच
उद्देशाने राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या वतीने “अरुणोदय” सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान
जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
दि. 15
जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या
मोहिमेंतर्गत सिकलसेल आजाराबाबत जनजागृती, मोफत तपासणी, सिकलसेल वाहक व रुग्णांची
ओळख, समुपदेशन तसेच आवश्यक उपचार व संदर्भ सेवा देण्यात येत आहेत. ग्रामीण व
आदिवासी भागांमध्ये आरोग्य पथकांमार्फत गृहभेटी देऊन सिकलसेल सोल्युबिलिटी तपासणी
करण्यात येत आहे.
बुलढाणा
जिल्ह्यात सध्या 317 सिकलसेल पीडित रुग्ण असून 1 हजार 731 वाहक
रुग्ण नोंदणीकृत आहेत. या अभियानात शालेय विद्यार्थी, किशोरवयीन मुले, युवक-युवती
तसेच प्रजननक्षम वयोगटातील नागरिकांवर विशेष भर देण्यात आला आहे. सिकलसेल हा
संसर्गजन्य नसून आनुवंशिक आजार आहे, ही बाब नागरिकांपर्यंत पोहोचवून विवाहपूर्व व
गर्भधारणेपूर्व तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यातील
जिल्हा आरोग्य यंत्रणा, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य
सेवक-सेविका, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून ही मोहीम
यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन तपासणी
करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
“सिकलसेल
मुक्त बुलढाणा” हे
उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून राबविण्यात येणारी “अरुणोदय” मोहीम निरोगी पिढीच्या निर्मितीसाठी
महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी कळविले.
0000
Comments
Post a Comment