Thursday 17 May 2018

केंद्रीय पथकाने घेतला बोंडअळी नुकसानीचा आढावा


  • शेतकऱ्यांशी चर्चा करुन घेतली माहिती
बुलडाणा, दि 17:- मागील खरीप हंगामात  बोंडअळीमुळे राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने बोंडअळीसाठी मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये एन डी आर एफ कडून सुध्दा मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार आज 17 मे 2018 रोजी केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतक-यांशी चर्चा करून बोंडअळीचा आढावा घेतला. पथकाने सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगांव माळ व दे. राजा तालुक्यातील भिवगांव येथे भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ शशिकांत खेडेकर उपस्थित होते.
   बोंडअळीग्रस्त  शेतक-यांना  शासनाने नुकतीच जिल्ह्यासाठी पहील्या टप्प्यात 35 कोटी 82 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने एन डी आर एफ मधून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करत केंद्र शासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवले आहे. पथक तेथील शेतक-यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतील. 
   दरम्यान आज डोंगराळ भागात वसलेल्या  सावरगांव माळ ता. सिं.राजा येथे पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.   यावेळी शेतकऱ्यांनी पथकाला शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान देण्याची मागणी केली. शेततळे हा शाश्वत सिंचनाचा सर्वात विश्वसनीय पर्याय आहे. त्यामुळे शेततळ्याला संपूर्ण अनुदान देण्यात यावे. वन्यप्राणी या भागामध्ये पिकांचे नुकसान करतात. त्यामध्ये रोही प्राणी महत्वाचा आहे. या प्राण्याच्या हैदोसमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सोसावे लागते. त्यामुळे या प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा. सौर उर्जेवर आधारीत कृषि पंप योजनेद्वारे पुन्हा पंप वितरण सुरू करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली.   पथकातील सदस्यांनी विविध कृषिच्या योजना शेतकऱ्यांना सांगितल्या.
   या पथकात पथकप्रमुख अश्निकुमार नवी दिल्ली, निती आयोगाच्या डॉ. बी गणेशराम,केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या डॉ. नंदीनी गोकटे नारखेडकर, दिनानाथ, फरीदाबाद येथील आर. डी देशकर, नागपूरचे डॉ. आर. पी सिंग, सीसीआयचे उपमहाव्यवस्थापक एच.डी टेंभुर्णे, कृषि आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग,   उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक काळे, तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, तहलिसदार संतोष कणसे, तालुका कृषि अधिकारी बिपीन राठोड, गटविकास अधिकारी श्री. भटकर, सरपंच श्रीमती सविता साळवे आदींसह कृषि विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. 
                                                                                    *********
बालगृह तपासणी समितीवर अशासकीय सदस्यांसाठी अर्ज आमंत्रित
बुलडाणा, दि 17:- महिला व बालविकास विभागामार्फत संस्थांच्या तपासणीसाठी राज्य व जिल्हास्तरावर तपासणी समिती गठीत करणेबाबत निर्देश आहेत. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या अनुषंगाने विधी संघर्षगग्रस्त बालके, त्यांची काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके यांच्यासाठी बालकांना निवासी सेवा पुरविणाऱ्या शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हास्तरीय समिती गठीत करावयाची असून ही समिती जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आहे. समितीमध्ये सदस्य सचिव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आहेत. या समितीमध्ये एकूण 7 जण असून एकअशासकीय सदस्याची निवड समितीवर करावयाची आहे. तरी सदस्य निवडीसाठी बाल हक्क, संरक्षण, संगोपन व कल्याण या क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव असलेल्या, वय 35 वर्षपेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसलेले व्यक्ती अर्ज करू शकते. अशासकीय सदस्यांचा कालावधी नेमणूकीपासून 3 वर्षांचा असणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी आपला प्रस्ताव 25 मे 2018 पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बस स्टँण्डच्या पाठीमागे, डॉ. जोशी हॉस्पीटल शेजारी, बुलडाणा येथे सादर करावे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद येंडोले यांनी कळविले आहे.
सामाजिक न्याय विभागातंर्गत मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू
बुलडाणा, दि‍.17: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागातंर्गत आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींच्या घाटपूरी, ता. खामगांव येथील शाळेत प्रवेश प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. या शैक्षणिक सत्र 2018-19 करीता सेमी इंग्रजी माध्यमाकरिता इयत्ता 6 वी साठी संपूर्ण नवीन प्रवेश  व इयत्ता 7 वी ते 9 वी मधील रिक्त  जागांसाठी प्रवेश केवळ मुलींसाठी देण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती, अनु. जाती, विजाभज, विमाप्र व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थीनींच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, असे घाटपुरी ता. खामागांव येथील शाळेचे मुख्याध्यापक यांनी कळविले आहे.

Wednesday 16 May 2018

खेलो इंडीया अंतर्गत आयोजीत होणाऱ्या मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षण शिबीराचे आयोजन


बुलडाणा, दि. 16 : भारत सरकार यांचे युवक सेवा व क्रीडा मंत्रालयातंर्गत पुनरुज्जीवीत खेलो इंडीया राष्ट्रीय खेल विकास कार्यक्रमानुसार क्रीडा व सामुहिक सहभागामध्ये उत्कृष्टतेचे नवे राष्ट्रीय उध्दीष्ट साध्य करण्याकरीता शासनाने ही योजना सुरु केली आहे. पुनरुज्जीवीत खेलो इंडीया या योजने अंतर्गत देशात खेळाचा वाढ व विकास करणे त्यामध्ये सामुदायिक प्रशिक्षणाचा विकास या मुदयाचा समावेश आहे. समाजातील प्रशिक्षणाचा विकास ज्याद्वारे शारिरीक शिक्षण, शिक्षक/स्वयंसेवक यांना विकसीत करणे जेणेकरुन त्यांचेद्वारे प्रशिक्षणार्थींचा स्वत:च्या स्थानिक विभागातील किंवा राज्यातील लोकप्रिय क्रीडा प्रकाराद्वारे खेळाचा विकास होण्यास मदत होणार आहे.
  त्या अनुषंगाने खेलो इंडीयाद्वारे सदर योजने अंतर्गत 2 एप्रिल 2018 ते 28 जानेवारी 2019 या दरम्यान मास्टर्स ट्रेनर्स करीता एकुण 15 प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे, सदर शिबीरासाठी ग्वाल्हेर व गुवाहाटी या ठिकाणी एकुण 100 प्रशिक्षकांची एक बॅच या प्रमाणे एकुण 15 प्रशिक्षण शिबीरे आयोजीत करण्यात आलेली आहेत. प्रत्येक प्रशिक्षण शिबीराचा कालावधी 15 दिवसाचा असून पैकी 10 प्रशिक्षण शिबीर हे एल.एन.आय.पी.ई. ग्वालियर या ठिकाणी आहेत व 05 प्रशिक्षण शिबीर हे  एल.एन.आय.पी.ई. गुवाहाटी या ठिकाणी आयोजीत करण्यात आलेले आहे.
    खेलो इंडीया अंतर्गत एकुण 15 प्रशिक्षण शिबीराचा कालावधी  पुढीलप्रमाणे : ग्वालीयर ट्रेनिंग सेंटर – 2 ते 19 जुलै 2018, 23 जुलै ते 16 ऑगस्ट, 10 ते 24 सप्टेंबर, 1 ते 15 ऑक्टोंबर, 18 ऑक्टों ते 1 नोव्हेंबर, 5 ते 19 नोव्हेंबर, 3 ते 17 डिसेंबर. गुवाहाटी ट्रेनिंग सेंटर – 23 जुलै ते 16 ऑगस्ट, 1 ते 15 ऑक्टो, 18 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2018
सदर प्रशिक्षण शिबीराकरीता मास्टर ट्रेनर्सची पात्रता : वय – 18 ते 40 वर्षनिवास- तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याचे ठिकाणाचे जवळ असावे,  क्रीडा पात्रता- कोणताही खेळ खेळलेला असावा, शारिरीक पात्रता – शारिरिक दृष्टया तंदुरुस्त असावाशैक्षणिक पात्रता – शारिरिक शिक्षणात पदवी किंवा पदवीका प्राप्त असावा किंवा मान्यता प्राप्त शारिरीक शिक्षण संस्थेकडून प्रमाणपत्र प्रशिक्षण घेतलेला असावा.
वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असलेले प्रशिक्षणार्थी आवश्यक आहेत. तसेच वरील शैक्षणिक पात्रता नसलेले परंतू प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करता येईल. प्रत्येक प्रशिक्षीत प्रशिक्षणार्थींनी प्रतिवर्षी किमान 100 क्रीडा शिक्षक/शिक्षक/स्वयंसेवकांना प्रशिक्षीत करणे हा सामुदायीक प्रशिक्षण कार्यक्रमाचा उददेश आहे.
सदर प्रशिक्षण शिबीरासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण, निवास, भोजन, वैद्यकीय सेवा या बाबींवरील खर्च केंद्र शासनाच्या युवक कल्याण व खेल मंत्रालयाद्वारे करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींच्या मुख्यालयापासून ते प्रशिक्षणाचे ठिकाणापर्यंतचा प्रशिक्षणार्थींचा फक्त प्रवास खर्च, येणे-जाणे, शासनाद्वारे निधी उपलब्ध होताच प्रत्यक्ष प्रवास खर्चाची प्रतिपुर्ती करता येईल.
उपरोक्त पात्रतेनुसार बुलडाणा जिल्हयातील शारिरीक शिक्षण शिक्षक/ प्राथमिक शिक्षक/माध्यमिक शिक्षक तसेच शारीरीक शिक्षणात पदवी किंवा पदविका प्राप्त असलेल्यांनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा नगरी जांभरुण रोड बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात 21 मे 2018 पर्यंत सादर करावी, तसेच अधिक माहितीसाठी अनिल इंगळे यांच्या 9970071172 यांच्याशी संपर्क साधावा असे  क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी कळविले आहे.
*********
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ देणार युवकांना ‘गाईड’चे प्रशिक्षण
  • अमरावती, सिंधुदुर्ग, औरंगाबाद व नागपूर येथे प्रत्येकी 100 युवकांना प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 16 : महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आता गाईड प्रशिक्षण कोर्स नियमितपणे सुरू करीत आहे. त्यानुसार अमरावती, औरंगाबाद, सिंधुदुर्ग व नागपूर येथे प्रत्येकी 100 युवकांना गाईडचे प्रशिक्षण महामंडळाच्यावतीने दिल्या जाणार आहे. यासाठी उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वय 18 ते 60 च्या दरम्यान असावे. प्रशिक्षणाचा कालावधी हा 12 दिवसांचा आहे. त्यामध्ये 10 दिवस शिकवणी वर्ग व 2 दिवस प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून प्रशिक्षणाचा समावेश असणार आहे.
  सदर प्रशिक्षणात चहा, दुपारचे जेवण दिले जाणार असून गाईड प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रही दिल्या जाणार आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी उमेदवारांकडून 25 मे 2018 पर्यंत http://mtdc2018.mhpravesh.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. याबाबतचा सविस्तर तपशील http://www.maharashtratourisam.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेवून अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत सवई यांनी केले आहे.
                                                            ************
तालुका स्तरीय लोकशाही दिनाचे 21 मे रोजी आयोजन
  बुलडाणा, दि.16 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी तालुका स्तरीय लोकशाही दिन संबंधित तहसिल  कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.  त्यानुसार या महिन्याच्या तिसऱ्या सेामवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 21 मे 2018 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात होणार आहे.  या दिवशी तहसीलदार व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
   अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत. असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे तहसलीदार यांनी कळविले आहे 
                                                            **********
शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकामध्ये अर्ज सादर करावे
·        जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा, दि.16 : खरीप हंगाम जवळ आला असून बळीराजा पेरणीसाठी सज्ज होताना दिसत आहे. पेरणीपूर्व शेतमशागतीची कामे सुरू आहेत. या खरीप हंगामात पेरणीसाठी बि-बियाणे, खते व आंतर मशागतीसाठी पैशाची तजवीज शेतकरी करीत आहे. अशा परिस्थितीत नवीन पिक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांनी संबंधित राष्ट्रीयकृत बँकेत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
    खामगांव येथे दि. 12 एप्रिल रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत बँकांना पिक कर्ज वितरणाबाबत निर्देश देण्यात आले होते. बँकांनी पीक कर्ज वितरणासाठी अर्ज घ्यावे. कुठल्याही प्रकारे वंचित शेतकरी कर्जापासून वंचित राहता कामा नये. बँकांनी आलेल्या शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक द्यावी. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकाकडे पीककर्ज वितरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी नवीन पीक कर्जास पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज वितरण तात्काळ सुरू करावे.
  कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या मात्र संपूर्ण कर्जमाफीची रक्कम कर्ज खात्यात प्राप्त न झालेल्या शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. जेणेकरून त्यांना पिक कर्जाचा लाभ मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीची रक्कम कर्ज खात्यात प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी त्वरित संबंधित जिल्हा बँक, व्यापारी बँक व राष्ट्रीयकृत बँकेत जावून नवीन पिक कर्जासाठी अर्ज द्यावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
पाणी टंचाई निवारणार्थ तीन गावांसाठी टँकर मंजूर
  • आंधई, धोत्रा भनगोजी व जांब गावांचा समावेश
बुलडाणा,दि‍. 16 : चिखली तालुक्यातील आंधई व धोत्रा भनगोजी, बुलडाणा तालुक्यातील जांब  येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे.  आंधई  गावच्या 1020 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हे टँकर दररोज 32 हजार 100 लिटर पाणीपुरवठा करणार आहे. तसेच धोत्रा भनगोजी  व जांब येथील अनुक्रमे 2931 व  3828 लोकसंख्येकरीता एक-एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.  टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                    

Friday 11 May 2018

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा - विभागीय आयुक्त


  • घरकूल, धडक विहीर, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे विषयांचा आढावा
  • जलयुक्तमधील अपूर्ण कामे मे अखेर पूर्ण करावी
  • जिओ टॅगिंग पूर्ण करावे, कार्यारंभ आदेशानंतर त्वरित काम सुरु करावे
बुलडाणा, दि‍. 11 -  राज्य व केंद्र शासन विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकाचा पूर्ण विकास होवून तो स्वयंपूर्ण झाला पाहिजे. शासनाचे हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी  शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी कार्यवाही केली पाहिजे, अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज दिल्या.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात विविध शासकीय उपक्रमांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र. जिल्हाधिकारी षण्मुखराजन,उपायुक्त शहाजी पवार,  निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी नेमाने, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल साकोरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे आदी उपस्थित होते.
  वृक्षलागवड मोहिमेचा आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, या वर्षी ऐतिहासिक कामगिरी करायची आहे. राज्यात 13 कोटी वृक्षलागवड करायची आहे. जिल्ह्यात या मोहिमेसाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज रहावे. खड्डे खोदून अक्षांश – रेखांशनुसार खड्यांचे फोटो अपलोड करावे. खड्यांसाठी लँड बँक तयार करावी. प्रत्येक यंत्रणेने उद्दिष्टानुसार रोपे उपलब्ध करून लागवड करावी. जीवंत रोपे असण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत अपूर्ण असलेली कामे येत्या मे अखेर पूर्ण करण्यात यावीत. कुठल्याही परिस्थितीत मागील अपूर्ण कामांना जुनमध्ये पूर्ण करू नये. तसेच पाण्याचा ताळेबंद पूर्ण असलेल्या गावांचा ‘एक्झिट प्रोटाकॉल’ ची माहिती द्यावी.  यामध्ये मंजूर आराखड्यापासून गावाचे पर्जन्यमान, भूजल पातळी, जलयुक्तच्या कामानंतर पडलेला प्रभाव, पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी पाणी उपलब्धता अशी संपूर्ण माहिती एक्झिट प्रोटोकॉलमध्ये द्यावयाची आहे.
   ते पुढे म्हणाले, एखाद्या कामाला कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळत नसेल, तर जास्त वेळ न घालविता यंत्रणांनी स्वत:च ते काम पूर्ण करावे. यंत्रणांनी जबाबदारी घेत कामे पूर्ण करून गाव वाटर न्युट्रल करावे. जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेत यंत्रणेनी काम पूर्ण करावे. ज्या कामांचे जिओ टॅगिंग झाले नसेल त्या कामांचे टॅगिंगचे काम त्वरित पूर्ण करावे. सन 2018-19 मध्ये निवडलेल्या 165 गावांमध्ये कामे मंजूर असल्यास पूर्ण करावीत. कार्यारंभ आदेश दिलेले असताना काम सुरू न झाल्यास यंत्रणानी जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी कार्यारंभ आदेश दिलेले असताना कामे त्वरित  सुरू करावी. या वर्षात निवडलेल्या गावांमध्ये लाभार्थ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे.
   मागेल त्याला शेततळे व धडक सिंचन विहीर योजनेचा आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये उद्दिष्टपूर्तीसाठी यंत्रणेने काम  करावे. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त काम व्हायला पाहिजे. तसेच शेततळ्याचे अनुदान काम पूर्ण झाल्यानंतर त्वरित लाभार्थ्याला देण्यात यावे. धडक सिंचन विहीर योजनेत काम अपूर्ण असलेल्या विहीरी त्वरित पूर्ण करण्यात याव्यात.
  याप्रसंगी तालुकानिहाय जलयुक्त शिवार अपूर्ण कामे, शेततळे योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        **********

मतदार पडताळणीसाठी बीएलओ आता घरोघरी…!
·        15 मे ते 20 जुन दरम्यान मोहिम
·        मतदार यादीतील नोंदणीची दुरूस्ती, स्थलांतरीत मतदारांची माहिती करणार गोळा
·        4 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध
बुलडाणा, दि.24:  भारत निवडणूक आयोगाच्यावतीने विशेष मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर मतदार नाव नोंदणी व जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी विविध उपक्रमही हाती घेण्यात आले आहे.  यामध्ये बीएलओ घरोघरी जावून माहिती गोळा करणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 15 मे ते 20 जुन 2018 या कालावधीत घरोघरी जावून मतदार पडताळणी करणार आहे. बीएलओ दुबार, मयत व कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदारांची माहिती गोळा करणार आहे. तसेच मतदार यादीतील नोंदणीची दुरूस्तीही करणार आहे,  अशी माहिती पत्रकार परिषदेत उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी दिली. यावेळी माहिती सहायक निलेश तायडे उपस्थित होते.
    मोहिमेदरम्यान 1 जानेवारी 2018  रोजी पात्र असलेले परंतु मतदार म्हणून अद्यापपर्यंत नोंदणी न झालेल्या नागरिकांची नावे गोळा करण्यात येणार आहे. तसेच 1 जानेवारी 2018 रोजी मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र ठरणाऱ्या भावी मतदारांची नावेही गोळा केल्या जाणार आहे.  मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण व प्रमाणीकरण 21 जून ते 31 जुलै 2018 या कालावधीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंबाबारवा अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन केल्यामुळे दोन मतदान केंद्र रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत मतदान केंद्राच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार आहे. नियंत्रक तक्ते अद्ययावत करणे, पुरवणी यादी तयार करणे व विलीनीकरण, एकत्रिकरण करून प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम 1 ऑग्स्ट ते 31 ऑगस्ट 2018 कालावधीत केल्या जाणार आहे.
        प्ररूप मतदार यादी 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहे. या यादीवर दावे व हरकती 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहे. या काळात 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या तरूण मतदारांना नाव नोंदता येणार आहे. प्राप्त दावे व हरकती 30 नोव्हेंबर 2018 पूर्वी निकाली काढण्यात येणार आहे. डाटाबेसचे अद्यावतीकरण करणे व पुरवणी यादीची छपाई 3 जानेवारी 2019 पूर्वी करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 4 जानेवारी 2019 रोजी करण्यात येणार आहे.
   बीएलओला घरी आल्यानंतर संपूर्ण कुटूंबाची माहिती द्यावी. जेणेकरून आपल्या कुटूंबातील कुणीही व्यक्ती मतदार यादीत नाव नोंदणीपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
*****

ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरावे
बुलडाणा, दि‍. 11 -  ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन नामनिर्देशन पत्र सादर करावे. शेवटच्या दिवसाची प्रतिक्षा न करता ऑनलाईन नामनिर्देशन भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावी. जेणेकरून नामनिर्देशनपत्र भरण्याच्या अंतिम दिवशी तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही. असे आवाहन निवडणूक शाखेने केले आहे.
                                                            **********
रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा सुधारीत दौरा
बुलडाणा, दि‍. 11 -  राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल दि. 12 मे 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 11 मे 2018 रोजी रात्री 11.18 वाजता मलकापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने लोणारकडे प्रयाण, पहाटे 2.30 वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 9 वाजता लोणार सरोवर परिसर पाहणी,  सकाळी 10.30 वाजता लोणार सरोवर परिसर विकासाबाबत एमटीडीसी कार्यालयात आयोजित बैठकीस उपस्थिती, दु. 1 वा. राखीव, दु. 2 वाजता लोकप्रतिनिधींसोबत लोणार परिसर विकास कामांचे भूमिपुजन, दुपारी 4 वाजता लोणार येथून चिखलीकडे प्रयाण, सायं 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह चिखली येथे आगमन व राखीव, सायं 6 वा विश्रामगृह येथून स्वरांजली लॉन, जालना रोड, चिखलीकडे प्रयाण, सायं 6.30 वाजता डॉ. सुधाकर इंगळे यांच्या कन्येच्या लग्न समारंभास उपस्थिती, रात्री 8 वा स्वरांजली लॉन, जालना रोड, चिखली येथून मलकापूर रेल्वे स्टेशनकडे प्रयाण, रात्री 10.15 वाजता मलकापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

Wednesday 9 May 2018

आहे उन्हाळा.. तब्येत सांभाळा


·        उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे नागरीकांना आवाहन
बुलडाणा, दि.9 : राज्यात मागील काही दिवसांपासून असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या लाटेपासून  व  उष्माघातापासून बचाव करण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे. हवामान विभागाने यावर्षी उष्णतेच्या लाटेची सुरूवात नेहमीपेक्षा लवकर होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच 2018 मध्ये उष्णतेची लाट दिर्घकाळापर्यंत असण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
   सर्वसाधारपणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल मध्य, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रभाव जाणवत असतो. तसेच त्यामुळे मृत्यू होण्याची संभावना असते. मात्र जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा परिणाम आताच जाणवू लागला आहे.  उष्माघाताचा परिणाम होऊ नये,यासाठी सर्व जनतेनी आतापासूनच जागृत राहीले पाहीजे, रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे.
उष्माघात  होण्याची सर्वसाधारण कारणे : उन्हाळयात शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ उन्हात करणे, कारखान्याच्या बॉयलर रुम मध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपडयांचा वापर करणे अश्या प्रकारे उष्णतेशी प्रत्यक्ष अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होतो.
उष्माघाताची लक्षणे : थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागने, चक्कर येण, निरुत्साही होणे, डोके दुखी, पोटात वेदना होणे अथवा पेंडके येणे, रक्तवाढ वाढणे, मानसिक बेचैन व अस्वच्छता, बेशुध्दावस्था इत्यादी. 
उष्माघातापासून बचावासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना : गावामधील तसेच शहरामधील मंदीरे, सार्वजनिक इमारती, हॉल, उद्याने आदी ठिकाणे दुपारीसुद्धा उघडी ठेवावीत. जेणेकरून नागरिकांना दुपारच्या वेळी येथे आश्रय घेता येणार आहे. याकाळात रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी महत्वाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत करू नये, वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत , बाहेर काम करीत  असताना मध्ये-मध्ये नियमित आराम करण्यात यावा, गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी, चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे, मद्य, चहा, कॉफी व कार्बानेटेड शितपेय पिण्याचे टाळावे, पुरेसे पाणी पित रहावे,  उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत, सैल सुती पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, उन्हात बाहेर जातांना गॉगल, डोक्यावर टोपी, टॉवेल यांचा वापर करावा, शिळे अन्न खाणे टाळावे, तीव्र उन्हात  मुख्यत: दुपरी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
                                                                                    *****
सुशिक्षीत बेरोजगार प्रवर्गातील लाभार्थ्यांची 11 मे रोजी लॉटरी पद्धतीने निवड
  • जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना
बुलडाणा, दि‍.9 -  शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना अंमलात आणली आहे. योजनेतंर्गत सुशिक्षीत बेरोजगार व्यक्ती या प्रवर्गामधून पात्र ठरलेल्या  व ऑनलाईन अपलोड केलेले कर्ज मंजूरी पत्र मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये विनाअट कर्ज मंजूरीचा दाखला ऑनलाईन दाखल करणाऱ्या अर्जदारांची संख्या जिल्ह्याच्या लक्षांकापेक्षा जास्त आहे.  त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे गठीत केलेल्या समितीने लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची  करावयाची आहे. जिल्ह्यातून सुशिक्षीत बेरोजगार व्यक्ती प्रवर्गातून एकूण 70 अर्जदारांचे बँक कर्ज मंजूरी पत्रे मंजूर करण्यात आलेली असून जिल्ह्यांचा लक्षांक 40 आहे. या 70 मंजूर अर्जदारांची यादी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांचे कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मधून अंतिम लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड 11 मे 2018 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी लक्षांकाप्रमाणे 40 लाभार्थ्यांची निवड करण्यात येवून अन्य सभासदांची प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर सभेला सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
                                                                                    ********
पाणी टंचाई निवारणार्थ नऊ गावांसाठी टँकर मंजूर
  • चिखली, शेगांव व खामगांव तालुक्यातील गावांचा समावेश
बुलडाणा,दि‍. 9 : चिखली तालुक्यातील चांधई, शेगांव तालुक्यातील गायगाव बु, गायगांव खु, तरोडा कसबा आणि खामगांव तालुक्यातील किन्ही महादेव, चिखली बु, सुजातपूर, पिंप्री देशमुख व टेंभूर्णा  येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे.  चांधई  गावच्या 2200 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. तसेच गायगाव खु व गायगांव बु  येथील अनुक्रमे 1520 व 760 लोकसंख्येकरीता एक-एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.  तरोडा कसबा येथील 1820, किन्ही महादेव गावच्या 1750, चिखली बु येथील 500, सुजातपूरच्या 500, पिंप्री देशमुख येथील 2585 आणि टेंभूर्णा गावच्या 4500 लोकसंख्येकरीता प्रत्येकी एक टूंकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
******

जिल्ह्यात 31 विंधन विहीरींना मंजूरात
·        मोताळा तालुक्यात 15, दे.राजा 5 व लोणार तालुक्यातील 2 गावांचा समावेश
बुलडाणा, दि‍. 9 - जि‍ल्हा परिषद  बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2017-2018 मध्ये समाविष्ट असलेल्या मोताळा, लोणार, दे.राजा, नांदुरा व मोताळा तालुक्यातील 23 गावांमध्ये एकूण 31 विंधन विहींरींना मंजुरात देण्यात आली आहे. पाणी टंचाई निवारणार्थ घेण्यात येणाऱ्या या विंधन विहीरींची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद यांच्यावर आहे.
   विंधन विहीरींना मंजूरात दिलेल्या गावांमध्ये मोताळा तालुक्यातील 15 गावांचा समावेश आहे. काही गावांमध्ये 1, तर काही ठिकाणी 2 व 3 विहीरींना मंजूरात देण्यात आली आहे. एक विहीरीला मंजूरात दिलेल्या गावांमध्ये मोताळा तालुक्यातील शेलापूर खु, नळकुंड, टाकळी वाघजाळ, धामणगांव देशमुख, अंत्री, गोतमारा तांडा, वरूड, फर्दापूर, लोणघाट व धनगर वाडा निमखेडी यांचा समवेश आहे. तर दोन विहीरींना मंजूरात आडविहीर, तालखेड व बोराखेडी या गावांचा समावेश आहे. तसेच तीन विहीरी रोहीणखेड गावामध्ये देण्यात आल्या आहेत. 
   दे.राजा तालुक्यात एक विंधन विहीर तुळजापूर, पांगरी व किन्ही पवार येथे मंजूर करण्यात आली असून दे.मही व अंढेरा या गावांमध्ये दोन विंधन विहीरी देण्यात आल्या आहे. तर लोणार तालुक्यात सोनुना, वझर आघाव येथे एक विंधन विहीरी देण्यात आली आहे. तसेच नांदुरा तालुक्यातील नारखेड येथे एक विहीरीला मंजूरात देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                ***********
मोबाईल ॲपद्वारे ईव्हिएम मशीनची पडताळणी
बुलडाणा, दि‍.9 -  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या एम 1 (2000-2005) इव्हीएम यंत्राचे 100 टक्के फिजीकल पडताळणी मोबाईल ॲपद्वारे 8 मे 2018 रोजी करण्यात आली. सदर पडताळणी अल्पबचत भवन, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बुलडाणाच्या बाजुला करण्यात आले. या पडताळणीला अर्थातच व्हेरीफिकेशनला जिल्ह्यातील राजकीय पक्ष प्रतिनिधींना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. तरी सदर पडताळणी उपजिल्हाधिकारी निवडणूक राजेंद्र देशमुख, तहसिलदार शैलेश काळे, सहा. जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी आमोद सुर्यवंशी यांचे निदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी राजकीय पक्ष प्रतिनिधी नगरसेवक आकाश दळवी, शिवसेनेकडून राजु फकीरबा मुळे, भाजपाकडून मंगेश चौधरी तसेच अव्वल कारकून पी. एम डब्बे, ऑपरेटर स्वप्नील बाभुळकर आदी उपस्थित होते.   

Friday 4 May 2018

पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जाहीर



·        मृग बहारातील संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू चिकू फळपिकांचा समावेश
·        शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
·        पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सहभाग बंधनकारक

     बुलडाणा, दि.3 : प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2018-19 करीता जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू व चिकु या पाच फळपिकांसाठी मिळणार आहे. योजनेद्वारे कमी/जास्त पाऊस, पावसाचा खंड व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते.  फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखल्या जाते.
  अधिसुचीत क्षेत्रात अधिसुचीत फळपीक घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जे शेतकरी विविध वित्तीय संस्थेकडून पीक कर्ज घेतात अशा कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहणार आहे. फळपीक निहाय निर्धारीत केलेले हवामान धोके  लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय राहणार आहे. विमा क्षेत्राचा घटक हा महसूल मंडळ राहणार आहे.
   बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी यांना तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत संत्रा, मोसंबी, पेरू या फळ पिकांकरीता 14 जून, तर डाळींब पिकाकरीता 14 जुलै राहणार आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी किंवा क्षेत्रीय अधिकारी असलेल्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

समाविष्ट फळपिकनिहाय महसूल मंडळ, संरक्षित विमा रक्कम व शेतकरी विमा हप्ता

संत्रा : मेहकर, डोणगांव, हिवरा आश्रम, जानेफळ, शेलगांव देशमुख ता. मेहकर, मेहूण राजा, दे.मही व अंढेरा ता. दे.राजा, अंजनी खु व सुलतानपूर ता. लोणार, बोरी अडगाव ता. खामगांव, सोनाळा व बावनबीर ता. संग्रामपूर, जामोद ता. जळगाव जामोद महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आले आहे. या फळपिकाला हेक्टरी 77000 रूपये संरक्षित रक्क्म असून विमा हप्ता 3850 प्रती हेक्टरी आहे. मोसंबी : मसला बु ता. बुलडाणा महसूल मंडळ समाविष्ट आहे.  या फळपिकाला हेक्टरी 77000 रूपये संरक्षित रक्क्म असून विमा हप्ता 3850 प्रती हेक्टरी आहे.  पेरू : सिं.राजा, सोनुशी, किनगाव राजा, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन व साखरखेर्डा ता. सिं.राजा,  साखळी बु ता. बुलडाणा, चिखली, हातणी व चांधई ता. चिखली, चांदुर बिस्वा ता. नांदुरा, पिंपळगांव काळे ता. जळगाव जामोद महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आले आहे. या फळपिकाला हेक्टरी 55000 रूपये संरक्षित रक्क्म असून विमा हप्ता 2750 प्रती हेक्टरी आहे. डाळींब : पेठ, चिखली, चांधई, कोलारा, अमडापूर, शेळगांव आटोळ, हातणी ता. चिखली,  बुलडाणा व धाड ता. बुलडाणा, शेलापूर, पिंप्री गवळी, पिं.देवी, बोराखेडी, मोताळा व धा. बढे ता. मोताळा, हिवरखेड व काळेगांव ता. खामगांव, नरवेल व जांबुळधाबा ता. मलकापूर, जामोद ता. जळगांव जामोद महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आले आहे. या फळपिकाला हेक्टरी 121000 रूपये संरक्षित रक्क्म असून विमा हप्ता 6050  प्रती हेक्टरी आहे.
                                                                        ****** 
कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जासाठी 20 मेपर्यंत मुदतवाढ
  • अर्ज सादर न करू शकलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी
  • एकरकमी कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 30 जुनपर्यंत मुदत
  बुलडाणा,दि.3: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – 2017 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या कालावधीत शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली असून अर्ज सादर करण्यास 20 मे 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  तसेच दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी योजनेत अर्ज सादर करण्यास 30 जुन 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
   त्यानुसार सदर अर्ज भरण्याची सेवा महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम केंद्रावरून नि:शुल्क पुरविण्याबाबत त्यांना निर्देशित करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत:सुद्धा http://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येईल. उपरोक्त कालावधीत आपले सरकार सेवा केंद्र, सर्व महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम यांनी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज नि:शुल्क भरून द्यावे, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने निर्देशीत केले आहे.

Thursday 3 May 2018

जिल्ह्यात 11 ठिकाणी अवैध सावकारीविरोधात झडती पथकाची कारवाई


  • महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अन्वये कारवाई
  • झडती पथकामध्ये 79 अधिकारी/कर्मचारी नियुक्ती
  बुलडाणादि. 3 : जिल्ह्यात कथीत अवैध सावकारी व्यवसायाबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयास 6 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीकरीता महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अन्वये संबधीत गैरअर्जदारांच्या ठिकाणांवर सहकार विभागाच्या झडती पथकाने आज धाडी टाकीत कारवाई केली. यामध्ये खामगांव तालुक्यात 3, चिखली 3, नांदुरा 3, जळगाव जामोद 1 व शेगांव तालुक्यातील एका करवाईचा समावेश आहे.  या सदर कारवाईसाठी सहकार विभागाच्या प्रशासन  व लेखा परीक्षण शाखेतील जिल्ह्यामधील 70 अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे 9 कर्मचारी आहेत. अशाप्रकारे एकूण 79 अधिकारी/कर्मचारी या पथकामध्ये होते.
   सदर पथकांसोबत शासकीय पंच म्हणून स्थानिक तहसिल कार्यालयातील कर्मचारी होते. तर संबंधित पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी यांचा समावेशही पथकामध्ये होता. खामगांव येथे तीन पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये संबंधित गैरअर्जदार यांचे राहते घरी व दुकानामध्ये झडती करण्यात आली. या ठिकाणावरून नोंदणीकृत खरेदी खते व पैशांच्या व्यवहारांचे नोंदी असलेल्या वह्या अशा स्वरूपाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. तसेच नांदुरा येथील तीन पथकांनी गैरअर्जदारांच्या ठिकाणी केलेल्या झडतीमध्ये नोंदणीकृत खरेदी खते व इतर काही दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहेत. शेगांव तालुक्यात कारवाईदरम्यान नोंदणीकृत खरेदी खते, कोरे बाँड असे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले. चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे तीन पथकांच्या कारवाईत संबंधीत तीन गैरअर्जदारांच्या ठिकाणांवरून खरेदी खते, कोरे चेक, कोरे बाँड जप्त करण्यात आले. तसेच जळगाव जामोद तालुक्यातील आसलगांव येथील एका ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये संबंधित गैरअर्जदार यांचे राहते घरातील व्यवसायाचे ठिकाण कुलूपबंद असल्यामुळे व कुणीही हजर नसल्यामुळे सदर ठिकाण सिल करण्यात आले.
   तरी सर्व 11 ठिकाणी रितसर झडती पंचनामे करण्यात आलेले आहे. झडती दरम्यान प्राप्त कागदपत्रांची सावकारी कायद्यातंर्गत संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक (सावकारी) यांचेकडून चौकशी करून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही संपूर्ण कारवाई जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कळविले आहे.
*****
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण कामकाज तात्पुरत्या स्वरूपात बंद
बुलडाणा, दि‍.3  - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असलेले योग्यता प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपात शिबिर कार्यालय कामकाजाच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. या कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सद्या कमी प्रमाणात कार्यरत आहे. त्यामुळे योग्य प्रमाणपत्र नुतनीकरण कामकाज तात्पुरत्या स्वरूपात शिबिर कार्यक्रमाच्या दिवशी बंद ठेवण्यात येत आहे. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
------------
जिल्हाधिकारी कार्यालयात
7 मे रोजी लोकशाही दिन
  बुलडाणादि. 3 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन दि. 7 मे 2018 दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            *********
पाणी टंचाई निवारणार्थ तीन गावासाठी टँकर मंजूर
बुलडाणा,दि‍.3: मोताळा तालुक्यातील शिरवा येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. तसेच बुलडाणा तालुक्यातील रायपूर व मेहकर तालुक्यातील वरूड येथे सुद्धा पाणीपुरवठ्याकरीता टँकर मंजूर करण्यात आले आहे. शिरवा गावच्या 1840 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर टँकर दररोज 58 हजार 760 लीटर पाणीपुरवठा करणार आहे. तसेच रायपूर येथील 9550 लोकसंख्येकरीता दोन टँकर मंजूर करण्यात आले आहे. वरूडच्या 1900 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.  टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            *********

                                                                                   

Tuesday 1 May 2018

राज्याचा 58 वा स्थापना दिवस थाटात





जिल्ह्याच्या समृद्धीसाठी विकास प्रक्रियेतील सहभाग महत्वाचा
- पालकमंत्री
  • जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 2 हजार 461 कामे पूर्ण
  • पाणी टंचाई निवारणार्थ 939 गावांमध्ये 1472 उपाययोजना
  • उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानातंर्गत कृषि यांत्रिकीकरणासाठी मोहिम
  • आजपासून डिजीटल स्वाक्षरी 7/12 चे वितरण
  • 3 हजार 748 शेततळी पूर्ण, रस्त्यांचा विकास गतीने सुरू
बुलडाणा, दि‍.1 - राज्य शासन विविध विभाग व अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेचे कल्याण साधण्याचे काम करीत असते. यामध्ये जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत घटकांचादेखील सहभाग असतो. शासन राबवित असलेल्या योजनांमध्ये लोकसहभागही तितकाच महत्वाचा असतो. जिल्ह्याला या योजनांच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी सर्वांचा  विक्रास प्रक्रियेतील सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले.
    महाराष्ट्र राज्याचा 58 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा  पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार विजयराज शिंदे, माजी अमदार धृपदराव सावळे, बुलडाणा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षष्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे आदींची उपस्थिती होती.  
  जिल्ह्यात उद्भवत असलेल्या पाणीटंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले,  सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता सर्वदूर जाणवत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना मुबलक व पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. जिल्ह्यात 939 गावांमध्ये 1472 पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.  त्यामध्ये आता 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 दरम्यान कृषी कर्ज थकीत खातेदार शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच दीड लाख रूपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या थकबाकीदार खातेदार शेतकऱ्यांना एकरकमी योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
      ते पुढे म्हणाले, या खरीप हंगापासून राज्यभर ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यातंर्गत कृषि यांत्रिकीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. जिल्ह्यात  एकूण  17 हजार 280  शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, पॉवर ट्रीलर आदी स्वयंचलित अवजारे देण्यात आली आहे. या साहित्याचे अनुदानाची रक्कम D.B.T. द्वारे आतापर्यंत एकूण 11 कोटी 7 लक्ष रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेत शेतीमध्ये यांत्रिकीकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
   पालकमंत्री पुढे म्हणाले, येत्या खरीप हंगामात 7.32 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून त्यामध्ये सोयाबीन व कापूस पिकांचे क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यासाठी सोयाबीनच्या 1.15 लक्ष क्विंटल व कापसाच्या 8.5 लक्ष बियाणे पाकिटांचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. या खरीप हंगामामध्ये शासनाने आतापासून काळजी घेतली आहे. बियाणे पाकिटांसोबत फेरोमन सापळे देण्यात येणार आहे. तसेच जनजागृतीसाठी गावपातळीवर कार्यक्रमांचे आयोजनही केल्या जाणार आहे. जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेत 3 हजार 748 शेततळी पूर्ण करण्यात आली आहे.  खरीप हंगामात प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळण्यासाठी गतवर्षीपेक्षा जिल्ह्याचे कृषि कर्जाचे उद्दिष्ट 419 कोटी रूपयांनी वाढवून 1877 कोटी रूपये निश्चित करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी संबंधित बँक शाखेत जावून नवीन कर्जासाठी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
      भूजल पातळी जलयुक्त शिवार अभियान यशस्वी ठरत असल्याचे सांगत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले,  भूजल पातळी वाढवून मोठ्या प्रमाणावर संरक्षित सिंचनासाठी जिल्ह्यात महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. गतवर्षी निवडलेल्या 195 गावांमध्ये 2 हजार 461 कामे पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध उपचारांमुळे 18 हजार 729 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. तसेच 16 हजार 535  हेक्टरवर एक वेळच्या  संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांचे महत्वाचे कागदपत्र असलेला 7/12 आजपासून डिजीटल स्वाक्षरीने मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ताटकळत न थांबता एका क्लिकवर 7/12 मिळणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. जवळपास 405 किलोमीटरच्या राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. रस्ते विकासामुळे निश्चितच जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत भर पडणार आहे.
          ते पुढे म्हणाले, कृषि पंपासाठी सन 2017-18 मध्ये  जिल्ह्यात 3 हजार 349 शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.  जिल्ह्यात 8 नवीन उपकेंद्र निर्माण करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत प्रत्येक बेघराला हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे.  मुलींचे घटते प्रमाण अत्यंत चिंताजनक असून स्त्री भ्रृण हत्या रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. केवळ सरकारी उपाययोजनांच्या माध्यमातून हे काम होणार नसून सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांनी सामाजिक भावनेने याबाबत काम करणे गरजेचे आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानातून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जाणीव-जागृती करण्यात येत आहे.
        कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त,विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री श्री. फुंडकर यांनी परेड निरीक्षण केले. कमांडर आर.आर वैजने यांनी पालकमंत्री यांना सलामी दिली. तसेच महिला पोलीस दल, होमगार्ड पुरूष व महिला दल, बँण्डपथक, श्वानपथक, रूग्णवाहिका व नगर पालिका अग्नीशमन वाहन यांनी परेडमध्ये सहभाग घेतला.
                                                            विविध पुरस्कारांचे वितरण
कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील 13 शहीद जवानांच्या पत्नींना आजिवन मोफत बस प्रवास सवलत पासचे वितरण करण्यात आले. यामध्ये श्रीमती कमलाबाई सदाशिव घुबे, श्रीमती द्रौपदाबाई त्र्यंबक पवार, श्रीमती उज्ज्वला नारायण कुलकर्णी, श्रीमती शांताबाई गवई, श्रीमती गोराबाई हनवते व श्रीमती विजया मनोज वानखेडे यांचा समावेश आहे. उपवनसरंक्षक बुलडाणा वन विभाग यांचे कार्यालयामार्फत संत वनग्राम पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार वनव्यवस्थापन समिती  पिंपळगांव चिलमखाँ दे.राजा यांना, द्वितीय पुरस्कार माटरगांव गेरू ता. खामगांव यांना, तर  तृतीय पुरस्कार राजुरा ता. जळगांव जामोद यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट कार्याकरीता वनरक्षक आय. बी गवारगुरू, श्रीमती एस.एस खरात व पी.पी जाधव यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी (प्राथ)  अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या बोराखेडी येथील मुख्याध्यापक अनिल कानिराम चव्हाण,  नारखेड ता. नांदुरा येथील सहायक अध्यापक प्रेमचंद देविसिंग राठोड यांना सन्मानित करण्यात आले.
     विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती अंतर्गत विभागीय निवड समिती  सन 2017-18 चा आदर्श तलाठी पुरस्कार मिळालेले मादणीच्या तलाठी श्रीमती व्ही. आर नाईक यांचा गौरव करण्यात आला. पोलीस महासंचालक यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी गौरव करण्यात आला. राज्य गुप्तावार्ता विभागाचे सहायक आयुक्त श्री. कौठाळे, सायबर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, वरिष्ठ गुप्तावार्ता अधिकारी ए.एल भगत, चालक पोलीस हवालदार वासुदेव पांडुरंग कोसे यांचा गौरव यावेळी झाला. तसेच सीसीटीएनएस प्रणालीवर उत्कृष्ट कामगिरी बद्दल छाया गोमलाडू, सपना पालवे, निलेश चौधरी, पंढरी मिसाळ यांचा सन्मानही याप्रसंगी करण्यात आला.  

तालुका स्मार्ट ग्रामपंचायतीच्या सरपंव व ग्रामसेवक यांचा सन्मान
कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते तालुका स्तरावर निवडलेल्या स्मार्ट ग्रामपंचायतीमधील सरपंच व ग्रामसेवक यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. जळगाव जामोद तालुक्यातून बोराळा खु येथील सरपंच सौ. सुरेखा तिजारे व ग्रामसेवक प्रमोद खोद्रे यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे खामगांव तालुक्यातील कंचनपूर येथील सरपंच सौ नलीनी आरज व ग्रामसेवक शिवशंकर पायघन, शेगांव तालुक्यातील मोरगांव डी येथील सरपंच श्रीमती बेबीताई वडोदे व ग्रामसेवक मनिष रोडे, रूधाना ता. संग्रामपूर येथील सरपंच सौ सरिता सातव व ग्रामसेवक राजकुमार काळे,  वसाडी बु ता. नांदुरा येथील सरपंच सौ वनिताताई गिरे व ग्रामसेवक प्रकाश राऊत, निंबारी ता. मलकापूर सरपंच सचिन वराडे व ग्रामसेवक दिपक  ठाकूर, शेलगांव बाजार ता. मोताळा येथील सरपंच सरला खर्चे व ग्रामसेवक अजय मोरे, बुलडाणा तालुक्यातील सावळीचे सरंपच श्रीमती ताराबाई वाघ व ग्रामसेवक विनायक पंडीत, मलगी ता. चिखली येथील सरपंच सौ सुमनताई जाधव व ग्रामसेवक विनायक वायाळ, सिनगांव जहा ता. दे.राजा येथील सरपंच सौ लता गिते व ग्रामसेवक श्रीराम नागरे, भंडारी ता. सिं.राजा येथील सरपंच सौ सुमनताई घुगे व ग्रामसेवक अविनाश नागरे, लोणार तालुक्यातील वझर आघवचे सरपंच रामेश्वर आघाव ग्रामसेवक कारभारी शिंगणे आणि दादुलगव्हाण ता. मेहकर येथील सरपंच सौ उज्वला दळवी व ग्रामसेवक कु. दिपाली कांबळे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
                                                            *******