Thursday 31 October 2019

राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले बुलडाणेकर..!





• एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
* जिल्हाधिकारी यांनी दाखविली हिरवी झेंडी
बुलडाणा, दि.31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज 31 ऑक्टोंबर रोजी आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये बुलडाणेकर राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले. या दौडमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थी, युवक, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी, नागरिक या एकता दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  दौडचा शुभारंभ जिजामाता प्रेक्षागार येथून जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील - भुजबळ यांनी हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
   यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे, तालुका क्रीडा अधिकारी श्री. धरपकवार यांच्यासह स्वयंसेवी संस्था, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर दौड संगम चौक, जयस्तंभ चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँक चौक मार्गे पुन्हा जिजामाता प्रेक्षागार येथे आल्यानंतर दौडचा समारोप झाला. विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, पोलीस व होमगार्ड कर्मचारी, पोलीस पाटील, पोलीस मित्र, अधिकारी-कर्मचारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, प्रशिक्षक, खेळाडू व नागरिक या दौडमध्ये सहभागी झाले होते.

Wednesday 30 October 2019

DIO BULDANA NEWS 30.10.2019

मतदार जनजागृतीसाठी माध्यम संस्थांना
निवडणूक आयोगाकडून पुरस्कार
बुलडाणा, दि. 30 : लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील.
लोकशाही बळकटीकरणासाठी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात जनजागृती, सर्वसामान्यांमध्ये मतदान जागृती व मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना 25 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. मतदार जागृती मोहीम, मोठ्या प्रमाणातील विशेष प्रसिद्धी, जनतेवर पडलेला प्रभाव या निकषांवर पुरस्कारांची निवड करण्यात येईल. त्यासाठी माध्यम संस्थांनी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण यांनी केले आहे.
प्रसारमाध्यमांनी इंग्रजी आणि हिंदीमधून प्रवेशिका पाठवाव्यात. इतर कोणत्याही भाषेतून या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवता येईल. मात्र त्यासोबत इंग्रजीतून भाषांतर केलेली प्रत सोबत जोडावी लागेल. संपर्क - श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली  110001, ईमेल- media.election.eci@gmail.com, अथवा diwaneci@yahoo.co.in, दूरध्वनी क्र. 011-23052133.
*******
टॅक्सी संवर्गातील वाहनांतून ‘चाईल्ड लॉक्‍’ची सुविधा निष्क्रीय करावी
  • उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
बुलडाणा, दि. 30 : रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी कळविलेल्या पत्रानुसार वाहनांतील ‘चाईल्उ लॉक’ या यंत्रणेच्या अतिरिक्त सुविधेचा विविध गुन्हेगारांकडून गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: ही सुविधा टॅक्सी मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी  धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशी चाईल्ड लॉक यंत्रणा टॅक्सीसह अन्य वाहनांतून निष्क्रीय करण्यात यावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        ******
तलाठी पदभरतीच्या निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्रांची होणार तपासणी
  • खुला, अ.जा, अ.ज, विमुक्त जाती- अ प्रवर्गासाठी 7 नोव्हेंबर रोजी तपासणी
  • भटक्या जमाती –ड, इमाव, एसईबीसी व ईडब्ल्युएस प्रवर्गासाठी 8 नोव्हेंबर रोजी तपासणी
बुलडाणा, दि. 30 : महापरीक्षा पोर्टलमार्फत 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत तलाठी पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेच्या निकालामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे व त्यांनी ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे प्रारूप निवड अथवा प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर प्रारूप निवड अथवा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे मुळ प्रमाणपत्र तपासणी प्रवर्गनिहाय 7 व 8 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे करण्यात येणार आहे.
  खुला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती –अ प्रवर्गातील निवड अथवा प्रतीक्षा योदीवरील उमेदवारांनी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपस्थित रहावे.    तसेच भटक्या जमाती- ड, इतर मागासवर्ग, एसईबीसी (सोशल ईकॉनॉमीकली बॅकवर्ड क्लास) व ईडब्ल्यूएस (ईकॉनॉमीकली विकर सेक्शन) प्रवर्गातील उमेदवारांनी 8 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपस्थित रहावे.
   येताना उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना तसेच ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेली सर्व मुळ प्रमाणपत्रे व या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रतीचा एक संच आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो न चुकता सोबत आणावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****
जलसाठ्यातील पाणी आरक्षणासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी नोंदवावी
  • 31 ऑक्टोंबर रोजी होणार पाणी आरक्षण सभा पुढे ढकलली
बुलडाणा, दि. 30 : जिल्हा पाणी आरक्षण समितीची सभा 31 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. बुलडाणा पाटबंधारे विभागाकडील तलावांवरून पिण्याचे पाणी आरक्षणाची  मागणी नोंदविण्याबाबत सर्व नगर परिषद, गटविकास अधिकारी, संबंधित ग्रामपंचायत यांना कळविण्यात आले होते. मात्र नियमित पाणी वापर करणारे बरेचसे बिगर सिंचन पाणी पुरवठा करणारे योजनांचे बिगर सिंचनाची पाणी आरक्षणाची मागणी अद्याप या विभागास अप्राप्त असल्यामुळे व प्रशासकीय कारणास्तव सदर बैठक पुढे ढकलण्यात येत आहे.
   तरी सर्व संबंधितांनी आपले पाणी मागणी कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांच्याकडे 5 नोव्हेंबर 2019 पूर्वी न चुकता नोंदवावी. अन्यथा बिगर सिंचन पाणी आरक्षणाची मागणीची नोंदणी न झाल्यास किंवा विलंब झाल्यास आपली पाणी आरक्षण होणार नाही. या बाबीस संबंधित स्वत: जबाबदार राहतील. होणाऱ्या सभेमध्ये धरणातील उपलब्ध पाणी साठयानुसार, पिण्याच्या पाण्याचे आरक्षणास मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. याची सर्व संबंधित बिगर सिंचन आरक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंद घ्यावी, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                            *****

Friday 11 October 2019

सातपुड्याच्या कुशीतही निनादला 'गो व्होट' चा आवाज..




* भिंगारा गावात मतदान जनजागृती
बुलडाणा, दि. 11 : सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत  भिंगारा येथे आदिवासी बांधवांमध्येमतदान जनजागृती करण्यात आली. या गावातही 'गो व्होट' चा आवाज निनादला. आदिवासी बहुल व दुर्गम असलेल्या भिंगारा गावात पंचायत समिती प्रशासन, जळगांव जामोद गटविकास अधिकारी श्री. भारसाकळे व त्यांच्या चमुने मतदान जनजागृती केली.
   मतदान जनजागृती मोहीम संपूर्ण जळगांव जामोद मतदारसंघात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत रॅली द्वारे व घरोघरी जावून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  रॅली व घरोघरी मतदारांना संपर्क करण्यासाठी ग्रामसेवक, शिक्षक, विद्यार्थी , अंगणवाडी सेविका यांचा मोलाचा सहभाग होता.  आदिवासी भगिनी व बांधवांमध्ये  यावेळी मतदान जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमार्फत  ग्राम भिंगारा या गावातील मुख्य चौकात पथनाट्य  सादरीकरण करून मतदारांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले. विशेष म्हणजे ग्राम भिंगारा येथील बोलीभाषेत विद्यार्थ्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
*****


चुनाव पाठशाळांमधून मतदान जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा
बुलडाणा, दि. 11 : जिल्हाभर जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे व जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन यांच्या मार्गदर्शनात मतदार जनजागृती  मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या चुनाव पाठशाळा घेण्यात येत आहे. या पाठशाळांमधून मतदान जनजागृती करणाऱ्या विषयांच्या निबंध स्पर्धा घेण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी  येथील सु. ब मोहता विद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 21 विद्यार्थी सहभागी झाले.
   त्याचप्रमाणे मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील जिजामाता विद्यालयात  मतदान जनजागृती निमित्त 'मतदान— लोकशाहीचा आधार' या विषयावर  निबंध लेखन स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. निबंध लेखनातून मतदारांचे  लोकशाहीतील महत्व निश्चितच विद्यार्थ्यांना समजून येणार आहे.
                                                                                    *****
निवडणूक निरीक्षक भंवरलाल मेहरा करणार मतदान केंद्रांची पाहणी
बुलडाणा, दि. 11 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्‍या अनुषंगाने जिल्ह्यात दाखल असलेले निवडणूक निरीक्षक (सामान्य) भंवरलाल मेहरा  दि. 12 व 13 ऑक्टोंबर रोजी मेहकर व खामगांव तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी करणार आहे. या पाहणीवेळी दिव्यांग मतदारांसाठी असलेल्या सुविधा, रॅम्प, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था आदींचा आढावाही घेण्यात आला.
   निरीक्षक भंवरलाल मेहरा दि. 12 ऑक्टोंब रोजी सकाळी मेहकर येथे राजकीय पक्ष प्रतिनिधी यांचे निवडणूकसंदर्भात असलेल्या प्रशिक्षणाला भेट, दुपारी मेहकर तालुक्यतील मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. तसेच  दि. 13 सप्टेंबर रोजी  खामगांव येथे इव्हिएम व व्हिव्हिपॅट तयारीचा आढावा व दुपारी तालुक्यतील मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. त्याचप्रमाणे सायं 4 ते 6 वाजेदरम्यन खामगांव येथील विश्राम गृहावर भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत.
                                                *****


बुलडाणा शहरातून पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती
बुलडाणा, दि. 11 : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार राजाने भरघोस मतदान करण्यासाठी प्रशासनाने जिल्हाभर मतदार जनजागृती मोहिम प्रभावीपण राबविण्यात येत आहे. त्यानुसार बुलडाणा शहरातही विविध माध्यमांतून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. बुलडाणा शहरात आज 11 ऑक्टोंबर रोजी पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.
       पथनाट्य जनजागृती  महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलडाणा येथील विद्यार्थ्यांनीसुद्धा सहभाग घेतला. तसेच शाहीर कदम यांनीसुद्धा वासुदेव वेशभूषा करीत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त्‍ श्रीमती राठोड, नगरपालिका  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  पथनाट्य जनता चौक, कारंजा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.
                                                                        *****
निवडणूक निरीक्षक भंवरलाल मेहरा यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी
* खामगांव व जळगांव जामोद मतदार संघातील मतदान केंद्र
बुलडाणा, दि. 11 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात निवडणूक निरीक्षक (सामान्य) भंवरलाल मेहरा दाखल आहेत. त्यांच्याकडे खामगांव, जळगांव जामोद व मेहकर विधानसभा मतदासंघाची जबाबदारी आहे.  त्यांनी  11 ऑक्टोंबर 2019 रोजी खामगांव व जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांतील उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. यामध्ये जळगांव जामोद येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा मतदान केंद्र, पिंपळगांव काळे येथील जिल्हा परिषद हायस्कूल मतदान केंद्र,  जिल्हा केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा आसलगांव, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा खेर्डा, बुरूंगले विद्यालय शेगांव, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर परिषद प्राथमिक शाळा शेगांव यांचा समावेश आहे.  
  त्याचप्रमाणे 10 ऑक्टोंब रोजी मेहकर, जळगांव जामोद व खामगांव विधानसभा मतदारसंघातील इव्हिएम व व्हिव्हिपॅट यांच्या रँण्डम पद्धतीच्या जोडणीवेळी संबंधित ठिकाणी उपस्थित होते. यावेळी राजकीय पक्ष प्रतिनिधींसुद्धा उपस्थित होते.
                                                                        *****

Wednesday 9 October 2019

ELECTION NEWS DIO BULDANA 9.10.2019



लोकशाहीत दिलेल्या मताधिकाराचा उपयोग करून मतदानाचा टक्का वाढवावा
                                                - निवडणूक निरीक्षक डॉ. पी सुरेश बाबु

* बुलडाणा शहरात निघाली मतदार जनजागृती मॅरेथॉन रॅली
बुलडाणा, 9 :  लोकशाहीमध्ये मतदार हाच सर्वश्री आहे. प्रत्येक मतदाराने लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांना मिळालेला मताधिकार  हा वापरलाच  पाहिजे. मताधिकार उपयोगात आणून या विधानसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन  निवडणूक निरीक्षक डॉ.पी सुरेश बाबु यांनी आज 9 ऑक्टोंबर रोजी बुलडाणा शहरात निघालेल्या मॅरेथॉन रॅलीला संबोधित करताना केले.
   आज सकाळी जिजामाता प्रेक्षागार येथून बुलडाणा शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी शहरात मतदार जागृती अभियान अंतर्गत मॅरेथॉन रॅलीचे आयोजन आले होते. या मॅरेथॉन रॅलीला बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश लोखंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून  रॅलीचा शुभारंभ केला. लोककलावंत विजय कदम यांनी मतदान जागृती अभियानाअंतर्गत लोककलेच्या माध्यमातून लोकगीते सादर केली. सदर मतदार जनजागृती रॅली जिजामाता प्रेक्षागार पासून संगम चौक, एसटी स्टॅन्ड, जांभरून रोड, सुवर्ण नगर या मार्गाने काढण्यात आली.
    रॅलीचा समारोप मुख्य निवडणूक निरीक्षक डॉक्टर सुरेश बाबु यांच्या हस्ते शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात करण्यात आला. बुलडाणा विधानसभा निवडणूक निरीक्षक डॉ. पी सुरेश बाबु यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले,   आपल्या परिसरातील मतदारांमध्ये जागृती घडवून आणून 21 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कशी वाढेल हे प्रत्येकाने बघावे . याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे म्हणाले,  मतदारांनी निर्भयपणे मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा तसेच 22-बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करावी.
  या रॅलीमध्ये प्रमुख्याने शिक्षण विभागाचे श्री. पाटील, उपशिक्षणाधिकारी श्री. वराडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी  श्री. वाघमोडे, नायब तहसीलदार श्री. पाटील यांच्या समवेत विविध शासकीय अधिकारी - कर्मचारी तथा बुलडाणा शहरातील राजीव गांधी मिलिटरी स्कूल, भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय, एडेड हायस्कूल , श्री शिवाजी विद्यालय,  जिल्हा परिषद विद्यालय आदींचे विद्यार्थी,  शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मतदार जागृती मॅरेथॉन रॅलीचे प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन नरेंद्र लांजेवार यांनी केले.
                                                                        *****



जळगांव जामोद तालुक्यातील आठवडी बाजारात मतदार जनजागृती
* सेल्फी पाँईटद्वारे मतदारांनी घेतल्या सेल्फी
 बुलडाणा, दि. 9 :  दसऱ्याच्या मुहूर्तावर आज जळगाव जामोद मतदार संघातील सर्वात मोठ्या आठवडी बाजारात असालगांव येथे ग्राम पंचायत, पंचायत समिती व महसूल विभागाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपट्याच्या पानांच्या चित्रावर मतदानाच्या बोटांची खूण असलेले छोटे कार्ड मतदारांना वाटप करण्यात आले.
    तसेच मतदान सेल्फी स्टँड  तयार करून प्रबोधन करण्यात आले. या सेल्फी पाँईटच्या माध्यमातून यावेळी अनेक मतदारांनी सेल्फी काढत मतदान करण्याचे आवाहन केले.  याशिवाय EVM मशीन व VVPAT चे प्रात्यक्षिक मतदारांना दाखविण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, विस्तार अधिकारी श्री. मोरे, ग्रामसेवक धीरज मारोडे , तलाठी गजानन सरप, तलाठी श्रीकांत, मंडळ अधिकारी श्री भेलके दादा उपस्थित होते. याप्रसंगी बाजारात सर्व विक्रेते व ग्राहक यांच्यापर्यंत पोहचून त्यांना 21 तारखेला न चुकता मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यात आले.
                                                                        ****


निवडणूक निरिक्षकांनी घेतला निवडणूकी तयारीचा आढावा
विविध ठिकाणी असलेल्या चेकपोस्टवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश
   बुलडाणा,दि.9 : विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्ह्यातील निर्माण करण्यात आलेल्या चेकपोस्टवर बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच तपासणी करण्यात येणाऱ्या वाहनांची व्हिडीओग्राफी करावी, असे निर्देश निवडणूक निरिक्षकांनी 7 ऑक्टोंबर रोजी  दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय नियुक्ती केलेल्या निवडणूक निरीक्षकांनी बैठक घेतली.
   बैठकीला मेहकर, खामगांव व जळगांव जामोद मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सामान्य)  भंवरलाल मेहरा, मलकापूर व बुलडाणा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक डॉ पी सुरेश बाबु, चिखली व सिंदखेड राजा मतदारसंघ कार्यक्षेत्र असलले निवडणूक निरीक्ष ओमप्रकाश बुनकर, निवडणूक खर्च निरीक्षक कोमी शेट्टी मुरलीधर, कायदा व सुव्यवस्थेचे निवडणूक निरीक्षक संजय कुमार, जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील- भुजबळ, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे आदी उपस्थित होते.
      याप्रसंगी निवडणूक निरिक्षक भंवरलाल मेहरा म्हणाले,  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी त्याचबरोबर दिव्यांग मतदारांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. मतदानाच्या दिवशी मतदारांना सुट्टी अथवा सवलत देण्याचे निर्देश सर्व खाजगी आस्थापनांना देण्यात यावे. मतदान प्रक्रियेत कुठलीही अडचण उद्भवू नये, याकरीता सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. सेक्टर ऑफिसर सोबत मास्टर ट्रेनर अथवा ईव्हीएम एक्सपर्ट ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा. याकरीता त्यांचेकडून मतदानाचा फॉर्म भरुन घ्यावा. पेडन्युजवर बारकाईने लक्ष ठेवावे.
   कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक संजय कुमार म्हणाले,  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करावे. सर्व्हीस वोटरला विहित वेळेत मतपत्रिका पाठविण्याची व्यवस्था करावी. तसेच जिल्ह्यातील परवानाधारकांकडून शस्त्रात्रे जमा करावीत. प्रत्येक उमेदवाराच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवावे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलीस, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच जिल्ह्यात नेमण्यात आलेले फ्लाईग स्कॉड, व्हीडीओ सर्व्हिलन्स टीम, स्थिर निगराणी पथके यांनी वाहनांची तपासणी करावी. निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सभा, बैठकांची माहिती घेऊन त्यानुसार पथकांची नेमणूक करावी.
    विना परवानगी कुठलीही सभा, बैठका होणार नाही याची दक्षता निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच प्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी केल्यात. तत्पूर्वी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी निवडणूक निरिक्षकांना जिल्ह्यातील कृषि, उद्योग, पर्यटन, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय घडामोडींच्या संक्षिप्त माहितीसोबतच जिल्हा प्रशासनाने निवडणूकीसाठी केलेल्या तयारीची तर पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील - भुजबळ यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त, चेकपोस्ट, अवैध दारु वाहतुक रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती निवडणूक निरिक्षकांना दिली. जि.प मुकाअ षण्मुगराजन यांनी स्वीप कार्यक्रमातंर्गत राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेली पुर्वपिठीका निवडणूक यावेळी संबंधित समित्यांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                                    ***



आपट्याच्या पानांच्या आकाराचे मतदार जनजागृतीच्या बॅचेसचे वाटप
* मोताळा तालुक्यात 61 ग्रामपंचायतींमध्ये उपक्रम
 बुलडाणा, दि. 9 :  दसऱ्याच्या मुहूर्तावर आपट्याच्या पानांना सोने म्हणून देण्यात येते. या प्रथेला मतदार जन जागृतीसाठी उपयोग करण्याचे मोताळा तालुक्यातील पंचायत समिती प्रशासनाने ठरविले. त्यानुसार स्वीप कार्यक्रमातंर्गत मोताळा तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींमध्ये  आपट्याच्या पानांच्या आकाराचे मतदार जनजागृतीचे बॅचेस तयार करून वाटप करण्यात आले. सोने म्हणून देण्यात येणाऱ्या आपट्यांच्या पानांऐवजी मतदार जनजागृतीचे बॅचेस देण्यात येवून मतदार जनजागृती करण्यात आली. मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार, पान्हेरा, परडा, शिरवा आदींसह तालुक्यातील अन्य गावांमध्ये बॅचेसचे वितरण करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे तालुकयात कौतुक करण्यात येत आहे. बॅचेस वितरण करताना अधिकाऱ्यांनी 21 ऑक्टोंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले.
      *************


माध्यम कक्षास निवडणूक निरीक्षक ओमप्रकाश बुनकर यांची भेट
बुलडाणा, दि. 9 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदारसंघ निहाय निवडणूक  निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक तयारी बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्ष, माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती कक्षास सिंदखेड राजा व चिखली मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक ओमप्रकाश बुनकर यांनी 7 ऑक्टोंबर रोजी भेट दिली. यावेळी  जिल्हा माहिती अधिकारी एस. के बावस्कर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिष जाधव,  माहिती सहाय्यक निलेश तायडे, पाटबंधारे विभागाचे श्री. राजपूत यांची उपस्थिती होती.
    याप्रसंगी निवडणूक निरीक्षक श्री. बुनकर म्हणाले,  उमेदवारांकडून देण्यात येणाऱ्या पेड न्यूजवर बारकाईने लक्ष ठेवावे. कुठल्याही परिस्थितीत पेड न्यूज शोधून उमेदवारांना नोटीस  द्यावीत. तसेच त्याचा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट करावा. त्याचप्रमाणे विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आलेल्या मिडीया कक्षांनी स्थानिक केबल चॅनेल, स्थानिक वर्तमानपत्रांवर बारकाईने लक्ष ठेवावे. त्याचा अहवाल जिल्हा समितीकडे पाठवावा.
    ते पुढे म्हणाले, मतदार जनजागृतीसाठी व्यवस्थित प्रसिद्धी करावी.  यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. बावस्कर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेले मॅग्नीफिशंट महाराष्ट्र, निवडणूक पुर्वपिठीका देवून निरीक्षकांचे स्वागत केले. यावेळी माध्यम कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
                                                                                    ******