“अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाचा सुरुवात Ø निरोगी पिढीसाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
बुलढाणा, (जिमाका) दि. १५ : जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाचा भव्य उद्घाटन सोहळा आज जिल्हा रुग्णालय परिसरात उत्साहात पार पडला.
यावेळी बाह्यरुग्ण विभाग परिसरात जिल्हा नर्सिंग कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी प्रश्नमंजुषा स्वरूपात सिकलसेल ॲनिमिया विषयक जनजागृती कार्यक्रम सादर केला. जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. अमोल गीते यांनी उपस्थित नागरिकांना सिकलसेल आजारासंदर्भात प्रश्न विचारून उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच दि. १५ जानेवारी ते ०७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘अरुणोदय’ विशेष अभियाना ची सविस्तर माहिती देत जनजागृती केली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सिकलसेल ॲनिमिया आजाराची कारणे, लक्षणे, उपचार पद्धती तसेच वेळेवर तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजीत मंडाले यांनी लग्नापूर्वी सिकलसेल तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करून, निरोगी पिढीसाठी नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी मोफत सिकलसेल तपासणी करून घ्यावी व आरोग्यदायी भविष्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, जिल्हा सिकलसेल समन्वयक सिताराम मोरे, नर्सिंग ऑफिसर उंबरकर, समुपदेशक गाडेकर, जिल्हा नर्सिंग कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी, आरोग्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000



Comments
Post a Comment