हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमधील भव्य कार्यक्रम यशस्वी करावा - मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी
‘
बुलढाणा, दि. १३ जानेवारी
(जिमाका) ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या
350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण
व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक
उपस्थित राहणार असून, त्यांच्या सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा व मूलभूत सोयी-सुविधांबाबत
सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री
यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी
यांनी दिल्या.
नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या
पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी
ते बोलत होते.
बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्यासह
संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त
डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे कार्यकारी अधिकारी
व शासकीय समन्वयक डॉ. जगदीश सकवान, गुरुद्वारा बोर्डाकडून अधीक्षक हरजितसिंघ कडेवाले,
राज्य समितीचे डॉ. जगदीश सकवान, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, बीड, परभणी, हिंगोली,
लातूर, धाराशिव, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,
महापालिका आयुक्त, शिक्षण, परिवहन, अल्पसंख्याक विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा माहिती
अधिकारी उपस्थित होते.
श्रीकर परदेशी म्हणाले की, या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय
स्तरावरून श्री गुरु तेग बहादूर यांना मानणारे लाखो भाविक नांदेडमध्ये येणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी,
भगत नामदेव व उदासीन समाज-संप्रदाय असे नऊ एकत्र येणार आहेत. श्री गुरु तेग बहादुर
यांच्या त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश-विदेशात पोहोचवणे,
हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी 26 विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
सुमारे १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता,
वाहतूक नियोजन, निवास व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आदी मूलभूत सुविधा
पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध व
वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी
https://gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर रस्ते, रेल्वे, बस, वाहतूक व्यवस्था
तसेच कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या
यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीच्या समन्वयाने सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी
पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सचिव रुचेश जयवंशी म्हणाले की, मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे, महानगरपालिका,
शाळा-महाविद्यालये, पोलीस यंत्रणा व परिवहन विभागाने समन्वयाने काम करत भाविकांना सर्व
सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर कार्यवाही करावी.
रामेश्वर नाईक म्हणाले की, श्री गुरु तेग बहादुर यांनी राष्ट्र व संस्कृतीच्या
रक्षणासाठी दिलेले बलिदान सर्वसामान्य जनतेपर्यंत, विशेषतः गावपातळीवर विविध उपक्रमांच्या
माध्यमातून पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम
संस्था आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या हस्ते
सन्मानित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी राहूल कर्डिले म्हणाले की, मुख्य कार्यक्रम असर्जन परिसरातील सार्वजनिक
बांधकाम विभागाच्या मैदानावर होणार असून मैदानाचे सपाटीकरण व स्वच्छतेच्या कामासह मुख्य
पेंडाल उभारणीसाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. विद्युत व पाणीपुरवठ्याची व्यवस्था
लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. भाविकांसाठी
जिल्हानिहाय पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून निवासासाठी शहरातील शाळा,
महाविद्यालये व मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र
नियोजन करण्यात आले असून आवश्यक वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. नांदेड हे
रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा
उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लंगर, निवास व वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन
आढावा घेतला जात असून आरोग्य सेवांसाठी 72 रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात
येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विविध आरोग्य स्टॉल उभारण्यात येणार आहोत. स्वच्छतेसाठी
सध्या 100 शौचालयांची व्यवस्था उपलब्ध आहे. यासाठी इतर जिल्ह्यांचेही सहकार्य घेतले
जाणार आहे. कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन
करण्यात आले असून 15 जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत. तसेच होर्डिंग्सद्वारे
मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश
कुमार यांनी सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व सुरक्षा पासेस याबाबतच्या नियोजनाची सविस्तर
माहिती दिली.
०००

Comments
Post a Comment