Thursday 28 September 2023

DIO BULDANA NEWS 28.09.2023

 पाण्याच्या उपलब्धतेसाठी वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 28 : पावसाळा संपल्यानंतरही पाण्याचा प्रवाह नाले आणि ओढ्यातून सुरू राहतो. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेसाठी श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

अल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याच्या सूचना कृषी संचालक आणि जिल्हाधिकारी यांनी केल्या आहे. सन 2023-24 मध्ये जून ते सप्टेंबर पावसाळी हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले आणि ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरू राहतो. हा पाण्याचा प्रभाव पारंपारिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा करण्यात येतो. यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी वनराई बंधारे लोक सहभागातून घेण्यात येणार आहे.

कृषी विभागांतर्गत दरवर्षी वनराई बंधारे बांधण्याचे काम केले जाते. वनराई बंधारे बांधल्यास संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होते. तसेच पाणीसाठा निर्माण क्षमता वाढते. रब्बी पीक घेण्यास शेतकऱ्यांना मदत होते. यावर्षी प्रत्येक कृषी सहाय्यकांना 10 वनराई बंधारे श्रमदानातून बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. संपूर्ण जिल्ह्यात यावर्षी लक्षांकानुसार वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जागांची स्थळनिश्चिती करण्यात आली आहे.

वनराई बंधाऱ्यांमुळे जिल्ह्यातील संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ होणार असून रब्बी क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी सहभागी होऊन वनराई बंधारे बांधण्याकरिता कृषी विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

00000

बुधवारी जेम पोर्टलविषयी बुधवारी प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 28 : शासनाला लागणाऱ्या सेवा आणि वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या जेम पोर्टलविषयी बुधवार, दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात हे प्रशिक्षण होणार आहे. शासकीय कार्यालयातील अधिनस्त सर्व विभागातील कार्यालय प्रमुख आणि संबंधितांसाठी सदर प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणास लॅपटॉपसह उपस्थित राहावे लागणार आहे.

केंद्र शासनाने विकसित केलेल्या गर्व्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलची कार्यपद्धती, राज्य शासनास वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी स्वीकृत करण्यास मान्यता दिली आहे. जेम पोर्टलचा वापर करुन पोर्टलद्वारे वस्तू व सेवांची खरेदी करण्यास शासकीय, निमशासकीय विभाग आणि स्वायत्त संस्थांना बंधनकारक आहे. उद्योग विभागाच्या सुधारीत खरेदी धोरणातील तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

जेमवरील वस्तू आणि सेवा खरेदीसंदर्भात प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

ज्येष्ठ नागरिक दिनी आरोग्य शिबीराचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ नागरीकांच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरीकांकरीता सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेरी, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा आणि ज्येष्ठ नागरीकांसाठी कार्य करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परीसंवाद, ज्येष्ठ नागरीक कायदे आणि योजनांची माहिती, वृद्धांचे हक्क, सोयीसुविधा आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांनी दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी श्री स्वामी विवेकानंद संस्था, हिवरा आश्रम, ता. मेहकर येथे सकाळी 11 वाजता आरोग्य तपासणी शिबिराकरीता उपस्थित राहून आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

000000

शुक्रवारी शौर्य दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा, विरमाता, विरपिता यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्यीत शिरून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहचविण्यासाठी शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने माजी सैनिक, शहिद जवानांच्या विरपत्नी, विरमाता, विरपिता आणि शौर्य पदकधारकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी दि 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचा कार्यक्रम जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लिडर रूपाली सरोदे यांनी केले आहे.

00000

प्रत्येक तालुक्यात होणार सेंद्रिय शेतीचे क्लस्टर

बुलडाणा, दि. 28 : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेती योजना राबविली जाते. आता ही योजना डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्ह्यात व्यापक पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यानुसार ‘सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती’साठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सेंद्रिय शेतीचे क्लस्टर तयार केले जाणार आहे.

सेंद्रीय शेतीसाठी परंपरागत कृषी विकास योजना, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या तीन योजनांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकन्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे आदी उद्दिष्टे योजनेत ठेवण्यात आली आहेत.

परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन

योजनेंतर्गत प्रति गट २० हेक्टर याप्रमाणे एकूण २५ गटांचे लक्षांक जिल्ह्यास देण्यात आले आहे. त्यासाठी बुलडाणा आणि चिखली या २ तालुक्यांमध्ये हे गट स्थापन करण्यात येत आहेत. यात प्रति शेतकरी १ हेक्टर मर्यादेपर्यंत लाभ देय असणार आहे.

या सेंद्रिय शेतकरी गटाची आत्मा अंतर्गत नोंदणी करावयाची आहे. प्रती गट लाभ देण्याचे क्षेत्र जास्तीत जास्त २० हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. परंतू सेंद्रिय शेतीमध्ये शेत जमिनीचे प्रमाणीकरण असल्याने सर्व सदस्यांचे आठ अ मधील संपूर्ण क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली आणणे अभिप्रेत आहे. प्रति हेक्टर ३२ हजर १३० रुपयांप्रमाणे बाबानिहाय अनुदान पुढील 3 वर्षांकरिता उपलब्ध होणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन

या १०० टक्के राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या ३ वर्षांकरिता जिल्ह्याकरीता प्रति वर्ष १५० सेंद्रिय शेतकरी गट आणि १५ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे लक्षांक प्राप्त आहे. १३ तालुक्यामध्ये १० सेंद्रिय शेतकरी गट आणि कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा आणि जळगाव जामोद यांना प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण १५० गट स्थापन केले जाणार आहे. पुढील ०३ वर्षामध्ये एकूण ४५० सेंद्रिय गट स्थापन केले जाणार आहे.

एक सेंद्रिय शेतकरी गट हा ५० हेक्टरचा राहणार आहे. प्रति शेतकरी जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्र लाभासाठी ग्राह्य राहणार आहे. तालुक्यात एका गावात शक्यतो सलग क्षेत्रात हा सेंद्रिय गट स्थापन करावयाचा आहे. सेंद्रिय शेतकरी गटाची आत्मा अंतर्गत नोंदणी करावयाची आहे. प्रतिवर्ष ७ हजार ५०० रूपये हेक्टरप्रमाणे 3 वर्षात २२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सेंद्रिय गटांच्या माध्यमातून सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली आणण्यात येणार आहे. प्रति गट प्रति हेक्टर १३ हजार ४६४ रुपयांप्रमाणे बाबानिहाय अनुदान पुढील 3 वर्षाकरिता उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये ५० हेक्टर क्षेत्राचा १ नैसर्गिक समूह याप्रमाणे एकूण ७५ समूह स्थापन करण्यात येणार आहे. एका गावात किंवा जवळपासच्या 2-3 गावात ५० हेक्टर क्षेत्राचा एक नैसर्गिक शेतीचा समूह असणार आहे. प्रत्येक समूहामध्ये किमान ५० किंवा त्याहून अधिक शेतकरी असावे लागणार आहे.

समूहातील शेतकऱ्याला कमाल १ हेक्टर क्षेत्राचा लाभ मिळू शकतो. तथापि त्याचे उर्वरित क्षेत्र कोणतेही अतिरिक्त साहाय्य न देता संपूर्ण क्षेत्र घेण्याची मुभा राहणार आहे. निवड केलेल्या समूहास प्रथम वर्षात शेतीशाळेद्वारे नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती, प्रात्यक्षिकाद्वारे अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यानंतरच्या ३ वर्षात प्रशिक्षण, क्षेत्रीय भेटी, स्वत:चे शेतीवर निविष्टा निर्मितीसाठी डीबीटीद्वारे अर्थसहाय्य आणि प्रमाणीकरण याबाबी राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक समूहासाठी पूर्वीपासूच नैसर्गिक शेती करीत असेलल्या आणि त्याबाबत ज्ञान आणि संवाद कौशल्य असलेल्या व्यक्तीची चॅम्पियन शेतकरी म्हणून तर एका स्थानिक युवक शेतकऱ्याची संसाधन व्यक्ती म्हणून ग्रामपंचायतीच्या सल्ल्याने मानधन तत्वावर निवड करण्यात येणार आहे. प्रति गट प्रति हेक्टर २७ हजार २५० रुपयांप्रमाणे बाबानिहाय अनुदान पुढील ३ वर्षाकरिता उपलब्ध होणार आहे.

या तीनही योजनांमध्ये शेतकरी प्रशिक्षण, सेंद्रिय शेतीमध्ये रुपांतरणासाठी अर्थसहाय्य, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेस सहाय्य आणि पूरक भागभांडवल देणे, कंपनी स्तरावर जैविक निविष्टा निर्मिती केंद्र स्थापन करणे, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण आदी बाबीसाठी मापदंडानुसार अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या योजनांमध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

शेतकऱ्यांसाठी रब्बी ज्वारी पिक लागवड तंत्रज्ञान

बुलडाणा, दि. 28 : येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून रब्बी ज्वारीची लागवड जिल्ह्यात होते. ज्वारीची उत्पादकता वाढावी, यासाठी कृषि विभागाकडून रब्बी ज्वारी पिक लागवड तंत्रज्ञान देण्यात येते. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

रब्बी ज्वारीचे लागवड तंत्रामध्ये विदर्भात रब्बी ज्वारीची लागवड कोरडवाहू आणि ओलिताखाली या दोन्ही क्षेत्रात केली जाते. ज्वारीचे पिक घेताना जमीन आणि पूर्वमशागतीमध्ये रब्बी ज्वारीच्या पेरणीकरीता मध्यम ते खोल, भारी व जास्त जलधारणा असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिनीची निवड करावी. खरीपातील उडीद किंवा मुंग काढल्यावर वखराच्या 3 ते 4 खोल पाळ्या देऊन जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी. भरखते देताना रब्बी ज्वारीला हेक्टरी 10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे आणि त्यानंतर वखराची पाळी देऊन जमिनीत चांगले मिसळावे.

रासायनिक खते देताना कोरडवाहू रब्बी ज्वारीकरीता 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश यात 110 किलो युरिया अधिक 126 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 42 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रत्येक हेक्टरी या खत मात्रेची शिफारस केली आहे. कोरडवाहू रब्बी ज्वारीला खताची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी द्यावे. परंतू रब्बी ज्वारी ओलिताखाली घ्यावयाची असल्यास 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश यात 200 किलो सुफला २०:२०:०० अधिक 76 किलो  म्युरेट ऑफ  पोटॅश अथवा 87 किलो युरिया अधिक 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 76 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी 40 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीसोबतच द्यावे व उरलेली 40 किलो नत्राची मात्रा 78 किलो युरिया पिक 25 ते 30 दिवसांचे असताना द्यावे. वरखत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून द्यावी. मृद चाचणीत आवश्यकता भासल्यास पालाशची मात्रा द्यावी.

रब्बी ज्वारीची पेरणी साधारणत: 25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर यादरम्यान करावी. पेरणीस उशीर झाल्यास मुरमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडांची योग्य ती संख्या मिळत नाही. रब्बी ज्वारीसाठी प्रति हेक्टरी 7.5 ते 10 किलो प्रमाणित बियाणे पुरेसे आहे. पेरणी 45 सेंमी म्हणजेच 1.5 फुटाच्या तिफणीने करावी. पेरणीसाठी दोन चाड्याच्या तिफणीचा उपयोग करावा, जेणे करून पेरणीसोबतच खते देणे सोईचे होईल. पेरणीपासून 15  ते 20 दिवसांनी  विरळणी करावी.  त्यासाठी  दोन  झाडातील अंतर  15 ते 20 सेंमी ठेवावे. हेक्टरी झाडांची संख्या 1.50 लाखापर्यत ठेवावी. विरळणी करताना खोडमाशी ग्रस्त रोपे काढावीत.

ओलीताचे व्यवस्थापन करताना रब्बी ज्वारीला ओलिताची अत्यंत आवश्यकता असते. रब्बी  हंगामात पावसाचे प्रमाण  फार  कमी  असते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाच्या विविध अवस्थेत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. पिकांची जोमदार वाढीची सुरुवात ही 35 ते 40 दिवसांनी होत असते. पिक हे पोटरीत येण्याचा काळ हा 60 ते 65 दिवसांचा असतो. पिक फुलोऱ्यात येण्याचा काल हा 70 ते 75 दिवसाचा असून दाणे भरण्याचा काळ हा 85 ते 95 दिवसाचा आहे. 

ज्वारीच्या पिकाची वेळोवेळी आंतरमशागत करून पिक 40-45 दिवसाचे होईपर्यत 2-3 कोळपण्या घ्याव्यात आणि एक-दोन वेळा खुरपणी करावी. रब्बी ज्वारीचे पिक परिपक्व झाल्यावर ताबडतोब कापणी व मळणी करावी. ज्यामुळे ज्वारी खराब होणार नाही. ज्वारी साठवणुकीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 20 टक्क्याच्या वर असू नये. शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानाचा उपयोग करून लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000

कृषि विभागाकडून रब्बी मका पिक लागवडीसाठी मार्गदर्शन

            बुलडाणा, दि. 28 : जिल्ह्यात रब्बी हंगामात मका पिकाची लागवड करण्यात येते. या पिकाची लागवड करण्यासाठी कृषि विभागाकडून मार्गदर्शन करण्यात येते. या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मका हे राज्याचे महत्वाचे पिक आहे. या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. पिकाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 1 हजार 928 किलो प्रती हेक्टर आणि उत्पादन 13.65 लक्ष टन आहे. तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात या पिकानंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक आहे. अन्न धान्याव्यतिरीक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अँसिटीक व लॅटीक अँसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लॅस्टीक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्जीन तसेच बुट पॉलीश आदी पदार्थ तयार करण्यासाठी होतो.

मका पिकासाठी हवामान हे उष्ण, समशीतोष्ण आणि शीत (थंड) अशा वेगवेगळ्या हवामानाशी समरस होण्याची क्षमता असणारे पीक आहे. समुद्र सपाटीपासून ते 2700 मीटर उंचीच्या ठिकाणी देखील मका लागवड करता येते. परंतू पिक वाढीच्या कोणत्याही काळात धुक्याचे हवामान मक्यास मानवत नाही. मका उगवणीसाठी 18 डिग्री सेल्सियस तापमान योग्य आहे, त्यापेक्षा कमी तापमान असल्यास थंड आणि ओलसरपणामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकाच्या उगवणीवर प्रतिकुल परिणाम होतो.

मका पिकाच्या योग्य वाढीसाठी 25 ते 30 डिग्री सेल्सियस तापमान चांगले असते. परंतु जेथे सौम्य तापमान 20 ते 25 डिग्री सेल्सियस आहे, अशा ठिकाणी मका पिक वर्षभर घेता येते. 35 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमान असल्यास पीक उत्पादनात घट येते. परागीभवनाचे वेळी अधिक तापमान आणि आर्द्रता कमी असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन आणि फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते.

जमीन

मक्यासाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन चांगली असते. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पिक फार चांगले येते. परंतु अधिक आम्ल सामू 4.5 पेक्षा कमी आणि चोपण अगर क्षारयुक्त 8.5 पेक्षा अधिक सामू असलेल्या जमिनीत मका घेऊ नये. तसेच दलदलीची जमीनसुद्धा टाळावी. पिकासाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.

पूर्वमशागत

जमिनीची खोल 15 ते 20 सेंमी नांगरट करावी. पिकाची धसकटे, अवशेष, काडीकचरा आदी खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळतो व जमिनीचा पोत सुधारतो. कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी 10 ते 12 टन साधारणत: 25 ते 30 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.

सुधारीत वाण

सुधारित वाणांचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळते. मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती या स्थानिक वाणांपेक्षा 60 ते 80 टक्के अधिक उत्पादन देतात. विविध कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या मक्याच्या संमिश्र आणि संकरीत जाती उपलब्ध असून पाऊस आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी.

पेरणीची वेळ

मका हे खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात जून ते जुलै दुसरा आठवडा खरिपातील पेरणीस उशीर करू नये, उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य राहत नाही. रब्बी हंगामात 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर, उन्हाळी हंगामात जानेवारी ते फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात पेरणी करावी. धान्य पिकासाठी 15-20 किलो बियाणे प्रती हेक्टरी चारा पिकासाठी 75 किलो बियाणे प्रती हेक्टरी उपयोगात आणावे.

पेरणीची पद्धत

पेरणी टोकण पद्धतीने करावी. सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेऊन पेरणी करावी. उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी 75 सेंमी अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून 20 ते 25 सेंमी अंतरावर टोकण करावी. लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत 60 सेंमी आणि दोन रोपात 20 सेंमी अंतर ठेवून टोकण करावी. रब्बी हंगामात मक्याची पेरणी 60 सेंमी अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत निम्म्या उंचीवर एका बाजूला 20 सेंमी अंतरावर 2 बिया 4-5 सेंमी खोल टोकण करून करावी. एक हेक्टर पेरणीसाठी 15-20 किलो बियाणे लागते. अश्याप्रकारे काढणीच्या वेळी प्रति हेक्टरी 90 हजार रोप संख्या मिळते आणि परिणामी अधिक उत्पन्न मिळते.

शेतकऱ्यांनी कृषि विभगाच्या सल्ल्याने मका पिकाची लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000

वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 28 : मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात योजनेतून आतापर्यंत 62 शेततळे पूर्ण झाले आहेत. सध्याच्या पावसाच्या खंड काळात शेततळ्यामध्ये जमा झालेल्या पाण्याचा खरीप पिके, फळबागांच्या संरक्षित सिंचनासाठी उपयोग होत आहे. या योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी पूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे यासह इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसणे आवश्यक आहे.

सध्याची पाणीटंचाईची परिस्थिती पाहता भविष्यात फळबाग वाचवण्यासाठी सध्या उपलब्ध असलेली विहीर आणि बोअरवेलचे, तसेच परतीच्या पावसाद्वारे उपलब्ध होणारे पाणी अस्तरीकरणासह शेततळे योजनेचा लाभ घेऊन साठवणे गरजेचे आहे. या योजनेतून अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत आणि अस्तरीकरणासह शेततळ्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. काम पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान जमा करण्यात येते.

शेततळे योजनेतून संरक्षित सिंचन शेतीला मिळावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी शेततळ्याचा लाभ घेतलेला नसलेल्या जिल्ह्यातील फळबागधारक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर सीएससी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरित्या ऑनलाईन नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

00000

सीईटी, जेईई, नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

बुलडाणा, दि. 28 : जिल्ह्यातील एमएच-सीईटी, जेईई, नीट 2025ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात येणार आहे. येळगाव येथील ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधिक्षक सुनील कडासने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास पात्र विद्यार्थी आणि पालकांनी आवश्यक मुळ आणि झेरॉक्स कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले आहे.

0000000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : दर महिन्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोबर 2023 महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार, दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवाव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी कळविले आहे.

00000

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना

बुलडाणा,दि. 28 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत सन 2023-24 या वित्तिय वर्षासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना घेण्यात आली आहे.

या योजनेचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज अनुषंगिक सर्व कागदपत्रांसह संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयामध्ये दि. 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत. सदर योजनेचा लाभ ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

00000           

स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 28 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेचा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी दि. 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे.

स्टँड अप इंडिया योजनेसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. यात उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रामणपत्र व बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावीत. योजनेत सवलतीस पात्र नवउद्योजकांनी 10 टक्के स्व हिस्सा भरणा केल्यानंतर आणि बँकेने अर्जदारास स्टॅड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी परिशिष्ट अ, नमुना अर्ज भरून द्यावा. अर्जात माहिती नमूद करुन त्यासह आवश्यक कागदपत्रे जोडून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास दि. 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

शुक्रवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 28 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबी घेण्यात येते. मात्र शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी तपासणीच्या दिवशी स्थानिक सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नियमित शुक्रवारी मतिमंद, मनोरूग्ण, कान, नाक, घसा व नेत्र संबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी ईद-ए-मिलाद निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवशीचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अस्थीव्यंग तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.

00000

वैयक्तिक लाभाच्या योजना अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ

बुलडाणा, दि. 28 : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे सन 2023-24 या वितीय वर्षात विशेष घटक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 90 टक्के अनुदानावर वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत, त्याबाबत पुर्वी लाभार्थ्यांकडून दि. 29 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी आता दि. 5 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना पिठाच्या चक्कीकरीता 90 टक्के अनुदान. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना शिलाई मशीनकरीता 90 टक्के अनुदान. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मसाला उद्योग यंत्राकरीता 90 टक्के अनुदान. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मिनी दालमिल यंत्राकरीता 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेकरीता अर्ज घेण्याकरीता दि. 5ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष घटक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 90 टक्के अनुदानावर वैयक्तिक लाभाच्या उपरोक्त योजनेचे अर्ज पात्र लाभार्थ्यांकडून दि. 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत एका‍त्मिक बालविकास सेवा योजना, ग्रामीण प्रकल्प कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

000000

Wednesday 27 September 2023

DIO BULDANA NEWS 27.09.2023




 देव्हारी पुनर्वसन प्रश्नी तातडीने कार्यवाही करावी

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 27 : देव्हारी येथील पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी येथील नागरिकांकडून सहमती घेऊन नियमाप्रमाणे लाभ देण्याची तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात देव्हारी येथील पुनर्वसनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

देव्हारी येथील पुनर्वसनास समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार 298 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यात 10 नागरिकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रस्तावाबात नोटीस देण्यात यावी. प्रस्तावाची परत छाननी करून त्यांच्याकडून इतर पुरावे घेऊन कार्यवाही करण्यात यावी. पुनर्वसन गतीने होण्यासाठी नागरिकांकडून तातडीने संमती पत्र लिहून घ्यावे. त्यानंतर त्यांना पुनर्वसनासाठी 1 लाख रूपयांचे वितरण करण्यात यावे. जमिनीचा ताबा दिल्यानंतर उर्वरीत 9 लाख रुपयांपैकी चार लाख रूपयांची रक्कम देण्यात यावी. उर्वरीत पाच लाख रूपयांची रक्कम संयुक्त खात्या मुदत ठेवींमध्ये ठेवण्यात यावी.

मोबदला देताना घरासाठी दुप्पट आणि शेतीसाठी चारपट रक्कम देण्यात येते. सुमारे पाच कोटी 57 लाख रूपयांचे मुल्यांकन निघाले असल्याने 68 कोटीची रक्कम द्यावी लागणार आहे. सध्या 62 कोटी रूपये उपलब्ध असून उर्वरीत निधीसाठी मागणी करावी. थेट खरेदीने जमिनीचे संपादन होणार असल्यामुळे यात पुनर्वसनाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नसल्याने यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करून ही प्रक्रिया पुर्ण करावी.

देव्हारीच्या पुनर्वसनासाठी गतीने कार्यवाही होण्यासाठी कॅम्प आयोजित करून एकत्रित प्रक्रिया करावी. या कॅम्पमध्ये सर्व अर्ज आणि नमुने ठेवण्यात यावे. बँक खाते एकाच बँकेत उघडण्यात यावे. तसेच संयुक्त खाते एकाच बॅंकेत उघडल्यास कार्यवाही लवकर होण्यास मदत होईल. ही प्रक्रिया येत्या एक महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिले.

000000




बुलढाण्यात शुक्रवारी 6 ऑक्टोंबरला दिव्यांग मेळावा

*3 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी सुरू राहणार

बुलडाणा, दि. 27 : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांग कल्याण विभाग अपंगाच्या दारी राबविण्यात येत आहे. यात बुलडाणा येथे शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी दिव्यांगाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

समाज कल्याण विभागातर्फे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात दि. 6 ऑक्टोंबर 2023 रोजी लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन विविध प्रकारची प्रमाणपत्रे आणि साहित्य वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटिल यांनी सदर कार्यक्रमात दिव्यांगांचा मेळावा घेवून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या आहे. यासाठी मेळाव्यात सर्व शासकीय विभागाचे स्टॉल उभारुन दिव्यांगासाठीच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर पात्र दिव्यांगांची तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच दिव्यांगांना साहित्याची गरज असल्यास त्यांना आवश्यकतेनुसार साहित्य देण्यात येणार आहे.

मेळाव्याला दिव्यांग कल्याण विभागाचे राज्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू उपस्थित राहतील. दिव्यांगांनी संबंधित पंचायत समिती अथवा नगरपालिका, नगर पंचायत येथे स्थापन केलेल्या कक्षात नाव नोंदणी करावी. ही नोंदणी दि. ३ ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहणार आहे, दिव्यांग कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड आदी महत्वाची कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

000000

एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना

रोख रक्कम हस्तांतरण योजना कार्यान्वित

*शेतकरी लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेतकरी लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट झाले नसलेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. त्याऐवजी या योजनेच्या लाभार्थ्यांना धान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रति लाभार्थी 150 रुपये प्रति महिन्याप्रमाणे रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये 23 हजार 1 लाभार्थ्यांना 1 कोटी 3 लाख 50 हजार 450 रुपये रक्कम जानेवारी ते मार्च 2023 करीता वितरीत करण्यात आली आहे.

रोख रकमेचा लाभ घेण्यासाठी एपीएल लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह विहीत नमुन्यातील अर्ज तहसिल कार्यालय किंवा रास्तभाव दुकानांमध्ये भरुन द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

खामगाव येथील गुरुवारचा आठवडी बाजार रद्द

बुलडाणा, दि. 27 : जिल्हाधिकारी यांच्या सुधारीत आदेशानुसार गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने खामगाव शहरामध्ये गुरुवार, दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खामगाव येथील आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.

खामगाव येथे गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार  आहे. मिरवणूकीमध्ये 15 ते 20 हजार लोकांचा सहभाग असतो. तसेच याच दिवशी ईद-ए-मिलाद सण असल्याने उत्सव साजरा करण्यात येतो. खामगाव शहर संवेदनशील असून याच दिवशी खामगाव शहरामध्ये आठवडी बाजार भरविण्यात येतो. आठवडी बाजारात मोठ्याप्रमाणात नागरिक येतात. त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही, याकरीता खामगाव शहरामध्ये दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जन होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही, यासाठी खामगाव शहरामध्ये दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

000000

शेतकरी गट स्थापन्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 27 : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून चांगला दर मिळण्यासाठी शेतकरी गट कार्यरत आहेत. शेतपिकांची काढणीपश्चात प्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या उत्पादनास अधिक भाव मिळण्यासाठी शेतकरी स्वयंसहायता गट स्थापन्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

कृषी संसाधनांचा उपयोग करणे, कीड व रोगांचे प्रभावी व्यवस्थापन, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादन वाढ, काढणीत्तोर हाताळणी, प्राथमिक प्रक्रिया, बाजार संपर्क वाढ, विपणनास चालना देण्यासाठी शेतकरी गट स्थापन्यास चालना देणे गरजेचे आहे. शेतकरी गटास लागणारे प्रशिक्षण, कौशल्यवृद्धी, शेतकरी अभ्यास दौरे, प्रक्षेत्र भेटी, शास्त्रज्ञ मार्गदर्शन, शेतमाल उत्पादन व शेती आधारीत उद्योगांना चालना देणे आणि त्याचा दर्जा वाढविणे आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना उत्पादनास भाव मिळावा या उद्देशाने शेतकरी स्वयंसहायता गट स्थापनेस प्रोत्साहन देऊन गटास विविध योजनांचा लाभ देऊन सक्षम करणे शक्य आहे.

गट स्थापन्यासाठी शेतकरी गटामध्ये सहभागी होण्यासाठी सभासद हा स्वतः शेतकरी असणे किंवा शेतकरी कुटुंबाचा सदस्य असणे आवश्यक आहे. एका गावातील, गावाच्या एका भागातील किमान ११ शेतकरी व जास्तीत जास्त १०० शेतकरी एका पिकासाठी एकत्र येवून गट स्थापन करू शकतात. गट नोंदणीकरिता विहित नमुन्यातील गट नोंदणी अर्ज, १०० रूपयांच्या स्टॅपपेपरवर विहित प्रपत्रातील करारनामा, सर्व सदस्यांचे आधारकार्ड, सर्व सदस्यांचे आठ अ किंवा सातबारा, शेतकरी कुटुंबातील असल्याचे संमतीपत्र, सर्व सदस्यांचे वैयक्तिक बँक खाते तपशील, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नावाने १ हजार रुपयांचा धनाकर्ष, प्रथम सभेचे इतिवृत्त आवश्यक ठरवासह, गटाची नियमावली ही कागदपत्रे जोडावी लागणार आहे.

परिपूर्ण प्रस्ताव गटाचे नियोजित अध्यक्ष आणि सचिवांच्या स्वाक्षरीने गावाचे कृषी सहायक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे सादर करावे लागणार आहे. प्राप्त प्रस्ताव संबधित तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत गट नोंदणीसाठी सादर करण्यात येणार आहे. प्राप्त प्रस्तावाची छाननी करून योग्य आढळल्यास गटाची नोंदणी करून गट नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे.

शेतकरी स्वयंसहाय्यता गटातील सर्व सदस्यांनी दर महिन्यात एकत्र येण्यासाठी कोणतेतरी वस्तुनिष्ठ प्रयोजन असावे किंवा बांधिलकी असावी या हेतूने शेतकरी स्वयंसहाय्यता गटामध्ये प्रत्येक महिन्याला बचत करणे आवश्यक आहे. या बचतीतून स्वयंसहाय्यता गटास भविष्यात बँकेकडून विनातारण पतपुरवठा होण्यासाठी विश्वासार्हता निर्माण होईल, असे अपेक्षित आहे. सभासदांनी बचतगट म्हणून कार्यरत राहण्याकरीता नियमित बैठका घेणे बंधनकारक आहे. स्थापन झालेल्या गटाच्या नियमित बैठका, त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी ठराविक मासिक वर्गणी, कामकाज आणि व्यवहाराची नोंदीसाठी क्षेत्रिय कर्मचाऱ्याकडून प्रशिक्षण देण्यात येते.

स्थापित शेतकरी गटास प्रशिक्षण, क्षमता बांधणी, नाविन्यपूर्ण पिक प्रात्यक्षिके, शेतकरी अभ्यास दौरे, कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ सामुहिकरित्या घेता येऊ शकतो. शेतकरी गट स्थापन करण्यास इच्छुक असल्यास त्यांनी वर नमूद कार्यपद्धतीनुसार गट स्थापनेसाठी संबंधितास संपर्क करावा, असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

00000

शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबरपूर्वी ई-पिक पाहणी करावी

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 27 : राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई-पीक पाहणीची सुरवात दि. 15 जून 2023 पासून सुरू झाली आहे. आपल्या सातबारावर पिकपेरा स्वत: शेतकऱ्यांनी शेतबांधावर जावून ॲन्ड्राईड मोबाईलद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. ई-पिक पाहणीची नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत दि. 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी तातडीने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात दि. 27 सप्टेंबर 2023पर्यंत 9 लाख 28 हजार 931 हेक्टर क्षेत्रापैकी 4 लाख 22 हजार 390 हेक्टरक्षेत्रावर, तसेच 6 लाख 51 हजार 411 खातेदारांपैकी 2 लाख 99 हजार 904 खातेदारांनी पिकांची ई-पिक पाहणी व्हर्जन 2.0 या मोबाईल ॲपद्वारे सातबारावर नोंदणी केली आहे. जिल्ह्याची ई-पिक पाहणीची नोंदणी 57.26 टक्के क्षेत्रावर झाली आहे. उर्वरीत क्षेत्रावर ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतबांधावर जाऊन पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पिक पाहणीची नोंदणी ई-पिक पाहणी व्हर्जन 2.0 या मोबाईल ॲपद्वारे करताना ॲन्ड्राईड मोबाईल आवश्यक आहे. सदर ॲप गुगल क्रोम अपडेट करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतबांधावर जाऊन पिकाची नोंदणी करून माहिती अपलोड करावी. यासाठी शेतकऱ्याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास किंवा हाताळता येत नसल्यास संबंधित गावाचे तलाठी, तसेच कॉमन सर्व्हीस सेंटरची मदत घेवून पिकांची नोंदणी ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतबांधावर जाऊन करावी. ॲपविषयी अडचणी असल्यास तलाठी, कॉमन सर्व्हीस सेंटरची मदत घ्यावी.

ई-पिक पाहणी द्वारे पिकांची नोंदणी दि. 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत केली नसल्यास सातबारावर पिकपेरा कोरा राहणार आहे. यानंतर तो भरता येत नाही. त्यामुळे पीक विमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचण निर्माण होईल. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीबाबत विमा क्लेम करायचे असल्यास सातबारावर अचूक पिक नोंद आवश्यक आहे. 

ई-पिक पाहणी ॲपची लिंक play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova ही असून गुगल ॲप स्टोअरद्वारे सदर ॲप इन्स्टॉल करावे. या ॲपद्वारे दि. 15 ऑक्टोबर 2023 पूर्वी पिकांची नोंदणी शेतबांधावर जाऊन करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000

ई-केवायसीसाठी जिल्ह्यातील केंद्राची यादी जाहिर

बुलडाणा, दि. 27 : शासनाच्या लाभासाठी शेतकरी, विद्यार्थी आणि इतर घटकांसाठी ई-केवायसी आवश्यक करण्यात आली आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना देण्यात येणार लाभ आणि मदत ही ई-केवायसीवर आधारीत करण्यात आली आहे. ई-केवायसी करण्यात अडचणी येत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील ई-केवायसी करणाऱ्या केंद्रांची यादी जाहिर करण्यात आली आहे.

बुलडाणा तालुक्यात प्रवीण पाटील (9422743908) तहसील कार्यालय, बुलडाणा, सतीश किलबि (9689329981) जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा, संजय तायडे (9922682291) ग्रामपंचायत कार्यालय, चांडोल, प्रवीण वाघ (9922682291) ग्रामपंचायत कार्यालय, तराडखेड, विशाल गावंडे (9763819587) ग्रामपंचायत कार्यालय, सावळी, अमोल तबडे (8975655594) ग्रामपंचायत कार्यालय, धामणगाव, परमेश्वर ऊबरहांडे (9922682291), ग्रामपंचायत कार्यालय, हतेडी, बु.

चिखली तालुक्यात अनिल इंगळे (9923686111) नगर परिषद कार्यालय, चिखली, तेजराव शेजूळ (9604490800) पंचायत समिती कार्यालय, चिखली, पुरुषोत्तम पडघान (9423053079) ग्राम पंचायत कार्यालय, मेरा खुर्द, नंदकिशोर गोडवे  (9657383522)         ग्रामपंचायत कार्यालय, बेराळा, राम चव्हाण (9049307030) ग्राम पंचायत कार्यालय, उंद्री, सुनील राठोड (9604443048) ग्राम पंचायत कार्यालय, महोदरी, पुरुषोत्तम चिंचोले (9307006913) ग्रामपंचायत कार्यालय, एकलारा.

देऊळगाव राजा सिद्धेश्वर नागरे (9767455133) तहसील कार्यालय, देऊळगाव राजा, संतोष डोंगरे (9673134864) उपनिबंधक कार्यालय, देऊळगाव राजा, कृष्णा सोनुने (9673134768) पंचायत समिती कार्यालय, देऊळगाव राजा, भारत कोल्हे (9673720212)          नगरपरिषद कार्यालय, देऊळगाव राजा, सुरेश शेळके (9922899131) ग्रामपंचायत कार्यालय, देऊळगाव मही, अनंता जायभाये (9158092153) ग्रामपंचायत कार्यालय, सावखेड नागरे.

सिंदखेड राजा निलेश राठोड (9921251554) तहसील कार्यालय सिंदखेड राजा, जयश्री वाघमारे. (9730983102) पंचायत समिती कार्यालय, सिंदखेड राजा, संदीप नालेगावकर (9860065484) ग्रामपंचायत कार्यालय, शेंदुर्जन, अमोल देशमुख (9766429437) ग्रामपंचायत कार्यालय, दुसरबीड, प्रताप जाधव (9420458182) ग्रामपंचायत कार्यालय, जांभोरा, शेख अन्सार शेख सत्तार (9545230006) ग्रामपंचायत कार्यालय,साखर खेर्डा.

लोणार तालुक्यात भारत दराडे     (9011365004) तहसील कार्यालय लोणार, श्रीराम गायकवाड (8007508846) ग्रामपंचायत कार्यालय, किनगाव जट्टू, पंढरी वाघ (9604058819) ग्रामपंचायत कार्यालय, अंजनी खुर्द, विजय खेत्री (9822303264) ग्रामपंचायत कार्यालय, सुलतानपूर, आशिष चव्हाण (9665404900) ग्रामपंचायत कार्यालय, तांबोळा, संदिपकुमार राठोड (9767454839) ग्राम पंचायत कार्यालय, देऊळगाव कुंडपळ,

मेहकर तालुक्यात विश्वास वाघ (8600073777) तहसील कार्यालय मेहकर, संतोष वाघ (9511896555) नगर परिषद कार्यालय मेहकर, मनोहर सरोदे (9822373610) ग्राम पंचायत कार्यालय, चायगाव, राजकिरण खरात (9922182947) ग्राम पंचायत कार्यालय जानेफळ, योगेश बोंद्रे (9011710541) ग्राम पंचायत कार्यालय, डोणगाव, संतोष वाघ (9511896555) ग्रामपंचायत कार्यालय, उकळी, शिवाजी साबळे (9767285071) ग्रामपंचायत कार्यालय, हिवरा साबळे, पुरुषोत्तम नवले (9922096197) ग्राम पंचायत कार्यालय, घाटबोरी आशिष धारतरकर (9421461006) ग्राम पंचायत कार्यालय, हिवरा आश्रम, रणधीर खरात (9922182947) ग्रामपंचायत कार्यालय, हिवरा खुर्द, भगवान चिखलकर (9422949785) जिल्हा परिषद केंद्रीय मराठी माध्यमिक शाळा, डोणगाव, अमोल ठाकरे (9823376233) जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा, डोणगाव.

खामगाव तालुक्यात प्रवीण खारोडे (9767644711) उपविभागीय कार्यालय, खामगाव, प्रशांत पाचपोर (7350617194) उपविभागीय कार्यालय, खामगाव, प्रतिक खुपसे (8275232910) नगर परिषद कार्यालय, खामगाव, गजानन महाले (9822727649) ग्राम पंचायत कार्यालय, अटाळी, सुनिल गवारगुरु (7972076538) ग्राम पंचायत कार्यालय, पिंपळगाव राजा, पवन वेरुळकर (9404553315) ग्राम पंचायत कार्यालय,रोहणा, शेख राजू शेख जहांगीर (9689350670) ग्रामपंचायत कार्यालय, गणेशपूर, निलेश सरदार (8600669964)        ग्रामपंचायत कार्यालय, लाखनवाडा.

शेगाव तालुक्यात अजित सानप (9422993983) तहसील कार्यालय, शेगाव, किशोर जुमले (7020345708) नगर परिषद कार्यालय, शेगाव, प्रकाश कळसकर (9850529818) ग्रामपंचायत कार्यालय, जवळा पळसखेड, सुनील गावंडे (9763561810) ग्रामपंचायत कार्यालय, पहुरजीरा,

जळगाव जामोद तालुक्यात झिकरुल्ला खान झियाउल्ला खान (9921901390) तहसील कार्यालय, जळगाव जामोद, योगेश राऊत (9763313310) ग्रामपंचायत कार्यालय, पिंपळगाव काळे, वैभव शेळके (9860223383) ग्रामपंचायत कार्यालय, खेर्डा खुर्द, अझरूद्दीन झियाउद्दीन शेख (9881564567) ग्रामपंचायत कार्यालय, माडाखेड बु.

मलकापूर तालुक्यात दीपक तायडे (8668435250) नगर परिषद कार्यालय, मलकापूर,  मोहन घाटे (7588804398)            उपविभागीय कार्यालय, मलकापूर, नंदा क्षीरसागर (9822774741) नगर परिषद शाळा क्र. २, पारपेठ, मलकापूर, हरीदिगंबर हिवाळे (9881620481) पंचायत समिती कार्यालय, मलकापूर, गजानन प्रकाश गवई (9766131373) तलाठी साझा भाग क्र. ३, मलकापूर, मनोज झनके (9545803712) नगर परिषद उर्दू कन्या शाळा, मलकापूर, राजेंद्र वाघाळे (9604556106) ग्राम पंचायत कार्यालय, जांभूळढाबा, विजय पाटील (9665174306) ग्रामपंचायत कार्यालय, दाताळा,

नांदुरा तालुक्यात प्रशांत दिवरे (9730174416) तहसील कार्यालय, नांदुरा, प्रशांत वाकोडे (9689717353) पंचायत समिती कार्यालय, नांदुरा, कैलाश साबे (9881383242) शासकीय रुग्णालय, नांदुरा, अक्षय हेलगे (9923947610) नगर परिषद कार्यालय, नांदुरा, विजय गणगे (9421105546) ग्राम पंचायत कार्यालय, खैरा, योगेश शाळीग्राम खंदारे (9921473727) ग्राम पंचायत कार्यालय, निमगाव, कैलाश मानकर (9689347505) ग्राम पंचायत कार्यालय, चांदूर बिस्वा, दिलीप बावस्कर (9404443755) ग्रामपंचायत कार्यालय, वडनेर भोलाजी.

मोताळा तालुक्यात अरुण वाघ (8788261938), तहसिल कार्यालय मोताळा, सय्यद वसीम सय्यद समद (8600213124) नगर पंचायत कार्यालय मोताळा, नितीन फेंगडे (9960584770) ग्रामपंचायत कार्यालय, माकोडी, सागर हागे (9960086174) ग्रामपंचायत कार्यालय, धामणगाव बढे, महादेव राहणे (9657486342) ग्रामपंचायत कार्यालय, पान्हेरा खेडी, रितेश जैन (9503159914) ग्रामपंचायत कार्यालय, शेलापूर.

संग्रामपूर तालुक्यात शाम मिरगे (7588809868) तहसील कार्यालय, संग्रामपूर, शेख गुलाम मोहंमद अल्ताफ (9503159904) पंचायत समिती कार्यालय, संग्रामपूर, पवन खंडेराव (9665296183) ग्राम पंचायत कार्यालय, कवठळ, कुशल वडे (9923303198) ग्राम पंचायत कार्यालय, पातुर्डा.

वरील केंद्रावर जाऊन नागरिकांनी ई-केवासी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

महिला, बाल कल्याण विभागाची व्यावसायिक प्रशिक्षणाची योजना

*अनुसुचित जाती, जमातीच्या महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे सन 2023-24 या वर्षासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला व मुलींसाठी व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षणाची योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 या योजनेमुळे महिला आणि मुलींना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होऊन आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. त्यासाठी योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांकडून मागविण्यात आले आहेत. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील महिला व मुलींना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण, ब्युटी थेरेपिस्ट प्रशिक्षण 90 टक्के अनुदान, मशरूम निर्मिती प्रशिक्षण 90 टक्के अनुदान, गांडूळखत निर्मिती प्रशिक्षण 90 टक्के अनुदान, लॅब टेक्नीशीयन, एक्स-रे टेक्नीशीयन प्रशिक्षण 90 टक्के अनुदान, मराठी, इंग्रजी टायपिग प्रशिक्षणासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

योजनेचे अर्ज, संबधित अटी व शर्ती तालुकास्तरावर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण यांच्या कार्यालयात, तसेच जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचे अर्ज दि. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज तालुकास्तरावर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण यांच्या कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत सादर करावे लागणार आहे. सदर प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यंडोले यांनी केले आहे.

0000000 

माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : राज्यात माहिती अधिकार दिन दि. 28 सप्टेंबर 2023 म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सर्व कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार 28 सप्‍टेंबर हा दिवस प्रतिवर्षी माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिवर्षी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येतो. यात माहिती अधिकाराविषयी सामान्य जनतेमध्ये जनजागृती होणे अपेक्षित आहे, त्यानुषंगाने सर्व विभाग प्रमुखांनी कार्यालयात दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी माहिती अधिकार दिन साजरा करावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी केले आहे.

000000

अतिवृष्टीमुळे नुकसानीचे अर्थसहाय जमा करण्यास सुरूवात

बुलडाणा, दि. 27 : जिल्ह्यामध्ये विविध कालावधीत सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे  झालेल्या नुकसानीची मदत लाभार्थ्यांना थेट बँक खात्या जमा करण्यात येत आहे. लाभार्थी हस्तांतरण प्रणाली मार्फत बॅंक खात्यात अर्थसहाय्य जमा करण्यात येऊन लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

डिसेबर 2021 मध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत खामगाव तालुक्यातील, ऑक्टोबर 2021 मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीबाबत, तसेच जून ते ऑक्टोबर 2022 मध्ये जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीबाबत आणि एप्रिल 2023 मध्ये जिल्ह्यात अवेळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना डीबीटीप्रणालीमार्फत शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे.

ई-केवायसीमुळे सदर मदत तात्काळ लाभार्थांच्या बँक खात्यात डीबीटीप्रणाली मार्फत जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ई-केवायसीबाबत लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालयामध्ये मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसल्यास त्यांनी महा ई-सेवा केंद्रात ई-केवायसी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000


Tuesday 26 September 2023

DIO BULDANA NEWS 26.09.2023

 राष्ट्रीय पशूधन अभियानातील योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 26 : पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2021-22 पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशूधन अभियानांतर्गत विविध तीन उप अभियानांचा समावेश केला आहे. यात पशूधन व कुक्कुट प्रजाती विकास उप अभियान, पशुखाद्य व वैरण उप अभियान, नाविण्यपूर्ण योजना व विस्तार उप अभियानाचा समावेश आहे. राष्ट्रीय पशूधन अभियानांतर्गत विविध योजनांकरीता  अर्ज  सदर करण्याचे आवाहन पशूसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

पशुधन व कुक्कुट प्रजाती विकास उप अभियानात ग्रामीण कुक्कुट पालनातून प्रजाती विकासद्वारे उद्योजगता विकासामध्ये कमीत कमी 1 हजार अंड्यावरील कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन व अंडी उबवणी केंद्राची स्थापना करीता 50 टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा, एकवेळ 50 टक्के भांडवली अनुदान  अधिकतम मर्यादा 25 लक्ष रूपये प्रती कुक्कुट युनिट आहे. ग्रामीण शेळी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकासामध्ये कमीत कमी 100, 200, 300, 400 किंवा 500 शेळ्या, मेंढ्या गटाची स्थापना करण्याकरीता 50 टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा, एकवेळ 50 टक्के भांडवली अनुदान 10, 20, 30, 40 व 50 लक्ष रूपये याप्रमाणे दोन समान हप्त्यामध्ये अधिकतम मर्यादा 50 लक्ष रूपये आहे. वराह पालनाद्वारे उद्योजकता विकासामध्ये 100 मादी आणि 25 नर वराह गटाची स्थापना करणे, उर्वरीत 50 टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा एकवेळ 50 टक्के भांडवली अनुदान 20.00 लक्ष रूपये आहे.

पशूखाद्य आणि वैरण उपअभियानात गुणवत्तापूर्ण वैरण बियाणे उत्पादनाकरीता अनुदान 100 टक्के मुलभुत बियाणे 250 रूपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान, पायाभूत बियाणे 150 रूपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान, प्रमाणित बियाणे 100 रूपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान देण्यात येते.

पशुखाद्य व वैरण उद्योजकता मध्ये मुरघास बेल, वैरणीच्या विटावि टीएमआर निर्मितीकरीता दोन टप्यामध्ये सिडबीमार्फत अनुदान उर्वरित 50 टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा राहणार आहे.

योजनेकरीता प्रकल्प अहवाल, सातबारा, बँकेचा रद्द केलेला धनादेश, बँकेचे संमतीपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल, प्रशिक्षण प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, 10 टक्के लाभार्थी हिस्सा जमा असल्याचे बँकेचे स्टेटमेंट पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय पशूधन अभियानांतर्गत विविध योजनेकरिता  शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपालन, वराहपालन क्षेत्र आणि वैरण विकास करुन रोजगार निर्मिती आणि उद्योजगता विकासासाठी पशूपालकांनी राष्ट्रीय पशुधन अभियानामध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी udymimitra.gov.in संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एस. पाटील यांनी केले आहे.

000000



अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त अभिवादन

बुलडाणा, दि. 26 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यालयात सोमवार, दि. 25 सप्टेंबर रोजी कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

जयंतीनिमित्त महामंडळचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम अंभोरे, वैभव मुंढे, सुरज जगताप, कौशल्य विकास कार्यालयाचे सविता वाकोडे, सचिन पवार, संतोष पडघान, राहुल सुरडकर, गोपाल चव्हाण, नंदू मेहेत्रे, योगेश लांडकर उपस्थित होते.

अण्णसाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी युनियन स्थापन केली.‍ अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना करून सामाजिक कार्य केले. त्यानंतर मराठा समाजासाठी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले. त्यानंतर त्यांच्या नावाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. यात व्यवसायाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना व्याज परतावा देण्यात येत आहे.

00000