Friday 30 September 2022

DIO BULDANA NEWS 30.09.2022



पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आज जिल्हा दौरा

बुलडाणा, दि. 30 : पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवार, दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौऱ्यानुसार सकाळी 10 वाजता मेहकर येथील जाहीर सभेस उपस्थित राहतील. दुपारी 11.30 वाजता चिखली येथील जाहीर सभेस उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता जळगाव जामोद येथील जाहीर सभेस उपस्थित राहतील. सायंकाळी 5.30 वाजता भुसावळकडे प्रयाण करतील.

00000



जमिनविषयक ऑनलाईन नोंदीबाबत कार्यशाळा

*ई-चावडी, ई-हक्काबाबत मार्गदर्शन

बुलडाणा, दि. 30 : जिल्ह्यातील जमिनविषयक नोंदी ऑनलाईन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा पार पडली. यात ई-महाभूमी प्रकल्पाच्या वतीने ई-चावडी, ई-हक्क आदींबाबत माहिती देण्यात आली. यात ई-महाभूमी फेरफा रप्रकल्पाच्या राज्य समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, सहआयुक्त श्यामकांत मस्के, श्री. नाईक उपस्थित होते. श्रीमती नरके यांनी महसुलविषयक घेण्यात येणाऱ्या जमिनीच्या नोंदीची माहिती दिली. या नोंद आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी ई-चावडीच्या माध्यमातून गाव नमून्यांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे गावपातळीवरील जमिनीची अचूक नोंद तलाठ्यांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. जमिन विषयक असणारी सर्व दस्तावेज ऑनलाईन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील एक गावाच्या पूर्ण नोंदी घेण्यात येणार आहे. या नोंदी येत्या काळात सर्वांसाठी खुल्या होणार आहेत.

राज्यातील जमिनविषयक विविध 21 नोंदी घेण्यात येतात. या सर्व नोंदी ऑनलाईन करण्यात येणार आहे. सातबारा, आठ अ, पिक पाहणी, या नोंदी घेणे, यात असणाऱ्या चुकांची दुरूस्ती करणे आदींची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष गावांमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी, ऑनलाईन कामकाजातील अडचणी श्रीमती नरके यांनी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी ई-हक्क बाबतीत माहिती देण्यात आली.

00000

पदवीधर मतदार संघाच्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित

बुलडाणा, दि. 30 : अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023साठी मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 1 नोव्हेंबर 2022 पासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

भारत सरकार निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमनुसार, अमरावती पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सुचना शनिवार, दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिद्धी शनिवार, दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमान पत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिद्धी मंगळवार, दि. 25 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात येणार आहे. सोमवार, दि. 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदारयादीची छपाई शनिवार, दि. 19 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. प्रारुप मतदारयाद्या बुधवार, दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. बुधवार, दि. 23 नोव्हेंबर 2022 ते शुक्रवार, दि. 9 डिसेंबर 2022 या कालावधी दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. रविवार, दि. 25 डिसेंबर, २०२२ रोजी हे दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येणार आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी शुक्रवार, दि. 30 डिसेंबर 2022 रोजी करण्यात येणार आहे.

                                                000000

बोरगांव वसू येथे पोषण माह अभियान

बुलडाणा, दि. 30 : राष्ट्रीय पोषण माह अभियान सन 2022 अंतर्गत बोरगांव वसू येथे पोषण माह कार्यक्रम पार पडला. यावेळी गरोदर माता, स्तनदा मातांना सकस आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 या कार्यक्रमाला सरपंच प्रयागबाई सपकाळ, विस्तार अधिकारी सुकेशिनी वानखेडे, पर्यवेक्षिका आम्रपाली साळवे, मुख्याध्यापिका श्रीमती ठोंबरे आदी उपस्थित होते.

पोषण अभियान समारोपीय कार्यक्रमात आहार प्रदर्शन घेण्यता आले. कुपोषणमुक्त भारत होण्यासाठी सप्तरंगी आहाराचे महत्व यातून सांगण्यात आले. गरोदर मातेला सकस आहार देऊन बाळाचे कुपोषण थांबविण्याबाबत यावेळी माहिती देण्यात आली. स्तनदा  मातांना स्तनपानाचे महत्व सांगण्यात आले. किशोरी मुलींनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. किशोरी एचबी 11 च्या पुढे आहे, अश्या किशोरींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पोषण माह अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा पर्यवेक्षिका आम्रपाली साळवे यांनी सत्कार केला. यावेळी प्रकल्प अधिकारी संदीप गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एकलारा बीटमधील सेविका, मदतनीस यांनी पुढाकार घेतला.

000000

 सोमवारी लोकशाही दिन

बुलडाणा, दि. 30 : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी, नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येईल. लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेद्वारे घेण्यात येणार आहे.

तक्रारदारांना लोकशाही दिनी स्वत: उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारदारांनी तक्रार रजिस्टर पोस्टाने प्रभारी अधिकारी, लोकशही दिन, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या नावे पाठवावी. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व, अपिल, सेवा व आस्थापनाविषयक बाबी विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Thursday 29 September 2022

DIO BULDANA NEWS 29.09.2022

  ऊसावरील घोणस अळीचे व्यवस्थापन करावे

*कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

बुलडाणा, दि. 29 : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऊसावर घोणस अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. पिक आणि मनुष्यांना या घोणस अळीचा अपाय होत असल्याने शेतकऱ्यांनी घोणस अळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन केले आहे.

काही दिवसांपासून विविध माध्यमामार्फत ऊसावर स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळीचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. अळीचा दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागलेअ आहेत. त्यामुळे अळीबद्दल भीती दिसून येते आहे, तसेच गैरसमज निर्माण झाले आहेत.

अळीची ओळख ही या अळीला स्लग कैटरपिलर, काटेरी अळी, डंक अळी असेही म्हणतात. ही एक पंतगवर्गीय कीड आहे. ती स्लग कैटरपिलर पतंग कुटुंबातील आहे. या अळ्यांना त्यांच्या चिकटून राहण्याच्या स्वभावामुळे आणि संथ हालचाली व लक्षणामुळे स्लग अळी असे म्हणतात. या अळीचे पतंग त्यांच्या भक्षकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात. पतंग फार वेगाने फिरत नाहीत आणि उडूही शकत नाहीत. ते पक्ष्यांचे आणि इतर भक्षकांचे सहज होणारे आणि मुख्य खाद्य आहेत. या जातीच्या अळ्यांनी स्वतःचा भक्षकांपासून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये भडक रंग आणि काटे विकसित केले आहेत. या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाद्वारे आणि काटे किंवा केसांद्वारे त्यांच्या भक्षकांना डंख मारण्याची चेतावणी देतात. हे अळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून वाचवते. अशा काट्याच्या खाली विष ग्रंथी असतात. ही एक स्वःसंरक्षणाची रणनीती आहे. या गटातील सर्व अळ्यांच्या शरीरावर काटे किंवा केस नसतात. या किडीला अकाली स्पर्श झाल्यास काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो परंतु या किडीचे पतंग अपायकारक नाहीत. ही कीड भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये आढळूनयेते.

ही अळी बहुभक्षी प्रकारातील कीड आहे. विशेषतः एरंडी, आंबा, केळी, डाळींब, लिंबूवर्गीय फळे, इतर फळझाडे, देशी बदाम, ओक, चहा, कॉफी, शोभेच्या वनस्पती, तणे आणि इतरही वनस्पती वर आढळून येते. ही अळी पिकाचे फारसे नुकसान करत नाही. परंतु काही वेळा अळीचा प्रादुर्भाव पिकाच्या काही ठराविक भागापुरताच मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रादूर्भाव जास्त झाल्यास अळ्या फक्त पानांच्या शिरा सोडून बाकी भाग अधाशीपणे खातात. त्यामुळे झाडाला फक्त पानांच्या शिराच शिल्लक राहून मोठे नुकसान होते.

या अळ्यांच्या शरीरावर असलेल्या काट्यांमुळे आणि केसांमुळे सहज लक्षात येतात.  त्याचा उद्देश त्यांच्या भक्षकांना परावृत्त करणे आहे. अळी लोकांच्या मागे जात नाहीत. परंतु तुम्ही त्यांना स्पर्श केल्यास किंवा चूकून संपर्कात येऊन शरीर घासले गेल्यास त्याठिकाणी काट्यांचा दंश होऊन अपाय होऊ शकतो आणि लक्षणे उद्भवतात. काट्यांमध्ये असलेले विष शरीरात प्रवेश करते. स्पर्श झालेल्या ठिकाणी अळीचे केस अथवा काटे शरीरात तसेच राहतात, दंश हा मधमाशीच्या डंखासारखा त्रासदायक असतो. विष हे सौम्य स्वरूपाचे असते. परंतु वेदना होणे, पुरळ येणे, जळजळ होणे, खाज सुटणे, सूज येणे आणि फोड येणे या सारखी लक्षणे दिसू शकतात. सहसा ही लक्षणे तात्पुरत्या स्वरुपाची असतात आणि एका दिवसात निघून जातात किंवा कमी होतात. परंतु जर ती तीव्र स्वरूपाची किंवा जास्त वेळाकरीता कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. काही लोकांना अशा अळीच्या संपर्कात आल्यास त्यांना असलेल्या अॅलर्जीमुळे जास्त त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना अस्थमा, अॅलर्जी सारख्या समस्या असतील अशा लोकांनी सावधगिरी बाळगावी. अपाय होऊन जास्त त्रास झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.

ताबडतोब करावयाचे उपाय म्हणून प्रभावित भागावर चिकट टेप हलक्या हाताने लावून काढावा. त्याने शरीरात गेलेले अळीचे केस किंवा काटे सहज निघण्यास मदत होईल. लक्षणे सौम्य स्वरूपाची असतील तर अपाय झालेल्या ठिकाणी बर्फ लावल्यास किंवा बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावल्यास त्रास कमी होतो.

 

अळीचे नियंत्रण करताना कोणतेही स्पर्शजन्य किटकनाशक फवारावे. यामध्ये क्विनॉलफॉस, क्लोरोपायरीफॉस, इमामेक्टीन बेंझोएट, फ्लूबेंडामाईडसारखे कीटकनाशक शिफारस नसले तरी चांगले नियंत्रण करतात. तसेच बरेच नैसर्गिक मित्र कीटकांद्वारे ही या किडीचे नियंत्रण नैसर्गिकरित्याच होते. त्यामुळे केसाळ किंवा काटेरी अळ्यापासून स्वसंरक्षणाची सावधगिरी बाळगावी. अळीमुळे दंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपाय अथवा उपचार करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

महसुलच्या साडेसतरा लाख ऑनलाईन प्रमाणपत्रांचे वाटप

*लोकसेवा हक्काची प्रभावी अंमलबजावणी

*नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : महाराष्ट्र लोकसेवा हक्काची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात जिल्ह्यामध्ये महसूल विभागाच्या 18 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहे. यात 17 लाख 45 हजार 588 ऑनलाईन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यांतर्गात 40 शासकीय कार्यालयातील 486 प्रकारच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर 2015 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत महसूल विभागात सेवांचे 18 लाख 40 हजार 729 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 17 लाख 45 हजार 588 ऑनलाईन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.  यातील सर्व सेवा विहित कालावधीत पुरविण्यात आल्या आहेत.

नागरिकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याकरीता ग्रामपंचायत, तालुकास्तरावर आपले सरकार सेवा केंद्र, तसेच सेतू सुविधा केंद्र देण्यात आले आहेत. नागरिक या केंद्राचा उपयोग करुन हव्या असलेल्या सेवांकरीता पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन शकतील. तसेच aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईट वरुन देखील नागरिक स्वत: अर्ज करुन शकतील.

नागरिकांच्या सुविधेसाठी सदर प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी म्हणून AAPLE SARKAR हे मोबाईल अप्लीकेशन तयार केले आहे. हे अप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्‍याचा उपयोग करुन आवश्यक असलेल्या सेवांकरीता नागरीक अर्ज सादर करुन शकतील. त्याचप्रमाणे RTS MAHARASHTRA हे ॲप उपलब्ध झाले आहे. सदर ॲप वापरास सोपे आहे. तरुणांसह सर्वस्तरातील नागरिक सदर ॲपच्या माध्यमातून विहित कालमर्यादेत गतिमान सेवा मिळवू शकतील.

जिल्ह्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या कालावधीत शासकीय विभागातील प्रलंबित अर्ज, तक्रारी, निवेदने निकाली काढण्यात येणार आहे. नागरिकांनी अर्ज ऑनलाईन सादर करावेत, शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क 2015 अंतर्गत सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

सेवानिवृत्तांचा सोमवारी संवाद मेळावा

बुलडाणा, दि. 29 : शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारक, कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांचा संवाद मेळावा सोमवार, दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा कोषागार कार्यालयातील प्रशिक्षण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा कोषागार कार्यालयातील मेळाव्यासाठी निवृत्ती वेतनधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे.

0000000 





समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीकांचा मेळावा

बुलडाणा, दि. 29 : समाज कल्याण कार्यालयात सेवा पंधरवाडा विशेष मोहीमेंतर्गत ज्येष्ठ नागरीकांचा मेळावा आणि चर्चासत्र पार पडले.

मेळाव्याला प्रकाश पिंपरकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मधुसुदन कुलकर्णी,  मधुकर पाटील, भरत जाधव, डॉ खर्चे, भरत जाधव, सर्जेराव चव्हाण, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते. यावेळी मिलींद जाधव, प्रकाश भालेराव, राजेंद्र बाहेकर, साहेबराव भोरटे, कडुबा साळवे, सुधाकर जाधव यांनी विचार व्यक्त केले.

          यावेळी  ज्येष्ठ नागरीकांसाठी कार्य करणाऱ्या जनस्थान संस्थेच्या प्रकल्प प्रमुख मिनाक्षी कोळी यांनी हेल्पलाईन क्रमांक 14567 बाबत माहिती दिली. या मदत क्रमांकाची ज्येष्ठ नागरीकांना होणारी मदत आणि संस्थेच्या स्वयंसेवकांकडून होणारी मदत, तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठी मानसिक आधार, कौटुंबिक अडचणी आणि समस्यांसंदर्भात सदैव मदतीसाठी  तत्पर असल्याचे सांगितले. प्रा. गायकवाड यांनी ज्येष्ठ नागरीकांच्या सामाजिक, कौटुंबिक, मानसिक समस्या व त्यावरील उपायासंदर्भात मार्गदर्शन केले.

प्रदीप धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. सतिश बाहेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती ठोंबरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी  योगेश पर्वतकर, प्रा. संदिप मोठे यांनी पुढाकार घेतला. हिवरा आश्रम, ता. मेहकर येथे दि. 1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरीक दिन स्वामी विवेकानंद संस्थान येथे साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

हमी दरात खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी

*पणन विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दरात मका, ज्वारी व बाजरी खरेदी करण्यात येणार आहे. यावर्षीच्या हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दि. 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी फेडरेशनच्या सब एजंट संस्थांकडे हमी दराचा लाभ घेण्यासाठी यावर्षीच्‍या हंगामा सातबारा उतारा, पिकपेरा, बँक पासबुकची प्रत, आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. तसेच खाते सुरु असल्याची खात्री करुन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यामध्ये मका, ज्वारी व बाजरी नोंदणीसाठी 14 केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. यात तालुका शेगाव सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, संग्रामपूर, शेगांव, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव, तसेच संत गजाजनन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, नारायणखेड, ता. देऊळगावराजा, केंद्र- सिंदखेडराजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नांदुरा, केंद्र-वाडी, या केंद्रांना मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे.

000000

Wednesday 28 September 2022

DIO BULDANA NEWS 28.09.2022

 चिखली शहरातील वाहतुकीवर निर्बंध

*पर्यायी वाहतूक मार्गाचे नियोजन

बुलडाणा, दि. 28 : जिल्ह्यातील चिखली शहरातील वाढलेल्या वाहतुकीमुळे येथील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. यासाठी पर्यायी वाहतूक मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी आदेश पारित केले आहे.

चिखली शहरातील वाढलेली लोकसंख्या, तसेच वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे आणि इतर ठिकाणाहून चिखली शहरात निर्माण होणारी नागरिकांची गर्दी व वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपघात घडत असल्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे.

चिखली शहरातील जाफ्राबाद रोड, सिद्धसायंस चौक ते शिवाजी पार्क, खामगाव चौफुली मार्गालगत वाढलेली नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालये, दवाखाना व शासकीय कार्यालये तसेच सतत होणारे अपघात यामुळे नमुद मार्गावरील वाहतुक कमी करुन नागरीकांच्या सुरशिक्षते करीता मेहकर फाटा ते राऊतवाडी, शेलुद हायवे सुरु करण्यात आलेला आहे. शहरात जाणारी, येणारी मालवाहू जड व हलकी वाहने शिवाजी चौक बाजारपेठ, बाबू लॉज चौक, डीपी रोड व गावामध्ये गर्दीच्या वेळी वाहने आणतात. त्यामुळे नमूद मार्गावर वाहनांची वर्दळ होऊन किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपघात होतात.

चिखली येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जड वाहतुकीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आली आहे. त्‍यानुसार चिखली शहरात सर्व जड व हलकी मालवाहू वाहनांना दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरामध्ये वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आली आहे. बाबू लॉज चौक ते महाराणा प्रताप पुतळ्यापर्यंत सर्व वाहनांना व रस्त्यावर हातगाडीसाठी रस्त्याचे मध्ये बसणारे व हातगाडी ठेवणारे यांना मधोमध विक्रीस प्रतिबंध राहील. हातगाडी, भाजी विक्रेते, हातगड्यांसाठी प्रतिबंध राहील. त्यांना पर्यायी जागा तात्पुरत्या स्वरूपात पारधी मठ येथे नगर परिषद व पोलीस प्रशासन उपलब्ध करून देणार आहे.

जयस्तंभ चौक ते बसवेश्वर चौक दोन्ही बाजूने दुचाकी आणि चारचाकी वाहन किंवा हातगाडी पार्किंगसाठी मनाई राहील. बस स्टँड पासून दोन्ही बाजूस 200 मिटर अंतरापर्यंत अवैध प्रवासी वाहनाना प्रतिबंध राहणार आहे. ॲटो स्टॉपसाठी चिखली बसस्टॅंडलगत असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंग क्षेत्र करण्यात येणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना विश्रामगृह चौक, भंगार गल्ली, जयस्तंभ चौक, कृषी उत्पन्न बाजार समितीचा मार्ग मोकळा राहील. गिट्टी, बोल्डर, रेती, मरुम, वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहराचे बाहेरील रस्त्याने सकाळी 6 ते सकाळी 10 वाजता तसेच सायंकाळी 6 वाजल्यानंतर आत प्रवेश राहील.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना 200 मीटर परिसरात प्रतिबंध राहील. चिखली शहरात प्रवेश बंदनंतर वाहतूक करणाऱ्या जडवाहनांना एनएच 146 वर रोडचे बाजूने किंवा एमआयडीसी तसेच मेहकर फाट्याच्या बाहेर किंवा शेलुदच्या मागे थांबता येईल. यापुढे शहरात थांबता येणार नाही. चिखली शहरातील अंतर्गत रस्त्यावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत यापुढे शहरात थांबता येणार नाही. चिखली शहरातील अंतर्गत रस्त्यावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोणतेही जड व हलके वाहन उभे किंवा वाहतूक करता येणार नाही.

सर्व प्रकारची हलकी मालवाहू वाहनांना सकाळी 6 ते 10 ते सायंकाळी 4 ते 7 वाजल्यानंतर चिखली शहरात वाहतुकीस परवानगी राहील. तसेच शहरातील रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभे करण्यास मनाई राहील. चिखली शहरात ज्या वाहनांना मालाची चढउतार करण्याची आवश्यकता नाही अशा सर्व प्रकारच्या जड वाहनांना 24 तास प्रवेश बंदी राहील. त्यांना फक्त हाय वे रोडचा वापर करता येईल.

सदर अधिसुचनेमधील वेळेचे बंधन सर्व जड व हलके वाहनांना रविवारी व शासकीय सुट्टीचे दिवशी लागू राहणार नाही. रमजान ईद, गणपती उत्सव, नवदुर्गा उत्सव, दिपावली व इतर महत्वाच्या सणावेळी अधिसुचना लागू राहील. सर्व प्रकारच्या वाहनांना मोटार वाहन अधिनियम अनुसार वाजवी क्षमतेपेक्षा जास्त अधिभार वाहून नेता येणार नाही. सदर अधिसुचना ही अत्यावश्यक सेवेतील ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड, पोलिस, गॅस सिलेंडर ट्रक, पेट्रोल, डिझेल टँकर आदी वाहनांना शहरात येण्यास व जाण्यास बंदी राहणार नाही. ही अधिसुचना चिखली शहरातील सर्व ट्रक ट्रांसपोर्ट व बाहेरील येणाऱ्या मालवाहू ट्रक आदी वाहनाना बंधनकारक राहील.

चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिशा निर्देशक बोर्ड तातडीने लावावेत. नगरपरिषद व पोलीस विभागाने अधिकृत ॲपेधारक, अधिकृत ऑटोधारक, अधिकृत जिपधारकांना रहदारी, वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी स्टँडकरीता जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नोंदणीकृत हॉकर्स, फेरीवाले यांना पर्यायी जागा चिखली नगरपरिषदेने उपलब्ध करुन द्यावी. औषधी, बी-बियाणे, खते व इतर जिवनावश्यक वस्तूंच्या मालवाहू वाहनाना विशिष्ट वेळेत प्रवेश देण्यात येणार आहे.

0000000000

आज शौर्य दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे गुरूवार, दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 103.30 वाजता शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने चिखली रस्त्यावरील सैनिक मुलांचे वसतिगृह येथे माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक द्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माजी सैनिकांची सन्मान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युद्ध विधवा, वीर माता, पिता व अवलंबितांना यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

0000000000




निर्यातवाढ होण्यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्नशील राहावे

-जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

*निर्यात कार्यशाळा उत्साहात संपन्न

बुलडाणा, दि. 28 : देशाच्या प्रगतीमध्ये निर्यातीला महत्व आहे. देश पातळीवर निर्यातीसाठी प्रयत्न होत असताना जिल्ह्यास्तरावरही निर्यातवाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. निर्यातीसाठी पायाभुत सोयीसुविधा आणि शासकीय मदत देण्यात येईल. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निर्यातीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

गुंतवणुक वृद्धी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा हॉटेल नर्मदा हॉलीडेज येथे पार पडली. यावेळी वाशिमचे जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश कोईनकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, भारतीय स्टेट बँकेचे महाप्रबंधक संजय श्रीवास्तव, उपमहाप्रबंधक पंकजकुमार बरनवाल, क्षेत्रीय प्रबंधक विशोक कुमार, निर्यात सल्लागार सुनिल कोईनकर, सिडबीचे प्रबंधक श्री. नायक, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त श्री. केदार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील उपस्थित होते.

श्री. श्रीवास्तव यांनी निर्यातविषयक बँकेची भुमिका याबाबत मार्गदर्शन केले. श्री. नायक यांनी सिडबीच्या योजनांची माहिती दिली. श्री. विशोककुमार यांनी निर्यातदारांना बँकाकडून मिळणाऱ्या विविध योजना, सवलतीबाबत मार्गदर्शन केले. योगेश कोईनकर यांनी निर्यातदारांनी निर्यात करताना करारनाम्यांचा अभ्यास करण्याबाबत सांगितले. तसेच उद्योगात येणाऱ्या कायदेविषयक अडचणी आणि त्यावरील उपयुक्त कायदे, उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात सुनील कोईनकर यांनी निर्यातीमधील फायदे सांगून जिल्ह्यातील उद्योजकांना निर्यात वाढीसाठी सर्वतोपरी  मदत करण्याचे आश्वासन दिले. श्री. डाबरे तसेच प्रवीण वानखेडे यांनी कृषी व अन्न प्रक्रिया प्रकल्प निर्यातवाढीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी उत्पादक कंपनी व उद्योजक यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. अन्न प्रक्रिया उद्योग करताना आवश्यक परवाने ऑनलाईन पद्धतीने काढण्यासंदर्भातील तरतुदीबाबत मार्गदर्शन केले. निर्यात करताना येणारे संभाव्य धोके आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चैतन्य ॲग्री प्रोडक्टस यांनी माहिती दिली.

एक जिल्हा एक उत्पादन योजना, तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पॉलीसी, सन 17-18 व 18-19 साठी निर्यात पुरस्कार नामांकने दाखल करणे, मैत्री पोर्टल बाबत माहिती श्री पाटील यांनी दिली.

कार्यशाळेसाठी देशपांडे ब्रदर्स ॲन्ड कंपनी देऊळगाव राजा यांनी होमीओपॅथी उत्पादने, इलेक्ट्रीकल वाहन उत्पादन कंपनी बुलढाणा यांनी ई-व्हेईकल सादरीकरण केले, चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज, मलकापूर यांनी उच्च दर्जाचे न्यूट्रास्युटिकल्स आणि फार्मास्युटिकल्स कच्चा माल  उत्पादने, युनानी हेल्थकेअर ॲन्ड आयुर्वेदिक प्रोडक्टस यांनी 250 उत्पादनाचे सादरीकरण केले. भारतीय स्टेट बँकेने त्यांच्याकडील राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या मार्गदर्शनासाठी स्टॉल लावला.

कार्यशाळेस ऑनलाईन पद्धतीने डीजीएफटी, व्यवसाय सुलभीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेसाठी हिंदुस्थान युनिलिव्हर खामगाव, बेन्झोकेम इंडस्ट्रीज मलकापूर, औद्योगिक संघटना, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी, उद्योजक तसेच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मवारी उपस्थित हाते. कार्यक्रमासाठी बँक अधिकारी, मिटकॉन, एमसीइडी यांनी सहकार्य केले. श्री. पाटील यांनी प्रास्तविक आणि कार्यक्रमाचे ध्येयधोरणे सांगितली. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नामदेव पाटील आभार मानले.

00000




 जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकारी दिन साजरा

बुलडाणा, दि. 28 : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी माहितीच्या अधिकाराबाबत उपस्थितांना माहिती दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, तहसिदार प्रिया सुळे यांनी प्रास्ताविकातून माहितीचा अधिकार कायद्याबाबत माहिती दिली. यावेळी श्री. गोगटे यांनीही माहितीचा अधिकार आणि कार्यालयीन कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत, नायब तहसीलदार संजय बनगाळे, सुनिल आहेर आदी उपस्थित होते.

000000

 


जिल्ह्यात राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान

बुलडाणा, दि. 28 : प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णय क्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करणे, यासाठी राज्य, तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान राबविण्यात येते. हे अभियान जिल्हास्तरावर राबविण्यात यावे, अशा सूचना प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अभियान राबविण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. जिल्ह्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशिलता आणण्याकरीता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान ग्राम, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर घेण्यात येणार असल्याने विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त कार्यालयातही हे अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या अभियानासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पारितो‍षिक देण्यात येत आहे. याशिवाय थेट राज्यस्तराकडेही प्रस्ताव सादर करता येऊ शकणार आहे. त्यामुळे आपल्या विभागांचे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन श्री. माचेवाड यांनी केले.

00000

Tuesday 27 September 2022

DIO BULDANA NEWS 27.09.2022

 

बुलडाणा आयटीआयमध्ये राष्ट्रीय प्रमाणपत्राचे वितरण

बुलडाणा, दि. 27 : बुलडाणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अखिल भारतीय व्यवसाय  परिक्षेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या कौशल्यप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना दिक्षांत समारंभात राष्ट्रीय प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

दिक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थपाक सुनिल पाटील होते. आमदार संजय गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बालाजी लोकरे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता उद्योजक एस. डी. जाधव, उद्योजक सुनिल मोडेकर, सुरेश चौधरी, मुत्यूंजय गायकवाड, गजेंद्र दांदडे आदी उपस्थित होते. विविध व्यवसायातून राज्यस्तरावर मिरिटमध्ये आलेल्या 42 उमेदवारांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

संस्थेचे प्राचार्य पी. के. खुळे यांनी प्रास्ताविक केले. गटनिदेशक भुजंग राठोड आणि एस. एस. सावरकर यांनी सुत्रसंचालन केले. संजय खर्चे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गटनिदेशक के. बी. इंगळे, बी. जी. राठोड, श्री. सराग, श्री. सावळे, श्री. चितारे, श्री. सानप, श्री. पवार, श्री. खत्री, श्री. वरोकार, श्री. आडे, रमेश काळे, संजीव बावणे, श्री. झगरे, श्री. कोलते, श्री. मोरे, श्री. सुर्यवंशी, अविनाश गवई, संतोष चवरे यांनी पुढाकार घेतला. 

0000000000

मध केंद्र योजनेसाठी अर्ज आमंत्रित

बुलडाणा, दि. 27 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झाली आहे.

या योजनेत मध उद्योगाचे विनामूल्य प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनासाठी सहाय्य देण्यात येते.

या योजनेत वैयक्तिक मधपाळासाठी लाभार्थी हा साक्षर व 18 वर्षे वयावरील असावा. शेती असल्यास प्राधान्य मिळेल. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ या घटकासाठी व्यक्ती वय 21 वर्षापेक्षा जास्त व दहावी उत्तीर्ण असावी. व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडेतत्वावरील शेतजमीन असावी, तसेच मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.

केंद्रचालक संस्था या घटकासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेची किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. याशिवाय मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावे लागेल. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, अरूणोदय बिल्डींग, सुवर्ण नगर, बुलडाणा, दूरध्वनी क्रमांक 07262-299076, मोबाईल क्रमांक 8329908470 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

00000

राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठानकडून ग्रंथालयांना अर्थसहाय्य

*28 ऑक्टोंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्याकडून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येते. त्यानुसार यावर्षीसाठी ग्रंथालयांनी दि. 28 ऑक्टोंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2022-23 या वर्षासाठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन अर्ज सादर करावेत.

 समान निधी योजनांमध्ये इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना, योजनेच्या व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत. असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरा स्थापन’ करण्याकरीता अर्थसहाय्य देण्यात येते.

योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी www.rrlf.gov.in या संकेतस्थळावरून माहिती घ्यावी. आवश्यकता असल्यास जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 28 ऑक्टोंबर 2022 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, मुंबई यांनी केले आहे.

000000

अंबिका बावणे यांनी जिल्हा पषिदेत उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : कार्यालयास कोणतीही सुचना न देता सतत गैरहजर राहणाऱ्या अंबिका बावणे यांनी जिल्हा परिषदेत उपस्थित राहावे, असे प्रकटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

जवळा बु., ता. शेगांव येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे कार्यरत अंबिका ज्ञानदेव बावणे ह्या दि. 3 जुलै 2018 पासून कार्यालयास कोणताही अर्ज सादर न करता अनधिकृतरित्या गैरहजर आहेत. या गैरहजेरीच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा ‘शिस्त व अपील’ नियम, 1964 (6) नुसार खाते चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. या कार्यवाहीनुसार अंतिम कारणे दाखवा  नोटीस रहिवाशी पत्यावर पाठविण्यात आली आहे. या पत्यावर राहत नसल्याने अंतिम कारणे दाखवा नोटीस पोच करता आलेली नाही. या प्रकटनाद्वारे श्रीमती बावणे यांनी 10 दिवसाच्या आत कार्यालयास उपस्थित राहून अंतिम कारणे दाखवा नोटीस स्विकारावी अथवा एकतर्फी कार्यवाही अंतर्गत सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.

                                      00000000000

मॅरेथॉन स्पर्धेमुळे वाहतूक मार्गात बदल

बुलडाणा, दि. 27 : बुलडाणा अर्बन को-ऑप सोसायटीतर्फे दि. 9 ऑक्टोंबर 2022 रोजी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी बुलडाणा-वरवंड-बोथा-खामगांव मार्गावरील वाहतूक सकाळी सहा ते दहा वाजेदरम्यान वळविण्यात आली आहे.

बुलडाणा-वरवंड-बोथा-खामगांव मार्गावरील वाहतूक वरवंड-उदयपूर(उंद्री)- खामगांव, बुलडाणा मोताळा-नांदुरा-खामगांव, बुलडाणा-मोताळा-तरवाडी-पिंपळगाव राजा-खामगाव या मार्गावर दि. 9 ऑक्टोंबर 2022 रोजी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत वळविण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धक येण्याची शक्यता असल्यामुळे सदर मार्गावर वाहतूक सुरु असल्यास मॅरेथॉन स्पर्धेस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

00000

 

 

Monday 26 September 2022

DIO BULDANA NEWS 26.09.2022

 

कामगारांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा

*कामगार कल्याण केंद्राचे आवाहन

बुलडाणा, दि. 26 : कामगार कल्याण मंडळाच्या कामगार केंद्रातर्फे कामगार वर्गाच्या पाल्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येतो. कामगारांच्या पाल्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रसंचालक नंदकिशोर खत्री यांनी केले आहे.

कामगाराच्या कुटुंबातील मुला मुलींना दहावीपासून उच्च शिक्षण, परदेशात शिक्षण पुर्ण करण्यासाठी कामगार कल्याण मंडळातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. कामगार, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थी पाल्यांना विविध आर्थिक लाभाच्या योजनाचा लाभ घेता येतो. याकरिता माहे जून आणि माहे डिसेंबर या महिन्यामध्ये कामगार कल्याण निधी 12 रुपये कपात असणे आवश्यक आहे.

सदर योजनांचा लाभ सभासद होऊन public.mlwb.in या वेबसाईटवर शिष्यवृत्तीच्या अर्जाचा भरणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती योजनेची अंतिम मुदत दि. 31 ऑक्टोंबर 2022 आहे. शिष्यवृत्ती योजनेचा कामगार पाल्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी केंद्रसंचालक नंदकिशोर खत्री संपर्क क्रमांक 9850034045, निलेश देशमुख संपर्क क्रमांक 9011050790, विद्या शिंदे संपर्क क्रमांक 7721900890 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

रब्बी हंगामामध्ये प्रमाणित

बियाण्यांसाठी अर्ज आमंत्रित

बुलडाणा, दि. 26 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पिक प्रात्यक्षिके, ज्वारी मिनिकीटसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी या प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे, तसेच कडधान्य, तृणधान्य व गळीतधान्य पिकांच्या नवीन वाणांचा प्रचार, प्रसार व्हावा, याकरिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानित दराने बियाणे उपलब्ध होणार आहे. महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड यात करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रमाणित बियाणे वितरण हे हरभरा बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास २५ रूपये प्रती किलो, तसेच रब्बी ज्वारी बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास ३० रूपये प्रती किलो आणि १० वर्षावरील वाणास १५ रूपये प्रती किलोप्रमाणे अनुदानित दराने महाबीज, एनएससी आणि कृभको या कंपनीमार्फत त्यांच्या अधिकृत वितरकांद्वारे तालुकानिहाय हरबरा आणि ज्वारी पिकांचे प्रमाणित बियाणे वितरीत करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाबीज, एनएससी आणि कृभकोमार्फत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात परमि उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर परमिटवर मुदत घालून देण्यात येणार आहे. या मुदतीतच बियाण्यांची उचल करावी लागणार आहे. मुदतीनंतर सदरचे परमिट बाद होणार आहे. मुदतीनंतरच्या परमिटवर बियाणे उपलब्ध होणार नाही.

निवड झालेल्या शेतकऱ्यांनी मुदतीत पुरवठादार संस्थांच्या अधिकृत वितरक यांच्याकडे अनुदान वजा जाता उर्वरित रक्कम भरून बियाणे खरेदी करावयाचे आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत बियाणे लाभ लाभ देय राहणार आहे. पीक प्रात्यक्षिकांमध्ये १०० टक्के अनुदानावर हरबरा पिकाचे १ हजार ३५५ हेक्टर, ज्वारी पिकाचे २ हजार २२० हेक्टर आणि करडई पिकाचे ३०० हेक्टरवर पिक प्रात्याक्षिके राबविण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत बियाणे व निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठामार्फत तसेच कृषि विभागामार्फत तंत्रज्ञानाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरचे तंत्रज्ञान शेतकऱ्याने अवलंब करणे बंधनकारक आहे.

ज्वारी मिनिकीट ही सन २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष असल्याने शेत तिथे पौष्टिक तृणधान्य राबवायचे आहे. शेतकऱ्याना ज्वारी पिकाचे मिनिकीट मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटीवर अर्ज करावा लागणार आहे. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

000000



अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त रोजगार मेळावा

          बुलडाणा, दि. 26 : अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त नांदूरा येथे बेरोजगार युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला.

कार्यक्रमात सुरवातीला कै. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्या आली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम अंभोरे यांनी महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. महामंडळाकडून मराठा समाजाला मिळणाऱ्या विविध योजना, कर्ज मिळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी, बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी लागणारे कागदपत्रे, अटी व शर्तीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी मराठा युवकांनी अर्ज करून उद्योग उभारण्याचे आवाहन केले.

यावेळी भागवत मुंढे, बलदेव चोपडे, मोहन पाटील, प्रमोद हिवाळे, बाळासाहेब चांभारे, संतोष मुंढे, संतोष हेलगे, राजू गावंडे, रामकृष्ण पाटील, संतोष पाटील, छोटू पाटील, अमर पाटील, डॉ. शरद पाटील, त्र्यंबक पाटील, अशोक घनोकर, अंबादास धांडे, राजू काटे, निलेश वेरुळकर, विशाल सरोदे, अमर ठाकरे, भगवंता गई उपस्थित होते.

00000000

महाविद्यालयस्तरावर समान संधी केंद्राची स्थापना

बुलडाणा, दि. 26 : जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात समान संधी केंद्राची स्थापना करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला मुलींना शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी आदी योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता, व्यवसाय, रोजगार निर्मिती आणि आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन, संवाद अभियान तसेच युवा संवाद कार्यक्रम सुरु करण्याकरिता महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता समान संधी केंद्राची स्थापन करण्याचे आवश्यक आहे.

केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित विकासासह त्यांचे सर्व  मार्गदर्शक सुचनांमध्ये देखील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकास व व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने विशेष उपाययोजना करण्याबाबत निर्देशित केले आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना त्यांच्या  महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व त्यांना सहाय्यक म्हणून काही विद्यार्थ्यांची मदत घेऊन महाविद्यालयात समान संधी केंद्राची स्थापना करण्याबाबत कळविण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवुन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र स्थापन झाले आहे.

000000

गुरूवारी तृतीयपंथीयांना ओळखपत्र, प्रमाणपत्राचे वाटप

बुलडाणा, दि. 26 : तृतीयपंथीयांना स्वत:ची ओळख मिळावी, यासाठी गुरूवार, दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी तृतीयपंथीयांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र वाटपासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

तृतीयपंथीयांचे कल्याण आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबतचा मुद्दा तिसऱ्या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे. समाजातील या घटकाच्या विकासासाठी समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

या समाज घटकांची सर्वागीण उन्नती व्हावी, त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे,  त्यांना स्वत:ची ओळख मिळावे या करिता याकरिता समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त कार्यालयात गुरूवार, दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी तृतीयपंथीयांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र वाटपासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

0000000



नेहरू युवा केंद्रात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

बुलडाणा, दि. 26 : येथील नेहरू युवा केंद्रात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती ‘अंत्योदय दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली.

नेहरू युवा केंद्राचे  लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी युथवेलचे संचालक राजेश शेळके, हेमंत बावस्कर, युवा केंद्राचे सहाय्यक धनंजय चाफेकर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अजय सपकाळ, विलास सोनोने, वैभव जुमले उपस्थित होते.

00000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

*महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरावे

बुलडाणा, दि. 26 : भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क आणि इतर योजनेसाठी शैक्षणिक सत्र 2022-23 या वर्षाचे ऑनलाईन अर्ज भरणेसाठी mahadbtmahait.gov.in ही प्रणाली 21 सप्टेंबर 2022 पासून सुरु झालेली आहे. ‍शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानीत महाविद्यालयातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क व इतर योजनेचे सन 2022-23 या सत्रातील नवीन तथा नुतनीकरणाचे अर्ज तात्काळ ऑनलाईन भरावे.

महाविद्यालयस्तरावरील विविध कारणास्तव प्रलंबित असलेले अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज, तसेच नूतनीकरणाचे अर्ज तात्काळ त्रुटीची पुर्तता करुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाच्या लॉगीनला मंजुरी साठी तात्काळ पाठविण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या अर्जाची प्रत महाविद्यालयस्तरावर जतन करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000