Wednesday 31 January 2024

DIO BULDANA NEWS 31.01.2024

 





लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणांनी पूर्वतयारी करावी

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

*मतमोजणी ठिकाणाची पाहणी

बुलडाणा, दि. 31 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडणुकीशी संबंधीत यंत्रणांनी पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

निवडणुकीच्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बुलडाणा उपविभागीय अधिकारी पुलकीत सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, येत्या काही दिवसात निवडणुकीच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. आचारसंहिता लागू झाल्याबरोबर विविध समित्या आणि कार्यवाही करणाऱ्या यंत्रणांना देण्यात आलेल्या कामांची पूर्वतयारी करून ठेवावी. प्रामुख्याने शासकीय संकेतस्थळ, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जाहिराती हटविण्यात याव्यात. आचारसंहिता लागू झाल्याबरोबर खर्च विषयक निरीक्षक जिल्ह्यात येतात. त्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेली माहिती पुरविण्यात यावी.

निवडणूक व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यावी. याकामी आवश्यक असणारा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. बाहेरून येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी. मतदान आणि मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षा ठेवण्यात यावी. तसेच संवेदनशील मतदान केंद्राच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा देण्यात यावी. निवडणूक कामासाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात यावी. मतदान केंद्राच्या ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, मतदान यंत्रणाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प आदी व्यवस्था प्राधान्याने पूर्ण कराव्यात.

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मतमोजणी केंद्राची पाहणी केली. याठिकाणी उमेदवारांची प्रतिनिधी, कर्मचारी, मतमोजणी करणारे कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, तसेच याठिकाणी मतदानानंतर ईव्हीएम मशिन ठेवण्यात येणार आहे, तेथे पुरेशा विजेची व्यवस्था, सुरक्षा ठेवण्यात यावी.

निवडणुकीची सर्व प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी यंत्रणंना कामे नेमून देण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिल्या.

000000

Monday 29 January 2024

DIO BULDANA NEWS 29.01.2024

 जिल्ह्यातील जातीनिहाय सर्व्हेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 29 : जिल्ह्यात जातनिहाय सर्व्हेक्षण घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. यात नागरिकांशी निगडीत अन्य माहितीही घेण्यात येत आहे. नागरिकांनी ही माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रगणकाला योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील एक हजार 306 गावांमध्ये 5 लाख 64 हजार 572 घरांपर्यंत पोहोण्यात येणार आहे. यात 28 लाख 51 हजार 802 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. आतापय्रंत 87 टक्के सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून 4 लाख 91 हजार 67 घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसात सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी आज जातनिहाय सर्व्हेक्षणाचा तहसिलदारांकडून आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, मुख्याधिकारी गणेश पांडे आदी उपस्थित होते. यात प्रामुख्याने प्रगणकांची उपलब्धता, आतापर्यंत झालेल्या नोंदी, खुल्या प्रवर्गातील नोंदी, मराठा समाजाच्या नोंदी, सर्वेक्षणाच्या कामाची टक्केवारी आदींबाबत माहिती घेतली. तहसिलस्तरावरून दररोज सायंकाळी चार वाजता गुगल शीट मध्ये डाटा भरावा. तसेच सर्व्हेक्षणात अद्यापपर्यंत ज्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकले नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचून सर्व्हेक्षणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे.

यात नगरपालिका किंवा जास्त घनता असलेल्या क्षेत्रात सर्व्हेक्षण करताना मेहनत घ्यावी लागणार आहे. कमी कालावधीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे सार्वजनिक सुविधा आहेत, त्यांची माहिती प्रगणकाने स्वत: भरावी. नागरी भागात कार्यालये, शाळा, दुकाने अशा ज्या ठिकाणी नागरिक उपलब्ध होतील, त्याठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात यावे. तसेच मजूर, स्थलांतरीत नागरिकांचे योग्य सर्व्हेक्षण करावे.

जिल्ह्यात खुल्या प्रवर्गातील नागरिकांची संख्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे या नोंदी घेण्याकडे प्रगणकांनी अधिक लक्ष पुरविणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्याचे सर्व्हेक्षण दोन दिवसात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले असल्याने यात सर्व यंत्रणांनी जाणिवपूर्वक काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

00000

तलाठी भरतीमधील निवडयादीतील

उमेदवारांच्या मुळ कागदपत्र तपासणी

*उमेदवारांनी तपासणीसाठी हजर राहण्याचे आवाहन

*बुधवार, गुरुवारी होणार कागदपत्रांची तपासणी

बुलडाणा, दि. 29 : तलाठी पदभरती 2023 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी बुधवार, दि. 31 जानेवारी आणि गुरुवार, दि. १ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. यावेळी उमेदवारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तलाठी पदभरती 2023 ही दि. 17 ऑगस्ट 2023 ते दि. 14 सप्टेंबर 2023 यादरम्यान टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली.  या परीक्षेच्या निकालामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे व ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्ह्याच्या एनआयसी संकेतस्थळावर निवड, प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केलेल्या निवडयादीतील उमेदवारांनी सामाजिक प्रवर्ग, समांतर आरक्षणनिहाय जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे मुळ प्रमाणपत्र तपासणीकरीता हजर रहावे लागणार आहे. उमेदवारांनी येताना ऑनलाईन अर्जाची प्रत, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, तसेच ऑनलाईन अर्जामध्ये नमुद केलेली सर्व मुळ प्रमाणपत्रे व या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रतीचा एक संच व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क, विशेष मागास प्रवर्ग उमेदवारांची कागदपत्रे तपासणी बुधवार, दि. 31 जानेवारी रोजी होईल, तर इतर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस, अराखीव उमेदवारांची कागदपत्रे तपासणी गुरुवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.

00000

रोहयोच्या लेखापरीक्षणासाठी अर्ज आमंत्रित

बुलडाणा, दि. 29 : जिल्हाधिकारी कार्यालयातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संवैधानिक लेखा परिक्षणासाठी इच्छुकांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. यासाठी दि. 1 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान अर्ज करावे लागणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्ह्याचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे अकाऊंड मॅनेजमेंट निगडीत सेवा आणि संवैधानिक लेखापरिक्षण करण्याकरीता इच्छुक निविदा धारकांकडून निविदा मागविण्यात येत आहे. सदर निविदा दि. 1 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सिलबंद लिफाफा पद्धतीने मागविण्यात येत आहे. सदर निविदा ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, मनरेगाची कामे करणाऱ्या सर्व यंत्रणा, पंचायत समिती कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो शाखा) यांचे लेखा परिक्षण करणे यासाठी मागविण्यात आली आहे. या निविदा दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय उघडण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती buldana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

000000


Friday 26 January 2024

DIO BULDANA NEWS 26.01.2024

















शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी प्रयत्नशील

-पालकमंत्री दिलीप वळसे पाटील

बुलडाणा, दि. 26 : राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कटीबद्ध आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अग्रक्रमाने देण्यात येत आहे. त्यासोबतच एक रूपयात पिक विमा, सौर कृषि पंप आणि नुकसान भरपाई देताना मदतीसाठी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी, दि. 26 जानेवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे ध्वजवंदन झाले. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून आतापर्यंत सुमारे 151 कोटी रूपये मंजूर झाले आहे. ही नुकसान भरपाई देताना तीन हेक्टरपर्यंत मर्यादा वाढविली आहे. तसेच खरीप हंगामात 1260 कोटी रूपये आणि रब्बी हंगामात 335 कोटी रूपये असे एकूण 1 हजार 600 कोटी रूपयांपर्यंत पिक कर्ज दिले आहे. खरीप हंगामात साडेसात लाख हेक्टर, तर रब्बी हंगामात तीन लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो किसान महासन्मान निधी योजनेंतर्गत प्रती वर्ष 12 हजार रूपये अर्थसहाय्य देण्यात येत आहे. जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता ही 1500 किलो प्रती हेक्टर इतकी असून ती देशाच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा अधिक आहे, ही अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी 2 हजार हेक्टर जमीन प्रदान केली आहे.

जिगाव प्रकल्पाद्वारे 26 टीएमसी पाणीसाठा करून सहा तालुक्यात एक लाख दोन हजार हेक्टर सिंचनक्षेत्र निर्मितीचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. प्रकल्पासाठी 7 हजार 400 कोटी रूपये उपलब्ध झाले आहे. विविध आवास योजनेतून 17 हजार 55 घरकुलांकरीता 267 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यात 4 लाख 81 हजार 275 आनंदाचा शिधा वाटप केले आहे.

चालू वर्षात 453 कोटी रूपयांची निर्यात झाली आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत 500 हून अधिक प्रस्तावांना आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. मुद्रा योजनेतून 481 कोटी रूपये इतका कर्जपुरवठा करण्यात आला आहे. पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे युवकांना सहाय्य व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे.

पर्यटन विकासासाठी नियोजन समितीमार्फत वीस कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. शासनाने 369 कोटी रूपयांचा लोणार आणि 260 कोटी रूपयांचा सिंदखेडराजा विकास आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियोजन समितीतून दर्जेदार व अत्याधुनिक शैक्षणिक सोयीसुविधांकरीता सुमारे 24 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच आरोग्य सुविधांसाठी सुमारे 15 कोटींहून अधिक निधी दिला आहे. नगरोत्थान योजना, दलित वस्ती व दलितेतर विकास योजना, तांडा वस्ती विकास या योजनांकरीता सुमारे 31 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. प्रभावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाला 16 कोटींचा निधी देण्यात आला आहेत.

युवा पिढीने व्यसनमुक्तीचा संकल्प घ्यावा, तसेच स्वच्छतावैयक्तिक शौचालये, वसुंधरा व जल संवर्धनाची कामे हाती घ्यावीतग्रामीण व शहरी भागात घनता असलेल्या गावात सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न मोठा आहे. लोकसहभागाद्वारे या समस्येवर मात करणे शक्य आहे. स्वच्छ भारत मिशन, नगरोत्थान, दलित वस्ती सुधार, तांडा वस्ती, सार्वजनिक आरोग्य, मानव विकास, जनसुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यासाठी पाणीटंचाई निवारणदुष्काळ व्यवस्थापनमनरेगासामुहिक कामाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

ध्वजवंदन नंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते पोलिस, क्रीडा, भुजल सर्व्हेक्षण, नगर पालिका, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच योजनांचा लाभ प्रदान करण्यात आला. महसूल, पोलिस विभागाला देण्यात आलेली वाहने सूपुर्द करण्यात आली. यावेळी आत्मनिर्भर भारत, विकसित भारतची शपथ घेण्यात आली. विविध विभागांनी माहिती देणारे चित्ररथ सादर केले. शालेय विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. साहेबराव सोळंकी, अपेक्षा इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

000000

Thursday 25 January 2024

DIO BULDANA NEWS 25.01.2024

 राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावली जाहीर

बुलडाणा, दि. 25 : शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार साहसी उपक्रम या पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार इक्वेस्ट्रियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलियर्डस् अॅण्ड स्नूकर, सॉफ्टबॉल पुरुष व बेसबॉल महिला आणि जिम्नॅस्टिक्स एरोबिक्स, अॅक्रोबॅटिक्स या खेळांसाठी अर्ज सादर करता येणार आहे

सुधारीत नियमावलीनुसार पुरस्काराकरीता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीनुसार पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत. यातील पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीमध्ये शासनाने दि. २५ जानेवारी, २०२४च्या शासन निर्णयानुसार सुधारणा केली आहे. शासनाच्या दि. २९ डिसेंबर २०२३ रोजीचा शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट ४.४ येथे इक्वेस्टरियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अॅन्ड स्नूकर, सॉफ्टबॉल पुरुष व बेसबॉल महिला या खेळांचा समावेश करण्यास व मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळामध्ये गुणांकन करताना टेट्राथलॉन या उपप्रकाराचा विचार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२२-२३ मध्ये करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

पुरस्काराकरीता विहित केलेला अर्ज क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे दि. २५ ते ३१ जानेवारी, २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे कार्यालय कार्यालयीन वेळेत सुट्टीच्या दिवशी देखील सुरु ठेवण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी कळविले आहे.

00000



शेतकऱ्यांनी शेतीला प्रयोगशाळा मानून प्रयोग करावेत

-खासदार प्रतापराव जाधव

*मेहकर येथे कृषि महोत्सव, प्रदर्शनीला सुरवात

बुलडाणा, दि. 25 : शेती नफ्याची होण्यासाठी पुढच्या पिढीवर सकारात्मक संस्कार होणे गरजेचे आहे. कष्ट केल्यानंतर शेती नफ्याची होते. तसेच शेती ही एक प्रयोगशाळा आहे, या शेतीमध्ये जेवढे जास्‍त प्रयोग केले जातील, तेवढी त्यात सुधारणा होईल, असे मत खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले. कृषि प्रदर्शनीचे उद्घाटन आज खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार संजय रायमुलकर स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, मेहकर बाजार समितीचे सभापती माधव जाधव, लोणार बाजार समितीचे सभापती बळीराम मापारी, मेहकर बाजार समितीचे उपसभापती विलास मेहरूत, लोणार बाजार समितीचे  उपसभापती जगाराव आडे उपस्थित होते.

खासदार जाधव म्हणाले, शेतमध्ये विविध प्रयोग करणे शक्य आहे. या प्रयोगातून शेतीची उत्पादकता वाढते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी पारंपरीक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करावी. खतांचा वापर करताना संतुलीत मात्रे खतांचा उपयोग केल्यास शेतपिकांपासून चांगले उत्पादन मिळण्यास मदत होईल. कृषि प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, आजही आपली शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायाची कास धरावी. शेतीसोबत जोडधंदा केल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होऊन आर्थिक प्रगती होण्यास मदत मिळत असल्याचे सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कृषि विभागातर्फे मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील प्रांगणात कृषि महोत्सव आणि कृषि प्रदर्शनीस आजपासून सुरुवात करण्यात आली. दि. 29 जानेवारीपर्यंत कृषि महोत्सव सुरू राहणार आहे. नागरिकांनी या कृषि प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

00000








राष्ट्रीय मतदार दिवस विविध उपक्रमांनी साजरा

बुलडाणा, दि. 25 : जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शारदा ज्ञानपीठ येथे राष्ट्रीय मतदार दिवसानिनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला शारदा ज्ञानपीठचे अध्यक्ष डॉ. देशपांडे बुलढाणा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहसिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, शरद पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार रूपेश खंडारे, गटविकास अधिकारी सरीता पवार उपस्थित होते.

            या कार्यक्रमात शारदा ज्ञानपीठ, श्री शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित पोस्टर, रांगोळी, चित्रकला स्पर्धेच्या प्रदर्शनीची पाहणी केली. तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी यांनी मतदानाचे महत्व समजावून सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करून भविष्यात जागरूक मतदार होण्याचे आवाहन केले.     जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील लोकसंख्या, मतदार, मतदारांची टक्केवारी, मतदारयादीतील इतर तपशिलाची माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी विशेषत: नवीन मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करून नोंदणी सुलभ करणे आणि जास्तीत जास्त नोंदणी, मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेची माहिती देऊन सहभाग वाढविण्याचे आवाहन केले.

            यावेळी नवमतदारांचा सत्कार करण्यात आला. त्यांना राष्ट्रीय मतदार दिवस समारंभात मतदार फोटो ओळखपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमात राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त लोकशाही निष्ठा ठेवण्यासंबधी शपथ देण्यात आली.

00000

पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज ध्वजवंदन

बुलडाणा, दि. 25 : प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस कवायत मैदान येथे ध्वजवंदन होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

श्री. वळसे पाटील हे शुक्रवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्राम भवन येथून निघून 9.15 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन, संचलन समारंभ व इतर कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वाजता सिंदखेड राजा येथील दि चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. शाखा सिंदखेडराजाच्या नुतन वास्तू उद्घाटन व स्थानांतरण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालय समोरील प्रांगण येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीवर्षानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, कृषी विभाग आणि मेहकर, लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित श्री अन्न निरंतर कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनास भेट देतील. त्यानंतर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गे नाशिककडे प्रयाण करतील.

00000











रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेट रॅली

बुलडाणा, दि. 25 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त शहरातून हेल्मेट रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हेल्मेट रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.

हेल्मेट रॅली शहरातून जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बॅंक चौक, तहसिल चौक, त्रिशरण चौक, सर्कुलर रोड मार्गे धाड नाका, जयस्तंभ चौक मार्गे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी शिपाई संवर्गातील कर्मचारी व सफाई कामगारांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालकाचे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या अध्यक्षेत स्कुल बस समितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक बाबुराव महामुनी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, मुख्याधिकारी गणेश पांडे, शिक्षणाधिकारी सिध्देश्‍वर काळुसे, उपस्थित होते. उपस्थितांनी रस्ता सुरक्षा संबंधी मार्गदर्शन केले. तसेच वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले.

00000

सेस फंड योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

बुलडाणा, दि. 25 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे सेस फंड योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता दि. 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या 20 टक्के सेस फंड योजनेंतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी मागासवर्गीय शेतकऱ्यांना, मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर 5 एचपी विद्युत मोटार पंप, एचडीपीई पाईप, मागासवर्गीय महिलांकरीता शिलाई मशिन पुरविण्याची योजना घेण्यात आली आहे. सदर योजनेचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय शेतकरी व महिला लाभार्थ्यांनी परीपूर्ण अर्ज अनुषंगिक सर्व कागदपत्रासह संबंधीत गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करावेत.

या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

Wednesday 24 January 2024

DIO BULDANA NEWS 24.01.2024

 राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती सप्ताह

बुलडाणा, दि. 24 : राष्ट्रीय मतदार दिन गुरूवार, दि.25 जानेवारी 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दि. 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान मतदार जागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे.

या सप्ताहात मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. मतदार नोंदणीची शिबीर आयोजित करण्यासंदर्भांत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. हे शिबीरे आयोजित करताना वातावरण निर्मिती करण्यासाठी घोषवाक्य, भिंतीपत्रके, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने लोकशाही निष्ठा ठेवण्यासंबधी शपथ घेण्यात येणार आहे. जिल्हा कार्यालयाकडुन राष्ट्रीय मतदारदिनी वर्षभरामध्ये निवडणूक कर्तव्यार्थ उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली आहे. आयोगाच्या स्थापनेनिमित्त 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवस 2024 ची थीम थीम मतदाना इतके अमुल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’ अशी आहे.

तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र शासनाने दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात येतो. त्यामध्ये मतदान केंद्रे, उपविभाग, विभाग, जिल्हा आणि राज्य मुख्यालयांचा समावेश आहे. राष्ट्रीय मतदार दिवस उत्सवाचा मुख्य हेतू  हा विशेषत: नवीन मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे, नोंदणी सुलभ करणे आणि जास्तीत जास्त नोंदणी करणे आहे. या दिवसाचा उपयोग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी, निवडणूक प्रक्रियेत माहिती देऊन जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी केला जातो. नवीन मतदारांचा सत्कार करण्यात येतो. तसेच मतदार फोटो ओळखपत्र दिले जाते.

या उपक्रमामुळे तरुणांना सबलीकरणाची, अभिमानाची भावना मिळते. त्यांना त्यांचा मताधिकार वापरण्याची प्रेरणा मिळते. यासाठी विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून नवमतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात येते. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत विविध स्पर्धा घेऊन विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाणर आहे. 

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यामध्ये सर्व नागरीकांनी, नवीन मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी केले आहे.

00000

वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी आज निवड

बुलडाणा, दि. 24 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग आणि महिला बालकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना 2023-24 साठी लाभार्थ्यांची गुरूवार, दि. 25 जानेवारी रोजी निवड करण्यात येणार आहे.

योजनांकरीता प्राप्त झालेल्या पात्र अर्जामधून ईश्वर चिठ्ठीने लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ईश्वर चिठ्ठीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय शेतकऱ्यासाठी एचडीईपी पाईप, मागासवर्गीय शेतकऱ्यासाठी 5 एचपी विद्युत मोटर पंप, मागासवर्गीय महिलांसाठी शिलाई मशिन, दिव्यांग व्यक्तीकरिता मिनी पिठाची गिरणी, तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिठाची चक्की पुरविणे (विघयो), ग्रामीण भागातील महिला व मुलींना शिलाई मशिन पुरविणे (विघयो), ग्रामीण भागातील महिला व मुलींना मिनी दाल मिल पुरविणे (विघयो), ग्रामीण भागातील महिला व मुलींना मसाला उद्योग यंत्र पुरविणे (विघयो) या योजनांसाठी लाभार्थी निवड करण्यात येणार आहे.

यावेळी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

000000

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मेळाव्यात योजनांची माहिती

बुलडाणा, दि. 24 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मेळावा पार पडला. मेळावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मंगळवारी, दि. २३ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात आला.

 महामंडळामार्फत मातंग व तत्सम जातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत, तसेच त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महामंडळाने नाविण्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यत पोहोचण्याकरीता योजनांचा प्रचार व प्रसार करण्याकरीता मेळावा घेण्यात आला.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे आमदार संजय गायकवाड, महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अ. ब. साळुंके, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त अनिता राठोड, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे उपस्थित होते.

मेळाव्यानिमित्त शाहीर केशव डाखोरे वाशिमकर यांचा अण्णाभाऊंच्या जीवनावर शाहीरी कार्यक्रम झाला. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व महाव्यवस्थापक यांनी महामंडळाच्या नाविण्यापूर्ण योजनांबाबत मार्गदर्शन केले.

आमदार गायकवाड यांनी मातंग समाजातील लाभार्थींनी योजनांचा लाभ घ्यावा, तसेच नाविण्यपूर्ण योजना लवकरच ऑनलाईन करण्यात येणार असलयाचे सांगितले. आमदार गायकवाड यांच्या हस्ते विविध योजनांतील धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच थेट कर्ज योजनेचे मंजुरी आदेश वाटप करण्यात आले. श्री. गाभणे यांनी प्रास्ताविक केले. वैशाली तायडे यांनी सूत्रसंचालन केले. विजय तायडे यांनी आभार मानले.

00000

मेहकर येथे आजपासून कृषि महोत्सव, प्रदर्शनी

बुलडाणा, दि. 24 : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कृषि विभागातर्फे मेहकर येथे कृषि महोत्सव आणि कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार, दि. 25 जानेवारी 2024 पासून दि. 29 जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.

मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील प्रांगणात ही प्रदर्शनी सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कृषि प्रदर्शनीचे उद्घाटन गुरूवारी दुपारी २ वाजता पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव अध्यक्षस्थानी राहतील. आमदार संजय रायमुलकर स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, राजेश एकडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे उपस्थित राहणार आहेत.

योवळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, मेहकर बाजार समितीचे सभापती माधव जाधव, लोणार बाजार समितीचे सभापती बळीराम मापारी, मेहकर बाजार समितीचे उपसभापती विलास मेहरूत, लोणार बाजार समितीचे  उपसभापती जगाराव आडे यांनी केले आहे.

00000

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 24 : जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू, दिव्यांग गुणवंत खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांचे कार्य, योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला), दिव्यांग गुणवंत खेळाडू यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. यासाठी दि. 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे.

यावर्षी प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार होते. परंतु अपरिहार्य कारणामुळे दि. 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत केले जाणार नाही. त्यामुळे पात्र खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांनी परिपूर्ण प्रस्ताव दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावे. सदर पुरस्कार महाराष्ट्र दिनी दि. 1 मे 2024 रोजी वितरीत करण्यात येतील. या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 10 हजार रूपये असे आहे. त्या अनुषंगाने सन 2021-22 व 2022-23 च्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असावे. क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे. त्याने वयाची 30 र्वो पुर्ण केली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल. दिव्यांग खेळाडू व गुणवंत खेळाडू पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असावे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र असणार नाही.

पुरस्कार वर्षाची गणना 1 जुलै ते 30 जुन अशी राहील. तीनही पुरस्काराकरीता अर्जासोबत सादर करण्यात आलेले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे पुन्हा सादर करु नये. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे व प्रमाणपत्र सत्य असल्याबाबत संबंधित तहसिलदार यांच्याकडून ॲफीडीवेट करुन घ्यावे.

विहीत नमुन्यातील अर्ज आणि पुरस्काराच्या अटी व शर्ती आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथून अर्ज प्राप्त करुन घ्यावे. परिपुर्ण अर्ज सिल बंद लिफाफ्यामध्ये दि.20 फेब्रुवारी 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांनी केले आहे

00000

पॉवरलिफ्टींग स्पर्धेचे आयोजन

बुलडाणा, दि. 24 : जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विना अनुदानीत क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्टिंग खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील राज्य संघटनेद्वारे मान्यताप्राप्त अधिकृत पावर लिफ्टिंग खेळाच्या संघटनांनी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000