Monday 31 July 2023

DIO BULDANA NEWS 31.07.2023

 



अंमली पदार्थांबाबत पालकांनी सजग राहावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 31 : शाळकरी मुलांमध्येही अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे युवा पिढी वाईट मार्गावर जात असल्याने पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन अंमली पदार्थाबाबत पालकांनी सजग राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

अंमली पदार्थ विरोधी कारवाई समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे आदी, मेहकर उपविभागीय अधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, प्रतिबंधात्मक कारवाई करताना प्रामुख्याने ज्या युवांवर अंमली पदार्थाचा दुष्परिणाम जाणविणार आहे, त्या ठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती करावी. पोलिस विभागाने केंद्रप्रमुखांच्या बैठकीमध्ये शाळा परिसरात होणाऱ्या अंमली पदार्थाबाबत माहिती द्यावी. तसेच पालक-शिक्षक सभेमध्ये अंमली पदार्थाची माहिती देण्यासंबंधी शाळांना देण्यात याव्यात. यामुळे मुलांमध्ये जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल.

            अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी राज्याच्या सिमेवर कडक कारवाई करावी. प्रतिबंधात्मक कारवाई करताना राज्य आणि जिल्ह्याच्या सिमेवर तपासणी करावी. इतर राज्यात जाणाऱ्या अवैध दारूवर कारवाई करावी. तसेच दारूप्राशन करून वाहन चालविल्यामुळे धाब्यावर दारू किंवा तत्सम अंमली पदार्थ उपलब्ध होणार नाही, यासाठी कारवाई करण्यात यावी. अवैधरित्या दारू विक्री प्रकार पूर्णपणे बंद कराव्यात. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर पोलिसांनी वचक निर्माण करावा. पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईवर तात्काळ निर्णय घेण्यात येईल. समृद्धी महामार्ग आणि इतर प्रमुख रस्त्यांवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याची कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

000000

पिक विमा काढण्यासाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 31 : खरीप हंगाम 2023 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून पिक विमा काढण्यास सोमवार, दि. 3 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीत पिक विमा काढावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना यावर्षीपासून फक्त 1 रुपयात पिक विमा काढावयाचा आहे. यासाठी 31 जुलै 2023 अंतिम मुदत देण्यात आली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता दि. 3 ऑगस्ट 2023 पर्यंत विमा काढता येणार आहे.  खरीप हंगाम 2023 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यात शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ 1 रुपया विमा हप्ता भरावयाचा आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा, आठ अ, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची छायांकित प्रत सादर करावे, लागणार आहे.

खरीप हंगामातील खरीप ज्वारी, मूग, उडीद, तूर, मका, सोयाबीन, कापूस अशा एकूण सात पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 3 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करावेत, अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

00000

डोळ्यांच्या आजाराबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी

*आरोग्य विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 31 : जिल्ह्यात सर्वत्र डोळ्यांच्या आजाराची साथ आली आहे. या आजाराबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. डोळ्यांच्या आजाराचा संसर्ग आणि घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य यंत्रणांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

डोळे येणे म्हणजे काय

आपल्याकडे पावसाळ्यात पाऊस पडत नाही. तेव्हा काही ठिकाणी उकाडा असतो. हवेतील दमटपणा या ऋतूत वाढलेला असतो. हे वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. सर्दी, पडसे, खोकला, ताप अशा आजाराबरोबरच दरवर्षी या दिवसात डोळे येण्याचीही साथ पसरते. या आजाराला conjunctivitis असेही म्हणतात. डोळे आलेल्या व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात येणे, तसेच अशा व्यक्तीचा रुमाल, त्याने वापरलेले डोळ्यांचे औषध अशा वस्तू वापरल्यामुळे निरोगी व्यक्तीलाही या साथीचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

डोळे येण्याचा संसर्ग कसा होतो

डोळे येण्याचा संसर्ग सामान्यतः प्रथम एका डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतोच असे नाही. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेल्यास पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही, असे म्हटले जाते. त्यात तथ्य नाही. एकदा डोळे येऊन गेले की त्या साधीविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते, हे खरे, परंतू पुन्हा संसर्ग होणार नाही, असे नाही.

लक्षणे

डोळ्यांना संसर्ग झाल्याचे ओळखणे फारसे कठिण नाही. डोळ्यांत सतत काहीतरी गेल्याची भावना होणे, डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळा लाल होणे, ही डोळे येण्याची सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे आधी एका डोळ्याला आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला दिसू लागतात. संसर्गामुळे डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन लाल दिसू लागतात. डोळ्यातून पाणी येऊन किंवा पस सदृश्य घाण येऊन प्रसंगी पापण्या चिकटतात. काहीवेळा डोळ्यांना डोळे जड वाटते. एकदम तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही. काहींना कानाच्या समोरील भागातील ग्रंथींना सूज येते. विशिष्ट प्रकारच्या विषाणू संसर्गामुळे डोळे येण्याबरोबरच ताप, सर्दी, घसा दुखणे यात तक्रारीही जाणवतात. डोळे येण्याचा संसर्ग जीवाणूजन्य असेल, तर त्यामुळे दृष्टीवर सहसा काहीही परिणाम होत नाही. संसर्ग विषाणूजन्य असल्यास डोळ्यांना तात्पुरते अंधुक दिसणे, तीव्र प्रकाशाचा त्रास होणे, ही लक्षणे दिसू शकतात.

हा गंभीर आजार नव्हे पण

डोळे येणे हा गंभीर आजार नव्हे, तरीही डोळे आलेल्या व्यक्तीने साथ पसरणे टाळण्यासाठी घरीच थाबावे.

काय काळजी घ्यावी

वातानुकुलित वातावरणात हा संसर्ग झपाट्याने पसरतो. डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेल्या रुमाल, टिशू, साबण, टॉवल अशा वस्तू इतरांनी वापरू नयेत. डोळ्यांचा संसर्ग चार-पाच दिवस टिकतो. मग बरा होतो. पण या आजारावर स्वतःच्याच मनाने घरगुती उपाय करू नयेत. तुरटी, दूध, काजळ आणि इतर वस्तूंचा वापर करू नये. औषधांच्या दुकानातून कोणतेही डोळ्यांचे ड्रॉप अंदाजाने वापरू नयेत. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्‍ज्ञांचा सल्ला घ्यावा.

डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना अथवा आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना गॉगल वापरावा. डोळे चोळण्याची इच्छा झाली, तरी गॉगल घातल्यामुळे ते जाणीवपूर्वक टाळणे शक्य होते. यामुळे संसर्ग पसरण्याला अटकाव होऊ शकतो. डोळ्यांना वारंवार हात लावू नये. स्टेरॉइड ड्रॉपचा अतिवापर करू नये. संसर्ग झालेल्या डोळ्यांच्या रुग्णांचे ड्रॉप दुसऱ्याने टाकू नये. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवावे. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यावर माशा बसून डोळ्याची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

000000








विभागीय आयुक्तांकडून अपघातातील जखमींची विचारपूस

*मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचे सांत्वन

बुलडाणा, दि. 31 : मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन ट्रॅव्हल्सच्या अपघातातील जखमींची विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

अमरनाथ यात्रेवरून येणारी बस आणि नागपूर-नाशिक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा शनिवार, दि. 29 जुलै रोजी पहाटे तीन वाजता अपघात झाला. यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती प्राप्त होताच विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या समवेत घटनास्थळाला भेट दिली. अपघातानंतर गुरूद्वारा येथे थांबविण्यात आलेल्या प्रवाशांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली. तसेच रस्त्यांमधील प्रशासकीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक दिले. प्रवासात मदत लागल्यास या क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले.

डॉ. पाण्डेय यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात अपघातातील जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जखमींची आस्थेने चौकशी करून लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

000000

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आ. ऊ. पाटील यांचा दौरा

बुलडाणा, दि. 31 : राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आ. ऊ. पाटिल हे सोमवार, दि. 7 ऑगस्ट 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. श्री. पाटील दौरा कार्यक्रमादरम्यान विविध विभागांच्या बैठका घेणार आहेत.

श्री. पाटील यांच्या दौऱ्यानुसार, रविवार, दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी सात वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. सोमवार, दि. 7 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यासोबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संवर्गाच्या इतर मागासवर्ग बिंदुनामावली व जिल्हा बदलीबाबत बैठक व चर्चा करतील. त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याशी बैठक व चर्चा करतील. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, खामगाव येथे आगमन. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत खामगाव येथील लखेरा, लखेरिया जात समुहाची क्षेत्र पाहणी करतील. दुपारी 4 वाजता खामगाव येथून शेगाव कडे रवाना होतील. दुपारी 4.40 वाजता शासकीय विश्रामगृह शेगाव येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता हडगर समाजासोबत बैठक घेतील. सायंकाळी 6.30 वाजता शेगाव येथून अकोला कडे प्रयाण करतील.

000000




अनुसूचित जाती उपयोजनेतून दर्जेदार कामे निर्माण व्हावी

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 31 : जिल्ह्याला अनुसूचित जाती उपयोजनेतून निधी प्राप्त होतो. या निधीतून नागरिकांना उपयुक्त आणि दर्जेदार कामे निर्माण व्हावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

सन 2023-24 या वर्षातील अनुसूचित जाती उपयोजनेतून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती जिल्हाधिकारी यांनी घेतली. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, अनुसूचित जाती उपयोजनेतून नियतव्यय प्राप्त झाला आहे. त्यानुसार विभागांनी आपली मागणी नोंदवावी. उपयोजनेतून कामे करताना त्यातून संपत्ती निर्माण होईल, अशी कामे करण्यात यावीत. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या कामांची गुणवत्ता तपासण्यात यावी. तसेच कामांबाबतचे रेकॉर्ड करून चांगल्या कामांची पुस्तिका तयार करावी.

जिल्हा नियोजनमध्ये यावर्षीपासून जिल्ह्याची बलस्थाने शोधून कामे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती उपयोजनेतून विकासाची कामे करण्यात यावीत. गेल्या कालावधीत पूरामुळे पाच तालुक्यातील रस्ते, शाळा इमारतींचे नुकसान झाले आहे. जिल्हा नियोजन आणि अनुसूचित जाती उपयोजनेतून निधी उपलब्ध असल्याने ही कामे तातडीने करता येणे शक्य आहे. यादृष्टिकोनातून प्रत्येक विभागांनी आपले प्रस्ताव सादर करावेत. अनुसूचित जाती उपयोजनेतून नाविन्यपूर्ण योजनेसाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यासाठी विभागांनी प्रस्ताव सादर करावेत. आलेल्या प्रस्तावाची छाननी करून अंतिम करावेत, त्यांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

000000


Friday 28 July 2023

DIO BULDANA NEWS 28.07.2023

 वृद्ध कलावंत मानधन योजनेसाठी अर्ज आमंत्रित

बुलडाणा, दि. 28 : वृद्ध कलावंतांसाठी सन 2023-24 या वर्षासाठी मानधन योजना राबविण्यात येत आहे. या वर्षासाठी मानधन घेऊ इच्छिणाऱ्या वृद्ध कलावंतांनी आपले अर्ज संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत दि. 18 ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक नियम व अटींची माहिती पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. पात्र इच्छुक लाभार्थ्यांना आपले परिपूर्ण अर्ज दि. 24 जुलै ते दि. 18 ऑगस्टपर्यंत संबंधित पंचायत समितीकडे सादर करावे लागणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी केलेले अर्ज दप्तर जमा झाल्याने विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जातील नमूद अटींची पूर्तता करणाऱ्या व आवश्यक त्या मूळ कागदपत्रांच्या छाननीअंतीच्या पुरावा, कागदपत्रासह सादर केलेले फक्त वैध आणि योग्य अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे इच्छुकांनी यासंबंधी नियम व अटी शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावे.

मुदतीनंतर येणारे अर्ज, अपूर्ण अर्ज, पुरावे नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. अर्जाचा नमुना पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

बुलडाणा, दि. 28 : महिला व बाल विकास विभागातर्फे दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. यात महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आणि संस्थांना गौरविण्यात येते. सन 2020-21, 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या वर्षाकरिता पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांकडून दि. 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज, प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

या पुरस्काराचे स्वरुप राज्यस्तरीय पुरस्कार 1 लाख 1 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षांचा  सामजिक  कार्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई पुरस्कार प्राप्त  झाला आहे, त्या महिला पुरस्कार मिळाल्यापासून 5 वर्षांपर्यत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

विभागीय पुरस्कार हा 25 हजार 1 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असा आहे. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 7 वर्षे कार्य असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत संस्थेस दलितमित्र पुरस्कार प्राप्त नसावा, तसेच संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवाही पक्षातीत व राजकारणापासून अलिप्त असावी लागणार आहे.

जिल्हास्तरीय पुरस्कार हा 10 रुपये 1 रूपये रोख स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ आहे. तसेच पुरस्कारासाठी संस्थेचे महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्षांचे सामजिक कार्य असणे आवश्यक आहे. ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई पुरस्कार मिळाला आहे, त्या महिलांना हा जिल्हास्त्तरीय पुरस्कार अनुज्ञेय नाही. अर्हता असणाऱ्या इच्छुक व्यक्ती, संस्थानी अर्हतेशी  संबंधित आवश्यक कागदपत्रे, तसेच प्रमाणपत्र, कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी चारित्र्य चांगले असल्याबाबत, तसेच त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी आणि त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे विभागीय  पोलीस अधिक्षक यांचे प्रमाणपत्र, प्रस्तावधारकांची माहिती, केलेल्या कार्याचा तपशील, वृत्तपत्र फोटोग्राफ, सध्या कोणत्या पदावर  कार्यरत आहे, यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय? असल्यास तपशिल सादर करावा लागणार आहे. सदर प्रस्ताव 3 प्रतीत सादर करावा लागणार आहे.

विभागीय स्तर पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, वृत्तपत्र फोटोग्राफ, सध्या कोणत्या पदावर  कार्यरत आहे, यापूर्वी संस्थेस पुरस्कार  मिळाला आहे काय? असल्यास त्याचा तपशिल, संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत, संस्थेचे पदाधिकारी यांचे चारित्र्य चांगले आहे, त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी, तसेच त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे व संस्थेचे कार्य व संस्था राजकारणापासून अलिप्त असल्याचे विभागीय पोलिस अधिक्षकांचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे आणि प्रस्ताव 3 प्रतीत सादर करावा लागणार आहे.

इच्छुक व्यक्ती, संस्थाना विहित नमुन्यातील अर्ज, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, फोन नं. 9689554822, 9665273169, 9763791588 येथे संपर्क साधावा. तसेच आवश्यक त्या सर्व  कागदपत्रांसह आपला प्रस्ताव 3 प्रतीत दि. 31 जुलै 2023 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

Thursday 27 July 2023

DIO BULDANA NEWS 27.07.2023

 



शालेय क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाईन प्रक्रिया

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

*शाळा, महाविद्यालयांनी नोंदणी करण्याचे आवाहन

 

बुलडाणा, दि. 27 : येत्या शैक्षणिक वर्षात क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धाऑनलाईन प्रक्रिया होणार आहे. सहभागासाठी शाळा, महाविद्यालयांची नोंदणी अनिवार्य आहे. याच सॉफ्टवेअरद्वारे क्रीडा स्पर्धेची प्रक्रिया होणार आहे, त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

जिल्हा क्रीडा परिषदेची सभा बुधवारी, दि. 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित होते.

शासनाच्या निर्णयानुसार सर्व शालेय क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाईन प्रक्रिया आवश्यक केली आहे. यातूनच स्पर्धेचे प्रमाणपत्र, विभाग, राज्य स्पर्धेसाठी आदेश पत्र, तसेच प्रवेश अर्ज आदी कामे करणे सुलभ होणार आहे. कामकाज पेपरलेस होणार असल्याने गतीमानता येणार आहे.

क्रीडा विभागातर्फे यावर्षी 90 क्रीडा स्पर्धा घेण्यात यातील कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, मैदानी स्पर्धा, कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, योगासन, बुद्धीबळ, बॅडमिंटन या दहा खेळांच्या स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धा 9 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात 15 विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच तलवारबाजीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडाव्यात, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

00000

सैनिकी मुलींचे वसतिगृह भाड्याने देण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा, दि. 27 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे वसतिगृह भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सैनिकी मुलींचे वसतिगृह, गायरान परीसर, सागवन, बुलडाणा हे निसर्गरम्य वातावरणात असून प्रशस्त दोन मजली इमारत आहे. या वसतिगृहापासून राजर्षी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग आणि फार्मसी कॉलेज जवळ आहे. इमारतीमध्ये राहण्यासाठी १२ रूम, स्वयंपाकगृह, भोजनकक्ष तथा मनोरंजन हॉल तसेच पाच हजार चौरस फुटाचे प्रशस्त क्रिडांगणआणि येण्या-जाण्यासाठी ३० फुट सिमेंट रस्ता आहे.

ईच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बसस्थानकासमोर, बुलडाणा, दूरध्वनी क्र. 07262-242208 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी यांनी केले आहे.

00000

निर्यात वाढीसाठी बुधवारी कार्यशाळा

बुलडाणा, दि. 27 :नागपूर येथील विदेश व्यापार महानिदेशालयातर्फे निर्यातवाढीसाठी बुधवारी, दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात एक्स्पोर्ट आउटरिच कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात अतिरिक्त महासंचालक डॉ. व्ही. रमण, मार्गदर्शन करणार आहेत.

नागपूर येथील डीजीएफटी तज्‍ज्ञांची चमू आयइसी, कस्टम प्रक्रिया, एमएसएमइ योजना, निर्यात कसे मिळवावे, बायर-सेलर मीट, इपीसीची भूमिका, वित्तीय सहायता मिळण्यासाठी पर्याय, ई-कॉमर्स बाबत सादरीकरण करणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांचेही मार्गदर्शन होणार आहे. निर्यातीसंदर्भात अडचणी, विविध योजनांबाबत प्रश्नोत्तरांना तज्‍ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधानांच्या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी निर्यात बंधू योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला निर्यात केंद्रात बदलण्यासाठी, स्थानिक वस्तू व सेवांच्या निर्यातीला वाव मिळुन प्रोत्साहन देण्यासाठी, आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार व्होकल फॉर लोकल आणि मेक इन इंडियासाठी प्रत्येक जिल्हा हा निर्यात केंद्र करण्याचा मानस आहे. जिल्ह्यातील निर्यातीस वाव, तसेच प्रोत्साहन मिळून उत्पादन आणि रोजगार निर्मिती होणार आहे.

जिल्ह्यातील उद्योजक, औद्योगिक संघटना एफपीओ, शेतकरी कंपन्या एफपीओ, एक्स्पोर्ट करण्यास इच्छुक युवक-युवती, तसेच कार्यरत एक्स्पोर्टर्सनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील यांनी केले आहे.

000000

रक्षाबंधनासाठी पोस्टाची विशेष व्यवस्था

बुलडाणा, दि. 27 : यावर्षीच्या रक्षाबांधनानिमित्त पोस्ट ऑफीसतर्फे राखी पाठविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी पोस्ट ऑफिस मार्फत देश-विदेशात राखी पाठवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राखी पाठविण्यासाठी पाकिटावर ‘राखी टपाल’ नमूद करून अचूक पिन कोड लिहावा, नागरिकांनी आपल्या नजिकच्या पोस्ट ऑफिसमार्फत राखी, भेटवस्तू पाठविण्याच्या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

00000

Wednesday 26 July 2023

DIO BULDANA NEWS 26.07.2023




 लसीकरणासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य यशस्वी करावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 25 : लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले आणि अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालके आणि गरोदर मातांचा शोध घेण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 राबविण्यात येणार आहे. येत्या ऑगस्टपासून तीन महिने हे मिशन सुरू राहणार आहे. माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे मिशन यशस्वीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0बाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यासह आरोग्य यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या मिशनमध्ये सुरवातीला दोन वर्षापर्यंतच्या लसीकरणापासून वंचित आणि गळती झालेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच गर्भवती मातांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण हे 7 ते 12 ऑगस्ट, 11 ते 16 सप्टेंबर, 9 ते 14 ऑक्टोबर या तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे. ही मोहिम प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात झिरो डोस, सुटलेले व वंचित राहिलेली लाभार्थी क्षेत्र, गोवर आजारासाठी अति जोखमीचा भाग, नियमित लसीचा कार्यक्रम, स्थलांतरीतांचे लसीकरण, गेल्या वर्षात गोवर, घटसर्प, डांग्या खोकला उद्रेकग्रस्त भागात लसीकरण करण्यात येणार आहे.

या मिशनमध्ये नियमित लसीकरण सत्राव्यतिरिक्त अतिरिक्त सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. लसीकरण सत्र हे संस्था, बाह्यसंपर्क आणि मोबाईल क्षेत्र अशा तीन सत्रात राबविण्यात येणार आहे. लसीकरण करावयाच्या समुहाच्या जवळ हे सत्र आयोजित करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी प्रशिक्षण तसेच जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाच वर्षांपर्यंतची एक लाख 6 हजार 798 बालके आढळून आली आहेत. यात एक वर्षाखालील 328, एक ते दोन वर्षाखालील 294 आणि दोन ते पाच वर्षाखालील 178 बालके लसीकरण मोहिमेपासून वंचित असल्याचे आढळून आले आहे. या बालकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी दिले.

000000

बुलडाणा येथे सोमवारी रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 25 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलडाणा आणि सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. सोमवार दि. 31 जुलै रोजी सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्यात नामांकित उद्योजकांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येईल.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तथा मॉडेल करीअर सेंटरच्या rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांनी दि. 31 जुलै रोजी सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, जतकर कॉम्प्लेक्स, पाटबंधारे ऑफिससमोर, संगम चौक, बुलडाणा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

पात्र, गरजू व नोकरी इच्छुक महिला, पुरुष उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता अर्ज करु शकतात. आवश्यक कागदपत्रांसह सकाळी १० वाजता स्वखर्चाने उपस्थित राहून आपली नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, काही अडचण आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 07262 - 242342 तसेच कार्यालयातील योगेश लांडकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7447473585 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलडाणाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना

*प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि‍. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या अधिनस्त असलेल्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2023-24ची वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थिनींनी यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्प आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, संग्रामपूर, ता. संग्रामपूर जि. बुलडाणा, या वसतिगृहाकरीता सातवी, दहावी आणि बारावीलगतच्या अभ्यासक्रमाकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत.

वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थिनी ह्या अनुसूचित जमातीच्या असाव्यात. विद्यार्थ्यांनीकडे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. चालू वर्षातील तहसिलदारांचा मुळ उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे. सदरचे खाते आधार कार्ड आणि मोबाईलशी संलग्न असावा. बँक खात्याची प्रत सोबत जोडावी. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहर, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहिवासी नसावेत. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली संस्था मान्यताप्राप्त महाविद्यालय, संस्था आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा.

विद्यार्थिनी आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेतला नसल्याचे प्रमाणपत्र, प्रवेश घेतलेल्या शाळा, महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचे हमीपत्र, शाळा, कॉलेज सोडल्याचा दाखला, मार्कशिट, विद्यार्थ्यांचा फोटो, आधारकार्ड, ग्रामसेवक, तलाठी यांचे आई, वडील नोकरीवर नसल्याचे प्रमाणपत्राची मूळ प्रत, ऑनलाईन भरलेला फॉर्म ऑफलाईन प्रत काढून सदर प्रत आणि सोबत ऑनलाईन सादर केलेले आवश्यक सर्व दस्ताऐवज संबधित वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहिल. योजनेमध्ये विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थानी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थीनी आणि शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे.

इयत्ता दहावी, बारावीच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेशासाठी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 जुलै 2023 पुर्वी नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे वसतिगृहाच्या कार्यालयात जमा करावे, असे आवाहन केले आहे.

00000


Tuesday 25 July 2023

DIO BULDANA NEWS 25.07.2023

 शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पिक स्पर्धा

* सहभागी होण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या हंगामात खरीप हंगाम पिक स्पर्धा घेण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकरी विविध प्रयोग करतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढते. ते अधिक उमेदीने नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पुढे येतात. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक होवून जिल्ह्याच्या उत्पादनात भर पडेल, यासाठी कृषि विभागातर्फे पिक स्पर्धा घेण्यात येत आहे.

            पिक स्पर्धेतील जिल्ह्याकरिता खरीप हंगामातील स्पर्धेसाठी मुग, उडीद, सोयाबीन, तूर आणि मका पिके समाविष्ट करण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे आणि ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. तसेच एकावेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. लाभार्थीचे शेतामध्ये त्या पिकाखालील किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धेसाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज स्पर्धेकरिता पात्र राहतील. पिक स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्षे त्याच पिकाकरीता पिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये, तर आदिवासी गटासाठी 150 रूपये राहणार आहे. मुग आणि उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम दि. 31 जुलै 2023 आहे. तर सोयाबीन, तूर आणि मका पिकासाठी दि. 31 ऑगस्ट 2023पर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

पिकस्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासह प्रवेश शुल्क चलन, सातबारा, आठ अ चा उतारा आणि अनुसूचित जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.

            तालुका पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले पाच हजार रूपये, दुसरे तीन हजार रूपये, तिसरे दोन हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले 10 हजार रूपये, दुसरे सात हजार रुपये, तिसरे पाच हजार रूपये बक्षीस असणार आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले 50 हजार  रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये बक्षीस असणार आहे.

            पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि उपसंचालक एस. आर. कणखर यांनी केले आहे.

00000

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

         बुलडाणा, दि. 25 : एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प, अकोला अंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलडाणा येथे शैक्षणिक सत्र 2023-24 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरताना विद्यार्थी आणि पालकांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कनिष्ठ महाविद्यालय, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दि. 31 जुलै 2023 आणि मेडिकल व इंजिनिअरींग विद्यार्थ्यांसाठी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. खास बाब प्रवेशाबाबत लोकप्रतिनिधी शिफारशी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आयुक्तालय, नाशिक येथे प्रकल्प कार्यालय, अकोला मार्फत सादर करावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना कागदपत्रांची  सुस्पष्ट व मूळ प्रत संकेतस्थळावर अपलोड करावी. अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंदवावा. मोबाईल क्रमांकाची नोंद करताना मोबाईल आधार क्रमांकाशी जोडलेला असावा. तसेच आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असावा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करावी. अर्जामध्ये नाव नोंदणी करताना आधारकार्ड वरील नावाप्रमाणेच तंतोतंत भरावे. पालकांचे स्वयं घोषणापत्र व विद्यार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहिल. घोषणापत्राचा नमुना संकेतस्थळावरील सुचना फलकावरील लिंकमध्ये देण्यात आला आहे. अर्जामध्ये माहिती भरताना चुकीची माहिती भरल्या जाणार नाही, याची खबरदारी विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावी.

उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, बोनाफाईड किंवा प्रवेश घेतल्याची मुळ पावती, विद्यार्थी आणि पालकांचे स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

 

000000

गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच योजना

बुलडाणा, दि. 25 : अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानामधील अन्न धान्य पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातील गळीतधान्य आणि तेलताड योजनेमध्ये फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच योजना राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज घेण्यास सुरवात झाली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामध्ये सन 2023-24 मध्ये अन्नधान्य पिके आणि गळीत धान्य अंतर्गत फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच यासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ यांच्याकडून तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत. गोदाम बांधकाम आणि बीज प्रक्रिया संचचा लाभ हा नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ असणाऱ्यांना आहे. त्यासाठी दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा लागणार आहे. मुदतीत अर्ज करणाऱ्या नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ यांचाच विचार केला जाईल. जिल्ह्यास गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संचासाठी लक्षांक प्राप्त आहे. या लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याची स्थानिकरित्या सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.  

गोदाम बांधकाम

              जिल्ह्यामध्ये या योजनेंतर्गत २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय देण्यात येणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहिल. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.

बीज प्रक्रिया संच

सदर योजनेंतर्गत उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीज प्रक्रिया संच उभारणी करण्यासाठी यंत्रसामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ, कंपनीने बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहिल. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर व बीज प्रक्रिया संच उभारणी पूर्ण झाल्यावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.

00000

कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांनी वृक्षारोपण करावे

*जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : जिल्ह्यातील माजी सैनिकांमधील उत्साह व त्यांची प्रशासनासोबत सलोख्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे माजी सैनिकांच्या सहभागाने कारगील विजय दिवसानिमित्त दि. 26 जुलै 2023 रोजी वृक्षारोपण करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त स्वक्वाड्रन लिडर रुपाली सरोदे यांनी केले आहे.

माजी सैनिकांनी 50पेक्षा कमी माजी सैनिक असलेल्या गावातील वृक्षारोपणाचे फोटो आणि सरपंचाच्या स्वाक्षरीनीशी अहवाल जिल्हा सैानिक कल्याण कार्यालय बुलडाणा येथे पाठवावा. जिल्ह्यामधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन गावातील माजी सैनिक समुहास प्रथम क्रमांकास 10 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 5 हजार रुपये प्रदान करण्यात येतील. 50पेक्षा जास्त माजी सैनिक असतील अशा गावातील समुहाला प्रथम क्रमांकास 20 हजार रूपये आणि द्वितीय क्रमांकास 15 हजार रूपये प्रदान करण्यात येतील. वृक्षारोपणाचे फोटो आणि अहवाल दि. 27 जुलै 2023 पुर्वी दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालयात देण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करावेत

*क्रीडा विभागाचे आवाहन

          बुलडाणा, दि. 25 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे अनुसूचित जाती उपयोजना क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत विविध अनुदानित शाळा, क्रीडा संस्था यांना विविध पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्यात येते. यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

या योजनेतून क्रीडांगण समपातळीत करणे, क्रीडांगणावर 200 मीटर, 400 मीटर धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणाभोवती भिंती, तारेचे कंपाऊंड बांधणे, क्रीडांगणावर विविध खेळांची प्रमाणित आकारांची मैदान तयार करणे, क्रीडांगणावर प्रसाधनगृह बांधणे, क्रीडांगणावर पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणावर भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा तयार करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर माती, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे, मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे यासाठी सात लाख रुपयांपर्यंत अंदाजपत्रक आणि दरपत्रकाच्या अनुषंगाने मंजूर करण्यात येते.

अनुदान घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजित केलेली जागा शासनाने घोषित केलेल्या दलित वस्तीत असणे आवश्यक आहे, तसे प्रस्तावासोबत गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरी, शिक्यानिशी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच संस्थेच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे. अनुदानाकरिता पात्र संस्थांचा प्राथम्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह तसेच क्रीडा विभागाची संकुले, पोलीस विभागांतर्गत कल्याण निधी समिती, शासकीय स्पोर्ट क्लब, शासकीय महाविद्यालये, शिक्षण विभागाच्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालये राहणार आहे.

अनुसूचित जाती उपयोजनेच्या अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या संस्थांनी दि. 10 ऑगस्ट 2023पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून विहित नमुना प्राप्त करुन, आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 12 ऑगस्ट 2023पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000