Thursday 31 August 2017

NEWS 31.8.2017 DIO BULDANA

अल्पसंख्याक बहुल शासनमान्य शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना जाहीर
·        18 सप्टेंबर 2017 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा,दि. 31 : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ  महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण व अपंग शाळा यांना पायाभूत सोयी-सुविधांसाठी अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. या अनुदान योजनेतंर्गत कमाल 2 रूपये लाख अनुदान उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल खाजगी शासन मान्यताप्राप्त इच्छुक शाळा, कनिष्ठ  महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळा व न.प शाळा यांनी शासननिर्णयामध्ये नमूद कागदपत्रांची पुर्तता करून परिपूर्ण अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 18 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावे.
   योजनेच्या लाभासाठी शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय,  औद्योगिक प्रशिक्षण संस्था व न.प शाळांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख व पारशी) मिळून किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असावे. तसेच शासन मान्यताप्राप्त अपंग शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. या योजनेतंर्गत शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे, ग्रंथालय अद्यावत करणे, प्रयोगशाळा उभारणे किंवा अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे किंवा अद्ययावत करणे, प्रसाधन गृह/स्वच्छतागृह उभारणे किंवा डागडुजी करणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर घेणे, वर्ग खोल्यांमध्ये आवश्यकतेनुसार पंख्यांची व्यवस्था करणे, इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्यापनाची साधने एलसीडी प्रोजेक्टर किंवा विविध सॉफ्टवेअरची खरेदी, इंग्रजी भाषा लॅब आणि संगणक हार्डवेअर / सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी अनुदान देय असणार आहे. तरी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
                                               **********
शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन करावे
बुलडाणा,दि. 31 : शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव मलकापूर, मोताळा तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. शेंदरी बोंडअळी सुरूवातीला पाते, कळ्या, फुलांवर उपजिविका करते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळी सारख्या दिसतात. अशा कळ्यांना डोमकळ्या म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाते व बोंडे गळुन पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. अळी बोंडातील बिया खात त्याचबरोबर रूई कातरून नुकसान करतात. त्यामुळे रूईची प्रत खालावते व सरकीतील तेलाचे प्रमाणपही कमी होते. याकिडीच्या नियंत्रणाकरीता एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
  

     किडीच्या व्यवस्थापनाकरीता कपाशीच्या सभोवती बिगर बी.टी कपाशीची लागवड करावी. नैसर्गिक मित्र किटकांचे कपाशीमध्ये संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मुंग, झेंडू व एरंडी या मिश्र सापळा पिकांची एक ओळ लावावी. माती परीक्षणाच्या आधारावर खतांच्या मात्रेच्या अवलंब करावा, नत्र खताचा जास्त वापर झाल्यास अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, डिसेंबर/जानेवारी दरम्यान कपाशीचे पीक पुर्णपणे काढून टाकावे व पुढे खोडवा घेवू नये, कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टर किमान 10 पक्षी थांबे उभे करावे म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळ्या टिपुन खातील, कापूस मिल व व्यापार संकुलाच्या ठिकाणी जेथे कपाशीचा वापर होतो, अशा ठिकाणी प्रकाश सापळे लावावेत. तसेच कापसाच्या शेतात ऑक्टोंबर पासून पुढे हेक्टरी 4 ते 5 कामगंध सापळे लावावेत व दोन सापळ्यांमध्ये अंतर 50 मीटर ठेवावे, सापळ्यात अडकलेले पतंग वेळच्या वेळी नष्ट करावेत. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा ॲझेडिरेक्टीन 10 हजार पीपीएम 1 मि.ली प्रती लिटर किंवा 1500 पीपीएम 1 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी कळविले आहे.
                                                                                   ********
पोर्टलवर गाव, बँक शाखेचे नाव नसल्यास
जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कळवावे
बुलडाणा,दि. 31 : छत्रपती शिवाजी  महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकरी बांधव, केंद्र चालक कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन सादर करीत आहे. मात्र ज्या गावांचे, बँक शाखांचे, विकास संस्थांचे नाव संबंधित पोर्टलवर दिसत नसतील त्याबाबत ddr_bud@rediffmail.com या ईमेल आयडीवर आणि 9923049253 , 9822744607 क्रमांकावर कळविण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
   अशाप्रकारे पोर्टलवर नसलेली नावे कळविल्यास जेणेकरून त्यांची नावे पोर्टलवर उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कारवाई करता येईल. तरी अशी नावे तात्काळ उपरोक्त मोबाईल क्रमांकावर व मेलवर द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

                                               ***********

Thursday 24 August 2017

24.8.2017 dpdc meeting news dio buldna


विहीत कालमर्यादेत निधी खर्च करून कामे पूर्ण करावी
- पालकमंत्री पांडुरंग फुंडकर
·                    कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी महसूल मंडळ स्तरावर शिबिरे
·                    आदिवासी विकास विभागाचे कार्यालय जिल्ह्यात होण्यासाठी शासनास प्रस्ताव
·                    कर्जमाफीकरीता नावावर शेती असलेल्या व्यक्तींचेच आधार कार्ड आवश्यक
बुलडाणा दि‍.24 -  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येणारा निधी प्रशासकीय यंत्रणांनी विहीत कालमर्यादेत खर्च करावा. कुठल्याही विभागाने निधी अखर्चीत ठेवून समर्पित करू नये. निधी खर्च करण्याचे व्यवस्थित नियोजन करून कामे पूर्ण करावी. तसेच सन 2016-17 मधील निधी खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र संबंधीत यंत्रणांनी सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले.
     जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज एस, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, जिल्हा नियोजन अधिकारी विवेक कुळकर्णी आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात आमदार सर्वश्री चैनसुख संचेती,  डॉ. संजय कुटे, राहूल बोंद्रे, डॉ. संजय रायमूलकर, ॲड. आकाश फुंडकर आदींसह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
        शेतकरी कृषी सन्मान योजनेतंर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज भरण्याचे आवाहन करीत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, शेतकरी कृषी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यासाठी यापुढे महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये कृषी, सहकार व महसूल विभागांचे अधिकारी उपस्थित राहतील. या शिबिरांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होवून आपले अर्ज भरून घ्यावे. अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफी योजनेमुळे सर्वात जास्त लाभ बँकांना होणार आहे. त्यामुळे बँकांनी स्वत: पुढाकार घेवून शेतकऱ्यांचे कर्जमाफी अर्जासाठी लागणारे बँकेतील कागदपत्रे ताबडतोब द्यावीत. तसेच अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून मदत करावी.  कर्जमाफीचा अर्ज भरताना पती, पत्नी किंवा मुलगा असे शेतकरी कुटूंब गृहीत धरण्यात आले होते. त्यामुळे पती-पत्नी या दोघांचे आधार कार्ड आवश्यक असायचे . आता मात्र ज्याच्या नावावर 7/12 व कर्ज खाते आहे, त्याचाच 7/12 व आधार कार्ड अर्ज भरतेवेळी लागणार आहे. महा ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र व संग्राम केंद्र यामध्ये अर्ज विनामूल्य भरण्याची सुविधा आहे. 
      जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गत वर्षात झालेल्या कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र त्वरित सादर करण्याचे आदेश देत पालकमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातील कामे करणाऱ्या सर्व यंत्रणांनी उपयोगीता प्रमाणपत्र विनाविलंब सादर केली पाहिजेत. त्याशिवाय पुढील वर्षासाठी निधी मिळणार नाही. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजनमधून निधी मिळणाऱ्या यंत्रणांनीसुद्धा उपयोगीता प्रमाणपत्र सादर करावी. बँकांनी कुठल्याही अनुदानाचे पैसे अथवा बचत खात्यातील पैसे कर्ज खात्यात वळते करू नये. कारण कर्जमाफीमुळे बँकांना थकीत कर्जाचा पैसा मिळणार आहे. 
    ते पुढे म्हणाले, आदिवासी विकास विभागाचे कार्यालय जिल्ह्यात नाही. सदर कार्यालय अथवा उपकार्यालय जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्या जातील. त्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येईल. तसेच प्रत्येक यंत्रणेने मिळालेल्या निधीचा उपयोग करून विहीत कालमर्यादेत कामे पूर्ण करावी, असे आदेशही त्यांनी दिले.
 


    या बैठकीत सन 2016-17 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 226.84 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेच्या 95.13 व आदिवासी उपयोजनेच्या 20.93 कोटी रूपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.  तसेच सन 2017-18 मधील खर्चाचा आढावा घेण्यात आला. या वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनेमध्ये 202.83, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 123.57 व आदिवासी उपयोजनेकरीता 24.09 कोटी रूपयांचा आराखडा आहे. यावेळी खर्चाचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान केंद्र सरकारच्या सुचनेनुसार संकल्प ते सिद्धी अभियानाची शपथ घेण्यात आली.
    खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी नगर परिषद हद्दवाढ आणि गावठाण विस्तारासाठी प्रयत्न करून नवीन महसूल गावांना मान्यता देण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचप्रमाणे बँकांनी मुद्रा योजना, शिक्षण कर्ज याविषयी जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करून कर्ज वितरण करण्याचे सांगितले.
      यावेळी आमदार चैनसुख संचेती, डॉ. संजय रायमूलकर, राहूल बोंद्रे, डॉ. संजय कुटे, ॲड आकाश फुंडकर यांनी विविध प्रश्न मांडले. या प्रश्नांवर पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेकडून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी विवेक कुळकर्णी यांनी सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बैठकीत माहिती दिली.   सुरूवातीला पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे यांनी पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त 51 हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विभागप्रमुख, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
--------------



Wednesday 23 August 2017

news 23.8.2017 dio buldana

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन
 बुलडाणा, दि. 23 : हॉकीचे जादुगर म्हणून ओळखल्या जाणारे स्व. मेजर ध्यानचंद यांचे जन्मदिनानिमित्त 29 ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये सर्वत्र राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे सकाळी 8.30 वाजता करण्यात आले आहे.  यावेळी शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.  
       राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्व. मेजर ध्यानचंद यांचे जिवनावर व्याख्यान, राष्ट्रीयस्तरावर खेळलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.  जे खेळाडू शालेय/संबंधीत अधिकृत फेडरेशन यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी असतील त्यांनी दि. 29 ऑगस्ट 2016 ते आजपर्यंत या कालाधीत जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळले असतील अशा खेळाडूंनी प्रमाणपत्राच्या सत्य छायांकीत प्रतीसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात  25 ऑगस्ट  2017 पर्यंत आपले प्रमाणपत्राची छायांकीत प्रत जमा सादर करावयाची आहे.
      तसेच  महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन या कार्यक्रमातंर्गत फुटबॉलचे सेल्फी पॉईंट येथे सेल्फी काढणे, हॅण्डबॉलचे प्रदर्शनीय सामने आयोजित होतील.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील शाळांनी, क्रीडा संघटना, अध्यक्ष, सचिव, खेळाडूंनी, अधिकारी कर्मचारी वृंद, शारीरिक शिक्षक व मुख्याध्यापक, क्रीडा प्रेमी नागरीक यांनी 29 ऑगस्ट 2017 रोजी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे सकाळी 7.30 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
                                                            ************
अप्रशिक्षीत शिक्षकांना डिएलएड पदविका बंधनकारक
  • 15 सप्टेंबर 2017 पर्यंत SWAYAM  पोर्टलवर अर्ज सादर करा
 बुलडाणा, दि. 23 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलमांनुसार राज्यातील शाळांमधील अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकांना नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ ओपन स्कूलींग योजनेतंर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार डिएलएड ही पदविका विहीत मुदतीत प्राप्त करावी लागणार आहे. सर्व आस्थापनाच्या कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळा अधिनियमान्वये परवानगी व मान्यता मिळालेल्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील अप्रशिक्षीत शिक्षकांना डि. एल. एड या पदविकेसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. त्यानुसार अप्रशिक्षीत शिक्षकांनी 15 सप्टेंबर 2017 पर्यंत केंद्र शासनाच्या SWAYAM  पोर्टलवर अर्ज सादर करावेत. हे शिक्षक मात्र राज्य शासनाच्या पत्रद्वारा शिक्षण योजनेतंर्गत प्रशिक्षीत होण्यासाठी अर्ज करू शकणार नाहीत.
   स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खाजगी अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांनी यापूर्वी वैयक्तिक मान्यता प्राप्त प्रदान केलेल्या अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकांना राज्य शासनाच्या पत्रद्वारा प्रशिक्षण योजनेमध्ये अथवा नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलींग योजनेतंर्गत डिएलएड पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. या योजनांमधून प्रवेश घेणाऱ्या अप्रशिक्षित शिक्षकांना 31 मार्च 2019 पूर्वी डिएलएड ही पदविका प्राप्त करणे बंधनकारक आहे. या दिनांकानंतर कोणताही अप्रशिक्षित शिक्षक शाळांमध्ये आढळणार नाही. येथून पुढे एकाही अप्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती शाळांनी करू नये, याची दक्षता घ्यावी. शिक्षकांनी अधिक माहितीसाठी www.mscert.org.in व केंद्र शासनाच्या SWAYAM पोर्टलवर संबंधितांनी संपर्क साधावा, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.
                                                                        ***********


शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचे अर्ज भरावे
·        महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल केंद्र, संग्राम केंद्र याठिकाणी मोफत सुविधा
·        9923049253, 7767010001, 9423338375,9822744607 या क्रमांकावर तक्रार करावी
·        07262-248683 क्रमांकावर संपर्क साधावा

     बुलडाणा, दि.23 : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना- 2017 अंतर्गत कर्जमाफी / प्रोत्साहनपर इतर लाभ मिळविण्यासाठी अर्ज तथा घोषणापत्र ऑनलाईन मोफत भरण्यात येत आहे. त्यासाठी महा ई सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल केंद्र, संग्राम केंद्र याठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या केंद्रांवर ऑनलाईन अर्ज मोफत भरण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे शुल्क अर्ज भरतेवेळी देण्याची गरज नाही.  सदर अर्ज व घोषणापत्र मिळविण्यासाठी वरील सर्व केंद्राशिवाय आपले गावातील गटसचिव, संबंधित बँक शाखा, तालुक्याचे सहायक निबंधक यांचे कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक बुलडाणा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांचे कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क करावा.
   शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरतेवेळी कर्ज खाते पासबुक झेरॉक्स, बचत खाते पासबुक झेरॉक्स, पती-पत्नी यांचे आधारकार्ड झेरॉक्स, पॅनकार्डची झेरॉक्स, सेवानिवृत्ती वेतन धारक असल्यास पीपीओ बुकची झेरॉक्स आदी कागदपत्रे सोबत आणावी. ऑनलाईन अर्ज सादर करून कर्जमाफी योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. तसेच फॉर्म भरताना कोणतेही शुल्क मागितल्यास 07262-248683, 9923049253, 7767010001, 9423338375, 9822744607 क्रमांकावर तक्रार करावी. तसेच अर्ज भरताना शेतकऱ्यांनी कुठलेही शुल्क देवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे यांनी केले आहे.
                                                            ***************
महाराष्ट्र मिशन 1 मिलीयनमध्ये बुलडाणा जिल्हा विदर्भात प्रथम
·         महाराष्ट्रात जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर
              बुलडाणा, दि. 23 :   भारतात पहील्यांदाच फीफाद्वारे फुटबॉलचा 17 वर्षाखालील मुलांचा विश्वचषक आयोजित होत आहे.  जगात सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या या क्रीडा प्रकारात भारताचे रॅकींग 96 वे आहे.  फुटबॉल या क्रीडा प्रकारात आपल्या देशाने दर्जेदार कामगिरी करावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटबॉल या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी आवाहन केले आहे.  त्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेने महाराष्ट्र राज्यात फुटबॉल  या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी महाराष्ट्र मिशन 1 मिलीयन अर्थात अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय हे अभियान राबविण्यात येत आहे.  त्यानुसार राज्यातील सर्व शाळांना आपल्याकडे असलेल्या फुटबॉल या खेळाच्या सुविधा व शाळेबाबत माहिती ऑनलाईन सादर करण्यासाठी एक लींक देखील देण्यात आलेली होती. 
   जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्हा फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेवून अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन केले आहे.  त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे नियोजन व त्यास जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व फुटबॉल संघटनेचे सहकार्य यामुळे जिल्ह्यातील जवळजवळ 90 टक्के शाळांनी पुढाकार घेवून सदर माहिती शासनाने दिलेल्या लींकवर ऑनलाईन सादर केली.  तसेच तालुका व जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत हिरीरीने सहभाग नोंदविला, अशी कामगिरी करणारा बुलडाणा हा विदर्भातील पहिला व राज्यातील तिसरा जिल्हा ठरला आहे.  मुंबई येथे 20 ऑगस्ट 2017 रोजी झालेल्या आढावा बैठकीत क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.  बुलडाणा जिल्ह्यात त्यामुळे फुटबॉलमय वातावरण होण्यास निश्चीतच बळ मिळणार आहे.
                या अभियानाची पुढील आयोजन म्हणून 15 सप्टेंबर 2017 रोजी संपुर्ण राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमध्ये आंतरवर्ग फुटबॉलचे प्रदर्शनीय सामने खेळविण्यात येणार आहे.  तसेच ज्या शाळांनी सदर लींकवर ऑनलाईन माहिती सादर केली आहे, त्या शाळांना शासनाच्या वतीने प्रत्येकी 3 फुटबॉल देण्यात येणार आहे.  तरी सर्व संबंधीत शाळांनी आपल्या शाळेतील किमान 10 मुला-मुलींचे संघ तयार करुन त्यांच्यात फुटबॉल आंतरवर्ग सामने घेण्यासाठी पूर्वतयारी करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांना परवाना देण्याची प्रक्रीया आता ऑनलाईन
  • www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावे अर्ज
  • मागील वर्षीचा हिशेब नवीन परवानगीसाठी देणे आवश्यक
     बुलडाणा,दि‍. 23 - सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सव 2017 करिता परवाना देण्याची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. मंडळांनी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे. मंडळांना मुंबई सार्वजनिक विश्वस्त्‍ा व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 क अन्वये सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करण्याकरिता सहायक धर्मदाय आयुक्तांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सव 2017 करिता परवाना घेणे बंधनकारक आहे. या परवान्यासाठी अर्ज ऑनलाईन सादर करावा.
   संस्था नोंदणी अधिनियम 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा 1950 अन्वये नोंद असलेल्या व ज्यांच्या उद्देशामध्ये गणेशोत्सव व नवरात्र उत्सव साजरा करणे असा उल्लेख असणाऱ्यांना संस्थांना अशी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तात्पुरत्या स्वरूपातील परवानगीसाठी अर्ज करतांना मागील वर्षी परवानगी घेतलेल्या संस्थांनी मागील वर्षीचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे.  त्याचप्रमाणे नविन परवानगी अर्ज करतेवेळी त्या-त्या क्षेत्रातील नगरसेवक, ग्रामपंचायत यांच्याकडील त्यांचे याठिकाणी गणेश उत्सव साजरा करण्यास अनुमती असल्याचे संमतीपत्र व प्रथम वर्ष असल्यास दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
    गणेशोत्सव 2017 करिता निधी गोळा करण्यासाठी परवानगी देण्याचे सुरू झाले असून ऐनवेळची गैरसोय टाळण्यासाठी अर्ज करावे. देणगीदारांनी देणगी देण्यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडील परवानगी प्रत पाहून खात्री करूनच देणगी, वर्गणी बाबात निर्णय घ्यावा, असे सहायक धर्मदाय आयुक्त यांनी कळविले आहे. वरील संकेतस्थळावर जावून लॉग ईन करावे. नंतर रजिस्टर युजर यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी. अपलोड करावयाच्या कागदपत्रांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सहायक धर्मदाय आयुक्त यांनी कळविले आहे.
                                                                          **********
जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत तुरीची खरेदी करण्यात येणार
·        31 मे 2017 तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तुर खरेदी
·        13 तुर खरेदी केंद्र, तुर तपासणी झालेल्या शेतकऱ्यांनी तुर विक्रीस आणावी
बुलडाणा, दि. 23 -  ज्या शेतकऱ्यांनी तुर खरेदी केंद्रावर 31 मे 2017 पर्यंत त्यांचे तुर विक्रीबाबत नोंद केलेली आहे. अशा शेतकऱ्यांची तुर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेतंर्गत 31 ऑगस्ट 2017 पर्यंत खेरदी करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात 13 तुर खरेदी केंद्र संबंधित तालुक्याच्या कृषि बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आलेली आहेत. या तुर खरेदीची कार्यवाही जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नियंत्रणात मार्केटींग फेडरेशनमार्फत सुरू असून तुर तपासणीचे कामकाज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, महसूल, कृषी विभागामार्फत सुरू  आहे. ज्या शेतकऱ्यांची तपासणी पूर्ण झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून तुर विक्रीसाठी खरेदी केंद्रावर बोलाविण्यात येत आहे.  मात्र बरेचशे शेतकरी तुर घेवून खरेदी केंद्रावर येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
शासनाने तुर खरेदीची अंतिम मुदत वाढविली असून ती 31 ऑगस्ट 2017 केली आहे. तरी तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे संपर्क साधून आपली तुर खरेदी केंद्रावर आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी केले आहे.
                                               
                                                                        *******





पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा,दि. 23 : कृषि व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर हे दिनांक 24 ऑगस्ट, 2017 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  दिनांक 24.08.2017 रोजी सकाळी 05.28 वाजता मुंबई येथून हावडा मेलने शेगाव येथे आगमन व शासकीय मोटारीने खामगावकडे प्रयाण,  सकाळी 06.00 वाजता खामगाव येथे आगमन व राखीव, सकाळी 10 वाजता खामगांव येथून मोटारीने बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता बुलडाणा येथे आगमन व गट शेती शासन निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीस उपस्थिती, दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती,  सोयीनुसार बुलडाणा येथून मोटारीने खामगांवकडे प्रयाण, खामगांव येथे आगमन, राखीव व मुक्काम.
                                                        *********
अपंग कल्याण राज्य पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
·                 9 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 23 -  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत 1982 पासून अपंग राज्य पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी 3 डिसेंबर या जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून सन 2017 साठीचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप उत्कृष्ट कर्मचारी, स्वयंउद्योजक अपंग व्यक्ती, उत्कृष्ट  नियुक्तक संस्था असे आहे.  अर्जाचे नमुने जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांच्या कार्यालयात 28 ऑगस्ट 2017 पर्यंत उपलब्ध आहेत. इच्छूक पात्र अपंग व्यक्ती, संस्था, अपंगांचे नियुक्तक यांनी 9 सप्टेंबर 2017 पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परीषद यांचे कार्यालयात सादर करावे.
   पुरस्कारामध्ये स्वयंउद्योग करणाऱ्या अपंग व्यक्ती किंवा अपंग कर्मचारी यांना उत्कृष्ट कर्मचारी/ स्वयंउद्योजक पुरस्कार देण्यात येतो. सदरचा पुरस्कार शासकीय/निमशासकीय क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रामधील अंध, अस्थीव्यंग, कर्णबधीर व मतिमंद प्रवर्गातील व्यक्तींना देण्यात येतो. तसेच जास्तीत जास्त अपंग व्यक्तींना त्यांच्या आस्थापने नोकरी उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय/ सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्थेला उत्कृष्ट नियुक्तक म्हणून पुरस्कार दिल्या जातो. तरी पात्र अपंग व्यक्तींनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.
                                                                        **********



Monday 21 August 2017

news 21.8.2017 dio buldana

ग्राहकांना कायद्याप्रमाणे संरक्षण मिळेल
-         ए.पी भंगाळे
बुलडाणा, दि. 21 : ग्रहकांचे हक्क, कर्तव्य व कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या सेवा महत्वाच्या आहेत. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदे निर्माण करण्यात आलेले आहेत. या कायद्यांप्रमाणे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण केले जाईल. त्यामुळे ग्राहकांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, असा विश्वास राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए.पी भंगाळे यांनी व्यक्त केला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या इमारत नुतनीकरणाचा कार्यक्रम इमारतीच्या परीसरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड विजय सावळे, जिल्हा मंचचे अध्यक्ष विश्वास ढवळे, सदस्य मनिष वानखडे आदी उपस्थित होते.
    याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी सेवा हमी कायद्यावर प्रकाश टाकीत शासनाला विहीत कालावधीत नागरिकांना सेवा द्यावयाच्या आहेत. सेवा म्हणजे उत्पादन व नागरिक म्हणजे ग्राहक. त्यामुळे नागरिकांना सेवा विहीत कालावधीत मिळण्याची हमी मिळाली आहे. ॲड. सावळे व श्री. ढवळे यांनीसुद्धा यावेळी आपले विचार व्यक्त केले. संचलन राहूल दाभाडे यांनी, तर आभार प्रदर्शन श्रीमती जयश्री खांडेभराड यांनी केले. कार्यक्रमाला जळगांव येथील भरत देशमुख, जळगांव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, माजी अध्यक्ष श्री. शिंदे, पक्षकार, जिल्हा मंचचे सर्व कमचारी उपस्थित होते.
-------------------------
शासकीय कर्मचाऱ्यांचा तयार होणार सर्वंकष माहितीकोष
  • 16 ऑगस्ट 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 कालावधीत होणार तयार
बुलडाणा, दि. 21 : नियोजन विभागाच्या परिपत्रकानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष-2017 तयार केल्या जाणार आहे. हा कोष 16 ऑगस्ट 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत तयार होणार आहे. तरी शासकीय कार्यालय यांनी कार्यरत अधिकारी/ कर्मचारी यांची कार्यालय व आहरण, संवितरण अधिकारीनिहाय सदर माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून पुरविण्यात येणाऱ्या https:mahasdb.maharashtra.gov.in/CGE/home.do  या संगणकीय आज्ञावलीमध्ये अद्ययावत करून 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावयाची आहे. माहिती सादर केल्यानंतर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून माहिती सादर केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत प्राप्त करून घ्यावे.
    सदर प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2017 च्या वेतन देयकासोबत सादर करणे अनिवार्य आहे. तसेच सादर केलेली माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र 1 डिसेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत प्राप्त करून घ्यावे. हे प्रमाणपत्र फेब्रुवारी  2018 चे वेतन देयकासोबत सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय सदर महिन्यांची वेतन देयके संबंधीत प्राधिकारी किंवा जिल्हा कोषागार कार्यालयाकडून स्वीकारली किंवा पारीत केले जाणार नाहीत. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी याबाबत जिल्हा सांख्यिकी कार्यालयाशी संपर्क साधून कार्यालयबाबतचा युजर आयडी व पासवर्ड 31 ऑगस्ट 2017 पर्यंत प्राप्त करून घ्यावा. तसेच तात्काळ माहिती उपरोक्त आज्ञावलीमध्ये द्यावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी सं.मो राठोड यांनी केले आहे.
                          ----------------------------



गणेशोत्सवामध्ये मिरवणूक काढण्यासाठी परवानगी आवश्यक
  • जाहीरनामा 25 ऑगस्ट 2017 पासून लागू
  • मिरवणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत ठेवावी
बुलडाणा, दि. 21 : जिल्ह्यात 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2017 दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यात सार्वजनिक रस्त्यावर अथवा रस्त्याच्या आसपास सार्वजनिक शांतता भंग न होण्याच्यादृष्टीने गणेशोत्सवा निमित्य होणारे मेळावे, दिंडी, मिरवणूकीत भाग घेणाऱ्या लोकांच्या नियमनाकरीता मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33, 37 व 40 प्रमाणे निर्बंध घालण्यात येत आहे. हा जाहीरनामा 25 ऑगस्ट 2017 चे सकाळी 6 वाजेपासून ते 5 सप्टेंबर 2017 च्या रात्री 10 वाजेपर्यंत अंमलात असणार आहे. गणेशोत्सवामध्ये कुणालाही मेळावे, पालख्या, वाद्यासहीत मिरवणूक काढावयाची असल्यास त्या व्यक्तीने 36 तासांपूर्वी संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे. अशी लेखी परवानगी घेतल्याशिवाय या कालावधीत कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास मनाई आहे. हा नियम मात्र प्रेतयात्रेला लागू राहणार नाही.  
  लेखी अर्जाद्वारे ठाणेदार यांच्याकडे मुख्य आयोजकाचे नाव व पत्ता, परवाना पाहिजे असण्याचे कारण, मेळावा अथवा मिरवणूकीचे वर्णन व मंडळाचे नाव, कोणकोणत्या ठिकाणी जाण्याकरीता परवाना पाहिजे ती तारिख व वेळ, ज्या रस्त्याने मिरवणूक जाणार असेल तो रस्ता, ज्या तारखेचा किंवा वेळेचा परवाना पाहिजे ती तारिख व वेळ, मिरवणूक चालकाचे व सदस्यांचे पूर्ण नाव, पत्ता, मुख्य आयोजकाने मिरवणूकीतील किंवा मेळाव्यातील प्रत्येक व्यक्तीचे योग्य शांत वर्तनाबद्दल तो स्वत: जबाबदार आहे असे अर्जावर लिहून देणे आवश्यक आहे. मिरवणूकीमध्ये वापरावयाचे वाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा यांचेकडून तपासून घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.
  मिरवणूक सार्वजनिक जागेतून नेतांना संबंधित व्यक्तीजवळ असा परवाना असावयास पाहिजे व दंडाधिकारी यांनी तो पहावयास मागितल्यास त्यांनी दाखविला पाहिजे. श्री गणपती विसर्जनाचे दिवशी मिरवणूक अथवा मेळावा रात्री 10 वाजेपर्यंत मिळालेल्या परवान्यात नमूद केलेल्या रस्त्यानेच व वेळेनुसार काढण्यात यावी. दुसऱ्या रस्त्याने जावू दिले जाणार नाही. मिरवणूकीमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाल्या मुख्य आयोजक जबाबदार धरल्या जाईल. कोणत्याही प्रसंगी मिरवणूकीने प्रेतयात्रेला अग्रक्रम दिला पाहिजे. मिरवणूकीमुळे शांतता धोक्यात येईल, जातीय तंटे निर्माण होतील, जमातीत संघर्ष निर्माण होईल्, असे कुठलेही कृत्य, भाषण, जाहीरात प्रदर्शन, अंगविक्षेप, सोंग काढणे, गैरवर्तन करण्यास सक्त मनाई आहे.  त्याचबरोबर वाद्य साहित्य, खेह, दिंड्या, आखाडे, सोंग फलके आहेत अशा लोकांनी रस्त्याने जाताना आजूबाजूस राहणाऱ्या लोकांना त्रास होईल अशा रितीने थांबू नये. जनावरे बावरणाऱ्यावेळी जनावरांना शांततेने जावू द्यावे.
   मशीद जवळून मिरवणूक जातांना मशीदीपुढे न थांबता पुढे निघून जावे. रेंगाळू नये, मिरवणूकीतील काही मुले पदे म्हणू लागली असता मुख्य आयोजकाने रस्त्यावरून वाहनास अडथळा होणार नाही, अशी व्यवस्था केली पाहिजे. अशा अडथळ्यांना तो आयोजक जबाबदार राहील. मिरवणूकीत कोणत्याही परवान्याशिवाय अग्नीशस्त्र, मशाल, तलवार, खंजीर, कट्यार, चाकू, काठ्या, बांबू, छोटे दगड आदीपैकी दुखापत करता येणारे साहित्य घेवून जावू नये. तसेच जवळ बाळगू नये. वस्तू सापडल्यास त्यांचे जवळून ते घेवून पोलीसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
  मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33, 37 व 40 नुसार जाहीरनामा काढण्यात येत आहे. यामधील कुठलयाही शर्तीचे विरूद्ध जो कुणीही गुन्हा करेल तो कलम 135 अन्वये शिक्षेस पात्र राहील. अशा गुन्हेगारांवर मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 152 नुसार भारतीय दंड संहीतेनुसार ख्रटला भरण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                       -------------------           






शालेय क्रीडा स्पर्धेत नवीन वयोगटांचा समावेश
बुलडाणा, दि. 21 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या परिपत्रकानुसार सन 2017-18 या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धेतील 13 क्रीडा प्रकारांमध्ये नविन वयोगटांचा समावेश करण्यात आला आहे. तरी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शैक्षणिक संस्थेने जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या स्पर्धा पुस्तिकेत नमूद केलेल्या स्पर्धा संयोजकांशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच सन 2017-18 या सत्रात जिल्हास्तर चॉकबॉल स्पर्धेचे आयोजन पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे. नव्याने टेबल सॉकर  17 व 19 वर्ष मुले अथवा मुली या गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक शैक्षणिक संस्थेने, खेळाडूंनी जिल्ह्यातील टेबल सॉकर संघटनेशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी कळविले आहे.
-         नव्याने समाविष्ट वयोगटातील खेळ-
कुस्ती फ्रीस्टाईल : वयोगट 14, 17 व 19 वर्ष मुले/मुली, कुस्ती ग्रीकोरोमन : वयोगट 17, 19 वर्ष मुले, रग्बी : वयोगट 14, 17 व 19 वर्ष मुले/मुली, रस्सीखेच : वयोगट 14, 17 व 19 वर्ष मुले/मुली, पावर लिफ्टींग : वयोगट 17 व 19 वर्ष मुले/मुली, डॉजबॉल : वयोगट 17 व 19 वर्ष मुले/मुली, फिल्ड आर्चरी : वयोगट 14, 17 व 19 वर्ष मुले/मुली, कॉर्फबॉल : वयोगट 17 व 19 वर्ष मुले/मुली,  कुडो : वयोगट 17 व 19 वर्ष मुले/मुली, मिनी गोल्फ : वयोगट 17 व 19 वर्ष मुले/मुली, स्पीडबॉल : वयोगट 17 व 19 वर्ष मुले/मुली, टेंग सु डो : वयोगट 14, 17 व 19 वर्ष मुले/मुली, वुडबॉल : वयोगट 17 व 19 वर्ष मुले/मुली.
                                                                 ************
आदिवासी बांधवांना 100 टक्के अनुदानावर साहित्य वाटप
  • लाभार्थ्यांनी अर्ज करावे
बुलडाणा, दि. 21 : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या, नाशिक यांच्या धारणी प्रादेशिक कार्यालयामार्फत आदिवासी बांधव लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर एच. डी. पी. ई पाईप या योजनेकरीता अर्ज वाटप सुरू आहे. इच्छूक लाभार्थ्यांनी अकोला येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज जमा करावे.
  प्रकल्प कार्यालय, धारणीकडून 100 टक्के अनुदानावर तेलपंप, विजपंप मंजूर किंवा मिळालेला असावा, लाभार्थ्याला प्रकल्प कार्यालय, अकोला या कार्यालयाकडून एच. डी. पी. ई पाईप या योजनेचा लाभ यापूर्वी मिळालेला नसावा, 7/12 व नमुना 8-अ (शेती सामुहिक असल्यास संमती पत्र जोडणे आवश्यक आहे), राशन कार्ड, बी.पी.एल कार्ड असल्यास छायाप्रत सोबत जोडावे, जातीचा दाखला, ओलीत असल्याचा दाखला, रहिवासी दाखला, ग्रामपंचायत नाहरकत प्रमाणपत्र व रंगीत छायाचित्र सोबत जोडावे. सर्व कागदपत्रे छायांकित असावी. तसेच लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी कार्यालय, अकोला येवूनप अर्ज जमा करावे, असे प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
                                                                 ***********
जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

बुलडाणा, दि‍. 20 -  देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ उपस्थिताना दिली.  याप्रसंगी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी श्री .चव्हाण, तहसीलदार शैलेश काळे, तहसीलदार श्री. शेळके आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Tuesday 15 August 2017

15.8.2017 dio buldana




बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी
-         पालकमंत्री पांडुरंग फुंडकर
  • भारतीय स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापन दिन थाटात साजरा
  • पालकमंत्री यांच्याहस्ते ध्वजारोहण
  • कृषी सन्मान योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ
  • जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य अभियानातंर्गत सर्वाधिक लाभ
  • कर्जमाफी योजनेचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज भरावे
बुलडाणा दि. 15 - राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिली.
  भारतीय स्वातंत्र्याचा 70 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात  आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राहूल बोंद्रे, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार धृपदराव सावळे, नगराध्यक्ष श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जि.प सभापती श्रीमती श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना आदींची उपस्थिती होती.
    छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजना अंमलात आणून शासन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या योजनेनुसार दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. या योजनेचा सर्वात जास्त लाभ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. जिल्ह्यात दीड लाखापर्यंत पीक कर्ज असलेल्या 1 लक्ष 70 हजार 850 शेतकऱ्यांच्या 913.27 कोटी रूपयांच्या कर्जाला माफी मिळाली आहे. तसेच दीड लाखावर कर्ज असलेल्या 4 हजार 980 शेतकऱ्यांना 118.61 कोटी रूपयांची कर्जमाफी एकरकमी भरणा केल्यानंतर मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरावे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून 31 ऑगस्ट 2017 पर्यंत अर्ज भरावे.  राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तुर खरेदीचा निर्णय घेतला. भाव स्थिरता आणि बाजार हस्तक्षेप योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत जिल्ह्यात 13 खरेदी केंद्रावर 49 हजार 811 शेतकऱ्यांची एकुण 8. 89 लक्ष क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे.  या खरेदीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 428.38 लक्ष रूपयांचे चुकारे जमा करण्यात आलेले आहे.      
   मोठ्या प्रमाणावर संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी शासन महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राबवित असल्याचे प्रतीपादीत करीत पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले,  या अभियानातंर्गत जिल्हाभरात  सन 2016-17 साठी दुसऱ्या टप्प्यात 245 गावांची निवड करण्यात आली. या गावांच्या शिवारात जलसंधारण व मृदसंधारणाची 4 हजार 908 कामे पूर्ण करण्यात आली आहेत.  तसेच 172 कामे प्रगतीपथावर आहेत.  या कामांमुळे 1.71 लक्ष टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच 7 हजार 241 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या संरक्षीत सिंचनाची व 12 हजार 625 हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षीत सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. शासनाने ठिबक व तुषार सिंचनाच्या संचावरील अनुदानही दिले आहे. त्यामुळे या सिंचन पद्धतीला हातभार मिळणार आहे. जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत शेततळ्यासाठी पात्र ठरलेल्या 6 हजार 836 अर्जांपैकी 3 हजार 982 शेततळ्यांना कार्यारंभ आदेश दिले आहे. त्यापैकी 2098 शेततळी पुर्ण झालेली आहेत. तसेच जिल्ह्यात जलपूर्ती धडक सिंचन विहीर योजनेतंर्गत 9 हजार 21 विहीरी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 8 हजार 924 विहीरी पूर्ण झालेल्या आहेत.
    

    ते पुढे म्हणाले,  पिकांचा सर्वंकष विमा उतरविण्यासाठी प्रधानमंत्री कृषि पिक विमा योजना अंमलात आहे. या योजनेत खरीप व रब्बी हंगामातील सर्व पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सन 2016-17 मध्ये खरीप हंगामात 3.87 लक्ष शेतकऱ्यांनी 3.26 लक्ष हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वांसाठी घर उपक्रम राबविण्यात येत आहे. कुठल्याही बेघराला हक्काचा निवारा मिळाला पाहिजे, असा शासनाचा मानस आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून 7 हजार 83 घरकूलांचे कामे सुरू असून 2 हजार 720 घरकूलांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे. जिल्ह्यात यासोबतच रमाई घरकूल व शबरी घरकूल योजनाही राबविण्यात येत आहे.  कृषि व संलग्न क्षेत्राला समृद्ध करणारा ‘समृद्धी महामार्ग’ जिल्ह्यात 4 तालुक्यांच्या 49 गावांजवळून जात आहे. या महामार्गावर जिल्ह्यात दोन ठिकाणी स्मार्ट शहरांची निर्मिती केल्या जाणार आहे. महामार्गामुळे जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा, लोणार व देऊळगांव राजा तालुक्यांसोबतच संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणार आहे.
    जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य अभियानातंर्गत गतवर्षी  24 हजार 519 रूग्णांना 10 रूग्णालयांच्या माध्यमातून लाभ देण्यात आला आहे. मराठवाडा व विदर्भातील 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याने या 14 जिल्ह्यांमध्ये 10 हजार 254 शेतकऱ्यांना लाभ देवून अव्वल क्रमांक पटकाविला आहे.  शासनाने गतवर्षी राज्यात महाअवयवदान अभियान राबविले. यावर्षीसुद्धा सदर अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभाग घेवून अवयवदान करण्याचे आवाहन याप्रसंगी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.  
            ते पुढे म्हणाले, पंचायत समिती मलकापूर व शेगांव हगणदारीमुक्त झाली असून 285 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त ठरल्या आहेत. जिल्ह्यात 3.62 लक्ष कुटूंबांपैकी 2.36 लक्ष कुटूंबाकडे शौचालय आहेत. जिल्ह्याने यामध्ये 65.19 टक्के काम केले आहे. उर्वरित 1.26 लक्ष कुटूंबांमध्ये शौचालय बांधकाम करण्याचे कार्य प्रशासनाकडून सुरू आहे.  नागरिकांना जलद व तात्काळ शासनाच्या सेवा मिळाव्यात यासाठी ऑनलाईन सेवा देण्यात येत आहे. त्यामध्ये 7/12 चा सुद्धा समावेश आहे. बिनचूक ऑनलाईन 7/12 असण्याचे जिल्ह्याचे काम 99.61 टक्के असून यामध्ये जिल्हा राज्यात पाचवा आहे. जिल्ह्यात 5.40 लक्ष 7/12 ऑनलाईन बिनचूक करण्यात आलेले आहे.  तलाठी एस.पी श्रीनाथ, व्हि.पी मोरे, किशोर कऱ्हाळे, व्हि. एस शिंदे व विनोद चिंचोले यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचे अभिनंदन याप्रसंगी पालकमंत्री यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त,  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विविध पुरस्कारांचे वितरण व सन्मान
     कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड व बिज संकलन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यामध्ये पंचतारांकित शाळा पुरस्कार प्रबोधन विद्यालय, जिजामाता नगर यांना देण्यात आला. तसेच विद्यार्थी कु. पुजा भावलाल शिंगणे, ओम अनिल इंगळे, शरद गजानन पाटील यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता 10 वीमध्ये राष्ट्रीय स्तरावर शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या शेगांव येथील साक्षी विलासराव मिरगे, गुंजन अतुल गट्टाणी, जळगांव जामोद यांचा सत्कार करण्यात आला. तर इयत्ता 8 वीतील  स्वराज नारायण फाळके, मलकापूर यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 2016-17 मध्ये हगणदारीमुक्त झालेल्या पंचायत समिती मलकापूरचे सभापती श्रीमती संगीता तायडे, उपसभापती श्रीमती सीमा बगाडे, गटविकास अधिकारी अशोक तायडे, शेगांवचे सभापती विठ्ठलराव पाटील, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे यांचा सन्मान करण्यात आला. संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायत पांगरखेड, ता. मेहकर व तिसरा क्रमांक प्राप्त अजिसपूर, ता. बुलडाणा यांचा गौरव करण्यात आला. विभागीय स्तरावर सन 2016-17 महाराजस्व अभियानातंर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
   लोणारचे तहसिलदार सुरेश कव्हळे यांचा उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. पोलीस दलाचे दैनंदिन कामकाज सांभाळून विनामूल्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर चालविणारे दिगंबर कन्हैयालाल कपाटे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडून दे.राजा येथील होमीओपॅथीक औषधीचे उत्पादन करणारे नंदकिशोर श्रीनिवास देशपांडे, चिखली येथील ॲटो स्पेअर पार्टचे उत्पादक परवेज गुलाम गौस देशमुख यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरस्कार देण्यात आला. सर्वधर्मीय सामुहिक विवाह चळवळ राबविणारे शिवाजीराव नवघरे, मंगरूळ नवघरे, ता. चिखली यांचा सन्मान करण्यात आला.

जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी वेतनाचा धनादेश कर्जमाफी निधीला दिला
 स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी आपल्या एका महिन्याचे वेतन 45 हजार 365 रूपयांचा धनादेश छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेला दिला. सदर धनादेश याप्रसंगी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे सुपूर्द केला. यामागे शेतकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी संधी मिळाल्याची प्रतिक्रया त्यांनी दिली.
                                                                        ****************