हरभऱ्यावर घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 08 :  जिल्ह्यातील बहुतांश भागात हरभऱ्याचे पीक फुलोरा अवस्थेत असून या कालावधीत घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. घाटेअळी ही हरभऱ्याची प्रमुख कीड असून तिच्यामुळे फुले व घाट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

घाटेअळीची मादी पतंग पानांवर, कोवळ्या शेंड्यांवर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. अंड्यातून २ ते ३ दिवसांत अळी बाहेर पडून प्रथम पानावरील हरितद्रव्य खरडून खाते. पुढे अळ्या संपूर्ण पाने, देठे तसेच फुले व घाटे खातात. मोठ्या अळ्या घाट्यांना छिद्र पाडून आतील दाणे खाऊन पाटे पोखरतात. एक अळी साधारणतः ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करू शकते.

एकात्मिक व्यवस्थापन : 1) घाटे अळीचे परभक्षक बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामधे फिरून घाटे अळया वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामधे येणार नाहीत. 2) ज्या शेतामधे मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणुन उपयोग केला नसेल त्या शेतामधे बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर २० पक्षी थांबे ) तयार करून शेतामधे लावावे. त्यामुळे पक्षांचे अळया वेचण्याचे काम सोपे होते. ३) घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामधे सतत तीन दिवस आठ ते दहा पंतग आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय राबवावे. 

(४) शेतकरी बंधुनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्यावर(१ ते २ अळया प्रति मिटर ओळ) आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी  निंबोळी अर्क ५ टक्के किंवा एच.ए.एन.पि.व्हि (१x१०१ पिओबी/ मिली) ५०० एल.ई./ हे. किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी., २० मि.ली. पिक परिस्थितीनुसार फवारणी करावी.

 पहिल्या फवारणीनंतर १५ दिसानंतर दुसरी फवारणी ईथिऑन ५० टक्के ईसी २५ मिली, किंवा  इमामेक्टीन बेझोएट ५ टक्के एस जी ४ ग्रॅम, किंवा स्पिनेटोरम ११.७० टक्के एससी ९ मिली, किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली, किंवा इंडोक्झाकार्ब १५.८० इसी ६.६ मिली, किंवा लँबडा सायहेलोथ्रीन ०.५ इसी १० मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील किटकनाशकांची मात्रा ही साध्या पंपासाठी असुन, पावरस्प्रे साठी मात्रा तिप्पट करावी. हरभऱ्यांवरील पाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी उपाययोजना करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या