Friday 29 January 2021

DIO BULDANA NEWS 29.1.2021,1

 राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2020

प्रवेशिका पाठविण्याकरिता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

           बुलडाणा (जिमाका), दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.31 जानेवारी 2021 होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता दि.15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने  dgipr.maharashtra.gov. in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

                                                                        *********


जिल्ह्यातील 436 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महिला आरक्षण जाहीर

  बुलडाणा,(जिमाका) दि.29 : मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील 3 (अ) (ब) तसेच नियम 2- अ पोटनियम 4 अन्वये जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 870 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी 436 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे महिलांसाठी राखीव आरक्षण आज 29 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. सदर आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार रूपेश खंडारे आदी उपस्थित होते. तसेच तालुकानिहाय महिलांचे आरक्षण संबंधीत तालुक्याचे तहसिलदारांनी चिठ्ठीद्वारे काढले.

 तालुकानिहाय एकूण ग्रामपंचायती, प्रवर्ग निहाय एकूण ग्रामपंचायती व महिलांसाठी आरक्षीत ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे : बुलडाणा -  एकूण ग्रामपंचायत 66, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 12 पैकी 6 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 3 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 33 पैकी 17  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रापं 33.  चिखली -  एकूण ग्रामपंचायत 99, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21  पैकी 11 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 3 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 27 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 48 पैकी 24  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 49. मेहकर : एकूण ग्रामपंचायत 98, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21 पैकी 10 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 6 पैकी 3 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 26 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 45 पैकी 23  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 49. लोणार : एकूण ग्रामपंचायत 60, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 6 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 2 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 16 पैकी 8 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 31 पैकी 16  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 31. सिं. राजा : एकूण ग्रामपंचायत 80, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 18 पैकी 9 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 1 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 22 पैकी 11 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 39 पैकी 20  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 41. दे. राजा : एकूण ग्रामपंचायत 48, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 5 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 1 पैकी निरंक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 6 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 23 पैकी 11  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 22. मलकापूर :  एकूण ग्रामपंचायत 49, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 8  पैकी 4 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 24 पैकी 12  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं  25. मोताळा : एकूण ग्रामपंचायत 65, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11  पैकी 6 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 6 पैकी 3 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 31 पैकी 15  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 33. नांदुरा : एकूण ग्रामपंचायत 65, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11  पैकी 5 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 32 पैकी 16  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 32. खामगांव : एकूण ग्रामपंचायत 97, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21  पैकी 10 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 26 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 46 पैकी 23  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 48. शेगांव : एकूण ग्रामपंचायत 46, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 10  पैकी 5 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 1 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 12 पैकी 6 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 23 पैकी 11  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 23. जळगांव जामोद : एकूण ग्रामपंचायत 47, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 7  पैकी 4 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 8 पैकी 4 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 19 पैकी 10  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 25. संग्रामपूर : एकूण ग्रामपंचायत 50, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 8  पैकी 4 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 8 पैकी 4 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 21 पैकी 10  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 25.

    अशाप्रकारे एकूण जिल्ह्यात 870 ग्रामपंचायती असून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 170 ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षीत आहे. त्यापैकी 85 महिला, अनुसूचित जमातीसाठी एकूण 50 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण आहे. यापैकी 25 ग्रामपंचायती महिला राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 235 ग्रा.पं सरपंच पद आरक्षण असून त्यापैकी 118 महिलांसाठी राखीव आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी 415 ग्रामपंचायतींपैकी 208 ग्रा.पं सरपंच पदावर महिला आरूढ होणार आहे.

                                                                        ***********


DIO BULDANA NEWS 29.1.2021

 लोकसेवा हक्क अधिनियमातंर्गत 486 शासकीय सेवा

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू झाला आहे. या अधिनियमावर 28 एप्रिल 2015 पासून अंमलबजावणीसुद्धा करण्यात येत आहे. या कायद्यातंर्गत विविध 40 शासकीय कार्यालयांमधील 486 प्रकारच्या सेवांचा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्टोंबर 2015 ते डिसेंबर 2020 या कालावधीत महसूल विभागाच्या 18 अधिसुचीत सेवांचे एकूण 24 लक्ष 9 हजार 650 एवढे अर्ज ऑनलाईन स्वरूपात प्राप्त झाले आहे. त्यापैकी 24 लक्ष 274 एवढे ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप करण्या आलेले आहे.

  सर्व सेवा ह्या विहीत कालावधीत पुरविण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याकरीता ग्रामपंचायत, तालुका स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र तसेच सेतू सुविधा केंद्र देण्यात आलेले आहेत. नागरिक या केंद्राचा उपयोग करून हव्या असलेल्या सेवा करीता ऑनलाईन अर्ज पोर्टलवर करू शकतात. तसेच aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून देखील नागरिक स्वत: अर्ज करू शकतात. सद्यस्थितीमध्ये राज्य शासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी सदर प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग करता यावा याकरिता मोबाईल अप्लीकेशन आपले सरकार तयार केलेले असून ते गुगल प्ले स्टोअर वर विनामूल्य  उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून हव्या, त्यावेळी आवश्यक असलेल्या सेवांकरिता नागरीक अर्ज सादर करू शकतात . तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सेवा हमी कायद्याचा उपयोग करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे.

                                                                                                ***********

 

                        जिल्हाधिकारी यांच्याहस्ते महाज्योती निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

            बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर यांच्या वतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्ताने महाज्योतीकडुन ऑन लाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  ही स्पर्धा संपुर्ण जिल्हास्तरावर राबविण्यात आली. जिल्हयातील संपुर्ण महाविदयालयातील विदयार्थ्यांनी ऑन लाईन निबंधाच्या माध्यमातुन यात सहभाग घेतला.

  या निबंध स्पधेचे विषय स्त्री-पुरूष समानता, सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण, सावित्रीबाई फुले यांचे विचार हे होते. स्पर्धेचे सनियंत्रण महाज्योतीचे समन्वयक अविनाश खिल्लारे, उमेश खराडे यांनी केले तर मुल्यांकन प्रा.सौ प्रियंका देशमुख,  सतिश बाहेकर यांनी केले. तसेच विजेत्या स्पर्धकाला क्रमांकाची निवड सहाय्यक आयुक्त्‍ डॉ अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .या स्पर्धचे प्रथम पारीतोषिक कु.पल्लवी गजानन अंभोरे, मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा व्दितीय प्रद्युम्न किसन लोखंडे, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद तर  तृतीय क्रमांक कु वैष्णवी महेश ठाकरे, जी. एस. कॉलेज खामगाव यांना मिळाला.

       सदर विजेत्यांना पारीतोषिक वितरण जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांच्याहस्ते 28 जानेवारी रोजी त्यांच्या दालनात करण्यात आले. प्रथम पारीतोषिक दहा हजार रु, व्दितीय पाच हजार व तृतीय दोन हजार पाचशे रुपये होत. त्यानुसार सदर रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड, समाज कल्याण निरीक्षक राजेश खरुले, क.ली प्रणिता बावणकर,  तालुका समन्वयक सतिश बाहेकर उपस्थित होते. सर्व विजेत्यांचे जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन केले .

*********

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 935 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 60 पॉझिटिव्ह

• 24 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 995 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 935 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 60 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 54 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 827 तर रॅपिड टेस्टमधील 108 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 935 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 13, जळगांव जामोद शहर : 2,  दे. राजा शहर : 2, चिखली शहर : 8, चिखली तालुका : केळवद 1, खामगांव शहर : 16, खामगांव तालुका : घाटपुरी 1, टेंभुर्णा 1, वझर 1, निपाणा 1, पळशी 1,   शेगांव तालुका : जानोरी 1, शेगांव शहर : 8, मोताळा तालुका : खरबडी 1,   संग्रामपूर शहर : 2,  मूळ पत्ता अकोला 1   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 60 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 24 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 2, स्त्री रूग्णालय 4,  दे. राजा : 2,  संग्रामपूर : 2, शेगांव : 5, मोताळा : 3.  

  तसेच आजपर्यंत 116912 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13387 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13387आहे. 

  तसेच 2030 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 116912 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13852 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13387  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 298 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 167 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                                        **********

जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

  बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्ह्यासाठी सन 2021 साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये अक्षय तृतीया शुक्रवार 14 मे 2021, ज्येष्ठागौरी पुजन सोमवार 13 सप्टेंबर आणि सर्वपित्री दर्श अमावस्या बुधवार 6 ऑक्टोंबर 2021 या तीन सुट्टयांचा समावेश आहे. सदर सुट्टीचा आदेश जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

                                                            *******  

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे

  • समाज कल्याण विभागाचे आवाहन

  बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस विभागाच्या https://mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.

   तरी सन 2020-21 या वर्षाकरीता  प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सदर महाडीबीटी प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या पोर्टलवर सर्व पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या वेळेच्या आत अर्ज भरून लाभ घ्यावा. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज दुरूस्त करून ऑनलाईन सादर करण्याकरीता मुदत देण्यात आली असून या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ‍शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                            **************

 

 

सिंदखेडराजा मतदारसंघातील

रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागणार

  • पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची सार्व. बांधकाम मंत्र्यासमवेत बैठक

  बुलडाणा,(जिमाका) दि. 29 :  सिंदखेड राजा मतदार संघातील रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्तावाबाबत मुंबई येथे बैठक 28 जानेवारी रोजी पार पडली.  या बैठकीत सिंदखेड राजा मतदार संघातील रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. ही बैठक पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या समवेत घेण्यात आली. याप्रसंगी  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड यांच्यासह अमरावती विभागाचे मुख्य अभियंता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

   याप्रसंगी सार्व. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले, आशियाई विकास बँकेच्या निधीअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील दोन रस्त्यांचा समावेश प्राधान्याने करण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच या मतदारसंघातील प्रस्तावित 28 कोटी रक्कमेची रस्ते व पुलांची कामे केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत घेण्याबाबत प्रस्ताव सादर करावे.

    हे प्रस्ताव प्राधान्याने विचारात घेऊ  तसेच येत्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त रस्त्यांच्या कामांना निधी देण्याची पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मागणीलाही श्री. चव्हाण यांनी सहमती दर्शविली.  सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते, पुल व इमारतींचा समावेश केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, विशेष दुरुस्ती कार्यक्रम या विविध योजनेमध्ये करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी केली. यामध्ये आशियाई विकास बँक अंतर्गत 5 कोटी 43 लाख रकमेची चार रस्त्यांची सुधारणा, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 28 कोटी 70 लाख किमतीची सुमारे 14 कामे तसेच नाबार्ड अंतर्गत 13 कोटी 38 लाख रक्कमेच्या 10 कामांचा समावेश आहे. तसेच आगामी अर्थसंकल्पात राज्यमार्गाची चार कामे, प्रमुख जिल्हा मार्गाचे 12 कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे श्री. शिंगणे यांनी यावेळी सांगितले.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, आशियाई विकास बँक निधीअंतर्गत प्रस्तावित अमडापूर-लव्हाणा-दुसरबीड-राहेर- वर्दळी ते जालना जिल्हा सिमा रस्ता आणि शेंदुर्जन-राजेगाव-सुलतानपूर-वेणी-गुंधा-हिरडव-वढव ते वाशिम जिल्हा हद्द या दोन्ही रस्त्यांचा समावेश करण्यासंदर्भात प्राधान्याने विचार केला जाईल. तसेच केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत या मतदारसंघातील जास्तीतजास्त कामे घेण्यात येईल. सिंदखेड राजा येथील पर्यटन विभागाकडे असलेले विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात पर्यटन विभागाकडे प्रस्ताव पाठवावा. त्यांच्याकडून मंजुरी आल्यानंतर त्या विश्रामगृहाचे नुतनीकरण करण्यात येईल. तसेच देऊळगाव मही येथील विश्रामगृहाच्या नुतनीकरणाचाही प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.

*********

फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन

कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय

मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात

व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑक्टोंबर महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवार 1 फेब्रुवारी 2021 रोजी ई लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

        या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल करून तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

       तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

********

पिंपळगांव देवी येथील यात्रा रद्द

  • मंदीरातील कार्यक्रमांना 10 भाविकांच्या उपस्थितीत परवानगी

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : मोताळा तालुक्यातील पिंपळगांव देवी येथील जगदंबा देवी संस्थान येथे होणारा यात्रा उत्सव कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, अन्य मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कोविड 19 साथरोगाची लाट पुन्हा उफाळून गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पिंपळगांव देवी येथील यात्रा उत्सवास परवानगी देण्यात आली नाही. मात्र मंदीराच्या आतील कार्यक्रमांसाठी 10 भाविकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे.  

  सदर सोहळ्याकरीता उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार असून थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमात उपस्थित व्यक्तींनी आरोग्य सेतू डाऊनलोड करावे. सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

******

 

शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षणाचे ऑनलॉईन पद्धतीने आयोजन

  • प्रशिक्षणासाठी 5 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करावी

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र मार्फत उद्योग अथवा व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण 5 ते 10 फेब्रुवारी 2021 दरम्यान पाच दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाकरीता  प्रवेश नोंदणी दि. 5 फेब्रुवारी 2021 पर्यत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांच्याकडे किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांक 8275093201 वर करावी. तसेच  उद्योजकता विकास केंद्र द्वारा, जिल्हा उद्योग केंद्र, मलकापुर रोड,  बुलडाणा येथे संपर्क करावा.

   तसेच प्रशिक्षणास भाग घेणारा उमेदवार किमान 7 वा वर्ग पास असणे आवश्यक असून त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे.  प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी तंत्रशुध्द प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा आहे. सदर प्रशिक्षणात शेळी पालनाचे तंत्र, शेळीचे प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार, उद्योग संधी, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे. तरी प्रशिक्षणासाठी प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन एसीईडी चे विभागीय अधिकारी योगेश डफाडे यांनी केले प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

****

वयोवृद्ध व्यक्तींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : वयोवृद्ध व्यक्तींसाठी  त्यांचे आयुष्य आनंदी करता यावे यासाठी प्रशिक्षण समाज कल्याण विभागाच्यावतीने देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण सावली, सिएएफआर, हेल्पपेज इंडिया, फेसकॉम व एएससिओपी या संस्थांमार्फत देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठत्वाची ओळख, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्यांची ओळख, भेडसावणाऱ्या समस्या, योजनांची ओळख या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण मर्यादीत 30 व्यक्तींना देण्यात येणार असून त्यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींनी नोंदणी करावयाची आहे. ही नोंदणी 9860964323 या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश किंवा भ्रमणध्वनी करून करावयाची आहे. तरी या प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                                                **********

 

 

Thursday 28 January 2021

DIO BULDANA NEWS 28.1.2021

        कोरोना अलर्ट : प्राप्त 838 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 47 पॉझिटिव्ह

• 31 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 843 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 838 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 47 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 43 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 683 तर रॅपिड टेस्टमधील 155 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 838 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :   चिखली तालुका : अंत्री खेडेकर 1, सवणा 1, रानअंत्री 1, उंद्री 1,  चिखली शहर : 10,  दे. राजा शहर : 4, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 1, खामगांव शहर : 5, खामगांव तालुका : पळशी 1, शेलोडी 1, पोरज 1,  बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 2, लोणार शहर : 2,  लोणार तालुका : शिवणी पिसा 1, शेगांव शहर : 7, मलकापूर तालुका : दुधलगाव 1,  नांदुरा तालुका : शेंबा 1, वडनेर 1, मोताळा तालुका : वरूड 1,   मूळ पत्ता मुक्ताई नगर जि. जळगांव 1, टेंभूर्णी जि. जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 47 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 31 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 10, बुलडाणा : अपंग विद्यालय 1, स्त्री महाविद्यालय 1,  शेगांव : 13, दे. राजा : 4, चिखली : 2.

  तसेच आजपर्यंत 105977  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13363 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13363 आहे. 

  तसेच 2129 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 105977आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13792 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13363 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 262 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 167 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                                        **********

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम उत्साहात

  बुलडाणा,(जिमाका) दि. 28 : जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियेाजन समिती सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती होते.  मतदार दिनानिमित्ताने नियोजन सभागृहासमोर मतदा दिवसावर आधारीत सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या.

     या रांगोळ्यांचे मान्यवरांनी अवलोकनी केले.  याप्रसंगी आयोगाकडून प्राप्त झालेली शपथ सभागृहातील सर्व उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान मतदार यादी तयार करण्याच्या कामी ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले, अशा अधिकाऱ्यांना प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 13 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. नवीन मतदारांना निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. संचलन नायग तहसिलदार विजय पाटील यांनी तर प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भिकाजी घुगे यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार सुनील आहेर, अव्वल कारकून नितीन बढे, कनिष्ठ लिपीक विजय सनीसे, शिपाई विजय तायडे आदींनी प्रयत्‍न केले.

                                                                                    *******

राज्य परिवहनच्या विभागीय कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

  बुलडाणा,(जिमाका) दि. 28 : राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यकमाचे आयोजन  आज करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय वाहतूक अधिकारी अमृतराव कच्छवे होते, तर प्रमुख उपस्थितीत रविंद्र इंगळे, साहित्यिक सुरेश साबळे, विभागीय सांख्यिकी अधिकारी नितीन देशमुख, विभागीय कर्म वर्ग अधिकारी श्रीमती त्रिभुवन विचारमंचावर होते.  

   याप्रसंगी नितीन देशमुख यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम साजरा करण्यामागील उद्देश सांगितला.  सुरेश साबळे यांनी जर बोली भाषा ही टिकली, तरच प्रमाण भाषा टिकणार आहे, त्यामुळे बोली भाषा जतन, संवर्धन करण्याची गरज असल्याचे सांगितले. रविंद्र इंगळे (चावरेकर) यांनी ज्ञानभाषा व व्यवहाराची भाषा यामध्ये भेदाभेद होऊ नये व मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्यवहारामध्ये करावा, असे आवाहन केले. विभागीय वाहतूक अधिकारी श्री. कच्छवे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. संचलन सचिन पिंगळे यांनी तर आभार प्रदर्शन नितीन देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमासाठी रा.प कर्मचारी बांधव उपस्थित होते.  

                                                                        *************

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

  • 30 जानेवारी 2021 अंतिम मुदत

  बुलडाणा,(जिमाका) दि. 28 :  केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे समाजात महिला सशक्तीकरण, समाज व राष्ट्र निर्माण करण्याचे कामात उत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती , संस्था यांना दरवर्षी नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या पुरस्काराकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

   या पुरस्कासाठी दि. 1 जुलै 2020 रोजी ज्या व्यक्तींचे वय किमान 25 वर्ष पुर्ण केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही.  तसेच ज्या संस्था, गट, संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधीत क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार , स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत.

    कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मुलभुत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रिडा, कला, संस्कृती  आदी क्षेत्रांमध्ये ठोसपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोय, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य महिला सक्षमीकरणाचा व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना यांना अनुभव असावा. राज्य अथवा केंद्रशासी प्रदेशात बाल लैंगिक गुणोत्तर अचुकपणे सुधारणा करण्याचे काम करणाऱ्यांचा या पुरस्कारासाठी प्रथम प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.  

   अर्जदाराने नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज, नामनिर्देशन केवळ ऑनलाईनव्दारे केंद्र शासनाचे www.narishakti puraskar.wcd.gov.in या वेबसाईटवर भरायचे आहेत. सदर वेबसाईटची लिंक महिला व बाल विकास मंत्रालयाच्या www.wcd.nic.in या कार्यालयीन वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या कागदपत्रांसह नामांकने सादर करावे. नामांकने सादर करावयाची अंतिम तारीख ही 30 जानेवारी 2021 आहे.  नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुक व्यक्ती किंवा संस्था / गट / संघटना यांना उपरोक्त वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरविंद रामरामे यांनी केले आहे.

                                                                                                ***********

  

--

Wednesday 27 January 2021

DIO BULDANA NEWS 27.1.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 1625 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 44 पॉझिटिव्ह

• 89 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1709 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1625 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 40 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1561 तर रॅपिड टेस्टमधील 64 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1625 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :   चिखली शहर : 8, चिखली तालुका : अंत्री खेडेकर 1, मुंगसरी 1, चांधई 1,  खामगांव तालुका : जळका भडंग 1, मेहकर शहर : 11, बुलडाणा शहर : 10, मोताळा तालुका : परडा 1, मोताळा शहर : 1, नांदुरा तालुका : अंभोडा 1, जवळा 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : दे. मही 2,  जळगांव जामोद शहर : 1,  मूळ पत्ता जाफ्राबाद जि. जालना  येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 44 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान संभाजी नगर, चिखली येथील 35 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

      तसेच आज 89 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : 8, सिद्धीविनायक हॅस्पीटल 17, स्त्री रूग्णालय 5, अपंग विद्यालय 11, मलकापूर : 8, दे. राजा : 9,  लोणार : 1,  मेहकर : 2, खामगांव : 17, मोताळा : 3, चिखली : 8.   

  तसेच आजपर्यंत 105139  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13332 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13332 आहे. 

  तसेच 2072 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 105139आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13745 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13332 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 246 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 167 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                                        **********



पलढग धरणाच्या जलाशयात दोन इंजिन बोटींचे उद्घाटन

  बुलडाणा,(जिमाका) दि. 27 : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 26 जानेवारी रोजी ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरणाच्या जलाशयामध्ये दोन इंजिन बोटींचे केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. पर्यटन विकास योजने अंतर्गत ज्ञानगंगा अभयारण्याच्या सर्वागीण विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामधून मौजे तारापूर जवळील पलढग धरणाच्या क्षेत्रामध्ये वनपर्यटकांसाठी 52 लक्ष रु.च्या दोन इंजिन बोटीचे उदघाटन करण्यात आले.  तसेच वन-पर्यटकांसाठी महिला बचत गट अंतर्गत उपहारगृहाचेसुध्दा उदघाटन करण्यात आले.

 

याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रातील बांधवांशी  संवादही साधला. कार्यक्रमासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती चे मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डी, ज्ञानगंगा अभयारण्य प्रकल्पाचे डि.सी.एफ. श्री. खैरनार, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, तारापूर चे संरपच प्रविण जाधव, योगेश जाधव डॉ. गोपाल डिके, राहूल सोळंके, प्रविण निमकरडे, बाळु जाधव आदींसह वनपरिक्षेत्र अभयारण्यचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

                                                                        *************


पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वीरित्या राबवावी

-          जिल्हाधिकारी

  • जिल्ह्यात 31 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलीओ लसीकरण
  • 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओचा डोस पाजण्यात येणार

  बुलडाणा,(जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत 31 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलीओ लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना 31 जानेवारी रोजी पोलीओ डोस पाजण्यात येणार  आहे. तरी ही लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम जिल्हा समन्वय समितीची सभा आज 27 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

   याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नसल्याची काळजी घेण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात यावी. यासाठी मोबाईल पथक, ट्रान्सीट टिम आदी सज्ज ठेवाव्यात.

 जिल्ह्यात ग्रामीण भागात 1 लक्ष 95 हजार 387 बालके असून शहरी भागात 59 हजार 120 बालके आहेत. अशाप्रकारे एकूण 2 लक्ष 54 हजार 507 लाभार्थी बालके अपेक्षीत आहे. सर्व बालकांना लसीकरणासाठी 2139 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे.  लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागासोबतच विविध विभागातून एकूण 5343 कर्मचाऱ्यांचे सहकार्य राहणार आहे. त्यासाठी 412 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 130 मोबाईल टिम, 148 ट्रान्झीट टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत.

                                                                                ****************

  


आयुष्यमान भारत व जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय

           कामगिरी केलेल्या रूग्णालयांचा गौरव

  बुलडाणा,(जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात कोरोना महामारी काळात एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. या योजनेत संलग्नीत असलेल्या उल्लेखनिय कामगिरी केलेल्या रुग्णालयांना 26 जानेवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी एस. रामामूर्ति  यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

      याप्रसंगी जिल्हा समन्वयक डॉ.विवेक सावके, जिल्हा प्रमुख चेतन जाधव, जिल्हा पर्यवेक्षक कुणाल सुरडकर व संबंधित सर्व रुग्णालयांचे वैद्यकीय  समन्वयक आणि शिबीर समन्वयक उपस्थित होते. कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या योजनांमध्ये संलग्नीत असलेल्या शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व अंगीकृत रुग्णालये राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण, राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व जिल्हा प्रशासन यांच्या  मार्गदर्शक तत्त्वावर कामगिरी नियमितरित्या करीत असतात.  या योजनांच्या एकत्रित प्रगतीस पुरक  व ईतर  रूग्णालयांचा योजनेमध्ये कामगिरी सुधारण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतीपादन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

                                                                                                *************

 

 

 

Tuesday 26 January 2021

DIO BULDANA NEWS 26.1.2021

        



कोरोनावर मात करीत जिल्ह्याला सर्वांग सुंदर जिल्हा बनविणार

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा थाटात
  • कर्जमुक्ती योजनेतून 1 लक्ष 69 हजार 596 शेतकऱ्यांना 1121 कोटीचा लाभ
  • शिव भोजन थाळी योजनेतून 5 लक्ष 41 हजार 169 लाभार्थ्यांना लाभ
  • गुटखामुक्त महाराष्ट्र अभियान राबविणार
  • कोविड लसीकरण मोहिमेत 2500 लाभार्थ्यांना आतापर्यंत लस

बुलडाणा,(जिमाका) दि. 26 :  कोरोना नावाच्या अदृश्य विषाणूने आपणाला चिंताक्रांत बनविले होते. या विषाणूचा संसर्ग थोपविण्यासाठी राज्य शासनाने प्रशासनासोबत घेत विविध उपाययोजना राबविल्या. परिणामी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात शासनाला यश आले. कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करीत जिल्ह्याला सर्वांग सुंदर जिल्हा बनविणार, असे प्रतीपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.

    भारतीय प्रजासत्ताकाचा 71 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार श्वेताताई महालेजि.प अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, माजी आमदार सर्वश्री विजयराज शिंदे, राहुल बोंद्रे,  वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी श्री. गिते आदींसह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक यांची उपस्थिती होती.

  कोरोनावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून पाच दिवस दहा केंद्रावर लसीकरण सुरू असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने कोविड लस दिल्या जात आहे. आतापर्यंत 2500 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मागील काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत राज्य शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्ताचा तुटवडा भविष्यात निर्माण न होण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी केले.      

    जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले,  अशा हवालदील परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आर्थिक मदत जाहीर केली. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्राप्त निधीपैकी 1 लक्ष 8 हजार 503 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 48 कोटी 50 लक्ष रूपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे.  राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे.  जिल्ह्यात 1 लक्ष 69 हजार 596 लाभार्थी शेतकऱ्यांना 1121 कोटी रूपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहे. यामुळे बळीराजावरील कर्जाचे ओझे निश्चितच उतरले आहे.

    ते पुढे म्हणाले, गरीब व आर्थिक दुर्बल घटकाला नाममात्र पाच रूपये दरात दर्जेदार जेवण देण्यासाठी शिव भोजन थाळी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यात 17 केंद्रामधून 5 लक्ष 41 हजार 169 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तसेच दरमहा अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना 1 लक्ष 20 हजार क्विंटल धान्याचे नियमित वाटप करण्यात येत आहे.   जिल्ह्यात रोजगार हमी योजनेमधून सन 2020-21 मध्ये आतापर्यंत 43 हजार 162 व्यक्तींना रोजगार देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात रोहयो अंतर्गत 811 कामे सुरू असून त्यावर 4 हजार 191 मजूरांची उपस्थिती आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात सन 2019-20 मध्ये 2 हजार 565 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. सद्य स्थितीत 3 हजार 963 घरकुलांचे काम मंजूर करण्यात आले आहे.  जिल्ह्यात  जिगांवसोबतच जिल्ह्यात अरकचेरी, चौंढी, आलेवाडी या लघु प्रकल्पांची कामे सुरू आहे.  जिगांव प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यातील 22 गावांपैकी 3 गावांचे पुनर्वसन पुर्ण करण्यात आले आहे. तसेच 10 गावांचे पुनर्वसन प्रगतीपथावर आहे.

    महाराष्ट्र गुटखामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले, आरोग्यासाठी घातक असणारा गुटखा अवैधरित्या राज्यातून हद्दपार करण्यात येत आहे.  त्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सोबतच कलम 328 आता गुटखा विक्री किंवा साठवणुकीच्या गुन्ह्यात लावता येणार आहे.  जिल्ह्यात  मागील कालावधीत 64 लक्ष 46 हजार रूपये किमतीच्या प्रतिबंधीत गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यात 3 लक्ष 51 हजार 917 कुटूंबांना वैयक्तिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  प्रत्येकाला दरडोई 55 लिटर पाणी मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात जल जिवन मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  विविध40 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींचे वाटप करण्यात आले आहे कोविडवरील लस आली असली तरी बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क, वारंवार हात धुणे किंवा सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे ही त्रि सुत्री अंगीकारणे गरजेचे आहे. भविष्यात कोविड सारख्या साथरोगांना यशस्वीपणे रोखण्यासाठी ही त्रि सुत्री प्रत्येकाने अंगीकारावी, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.

       कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री यांना पोलीसांकडून सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त,  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कोरोनावर मात केल्याबद्दल कोरोना योद्धा म्हणून श्रीमती सविता तुळशीराम तायडे, श्रीमती पुष्पाताई जाधव, मिर्झा अनिस बेग मिर्झा अन्वर बेग, दशरथ हुडेकर, संजय तायडे, गणेश बिडवे यांना विशेष निमंत्रीत करण्यात आले होते.

                                                                        ********

                        प्रजासत्ताक दिनी  शहीद जवानांच्या कुटूंबीयांना मदतीचे धनादेशाचे वितरण  

       बुलडाणा,(जिमाका) दि. 26 :  पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते आज 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस कवायत मैदानावर विविध पुरस्कार, आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 चे उत्कृष्ट निधी संकलनाबाबत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांना स्मृतिचन्ह देण्यात आले.  शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले.

  यामध्ये मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या आई वीरमाता श्रीमती जिजाबाई भिकमसिंह राजपूत,  चोर पांग्रा ता. लोणार येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या वीरपत्नी श्रीमती वंदना राठोड व वीरमाता सौ. सावित्रीबाई राठोड यांना प्रत्येकी प्रति कुंटूंबीय 40 लक्ष रूपये निधीचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच शहीद जवान अनिल वाघमारे यांच्या वीरपत्नी किरण अनिल वाघमारे यांना 45 लक्ष रूपयांचा धनादेश देण्यात आला. शहीद जवान चंद्राकांत भाकरे यांच्या वीरपत्नी मनिषा भाकरे, वीरमाता निर्मलाबाई भाकरे व वीरपीता भगवंतराव भाकरे यांना 40 लक्ष रूपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

   जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षलग्रस्त भागात खडतर व कठीण कर्तव्य बजाविल्याबाबत खामगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कोळी यांना विशेष सेवा पदक देण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव धोक्यात घालून उत्कृष्ट काम केल्याबद्दल आपत्ती निवारण अधिकारी संभाजी पवार, महसूल सहायक किसन जाधव, संजय खुळे, राजेंद्र झाडगे, पो. कॉ तारासिंग पवार, संतोष वनवे, दिपक वायाळ,  रविंद्र गिते, संतोष काकड, होमगार्ड प्रविण साखरे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आल्याबद्दल खामगांव येथील श्रीमती सरोजबेन दामजीभाई विकमसी ज्ञानपीठची विद्यार्थीनी कु. तनिष्का रितेश चौधरी यांचा गौरव करण्यात आला.कोविड  काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ मोहम्मद अस्लम व त्यांच्या चमूला प्रशस्तीपत्राचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे महावितरणच्यावतीने सौर कृषी पंप मिळालेल्या शेतकऱ्यांना डिमांट नोट याप्रसंगी देण्यात आल्या.