Saturday 30 December 2017

जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करा - पालकमंत्री पांडुरंग फुंडकर



जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करा
                                                 - पालकमंत्री पांडुरंग फुंडकर
* विविध विषयांचा पालकमंत्री यांनी घेतला आढावा
* कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी प्रसिद्ध कराव्या
* निधीचा पूर्णपणे विनियोग करावा
बुलडाणा,दि.30- जिल्ह्यामध्ये विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या कामांमुळे जिल्हा विकास वाटेवर अग्रेसर होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मिती कामांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. जी कामे सुरु आहेत ती गतीने पूर्ण करावी आणि जी सुरु करण्यात येणारी आहेत, ती त्वरित सुरु करावी, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेतांना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधिकारी शशिकुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुळकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे आदी उपस्थित होते.
  आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये प्राप्त निधीचा पूर्णपणे विनियोग करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, मिळालेला पूर्ण निधी मार्चअखेर खर्च झाला पाहिजे. प्रत्येक विभागाने निधी अखर्चित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच जलयुक्त शिवारची कामे विहित कालावधीत पूर्ण करावी. निवडलेले गाव पाण्याच्या ताळेबंदानुसार जलयुक्त करावे. त्याचप्रमाणे चिखली-खामगाव, अजिंठा-बुलडाणा, मेहकर-चिखली, नांदुरा-जळगाव जामोद या महामार्गांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावी.
 ते पुढे म्हणाले, शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग बांधवासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्यांना त्रास होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी शासकीय हमीभावानुसार शेतमाल विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर आणावा. सर्वप्रथम शेतमालाची ऑन लाईन नोंदणी करावी. ज्वारी, मका, उडीद व मुंग खरेदी ६ जानेवारी २०१८ पर्यंत करण्यात यावी. बँकांनी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकेच्या बाहेर प्रसिद्ध कराव्या. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमाफीचे एस एम एस संबंधित शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवावे.
   बैठकीदरम्यान पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त विलास भगवान जायभाये नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल पालकमंत्री यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                       

Thursday 14 December 2017

जिगांवसह 8 लघु प्रकल्पांच्या कामांचा कार्यान्वीतीकरणाच शुभारंभ



·        *नांदुरा येथे 17 डिसेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन
·       * बळीराजा जलसंजीवनी योजना
बुलडाणा, दि. 14: राज्यात निधीअभावी रखडलेल्या 21 मुख्य व 83 लघु अशा एकूण 104 प्रकल्पांची कामे आता शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत पुर्ण होणार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त 14 जिल्ह्यातील प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. त्यामध्ये विदर्भातील रखडलेल्या 81 प्रकल्पांचा समावेश आहे.  या योजनेतंर्गत जिल्हयातील जिगांवसह 8 लघु प्रकल्पांसाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या कार्यान्वितीकरण अर्थातच कार्यान्वयन कामाचा शुभारंभ 17 डिसेंबर 2017 रोजी नांदुरा येथे होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन 17 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता कोठारी विद्यालयाचे प्रांगणात करण्यात आले आहे. प्रकल्पांचे कार्यान्वीतीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, जलसंधारण आणि गंगा शुद्धीकरण विभागाचे मंत्री नितीन गडकरी असणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील राहणार आहे. तसेच सर्व लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणारआहे
 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प पुर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने मंजुर केलेल्या अर्थसहाय्या अंतर्गत  जिगांवसह अन्य 8 लघु प्रकल्पांची कामे पुर्ण होणार आहे. यामध्ये आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे ता. संग्रामपूर, चोंढी बृहत लघु पाटबंधारे ता. संग्रामपूर, अरकचेरी बृहत लघु पाटबंधारे योजला ता. संग्रामपूर, निम्न ज्ञानगंगा 2 बृहत लघु पाटबंधारे योजना ता. खमगांव, दुर्गबोरी लघु पाटबंधारे योजना ता. मेहकर, दिग्रस कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा ता. दे.राजा, बोरखेडी मिश्र संग्राहक तलाव ता. लोणार आणि राहेरा संग्राहक तलाव ता. मोताळा यांचा समावेश आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील समाविष्ट्र सिंचन प्रकल्प पूणर्‍ झाल्यानंतर सिंचनाचा अनुशेष भरून निघण्यास मदत होणार आहे, असे सचिव यु.पी सिंग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सचिव अ.वा सुर्वे, प्रधान सचिव आय.एस चहल, अमरावती विभागाचे मुख्य अभियंता रविंद्र लांडेकर, बुलडाणा अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी कळविले आहे.

Wednesday 13 December 2017

buldana loan wevier news 12.12.2017 dio buldana

जिल्ह्यात 2 लक्ष 22 हजार 309 शेतकरी  कर्जमाफीसाठी पात्र..!
  • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
  • उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू
बुलडाणा, दि. 12 :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थातच ऐतिहासिक कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 22 हजार 309 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर प्राप्त याद्यांची छाननी करण्यात आली. छाननीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या ग्रीन याद्या बँकांना पाठविण्यात आल्या. या ग्रीन यादीत जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 22 हजार 309 शेतकरी पात्र असून  यामधील 1 लाख 80 हजार 786 शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच (ओटीएस) एकरकमी योजनेतंर्गत 41 हजार 518 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. अशाप्रकारे एकरकमी व सरसकट कर्जमाफी याप्रमाणे जिल्ह्यात 2 लक्ष 22 हजार 309  शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात प्रोत्साहनपर अनुदानही देण्यात आले आहे.
     या योजनेतंर्गत आतापर्यंत राज्यात साधारणत: 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी 77 लाख अर्ज राज्यभरातून प्राप्त झाले.  प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर  डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी  हस्तांतरित करण्यात आला आहे.
दीड लक्ष रूपयांपर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात आले, तर दीड लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट अंतर्गत दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिल्या जात आहे.  शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शेतजमिनीची अट न ठेवता कर्जमाफी योजना जाहीर केली. जिल्ह्यातील दीड लाख पर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे खाते निल’ करण्यात आलेले आहे.  
 याविषयी प्रतिक्रिया देताना बुलडाणा तालुक्यातील रूईखेड टेकाळचे नारायणराव देशमुख म्हणतात, मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्यावर बुलडाणा केंद्रीय सहकारी बँकेचे 17 हजार 200 रूपयांचे कर्ज थकीत होते. मात्र या शासनाने कर्जमाफी दिली. माझे संपूर्ण कर्ज माफ झाले असून तसा एसएमएसही मला आला आहे. याबद्दल राज्य शासनाचा मी आभारी आहे. तर भादोला ता. बुलडाणा येथील शेतकरी अनिल भालेराव यांनी सांगितले, माझ्याकडे बुलडाणा सहकारी बँकेचे 77 हजार रूपयांचे कर्ज थकीत होते. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आणि आम्हाला कर्जमाफी मिळाली. माझे संपूर्ण कर्ज माफ झाले असून मी पुन्हा नव्या उमेदीने शेती करण्यासाठी सज्ज आहे. शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे आम्हा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा लाभ मिळाला आहे.
  तसेच रुईखेड ता. बुलडाणा येथील श्रीधर टेकाळे म्हणाले, बँकेचे माझ्याकडे 1 लाख 20 हजार 243 रूपयांचे कर्ज थकीत होते. या कर्जापायी झोपही लागत नव्हती. मात्र राज्य शासन देवासारखे धावून आले आणि कर्जमाफी दिली. माझे कर्ज माफ झाले असून यासाठी शासनाचे शतश: आभार मानतो. कर्जमाफीवर प्रतिक्रीया देताना इसापूर येथील शेतकरी काशीराम निकम  म्हणाले, माझ्यावर 1 लक्ष 59 हजार 600 रूपयांचे कर्ज होते. शासनाने ही कर्जमाफी देवून नवसंजीवनी दिली. अनेक शेतकऱ्यांसह या कर्जमाफीमुळे मी सुद्धा कर्जमुक्तीकडे वळलो आहे. शेतात अधिक उत्पादन घेवून आर्थिक संपन्न होण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहे. ही उर्मी केवळ या शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळेच मिळाली एवढे मात्र निश्चित.

Monday 4 December 2017

news 4.12.2017 io buldana

        
परिस्थितीवर मात करीत ‘विशालची’ भरारी…!
·        सावळी येथील विशाल नरवाडे बनला आयपीएस
  बुलडाणा, दि. 4 : मध्यमवर्गीय कुटूंब.. वडील चांडोळ येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे कार्यरत.. तसेच आई सुरूवातीला अंगणवाडी शिक्षीका आणी नंतर गृहीणी.. अशी बेताची परिस्थिती.. कुटूंब अजूनही धाड येथे भाड्याच्या घरात राहणारे.. मात्र नोकरी करीत गुंतवणूक तर करायची.. ही तेजराव नरवाडे यांची इच्छा.. आणि गुंतवणूक केली ती शिक्षणामध्ये.. मुलगी व मुलगा विशाल असे छोटे कुटूंब असणाऱ्या तेजराव यांनी मुलीला स्त्रीरोगतज्ज्ञ केले तर विशालला आयआयटी जबलपूर येथून अभियंता बनविले. मात्र प्रशासनात जावून समाजाची सेवा करावी..ही उर्मी विशालला स्वस्थ बसू देत नव्हती. विशालने आयआयटी झाल्यानंतर लाखो रूपयांच्या पगाराची खाजगी नोकरी न पत्करता दिल्ली गाठले. दिल्ली गाठताच आयपीएस होण्याचा अभ्यास सुरू केला. विशालचे मूळ गांव बुलडाणा तालुक्यातील सावळी.
    स्पर्धा परीक्षा..प्रशासकीय सेवेत जावून समाजाची सेवा करण्याचा मार्ग. या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक इच्छूकाला खडतर प्रवास करावा लागतो. स्पर्धा परीक्षा दिली म्हणजे नोकरी पक्कीच असाही काहींचा समज असतो. मात्र केवळ नोकरी म्हणून या क्षेत्राकडे बघणाऱ्या तरूणांना यश न मिळाल्यास बेकारी पदरी पडते. ह्या परीक्षा देणे म्हणजे.. प्रचंड मेहनत व 14 ते 15 तास अभ्यास करावा लागतो.. या मेहनतीला विशाल सामोरे गेला. विशालचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. सावळी या छोट्याशा गावात शिक्षण पूर्ण केले व इयत्ता 5 वी मध्ये भडगांवला शरद पवार विद्यालयात प्रवेश घेतला. गुणवत्तेच्या भरवशावर विशालने शेगांवचे नवोदय विद्यालय येथे इयत्ता 6, 7 वीचे शिक्षण पुर्ण केले. विशालने 8, 9 व 10 वी चे शिक्षण भारत विद्यालय, बुलडाणा येथे पूर्ण केले. तर 11 वी आणि 12 वी चे शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे घेतले.
  मुलांच्या शिक्षणातच गुंतवणूक करायची हा ठाम निश्चय मनाशी बाळगलेल्या तेजराव नरवाडे यांनी मुलाला आयआयटी जबलपूर (मध्यप्रदेश) येथे स्नातकसाठी पाठविले. विशालही आयआयटी जबलपूर येथून इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन अभियांत्रिकीची पदवी घेवूनच बाहेर पडला. मात्र जेमतेम परिस्थिती असलेल्या तेजराव यांनी विशालचा खाजगी क्षेत्रात नसलेला रस कळला. त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे सन 2012 मध्ये आयपीएस होण्यासाठी दिल्लीला पाठविले. या दरम्यान विशालच्या आईला त्यांची अंगणवाडी शिक्षीकेची नोकरी सोडावी लागली. त्या विशालसोबत दिल्लीला गेल्या. तीथे सर्व नवीन वातावरणात विशालने अभ्यास सुरू केला. करोलबाग भागात  छोट्या-मोठ्या क्लासेसच्या माध्यमातून अभ्यास केला. प्रारंभी लायब्ररीमध्ये अभ्यास करीत युपीएससीची तयारी करू लागला.  दिल्लीला गेल्यानंतर सण, समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम सर्व सोडून दिले. कुटूंबावर तुळशीपत्र ठेवून विशाल आपल्या ध्येयाकडे अग्रेसर राहीला. कुटूंबाकडे केवळ दोन एकर शेती असलेल्या तेजराव नरवाडे यांनीसुद्धा विशालला शिक्षणासाठी पैसा पुरविला. एवढेच नव्हे, तर त्यांनी मुलीलासुद्धा डॉक्टर केले. अशाप्रकारे कुटूंबाचे सहकार्य मिळाल्यानंतर विशालने मागे वळून पाहिले नाही. तो पहिल्याच प्रयत्नात 2013 मध्ये युपीएसीची चाळणी, मुख्य परीक्षा उत्तीर्ण होवून मुलाखतीला पात्र ठरला. या यशाच्यावेळी त्याने वयाची अवघी 22 वर्ष पूर्ण केली होती. मुलाखत पॅनल समोर जाणारा तो सर्वात कमी वयाचा उमेदवार होता. मात्र विशालला अपयश आले. त्याची अंतिम यादीत निवड होवू शकली नाही. त्याने हार न मानता सन 2014 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा मुलाखतीपर्यंत धडक मारली आणि सन 2015 ला तिसऱ्या प्रयत्नात विशालची आयपीएसमध्ये निवड झाली.
   मात्र मोठ्या स्वप्नांची माणसे आपल्या कार्यावर थांबत नाहीत. अशाप्रकारे विशालही थांबला नाही, त्याने आयएएससाठी तयारी सुरू केली आहे. आपल्या परिस्थितीवर मात करीत विशालने मिळविले हे यश प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. आपल्या यशाचे श्रेय विशाल आपल्या आई-वडीलांना देतो. त्यांचा विरह, त्याग व सहकार्य यांच्यामुळेच हे यश मिळविले असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. विशाल नरवाडे यांचे 18 डिसेंबर 2017 पासून एक वर्षाचे अत्यंत कडक प्रशिक्षण हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकॅडमी येथे सुरू होत आहे.
   लवकरच विशाल एखाद्या जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा जिल्हा पोलीस अधिक्षक बनून सांभाळतांना दिसणार आहे. तेव्हा आपण गर्वाने ते एसपी साहेब आमच्या जिल्ह्याचे असल्याचे सांगणार आहे. यात मात्र शंकाच नाही.
                                                                                    *******
उडीद, मुंग व सोयाबीन शेतमाल खरेदीसाठी माल नाफेड केंद्रावर आणावा
·        जिल्हा मार्केटींग अधिकारी यांचे आवाहन
·        शेतकऱ्यांनी आधी मालाची नोंदणी खरेदी विक्री संघाकडे केलेली असावी
बुलडाणा, दि. 4 : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत 13 खरेदी केंद्रांवर उडीद, मुंग व सोयाबीन शेतमालाची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी खरेदी-विक्री संघाकडे उडीद, मुंग व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी उडीद, मुंग, सोयाबीन शेतमालाची नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना 13 डिसेंबर 2017 पर्यंत एसएमएस किंवा मोबाईलद्वारे शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्यासाठी कळविण्यातसुद्धा येत आहे. तरीही काही शेतकऱ्यांना असा एसएमएस किंवा सुचना मिळाली नसल्यास त्यांनी खरेदी – विक्री संघाकडे संपर्क साधावयाचा आहे. तरी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित आपला माल नाफेड खरेदी केंद्रावर आणावा, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी केले आहे. तरी 13 डिसेंबर पर्यंत उडीद, मुंग व सोयाबीन शेतमाल नाफेड खरेदी केंद्रावर आणावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
*****
लोकशाही दिन कार्यवाहीत 5 तक्रारी निकाली
  
     बुलडाणा, दि.4 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यवाहीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते. त्यानुसार आज 4 डिसेंबर 2017 रोजी अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन कार्यवाही करण्यात आली.   याप्रसंगी अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आर.एस कदम, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, भूमि अभिलेख अधिक्षक श्री. जधवर, तहसीलदार शैलेश काळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या लोकशाही दिन कार्यवाहीमध्ये 5  तक्रारी  निकाली काढण्यात आल्या. त्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मेहकर नगर परिषद, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांच्याकडील दोन आणि उपवनसंरक्षक यांच्याकडील एक तक्रारींचा समावेश आहे.  तसेच 7 प्राप्त झाल्या असून त्यांना सामान्य तक्रार म्हणून स्वीकृत करण्यात आले आहे.  लोकशाही दिन कार्यवाहीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        *******
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘टेक सॅटरडे’ उपक्रमाचे आयोजन
  
     बुलडाणा, दि.4 : राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सहकार्यातून जिल्हाधिकारी कार्यालयात ‘टेक सॅटरडे’ उपक्रमाचे 2 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा सुचना-विज्ञान अधिकारी उत्तम चव्हाण व अतिरिक्त जिल्हा सुचना-विज्ञान अधिकारी आमोदकुमार प्रदिप सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी संगणकातील नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व जागरूकता याबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच उत्तम चव्हाण, आमोदकुमार सुर्यवंशी यांनी कार्यालयीन वापरातील युनीकोडचा वापर, एनआयसी नेटवर्कची ओळख व सायबर सुरक्षेची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
******
  जिल्हा कारागृहात बंदी जणांसाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम
  
     बुलडाणा, दि.4 : जिल्हा कारागृहात बंदी जणांसाठी सत्संगाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व विविध विषयांवर मन परिवर्तन कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रम मानव उत्थान सेवा समिती, खामगांव यांच्या माध्यमातून घेण्यात आला. कार्यक्रमात कैदी बांधव/भगीनी सहभागी झालेल्या होत्या. यावेळी श्रीमती अर्पणा व श्रीमती बागीशा यांनी संबोधीत केले. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कारागृह अधिक्षक श्री. गुल्हाने, जगदेव वानखेडे, गणपत मुळे, विष्णू रिंढे, अमो घोगळे व श्रीमती वानखेडे यांनी सहकार्य केले.
                                                                                    ******


Saturday 2 December 2017

news 2.12.2017 dio buldana

 मुख आरोग्य हे शारिरीक स्वास्थ्याचे गमक
                                                    -  जिल्हाधिकारी
* मुख आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्घाटन
* 31 डिसेंबर 2017 पर्यंत चालणार मोहिम
       बुलडाणा, दि. 2 :   मुख आरोग्य सांभाळले पाहिजे. मुख स्वास्थ्‌य हे पुष्कळच्या आजारांपासून आपले संरक्षण करते. अनेक आजार मुख दुर्गंधी असल्यामुळे निर्माण होतात. अशा आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख आरोग्य महत्वाचे आहे. स्वच्छ श्वास हे स्वच्छ शरीराचे प्रतिक आहे.  त्यामुळे मुख आरोग्य हे चांगल्या शरीर स्वास्थ्‌याचे गमक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले. मुख स्वास्थ्य तपासणी मोहिमेचचा उद्घाटनीय कार्यक्रम जिल्हा सामान्य रूग्णालय येथे नुकताच पार पडला. त्यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करताना बोलत होते.
     यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरीता पाटील होत्या, तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, आयएएम चे अध्यक्ष डॉ. राठोड, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मकानदार, आरसीएच डॉ. गोफणे, नोडल अधिकारी डॉ. शैलेश वैष्णव, जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले, डॉ. आशिष गायकवाड, सी. टी इंगळे,  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिलींद जाधव आदी उपस्थित होते.
  जिल्ह्यात 31 डिसेंबर 2017 पर्यंत मुख आरोग्य मोहिम चालणार असून यामध्ये विविध दिवशी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, कर्मचारी यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच तंबाखु विषयी जनजागृती व समुपदेशन करण्यात येईल.
   कार्यक्रमाला डॉ. महेश बाहेकर, प्रा. श्री. पठाण, रामेश्वर बांबल, प्रा. राजेंद्र कंदारकर, रणजित राजपूत, श्रीमती पिसे, प्राचार्या श्रीमती खेडेकर, श्रीमती शेळके, शारदा गाडेकर, सुनील राजस, मलीक खान, श्रीमती किर्ती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लता भोसले यांनी तर संचलन डॉ. आशिष गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन समुपदेशक सिद्धार्थ जाधव यांनी केले.
******* 
एड्स आजाराविषयी रॅलीमधून जनजागृती
       बुलडाणा, दि. 2 :   जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आज 2 डिसेंबर रोजी एडस आजाराविषयी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात  आले. रॅलीला जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रांगणातून जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी  माझे आरोग्य माझा अधिकार याविषयी शपथही देण्यात आली.
  यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरीता पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. महामुनी, नगरपालिकेचे श्री. सौभागे, शाहीर डी. आर इंगळे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये उपस्थित होते. एड्स आजारा विषयी जनजागृती या रॅलीमधून करण्यात आली.
                                                                        *******





कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान उपलब्ध
·        100 रूपये प्रति क्विंटल अनुदानाची रक्कम
·        मलकापूर व नांदुरा बाजार समितीमध्ये कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान
       बुलडाणा, दि. 2 :   ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचेकडील कांदा कृषि उत्पन्न बाजार समिती मलकापूर व नांदुरा कृषि उत्पन्न बाजार समिती येथे माहे जुलै व ऑगस्ट 2016 मध्ये विक्री केलेला आहे. अशा शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 100 रूपये अनुदान शासनाने मंजूर केलेले आहे. त्यानुसार 1866 लाभार्थी शेतकऱ्यांचे 19 लक्ष 87 हजार 389 रूपये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कृषि उत्पन्न बाजार समिती यांचेकडून ज्या लाभार्थीचे बँक खाते क्रमांक प्राप्त झालेले आहेत, अशा लाभार्थींचे बँक खात्यामध्ये कांदा अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
  मात्र अद्याप 622 लाभार्थीचे त्यांचे बँक खाते क्रमांक संबधित माहिती कृषि उत्पन्न बाजार समितीकडे जमा केली नाही. त्यामुळे त्यांचे कांदा अनुदानाची रक्कम त्यांचे खात्यावर जमा करणे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला शक्य नाही. तरी सर्व कांदा अनुदान पात्र लाभार्थी यांनी 8 दिवसांमध्ये त्यांचे बँक खाते क्रमांक कृषि उत्पन्न बाजार समिती मलकापूर व नांदुरा यांचेकडे जमा करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
                                                                        ******
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान प्राप्त
·        शेतकऱ्यांच्या याद्या बँकाकडे सादर
       बुलडाणा, दि. 2 :   ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी  माहे ऑक्टोंब, नोव्हेंबर  व डिसेंबर 2016 मध्ये कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेला आहे. अशा शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 200 रूपये अनुदान शासनाने मंजूर केलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे सोयाबीन अनुदानाबाबत याद्या संबंधित बँकाकडे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रकमा जमा करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर याद्या संबंधित बाजार समितीचे कार्यालयात जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी जाहीर प्रसिद्ध कराव्यात, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
                                                            *********
राहेरा गावाच्या पुनर्वसनासाठी 5 डिसेंबर रोजी भूखंड वाटप
       बुलडाणा, दि. 2 :   राहेरा संग्राहक लघु पाटबंधारे योजना मोताळा तालुक्यात करण्यात येत आहे. या योजनेमध्ये राहेरा गावाचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यानुसार या प्रकल्पातंर्गत राहेरा गावाचे पुनर्वसन करावयाचे असल्यामुळे नवीन गावठाण येथे भूखंड वाटप करण्यात येणार आहे. हे भूखंड मंगळवार, दि. 5 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता राहेरा येथे करण्यात येत आहे. तरी या कार्यवाहीसाठी प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित रहावे व पुढील कार्यवाही पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.
                                                            *****
पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचा दौरा

बुलडाणा, दि. 2 : राज्याचे पाणीपुरवठा व स्व्च्छता मंत्री  दि. 3 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 3 डिसेंबर रेाजी दुपारी 2 वाजता मौजे डिकसळ, ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथून दुसरबीड ता. सिं. राजाकडे प्रयाण, सायं 6.35 वाजता दुसरबीड येथे आगमन व श्री मुरलीधर डोईफोडे यांचे चिरंजीव यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती, सोयीनुसार दुसरबीड येथून जालनाकडे प्रयाण  करतील.
                                                                                    *****


Thursday 30 November 2017

news 30.11.2017 dio buldana


ग्रंथालय चळवळ टिकल्याशिवाय नवी पिढी घडणार नाही
                                                    -  पालकमंत्री पांडुरंग फुंडकर
  * जिल्हा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन
  •  शतायुशी ग्रंथालयांचा सन्मान
  • दोन दिवसीय ग्रंथोत्सव
       बुलडाणा, दि. 30 :   देशात आणि राज्यात ग्रंथालय चळवळ अतिशय जुनी आहे. हजारो वर्षांपूर्वीचे ग्रंथ आजही कायम आहेत. या ग्रंथांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. ग्रंथ पिढी घडविण्याचे, सुसंस्कृत करण्याचे काम करतात. ग्रंथालय चळवळ टिकली नाही तर नव्या पिढील देशाचा इतिहास आणि संस्कृती कळणार नाही.  त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकली पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केली. 
    स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आज दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव 2017 चे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार होत, तर खासदार प्रतापराव जाधव, जि. प. अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जि. प. सदस्या श्रीमती ज्योती खेडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, सहायक ग्रंथालय संचालक ज. सु. पाटील, जिल्हा माहिती सहायक निलेश तायडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष कि.वा. वाघ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
     ग्रामीण भागात ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांची गाथा, ग्रामगीतेचे सामूहिक वाचन केले जात असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले,  अशा विविध धार्मिक तसेच वैचारीक सामाजिक ग्रंथांचे जतन ग्रंथालय चळवळीने केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाचन चळवळ अधिक बळकट होणे गरजेचे आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून अशासन स्तरावर ग्रंथालय चळवळ संवर्धनाचे काम केले जात आहे.
   यावेळी खा. प्रतापराव जाधव म्हणाले,  आयुष्यात पुस्तकांचे महत्व मोठे असून ग्रंथ हे गुरु समान आहेत. ग्रंथ जिवनाला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथालय व वाचन संस्कृती टिकणे महत्वाचे असून त्यासाठी ग्रंथोत्सव अत्यंत महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.  जि. प. अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे यावेळी म्हणाल्या,  प्रत्येक गावात ग्रंथालयाची गरज आहे. त्यामुळे गावागावात ग्रंथालय उभारली पाहिजेत.
    जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ज्या देशात मोठ - मोठी ग्रंथालये आहे. तो देश समृद्ध समजल्या जातो. सध्या मोबाईल युग आहे. सर्वच बाबी मोबाईलवर पाहिल्या जातात, अगदी पुस्तकही मोबाईलवर वाचली जातात.  परंतु प्रत्यक्ष हातात घेऊन पुस्तक वाचनाचा फायदा अधिक होतो. नवीन पिढी पुस्तकांना विसरली तर भविष्यकाळ कठीण राहिल. त्यामुळे वाचन चळवळ वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
   सुरुवातीला जिल्हा ग्रंथपाल सतीश जाधव यांनी प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथोत्सवाची माहिती व पार्श्वभूमी विषद केली. वाचन संस्कृती व ग्रंथालय चळवळीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शंभर वर्षे पूर्ण झालेल्या वाचनालयांना शतायु ग्रंथालय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. निशिकांत ढवळे यांनी, तर आभार कि.वा. वाघ यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील वाचनालयांचे प्रतिनिधी, वाचकप्रेमी, साहित्य व कलाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  विविध पुस्तक प्रदर्शनी विक्रीच्या स्टॉलचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
******* 





                                                            ग्रंथदिंडीत  थिरकली पावले…
  • ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाचा शुभारंभ
बुलडाणा, दि.30 : उच्च  व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सव 2017 ला आज 30 नोव्हेंबर रोजी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीत साहित्यप्रेमी जनतेची पाऊले थिरकली.
    नगराध्यक्षा नजमुन्नीसा बेगम मो. सज्जाद यांच्या हस्ते ग्रंथपूजन करुन ताराबाई शिंदे यांच्या वाड्यापासून ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांच्याहस्ते पालखीचे पूजन झाल्यानंतर ही ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव, जिल्हा माहिती सहायक निलेश तायडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष कि.वा. वाघ, नेमीनाथ सातपुते, प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, हरिभाऊ पल्हाडे यांच्यासह शासनमान्य ग्रंथालयांचे प्रतिनिधी, वाचकप्रेमी नागरिक, पुरुष व महिला भजनी मंडळ, शाहिर हरिदास खांडेभराड यांचा संच तसेच एडेड् महाविद्यालय व राजीव गांधी मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.
  ग्रंथदिंडी मुख्य बाजार लाईन, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बॅंक चौक या मार्गे  गर्दे सभागृहात पोहचली. दरम्यान भजनी मंडळांनी विविध भजने, भारुडे सादर केली. पारंपारिक पाऊली आणि फुगडी  कलेचे देखील सादरीकरण करुन नागरिकांचे लक्ष वेधले. फुलांनी सजविलेली पालखी त्यामध्ये भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, ग्रामगीता यासह विविध ग्रंथ ठेऊन ही पालखी खांद्यावर घेत दिंडीत फिरविण्यात आली.  साहित्यप्रेमी, कलावंत, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते तसेच चोखंदळ वाचकांसाठी ग्रंथोत्सव म्हणजे एक आनंद मेळावाच असतो. स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात 30 नाव्हेंबर व 1 डिसेंबर असे दोन दिवस या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाची सुरुवात 9 वाजता ग्रंथदिंडीने करण्यात आली. या निमित्ताने पुस्तक प्रदर्शन व विक्रीसाठी विविध स्टॉल देखील लावण्यात आले असून वाचकांची या स्टॉलवर दिवसभर गर्दी पहावयास मिळाली. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचा स्टॉलही उभारण्यात आला आहे. या स्टॉलला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
                                                                        ******
शेतीसाठी पाणी देण्याविषयी नियोजन करावे
-       पालकमंत्री
  • पाणी आरक्षण समितीची बैठक
  • खडकपूर्णा प्रकल्पाच्या मृत साठ्यातील पाणी देण्यासाठी कार्यवाही करावी

     बुलडाणा, दि. 30 : यंदाच्या पावसाळ्यात पाऊस समाधानकारक जरी पडला असेल, तरी  जलसाठे ओसंडून वाहतील, असा झालेला नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचे सावट जिल्ह्यात येणार आहे. या संकटाचा सामना करण्यासठी आतापासून पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा मृतसाठा  मोठा असून त्यामधून या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी सुकणार नाही. याबाबत काळजी घेवून त्यापद्धतीने पाणी देण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना  पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या.
  पाणी आरक्षण समितीच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. शशिकांत खेडेकर, राहूल बोंद्रे,  जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी एस षण्मुखराज, अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे,  आदी व्यासपीठावर  आदी उपस्थित होते. तसेच बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. सुपेकर, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे उपस्थित होते.
   पालकमंत्री पुढे म्हणाले, खडकपूर्णा प्रकलपातील मृत साठ्यातील पाणी उपयोगात आणल्यास पाणीपुरवठा योजनांवर परिणामाबाबत चाचपणी करावी. तसेच एक पाळी पाणी सिंचनासाठी देता येत असल्यास तात्काळ आठ दिवसात उपसा सिंचनाद्वारे पाणी सोडावे.    खासदार प्रतापराव जाधव, आमदार राहूल बोंद्रे व शशिकांत खेडेकर यांनी खडकपूर्णा प्रकलपातील होत असलेली पाण्याची चोरी, वीज जोडण्या तोडणे, शेतीला सिंचनासाठी उपसा सिंचनाद्वारे पाणी देण्याविषयी मत मांडले. तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. बैठकीला सिंचन, महसूल, पाणी पुरवठा विभागाचे अधिकार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                        ******
दिवठाणा येथील गावकऱ्यांना आवास योजनेतंर्गत घरकुले द्यावी
-       पालकमंत्री पांडुरंग फुंडकर

बुलडाणा, दि. 30 : ज्ञानगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या दिवठाणा गावातील अतिक्रमीत जागेवर काही नागरिकांची घरे आहेत. या अतिक्रमीत जागांवर असलेले नागरिक यांना जवळपास जागा देवून त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे. त्यासाठी या जागेवर पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत त्यांना घरकुले देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई घरकूल योजनेमधून घरकुलांचा लाभ द्यावा, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या.
    ज्ञानगंगा प्रकल्प बाधीत दिवठाणा गावातील अतिक्रमीत जागेवर घरकुलासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे आदी उपस्थित होते.
   काळेगांव फाट्यावरील जागेची पाहणी करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, दिवठाणा गावातील  या गावकऱ्यांचे पुनर्वसन झाल्यानंतर ज्ञानगंगा प्रकलपाचे काम पूर्ण होईल. त्यामुळे अतिक्रमीत जागेवरील नागरिकांचे पुर्नवसन  करणे आवश्यक आहे. याप्रसंगी पुनर्वसन, लघु पाटबंधारे, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थितहोते.
                                                                                    **********
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा

बुलडाणा, दि. 30 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील दि. 1 व 2 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 1 डिसेंबर रेाजी सायं 7 वाजता औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने बुलडाणाकडे प्रयाण, रात्री 10 वाजता बुलडाणा शासकीय विश्रामभवन येथे आगमन व मुक्काम, दि. 2 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.50 वाजता शासकीय विश्रामभवन येथून बैठकस्थळी रवाना, सकाळी 8 वाजता शासकीय विश्राम भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीस उपस्थिती, सकाळी 10 वाजता विश्राम भवन येथे विविध लोकप्रतिनिधींच्या भेटीसाठी राखीव, सकाळी 11 वाजता शासकीय वाहनाने बुलडाणा येथून अकोलाकडे प्रयाण करतील.
                                                            *********
जिल्हाधिकारी कार्यालयात
 4 डिसेंबर रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि.2 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या महिन्याचा सदर लोकशाही दिन सोमवार 4 डिसेंबर 2017 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
   अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                    *********
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावयाची मुदत वाढ
बुलडाणा, दि. 30 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2014-15, 2015-16, 2016-17 या तीन वर्षासाठी जिल्हयातील खेळाडू, संघटक, क्रीडा मार्गदर्शक यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावयाची मुदत दि. 09.12.2017 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच अर्जासोबत 100 प्रमाणपत्रची मर्यादा रदद करुन अर्जदाराने सादर केलेल्या सर्व Attachment upload करण्यास शासनाने परवानगी देण्यातआलेली आहे. तरी या मुदतवाढीची जिल्हयातील सर्व खेळाडू, संघटक, क्रीडा मार्गदर्शक यांनी नोंद घेवूनत्यानुसार पुरस्कारासाठीचे आपले अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.
                                                                                    ****