कृषी विज्ञान केंद्रात विकसित भारत रोजगार हमी मिशनबाबत चर्चासत्र संपन्न
बुलढाणा, (जिमाका) दि. 05 : येथील
कृषी विज्ञान केंद्रात आज ‘विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन(ग्रामीण)’ अंतर्गत
ग्रामस्तर लोकप्रतिनिधींसोबत चर्चासत्र व सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शकाव्दारे शासनाच्या योजना, नवीन तंत्रज्ञान, शेतीविषयक अडचणीवर मार्गदर्शन
करण्यात आले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे
उपस्थित होते. तसेच सरपंच, हातेडी (खु.) प्रशांत गाडे, सरपंच चौथा गजानन गायकवाडसह
पंचक्रोशीतून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपातळीवरील समितीचे सदस्य तसेच
शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य उपस्थित होते.
मार्गदर्शन
करताना शिवशंकर भारसाकळे यांनी विकसित भारत कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रोजगार हमी योजनेचे
नवीन स्वरूप असलेल्या विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) योजनेची सविस्तर
माहिती दिली. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळून रोजगाराच्या संधी
निर्माण होतील व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ.
अमोल झापे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शेतकरी-केंद्रित उपक्रमांची माहिती दिली.
व्ही.बी.जी. रामजी या नव्या रोजगार हमी योजनेबाबत कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यातील
विविध गावांमध्ये जनजागृती केल्याचे त्यांनी नमूद केले. या योजनेअंतर्गत शेतीसंबंधित
विविध कामे दर्जेदार पद्धतीने राबवून ग्रामीण भागात रोजगाराची निश्चित हमी उपलब्ध होईल,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी जोडले जाऊन
नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा व शेतीविषयक अडचणी असल्यास निःसंकोच संपर्क साधावा,
असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनेश यदुलवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.



Comments
Post a Comment