Wednesday 1 May 2024

DIO BULDANA NEWS 01.05.2024


महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
*उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान
बुलडाणा, दि. १ : महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा येथील पोलिस कवायत मैदानावर पार पडला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी परेडची पाहणी केली. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र दिनाच्या 64वा वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस दल आणि होमगार्डने मानवंदना दिली. परेड निरीक्षण केल्यानंतर परेड संचलन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक इंगळे, पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, पोलिस हवालदार विकास खानझोडे, सुखदेव ठाकरे, संजय नागरे, चालक पोलीस हवालदार शेख वसीम शेख मेहबूब यांचा सन्मानचिन्ह आणि विशेष सेवा पदक देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मासरूळ, ता. बुलढाणाचे तलाठी एस. पी. शहागडकर यांना प्रशस्तीपत्र आणि आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता कालावधीत भरीव कामगिरी केल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक आर. एम. माकोडे, दुय्यम निरीक्षक आर. आर. उरकुडे, जवान एस. एस. जाधव, एन. एम. सोळंकी, पी. एच. पिंपळे, श्रीमती एस. एस. उंबरहंडे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मनरेगाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीबद्दल तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, कृषी सहाय्यक रवींद्र जाधव, वासुदेव भोई, शंकर वाघमारे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड, अक्षय गाडगे, जयश्री ठाकरे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नाझर गजानन मोतेकर आणि मंगेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
00000

Tuesday 30 April 2024

DIO BULDANA NEWS 30.04.2024



 जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

बुलडाणा, दि. 30 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, अक्षय गाडगे, नाझर गजानन मोतेकर, सुरेश खोडके आदी उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन केले.

000000

महाराष्ट्र दिनानिमित्त आज ध्वजारोहण

बुलडाणा, दि. 30 : महाराष्ट्र दिनाच्या 64वा वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

पोलिस कवायत मैदान येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

पाणीटंचाई निवारणासाठी टँकर मंजूर

बुलडाणा, दि‍. 30 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. बामखेड, मंडपगाव, चिंचोली बु., ता. देऊळगाव राजा येथे प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या तीन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावांमधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा यांनी कळविले आहे.  

00000

बुलढाणा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 जूनला मतमोजणी

बुलडाणा, दि. 30 : बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी दि. 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी बुलडाणा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. 4 जूनला होणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. त्यानुसार 5 बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात आले. मतमोजणीची सुरवात मंगळवार, दि. 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे.

बुलढाणा लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गणेश नगर, मलकापूर रोड, बुलढाणा येथे होईल. मतमोजणी सकाळी 8 वाजता सूरू होणार आहे. याची नोंद सर्व उमेदवार, प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

मलकापूर विधानसभा क्षेत्रातील

13 मे रोजीचा आठवडी बाजार रद्द

बुलडाणा, दि. 30 : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी दि. 13 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा क्षेत्रातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्या मतदान होणार असल्याने सोमवार, दि. 13 मेचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संपूर्ण निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या क्षेत्रात कोणताही कायदा भंग होऊ नये, आचारसंहितेचे पालन होण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी संबंधीत गाव, शहरामध्ये मुख्य मार्गावर रस्त्यावर आठवडी बाजार भरतो. आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक बाजार खरेदी करण्यासाठी येत असतात. तसेच आजुबाजूचे गावातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होण्याची, तसेच मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे जिल्हादंडाधिकारी यांना बाजार व जत्रा अधिनियम, 1862 च्या कलम 5 नुसार मलकापूर विधानसभा मतदारसंघाममध्ये दि. 13 मे 2024 रोजी कायदा व सुव्यवस्था, तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही यासाठी आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे. सदर आठवडी बाजार त्या पुढील दिवशी भरविण्याची मुभा देण्यात आली आहे.

00000

Monday 29 April 2024

DIO BULDANA NEWS 29.04.2024

 



खरीप हंगामात उत्पादकता वाढीवर लक्ष केंद्रीत करावे

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 29 : जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पिकांवर शेतकऱ्यांची अवलंबितता अधिक आहे. या शेतकऱ्यांवर अरिष्ट ओढविल्यास त्यांची परिस्थिती बिकट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर आणि त्यांची उत्पादकता वाढणारी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोज ढगे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल अधिक होता. यावर्षी शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. यासाठी त्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे, बियाणे खरेदीची पावती, पिशवी आदी सांभाळून ठेवण्याचे सांगावे. तसेच विक्रेत्यांची नावे आणि पत्ते जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावेत. कोणत्याही परिस्थितीत बोगस बियाणे विक्री होऊ नये, यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात यावी. यासोबतच रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा.

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती देण्यात यावी. चांगले वाण आणि कमी पाण्यात चांगली उत्पादकता देणारी, तसेच शेतीमधील नवीन बाबींची माहिती देण्यात यावी. नवीन संशोधनाची माहिती देऊन शेतकऱ्यांना शेती संरक्षित करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना शेती सुकररित्या करण्यासाठी यांत्रिकीकरण आणि इतर योजनांचा लाभ देण्यात यावा. एकात्मिक पद्धतीने शेती करण्यासोबतच त्यांचा शेतकरी उत्पादक कंपनीशी समन्वय साधून देण्यात यावा.

पिक विम्यामुळे शेतकऱ्यांना आपदग्रस्तवेळी मदत मिळण्यास मदत होते. यावर्षी 234 कोटी रूपयांचा विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे. विम्याची रक्कम मिळण्यास ईकेवासी नसल्याने अडचणी येत असल्यामुळे ईकेवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगण्यात यावे. यासोबतच अपघात विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रकरणे तातडीने निकाली काढावेत. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. यातून 332 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना मदतीसाठी पिक कर्ज महत्वाचे आहे. यावर्षी सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. बँकांनी कर्ज प्रक्रिया करण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करावी. शेतकऱ्यांना मदतीसाठी नवीन वाणांची पिके देण्यात यावी. हळद, ओवा सारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. तसेच फळ पिके, बांबू लागवड आणि वैरण विकासाची कामे करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना ज्या योजनांमधून लाभ मिळणार आहे, अशा योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

000000

बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 29 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी रोजी सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नियमित बुधवारी अस्‍थीव्यंग संबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवसाचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे. 

00000

पाणीटंचाई निवारणासाठी कुपनलिका, विंधन विहिरी मंजूर

 बुलडाणा, दि. 29 :जिल्ह्यातील पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून 39 गावापैकी 10 गावात कुपनलिका आणि 29 गावात 48 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.

मलकापूर तालुक्यातील वडोदा, अनुराबाद, काळेगाव, भाडगणी, बेलाड, वाघुड, धरणगाव, तांदुळवाडी, म्हैसवाडी, रणथम, गोराड, नांदुरा तालुक्यातील खुमगाव, नवे इसरखेड, वडनेर भोलाजी, खामगाव तालुक्यातील लाखनवाडा बु., लाखनवाडा खु., कंचनपूर, वाहाळा खु., आडगाव, बोरी, बोथाकोजी, लोणार तालुक्यातील अजीसपूर, खुरमपूर, ब्राम्हणचिकणा, पिंपळखुटा, आरडव, देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगाव बु.. तुळजापूर, पिंपळगाव बु., या गावांसाठी 48 विंधन विहिरी, तर संग्रामपूर तालुक्यातील एकलारा, काकनवाडा बु., पिंप्री आडगाव, रूधाना, सावळी, रिंगणवाडी, सोनाळा, टुनकी बु., टुनकी खु., वानखेड या दहा गावांमध्ये दहा कुपनलिका मंजूर करण्यात आल्या आहे.

00000

DIO BULDANA NEWS 27.04.2024

 बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 62.03 टक्के मतदान

बुलडाणा, दि. 27 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. या मतदानामध्ये बुलढाणा मतदारसंघासाठी  62.03 टक्के मतदान झाले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी उत्साहात मतदान केले.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नऊ लाख 33 हजार 173   पुरुष मतदारांपैकी सहा लाख 3 हजार 525, तर आठ लाख 49 हजार 503 महिला मतदारांपैकी पाच लाख 2 हजार 226, तसेच इतर 24 मतदारांपैकी दहा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघातील 17 लाख 82 हजार 700 मतदारांपैकी अकरा लाख 5 हजार 761 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा समावेश आहे. यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील एक लाख 53 हजार 160 पुरुष मतदारांपैकी 86 हजार 164, तर एक लाख 40 हजार 326 महिला मतदारांपैकी 72 हजार 211, तसेच तेरा इतर उमेदवारांपैकी सहा मतदारांनी हक्क बजावला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख 93 हजार 499 मतदारांपैकी एक लाख 58 हजार 381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 53.96 टक्के एवढी आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघातील एक लाख 51 हजार 9 पुरुष मतदारांपैकी 97 हजार 482, तर एक लाख 40 हजार 609 महिला मतदारांपैकी 83 हजार 947 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चिखली विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख 91 हजार 618  मतदारांपैकी एक लाख 81 हजार 429 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 62.21 टक्के एवढी आहे.

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील एक लाख 64 हजार 629 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 4 हजार 355, तर एक लाख 49 हजार 449 महिला मतदारांपैकी 88 हजार 293 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 14 हजार 78  मतदारांपैकी एक लाख 92 हजार 648 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 61.34 टक्के एवढी आहे.

मेहकर विधानसभा मतदारसंघातील एक लाख 56 हजार 713 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 5 हजार 150, तर एक लाख 42 हजार 385 महिला मतदारांपैकी 88 हजार 794, तसेच 3 इतर मतदारांपैकी 2 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मेहकर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 99 हजार 101 मतदारांपैकी एक लाख 93 हजार 946 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 64.84 टक्के एवढी आहे.

खामगाव विधानसभा मतदारसंघातील एक लाख 52 हजार 968 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 6 हजार 408, तर एक लाख 37 हजार 20 महिला मतदारांपैकी 85 हजार 763, तसेच 4 इतर मतदारांपैकी 1 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खामगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 89 हजार 992 मतदारांपैकी एक लाख 92 हजार 172 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 66.27 टक्के एवढी आहे.

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील एक लाख 54 हजार 694 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 3 हजार 966, तर एक लाख 39 हजार 714 महिला मतदारांपैकी 83 हजार 218, तसेच 4 इतर मतदारांपैकी 1 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 94 हजार 412 मतदारांपैकी एक लाख 87 हजार 185 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 63.58 टक्के एवढी आहे.
00000

Wednesday 24 April 2024

DIO BULDANA NEWS 24.04.2024

 कामगार मतदारांना मतदानासाठी सुट्टी

बुलडाणा, दि. 24 : बुलढाणा मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्यात येणार आहे.

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.

सदर सुट्टी उद्योग, उर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहणार आहे. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने आणि इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स रिटेलर्स यांना हा आदेश लागू राहणार आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, बुलडाणा  यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी  किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींच्या मालक, व्यवस्थापनांनी सूचनांचे योग्य अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त झाली नाही आणि मतदान करता येणे शक्य झाले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

बुलढाणा मतदारसंघातील सर्व कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व प्रकारच्या आस्थापनाधारकांनी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.

000000

Tuesday 23 April 2024

DIO BULDANA NEWS 23.04.2024





 लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या मदतीसाठी व्होटर हेल्पलाईन

*मतदारांना व्होटर स्लीप, संदेश पत्राचे वितरण

*मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी संस्थांना आवाहन

बुलडाणा, दि. 23 : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांना निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती आणि सेवा मिळणार आहे. ॲप सहजपणे डाऊनलोड करण्यासाठी क्यूआर कोडही देण्यात आला आहे.

व्होटर हेल्पलाईन ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या या ॲपने मतदारांशी संबंधित सेवा देऊन क्रांती घडवून आणली आहे. या ॲपमध्ये नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांसाठी सेवा, ई-इपिक डाऊनलोड, निवडणूक विषयक माहिती, उमेदवारांची माहिती, निवडणूक निकाल, माहिती स्त्रोत, नवीन घडामोडी, तक्रारी आणि सूचना यासह मतदारयादीतील तपशिलांची दुरुस्ती, मतदारयादीतील नावाचा शोध आणि इतर निवडणूक संबंधित सेवांनी या ॲपने ईसीआयला नागरिकांशी जोडले आहे. तसेच ही प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम बनविली आहे.

मतदारांना मतदान करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे बुलढाणा मतदारसंघातील 17 लाख 82 हजार मतदारांना व्होटर स्लीपचे घरपोच वाटप करण्यात आले आहे. या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. यासोबतच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे मतदान करण्याबाबतचे आवाहनपर संदेशपत्रक वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

मतदान केंद्रावर मतदारांना किमान सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या बाजूच्या खोलीत मतदारांसाठी बैठक, पाणी, पंखे आदीची सोय करण्यात येणार आहे. मतदार याठिकाणी थांबून क्रमाने मतदान करण्यास जाऊ शकतील. दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपद्वारे सुविधा पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना ॲपवरून मतदान केंद्रावरील सोयीसुविधांसाठी नोंदणी करावी लागणार आहे. तसेच दिव्यांग आणि 85 वर्षावरील नागरिकांना घरून मतदान करण्याची सोय दिली आहे. यात आजपर्यंत 2 हजार 650 मतदार म्हणजेच 93 टक्के मतदान झाले आहे.

उष्णाघाताच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे. त्यांच्याकडे औषधे आणि ओआरएसचा पुरेसा साठा उपलब्ध राहणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी गृहनिर्माण सोसायटीं, मेडीकल असोशिएशन यांना आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच मतदानासाठी कर्तव्यावर असणाऱ्यांना प्रमापणपत्र देण्यात आले आहे. यामध्ये 11 हजाराहून अधिक मतदान होणार आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे 100 टक्के मदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

गेल्या लोकसभेत राज्याचे 61.02 टक्के, तर जिल्ह्यात 63.54 टक्के मतदान झाले आहे. यावर्षी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृती केली असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार आहे. गेल्या लोकसभेत बुलडाणा विधानसभा क्षेत्रात 55.39 टक्के मतदान झाले होते. यावर्षी या भागत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी मतदानासाठी पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

न्याय पालिकेतील कर्मचाऱ्यांची मतदार प्रतिज्ञा

कर्मचारी, नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे

-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी

बुलडाणा, दि. 23 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी न्यायपालिकेंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. तसेच आपले कुटुंबीय आणि आपल्या परिसरातील नागरिकांनाही मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी केले.

भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या 'सुनियोजित मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग' या प्रमुख कार्यक्रमांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागांमधून मतदार जागरूकता मंचाची स्थापन करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकामध्ये शासकीय आणि निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक साक्षरता आणि सहकार्यता निर्माण करण्यासाठी हा फोरम महत्वपूर्ण आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 22 एप्रिल रोजी जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील न्यायालयांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांच्या मार्गदर्शनाखाली एकाचवेळी मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हा न्यायाधीश राजेंद्र मेहरे, संजय डिगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल बी. एम. मोहन, तसेच दूरचित्रवाणी परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरावरील सर्व न्यायालयाचे न्यायधीश, कर्मचारी आणि विधिज्ञ उपस्थित होते.

सुरुवातीला सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या माझे मत, माझा आवाज या नागरिकांना करण्यात आलेल्या मतदानविषयक आवाहन संदेशाचे प्रक्षेपण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल बी. एम. मोहन यांनीही मतदान करण्याबाबत सर्वांनी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश संजय डिगे यांनी उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा दिली. जिल्हा प्रणाली प्रशासक प्रदिप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

00000



डाक विभागाकडून मतदार जागृती रॅली

            बुलडाणा, दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचा टक्का वाढावा आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांमध्ये कुणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये बुलडाणा डाक विभागाकडून मतदार जागृतीसाठी आज दि. 23 एप्रिल रोजी मतदाता जागृती रॅली काढण्यात आली होते.

जिल्ह्यात निवडणूक आचार संहिता लागू असताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून अतिशय शांत, शिस्तबद्ध पद्धतीने डाक विभागाचे डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अधीक्षक सतीश निकम आणि पोस्टमास्टर रविंद्र झिने यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. यात डाक कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाहीला मजबूत करावे, असे आवाहन डाक विभागाने केले.

000000






राज्य उत्पादन शुल्कच्या अवैध दारूविरूद्ध चार कारवाई

बुलडाणा, दि. 23 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. यात आज दि. 23 एप्रिल रोजी चार कारवाया करण्यात आल्या. यात 1 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक मलकापूर यांनी दि. २३ एप्रिल रोजी बोदवड-मलकापूर रस्त्याबर बोदवड, जि. जळगाव येथील एका गुन्ह्यांमध्ये एक स्विप्ट चारचाकी वाहनामध्ये एकुण देशी २५.१२ लिटर आणि विदेशी १७.३२ लिटर असा २ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मलकापूर श्री. शिंदे आणि जवान ए. पी. सुसरे यांनी सहभाग घेतला.

तसेच चिखलीच्या पथकाने नशिराबाद फाट्याजवळ नाईकनगर, ता. सिंदखेडराजा येथे १ पिकअप बोलेरो चारचाकी वाहनासह देशी दारु १९०.०८ लिटर व विदेशी दारू ८.६४ लिटर मद्य पकडुन ७ लाख ३१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात निरीक्षक श्री. रोकडे, दुय्यम निरीक्षक नयना देशमुख, श्री. पहाडे, जवान श्री. तिवाने, संजीव जाधव यांनी सहभाग घेतला.

बुलडाणाच्या पथकाने देऊळघाट येथे दोन कारवाया केल्या. यात पहिल्या कारवाईत अशोक सुखदेव पन्हाळे याच्या राहत्या घरी देशी दारु २६४.९6 लिटर मद्य पकडून १ लाख ३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात निरीक्षक के. आर. पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक निलेश देशमुख, जवान अवचार, विशाल पाटील यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या कारवाईत गजानन दगडू पन्होळे याच्या राहत्या घरातून देशी दारू ४३.२० लिटर मद्य पकडून १६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत २०४ गुन्हे नोंदविले असून २०० वारस गुन्ह्यात २०८ आरोपींना अटक केली आहे. यात २२ वाहनांसह ३५ लाख ८३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व गुन्ह्यांमध्ये देशी मद्य १ हजार ३४०.४ लिटर. विदेशी मद्य १५०.५२ लिटर. बिअर ९१.०७ लिटर, ताडी १४८ लिटर, रसायन सडवा २६ हजार ९१४ लिटर, हातभट्टी १ हजार ६७६ लिटर पकडण्यात आले आहे.

00000

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार रद्द

           बुलडाणा, दि. 23 : लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मलकापूर आणि नांदुरा तालुका वगळता असणारे आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे.

निवडणूक कालावधीतील आदर्श आचार संहितेचे पालन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकतो. याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाजार व जत्रा अधिनियम 1862च्या कलम 5 नुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही यादृष्टीकोनातून मलकापूर आणि नांदुरा तालुका वगळता शुक्रवारी भरणारे बाजार रद्द करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे..

000000


Monday 22 April 2024

DIO BULDANA NEWS 22.04.2024

शुक्रवारच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

*17 लाख 82 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

*शहरी 381, ग्रामीण 1581 असे 1962 मतदान केंद्र

*11 हजार अधिकारी, 5 हजार पोलिस राहणार तैनात

बुलडाणा, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा मतदारसंघासाठी 17 लाख 82 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1 हजार 104 ठिकाणी 1 हजार 962 मतदान मतदान केंद्र राहणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यात 17 लाख 82 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यावेळी 18 ते 19 वर्षे वयोगटातील नव्याने नोंदणी केलेले 26 हजार 500 मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहे. मतदार संघात 9 लाख 33 हजार 173 पुरूष, तर 8 लाख 49 हजार 503 महिला आणि 24 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. यात दिव्यांग 14 हजार 234, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 26 हजार 830, तर 4 हजार 395 सैन्यदलातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील 1 हजार 104 ठिकाणी स्थापित 1 हजार 962 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या सर्व मतदान केंद्रावर मतदारांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. याठिकाणी रांगविरहीत मतदानासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांना रांगेत उभे ठेवण्याऐवजी मतदान केंद्रालगत असलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये बैठक, वीज, पंखे, पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर टोकन क्रमांकानुसार मतदानासाठी केवळ पाच मतदारांना रांगेत उभे ठेवण्यात येणार आहे. उष्ण वातावरणात मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी सुविधा पुरविण्यात येणार आहे. तसेच उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली सुविधा देण्यात येणार आहे.

मतदानासाठी एकूण 1 हजार 962 मतदान केंद्र राहणार आहे. यापैकी 381 शहरी तर 1581 नागरी भागात मतदान केंद्र राहणार आहे. यातील 987 मतदान केंद्राचे वेबकास्टींगद्वारे लाईव्ह स्वरूपात मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांकरीता विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सक्षम ॲपद्वारे व्हील चेअर आणि मतदान केंद्रावर नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानुसार या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्राशिवाय आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे..

मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी कर्तव्यावर नियुक्त असणाऱ्या मतदान केंद्रावर त्यांना मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील कर्तव्यावर असलेल्या 1 हजार 149 अधिकारी, कर्मचारी पोस्टाद्वारे मतदान करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी डाक मतदान प्रक्रियेची सुविधा राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात घरून मतदानाला रविवारपासून सुरूवात झाली आहे. यात दिव्यांग 692 आणि 85 वर्षावरील 2 हजार 171 असे गृह मतदानासाठी नोंदणी केलेले एकूण 2 हजार 863 मतदारांचे मतदान करण्यात येत आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 11 हजार 592 अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहे. तसेच 5 हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. 24 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते दि. 26 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवसापर्यंत हे आदेश लागू राहतील. मतदान केंद्राच्या ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आले असून 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे­. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू आणि रोकड जप्त करण्यात येत आहे. यात आतापर्यंत 1 कोटी 60 लाख रूपयांपर्यंतचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 25 लाखाहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांना मतदानाला येण्यासाठी आणि मतदान केंद्रावर सर्व सोयी पुरविण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये निर्भयपणे सक्रीय सहभाग नोंदवून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे..

000000

शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत उपलब्ध

गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 22 : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या उपक्रमात शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गाळ काढणे आणि शेतापर्यंत वाहतूक करण्याचा खर्च उचलावा लागणार आहे. शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत उपलब्ध असून यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण आणि राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या मालकीच्या 177 जलाशयांमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गाळ काढण्यात येत आहे. शेतामध्ये गाळ टाकल्याने जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांना गाळ मोफत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी कोणत्याही यंत्रणेला शुल्क देण्याची गरज नाही. हा गाळ शेतीच्या उपयोगासाठी मोफत उपलब्ध असणार आहे. गाळ उपसा करणे आणि वाहतूक करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार येणार नाही.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार हा उपक्रम ग्रामपंचायत आणि शेतीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्यामुळे गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना सहकार्य करावे. या उपक्रमात नागरिकांनी सहकार्य करावे, पावसाळा सुरू होण्यासाठी जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. या अल्प कालावधीत धरणातील गाळ काढावा लागणार आहे. विहित मुदतीत ही कामे होऊ शकली नसल्यास ग्रामपंचायतीचे नुकसान होणार आहे. पावसाळ्या धरणातील गाळ काढता येणे शक्य नसल्याने जलसंधारण विभागाने या कामात अटकाव करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

गाळ काढण्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. तसेच हा गाळ शेतीमध्ये टाकण्यात आल्यामुळे सुपिकता वाढणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे. धरण, तलावातील गाळ शेतामध्ये नेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. गाळ घेऊन जाऊन शेतकऱ्यांनी शेती सुपिक करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा. या उपक्रमात नागरिक, ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले

000000 

DIO BULDANA NEWS 21.04.2024

 लोकसभा निवडणुकीत रांगविरहित मतदान प्रक्रिया

*मतदानासाठी मतदारांना टोकन देणार

*दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअरची सुविधा

*प्रत्येक केंद्रावर आरोग्य पथक तैनात

बुलडाणा, दि. 21 येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सध्यास्थितीतील जिल्ह्यातील उष्ण तापमानाच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या सुलभतेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात यावर्षी प्रामुख्याने टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला टोकन देण्यात येणार आहे. मतदानासाठी एकावेळी फक्त पाच मतदार रांगेत उभे राहतील. उर्वरीत टोकन असणाऱ्या मतदारांसाठी मतदान केंद्राच्या बाजूच्या खोलीत बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

सध्या जिल्ह्यात तापमान उष्ण आहे. याचा परिणाम मतदानाचा हक्क बजावण्यावर होऊ नये, नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात यावर्षी प्रथमच मतदारांना मतदान केंद्रावर टोकन देण्यात येणार आहे. या टोकन क्रमांकानुसार मतदान करण्यासाठी रांगेत सोडण्यात येणार आहे. महिला आणि पुरूषांसाठी वेगळे टोकन देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदारांना टोकन देण्यात येतील. यातील पाच मतदारांना रांगेत ठेवण्यात येणार असून उर्वरीत मतदारांसाठी मतदान केंद्राच्या बाजूच्या खोलीत बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी पंखे, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी खुर्च्या आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. या माध्यमातून रांगविरहित मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

दिव्यांग मतदारांसाठी मतदानाला येण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्ती सक्षम ॲपवरून मतदान केंद्रावर येणे-जाणे आणि व्हीलचेअरची मागणी नोंदवू शकतील. मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींना सर्व मदत दिली जाणार आहे. अंध मतदारांना ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच मतदान यंत्रावर निळ्या बटनाशेजारी ब्रेल लिपीतील क्रमांक असणार आहे. यंत्रावरील क्रमांक तपासून अंध मतदार मतदान करू शकतील. दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना आवश्यकतेप्रमाणे मदतनीस पुरविण्यात येणार आहे.

उष्ण तापमानामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास उपचार करण्यासाठी मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे. पथकाकडे आवश्यक औषध साठ्यासह मेडीकल किट उपलब्ध राहणार आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ओआरएस आणि इतर औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहे. तसेच चार किंवा त्यापेक्षा जास्त मतदान केंद्र एकाच इमारतीमध्ये असणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर मंडप उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पंखे, खुर्च्या, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी मतदार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क्‍ बजावावा, यासाठी प्रशासनातर्फे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मतदान केंद्रावरही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. मतदानाला येणाऱ्या नागरिकांची सर्वेतोपरी काळजी प्रशासन घेणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणतीही काळजी न बाळता मतदानाला येऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000



राज्य उत्पादन शुल्कची निवडणूक काळात कारवाई

*१९ दुचाकी़, १ इर्टीगासह ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

            बुलडाणादि. 21 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणूक काळात कारवाई सुरू केली आहे. आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत 19 दुचाकी आणि एका इर्टीगा वाहनासह 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

            लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबविण्यात आली­. या कालावधीत एकुण १९६ गुन्हे नोंदविण्यात आले असून १९२ वारस गुन्ह्यात १९९ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच २० बाहनासह एकूण ३१ लाख ९५ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य ९७९.७७ लिटरविदेशी मद्य १३३.२ लिटर, बिअर ५१.९५ लिटरताडी १४८ लिटररसायन सडवा २६ हजार ४१० लिटरहातभट्टी १ हजार ६५७ लिटर जप्त करण्यात आले आहे.

            राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने शनिवार, दि. २० एप्रिल २०२४ रोजी किनगाव राजा, ता. सिंदखेडराजा येथे २ गुन्ह्यांमध्ये एक ईटींगा चारचाकी वाहन क्रमांक एमएच १४ जेएम ६१९७ आणि १ मोटर सायकल क्रमांक एमएच २८ एसी ७९६२ यामध्ये एकुण ४३.२ लिटर देशी मद्य पकडुन एकुण ६ लाख ९६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये रविकुमार रामदास चाटे, वय ३३, रा. निमगाव वायाळ आणि शरद दत्तात्रय जाधव, वय ४०, रा. किनगावराजा, ता. सिंदखेडराजा यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी निरीक्षक आर. एम. माकोडेदुय्यम निरीक्षक आर. आर. उरकुडेजवान नि वाहनचालक मोहन जाधव, जवान पी. एच. पिंपळे यांनी सहभाग घेतला होता.

            राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक यांनी येळगाव शिवारात १ मोटर सायकल वाहनासह ८.६४ लिटर देशी मद्य पकडुन एकुण २३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात विपुल प्रकाश साळवे, रा. बुलडाणा याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दुय्यम निरीक्षक आर. के. विठोरेव जवान एस. बी. निकाळजे यांनी सहभाग घेतला.

            परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास या विभागास टोल फी नंबर १८००२३३९९९९ वर किंवा व्हॉटअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

00000