Friday 26 January 2018

बोंड अळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे - पालकमंत्री पांडुरंग फुंडकर



बोंड अळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे
-         पालकमंत्री पांडुरंग फुंडकर
  • पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा थाटात
  • ऐतिहासिक कर्जमाफी योजना कार्यवाहीत जिल्हा राज्यात प्रथम
  • मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत अर्ज करण्याचे आवाहन
  • जिल्ह्यातील 441 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
  • कृषी यांत्रिकीकरण योजनेला 10 कोटी रूपयांची वाढीव तरतूद
  • 587 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त, मार्च 2018 पर्यंत संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्तीचा संकल्प 
बुलडाणा, दि. 26 - कापूस पिकावर आलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात बोंडअळीने नुकसान झालेल्या 2.4 लक्ष  शेतकऱ्यांच्या 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त बाधीत असलेल्या 1.90 लक्ष हेक्टरवरील क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या नुकसानीपोटी 134.34 कोटी रूपये आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसार बोंड अळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिल्या जाणार असून बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे, असे प्रतीपादन राज्याचे कृषि तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले.
    भारतीय प्रजासत्ताकाचा 68 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार सखाराम आहेर (गुरूजी), विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, नगराध्यक्षा श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, उपाध्यक्ष विजय जायभाये, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,  मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी श्री. दुबे, अप्पर पोलीस अधिक्ष संदीप डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी नेमाने आदींची उपस्थिती होती.
    शेतकऱ्यांना उभारी देणारी ऐतिहासिक कर्ज माफी शासनाने दिली असल्याचे सांगत पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले, तंत्रज्ञानाचा उपयोग करीत खऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यात 2 लाख 4 हजार 700 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. कर्जमाफीपोटी आतापर्यंत तब्बल 843 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहे. कर्जमाफीच्या कामामध्ये जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले असून याबाबतीत बुलडाणा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. शासनाने नाफेडमार्फत हमी भावाला शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात सोयाबीन 26 हजार 423 क्विंटल, उडीद 1 लक्ष 55 हजार 784, मका 26 हजार 126 आणि मुंगाची 15 हजार 997 क्विंटल शासकीय खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीपोटी शासनाने 67.21 कोटी रूपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा केले आहे. उर्वरित चुकारे अदा करण्याची कार्यवाही सुरू आहे. 
    जलयुक्त शिवार अभियानाबाबत पालकमंत्री म्हणाले, सन 2016-17 साठी दुसऱ्या टप्प्यात निवडलेल्या 245 गावांमध्ये 5 हजार 390 कामे पूर्ण झाली आहे. या कामांमुळे जिल्ह्यात 18 हजार 729 टि.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच 16 हजार 535 हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचनाची आणि 9 हजार 525 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. तसेच 2017-18 मध्ये निवडलेल्या 195 गावांच्या शिवारात जलसंधारणाची 718 कामे पूर्ण झाली आहे. शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अंमलात आणलेली आहे. या योजनेला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शेततळ्यासाठी जिल्ह्यात प्राप्त अर्जांपैकी पात्र ठरलेल्या 5 हजार 913 अर्जांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे.  त्यापैकी 2 हजार 409 शेततळी पुर्ण झाली असून 346 प्रगतीपथावर आहे.   जिल्ह्यात 2 हजार 219 शेततळी धारक शेतकऱ्यांना 987.78 लक्ष रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले आहे.  
     ते पुढे म्हणाले, उन्नत शेती समृद्ध शेतकरी या मोहिमेतंर्गत कृषि यांत्रिकीकरणासाठी जिल्ह्यात एकूण  4 हजार 770  शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. त्यानुसार ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, दालमिल आदी स्वयंचलित औजारांकरिता D.B.T. द्वारे आतापर्यंत एकूण 4 कोटी 13 लक्ष रूपये अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 250 ट्रॅक्टर, 275 रोटाव्हेटर, 150 ट्रॅक्टरचलित अवजारे व इतर अशी एकूण सुमारे 750 अवजारे वितरीत केली आहेत. तसेच योजनेस मिळालेला शेतकरी बांधवांच्या भरघोस प्रतिसादामुळे व मागणीमुळे अजून 10 कोटी रूपयांची वाढीव तरतूद बुलडाणा जिल्ह्याकरिता मंजूर केली आहे. राज्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 15 जिल्ह्यांतील 5142 गावांमधून राबविण्यात येत आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 441 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृतीचे काम आजपासून सुरू झाले आहे. तसेच शासनाने जुन 2017 मध्ये मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार कृषि प्रक्रिया उद्योग सुरू करणाऱ्या इच्छूकांनी 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत कृषी विभागाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन याप्रसंगी पालकमंत्री यांनी केले.
     प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात ऑनलाईन  ई ठिबक प्रणालीद्वारे 38 हजार 471 अर्ज प्राप्त झाले असून ही संख्या राज्यात सर्वात जास्त आहे. प्राप्त झालेल्या ठिबक व तुषार सिंचन प्रस्तावांची क्षेत्रीय तपासणी करण्यात आली. यामधून 9 हजार 27 लाभार्थ्यांना 6 हजार 977 हेक्टर क्षेत्रासाठी 23.19 कोटी अनुदान वितरीत करण्यात आले आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारण्याकरीता ही आज्ञावली 15 मार्च 2018 पर्यंत सुरू ठेवण्यात आली असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.    
   ते पुढे म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात सन 2016-17 मध्ये 2 हजार 482 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. तसेच 2017-18 मध्ये 1 हजार 55 लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता अदा करण्यात आला असून घरकूल निर्मिती प्रगतीपथावर आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेनुसार जिगांव मोठा प्रकल्प व अन्य 8 लघु प्रकल्पांना 6 हजार 61 कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सर्वात मोठ्या जिगांव प्रकल्पाच्या कामास गती प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 100 दलघमी पाणीसाठा आहे. पुर्ण क्षमतेने धरणे भरली नसल्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाने जून 2018 पर्यंत 18.24 कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे.
    राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत जिल्ह्यात मलकापूर, शेगांव, संग्रामपूर, जळगांव जामोद, नांदुरा व देऊळगांव राजा तालुके हगणदारीमुक्त झाली असून 587 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त ठरल्या आहेत. वैयक्तिक शौचालयांच्या निर्मितीमध्येही जिल्ह्याने भरारी घेतली आहे. जिल्ह्यात 3.53 लक्ष कुटूंबांपैकी 3.18 लक्ष कुटूंबाकडे शौचालय आहेत. जिल्ह्याने सन 2017-18 मध्ये 88 हजार 164 शौचालयांची निर्मिती करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे. जिल्ह्याची स्वच्छतेची व्याप्ती 90.6 टक्के असून मार्च 2018 पर्यंत संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प पालकमंत्री यांनी व्यक्त केला.
  कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री यांनी परेड निरीक्षण केले. बुलडाणा पुरूष व महिला पोलीस दल, होमगार्ड पुरूष व महिला दल, वन रक्षक दल, एनसीसी छात्र, राजीव गांधी सैनिकी शाळा विद्यार्थी, जिजामाता मुलींची सैनिकी शाळा विद्यार्थीनी, पोलीस बँण्ड पथक तसेच शिघ्र कृती दल आदींनी मानवंदना दिली. विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी कराटे प्रात्याक्षिक, लेझीमचे सामुहिक संचलनाचे सादरीकरण कार्यक्रमाप्रसंगी केले. कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र लांजेवार यांनी केले. पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याप्रसंगी कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ दिली. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त,  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
                                                              विविध पुरस्कारांचे वितरण व सन्मान
    उत्कृष्ट ध्वज दिन निधी संकलन केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुडंवार यांचे पालकमंत्री यांच्याहस्ते विशेष स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच 7/12 संगणकीकरणात जिल्ह्याने 100 टक्के कार्यवाही पुर्ण केली आहे. त्याबद्दल तलाठी साझा सवचे नितीन अहीर, सवना भाग 2 चे इंदू शेजोळ, वर्दळी बु चे वाय. एच गरजाळे, सरंबाचे व्हि. एन सांगळे, कळंबेश्वर दिपक सवडतकर, दाभाचे शिवशंकर खारवाल, पिं. देवी भाग 2 चे प्रियंका राठोड, महाळुंगीचे श्रीकृष्ण सोनोने, वरखेडचे डि. टी तालीमकर, तरोडाचे यु.पी बुरजे, मडाखेडचे श्रावण पुंजाजी, पारखेड भाग 2 चे नीता कडवकर, पातुर्डा के. एस कऱ्हाळे आदींचा सत्कार करण्यात आला. सहज सोप्या पद्धतीने शेतातील हरभरा शेंडा खुडणी यंत्र तयार केल्याबद्दल नंदुअप्पा बोरबळे केळवद ता. बुलडाणा यांचा गौरव करण्यात आला. तसेच स्वच्छ करंडक वर्त्कृत्व स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम आल्याबद्दल कु. प्रतीक्षा वासुदेव मिसाळ रा. शेगांव हिचा सत्कार करण्यात आला.
   बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमातंर्गत मुलींच्या जन्माचे गुणोतर प्रमाण 1000 च्या वर नेणाऱ्या ग्रामपंचायतींचा 5 हजार रूपये रोख व प्रमाणपत्राचे वाटप यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यामध्ये कोऱ्हाळा ता. मोताळा, दे.घाट ता. बुलडाणा व चांडोळ ता. बुलडाणा यांचा समावेश आहे. धोके निवारण उपक्रमामध्ये निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या कु. श्रृती विलास डुकरे वर्ग 10 वा, दे. राजा व द्वितीय क्रमांक प्राप्त ऋषिकेश मानकर वर्ग 12 शेगांव यांना बक्षीस देण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दिल्या जाणारा गुणवंत खेळाडू पुरस्कार कुलदीप भोलाने, कु. मृणाल सरकटे यांना तर क्रीडा संघटक पुरस्कार प्रा. डॉ. कैलास पवार व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार चंद्रकांत इलग यांना प्रदान करण्यात आला.
  त्याचप्रमाणे यावेळी गत 25 वर्षापासून प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन व महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे संचलन करणाऱ्या नरेंद्र लांजेवार यांचा यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागामार्फत दिपक पाटील, प्रबोधन विद्यालय जिजामाता नगर, बुलडाणा व पर्यावरण मित्र मंडळ बुलडाणा यांचा वृक्ष लागवड, पर्यावरण पुरक कामाबद्दल बक्षीस देवून गौरव करण्यात आला.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीसांचा सत्कार
नक्षलग्रस्त भागात खडतर कामगिरी केल्याबद्दल खडतर सेवा पदक पोलीस उपअधिक्षक बुलडाणा बी. बी महामुनी यांना देवून सन्मानित करण्यात आले. उपविभागीय पोलीस कार्यालय मेहकर आयएसओ केल्याबद्दल पोलीस उपअधिक्षक रामेश्वर वैजने यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस स्टेशन मेहकर व धाड आयएसओ  केल्याबद्दल अनुक्रमे पोलीस निरीक्षक श्री. प्रधान, सहायक पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये बॉस्केटबॉल क्रीडा प्रकारात मपोकॉ रूबीना शेख वाहतूक शाखा व हिना खान पिं.राजा यांना गोल्ड मेडल देण्यात आले. तसेच बॉक्सींग क्रिडा प्रकारात दिपाली देशमुख खामगांव यांना सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले. 
                                                                          विविध विभागांचे चित्ररथ
प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस कवायत मैदानावर विविध विभागांचे चित्ररथ साकारण्यात आले. त्यामध्ये बुलडाणा पोलीस दल, मतदार जागृती करणारा तहसील कार्यालय बुलडाणाचा चित्ररथ, 108 ॲम्ब्युलन्स सेवा, अग्नीशमन दल, सामाजिक वनीकरण विभागाचा हरीत चित्ररथ, हगणदारीमुक्ती नगर परिषदेचा चित्ररथ, बेटी बचाओ बेटी पढाओ चित्ररथ, सर्व शिक्षा अभियान, जिल्हा हिवताप कार्यालयाचा किटकजन्य रोग नियंत्रण चित्ररथ, सामाजिक न्याय विभाग, पशुसंवर्धन विभाग,  स्वच्छ भारत मिशन, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचा कृषि विभागाचा चित्ररथ आणि वन विभाग, एडेड हायस्कूलच्या चित्ररथाचा समावेश आहे.
                                                           
                                                                        ****

Monday 22 January 2018

0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलीओ डोस पाजावा - जिल्हाधिकारी


 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलीओ डोस पाजावा
-    जिल्हाधिकारी
·        2 लक्ष 84 हजार 540 अपेक्षीत बालके
·        2047 बुथची व्यवस्था, 130 मोबाईल टिम सज्ज
·        28 जानेवारी रोजी पोलीओ लसीकरण मोहिम
·        बालकाच्या डाव्या हाताच्या करंगळीवर मार्कर पेनची खून करण्यात येणार
बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यात दोन सत्रात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत 28 जानेवारी व 11 मार्च 2018 रोजी जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण  करण्यात येणार आहे. लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना या दिवशी पोलीओ डोस पाजण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.
  राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बेालत होते. याप्रसंगी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोफणे आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
    पोलीस लसीकरण मोहिम 28 जानेवारी 2018 रोजी राबविण्यात येत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले,  त्यासाठी जिल्ह्यात 2047 पोलीओ बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 130 मोबाईल टिम, 6 रात्रीच्या टिम सज्ज करण्यात आल्या आहे. या संपूर्ण मोहिमेसाठी 5 हजार 506 मनुषबळ कर्तव्य बजाविणार आहे. जिल्ह्यातील सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नसल्याची काळजी घेण्यात यावी.  लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात येणार असून यासाठी मोबाईल पथक, ट्रन्झिट टीम आदी सज्ज ठेवण्यात येत आहे. जेणेकरून कुणीही बालक पोलीओ डोसपासून वंचित राहणार नाही.
      जिल्ह्यात ग्रामीण भागात 2 लक्ष 27 हजार 68 बालके असून शहरी भागात 57 हजार 472 बालके आहे. अशाप्रकारे एकूण 2 लक्ष 84 हजार 540 बालके अपेक्षीत आहे. सर्व बालकांना लसीकरणाकरिता 2047 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यात आरोग्य विभागासोबत विविध विभागातून एकूण 5506 कर्मचारी सहकार्य करणार आहे. त्यासाठी 427 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  मोहिमेसाठी 3 लक्ष 57 हजार व्हॅक्सीन डोसेसजी व्यवस्थाही करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

                                                                        ******

Thursday 18 January 2018

उडीद खरेदीसाठी 20 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

उडीद खरेदीसाठी 20 जानेवारी पर्यंत मुदतवाढ
बुलडाणा,दि.18 - केंद्र शासनाचे आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत 2017-18 मधील उडीद शेतमालाची  ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 13 डिसेंबर 2017 अखेर 12 तालुका खरेदी – विक्री संघ तथा चिखली जिनिंग प्रेसिंग चिखली येथे उडीदाची ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.  अशा शेतकऱ्यांची खरेदी जवळपास पूर्णत्वास गेलेली आहे. मात्र काही शेतकऱ्यांना तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांना एसएमएस किंवा मोबाईलद्वारे संदेश मिळाला नसेल, अशा शेतकऱ्यांनी आपला उडीद शेतमाल नाफेडच्या खरेदी केंद्रावर 20 जानेवारी 2018 पूर्वी आणायचा आहे. त्यानंतर आलेल्या उडीदाची खरेदी करण्यात येणार नाही, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी ,असे आवाहन जिल्हा मार्केंटींग अधिकारी यांनी केले आहे.
00000
बुलडाणा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन   
  बुलडाणा, दि. 18 : जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच जिजामाता महाविद्यालय, चिखली रोड बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशि‍क्षीत बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 20 जानेवारी  2018  रोजी जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा येथे सकाळी 11.00 वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
            या मेळाव्या अंतर्गत किरण लाईट प्रा. लि, धाड येथील कंपनी कंपनीकरीता इलेक्ट्रीशीयन टेक्नीशीयनची  25 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता मुलाखत निवड पध्दतीव्दारे निवड करण्यात येणार आहे. वयोमर्यादा 18 ते 32 वर्ष, वेतन 6000 रूपये असणार आहे. करियर फोरम औरंगाबाद कंपनीकरीता इलेक्ट्रीशीयन, वायरमन, फिटर, मशिनीस्ट, शिटमेटल वर्कर 50 पदे, आयटीआय उत्तीर्ण असावे, मुलाखतीव्दारे निवड करण्यात येणार असुन 7500 ते 8000 रूपये वेतन, 17 ते 24 वर्ष वयोमर्यादा असावी. एसआयएस इंडिया पुणे  सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक या पदांच्या अनुक्रमे 100 आणि 50 पदांसाठी शारिरीक चाचणी व लेखी परीक्षेदवारे निवड करण्यात येणार आहे. नवभारत फल्टीलायझर, नागपूर कंपनीसाठी सेल्स रिप्रेझेन्टेटीव्ह 40 पदाकरीता  शैक्षणिक पात्रता  12 वी आवश्यक असून मुलाखतीव्दारे निवड करण्यात येणार आहे. सतिशजी इन्फ्राटेक अँण्ड मिडीया प्रा. लि चिखली कंपनीच्या वेल्डर, फिटर, हेल्पर, सुरक्षा रक्षक कंपनीच्या 35 पदांसाठी इयत्ता 10 वी व  आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी 18 ते 36 वर्ष वयोगटात 6 ते 10 हजार रूपये वेतनावर मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
    अधिक माहिती साठी सहाय्यक संचालक ,जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 07262-242342 व 9421468632 या क्रमांकावर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी सेवायोजन कार्ड, निवडणूक ओळखपत्र/आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, 5 पासपोर्ट फोटो व बायोडाटा सोबत आणावा, असे आवाहन सहाय्यक संचालक ,जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
  25 टक्के प्रवेश ऑनलाईन पद्धतीने...!
·        आरक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
·        24 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा
बुलडाणा दि.21- बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकारी अधिनियम सन 2009 नुसार 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. आरटीई अंतर्गत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाचे 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर  करण्यात आले आहे. कायद्यानुसार दुर्बल वंचित घटकातील बालकांना विना अनुदानीत व कायम विना अनुदानीत शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. हे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
       शिक्षण विभागाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार 20 जानेवारी 2018 पर्यंत शाळांना प्रवेश प्रक्रियेत सहभागासाठी नोंदणी करावी लागणार आहे. शाळेत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश पात्र असणाऱ्या शाळांनी प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य आहे. शाळेनेच प्रवेश स्तर ठरवायचा आहे. ज्या शाळा नोंदणी करणार नाही, त्यांच्यावर नियमानुसार कार्यवही करण्यात येणार आहे.  शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर 24 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2018 या कालावधीत पालकांनी rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावयाचा आहे. आलेल्या अर्जानुसार 14 व 15 फेब्रुवारी 2018 रोजी प्रवेशाची पहिली लॉटरी काढण्यात येणार आहे.
        त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रवेशाची लॉटरी काढली जाणार आहे. या प्रक्रियेत एकूण 6 वेळा लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केले जाणार आहे. लॉटरीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश 16 फेब्रुवारी ते 9 मार्च 2018 दरम्यान शाळेत जाऊन निश्चित करावा. दुसरी लॉटरी 7 व 8 मार्च, या लॉटरीमध्ये प्रवेश मिळालेल्या पालकांना पाल्यांचे निश्चित प्रवेश 9 ते 21 मार्च 2018 दरम्यान करावे लागणार आहे. तिसरी लॉटरी 26 व 27 मार्च, शाळेत प्रवेश निश्चित करणे 28 मार्च ते 7 एप्रिल 2018, रिक्त जागा जाहीर करणे 9 व 10 एप्रिल दरम्यान कराव्या लागतील. तिसऱ्या लॉटरीनंतर प्रवेशाची मुदत संपल्यावर कार्यशाळा घेऊन प्रवेशाची पात्र शाळांमधील रिक्त पदांची संख्या 9 व 10 एप्रिल 2018 रोजी ऑनलाईन जाहीर करावी लागणार आहे.   त्यानंतर आवश्यकता असल्यास पुढील लॉटरीचे आयोजन तिसऱ्या लॉटरी पद्धतीने करावे लागणार आहे.
   ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने सॉफ्टवेअर विकसित केले असून   rte25admission. maharashtra. gov.in असा त्याचा पत्ता आहे. सर्व ऑनलाईन प्रक्रियेची माहिती यावर उपलब्ध आहे. ही माहिती ऑनलाईन पद्धतीने मुख्याध्यापक यांनी शाळा स्तरावर भरावयाची आहे. ही माहिती केंद्रप्रमुख व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी पडताळणी करणे अनिवार्य आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी कळविले आहे.
*********
नोंदणीकृत मच्छीमारांची माहिती द्यावी
बुलडाणा दि 18- जिल्ह्यातील नोंदणीकृत सर्व मच्छिमार सहकारी संस्थांनी नोंदणीकृत सभासदांना, अपघात गट विमा योजनेतंर्गत मच्छिमारांना विमा संरक्षण व नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यांच्या वारसांना विमा रक्कम देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी फिशकोपफेड, नवी दिल्ली यांनी नोंदणीकृत मच्छिमारांची माहिती मागितली आहे. सदर माहिती सादर न केल्यास शासनाच्या येाजनेचा लाभ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मिळू शकणार नाही.तरी नोंदणीकृत मच्छिमार सहकारी संस्थेमधील मच्छिमारांनी 31 जानेवारी 2018 पर्यंत सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, पहिला माळा, बस स्टँण्ड समोर, बुलडाणा या कार्यालयात स्वहस्ते सादर करावी.
  या माहितीमध्ये मच्छिमार सभासदाचे नाव व पत्ता, आधार कार्ड क्रमांक, जन्म दिनांक, बँकेचे खाते क्रमांक, आयएफएससी कोड क्रमांक, बँकेचे नाव व पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, वारसाचे नाव व स्त्री/पुरूष असल्याबाबतची माहितीचा समावेश आहे. ही माहिती इंग्रजी/ मराठी प्रपत्रात भरून उपरोक्त कार्यालयाकडे सादर करावी, असे आवाहन सहायक आयुक्त स इ नायकवडी यांनी केले आहे.
                                                                        *****
ध्वज दिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन
बुलडाणा दि 18- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व सन 2016 चे उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलनाप्रित्यर्थ प्रशस्तीपत्र आणि प्रोत्साहनपर बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन सैनिकी मंगल कार्यालय, बुलडाणा येथे 23 जानेवारी 2018 रोजी 12 वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्यास माजी सैनिक, युद्ध विधवा, वीर पिता व अवलंबित यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार असून अध्यक्षस्थानी जिल्हाधिकार डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तर प्रमुख उपस्थितीत संचालक कर्नल सुहास जतकर असणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व युद्ध विधवा, माजी सैनिक, वीर माता, वीर पिता व अवलंबित यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

एस टी महामंडळाच्या विना अपघात सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ
·        17 फेब्रुवारी 2018 पर्यंत चालणार मोहिम
बुलडाणा दि 18- रस्ते वाहतुकीमध्ये सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे प्रवाशांची सुरक्षित सेवा करणारे महामंडळ आहे. महामंडळाचा हा दावा प्रबळ करण्यासाठी विना अपघात सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ महामंडळाच्यावतीने करण्यात आला आहे. ही मोहिम 17 फेब्रुवारी 2018 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
  या मोहिमेदरम्यान प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृद्धींगत करणे, रा.प कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाळण्यावर भर देणे व रा.प वाहनांना अपघात होणार नाहीत, यासाठी सदैव योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. ही मोहिम आगार पातळीवर राबवियात येत आहे. चालकांसाठी मान्यवरांची उद्बोधनपर भाषणे, सभा घेणे, बॅनर, फलक, पोस्टर्स व स्टीकर्स दर्शनी भागात लावणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. तर प्रवाशांनी या मोहिमेस सहकार्य करून अपघातांवर नियंत्रण मिळवावे, असे आवाहन एस टी महामंडळाने केले आहे.
****

प्रगतीमधील कामे पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता

* ७.२६ कोटी रुपयांचा निधी सा. बां खामगाव यांच्याकडे वर्ग

बुलडाणा, दि. 18 :  सन २०१५-१६ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना रस्ते विकास व मजबुतीकरणाची १६.४४ कोटीची ६६ कामे मंजूर झाली. या कामांवर मार्च २०१७ अखेर ९.६० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. सद्यस्थितीत हि सर्व कामे प्रगतीपथावर असून ७.२६ कोटी एवढ्या निधीची आवश्यकता  आहे. सदर कार्यालयाच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ७.२६ कोटी एवढ्या दायित्वाची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभाग खामगावला उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे वृत्त दिशाभूल करणारे आहे.
  त्याचप्रमाणे यामध्ये पालकमंत्री यांचा निधी वळती करण्याबाबत हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदर निधी हा जुनी प्रगतीत असलेली कामे पूर्ण करण्याकरिता आवश्यक निधी आहे, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांनी केला आहे.
********
मतदार दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
बुलडाणा, दि‍.18 -  राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2017 निमित्त  मतदार दिवस जागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र 25 जानेवारी 2018 रोजी आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
  स्पर्धेचा विषय मतदारांची जागरूकता आणि लोकशाहीचे भवितव्य असून वय 15 ते 23 वर्ष आवश्यक आहे. स्पर्धेसाठी 20 जानेवारी 2018 रोजी सायं 5 वाजेपर्यंत नेहरू युवा केंद्र, बुलडाणा या पत्त्यावर निबंध पाठवायचे आहे. निबंधाची शब्दमर्यादा 1000 असून पानाच्या एकाच बाजूने निबंध लिहावा. निबंधावर नाव लिहू नये, विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज निबंधासोबत जोडावा, या स्पर्धेसंदर्भात परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेवून निबंध पाठवावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.

******

Monday 8 January 2018

सन 2018-19 साठी 347 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा मंजूर - पालकमंत्री


सन 2018-19 साठी 347 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा मंजूर
पालकमंत्री
* सर्वसाधारण योजनेसाठी 199.32 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 123.51 कोटी
* आदिवासी उप योजनेसाठी 24.09 कोटी रूपये
* अवैध दारू विक्री विरोधात महसूल, उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाने कार्यवाही करावी
* बोंड अळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 7/12 वर कापूस पिकाची नोंद असल्याससुद्धा मदत मिळणार
* सोयाबीन अनुदानाचे त्रुटीतील प्रस्ताव पुन्हा सादर करावे
 बुलडाणा, दि‍.8 -  सन 2018-19 करिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय मर्यादेत 347 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजनेचा 199.32, अनुसूचित जाती उपयोजनेचा 123.51 व आदिवासी उपयोजनेसाठी 24.09 कोटी रूपयांचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीच्या प्रारूप आराखड्याला शासनाकडून कपात न लागण्यासाठी प्रयत्न केल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे सन 2017-18 वर्षाच्या पुनर्विनीयोजन प्रस्तावालाही मान्यता देण्यात येत आहे. समितीने प्रस्तावित केलेल्या आराखड्यामधून विकासाची व जनकल्याणाची कामे मोठ्या प्रमाणावर व्हावीत, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केली.
   जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे,  जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस षण्मुखराज, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुळकर्णी, अति. पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, राहूल बोंद्रे, डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशीकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, आकाश फुंडकर आदींसह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
     बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करणार असल्याचे सांगत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, बोंडअळी आल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक भागात कापूस पिक वखरले. त्यामध्ये दुसरे पीक घेतले. अशा परिस्थितीत पंचनामा होवू शकत नाही. त्यामुळे या हंगामाच्या 7/12 वर कापूस पिक पेरल्याची नोंद असल्यास त्या क्षेत्रासाठी मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणासाठी कामे मोठ्या संख्येने सुरू आहेत. ही कामे घेणाऱ्या कंत्राटदारांकडून जवळील गावांमध्ये गाव तलाव, शेत तलाव आदींची कामे करून घ्यावीत. तसेच ज्या पाझर तलावांच्या कामांसाठी भूसंपादनाची गरत नाही. ई-क्लास जमिनीवर प्रकल्प होवू शकतात, अशा प्रकल्पांची कामे हाती घ्यावीत.
    अवैध दारू विक्री विरोधात पोलीस, महसूल व उत्पादन शुल्क विभागांनी संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना देत श्री. फुंडकर म्हणाले, या तिनही विभागांची संयुक्त बैठक घ्यावी आणि अवैध दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी छापेमारी करून संबंधीतांवर कारवाई करावी.  रेती घाटांवर अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात यावी. रेती घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येवून गावपातळीवरील तलाठी, पोलीस कर्मचारी व गावातील नागरिकांचे पथक स्थापन करावे. त्याद्वारे अवैध रेती उत्खनन, कंत्राटदाराकडून पावतीपेक्षा जास्त रेतीचे उत्खनन व विक्री यांवर आळा घालावा. कुठल्याही रेती घाटावर मशीनद्वारे रेती उत्खनन करण्यात येवू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
    ते पुढे म्हणाले, सोयाबीन शेतमालावर प्रति क्विंटल 200 रूपये अनुदान शासनाने जाहीर केले. त्यानुसार बाजार समित्यांकडून अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू आहे. मात्र जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्रुट्या असल्याने नामंजूर करण्यात आले. परिणामी शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत आहे. तरी संबंधित विभागाने त्रुट्यांमध्ये नामंजूर प्रस्तावांना पुन्हा शेतकऱ्यांना संधी देवून ते सादर करण्याचे आवाहन करावे. चिखली-खामगांव रस्त्याच्या कामामध्ये शेतकऱ्यांची जमिन संपादीत केली असल्यास त्यांना त्वरित मोबदला देण्यात यावा. जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे देण्यात येत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम स्थगित करावे.
        खासदार प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील उघड्यावरील मांस विक्री बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कार्यवाही करावी. अवैध मांस विक्री होत असलेल्या ठिकाणांचा आढावा घेवून स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेवून कारवाई करावी. मागील काळात झालेल्या गापीटीचा पंचनामा न झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. पंचनामा न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
    यावेळी लोकप्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या. या समस्यांवर पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेकडून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुळकर्णी यांनी सादरीकरण केले.बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विभागप्रमुख, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

Wednesday 3 January 2018

सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

     बुलडाणा, दि.3 :  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त आज 3 जानेवारी 2018 रोजी अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार श्री. शेळके आदी उपस्थित होते.
*********
सेवानिवृत्ती वेतन धारकांनी बचतीचा तपशील सादर करावा
  • जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

     बुलडाणा, दि.3 :  निवृत्ती वेतन धारक/ कुटूंब निवृत्ती वेतन धारक वित्तीय वर्ष 2017-18 मध्ये आयकरास पात्र असल्यास त्यांनी केलेल्या बचतीचा तपशील, अपंग प्रमाणपत्र, पॅन कार्ड आदींचा तपशील सादर करावा. तसेच आयकराचा भरणा केला असल्यास गणना पत्रक, चलन आदींसह संपूर्ण तपशील 15 जानेवारी 2018 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावा.  जेणेकरून आयकरास पात्र असलेले निवृत्ती वेतन धारक / कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांचे निवृत्ती वेतन आहरीत करून अदा करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. तरी त्वरित तपशील सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावीस्कर यांनी केले आहे.
                                                                        *****
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर
  • जानेवारी ते जून 2018 दरम्यानचा कार्यक्रम
     बुलडाणा दि. 3 - माहे जानेवारी ते जून 2018 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत.
    शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जानेवारी 2018 मध्ये : जळगाव जामोद 4 जानेवारी, शेगाव 6, मेहकर 17, खामगांव 10 व 24, चिखली 12 , नांदुरा 19 , मलकापूर 22, सिंदखेड राजा 25, लोणार 8 व देऊळगाव राजा येथे 15 जानेवारी 2017 रोजी होणार आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये : जळगाव जामोद 2 फेब्रुवारी, शेगाव 5, मेहकर 16, खामगांव 9 व 23, चिखली 12, नांदुरा 20, मलकापूर 22, सिंदखेड राजा 26, लोणार 7 व देऊळगाव राजा 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मार्च 2018 मध्ये :  जळगाव जामोद 5 मार्च, शेगाव 7, मेहकर 19, खामगांव 12 व 26, चिखली 14, नांदुरा 21, मलकापूर 23, सिंदखेड राजा 28, लोणार 9 व देऊळगाव राजा 16 मार्च रोजी होणार आहे. एप्रिल 2018 : जळगाव जामोद 4 एप्रिल, शेगाव 6, मेहकर 19, खामगांव 11 व 27, चिखली 13, नांदुरा 20, मलकापूर 23, सिंदखेड राजा 25, लोणार 9 व देऊळगाव राजा 16 एप्रिल रोजी होणार आहे. मे 2018 : जळगाव जामोद 4 मे, शेगाव 7, मेहकर 18, खामगांव 11 व 28, चिखली 14, नांदुरा 21, मलकापूर 23, सिंदखेड राजा 25, लोणार 9 व देऊळगाव राजा 16 मे रोजी होणार आहे. जून 2018 : जळगाव जामोद 4 जून, शेगाव 6, मेहकर 19, खामगांव 11 व 28, चिखली 13, नांदुरा 21, मलकापूर 25, सिंदखेड राजा 27, लोणार 8 व देऊळगाव राजा 15 जून रोजी होणार आहे. याबाबत नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
                                                                        **********

                           जिल्हा परिषदेच्या नस्त्यांची विनाकारण अडवणूक नाही
  • जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाचा खुलासा
     बुलडाणा दि. 3 वित्त विभागाकडे जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील नस्त्या वित्तीय अभिप्रायाकरीता व देयके प्रदानाकरीता येत असतात. सदर नस्त्या व देयकांचा नियमानुसार, विहीत कालावधीत निपटारा करण्यात येतो. या नस्त्या व देयके विनाकारण अडविण्यात येत नसून त्रुटीयुक्त नस्त्या व देयके नियमानुसार लेखी अभिप्राय देवून त्रुटी पुर्ततेकरीता संबंधित विभागास परत करण्यात येतात. सदर नस्ती किंवा देयकांचा पाठपुरावा करीत असतांना संबधीत व्यक्ती भेटावयास आला असता त्यांना कोणत्याही प्रकारची ॲट्रासिटी दाखल करणे बाबतची धमकी देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रकाशित वृत्तामध्ये तथ्य नसून जिल्हा परिषदेचा वित्त विभाग हा शासन नियमानुसार वित्तीय नियमावलीने काम करीत आहे, असा खुलासा मुख्य वित्त व लेखा अधिकारी, जि.प, बुलडाणा यांनी केला आहे.
                                                                        ********
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल
बुलडाणा दि‍.3 -  राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यामुळे दि 12.1.2018 रोजी मेहकर- जालना मार्गावरील सिंदखेड राजा मार्गे होणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल 11 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 12 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
  सध्याचा प्रचलीत मार्ग असलेल्या मालेगांव-मेहकर-सुलतानपूर- सिंदखेड राजा- न्हावा- जालना आणि जालना-न्हावा-सिंदखेडराजा-सुलतानपूर-मेहकर-मालेगांव असा आहे. या मार्गात 12 जानेवारी रोजी बदल करण्यात येत असून हा मार्ग मालेगांव-मेहकर-चिखली-दे.राजा- जालना व परतीचा जालना-दे.राजा-चिखली-मेहकर-मालेगांव असा करण्यात आला आहे. या वाहतूक बदलातून सर्व शासकीय वाहने, रूग्णवाहिका, शववाहिनी, अग्नीशमन दलाची वाहने व जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने यांना वगळण्यात आले आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कळविले आहे.
                                                            *********
      निवृत्ती वेतन धारकांच्या मेळाव्याचे 6 जानेवारी रोजी आयोजन
बुलडाणा दि‍.3 -  राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक / कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांच्या अडी – अडचणी सोडविण्यासाठी तसेच अन्य लाभ देण्याकरीता 6 जानेवारी 2018 रोजी दुपारी 12 वाजता नगर परिषद शाळा क्रं 2, बुलडाणा येथे त्रैमासिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळावा जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे.  निवृत्ती वेतनाबाबत काही अडचणी असल्यास लेखी स्वरूपात सोबत आणाव्यात, त्यामध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक व निवृत्ती वेतन प्रदान आदेश क्रमांक असणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावीस्कर यांनी केले आहे.
                                                                                    *******
राज्य परिवहन महामंडळात समुपदेशक पदासाठी अर्ज आमंत्रित
बुलडाणा दि‍.3 -  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सर्व विभागांमध्ये मानद तत्वावर समुपदेशक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याविषयी अधिक माहिती महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसशास्त्र या विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी, तसेच समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका आवश्यक आहे. समुपदेशन क्षेत्रातील किमान दोन वर्षांचा अनुभव पाहिजे.
  ही नेमणूक निव्वळ मानद तत्त्वावर असून नेमणूकीचा कालावधी एक वर्षाचा राहणार आहे. आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कालावधी विचारात घेवून संबंधित विभागामार्फत वाढविण्यात येईल. ही नियुक्ती मानद तत्वावर असल्यामुळे रा.प महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे, सामावून घेण्याचे अथवा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार, हक्क अर्जदारास किंवा समुपदेशकास नसतील.  तसेच सक्षम प्राधिकारी, नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. रा.प महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल. त्यासाठी मासिक मानधन 4 हजार  रूपये देण्यात येईल. समुपदेशकाला समुपदेशनाद्वारे रा.प कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून अडी अडचणी समजावून घेणे, वैयक्तिक पातळीवर निराकारण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निदर्शनास आणून देणे. तसेच आगारास महिन्यातून किमान 3 वेळा भेटी देणे आदी कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.
   उमेदवाराने अर्ज टंकलिखीत करून स्वत:चा फोटो त्यावर चिटकवावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र, अनुभवाचा दाखला जोडण्यात यावे. सदर अर्ज ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छूक असाल, त्या विभागातील रा.प महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय यांचेकडे 17 जानेवारी 2018 पर्यंत पाठवावे, असे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.
                                                                        *****
जिल्ह्यातील उद्योजकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे 5 जानेवारी रोजी आयोजन
बुलडाणा दि‍.3 -  जिल्ह्यातील उद्योजकांसाठी सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय आणि जिल्हा उद्योग केंद्र, बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन खामगांव येथील हॉटेल प्रेम रेसिडेन्सीमध्ये 5 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. या कार्यशाळेत उद्योग, कर्ज, पुरस्कार आदींची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेचा उद्योजकांसाठी लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.

                                                                        ******