Tuesday 28 February 2023

DIO BULDANA NEWS 28.02.2023

 


सामाजिक न्यायच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

*योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहोचणार

बुलडाणा, दि. 28 : सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी सामाजिक न्याय भवन येथे हिरवी झेंडी दाखविली. येत्या महिन्यात हा चित्ररथ सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्हाभरात प्रसिद्धी करणार आहे.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रदिप धर्माधिकारी, समाज कल्याण निरीक्षक प्रमोद खांदवे आदी उपस्थित होते.

विशेष घटक योजनेतून या चित्ररथाची संकल्पना साकारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे, विविध शिष्यवृती योजना, आंतरजातीलय विवाह प्रोत्साहन, शासकीय पुनर्वसन योजना, राजर्षि शाहू गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य योजना, कर्मवीर दादासाहेब पाटील सबळीकरण योजना, कन्यादान योजना, स्वाधार योजना आदी योजनांची माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात फिरणार आहे. चित्ररथामध्ये असणाऱ्या एलईडी दृकश्राव्य माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोविण्यासाठी चित्ररथ प्रयत्न करणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

000000




विशेष घटक योजनेतून चांगल्या पायाभूत सुविधा उभाराव्यात

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 28 : मागासवर्गीयांच्या विकासासाठी विशेष घटक योजनेतून जिल्ह्याला चांगला निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, तसेच हा निधी खर्च होण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी विशेष घटक योजनेतून निधी मिळविणाऱ्या यंत्रणांना दोन वर्षात निधी खर्च करण्याचा कालावधी दिला आहे.  मात्र दोन वर्षाचा अवधी न पाहता निधी याच आर्थिक वर्षात खर्च करण्याचा प्रयत्न करावा. नगर प्रशासन विभागातर्फे या योजनेतून एकही प्रस्ताव सादर केला नाही. येत्या आठ दिवसात प्रस्ताव सादर करून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी घेण्यात याव्यात. नगर प्रशासनातर्फे निधी मागणी प्रस्ताव सादर केले नसल्यास हा निधी इतर विभागांना देण्यात येईल. नाविन्यपूर्ण योजनांमधून विकास कामे करताना ती चांगल्या दर्जाची व्हावीत, कामे करताना संपूर्ण निधी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले.

          यावेळी कृषि विभाग, जिल्हा परिषद, उपनिबंधक, सहकारी संस्था, महावितरण, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महिला व बालविकास, जिल्हा माहिती कार्यालय आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.

00000







देऊळगाव मही ग्राम क्रीडा संकुलाच्या कामास सुरूवात

बुलडाणा, दि. 28 : देऊळगाव राजा तालुका क्रीडा संकुलांतर्गत देऊळगाव मही ग्राम क्रीडा संकुलाच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यात मैदान सपाटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते रविवार, दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडले.

भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी देऊळगांव मही ग्रामच्या सरपंच वंदना शिंगणे, तहसीलदार शाम धनमणे उपस्थित होते. आमदार डॉ. शिंगणे यांच्या प्रयत्नातून ग्राम क्रीडा संकुलासाठी देऊळगाव मही येथील 2 हेक्टर जागा क्रीडा सुविधा उभारणीकरीता प्राप्त झाली आहे. त्यानुसार ग्राम क्रीडा संकुल मैदानाच्या क्रीडाविषयक विकास करावयाचे दृष्टीने सन 2022-23 या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मैदानाच्या सपाटीकरणासाठी 7 लाख रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

येत्या काळात विविध क्रीडा विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. क्रीडांगणावर 200 मीटर, 400 मीटर धाव मार्ग, क्रीडांगणाभोवती भिंत, तारेचे कंपाऊंड,  क्रीडांगणावर विविध खेळांचे मैदान, क्रीडांगणावर प्रसाधनगृह, क्रीडांगणावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, क्रीडांगणावर भांडारगृह, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा, क्रीडा साहित्य, क्रीडांगणावर माती, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था, प्रेक्षक गॅलरीवर, आसन व्यवस्थेवर शेड, क्रीडांगण भोवती ड्रेनेज व्यवस्था, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा, मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर, आदी क्रीडा विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तर स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकेल.

000000

जिल्ह्यात ३.५४ लाख आयुष्मान ई कार्ड

*पाच लाखांपर्यंत मोफत उपचार

बुलडाणा, दि. 28 : आयुष्मान भारत योजनेंतर्गत मोफत वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील ३.५४ लाख लाभार्थीनी ई-कार्ड काढले आहेत. यात अजून ४ लाख ३९ हजार ७१८ लाख लाभार्थ्यांचे ई-कार्ड काढण्यात येणार आहे.

आयुष्मान भारत योजनेत गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, याकरिता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रितरित्या आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. यात वर्षाला एक लाखापर्यंत उत्पन्न असल्यास १ हजार २०९ आजारांवर पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्वेक्षणातून जिल्ह्यातील लाभार्थ्याची जनआरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी ७ लाख ४५ हजार १९१ लाभार्थी पात्र ठरले आहेत.

आजपर्यंत ३ लाख ४५ हजार ७३ लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचे ई-कार्ड, गोल्डन कार्ड काढले आहे. जिल्ह्यातील २ हजार ९ सीएससी केंद्र आणि ८०० आपले सरकार सेवा केंद्रांतून हे ई-कार्ड, गोल्डन कार्ड काढण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. सर्व कुटुंबाला शिधापत्रिकेवरून निवडक गंभीर १ हजार २०९ आजारांवर शस्त्रक्रिया उपचाराची सुविधा नोंदणीकृत खासगी आणि सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत एक लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लाभार्थीला पाच लाख रुपयांचे विमा कवच आहे.

ई-कार्ड काढण्यासाठी आयुष्मान भारत पत्र, रेशन कार्ड आणि आधारकार्ड ही कागदपत्रे घेऊन सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे लागणार आहे. स्वतःच्या मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला दिल्यानंतर ई-कार्ड त्वरित तयार होते. गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना रेशन कार्डनुसार आयुष्मान ई-कार्ड काढता येणार आहे.

योजनेतून जिल्ह्यात २५ रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. यात ५ शासकीय, तर २० खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत ई-कार्ड, गोल्डन कार्ड काढावे. लाभार्थ्यांनी आपले सरकार केंद्र किंवा सीएससी सेंटरवरूनदेखील ई-कार्ड मोफत काढता येणार असल्याचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी कळविले आहे.

00000

शुक्रवारी माजी सैनिक आरोग्य योजनेबाबत बैठक

बुलडाणा, दि. 28 : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेबाबत असणाऱ्या समस्यांबाबत शुक्रवार, दि. 3 मार्च 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी माजी सैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेतील समस्यांचे निवारणासाठी उत्तर महाराष्ट्र नागपूर सब एरियाचे कर्नल विकास वर्मा शुक्रवारी सकाळी ११ वाजता सैनिकी सभा मंडपात आढावा बैठक घेणार आहेत.

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युद्ध विधवा, विरमाता, पिता, अवलंबित, जिल्हा सैनिक मंडळ व जिल्हा पोलीस संरक्षण समिती सदस्य, विविध माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तथा पदधिकारी, शासकीय पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आणि पदधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रुपाली सरोदे यांनी केले आहे.

00000

Monday 27 February 2023

DIO BULDANA NEWS 27.02.2023

 


जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदी रुपाली सरोदे यांची नियुक्ती

*माजी सैनिक संघटनेतर्फे सत्कार

बुलडाणा, दि. 27 : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदी स्कॉड्रन लीडर (सेवानिवृत्त) रुपाली पांडुरंग सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती सरोदे ह्या माजी सैनिक पांडुरंग सरोदे यांची मुलगी आहे. यानिमित्त शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्रीमती सरोदे यांनी जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, वीर पत्नी आणि वीर मातांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, संजय गायकवाड, अर्जुन गाडेकर यांच्यासह अशोक शेळके उपस्थित होते शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे ज्ञानेश्वर ठेंग, केशव सोनुने, रमेश जोहरे, गजानन मोतेकर, उज्ज्वला कुलकर्णी, हरीदास थोलबरे, सांडू भगत, जी. व्ही. बढे, सुरेश खडके, आर. जे.  जाधव, उत्तम रिंढे, गजानन पांगारकर, अनिरुद्ध खानझोडे, जयंत शेलेकर, मुरलीधर सुसर आदी उपस्थित होते.

00000

Friday 24 February 2023

DIO BULDANA NEWS 24.02.2023


जळगाव जामोद येथील रोजगार मेळाव्यात

१२ उमेदवारांना मेळाव्यातच ऑफर लेटर
बुलडाणा, दि. २४ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा मॉडेल करिअर सेंटर आणि जळगाव जामोद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आज दि. 24 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद येथे रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. यात १२ उमेदवारांना मेळाव्यातच ऑफर लेटर देण्यात आले. 
सदर मेळाव्यासाठी 1 हजार 959 उमेदवारांनी नोंदणी केली. यातील 856 उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली. सदर मेळाव्यात 635 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. 
आमदार डॉ. संजय कुटे यांनी दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. महाले, श्री. काळे, श्री. भावले, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, स्वीय सहाय्यक वसंत पालवे उपस्थित होते.
आमदार डॉ. कुटे यांनी, कौशल्य, मेहनत करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. युवकांनी सुरवातीला कमी पगारापासून सुरुवात करून प्रगती करावी आणि आयुष्यात सन्मानाचे स्थान मिळवावे. कोणतेही काम लहान नसून आपला आत्मसन्मान हा सगळ्यात मोठा आहे. आयुष्यात शून्यातून विश्व निर्माण करता येऊ शकते. कोणतीही लाज न बाळगता
काम केल्यास त्यामधून यश प्राप्ती होते. अनुभवातून आलेले कौशल्य उपयोगात आणून त्याचा आपल्या जीवनात फायदा करून घ्यावा, असे आवाहन केले.
श्री. पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती देवून युवकांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडावा असे आवाहन केले. श्रीमती बारस्कर यांनी प्रास्ताविकातून मेळाव्यासाठी १८ उद्योगानी सहभाग नोंदवून एक हजारावर पदे अधिसूचित केली असल्याची माहिती दिली. प्राचार्य श्री. महाले यांनी आभार मानले.
मेळाव्यासाठी कौशल्य विकास कार्यालय, जळगाव जामोद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
00000



केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे

पांडुरंग फुंडकरांना अभिवादन

बुलडाणा, दि. 24 : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी खामगाव येथील स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.

श्री. गडकरी यांचे खामगाव येथील सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन झाले. याठिकाणी असलेल्या स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या समाधीस्थळी त्यांनी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी स्वागत बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संजोजक डॉ राजेंद्र फडके, आमदार अॅड. आकाश फुंडकर, विजयराज शिंदे, खविसचे अध्यक्ष शिवशंकर लोखंडकार, महेंद्र रोहनकार, डॉ. गोपाल गव्हाळे, उपविभागीय अधिकारी अतुल पतोळे आदी उपस्थित होते.

त्यानंतर श्री. गडकरी यांनी सतीश जळगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर नांदेडकडे प्रयाण केले.

000000

मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी सोमवारी निवड

बुलडाणा, दि. 24 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम अमरावती येथे घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी सोमवार, दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी 12 वाजता चिखली रोडवरील सैनिकी वसतिगृहात निवड करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत उद्योग संचालनालयातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, नवउद्योजकांसाठी मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम दि. 28 फेब्रुवारी ते 17 मार्च 2023 या कालावधीत अमरावती येथे करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा परिचय कार्यक्रम आणि लाभार्थींची निवड करण्यासाठी उद्योजकता परिचय कार्यक्रम आणि प्रत्यक्ष मुलाखतीची आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले आहे.

00000

Thursday 23 February 2023

DIO BULDANA NEWS 23.02.2023

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा

बुलडाणा, दि. 23 : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवार, दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौऱ्यानुसार, श्री. गडकरी यांचे सकाळी 8.40 वाजता खामगाव येथील सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन होईल. त्यानंतर ते सकाळी 9.15 वाजता सतीश जळगावकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. भेटीनंतर सकाळी 9.45 वाजता सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवरून नांदेडकडे प्रयाण करतील.

000000



जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 23 : जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

तहसीलदार श्यामला खोत यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिला पाल, नाझर संजय वानखडे, गजानन मोतेकर आदी उपस्थित होते. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000

Wednesday 22 February 2023

DIO BULDANA NEWS 22.02.2023

 मार्चमध्ये डाक पेंशन अदालतीचे आयोजन

बुलडाणा, दि. 22 : टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी 52वी पेंशन अदालत दि. 16 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथील मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल येथे आयोजित केली आहे.

निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, टपाल विभागातून निवृत्त झालेले, सेवेत असताना मुत्यू झाले आहे, टपाल विभागात महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृतीवेतनधारकांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही, अशा प्रकरणाचा डाक पेंशन अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे.

पेंशन अदालतीमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्दांसह प्रकरणे, वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन टीबीओपी, एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डीपीसीच्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणाचा विचार केला जाणार नाही. निवृत्तीवेतनधारकांनी दिलेल्या पत्रामध्ये आपल्या अर्जाचे तीन प्रती लेखा अधिकारी, सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुबई 400 001 येथे पाठवावेत, असे आवाहन डाक अधिक्षक यांनी केले आहे.  

000000




सोनोग्राफी, एमटीपी केंद्रचालकांना कार्यशाळेत मार्गदर्शन

बुलडाणा, दि. 22 : पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी आणि एमटीपी केंद्र चालकांसाठी मंगळवार, दि. 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा स्त्री व बाल रुग्णालयात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यात कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुशील चव्हाण अध्यक्षस्थानी होते. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन वासेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मीन चौधरी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल बांगर, रेडिओलॉजिस्ट डॉ. संजय बोथरा, डॉ. डी. डी कुळकर्णी, डॉ. अर्चना वानेरे, अॅड. सुभाष विणकर उपस्थित होते.

ॲड. सुभाष विणकर यांनी पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती दिली. डॉ. संजय बोथरा यांनी सोनोग्राफी, एमटीपी सेंटरधारकांनी अवैध कार्य करू नये असे सांगितले. डॉ. डी. डी. कुळकर्णी आणि डॉ. अर्चना वानेरे यांनी एमटीपीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुशील चव्हाण यांनी पीसीपीएनडीटी कार्यक्रमाची माहिती दिली. सोनोग्राफी, एमटीपी सेंटरधारकांना कायदेशीर अडचणी आल्यास प्रशासनाकडून योग्य सहकार्य देण्यात येईल, असे सांगितले. तसेच शासनाच्या खबऱ्या बक्षीस योजना, टोल फ्री क्रमांकाबाबत माहिती देऊन जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

जिल्हा रुग्णालयाच्या विधी समुपदेशक ॲड. वंदना तायडे यांनी प्रास्ताविक केले. सुनिल जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेसाठी रुग्णालयातील पीसीपीएनडीटी विभागातील के. पी. भोंडे, विवेक जोशी यांनी पुढाकार घेतला.

0000000

नवउद्योजकांनी स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घ्यावा

*समाज कल्याण विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांसाठी केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत धनगर समाजाच्या महिलांसाठी स्टँड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक, तसेच धनगर समाजाच्या महिलांसाठी उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र, बॅंकेचे कर्ज मंजूरीची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. सदर योजनेतील सवलतीस पात्र नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरण केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्‍ड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. 

पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास दि. 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

Tuesday 21 February 2023

DIO BULDANA NEWS 21.02.2023

 जळगाव जामोद येथे शुक्रवारी रोजगार मेळावा

* उमेदवारांना 1000 जागांवर नोकरीची संधी

बुलडाणा, दि. 21 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जळगाव जामोद येथे शुक्रवार, दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. हा मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव जामोद येथे घेण्यात येईल. या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये 16 पेक्षा अधिक उद्योजकांनी 1 हजारपेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात इंडोरामा, महिंद्रा, हिताची यासारख्या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करतील. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एल ॲण्ड टी, रेमंड, इंड्युरंस सारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांनी जळगाव जामोद येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.

 पात्र, गरजू आणि नोकरी इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करु शकतील. मुलाखतस्थळी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहून नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपनींच्या प्रतिनिधीसमवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. याबाबत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे कळविले आहे.

0000

क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न

बुलडाणा, दि. 21 : जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या अध्यक्षेखाली सोमवार, दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडली. या बैठकीत समितीच्या विविध कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्ताचे वाचन करून त्यास मान्यता देण्यात आली. तसेच सभेमध्ये सहा विषयावर चर्चा होऊन ठराव पारीत करण्यात आले.

यात जिजामाता क्रीडा आणि व्यापारी संकुलातील पहिला मजल्यावरील व्यापारी गाळा क्रमांक 42, 43 आणि तळ मजल्यावरील 44, 45 गाळे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी भाड्याने देण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा क्रीडा संकुल आणि जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथील क्रीडा सुविधांचे शासकीय यंत्रणांकडे असलेले थकीत भाडे प्राप्त करुन घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या कार्यालयासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मानधनावरील पदांच्या सेवा, सहकार कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थेमार्फत उपलब्ध करुन घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या मालकीचे मिनी रोलर, वापराबाबत नियमावली, तसेच प्रतिदिन दोन हजार रुपये भाडे घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

00000

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना

*अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

बुलडाणा, दि. 21 : वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्वयंम याजनेचा लाभ देण्यात येणार आहे. याठी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये बारावी आणि त्यानंतरच्या मान्यताप्राप्त जिल्हास्तरावरील तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण घेतलेल्या परंतू शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न थेट बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.

या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी हा धनगर समाजातील असावा, विद्यार्थ्यांने अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रूपयांपेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांने स्वत:चे आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसणे आवश्यक आहे.

तसेच बारावीमध्ये 60 टक्के गुण असणे अवाश्यक. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. बारावी आणि नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण, तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला असावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबधित अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त 5 वर्षे योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी व्यवसाय करत नसावा. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामाध्ये प्रवेश मिळालेला नसावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विजाभज, इमाव आणि विमाप्र कल्याण विभागाच्या महाडीबीटीमध्ये अर्ज केला आहे आणि सदर अर्ज मंजूर झाला आहे, त्यांना अनुज्ञेय राहील. वसतिगृह प्रवेश प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहिल. संबंधित विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थेने अर्ज करणे अनिवार्य राहील, त्याप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सहाय्यक आयुकत, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील. त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी या योजनेच्या लाभास पात्र असतील. अधिक माहितीसाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

0000000

नाफेडतर्फे तुरीला 6600 रूपये प्रति क्विंटल दर

बुलडाणा, दि. 21 : जिल्ह्यात नाफेडतर्फे तूर खरेदी सुरवात करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत ६ हजार ६०० रूपये प्रति क्विंटल हमीदराने तूर खरेदी करण्यात येणार आहे. खरेदी बाबत नोंदणी दि. २१ जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे.

तूर खरेदीसाठी नोंदणी दि. ६ मार्च २०२३ पर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे. तसेच खरेदीचा कालावधी दि. १ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु झाली असून दि. ३० एप्रिल २०२३ राहणार आहे. जिल्ह्यामध्ये तूर खरेदीसाठी जिल्ह्यामध्ये ६ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, मेहकर, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु., केंद्र साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था, चिखली, केंद्र - उंद्री, कृषि उत्पन्न बाजार समिती, सिंदखेडराजा, केंद्र - मलकापूर पांग्रा, बीबी फार्मर प्रोड्युसर कंपनी, बिबल केंद्र - किनगाव जट्टू या केंद्रांना मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी यांनी सहा ठिकाणी तूर खरेदी सुरु करण्याचे आदेश दिले आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, तसेच ज्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस येतील, त्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रवरील संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

00000

Monday 20 February 2023

DIO BULDANA NEWS 20.02.2023

 दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर जमावबंदी आदेश

*जिल्हाधिकाऱ्यांनी केले कलम 144 लागू

बुलडाणा, दि. 20 : यावर्षीच्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुयोग्य वातावरणात पार पाडण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहे. परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासोबतच आता जिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. यासाठी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी 2023 ते दि. 21 मार्च 2023 आणि दहावीची परीक्षा दि. 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परिक्षांच्या कालावधीत परिक्षामध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. दरम्यान सदर परिक्षेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना, तसेच परिक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

जिल्हादंडाधिकारी म्हणून प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी जिल्ह्यातील परिक्षेदरम्यान होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये परीक्षा कालावधीत परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात संगणक सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.

000000



जिल्हाधिकारी कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

बुलडाणा, दि. 20 : जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार श्यामला खोत, पुष्पा डाबेराव, पी. के. करे, विधी अधिकारी गजानन पदमने, नाझर संजय वानखेडे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

सर्वांनी कॉपीमुक्त अभियानास सहकार्य करावे

खासदार प्रतापराव जाधव यांचे आवाहन

बुलडाणा, दि. 20 : येत्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा स्पर्धात्मक वातावरणात व्हावी, यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानास संस्थाचालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मनापासून सहकार्य करावे, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

खरोखर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गैरप्रकाराने अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अन्याय होतो. कॉपी करून वरच्या श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि इतर ठिकाणी चांगली संधी प्राप्त होते. मात्र खरोखरची गुणवत्ता असणारे विद्यार्थी मागे पडत असल्याने कॉपीमुक्त अभियान काळाची गरज झाली आहे.

राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी सारख्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांनी करावी. समाजातील सर्व घटकांनी या अभियानास सहकार्य करावे. जेणेकरून समाजात एक चांगले वातावरण निर्माण होऊन सुदृढ आणि गुणवत्तायुक्त नवीन पिढी तयार करण्यास मोलाचा हातभार लागेल, असे श्री. जाधव यांनी सांगितले.

00000

राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

        बुलडाणा, दि. 20 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमयनिर्मितीसाठी 2022 मध्ये प्रकाशित पुस्तकासाठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार देण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत दि. 2 मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे.

          स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात, तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व ‘व्हाटस् न्यू’या सदरात पुरस्काराच्या शीर्षाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

        प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 2 मार्च 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक व प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात. त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 2 मार्च 2023 पर्यंत प्रवेशिका दाखल करता येतील. लेखक व प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर किंवा पाकिटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.

00000

Sunday 19 February 2023

DIO BULDANA NEWS 19.02.2023

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
बुलडाणा, दि. १९ : जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी अभिवादन केले. 
निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, तहसीलदार श्यामला खोत, नायब तहसीलदार संजय बंगाळे, नाझर गजानन मोतेकर यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य गीत सादर करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्यामला खोत यांनी राजमाता माॅ जिजाऊ यांच्यावरील स्वरचित कविता सादर केली.
000000

Friday 17 February 2023

DIO NEWS 17-02-2023

केंद्रीय योजनाचा लाभ सर्वसामान्यांना द्यावा
-खासदार प्रतापराव जाधव
बुलडाणा, दि. १७ : सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सकारात्मक राहावे, असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी आमदार संजय रायमूलकर, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपवन संरक्षक अक्षय गजभिये, जालिंदर बुधावत आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात जिगाव प्रकल्प होत आहे. यामुळे पुनर्वसनाची कामे योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. यात घरासाठी जमिन देताना ती योग्य असावी याची दक्षता घ्यावी. याठिकाणी पाणी आणि विजेची सुविधा देण्यात यावी. आवश्यक असणाऱ्या अटी पूर्ण करून आवास योजनेची घरे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत.
राष्ट्रीय महामार्गाची कामे करताना रस्ता आणि इतर कामे पूर्ण झाल्याशिवाय पूर्णत्वाचा दाखला देऊ नये. खामगाव बुलडाणा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. कंत्राटदारांकडून कामे करून घ्यावीत. वेळेत काम पूर्ण केली नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. पाणी पुरवठ्याच्या योजना सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी त्या वेळेत हस्तांतरित करण्यात याव्यात. 
खरिप हंगामात पिक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे, तरी गरजू शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल यासाठी बँकांनी प्रयत्नशील रहावे. पिक विम्याबाबत तीन लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यातील दोन लाख २९ हजार शेतकऱ्यांना पिक विमा मंजुरी मिळाली असून एक लाख ९२ हजार शेतकऱ्यांना १५६ कोटी वितरीत करण्यात आले आहे. पिक विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रत देण्यात यावी. 
डिजिटल इंडियामध्ये फायबर ऑप्टिक प्रत्येक गावात पोहोचविण्याचे उद्दीष्ट आहे. ही सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी प्रयत्नशील रहावे. कौशल्य विकासातून प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेताना त्यांना रोजगार मिळावा किंवा स्वयंरोजगार करण्यासाठी कर्ज आणि इतर सुविधा मिळावी. शासकीय किंवा खासगी कंपनीमध्ये भरती होताना शासकीय योजनांमधून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे.
जल जीवन मिशन अंतर्गत ७१४ गावांमध्ये योजना राबविण्यात येत आहे. ही कामे तातडीने पूर्ण करून प्रत्येक घराला पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करावे. ही कामे चांगली करण्यात यावी. पोषण आहार चांगल्या दर्जाचा पुरवठा व्हावा यासाठी शाळांना सूचना देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शाळेचे दिवस हे पाहूनच पोषण आहाराचा पुरवठा करण्यात यावा. बालके, गरोदर माता, स्तनदा माता यांची योग्य ती काळजी घेण्यात यावी. 
यावेळी राष्ट्रीय महामार्ग, पाणी पुरवठा, पूनर्वसन, पिक विमा, डिजिटल इंडिया, बांधकाम, स्वच्छ भारत, शालेय पोषण आहार, रोजगार हमी योजना, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, उमेद, वन विभाग, प्रधानमंत्री आवास योजना आदी बाबतचा आढावा घेण्यात आला.
00000

Thursday 16 February 2023

DIO BULDANA NEWS 16.02.2023

 





रोजगारक्षम अभ्यासक्रमाची निर्मिती व्हावी

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

*उदयनगर येथे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 16 : उद्योजकांकडून कुशल मनुष्यबळाची मागणी होत असते. मात्र त्या तुलनेत मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे कालानुरूप रोजगारक्षम अभ्यासक्रमाची निर्मिती होणे गरजेचे आहे. यासाठी प्रशिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे उदयनगर, ता. चिखली येथील दयासागर महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार श्वेता महाले, तहसिलदार अजित येळे, प्राचार्य एस. डी. गंगावणे, श्री. खुळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, शिक्षण पुर्ण करून प्रत्येकालाच शासकीय नोकरी प्राप्त होण शक्य नाही. त्यामुळे खासगी कंपनीमध्ये रोजगार किंवा स्वत:चा उद्योग हे पर्यायही युवकांसमोर आहे. अनुभव घेण्यासाठी युवकांना संधी मिळावी, यासाठी रोजगार मेळावे घेण्यात येत आहे. उदयनगर येथील रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यात रोजगार मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. बहुतांश कंपन्यांकडून स्थानिक पातळीवर रोजगार देण्यात येणार आहे. परंतु युवकांनी जिल्ह्याबाहेर जाऊन काम करण्याची मानसिकता ठेवावी.

विद्यार्थ्यांनी संकुचित वृत्ती न ठेवता आलेली संधी स्विकारून अनुभव प्राप्त करावा. या अनुभवामुळे मोठ्या पदावर जाण्याची आणि स्वत:चा उद्योग उभारणी करण्यासाठी मदत होते. जिल्ह्यातील युवकांमध्ये काम करण्याची क्षमता आहे. निवड झालेले विद्यार्थी नक्कीच उद्योगांच्या विकासासाठी हातभार लावतील. रोजगार देण्यासाठी आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींनी या ठिकाणाहून अधिकाधिक युवकांना संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार श्रीमती महाले यांनी, सदर रोजगार मेळाव्यातून युवकांना स्थानिक स्तरावरच रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे युवक आपली वडीलोपार्जित शेतीसोबतच खासगी कंपनीत कामही करू शकतील. तसेच सहभागी झालेल्या कंपन्यांनी अनुभवाची अट ठेवलेली नसल्याने सर्वांना समान संधी चालून आली आहे. कंपन्यांनी वेतनही चांगले ठेवले असल्याने यास चांगला प्रतिसाद मिळेल. कोणत्याही परिस्थितीला युवकांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे. रोजगार मिळवण्यासाठी युवकांनी उद्योग उभारणीसाठी प्रयत्न केल्यास शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल. नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच विकास परिषद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

योगेश लांडकर यांनी सूत्रसंचालन केले. योगेश राजपूत यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी प्रमोद खोडे, पुरुषोत्तम अंभोरे, नंदू मेहेत्रे, सतीश शेळके, गोपाळ चव्हाण यांनी पुढाकार घेतला.