Wednesday 31 May 2023

DIO BULDANA NEWS 31.05.2023

    


जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, नाझर गजानन मोतेकर, नंदकुमार येसकर, सुरेश खोडके, मनीषा पाल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

0000000

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून फळबागांचे पुनरूज्जीवन

*फळे, फुले, मसाला लागवड, जुन्या बागांना लाभ

बुलडाणा, दि. 31 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड आणि जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यात येते. यात विदेशी फळे, फुले, मसाला लागवड आणि आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यात येत आहे.  

राज्यात विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे, तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. यामधील घटकांचे अनुदान हे फुले लागवडीसाठी कट फ्लावर्स अल्प भूधारक शेतकऱ्यांना 1 लाख रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रूपये प्रति हेक्टर, इतर शेतकऱ्यांना 1 लाख रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार रूपये प्रति हेक्टर, कंदवर्गीय फुलांसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजार प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रूपये प्रति हेक्टर, इतर शेतकऱ्यांना 1 लाख रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार रूपये प्रति हेक्टर, सुटी फुलांसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यांना       40 हजार रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार रुपये  प्रति हेक्टर, इतर शेतकऱ्यांसाठी 40 हजार रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.

मसाला पिक लागवडीसाठी बिया वर्गीय व कंद वर्गीय मसाला पिकांसाठी 30 हजार रुपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के 12 हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवर्षिय मसाला पिकासाठी 50 हजार रुपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के 20 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.

विदेश फळपिक लागवडीसाठी ड्रॅगन फ्रुट साठी चार लाख रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 60 हजार रूपये प्रति हेक्टर, स्ट्रॉबेरी साठी दोन लाख 80 हजार रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 12 हजार रुपये प्रति हेक्टर, अवॅकॅडोसाठी 1 लाख रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते. जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवनासाठी 40 हजार रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 20 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.

इच्छुक शेतकऱ्यांनी विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करणे आणि जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा आणि मोसंबी फळपिकांच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबधित नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000

Monday 29 May 2023

DIO BULDANA NEWS 29.05.2023

 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी आर्थिक सहाय्य योजना

बुलडाणा, दि. 29 : अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तसेच सहभागी झालेल्या होतकरु खेळाडूंना प्रशिक्षण आणि इतर बाबींसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. यासाठी खेळाडूंनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन परिणामकारक करण्यासाठी, तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत, यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख यासाठी क्रीडा धोरण 2012 तयार करण्यात आले आहे. यात राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. ही योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वीत आहे. शासनाच्या निर्णयानुसार अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन, तसेच देश-विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्‍ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात किंवा खरेदी करणे, गणवेश आदी बाबींसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

या योजनेत ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई, जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप आणि वर्ल्ड कप या स्पर्धांना अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ज्या खेळ, क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ, क्रीडा प्रकार इतर स्पर्धांमध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास पात्र आहेत. मात्र कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद करण्यात आला आहे.

अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन देणे आवश्यक आहे. संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000




राज्य उत्पादन शुल्कचे महिनाभरात 100 गुन्हे नोंद

बुलडाणा, दि. 29 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मे महिन्यात अवैध दारू विरोधात 100 गुन्हे नोंद केले. अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मे महिन्यात आतापर्यंत हातभट्टी दारूविरूद्ध मोहिमेंतर्गत जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीचे 100 गुन्हे नोंदविले आहे. यात 102 आरोपींसह 4 वाहने असा एकूण 1 हजार 226 लिटर हातभट्टी दारू, 38 हजार 302 लिटर मोहा रसायन, 196.92 लिटर देशी दारू आणि 46.44 लिटर विदेशी दारूसह 9 लाख 71 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बुलडाणा तालुक्यातील कैकाडी पुरा, भिलवाडा, परदेशीपुरा, पळसखेड नाईक, डोंगरखंडाळा, भादोला, येळगांव, मढ, बोराखेडी, लासुरा, नरवेल, तसेच चिखली कार्यक्षेत्रातील गवळीपुरा चिखली, गवळीपुरा लोणार, चायगाव, खामगाव कार्यक्षेत्रातील देऊळगाव साकर्शा, वाडी शिवार मेहकर, शिराळा, मानेगाव फाटा, आरेगाव कळंम्बेश्वर या परिसरामध्ये मोहिमेंतर्गत अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीबाबत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

बनावट मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे जिवीतहानी किंवा गंभीर स्वरुपाचे आजार होण्याची किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यातील नागरीकांनी मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री किंवा बनावट मद्यनिर्मिती होत आढळल्यास टोल फ्री नंबर 18002339999 किंवा व्हॉट्सॲप नंबर 8422001133, किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाच्या पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी.

जिल्ह्यातील किरकोळ आणि ठोक मद्य अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्तीमध्ये बनावट मद्य आढळून आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

00000

Friday 26 May 2023

DIO BULDANA NEWS 26.05.2023

 हातमाग तंत्रविज्ञान संस्थेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

*२० जून पर्यंत अर्ज करण्याची मुदत

बुलडाणा, दि. 26 : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ यावर्षाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रथम सत्राकरिता एकूण १५ जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातून प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांच्यामार्फत २० जून २०२३ पर्यत प्रवेश अर्ज करता येणार आहेत.

ओडिशातील बरगढ येथील भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या पदविका अभ्यासक्रमाकरीता राज्यातून १३, तर आर्थिक दुर्बल घटकासाठी १ जागा, तसेच वेंकटगिरी येथील कॅम्पसकरीता २ जागांच्या प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांकडून प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाने अर्ज मागविले आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या dirtexmah.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयात उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग, नागपूरचे आयुक्त एम. जे. प्रदिप चंदन यांनी कळविले आहे.

विदर्भातील ११ जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यानी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्र. २, आठवा माळा, बी विंग, सिव्हील लाईन, नागपूर यांच्याकडून प्राप्त करावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0712-2537927 वर संपर्क साधावा. अर्जाचा नमुना व विहित पात्रता कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे.

00000

Thursday 25 May 2023

DIO BULDANA NEWS 25.05.2023





 खामगावातील ‘शासन आपल्या दारी’मध्ये दहा हजार लाभ

*16 विभागांच्या दालनातून योजनांची माहिती

बुलडाणा, दि. 25 : खामगाव तहसील कार्यालयातर्फे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात 10 हजार 640 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. खामगाव तालुका प्रशासनाने गुरुवारी, दि. 25 मे 2023 रोजी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

आमदार अॅड. आकाश फुंडकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या विविध विभागांकडून देण्यात येणारे लाभ पात्र लाभार्थ्यांना एकाच छताखाली देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शासनाच्या 16 विभागांनी माहिती देणारे स्टॉल उभारले होते.

आज खामगाव येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात महसूल विभागाचे 4 हजार 968, पंचायत समिती 1 हजार 300, कृषी विभाग 937, नगरपालिका 784, सहकार व पणन विभाग 384, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 1 हजार 874, आरोग्य विभाग 393 अशा एकूण 10 हजार 640 लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले. तसेच सलोखा योजनेंतर्गत शिर्ला नेमाने यांना तालुक्यातील पहिल्या अदलाबदल दस्तावेजाचे वितरण आमदार श्री. फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबिरात मदत कक्ष, हिरकणी कक्ष यांच्यासह विविध विभागाचे 16 स्टॉल उभारले. याठिकाणी नागरिकांना योजनांची माहिती आणि पात्र लाभार्थ्याना थेट लाभ वितरीत करण्यात आले. आरोग्य विभागाने आरोग्य शिबीर घेतले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरीकांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबीरात महसूल, पंचायत समिती, नगर विकास, आरोग्य, कृषी, एकात्मिक बालविकास, राज्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम, नोंदणी व मुद्रांक, सहकार यासह तालुकास्तरीय विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000


देऊळगाव राजा येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर

बुलडाणा, दि. 25 : दहावी, बारावीच्या उमेदवारांना करीअरच्या वाटा आणि त्यातील संधीची माहिती व्हावी यासाठी देऊळगाव राजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंगळवार, दि. 23 मे 2023 रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर घेण्यात आले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, सिंदखेडराजा व देऊळगाव राजा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यातर्फे देऊळगावराजा येथे शिबीर पार पडले. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी. चाटे अध्यक्षस्थानी होते. तज्‍ज्ञ मार्गदर्शक म्हणून उद्योजक भगवान गवई, विवेक मनियार, मोटिवेशनल स्पीकर राहुल राजगुरू, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी, प्राचार्य गणेश भावले, प्र. प्राचार्य श्री. नागरे आदी उपस्थित होते.

श्री. चाटे यांनी बदलते तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण होत असलेल्या संधीबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विद्यार्थ्यांनी आपला स्किल सेट विकसित करत करीअरचा विचार करावा, तसेच शासनाच्या योजनेचा आपल्या उत्कर्षासाठी लाभ करून घ्यावा, असे आवाहन केले. श्री. गवई आणि श्री. मनियार यांनी उद्योजकीय मानसिकता विकसित होण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. श्री. राजगुरू यांनी व्यक्तिमत्व विकासावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्राचार्य गणेश भावले यांनी प्रास्ताविक केले. गिरीश वाईकर आणि उद्धव मांटे यांनी सूत्रसंचालन केले. श्री.  नागरे यांनी आभार मानले.

00000

जळगाव जामोद येथे सोमवारी युवाशक्ती करीअर शिबीर

बुलडाणा, दि. 25 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने जळगाव जामोद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवार, दि. 29 मे रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर घेण्यात येणार आहे.

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी एयएमसी अध्यक्ष संजय हावरे उपस्थित राहणार आहे. यावेळी जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव या तीन तालुक्यातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि युवक, पालकांसाठी विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि उद्योगविषयक तहसीलदार समाधान सोनवणे, करीअर मार्गदर्शक सचिन वारूळकर माहिती देणार आहे.

यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य व्ही. एस. पायघन यांनी केले आहे.

00000

सोयाबीन पिकातील विषाणूजन्य मोझॅक, पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन

बुलडाणा, दि‍. 25 : जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनची लागवडी अधिक प्रमाणात होणार आहे. या हंगामात सोयाबीनचे उत्पादन जादा येण्यासाठी या पिकावरील विषाणूजन्य मोझॅक, पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

मोझॅक लक्षणे ही रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखूड, लहान, जाडसर व सुरकुतलेली होतात, रोगग्रस्त झाडांना शेंगा कमी लागतात, रोगग्रस्त झाडांना शेंगा कमी लागतात, रोगाचा प्रसार मावा किडी द्वारे व बियाण्यापासून होतो. तर पिवळा मोझॅक हा रोगग्रस्त झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट, तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात, रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो.

या रोगाचे व्यवस्थापन करताना सुरवातीस रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढून नष्ट करावी. पिकामधील आणि बांधावरील तण नियंत्रण करावे. रस शोषणाऱ्या किडींना रोखण्यासाठी पिवळ्या चिकट सापाळ्यांचा 15 बाय 30 सेंमी आकाराचे 10 प्रती एकर उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पिकांच्या समकक्ष उंचीवर लावावे. उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पिकांच्या समकक्ष उंचीवर लावावे. उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 50 टक्के डब्लूजी 3 ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम 25 टक्के डब्लूजी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

00000

Wednesday 24 May 2023

DIO BULDANA NEWS 24.05.2023

 


पर्यावरणपूरक जीवनपद्धती कार्यशाळेचा समारोप

बुलडाणा, दि. 24 : केंद्र शासनाच्या लाईफ मिशन अंतर्गत पर्यावरणपूरक जीवनपद्धतीस प्रोत्साहन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि आत्मातर्फे जिल्हा प्रशिक्षण केंद्रात सोमवार, दि. २२ मे २०२३ रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली.

कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. तारू यांनी बदलत्या हवामानाशी सुसंगत पिकाच्या वाणांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. हवामान शास्त्रज्ञ डॉ. मनेश येदुलवार यांनी मान्सून आणि हवामानाच्या अंदाजाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. श्रीमती तिजारे यांनी हवामान अनुकूल शेतीपद्धती बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, पाण्याचा सूक्ष्म वापराबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी वातावरणानुकुल शेतीपद्धतीसाठी कृषी विभागाच्या योजनाबाबत माहिती दिली. पोकराचे प्रकल्प विशेषज्ञ उमेश जाधव यांनी मुलस्थानी जलसंधारण, पाण्याचा सुयोग्य वापराबाबत मार्गदर्शन केले. आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे यांनी जैवविविधता, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केले.

सप्ताहात तालुका आणि ग्रामस्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. रविवार, दि. २८ मे रोजी कृषी विज्ञान केंद्रात समारोपीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

00000

भारतीय डाक विभागाची महिला सन्मान बचतपत्र योजना

 बुलडाणा, दि. 24 : भारतीय डाक विभागाने महिलांसाठी महिला सन्मान बचत योजना सुरू केली आहे. वार्षिक दोन लाख रूपयांपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 योजना 1 एप्रिल 2023 पासून देशातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमधून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेत महिला खातेदार स्वतःसाठी किंवा पालक अल्पवयीन मुलीच्या नावे कमीत कमी एक हजार रूपये ते कमाल 2 लाख रूपये जमा करून वार्षिक 7.5 टक्के त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवू शकतात. यासाठी खातेदाराला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहे.

सदर खाते दि. 31 मार्च 2025 पर्यंत एक खातेदाराच्या नावे दोन खात्यांमध्ये 3 महिन्यांचे अंतर ठेवून काढले जाऊ शकते. जिल्ह्यातील महिलांनी महिला सम्मान बचत पत्र योजनेसह डाक विभागाच्या बचत खाते, आवर्ती जमा खाते, बचत ठेव खाते, मासिक उत्पन्न योजना खाते, ज्येष्ठ नागरिकांसाठी खाते, आयकर सवलत करिता पीपीएफ खाते, मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी खाते, राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र काढण्याचे आवाहन डाक अधिक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

00000

Tuesday 23 May 2023

DIO BULDANA NEWS 23.05.2023

 शुक्रवारी ऑनलाइन रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 23 : सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होण्‍यासाठी मॉडेल करिअर सेंटरतर्फे शुक्रवार, दि. 26 मे 2023 रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यात जबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे, मकापेरी एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रोजगार मेळाव्याची पदे अधिसूचित केली आहेत. नॅशनल करियर सर्विसेसच्या ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना या मेळाव्यात सहभाग नोंदविता येणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार कोणत्याही ठिकाणावरून कार्यालयाकडून गुगल मीटच्‍या लिंकद्वारे ऑनलाईन सहभाग नोंदवू शकेल.

पात्र उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करू शकेल. मेळाव्याबाबत अधिक माहिती, तसेच ऑनलाईन रोजगार मेळाव्याची लिंक मिळविण्याकरिता मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनी द्वारे 7447473585 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मॉडेल करिअर सेंटरचे योगेश लांडकर यांनी केले आहे.

000000

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 23 : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

          शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील विद्यार्थ्यांना नवीन अर्ज तसेच अर्ज नुतनीकरण करता येणार आहे. तसेच 2021-22 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना यापूर्वी सादर केलेल्या मात्र त्रृटीत असलेल्या अर्ज त्रृटीची पुर्तता करुन पुन्हा सादर करता येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी दि. 31 मे 2023 पूर्वी ऑनलाईन परिपूर्ण अर्ज भरावेत. कोणताही विद्यार्थी शिष्यवृतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

000000

मका, ज्वारी, बाजरी खरेदी नोंदणीस मुदतवाढ

बुलडाणा, दि. 23 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दरात मका, ज्वारी, बाजरी खरेदी करण्यात येत आहे. या नोंदणीसाठी दि. 31 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मका, ज्वारी, बाजरी खरेदीसाठी नोंदणी दि. ४ मे ते २० मे २०२३ पर्यंत देण्यात आली होती. शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करून संस्थांकडे उपस्थित राहून लाईव्ह फोटो काढणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी हंगाम २०२२-२३चा सातबारा उतारा, पिकपेरा, बँक पासबुकची झेरॉक्स, जनधन पासबुक देऊ नये, आधारकार्ड, बँक खाते सुरु असल्याची खात्री करुन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.

जिल्ह्यामध्ये मका, ज्वारी नोंदणीसाठी १३ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलढाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद आणि खामगाव. संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु. केंद्र - साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्यादित चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, नारायणखेड, ता. देऊळगावराजा केंद्र - सिंदखेडराजा, नांदुरा अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नांदुरा, केंद्र- वाडी या केंद्राना मान्यता देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी स्वत: केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

00000

 

व्यायामशाळा विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत विविध अनुदानित शाळा, क्रीडा संस्थांना 7 लाख रुपये अनुदान देण्यात येते. यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्यायामशाळा बांधकाम, व्यायाम साहित्य खरेदी, खुले व्यायाम साहित्य खरेदी, व्यायामशाळा दुरुस्ती व नुतणीकरणासाठी अनुदान घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजित केलेली जागा शासनाने घोषित केलेल्या दलित वस्तीत असणे आवश्यक आहे.  अनुदानाकरीता पात्र संस्थांचा प्राथम्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा आणि वसतीगृह तसेच क्रीडा विभागाचे संकुले, पोलिस विभागांतर्गत कल्याण निधी समिती, शासकीय स्पोर्टस क्लब, शासकीय महाविद्यालये, शिक्षण विभागाने अनुदानित संबंधित संस्थेस पाच वर्षांपूर्वी अनुदानाचा प्रथम टप्पा 20 टक्के मिळणे आवश्यक आहे. प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या संस्थांनी दि. 5 जून 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथून विहित नमुना प्राप्त करुन, आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 22 जुन, 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

00000



तंबाखू नियंत्रण पथकाची बुलडाण्यात कारवाई

बुलडाणा, दि. 23 : जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने बुलडाणा शहरातील पानटपरी चालकांवर आज दि. 23 मे 2023 रोजी कारवाई केली. यात 14 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. राठोड, श्री. पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वासेकर, ठाणेदार श्री. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अंमलबजावणी पथकाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बुलडाणा शहरातील 58 पानटपरीधारकांवर कारवाई केली. यात 14 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले, समुपदेशक श्री. सरकटे, सामाजिक कार्यकर्ता श्रीमती आराख, अन्न औषध प्रशासन विभाग श्री वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. जुमडे, श्री. बोचे, श्री. खेरडे यांनी ही कारवाई केली.

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षापासून हृदयरोग, मधुमेह, अर्धांगवायू, कर्करोग या आजारांसाठी कारणीभूत तंबाखू व्यसनावर मार्गदर्शन, प्रशिक्षण, मुख तपासणी, मुख कर्करोगावरील मोफत शस्रक्रिया आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष ओपीडी नंबर 33 व 34 येथे कार्यरत आहे. नागरिकांनी तंबाखू मुक्तीसाठी मोफत टोल फ्री क्रमांक क्र. 1800112356 व मुखस्वास्थासाठी मोफत टोल फ्री क्रमांक क्र. 1800112032 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Monday 22 May 2023

DIO BULDANA NEWS 22.05.2023

 


जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 22 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, नायब तहसीलदार संजय बंगाळे, नाझर गजानन मोतेकर, शिला पाल, सरला सपकाळ, मनिषा रिंढे आदी उपस्थित होते.

००००


DIO BULDANA NEWS 21.05.2023



 जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त प्रतिज्ञा

बुलडाणा, दि. २१ : जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त प्रतिज्ञा देण्यात आली. 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक प्रिया सुळे यांनी प्रतिज्ञा वाचली. यावेळी तहसीलदार पी. के. करे, नायब तहसीलदार संजय बंगाळे, वर्षा मुळे, सचिन ठाकरे, अमित घोलिया, अनंत साळवे उपस्थित होते.
०००० 

Friday 19 May 2023

DIO BULDANA NEWS 19.05.2023

 खरीप हंगामात सोयाबीन उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्ट

*सोयाबीनचे अपेक्षित उत्पादनासाठी अष्ठसुत्री वापरावी

बुलडाणा, दि. 18 : जिल्ह्याची ओळख सोयाबीनचा हब म्हणून आहे. खरीपातील एकूण लागवड क्षेत्रापैकी सुमारे 75 टक्के क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतल्या जाते. सध्या पिकाची उत्पादकता लक्षात घेता उत्पादकता वाढविण्यास मोठा वाव आहे. सन 2022-23 मध्ये जिल्ह्याची सरासरी उत्पादकता 1 हजार 693 किलो प्रति हेक्टर आहे. ती सन 2023-24 या वर्षात वाढवून 1 हजार 862 किलो करण्याचे उद्दिष्ट कृषि विभागाने निश्च‍ित केले आहे.

नियोजित उत्पादकता साध्य करण्याकरीता शेतकऱ्यांनी काही बाबींचा अंगिकार केल्यास निश्च‍ित साध्य करता येऊ शकते. याकरीता हलक्या जमिनीत हे पिक अपेक्षित उत्पादन देऊ शकत नाही. त्याकरीता मध्यम ते भारी जमीनीवर पिकाची  लागवड करावी. सोयाबीन पिकाच्या उगवणीकरीता 25 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यक आहे. संपूर्ण वाढीच्या अवस्थेत सर्वसाधारणपणे 22 ते 35 डिग्री सेल्सीअस तापमानात पिक चांगले येते. या पिकाकरीता 750 ते 1000 मीमी पाऊस आवश्यक आहे. सुरुवातीच्या पिकाचे अवस्थेत कमी पाणी लागत असून दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याची जास्त आवश्यकता असते.

सोयाबीन हे पिक स्वपरागसिचिंत असून सुधारीत वाणच या पिकाची उपलब्ध आहेत. त्यामुळे दरवर्षी बाजारातील बियाणे खरेदी न करता तीन वर्षातून एकदा प्रमाणित बियाणे खरेदी करावे. प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित सोयाबीन दोन वर्ष घरगुती पद्धतीने साठवून ठेऊन वापर करता येतो. यामुळे बियाण्यावर होणारा खर्च बचत करता येऊ शकते. घरगुती पद्धतीने साठवून ठेवलेल्या बियाण्याची स्थानिक पातळीवर स्पायरल सेपरेटरद्वारे प्रतवारी करुन बियाणे म्हणून वापर करता येईल.

घरगुती पद्धतीने साठवून ठेवलेल्या बियाण्याची उगवण क्षमता स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे साहित्य गोणपाठ, टिशू पेपर, वर्तमानपत्राचा कागद किंवा मातीच्या ट्रेचा वापर करुन उगवण क्षमता तपासून घ्यावी. याकरीता पोत्यातील बियाणे निवडून न घेता 100 बिया एका गोणपाटावर 10चे रांगेत ठेऊन असे चार गोणपाट तयार करावे, ओल्या गोणपाटाची गुंडाळी करुन ठेवाव्या व 5 ते 7 दिवसानंतर कोंब आलेले बियाणे मोजून सरासरी टक्केवारी काढावी. 70 किंवा 70 टक्के पेक्षा जास्त उगवणक्षमता आलेले बियाणे पेरणी करीता उपयोगात आणावे.

सोयाबीन पिकास प्रथम बुरशीनाशक थायरम 37.5 + कार्बोझींग 37.5 टक्के 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे लावावे. वेगवेगळ्या किडी रोगापासून पिकांचे सुरुवातीचे काळात संरक्षण करण्याकरीता रासायनिक आणि जैविक बिजप्रक्रिया करणे आवश्यक असते. थायोमिथोक्झाम 30 टक्के एफएस 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावल्यास खोडमाशी पासून संरक्षण मिळते. इमॅडोक्लोप्रिड 48 टक्के एफएसमुळे इतर रसशोषण करणाऱ्या किडीपासून संरक्षण मिळते.      

पिकासाठी जिवाणू संवर्धन वापर महत्वाचा ठरतो. जमिनीत उपलब्ध असणारे विविध अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होण्याकरीता जिवाणू चा महत्वाचा सहभाग असतो. याकरीता रायझोबियम + पीएसबी + केएमबी प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात पेरणीपूर्वी बियाण्यास लावावे. बियाण्यास प्रथम बुरशीनाशक आणि नंतर किटकनाशकाची किंवा काही कंपनीचे दोन्ही औषधे एकत्रित असलेले संयोजन बाजारात उपलब्ध झालेले आहेत, ते वापरुन रासायनिक बिजप्रक्रिया करावी. जैविक बिजप्रक्रिया पेरणीपुर्वी दोन तास अगोदर रायझोबियम + पीएसबी + केएमबी किंवा लिक्वीड कॉन्सर्सिया वापरुन जैविक बिजप्रक्रिया करावी. रासायनिक बुरशीनाशक उपलब्ध न झाल्यास प्रथम ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा 6 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जैविक बिजप्रक्रिया पेरणीपुर्वी दोन तास अगोदर करावी.

जैविक औषधाची बिजप्रक्रिया करणे पेरणीवेळी शक्य न झाल्यास ट्रायकोडर्मा 5 ते 10 किलो + 100 किलो शेणखत किंवा 2 लिटर ट्रायकोडर्मा + 100 किलो शेणखतात मिसळून सावलीखाली सात दिवस मिश्रणावर पॉलीथिन पेपर झाकावे. सात दिवसानंतर जमिनीमध्ये  मिसळून द्यावे, पीएसबी व रायझोबियम 3 ते 5 किलो + 50 किलो शेणखत मिसळून जमिनीमध्ये द्यावे.

योग्य वाणाची निवड करताना शक्यतोवर 10 वर्षाआतील प्रसारित वाणाची निवड पेरणीकरिता करावी. जुने झालेले वाणाची किडरोग प्रतिकारकक्षमता कमी होऊन पिक किड व रोगास बळी पडते. याकरीता आपल्या भागात शिफारस केलेले वाण निवडावे. उभट वाढणारी वाण JS 93-05, JS 95-60, MAUS-162 या वाणाचे जमिनीच्या मगदुराप्रमाणे 26 ते 30 किलो प्रति एकर बियाणे वापरावे. तसेच फांद्या करणारे वाण KDS-726, KDS-753 व मध्यम फांद्या करणारे वाण JS-335, DS-228 व MAUS-612, फुले किमया (KDS-753), ही असून जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पाण्याची उपलब्धता पाहून वाणाची योग्य निवड करावी. ज्या ठिकाणी संरक्षित ओलीताची सोय असेल व जमिन भारी असेल, अशा ठिकाणी फुले संगम (KDS-726), फुले दुर्वा, (KDS-992) यासारखे वाण निवडावे. या वाणासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे टोकण पद्धतीने लागवडीकरीता एकरी 16 ते 20 किलो बियाणे वापरावे.

पेरणी व पेरणीच्या पद्धती मध्ये सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन येण्यासाठी पेरणीची पद्धत योग्य निवडणे फार महत्वाचे आहे. सोयाबीन पिकास सुरुवातीच्या काळात पाणी कमी लागते. परंतू पावसाळा जास्त असल्याने पिक पाण्यात सापडून योग्य वाढ होत नाही. या उलट पिकास दाणे भरण्याचे अवस्थेत पाण्याची जास्त गरज असते. अशावेळी पावसात खंड असतो. त्यामुळे दाणे योग्य पद्धतीने भरत नाहीत. परिणामी उत्पादन कमी येते. यावर मात करण्याकरीता पेरणीची योग्य पद्धत निवडुन पेरणी करावी. सरी-वरंबा पद्धतीने टोकण लागवड, बेडवर लागवड किंवा बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करावी.

पेरणीची वेळ 7 जून ते 15 जुलै असून पेरणी करण्यास उशीर झाल्यास कमी कालावधीचे वाण वापरावे. 75 ते 100 मीमी पाऊस किंवा जमीन 6 इंच खोल ओलीची खात्री करुन वापसा आल्यानंतर पेरणी करावी. पेरणी करताना बियाणे 3 ते 5 सेमी खोलीवरच पेरावे.

पेरणीचे अंतर हे उभट वाढणारे वाण, हलकी जमीन 30 सेमी, मध्यम जमीन 37.5 सेमी, भारी जमीन 45 सेमी, जास्त फांद्या करणारे वाण हलकी जमीन 45 सेमी, मध्यम फांद्या करणारे वाण मध्यम जमीन 45 सेमी. जास्त फांद्या करणारे मध्यम जमीन 52.5 सेमी, मध्यम फांद्या करणारी भारी जमीन 52.5 से.मी., जास्त फांद्या करणारे वाण भारी जमीन 60 सेमी, जास्त फांद्या करणारी खूप भारी जमीन 75 सेमी दोन ओळीतील अंतर ठेऊन पेरणी करावी.

तण नियंत्रण करताना जमिनीतील सेंद्रीय कर्ब व प्रति ग्रॅम जिवाणूची उपलब्धता लक्षात घेता शक्यतो तणनाशकाचा वापर टाळुन भौतिक पद्धतीने तण नियंत्रण करावे. अपवादात्मक परिस्थीतीतच तणनाशकाचा वापर करावा. सुरुवातीचे 30 ते 35 दिवस पिक तणविरहित ठेवावे. पेरणी नंतर लगेचच उगवणपूर्व फ्लुमीऑक्झीन 50 टक्के एससी 5 मीली प्रती 10 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी किंवा पेरणीनंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान तण दोन ते तीन पानावर असताना इमॅझीथायपर 20 मिली प्रती 10 लिटर पाणी किंवा क्विझॅलोपॉप पी. इथाईल 5 टक्के इसी 20 मीली प्रती 10 लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची  फवारणी नॅपसॅक पंपाद्वारे करावी. तणनाशक फवारणीपूर्वी पंप स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. तणनाशकाच्या फवारणी करीता गढूळ  पाण्याचा वापरु नये. तणनाशकाची फवारणी करताना वापरण्यात येणारे पाणी आम्लधर्मी असावे. त्याकरीता लिटमस पेपर द्वारे तपासणी  करावी. पाणी अल्कधर्मी असल्यास सिट्रीक अॅसिड मिसळून पाणी आम्लधर्मी करुन वापरल्यास तणाचे प्रभावी नियंत्रण होते. फवारणी करीत असताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.

 रासायनिक खत मात्रा ही विद्यापिठाचे शिफारशीनुसार व माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खताची मात्रा पेरणी बरोबर द्यावी. अकोला विद्यापिठाचे N-12 : P-30: K-12 ची प्रति एकर शिफारस असून बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक खतामधून ही मात्रा देण्यात यावी. तसेच 12:32:16, 10:26:26, 18:46:00 इत्यादी संयुक्त खतामधून मात्रा देत असल्यास एकरी 8 किलो गंधकाची मात्रा पेरणी बरोबर द्यावी. उभ्या सोयाबीन पिकास युरीया खत देऊ नये. त्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच संभवते. चालू खरीप हंगामात इफ्को द्वारा नॅनो डीएपी द्रवरुप (8:16:0) उपलब्ध झाले आहे. नॅनो डीएपी पिकास वापरायचे असल्यास पेरणीसोबत द्यावयाची रासायनिक खताची मात्रा 50 टक्के कमी वापरुन पेरणी करावी. पेरणीनंतर पिक 30 ते 35 दिवसाचे असताना 2 ते 4 मीली नॅनो डीएपी प्रति लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. नॅनो युरिया व नॅनो डीएपीचा वापर केल्यास पिकाचे संवर्धनाबरोबरच पर्यावरण राखण्यास मदत होते व रासायनिक खतावरील खर्च कमी करता येऊ शकतो.

आंतरमशागत करताना सोयाबीन पिकाचा फुलावर येण्याचा कालावधी जातीपरत्वे 35 ते 45 दिवसांनी फुलधारणा होते. त्यामुळे आंतरमशागतीचे कामे, कोळपणी, निंदणी आदी पिके फुलावर येण्यापूर्वी करुन घ्यावी. पिक फुलावर असताना आंतरमशागत करु नये. एकात्मिक किडरोग व्यवस्थापन करताना सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या काळात खोडमाशी ही किड येते. याकरीता 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

विविध प्रकारच्या अळ्या उंट अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, घाटेअळी इत्यादी करिता फेरोमेन ट्रॅप व ल्युर्स हेक्टरी 15 ते 20 व पक्षी थांबे 15 ते 20 लावावे. पिकांचे नियमित निरीक्षण घ्यावी. निरीक्षणात प्रति मिटर 3 ते 5 पेक्षा जास्त अळ्या आढळून आल्यास किड आर्थिक नुकसान पातळीचे वर गेले, असे समजून योग्य किटकनाशकाची फवारणी करावी.

 

किडरोग व्यवस्थापन फवारणीची वेळ

कीड व रोग

फवारणीची  वेळ

कीटकनाशकाचे प्रमाण प्रति १० लिटर पाणी

किड व रोग

 

पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी

ट्रायझोफॉस 20 मिली + 5 टक्के निंबोळी अर्क किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 ईसी-3 मिली

खोडमाशी

पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी किंवा

एखादे पान कडेने वाळू लागते व त्याची फांदी सुकलेली आढळते

ट्रायझोफॉस 20 मिली + 5 टक्के निंबोळी अर्क किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 ईसी-3 मिली

चक्रीभुंगा

फुलोरा अवस्था

क्लोरोपायरीफॉस किंवा क्विनॉलफॉस 20 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट 4 ग्रॅम, एकरी 20 ते 25 पक्षी थांबे उभे करावेत.

पाने खाणाऱ्या अळ्या (स्पोडोप्टेरा, उंट, केसाळ व घाटे अळी)

शेंगात दाणे भरताना

 

इमामेक्टीन बेंझोएट 4 ग्रॅम किंवा

क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 ईसी-3 मिली

 

पाने खाणाऱ्या अळ्या (स्पोडोप्टेरा, उंट, केसाळ व घाटे अळी)

प्रादुर्भाव दिसताच

बाविस्टीन- 10 ग्रॅम

 

शेंगाचा करपा

प्रादुर्भाव दिसताच

डायथेन एम 45-25 ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल 10 मीली

 

तांबेरा

प्रादुर्भाव दिसताच

या रोगाची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ प्रादूर्भावग्रस्त रोपे नष्ट करावे व रस शोषणाऱ्या किडीचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी 15 ते 20 निळे व पिवळे चिकट सापळे प्रति हेक्टर वापरावे.

सोयाबीन पिवळा मोझॅक

 

प्रादुर्भाव दिसताच

सोयाबीन मोझॅक

प्रादुर्भाव दिसताच

जर पेट्रोल पंपाने फवारणी केल्यास किटकनाशकाचे  प्रमाण तिप्पट करावे.

 

काढणी व मळणी करताना पिक परिपक्व झाल्यानंतर मजूराच्या सहाय्याने कापणी करुन मळणी यंत्राद्वारे मळणी करावी किंवा MAUS-162 सारखे वाण लागवड केले असल्यास हार्वेस्टरद्वारे मळणी करावी, असे आवाहन कृषि विभागान केले आहे.

00000

लेख

शाश्वत उत्पन्नासाठी संपूर्ण अनुदानावर फळबाग योजना

*स्व. भाऊसाहेब फुंडकर योजना

          शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. जिल्ह्यात फळबागाचे क्षेत्र वाढावे, यासाठी कृषि विभागातर्फे स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. शंभर टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन वाढीसाठी ही योजना राबविण्यात येते. रोहयोतून प्रामुख्याने शेत आणि बांधावर फळझाडे लागवड करण्यात येते. यात शंभर टक्के अनुदान देण्यात येते. ही योजना कृषि, ग्राम विकास आणि वनविभागाच्या माध्यमातून राबविली जाते. यात दोन हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीचा लाभ देण्यात येतो.

ग्रामपंचायतीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर कामास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता कृषी विभागामार्फत देण्यात येते. फळबाग, वृक्ष, फुलझाडे या योजनेत लागवड केली जाते.  निवड झालेल्या लाभार्थींना कृषी विभागामार्फत शासकीय फळ रोपवाटिकेमधून जातीवंत कलमे, रोपे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तसेच फळबाग लागवडीचे सर्व प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येते.

या योजनेसाठी पात्र लाभार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, भूसुधारक योजनेचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006नुसार पात्र व्यक्ती, कृषी कर्जमाफी योजना 2008 नुसार लहान शेतकरी एक हेक्टरपेक्षा जास्त परंतू दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेले जमीन मालक व कूळ, सीमांत शेतकरी, सीमांत शेतकरी हे एक हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी, जमीन मालक व कूळ. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉब कार्ड धारक 1 ते 11 प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतो.

या योजनेच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर कधीही अर्ज करता येतो. यासाठी आवश्यक कागदपत्रे ही सातबारा, 8अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, जॉब कार्ड, दारिद्र्य रेषेखालील अल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जातीचा उल्लेख असलेली कोणतेही अधिकृत शासनाचे पुरावे सादर करावी लागतात. योजनेत समाविष्ट फळपिके, वृक्ष, फुलपिके ही 59 प्रकारची फळपिके, वृक्ष, फुल पिके, मसाला पिके औषधी वनस्पती आदींसाठी सहाय्य केले जाते.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन फळझाडाची लागवड करून शाश्वत उत्पन्न घ्यावे. इच्छुक शेतकऱ्यांनी नजिकच्या ग्रामपंचायत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

00000

लेख

आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात

*गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

शेती करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात आणि मानवनिर्मित, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व येते. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाची गोपीनाथ मुंड शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना महत्वपूर्ण ठरत आहे.

घरातील व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होते. ऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना २००५-०६ पासून राबविण्यात येत होती. या योजनेत बदल करून दि. १९ एप्रिल २०२३ पासून अपघाती मृत्यू, अपंगत्वासाठी नवीन ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास मान्यता दिली आहे. या नवीन योजनेत शेतकऱ्यांसाठी अनुकूल कार्यपद्धती अवलंबली आहे. योजनेचे प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तालुकास्तरावरील तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीला देण्यात आले आहेत. अपघात घडल्यानंतर 30 दिवसाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव वारसदारानी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावयाचा आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून त्वरीत मदत वाटप थेट बँक खात्या करण्याची कार्यवाही तालुका कृषी अधिकारी करणार आहे.

अपघाताचे स्वरूपामध्ये शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू कीडनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचू दंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांचे हल्ल्ये, चावणे यामुळे जखमी किंवा मृत्यू, दंगल अन्य कोणतेही अपघात, तसेच अपघाताच्या व्याख्येनुसार कोणतेही अनपेक्षित आकस्मिक दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व यासह आता बाळंतपणातील मृत्यूचा देखील समावेश करण्यात आला आहे.

कुटुंबाची व्याख्या आणि अनुदानात अपघाताच्या दिवशी स्वतः वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य यात आई-वडील, शेतकऱ्याचा पती-पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती, असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना समावेश राहणार आहे. अपघाती मृत्यू, तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास २ लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास १ लाख रूपये लाभ अनुदान देण्यात येणार आहे.

योजनेच्या लाभासाठी अपघात घडल्यानंतर तीस दिवसांच्या आत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, फेरफार उतारा ६ ड, वारसनोंद उतारा ६ क, शेतकऱ्याच्या वयाचा दाखल्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलिस पाटील माहिती अहवाल, मरणोत्तर अहवाल, शवविच्छेदन अहवाल, वाहन परवाना, पाण्यात बुडून बेपत्ता झाल्यास प्रथम माहिती अहवाल आणि शेतपूर्ती बंधपत्र आवश्यक, बाळंतपणात मृत्यू झाला असल्यास शासकीय आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, अपंगत्व असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे लागणार आहे.

 

गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

00000



महिलांसाठी पेपर कव्हर इन्व्हलप प्रशिक्षण संपन्न

बुलडाणा, दि. 19 : सेंट्रल बँक सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे दि. 7 ते 16 मे दरम्यान सुंदरखेड ग्रामीण येथे दहा दिवसीय पेपर कव्हर इन्व्हलप तयार करण्याचे प्रशिक्षण पार पडले.

सुंदरखेडमधील महिलांनी यात सहभाग घेऊन स्वयंरोजगाराकडे पाऊल टाकले आहे. प्रशिक्षणादरम्यान कार्यालयामध्ये लागण्याऱ्या सर्व प्रकारच्या फाईल, लिफाफे, तसेच दिवाळी उत्सवासाठी लागणारे आकाश कंदील, केक बॉक्स, मिटाई बॉक्स तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी संस्थेचे संचालक श्री. पोटे, प्रशिक्षक मनिषा देव, सहायक स्वप्नील गवई यांनी प्रशिक्षनार्थ्यांना मार्गदर्शन केले. आरसेटी तर्फे विविध प्रशिक्षण देण्यात येते. तसेच बेरोजगारांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा, यासाठी सहकार्य करण्यात येते.

00000

लेख

शेतकऱ्यांसाठी पीएम प्रणाम योजना

*रासायनिक खताच्या वापरात बचत

आधुनिक शेतीच्या वाटेवर वाटचाल करीत असताना उत्पादन वाढीसाठी शेतीत विविध प्रयोग करण्यात येतात. त्याचबरोबर रासायनिक खताचा वापर असंतुलित होत असतो, त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतो. रासायनिक खताचा योग्य वापर करण्यासाठी माती परिक्षण करुन त्यानंतर दिल्या जाणाऱ्या पिकनिहाय शिफारशींचा विचार करुन खताच्या योग्य मात्रा दिल्यास, उत्पादन खर्च कमी होऊन रासायनिक खताच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचे नुकसान टाळता येऊ शकते. त्यासाठी नॅनो खताची पीएम प्रणाम योजना राबविण्यात येत आहे.

खर्चाचा भाग म्हणून जर रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी पिक आणि जमिनीच्या प्रतवारीनुसार गरजा या गोष्टींची संपुर्ण माहिती असावी. युरियाच्या अतिरिक्त वापराचे दुष्परिणामामुळे पिकाची अधिक वाढ होते. विशेष करुन पिकाची पाने लुसलुशीत आणि मऊ होतात. टणकपणा व कणखरपणा कमी झाल्याने कीड रोगाचा विशेष करुन रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो. सहाजिकच किटकनाशकाचा वापर करणे भाग पडते आणि उत्पादन खर्चात वाढ होते.

युरिया खताची अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो, जमिनीतील कार्ब : नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते. त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊन उत्पादनात घट होते.

युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना अॅझीटोबॅक्टर जिवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जिवाणू संवर्धकांची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. यामुळे पिकांमध्ये १५ ते २० टक्के नत्राची बचत होते. विशेष बाब म्हणजे ऊसामध्ये ५० टक्केपर्यत बचत होते. नत्र खते उघड्यावर फेकून देऊ नये. खते दिल्यानंतर जास्त पाणी देऊ नये. निचऱ्याद्वारे ऱ्हास होत नाही. हिरवळीचे खते, सेंद्रीय खते आणि द्विदल धान्य वापरल्याने जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीची सुपिकता वाढते.  तसेच रासायनिक खतामध्ये बचत होते.

शेणखत चांगले कुजलेले असावे अन्यथा पिक वाढीच्या अवस्थेत नत्राची कमतरता जाणवते, तसेच अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे हुमणी आणि इतर किटकांचा प्रादुर्भाव जाणवतो. शेणखताचा वापर पेरणीच्या 15-20 दिवस आधी करावा. खुप आधी टाकल्यास त्याची कार्यक्षमता पर्यायाने कमी होते. गांडुळ खताचा वापर करताना ते शक्यतो स्वतः तयार केलेले असावे, विकत आणल्यास त्याची गुणवत्ता तपासून घ्यावी. हिरवळीचे खत गिरीपुष्प, शेवरी पेरतानाच द्यावे, त्यामुळे पुढील 20-25 दिवसात त्यांचे विघटन होऊन नत्राची उपलब्धता होते. धैंचा किंवा बोरु २५ ते ४० किलो प्रति हेक्टर या प्रकारच्या हिरवळीच्या खताचा वापर पेरणीच्या 30-35 दिवसानंतर अथवा फुलोऱ्यावर येण्याआधी करावा. पिकांचे अवशेष शेतात असल्यास ते जागीच गाडुन टाकावे. मुग, चवळी, सोयाबीन, मटकी, कुळीत, गवार ही पिके फुलोऱ्याआधी जमिनीत गाडुन टाकावे. बाजारामध्ये विविध प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध आहेत. त्याच्या गरजेनुसार उपयोग करून अनावश्यक खर्च टाळावा.

मृदा आरोग्य अबाधित राखण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन चालना देण्याकरिता मृद तपासणीवर आधारित राज्यात ३१ जिल्ह्यास्तरावर शासकीय मृद तपासणी प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्य विश्लेषण करण्यात येते. त्यानुसार खताच्या वापराबाबत शिफारस करण्यात येते. त्याप्रमाणे खताचे नियोजन केल्यास बऱ्याच प्रमाणात रासायनिक खतांची बचत करता येईल. तसेच उत्पादन खर्च कमी होईल.

नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा वापर महत्वाचा ठरत आहे. नॅनो युरिया हा नत्राचा स्त्रोत असून, नॅनो डीएपी हे नायट्रोजन व फॉस्फरसचे उत्कृष्ट स्त्रोत आहे. हे द्रव रुपातील खते असल्यामुळे यांचा वापर जमिनीद्वारे न करता पानांवर फवारण्यासाठी केला जातो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य, पाणी व पर्यावरण प्रदूषण होत नाही. पारंपारिक खतांच्या किंमतीपेक्षा कमी किंमत असल्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी झाल्यामुळे उत्पन्न वाढ होते. त्यामुळे बाजारामध्ये उपलब्ध नॅनो युरियाची ५०० मिली बॉटलची किंमत २२५ रूपये इतकी असून पारंपरिक युरियाच्या ४५ किलो बॅगची किंमत २६६ रुपये इतकी आहे. पिकासाठी उपलब्ध नत्राचे प्रमाण तुलनात्मक सारखेच आहे. नॅनो डीएपीची ५०० मिलि बॉटलची किंमत ६०० रूपये इतकी असून पारंपारिक डीएपीच्या ५० किलो बॅगची किंमत १३५० इतकी आहे. तुलनात्मकदृष्ट्या उत्पादन खर्चाचा विचार केल्यास पारंपारिक युरिया व डीएपीऐवजी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचा वापर कमी खर्चाचा आहे.

खरीप-२०२३ साठी केंद्र शासनाकडील मंजूर आवंटनापैकी १० टक्के पारंपारिक युरियाचे आवंटन कमी करुन १७ लाख नॅनो युरियाच्या बॉटलचे आवंटन करण्यात आले आहे. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल बाजारात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या पीएम प्रणाम योजनेचे मुख्य उद्दिष्ट रासायनिक खताचा संतुलित, शाश्वत वापरास प्रोत्साहन देऊन धरणी मातेचे आरोग्य वाचवण्यासाठी रासायनिक खतांचा असंतुलित वापर टाळून सेंद्रिय, जैविक आणि नॅनो खताचा अवलंब करणे.आहे.

राज्यामध्ये लोकसहभागातून मातृभुमीचे आरोग्य पुनर्संचयित करण्याबाबत जागरुकता निर्माण करणे. नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, सेंद्रिय, जैविक आणि नॅनो खताच्या वापरास प्रोत्साहन देणे, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे, ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

मातीची सुपीकता पुनर्संचयित होणे. खतांच्या लिचिंग निक्षालनामुळे दूषित होणारे भु जलाचे प्रमाण कमी होईल. हरितगृह वायुचे उत्सर्जन कमी होऊन सेंद्रिय कार्बचे प्रमाण सुधारेल, ही या योजनेची फायदे आहेत.

मागील तीन वर्षाच्या सरासरी वापराच्या तुलनेत युरिया, डीएपी, एनपीकेएस आणि एमओपी या रासायनिक खतांचा वापर कमी करुन चालू वर्षाच्या खत वापराशी तुलना करुन बचत  होणाऱ्या अनुदानाच्या वाट्यापैकी ५० टक्के रक्कम राज्याना मिळणार आहे. सदर रक्कमेपैकी ६५ टक्के अनुदानाची रक्कम राज्यातील भांडवली प्रकल्पासाठी खर्च करण्यात येईल. उर्वरीत अनुदानाची रक्कम राज्याना कृषी विकास कार्यक्रमासाठी  दिली जाणार आहे.

 

मनोजकुमार ढगे,

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,

बुलडाणा.

000000