Thursday 29 June 2017

NEWS 29.6.2017 DIO BULDANA


जिल्हाधिकारी कार्यालयात
3 जुलै रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि.29 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 3 जुलै 2017 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                                ******
राहेरी पुलाच्या दुरूस्तीपोटी कंत्राटदाराच्या देयकाची अदायगी नाही
·        पुलाच्या ‘एक्स्पान्शेंन जॉईंट’चे काम पूर्ण
·        क्युरींग पिरेड पूर्ण होण्यापूर्वी वाहतूक सुरू करणे अत्यावश्यक
·        कंत्राटदारास 70 लक्ष रूपयांचे देयक नाही
  बुलडाणा, दि.29 : सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील राहेरी गावाशेजारील पुलाचे एक्स्पान्शंन जॉईंट व बेअरींग दुरूस्तीचे काम पुर्ण करण्यात आले आहे. सदर पुल वाहतूकीसाठी 28 एप्रिल 2017 रोजी खुला करण्यात आलेला आहे. पुलाच्या दुरूस्तीपोटी कंत्राटदाराला 70 लक्ष रूपयांचे देयक अदा केल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या, मात्र या पुलाच्या दुरूस्तीपोटी 26.31 लक्ष रूपयांचे देयक असून त्याची अदायगी अद्याप केलेली नाही, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.  
    या पुलाच्या एक्स्पान्शेंन जॉईंटचे काम करण्यात येत असताना एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली होती. एका बाजूचे एक्स्पान्शन जॉईंटचे क्रॉक्रींटीकरण करण्यात आलेले होते व ते पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काँक्रीटीकरण करण्यात आलेले होते. या कामाचा ‘क्युरींग पीरेड’ पूर्ण होण्यासाठी वाहतूक सुरू करणे अत्यावश्यक होते. त्यामुळे काँक्रीटच्या जाँईटला तडे जावून ते थोडे क्षतिग्रस्त झाल्याचे निदर्शनास आले. सदर काँक्रीटची मोजमापे 7.09 घनफूट इतके असून त्याची किंमत 45 हजार एवढी आहे. काँक्रीटच्या कामाचे देयक अद्याप अदा करण्यात आलेले नाही. सदरच्या दुरूस्तीविषयी कंत्राटदारास अवगत करण्यात आलेले आहे.  सदर काम करीत असताना वाहतुक  सुरू असल्यामुळे काँक्रीटला बळकटी येण्यापूर्वी वाहतूक सुरू करावी लागली. त्यामुळे काँक्रीटचा काही भाग क्षतिग्रस्त झाला, असे कार्यकारी अभियंता, सा.बां, बुलडाणा यांनी कळविले आहे.
*****
पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यात पशुसमृद्धी सप्ताहाचे आयोजन
·        5 जुलै 2017 पर्यंत राबविण्यात येणार सप्ताह
  बुलडाणा, दि.29 : राष्ट्रीय विकास योजनेतंर्गत विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये महादूध ही विशेष दुग्ध विकास योजना मंजरू करण्यात आली आहे. या योजनेची सुरूवात जिल्ह्यातही करण्यात आली आहे. योजनेतंर्गत प्रकल्प क्षेत्रातील गावांमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसमृद्धी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सदर सप्ताह 5 जुलै 2017 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
  सप्ताहादरम्यान निवडलेल्या गावांमध्ये पशुवैद्यकीय उपचार शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सदर शिबिरांमध्ये गावातील जनावरांना नाममात्र एक रूपया सेवाशुल्क आकारून कृत्रिम रेतन, आजारी जनावरांना उपचार, वंध्यत्व तपासणी, शस्त्रक्रीया, गर्भ तपासणी, गोचिड, गोमाशा औषध फवारणी करण्यात येणार आहे. दुध संकलन, दुध उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन व विक्रीकरीता आवश्यक सुविधा महादूध या योजनेतंर्गत निर्माण करण्यात येणार आहे.  राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या सहकार्याने ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. हा शासनाचा अत्यंत महत्वांकांक्षी प्रकल्प असून याद्वारे पशुपालकांचे उत्पन्न वाढणार आहे. पशुवैद्यकीय सेवा या योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दुधाळ जनावरे वाटप, वैरण बियाणे, ठोंब वाटप, लसीकरण करण्यात येणार आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविले आहे.
                                                                        *****
क्रीडा प्रबोधीनीमध्ये खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन
  बुलडाणा, दि.29 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत सन 2017-18 मध्ये ॲथेलेटीक्स, जलतरण, जिन्मॅस्टीक, हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, आर्चरी, ज्युदो, बॉक्सींग, कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, वेटलिफ्टिींग व शूटींग या खेळनिहाय कौशल्य चाचण्यांचे आयोजन 7 व 8 जुलै 2017 रोजी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात येणार आहे.
   या खेळांमध्ये जे खेळाडू राज्याचे रहिवासी आहेत व राज्यस्तरावर सहभागी झालेले 19 वर्षाच्या आतील खेळाडू सदर चाचणीस पात्र असणार आहे. सहभागी होणाऱ्या खेळाडूंची केवळ निवास व्यवस्था करण्यात येणार असून त्यांचेसोबत येणारे पालक व क्रीडा मार्गदर्शकांची निवासव्यवसथा करण्यात येणार नाही. सदर खेळाडूंनी प्रवास, भोजन खर्च स्वत: करावयाचा आहे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी कळविले आहे.
                                                                                    ****
शासकीय जाहीरात धोरणाबाबत 5 जुलै पर्यंत हरकती/सूचना आमंत्रित
            बुलडाणा, दि. 29 : शासकीय जाहिरात धोरणात बदल करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 24 जानेवारी 2017 रोजीच्या शासन निर्णय क्रमांक : पीयुबी-2016/प्र.क्र.36/34 नुसार अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे धोरण तयार करण्याकरिता विषयवार उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
            महाराष्ट्र शासनामार्फत वृत्तपत्रे व नियतकालिकांना देण्यात येणाऱ्या वर्गीकृत व दर्शनी जाहिरातींच्या वितरण धोरणाची नियमावली तयार करुन ती दिनांक 1 मे 2001 च्या शासननिर्णयानुसार अंमलात आली आहे. तथापि गेल्या पंधरा वर्षात जाहिरात क्षेत्रात झालेले बदल व सोशल मीडियासह उदयाला आलेली नवीन प्रसारमाध्यमे लक्षात घेता नवीन सर्वंकक्ष जाहिरात धोरण तयार करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने वृत्तपत्रे व अन्य मुद्रित माध्यमांना अपेक्षित असणारे बदल व सूचना (मुद्यांच्या स्वरुपात) त्यांनी दिनांक 5 जुलै 2017 पर्यंत jahidhoran2017@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात येत आहे.
                                                                                    ***

4 कोटी वृक्षलागवड मोहिमेसाठी वृक्षदिंडीचे आयोजन
            बुलडाणा, दि. 29 : राज्य शासनाचा अत्यंत महत्वांकांक्षी उपक्रम असलेली 4 कोटी वृक्षलागवड मोहिम 1 जुलै ते 7 जुलै 2017 अशी सप्ताहाभर राबविण्यात येणार आहे.या मोहिमेच्या जनजागृतीसाठी वृक्ष दिंडीचे आयोजन आज शहरात करण्यात आले. सदर वृक्षदिंडीला जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, उपवनसंरक्षक बी.टी भगत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक आदी उपस्थित होते. सदर वृक्षदिंडीचे आयोजन सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व राष्ट्रीय हरीत सेना यांच्यावतीने करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षकही उपस्थित होते.
                                                

Wednesday 28 June 2017

news 28.6.2017 dio buldana

 ‘महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा जाहीर

*          निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
*          पंचवीस, वीस व पंधरा हजार रुपयांची पारितोषिके
*          तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे
बुलडाणा, दि. 28 : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा जाहीर केली आहे.
या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 25 हजार रूपये, 20 हजार रूपये, 15 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा, मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, माझी कन्या भाग्यश्री, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील.
      स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी maha.photo01@gmail.com या ईमेल वर दि.15जुलै 2017 पर्यंत छायाचित्र पाठवावीत. ही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ही छायाचित्र 18X30 इंच एचडी (हाय रिझॉल्युशन) असावीत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून सादर होणाऱ्या छायाचित्रांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हक्क राहतील.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक सहायक संचालक(माहिती) सागरकुमार कांबळे (9175544155) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
******
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर
  • जुलै ते डिसेंबर 2017 दरम्यानचा कार्यक्रम
     बुलडाणा दि. 28 - माहे जुलै ते डिसेंबर 2017 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत.
   शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जुलै 2017 मध्ये : जळगाव जामोद 3 जुलै, शेगाव 5 , मेहकर 13 , खामगांव 7 व 21, चिखली 10, नांदुरा 18, मलकापूर 20, सिंदखेड राजा 24, लोणार 6 व देऊळगाव राजा येथे 11 जुलै रोजी होणार आहे. ऑगस्ट 2017 मध्ये : जळगाव जामोद 4 ऑगस्ट, शेगाव 8, मेहकर 16, खामगांव 10 व 21, चिखली 11, नांदुरा 18, मलकापूर 22, सिंदखेड राजा 24, लोणार 9 व देऊळगाव राजा 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. सप्टेंबर 2017 मध्ये :  जळगाव जामोद 4 सप्टेंबर, शेगाव 7 , मेहकर 18, खामगांव 11 व 21 , चिखली 12 , नांदुरा 19 , मलकापूर 22, सिंदखेड राजा 25, लोणार 8 व देऊळगाव राजा येथे 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. ऑक्टोंबर : जळगाव जामोद 5 ऑक्टोंबर, शेगाव 6, मेहकर 17, खामगांव 12 व 23, चिखली 13, नांदुरा 24, मलकापूर 25, सिंदखेड राजा 26, लोणार 9 व देऊळगाव राजा येथे 16 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. नोव्हेंबर : जळगाव जामोद 6 नोंव्हेंबर, शेगाव 7, मेहकर 17, खामगांव 13 व 23, चिखली 14, नांदुरा 20, मलकापूर 21, सिंदखेड राजा 24, लोणार 9 व देऊळगाव राजा येथे 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. डिसेंबर 2017 मध्ये : जळगाव जामोद 4 डिसेंबर, शेगाव 5 , मेहकर 18, खामगांव 11 व 22, चिखली 12, नांदुरा 19, मलकापूर 21, सिंदखेड राजा 26, लोणार 7 व देऊळगाव राजा येथे 14 डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
*****
आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांना विनामुल्य
स्पर्धा परिक्षापुर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
बुलडाणा, दि.28 : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर, कॅम्प, परतवाडा. जि. अमरावती येथे नोकरीच्या विविध पदासाठी घेण्यात येणा-या स्पर्धा परिक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामुल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करुन घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतिन महिन्यांचा असुन या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा रु. 1000 दराने विद्यावेतन देण्यात येते.
प्रशिक्षण यशस्विरित्या पुर्ण केल्यानंतर स्पर्धा परिक्षेचा अभ्या करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामुल्य देण्यात येतो. या प्रशिक्षणाकरीता उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील असुन दि. 01 ऑगस्ट, 2017 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण परंतु दि. 15 सप्टेंबर, 2017 रोजी त्याने 30 वर्ष पुणे केलेले नसावे. तसेच त्याने किमान एसएससी परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी व तो सद्या कोणतेही शिक्षण किंवा प्रशिक्षण घेत नसावा. तरी सदर पात्रतेच्या इच्छुक उमेदवारांनी दि. 1 ऑगस्ट, 2017 पासुन सुरु होणा-य दुस-या सत्रासाठी दिनांक 25 जुलै 2017 पर्यंत, आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, स्टेट बँकेजवळ, अचलपुर, कॅम्प, परतवाडा. ता. अचलपुर. जि. अमरावती फोन नं. 07223-221205 किंवा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व सहाय्य केंद्र, धारणी जि. अमरावती येथे अर्ज करावेत.

अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी उत्तीर्णची गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र/प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास कार्यालयात नांव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड, इत्यादी प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती व एक छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. तसेच http://rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेले ऑनलाईन कार्ड सोबत आणावे. यापुर्वी सदर प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी यासाठी पुन्हा अर्ज करु नये. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, अचलपुर, जि. अमरावती यांनी केले आहे. 

Tuesday 27 June 2017

NEWS 27.6.2017 DIO BULDANA


शासनाच्या कर्जमाफी निर्णयामुळे 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 होणार कोरा
- कृषिमंत्री
* जिल्हा परिषदेत कर्जमाफीबद्दल सत्कार कार्यक्रम
* शेतकऱ्यांना खरीप हंगामात होणार लाभ
बुलडाणा, दि.27 - राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील शेतकऱ्यांची 30 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफीमुळे शेतकरी आनंदीत झाला असून येणाऱ्या खरीप हंगामात मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. या निर्णयाचे अनेक फायदे होणार आहे. त्यापैकी राज्यातील जवळपास 40 लक्ष शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले.
   कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे पहिल्यांदाच बुलडाणा शहरात आगमन झाले. त्यानिमित्ताने जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री सत्काराला उत्तर देताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जि.प महिला व बालकल्याण सभापती श्रीमती श्वेता महाले आदी उपस्थित होते.
   कर्जमाफीचा निर्णय हा सहजा-सहजी झाला नसल्याचे सांगत कृषिमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी या विषयाची गंभीरता लक्षात घेवून उच्चस्तरीय मंत्रीगटाची स्थापना केली. या मंत्रीगटाने आंदोलनकर्त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी, सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरसकट दीड लक्ष रूपयापर्यंतच्या पीक कर्जाला माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातला कर्जामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी सुखावला आहे. शासनाने सर्व तांत्रिक कारणे निकाली लावून सर्वंकष असा हा निर्णय घेतला आहे. कुठल्याही प्रकारच्या जमिनीची अट शासनाने यामध्ये ठेवली नाही. सरसकट दीड लाख रूपयापर्यंतची कर्जमाफी दिली. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत 25 हजार रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  ते पुढे म्हणाले, या निर्णयामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याआधीच्या कर्जमाफी निर्णयांमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार करण्यात आलेला नव्हता. या निर्णयात मात्र नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रकर्षाने विचार करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी तातडीने 10 हजार रूपये मदत देण्यात येत आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
    यावेळी जि.प अध्यक्षा उमाताई तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचलन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार प्रदर्शन जि.प सदस्य संजय वडतकर यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्यावतीने जि.प अध्यक्षा यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सत्कार केला. तसेच जि.प प्रशासनाच्यावतीनेही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
कोलवडच्या जिल्हा परिषदेत शाळेत जिल्हाधिकारी यांनी केले नवागतांचे स्वागत
बुलडाणा,दि.27- जिल्ह्यात आजपासून शाळा सुरू झाल्या. लहानग्यांना घेवून मोठ्या लगबगीने पालकांनी शाळा गाठल्या. शाळांमध्ये आजपासून ही किलबिल सुरू झाली. त्याला जिल्हा परिषदेच्या शाळाही अपवाद नाहीत. कोलवड ता. बुलडाणा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी उच्च माध्यमिक प्राथमिक शाळेत आज जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भेट दिली. त्यांनी नवोगत विद्यार्थ्यांचे, चिमुकल्यांचे स्वागत केले आणि त्यांच्याशी संवाद साधला.
   यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती शंकर जाधव, गटशिक्षणाधिकारी श्री. आंधळे यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्याहस्ते इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी चिमुकल्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. यावेळी मुख्याध्यापक श्री. वाघ, श्रीमती  बोर्डे, श्रीमती राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मटोले, केंद्रप्रमुख आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
                                                                           *****
कर्जमाफीमुळे जिल्हा बँकेला मिळणार नवसंजीवनी
-         पालकमंत्री
·        जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत सत्कार कार्यक्रम
बुलडाणा, दि. 27 – बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही आर्थिक अडचणीत असणारी बँक होती.  मात्र नाबार्ड व केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीने बँक अडचणीतून बाहेर यायला लागली. बँकिंगचा परवाना मिळाल्यानंतर बँकेचे व्यवहार सुरू झाले. यावर्षीही बँकेने सीआरएआर 10.84 टक्के एवढा राखून चांगली कामगिरी बजावली आहे. कर्जमाफीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेला सर्वात जास्त लाभ मिळणार आहे. ही कर्जमाफी जिल्हा बँकेला मिळालेली नवसंजीवनी असल्याचे मत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केले.
   जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या सभागृहात कर्जमाफीच्या निर्णयानंतर पहिल्यांदा बुलडाणा शहरात आगमनप्रसंगी पालकमंत्री यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, बँकेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण चव्हाण, नाबार्डचे सुभाष बोंदाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. श्रोते आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी याप्रसंगी जिल्हा बँकेच्या कृषि कर्ज वितरणाचा आढावा घेतला.
      शासनाच्या ऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयामुळे जिल्हा बँकेचे खातेदार असलेला शेतकरी उत्साहित झाला असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, जिल्हा बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक आहे. बँकेच्या अथक परिश्रमामुळे व शेतकऱ्यांनी वसुलीमध्ये दिलेल्या भरपूर सहकार्यामुळे बँक उर्जितावस्थेकडे वाटचाल करीत आहे. लवकरच बँकेला राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने द्यावयाचे 10 हजार रूपये बँकेमार्फत देण्यात येतील.   
   कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री यांचा जिल्हा बँक प्रशासन व कर्मचारीवृंद, जिल्हाधिकारी, उपनिबंधक यांनी सत्कार केला. प्रास्ताविक डॉ. अशोक खरात यांनी केले. ते म्हणाले, बँक प्रशासनाने बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत करण्यासाठी मुख्यालयीन डेटा सेंटर केले आहे. त्याशिवाय डेबीट/क्रेडीट कार्डचे वाटप करण्यात आले आहे. या कर्जमाफीचा लाभ बँकेच्या 59 हजार 450 शेतकरी खातेदार सभासदांना होणार आहे. त्यांची 285.94 कोटी रूपयांची कर्जमाफी झाली आहे. तसेच दीड लाखाचे वरील 1870 शेतकऱ्यांचे 35.98 कोटी रूपयांची मागणी बँकेची आहे. या शेतकऱ्यांना 28.05 कोटी  रूपयांची रक्कम प्रत्यक्षात मिळणार आहे. अशाप्रकारे बँकेला या कर्जमाफीच्या निर्णयामुळे 317.53 कोटी रूपयांचा लाभ होणार आहे.
  यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार श्री इथापे यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                                                    *****   

Friday 23 June 2017

news 23.6.2017 DIO BULDANA

खरीप हंगाम 2017 करीता प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू
  • 31 जुलै 2017 पर्यंत शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घ्यावा
  • कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा बंधनकारक, कापूस व सोयाबिनला 40 हजार रूपये विमा संरक्षण
  • प्रति हेक्टरी कापसाला 2000, तर सोयाबीनला 800 रूपये हप्ता
  • जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी नियुक्त
बुलडाणा, दि. 23 -  खरीप हंगाम 2017 साठी जिल्ह्यात प्रधानमंत्री  पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार  पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येणार आहे. तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखून शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास आर्थिक मदतीची शाश्वती मिळणार आहे. जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे. विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होवून आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.
     जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पिक विमा बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के मर्यादीत ठेवण्यात आला आहे. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिम स्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. या योजनेसाठी जिल्ह्याकरीता भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई, क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टावर्स, 20 वा मजला, पुर्व खंड, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ही कंपनी कार्यान्वीयन यंत्रणेला नियुक्त करण्यात आली आहे. अधिसूचीत क्षेत्रात, अधिसुचीत पिक घेणारे (कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत.  शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2017 पर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक 18001030061 वर संपर्क साधावा.
-         या नुकसानीला मिळणार विम्याचा लाभ-
पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पिक पेरणी पूर्व/लावणी पूर्व नुकसान भरपाई, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात झालेले नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती -मुळे होणारे नुकसान, या बाबींमुळे होणाऱ्या नुकसानीला आता विम्यापोटी भरपाई मिळणार आहे.
-         असा आहे विम्याचा हप्ता
  पिक विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर खालीलप्रमाणे
खरीप ज्वारी : विमा संरक्षीत रक्कम 24 हजार, हप्ता 480 रूपये (प्रति हेक्टर), मका : विमा संरक्षीत रक्कम 25 हजार, हप्ता 500 रूपये, तुर : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600 रूपये, मुग : विमा संरक्षीत रक्कम 18 हजार, हप्ता 360 रूपये, उडीद : विमा संरक्षीत रक्कम 18 हजार, हप्ता 360 रूपये, भुईमुग : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600 रूपये, सोयाबीन : विमा संरक्षीत रक्कम 40 हजार, हप्ता 800 रूपये, तीळ : विमा संरक्षीत रक्कम 22 हजार, हप्ता 440 रूपये आणि कापूस पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 40 हजार, हप्ता 2000  रूपये राहणार आहे.
                                                                                *******                  
सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन
बुलडाणा दि 23 - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सोमवार, 26 जून 2017 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
   कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर असणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थितीत खासदार प्रतापराव जाधव, श्रीमती रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे असणार आहे. कार्यक्रमाला विशेष आमंत्रित म्हणून आमदार सर्वश्री गोपीकिशन बाजोरीया, श्रीकांत देशपांडे, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, राहूल बोंद्रे, डॉ. शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, हर्षवर्धन सपकाळ व नगराध्यक्षा श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद असणार आहेत. प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ.  चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना,  समाज कल्याण सभापती डॉ. गोपाल गव्हाळे तर मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस असणार आहेत. तरी कार्यक्रमास उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अमोल यावलीकर व जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.
*****
पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जाहीर
·        शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
·        पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सहभाग बंधनकारक
·        डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी 14 जुलै पर्यंत बँकांना प्रस्ताव सादर करावे

     बुलडाणा, दि.23 : प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2017-18 करीता जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये डाळींब या फळपिकास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनेद्वारे कमी/ जास्त पाऊस, पावसाचा खंड व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते.  फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखल्या जाते.
  अधिसुचीत क्षेत्रात अधिसुचीत फळपीक घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जे शेतकरी विविध वित्तीय संस्थेकडून पीक कर्ज घेतात अशा कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहणार आहे. फळपीक निहाय निर्धारीत केलेले हवामान धोके  लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय राहणार आहे. विमा क्षेत्राचा घटक हा महसूल मंडळ असणार आहे. डाळींब फळपिकाकरीता विम्याची संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 1 लक्ष 10 हजार असणार असून विमा हप्ता प्रती हेक्टरी 5500  राहणार आहे.  
   बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी यांना तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत डाळींब पिकाकरीता 14 जुलै आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी किंवा क्षेत्रीय अधिकारी असलेल्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
-         या महसूल मंडळात डाळींब फळपिकासाठी असणारा विम्याचा लाभ –
चिखली तालुका : पेठ, चिखली, चांधई, हातणी, अमडापूर, शेळगांव आटोळ, बुलडाणा : बुलडाणा व धाड, मोताळा : शेलापूर, बोराखेडी, मोताळा, धा.बढे. खामगांव : हिवरखेड व काळेगांव, दे.राजा : दे.राजा, अंढेरा, दे. मही, तुळजापूर, मेहुण राजा, जळगाव जामोद : जामोद, मलकापूर : नरवेल व जांभुळधाबा.
*********




क्रीडा प्रबोधिनी निवासी व अनिवासी प्रवेश
सरळ प्रवेश व खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन
            बुलडाणा, दि. 23 : क्रीडा व युवक सेवा संचालनलायाच्या अधिपत्याखालील शिवछत्रपती क्रीडापीठाअंतर्गत राज्यातील 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये ॲथलेटिक्स, ज्युदो, शूटींग, सायकलींग, वेटलिफ्टिंग, हॉकी, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, फुटबॉल, कुस्ती, टेबल टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, आर्चरी, हॅण्डबॉल या खेळातील चाचण्यांचे आयोजन राज्यस्तरावर करण्यात आले असुन चाचण्या आयोजनाचे प्रवेश पध्दतीनुसार आयोजनाचा कार्यक्रम इरविण्यात आला आहे.
   सरळ प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी ॲथलेटिक्स, जलतरण, जिम्नॅस्टिक, ट्रायथलॉन, ज्युदो, बॉक्सिंग, सायकलींग, कुस्ती या खेळ प्रकाराकरीता 28 जून 2017 रेाजी चाचणी असणार आहे. तसेच हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, शूटिंग, वेटलिफ्टिंग या खेळ प्रकारासाठी 29 जून 2017 रोजी चाचणी होणार आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये चाचणी ही शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे होणार आहे. तर आर्चरी या खेळ प्रकारासाठी 29 जून 2017 रोजी चाचणी प्राचार्य, क्रीडा प्रबोधिनी विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे.
             सरळ प्रवेशाकरीता वरील नमुद खेळातील जे खेळाडु महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, राष्ट्रीयस्तर सहभागी झालेले आहेत व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने विजयी झालेले 17 वर्षाखालील खेळाडू या सरळ प्रवेश प्रक्रीयासाठी पात्र आहेत. सरळ प्रवेश प्रक्रीया करीता जे खेळाडू उपरोक्त नमुद नियमानुसार क्रीडा प्रबोधिनीसाठी मान्य खेळ असलेल्या खेळातील पात्र खेळाडूंनी उपरोक्त नमुद केलेल्या खेळनिहाय तारखेस आवश्यक प्रमाणपत्रासहीत सकाळी 8.00 वाजता चाचणी ठिकाणी उपस्थित राहावे असे शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
****
परीक्षेत्रीय पोलीस मेळाव्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कागगिरी
·        दोन अधिकारी व 14 पोलीस कर्मचाऱ्यांचा मेळाव्यात सहभाग
·        जिल्ह्याला दुसरा क्रमांक
 बुलडाणा, दि. 23 : दरवर्षीप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली 19 ते 21 जून 2017 दरम्यान 15 व्या अमरावती परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण अमरावती विभागातून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
   मेळाव्यात पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना व अप्पर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्ह्यातील दे.राजा चे ठाणेदार सारंग नवलकर यांचे नेतृत्वात दोन अधिकारी व 14 पोलीस कर्मचारी यांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक शेवानंद वानखडे यांनी फॉरेन्सीक सायन्समध्ये द्वितीय क्रमांक पटकविला आहे. तसेच लेवलिंग ॲण्‍ड पॅकिंग टेस्टमध्ये  तृतीय क्रमांक पटकाविला. पोलीस उपनिरीक्षक दिनकर गोरे यांनी लेबलिंग ॲण्ड पॅकिंग टेस्टमध्ये द्वितीय व फिंगर प्रिंट टेस्टमध्ये तृतीय, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गिते यांनी कॉम्प्युटर अवरनेस ऑफीस ऑटो टेस्टमध्ये प्रथम, तर ऑब्जेक्टीव्ह टेस्टमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. संतोष जमधडे यांनी साहेबराव शिंदे यांनी डॉग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. पोहेकॉ आरिफ व पो.ना प्रशांत शास्त्री यांनी घातपात विरोधी तपासणीमध्ये प्रथम, पोहकॉ सुधाकर तारकसे यांनी निरीक्षण चाचणी स्पर्धेत तृतीय, पोना संजय डोंगरदिवे यांनी निरीक्षण चाचणीमध्ये द्वितीय आणि पोकॉ संदीप मिसाळ यांनी छायाचित्रण स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.
   या स्पर्धेमध्ये पोना सुनील वाघमारे, संजय भुजबळ, पवन मखमले यांनी संगणक जनजागृती स्पर्धेत, तर पोकॉ संदीप डोंगरे, चंद्रकांत शिंदे, राहुल जाधव यांनी छायाचित्रण स्पर्धेत सहभाग नोंदविला.   संपूर्ण स्पर्धेत बुलडाणा जिल्हा पोलीस दलास द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

                                                           *****

Thursday 22 June 2017

news 22.6.2017 DIO BULDANA

अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पं. दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना
  • वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा
  • swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे
बुलडाणा, दि.22 -  राज्यात विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय वसतिगृह योजना कार्यान्वीत आहे. तर जिल्हास्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह, अथवा पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यापैकी कोणत्याही एका योजनेची निवड करावी.
  विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमाचे निकाल लागल्यापासून एक महिन्याचे आत www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. स्वयंम योजनेकरीता नवीन व जुने प्रवेशार्थींनी ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज संबंधित महाविद्यालयाकडे सादर करावेत. त्याचप्रमाणे विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 11 व 12 वीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच तालुका व ग्रामीण स्तरावर इयत्ता 8 वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या नवीन व जुन्या प्रवेशार्थींनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वर नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावयाची आहे.
  तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर तात्काळ संपर्क करून ऑनलाईन अर्ज सादर करावे. ऑनलाईन अर्ज नोंदणीस काही अडचणी येत असल्यास त्यासाठी नजीकच्या वसतीगृहाचे गृहपाल यांचेकडे संपर्क करावा, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी कळविले आहे.  
                                                           *****
आदिवासी विकास विभागाचे पाऊल पडते पुढे..
·        शासकीय आश्रम शाळांमध्ये थेट लाभ हस्तांतरण योजना
·        पालकांसाठी आश्रम शाळांमध्ये जनजागृती मेळाव्यांचे आयोजन
बुलडाणा, दि.22 -  राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने प्रगती व पारदर्शकतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत शासकीय आश्रम शाळांमध्ये थेट लाभ हस्तांतरण योजना कार्यान्वीत केली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय आश्रम शाळेमार्फत मिळणाऱ्या सोयी-सुविधा आता शासन स्तरावरून रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी आपल्या आवडी-निवडीप्रमाणे वस्तु/साहित्य खरेदी करतील. परिणामी निर्णय क्षमता वाढून आदिवासी समाज हा अन्य समाजाप्रमाणे व्यवहार करणे शिकेल व मुख्य प्रवाहात येईल, असा मानस या विभागाचा आहे.
   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत 8 शासकीय आश्रम शाळा आहेत. या शाळांमधून 2 शासकीय आश्रमशाळाववर प्रायोगित तत्वावर थेट लाभ हस्तांतरण योजना राबवायची आहे. त्यामध्ये सायखेड ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा व मुसळवाडी ता. मालेगांव, जि. वाशिम या शाळांचा समावेश आहे. या शाळांवर पालकांच्या उद्बोधनासाठी जनजागृती मेळाव्यांचे आयोजनही केल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे अन्य 6 शासकीय आश्रमशाळांमध्येसुद्धा अंशत: थेट लाभ हस्तांतरण करण्यात येत आहे. आश्रम शाळेवरील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या माध्यमातून गावागावात सदर योजनेचा प्रसार व प्रचार सुरू करण्यात आला आहे, असे प्रकल्प अधिकारी विनीता सोनावणे यांनी कळविले आहे.
                                                                                    ******


बुलडाणा येथील शासकीस वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

     बुलडाणा, दि. 22 : येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या  शासकीय वसतिगृहात रिक्त झालेल्या जागांवर सन 2017-18 या शैक्षणिक सत्रामध्ये गुणवत्तेनिहाय व प्रवर्ग निहाय प्रवेश देणे सुरू आहे.  इयत्ता 7 वी, 10 वी व 12 वी पास तसेच अपंग, अनाथ, विशेष मागास प्रवर्ग, अनुसूचित जमाती, विजाभज, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थीनींना प्रवेश देण्यात येत आहे. मध्यतरीच्या वर्गातील शिकत असलेल्या विद्यार्थींनींना प्रवेश देता येत नाही.
     विहीत नमुन्यातील प्रवेश अर्जाचा नमुना संबंधित वसतीगृहात उपलब्ध आहे. प्रवेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या सामाजिक आरक्षण व नियमावलीअन्वये करण्यात येणार आहे. तरी गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज घेवून जावून आवश्यक त्या कागदपत्रांसह विहीत कालावधीत वसतीगृहात जमा करावे. वसतिगृहामध्ये मोफत भोजन, अंथरून, पांघरून, शैक्षणिक पुस्तके, स्टेशनरी साहित्य, निर्वाह भत्ता, गणवेश रक्कम आदी सुविधा विनामुल्य देण्यात येतात. अधिक माहितीसाठी 9518743219 क्रमांकावर संपर्क साधावा.  तरी मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल कु. कविता गावंडे यांनी केले आहे.
*****
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज आमंत्रित
·        10 जुलै 2017 पर्यंत अर्ज सादर करावे

     बुलडाणा, दि. 22 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. मातंग समाजातील इयत्ता 10, 12 वी, पदवी व पदविका, अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेत कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय निवड केल्या जाते. मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीगं, मादीगं, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी या पोटजातील विद्यार्थी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. सदर अर्ज सादर करण्याची शेवटची तारिख 10 जुलै 2017 आहे. या तारखेपर्यंत अर्ज सादर करतेवेळी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे दाखल करावी. सदर अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे दाखल करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
   नांदुरा व मलकापूर येथील शासकीस वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

     बुलडाणा, दि. 22 : नांदुरा व मलकापूर येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलांच्या, मुलींच्या  शासकीय वसतिगृहात रिक्त झालेल्या जागांवर सन 2017-18 या शैक्षणिक सत्रामध्ये गुणवत्तेनिहाय व प्रवर्ग निहाय प्रवेश देणे सुरू आहे.  इयत्ता 7 वी, 10 वी व 12 वी पास तसेच अपंग, अनाथ, विशेष मागास प्रवर्ग, अनुसूचित जमाती, विजाभज, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थीनींना प्रवेश देण्यात येत आहे. मध्यतरीच्या वर्गातील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येत नाही.
     विहीत नमुन्यातील प्रवेश अर्जाचा नमुना संबंधित वसतीगृहात उपलब्ध आहे. प्रवेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या सामाजिक आरक्षण व नियमावलीअन्वये करण्यात येणार आहे. तरी गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज  घेवून जावून आवश्यक त्या कागदपत्रांसह विहीत कालावधीत वसतीगृहात जमा करावे. वसतिगृहामध्ये मोफत भोजन, अंथरून, पांघरून, शैक्षणिक पुस्तके, स्टेशनरी साहित्य, निर्वाह भत्ता, गणवेश रक्कम आदी सुविधा विनामुल्य देण्यात येतात. अधिक माहितीसाठी 8806375908  क्रमांकावर संपर्क साधावा.  तरी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल विनोद शिंदे यांनी केले आहे. या वसतिगृहाचा पत्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मोताळा रोड, कॉटन मार्केट समोर, नांदुरा, जि. बुलडाणा असा आहे.तर मलकापूरचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मा.व.मुलींचे शासकीय वसतिगृह, मलकापूर, जि. बुलडाणा आहे.
*****