Tuesday 10 December 2019

DIO BULDANA NEWS 10.12.2019

राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठान अंतर्गत ग्रंथालयांना असमान निधी योजनेतून अर्थसहाय्य
·        20 डिसेंबर 2019 पर्यंत ग्रंथालयांनी अर्ज करावे
बुलडाणा, दि.१० :  भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजने अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात. त्यानुसार सन 2019-20 साठी असमान निधी योजनेतंर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.     
         ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य,  राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, ५०,६०, ७५, १००, १२५ आणि १५० वे महोत्सवी वर्ष असल्यास हे वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य आणि बाल ग्रंथालय व राजा राममोहन ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसहाय्य या योजनेतून देण्यात येते. या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
   या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी संकेतस्थळावर संपर्क साधावा. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहीत मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात २० डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावे, असे आवाहन ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    *****
मनरेगातंर्गत तक्रार निवारण प्राधिकारी पदासाठी अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि.१० :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत  मजुर, योजनेचे लाभार्थी व सामान्य नागरिक यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी व योजनेमध्ये पारदर्शकता, उत्तरदायीत्व व सहभाग वाढविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 कलम 27 (1) अंतर्गत जिल्हास्तरावर तक्रार निवारण अधिका-याची (ombudsman) नियुक्ती करण्यासाठी  ईच्छुक व्यक्तीकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.
      या पदासाठी अर्ज करणा-या व्यक्तीस लोकप्रशासनाचा, कायद्याचा , सामाजिक कार्य, शैक्षणिक किंवा व्यवस्थान क्षेत्रातला किमान 20 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा किमान पदव्युत्तर Post Graduate), संगणकीय ज्ञान असणारा (किमान एमएससीआयटी असावा, त्याव्यक्तीचा राजकीय पक्षाशी कोणत्याच प्रकारचा संबध नसावा, सदर व्यक्ती शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व सक्षम असावी, अतिदूर भागात दौरे , निरीक्षणे करण्यास सक्षम असावी, निवड होणा-या तक्रार निवारण अधिका-याची (ombudsman) चा कालावधी 2 वर्षाचा राहणार असून या अधिका-याचे मुख्यालय जिल्हयाचे ठिकाणी राहिल व त्यास मासिक बैठक भत्ता 1 हजार रूपये प्रति बैठक या दराने (मात्र दरमहा कमाल 20 हजार रूपये एवढया मर्यादेत), तांत्रिक व प्रशासकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. उमेदवारांस शासन निर्देशीत करील अशा ठिकाणी स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाणी हजर रहावे लागेल.

      इच्छूकांनी सदर अर्ज ए-4 पेपरसाईज चे कागदावर, एका बाजुनेच (one side) संगणकीय टंकलीखीत केलेला असावा. सदर अर्जात अर्जकर्त्याचे पूर्ण नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक(landline), भ्रमणध्वनी (Mobile No.), ईमेल आयडी, शैक्षणीक पात्रता, सेवापुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स, अनुभवाचे सविस्तर वर्णन (शेवटी कार्यरत कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी आदींसह), कोणत्याही राजकीय पक्षाशी संबधीत नसल्याचे व कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र, फिटनेस (Fitness)बाबत वैद्यकीय दाखला,पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रांसह अर्ज दि.30 डिसेंबर 2019 पुर्वी कार्यालयीन दिवशी दु 1 वाजता पावेतो जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो शाखा), बुलडाणा येथे समक्ष सादर करावा. सोबत शैक्षणीक पात्रतेच्या, अनुभवा संबधीत सर्व कागदपत्र, सेवापुस्तक पहिल्या पानाची झेरॉक्स स्वसाक्षांकीत करुन जोडावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****
वैश्विक आरोग्य संरक्षण दिनानिमित्त 12 डिसेंबर रोजी आरोग्य शिबिर
·        शेगांव, लव्हाळा ता. मेहकर, सावळा ता. बुलडाणा व दाताळा ता. मलकापूर येथे आयोजन
बुलडाणा, दि.१० :  जिल्ह्यामध्ये वैश्विक आरोग्य संरक्षण दिनाचे औचित्य साधून गुरूवार, १२ डिसेंबर २०१९ रोजी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर अंगीकृत रूग्णालयांमार्फत सईबाई मोटे शासकीय उपजिल्हा रूग्णालय शेगांव, लव्हाळा ता. मेहकर, दाताळा ता. मलकापूर, सावळा ता. बुलडाणा येथे आरोग्य शिबिरे होणार आहेत.
   शेगांव येथे सामान्य रूग्णालय खामगांव, जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा, सईबाई मोटे उपजिल्हा रूग्णालय शेगांव, माऊली डायलीसीस सेंटर शेगांव आणि सिल्वरसिटी हॉस्पीटल खामगांव हे अंगीकृत रूग्णालये आरोग्य शिबरात सहभाग घेणार आहेत. तसेच ग्रामपंचायत लव्हाळा ता. मेहकर येथे होणाऱ्या शिबिरात तुळजाई हॉस्पीटल चिखली व मेहकर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर सहभागी होणार आहेत. ग्रामपंचायत दाताळा ता. मलकापूर येथे शिबिरात चोपडे हॉस्पीटल मलकापूर व सिटी हॉस्पीटल बुलडाणा सहभागी होवून रूग्णसेवा देणार आहेत. ग्रामपंचायत सावळा ता. बुलडाणा येथील शिबिरात अमृत हृदयालय आणि सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल बुलडाणा व मेहेत्रे हॉस्पीटल बुलडाणा सहभागी असणार आहेत.
    आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या मदतीने संबंधित केंद्रांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व गावांमधील आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांचे कार्ड तयार करून घेण्यात यावे. जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देणे शक्य होणार आहे.  तरी लाभार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
                                                आयुष अभियानातंर्गतही १६ डिसेंबर रोजी शिबिराचे आयेाजन
आयुष अभियान अंतर्गत सर्व जनतेसाठी मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन १६ डिसेंबर २०१९ रोजी आयुष कक्ष, जिल्हा रूग्णालय बुलडाणा येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या शिबिरात आयुर्वेदीक, युनानी होमीओपॅथी, योग व निसर्गोपचार पद्धतीने उपचार करण्यात येणार आहे.   गरजु रूग्णांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                                        *****

दिव्यांग सहाय्यता व मार्गदर्शन मेळावा उत्साहात
बुलडाणा, दि. 10 : स्थानिक गर्दे वाचनालय सभागृहात 9 डिसेंबर 2019 रोजी दिव्यांग सहाय्यता व मार्गदर्शन मेळावा व नोंदणी अभियानाचे आयोजन नगर परिषद बुलडाणा, दिव्यांग कल्याण केंद्र,  संत गाडगेबाबा अपंग कल्याण व पुर्नवसन संस्था यांच्या सहभागाने करण्यात आले.  हा मेळावा उत्साहात पार पडला.  या मेळाव्यामध्ये दिव्यांगांना एस.टी.पास,  रेल्वे पास, असमर्थ दाखला आदींचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान दिव्यांग कल्याण केंद्र बुलडाणा यांच्या वतीने दिव्यांग वधु-वर नोंदणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राअंतर्गत अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर दिव्यांगांची नोंदणी करुन लग्न जुळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. या कार्यक्रमात उपक्रमाची घोषणा केल्यानंतर एका दिव्यांग जोडप्याचे मान्यवरांच्या शुभआशिर्वादाने लग्नही  लावण्यात आले.  नगर परिषदेच्यावतीने या जोडप्याला शुभेच्छा म्हणुन नगर परिषदेचे उपाध्यक्ष विजय जायभाये यांनी 11 हजार रूपये नगर पालिकेच्या फंडातुन आर्थिक सहाय्य देण्याचे घोषित केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केले. ते म्हणाले, दिव्यांग कल्याण केंद्र नगर परिषद च्या माध्यमातुन शहरातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी करुन शासनाच्या विविध योजना एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी दिव्यांग कल्याण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.पा उपाध्यक्ष विजय जायभाये होते.  उद्घाटक म्हणून  जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडित उपस्थित होते.  एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्री. रायवलकर, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन,  कुणाल गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी दिव्यांगांना शासकिय योजनांविषयी मार्गदर्शन केले.  बुलडाणा नगर परिषदेचे नगर सेवक उमेश कापुरे, मंदार बाहेकर आणि विविध अधिकारी व कर्मचारी वर्ग कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते.
    दिव्यांग लाभार्थ्यांना नगर परिषद बलडाणा च्या माध्यमातुन विविध प्रकारची मदत दरवर्षी करण्यात येत आहे. दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी नगर परिषद नेहमीच आपल्यासोबत राहील असे आवाहन विजय जायभाये यांनी केले.  संचालन रमेश आराख यांनी तर,आभार प्रदर्शन कर निरीक्षक स्वाती तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  न.प. व्यवस्थापक महेंद्र सौभागे यांनी प्रयत्न केले, असे मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        *******

--

Monday 9 December 2019

DIO BULDANA NEWS 9.12.2019

संत जगनाडे महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि.९ – जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्ताने ८ डिसेंबर २०१९ रोजी अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  तसेच उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे, नायब तहसिलदार श्री. अहीरे आदी उपस्थित होते.
                                                                        *****
  शेतकरी लाभार्थ्यांसाठी गहू व  तांदूळ धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 31 डिसेंबर 2019 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणादि‍ 9 -  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जानेवारी 2020 चे नियतनातील एपीएल केशरी शिधा पत्रीकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना गहू व तांदूळाची  भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 डिसेंबर 2019 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे परिमाण गहू 2 रूपये प्रति किलो प्रति लाभार्थी 4 किलो,  तांदूळ 3  रूपये प्रतिकिलो प्रति लाभार्थी  1 किलो आहे.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी गहू 1474 व तांदूळ  368  क्विंटल, बुलडाणा : गहू 975 व  तांदूळ 244,  दे.राजा गोदामाकरीता गहू 932 व तांदूळ 233, अमडापूर : गहू 320 व तांदूळ 80,   मोताळासाठी गहू 776 व तांदूळ 194, नांदुरासाठी गहू 1256 व तांदूळ 314, खामगांव गोदामकरीता गहू 1177 व तांदूळ 293, शेगांवकरीता गहू 1088 व तांदूळ 272, जळगांव जामोदकरीता गहू 1051 व तांदूळ 263, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 784 व तांदूळ 196, मेहकरसाठी गहू 1202 व तांदूळ 301, लोणारकरीता गहू 1215 व तांदूळ 304 क्विंटल, सिंदखेड राजाकरीता गहू 1108 व तांदूळ 277 क्विंटल, मलकापूर : गहू 935 व तांदूळ 234, साखरखेर्डा : गहू 493 व तांदूळ 123 आणि डोणगांवकरीता गहू 494 व तांदूळ 124 क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 15280 व तांदूळ 3 हजार 820 क्विंटल  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
****
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 31 डिसेंबर 2019 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणादि‍ 9 -  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना  जानेवारी 2020 चे नियतनातील गहू व तांदूळाची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 डिसेंबर  2019 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे परिमाण हे तांदूळ 3 किलो प्रति लाभार्थी असून वाटपाचे दर गहू 2 रूपये प्रतिकिलो आहेत. तसेच तांदुळासाठी 3 रूपये प्रतिकिलो दर व परिमाण 2 किलो प्रति लाभार्थी आहे.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी गहू 4268  क्विंटल व तांदूळ  2846, बुलडाणा : गहू 5026 क्विंटल व तांदूळ 3351,  दे.राजा गोदामाकरीता गहू 2087 क्विंटल व तांदूळ 1392, अमडापूर : गहू 1387 व तांदूळ 925, मोताळासाठी गहू 2959 व तांदूळ 1973, नांदुरासाठी गहू 2997 व तांदूळ 1998, खामगांव गोदामा करीता गहू 5464 व तांदूळ 3643,  शेगांवकरीता गहू 2631 व तांदूळ 1754जळगांव जामोदकरीता गहू 2747 व तांदूळ 1832, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 2556 व तांदूळ 1702, मेहकरसाठी गहू 3721 व तांदूळ 2481, लोणारकरीता गहू 2471 व तांदूळ 1648, सिंदखेड राजाकरीता गहू 1667 व तांदूळ 1112, मलकापूर : गहू 3017 व तांदूळ 2011, साखरखेर्डा : गहू 1265 व तांदूळ 844 आणि डोणगांवकरीता गहू 1317 व तांदूळ 878 क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 45580 तांदूळ 30390 क्विंटल  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        ********
 अंत्योदय लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 31 डिसेंबर 2019 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,दि‍ 9 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जानेवारी 2020 चे नियतनातील अंत्योदय योजने करीता गहू व तांदूळाची  भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 डिसेंबर 2019 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये प्रतिकिलो व  तांदूळ 3  रूपये प्रतिकिलो आहे. तर परिमाण प्रति कार्ड 15 किलो गहू व तांदुळ 20 किलो आहेत.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.   चिखली गोदामासाठी गहू 514 क्विंटल व तांदूळ 685, बुलडाणा : गहू 1050  क्विंटल व तांदूळ  1399,  दे.राजा गोदामाकरीता गहू 427 क्विंटल व तांदूळ 569, अमडापूर : गहू 175  क्विंटल व तांदूळ 233,  मोताळासाठी गहू 882  क्विंटल व तांदूळ  1174, नांदुरासाठी गहू 912 क्विंटल व तांदूळ  1215, खामगांव गोदामकरीता गहू 755 क्विंटल व तांदूळ 1007, शेगांवकरीता गहू 456 क्विंटल व तांदूळ  608जळगांव जामोदकरीता गहू 757 क्विंटल व तांदूळ 1008, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 913 क्विंटल व तांदूळ 1217, मेहकरसाठी गहू 635  क्विंटल व तांदूळ  846, लोणारकरीता गहू 975 क्विंटल व तांदूळ 1299, सिंदखेड राजाकरीता गहू 418 क्विंटल व तांदूळ 558, मलकापूर : गहू 680 क्विंटल व तांदूळ 907,  साखरखेर्डा गहू 232 क्विंटल व तांदूळ  309 आणि डोणगांव करीता गहू 199  क्विंटल व तांदूळ 266  क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 9980 व तांदूळ 13 हजार 300 क्विंटल  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    ********
फिट इंडिया मुव्हमेंट क्रीडा सप्ताहाचे आयोजन
·        12 ते 18 डिसेंबर दरम्यान चालणार सप्ताह
बुलडाणा,दि‍ 9 - महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व्हावी, क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, या दृष्टीने शासन निर्णयान्वये दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत प्रतिवर्षी क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात येतो. तसेच
समाजातील प्रत्येक नागरीकांच्या शारीरिक स्वास्थ्याकरीता व्यायाम करावा, अथवा खेळामध्ये भाग घ्यावा व प्रकृती स्वास्थ्य राखावे, याकरीता केंद्र शासनामार्फत फिट इंडीया मुव्हमेंट कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
   फिट इंडीया मुव्हमेंट अधिक प्रभावी राबविण्यासाठी क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने शाळांमध्ये विविध खेळांचे आयोजन दि. 12 ते 18 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रभावीपणे राबविण्याकरीता  5 डिसेंबर रोजी  जिल्हा क्रीडा संकुल, बुलडाणा येथे सभेचे आयोजनही करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे होते. तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा क्रीडा अधिकारी  शेखर पाटील,  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) एस.टी.वराडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, तालुका संयोजक निलेश इंगळे, सुधीर मानकर, आत्माराम चांदोरे, शैलेंद्रसिंह राजपूत, प्रभाकर जाधव, पुंजाजी कोल्हे, अनिल मुलांडे, सुनील चव्हाण, राजेश सपाटे होते. तसेच प्रमोद येऊल, अनिल इंगळे, घनश्याम वरारकर, रविंद्र धारपवार आदी उपस्थित होते.
     फिट इंडीया चळवळीचा प्रारंभ यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनाला करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडीया
चळवळीद्वारे भारत आणि भारतीयांना 2022 पर्यंत तंदुरुस्त बनविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यानुसार प्रत्येक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. फिट इंडीया चळवळीचा मुख्य उद्देश हा तंदुरुस्तीचे महत्व दैनंदिन जीवनामध्ये वाढविणे हा आहे. तंदुरुस्ती हा संस्कृती व परंपरेचा भाग असुन ते पुढे नेण्यासाठी विविध मार्गाने सर्वत्र अभ्यासता येईल. संस्कृती, रितीरिवाज, सण, नृत्य, सामाजिक मेळावे, आहार पध्दती या मार्गाने तंदुरुस्तीचे विविध घटक आपण कालानुरुप सरावाने आत्मसात करु शकतो. पुरातन काळापासुन तंदुरुस्तीला पारंपारिक खेळाचे माध्यमातून शारीरिक सुदृढतेसाठी महत्व दिलेले आहे. परंतु तंत्रज्ञानातील प्रगती व आधुनिक जीवनशैली दिनक्रमामुळे आरोग्यावर
प्रतिकुल परिणाम होत आहेत.
  फिट इंडिया मोहिमेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या शाळांसाठी मानांकन तयार करण्यात आलेले आहे. मोहिमेत फ्री हँण्ड्स एक्झरसाईज, विविध मैदानी क्रीडा स्पर्धा, मनोरंजनात्मक व पारंपारिक खेळ, नृत्य, सामुहिक कवायती, प्रश्नमंजुषा, चित्रकला, खेलो इंडिया अंतर्गत शालेय स्तरावर शारीरिक क्षमता मुल्यमापन चाचण्या, आहारविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी शाळांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घेवून मोहिम यशस्वी करावी,  असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****


Saturday 23 November 2019

केंद्रीय पथकाने केली जिल्ह्यातील खरीप पिक नुकसानीची पाहणी




  • खामगांव तालुक्यातील कलोरी, टेंभूर्णा व सुटाळा शिवारातील पिक पाहणी
  • शेतकऱ्यांशी साधला संवाद, जाणून घेतली परिस्थिती
  • भादोला येथील शेतात नुकसानग्रस्त सोयाबीनच्या सुडीची केली पाहणी

 बुलडाणा, दि. 23 :  अरबी समुद्रात गत काही दिवसांमध्ये निर्माण झालेल्या ‘क्यार’ व महा’ या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत असणाऱ्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ आर. पी सिंग यांचे पथकाने आज जिल्ह्यात नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी केली. पथकाने खामगांव तालुक्यातील कलोरी, टेंभूर्णा व सुटाळा तर बुलडाणा तालुक्यातील भादोला शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.                                                                                                                  

यावेळी या पथकासमवेत खामगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर, अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  नरेंद्र नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे,  खामगांवचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पटेल, तहसीलदार शितल रसाळ, तालुका कृषि अधिकारी श्री. गिरी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच भादोला येथील शेतात उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार श्री. शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे आदी उपस्थित होते.

          सर्वप्रथम पथकाने कलोरी येथील शेतकरी विशाल वामनराव घुले यांच्या शेतात जाऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पीकाची पाहणी केली. तसेच टेंभूर्णा येथील शेतकरी नरेश जगन्नाथ चौकसे यांच्या सोयाबीन व ज्वारी पीकाची, तर सुटाळा येथील शेतकरी शंकर संपत वानखेडे यांच्या  शेतातील कापून ठेवलेल्या ज्वारी पीकाची पाहणी केली.

  पीक परिस्थितीची पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. सिंग यांनी यावेळी सांगितले.  त्यांनी पाहणी केलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती करून घेत परिस्थिती जाणून घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पथकातील अधिकाऱ्यांना माहिती देतांना शेतकऱ्यांनी सांगितले की, ऐन पीक काढणीच्यावेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्याचबरोबर अद्यापही काही ठिकाणी जमीन ओलसर असल्यामुळे रब्बी हंगाम घेण्यातही अडचण येत आहे. तसेच ज्वारी, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे जनावरांना या पिकापासून बनलेला चारा मिळणार नाही.

   भादोला येथील शंकरअप्पा दगडअप्पा चित्ते यांच्या शेतात सोंगूण सुडी मारलेल्या नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी डॉ. सिंग यांनी शेतकऱ्याशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. भेटीप्रसंगी महसूल, कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच भेट दिलेल्या ठिकाणी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.  सुरूवातीला जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती पथकाला दिली. तसेच जिल्ह्यातील पीकाचे खरीप व रब्बी हंगामाचे क्षेत्र, पीक परिस्थिती, लागवड केलेले क्षेत्र, बाधित क्षेत्र, पाऊसाची सरासरी तसेच पीक काढणीच्यावेळीच पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, कापूस, फळपिके आदींचे  जिल्ह्यातील  शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती दिली.



               खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची पथकाने केली पाहणी
  • सोयाबीन व मुंगाच्या प्रतवारीची घेतली माहिती
 बुलडाणादि. 23 :  जिल्ह्यात परतीचा व अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतमालाची प्रतवारीही घसरली आहे. अशा शेतमालाची पाहणी आज केंद्रींय पथकातील केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत असणाऱ्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ आर. पी सिंग खामगांव येथील  कृषि उत्पन्न बाजास समितीमध्ये जावून केली. याप्रसंगी मुंग, सोयाबीन शेतमालाची प्रतवारी बघत संबंधित शेतकरी व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
   यावेळी या पथकासमवेत आमदार ॲड आकाश फुंडकर, अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  नरेंद्र नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे,  उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, खामगांवचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पटेल, तहसीलदार शितल रसाळ, तालुका कृषि अधिकारी श्री. गिरी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*******


‘आरटीओ’ विशेष वाहन तपासणी मोहिम; 273 वाहनधारकांना दंड
  • स्वत: विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दंड ठोठावला
  • वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
 बुलडाणादि. 23 : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आज 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहिम राबविण्यात आली. केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानिमित्ताने जिल्ह्यात आलेल्या विभागीय आयुक्त पियुष सिंग, तसेच दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी स्वत: या तपासणी मोहिमेत सहभाग घेत वाहतुक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांना दंड ठोठावला. यावेळी स्वत: विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी चलान दिल्या. तसेच वाहनधारकांना वाहतुक नियमांचे पालन करीत वाहन चालविण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे उपस्थित होत्या.
   जिल्ह्यात आज करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत हेल्मेट न वापरणे, फॅन्सी नंबरप्लेट, अवैध प्रवाशी वाहतूक, विना नोंदणी वाहने, विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, सिट बेल्ट न लावणे, अनुज्ञप्ती सादर न करणे, विमा सादर न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे या गुन्ह्यांअंतर्गत सदर कार्यालयाने चार पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात खामगांव ते मलकापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व ईतर मार्गांवर एकुन 273 वाहन धारकांवर कार्यवाही केली. तपासणी मोहिमेत बुलडाणा-  चिखली -दे.राजा रस्त्यावर मोटार वाहन निरीक्षक निशिकांत वैद्य, संदीप मोरे, वरिष्ठ लिपिक गजानन तनपुरे, कनिष्ठ लिपिक प्रविण मुंगळे, अनंता सोर यांचा समोवश होता. तर  नांदुरा – खामगांव- कलोरी फाटापर्यंत मोटार वाहन निरीक्षक संदीप तायडे, संदीप पवार, वरिष्ठ लिपीक संतोष घ्यार, कनिष्ठ लिपीक विजय माहुलकर, अमोल खिरोडकर, यांनी तपासणी मोहिम राबविली. तसेच नांदुरा ते मलकापूर रस्त्यावर मोटार वाहन निरीक्षक संताजी बर्गे, अविनाश भोपळे, वरिष्ठ लिपीक सुनील सोळंकी, कनिष्ठ लिपीक राजेश काळे, मिलींद उईके यांनी, तर चिखली – खामगांव महामार्गावर मोटार वाहन निरीक्षक फारूक शेख, वरिष्ठ लिपीक सुनील सुर्यवंशी, कनिष्ठ लिपीक रोहीत काळे यांनी तपासणी मोहिमेत सहभाग घेतला, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.

--

Wednesday 20 November 2019

DIO BULDANA NEWS 20.11.2019

आरोग्य विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी
- जिल्हाधिकारी

तंबाखू खाण्याच्या दुष्परीणामांविषयी जनजागृती करावी
बुलडाणा, दि. 20 : शासन विविध आरोग्यविषयीच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आरोग्यवर्धनासाठी काम करते. आरोग्याच्या योजनांतून लाभार्थ्यांना उपचार, प्रतिबंधात्मक माहिती मिळते. अनेक योजनांमुळे संबंधित आजाराविषयी जनजागृती होवून नागरिकांकडून आजार न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येतात. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या.
  जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये आज विविध आरोग्य विषयक योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. गोफणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) श्री. रामरामे, संबंधित विभागाचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
    जास्तीत जास्त लोकसंख्येची एचआयव्ही तपासणी करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, एचआयव्ही तपासणी करताना अधिकाधिक लोकांचा सहभाग घ्यायला पाहिजे. जिल्ह्यातील संपूर्ण गावे त्यामध्ये आली पाहिजेत. 'हाय रिस्क' लोकसंख्येची तपासणी करून आजुबाजूच्या गावातील, परिसरातील लोकांची तपासणीही करून घ्यावी. एड्स नियंत्रण कार्यक्रमात जिल्हा अव्वल असावा. एआरटीवर असणाऱ्या रूग्णांना विनात्रास औषधे उपलब्ध करून द्यावीत. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविताना जिल्ह्याचे काम अव्वल दर्जाचे असावे. लसीकरण मोहिम राबविताना शासनाकडून देण्यात येणाऱ्या लसींचा पुरवठा पर्याप्त संख्येत ठेवावा. लसीकरणातंर्गत सर्व पात्र बालके घ्यावीत.
      पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, स्त्री भ्रुण हत्या जास्त होत असलेल्या भागांमध्ये जनजागृती करण्यात यावी. प्रत्येक महिन्यात मुलांच्या जन्मांची संख्या, मुलींच्या जन्मांची संख्या व आढळणारी तफावत याचा सखोल विश्लेषणात्मक अहवाल सादर करावा. ज्या गावांत, तालुक्यात हे प्रमाण व्यस्त्‍ असेल तिथे लक्ष केंद्रीत करून तपासण्या बारकाईने कराव्या. अशा ठिकाणी केसेस दाखल कराव्यात. मुलींचा जन्मदर कमी राहत असलेल्या गावाचा, भागाचा बारकाईने तपास करून कारणांसह अहवाल सादर करावा. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी कार्यवाही करावी. तंबाखू नियंत्रण कायद्याचा प्रभावीरित्या उपयोग करावा.
  त्या पुढे म्हणाल्या, तंबाखू नियंत्रणासाठी महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांचा गट, तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या नागरिकांचा एक गट अशा पद्धतीने  कार्यवाही करावी.  विद्यार्थी गटात तंबाखूचे दुष्परिणाम समजवून जनजागृती करावी, तर कर्करोग झालेल्या गटात उपचारासाठी कार्यवाही करावी. तंबाखू नियंत्रण करताना जिल्ह्यात तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या नागरिकांचा अहवाल सादर करावा. यामध्ये तालुकानिहाय आकडेवारी असावी. बैठकीप्रसंगी संबंधित शाखेचे जिल्हा समन्वयक, गजानन देशमुख, डॉ लता बाहेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        *******
आयटीआय मलकापूर येथे तासिका तत्त्वावर पदांसाठी अर्ज आमंत्रित
  • 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुदत
बुलडाणा, दि. 20 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर येथे अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर शासकीय नियमानुसार मानधनावर निदेशक पदांसाठी भरती करावयाची आहे. निदेशक पद 'एम्प्लॉयबीलीटी स्कील' या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असून त्याची शैक्षणिक पात्रता दोन वर्षांसह एमबीए किंवा बीबीए, अथवा सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र या विषयात स्नातक दोन वर्षाच्या अनुभवासह आहे. पदसंख्या एक आहे. या पदाकरीता शैक्षणिक अर्हताधारकांनी संपूर्ण अर्ज, बायोडाटासह संस्थेच्या iti_malkapur@yahoo.com व iti_malakapur@dvet.edu.in या इमेलवर 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत पाठवावे, असे आवाहन प्राचार्य, आयटीआय मलकापूर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    *******
        जिल्ह्यात 2 डिसेंबरपासून लसीकरणाची विशेष इंद्रधनुष्य मोहिम
बुलडाणा, दि. 20 : जिल्ह्यात लसीकरण सक्षमीकरणासाठी ‘विशेष इंद्रधनुष्य मोहिम 2.0’ येत्या 2 डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात येणार आहे. सदर मोहिमेंतर्गत जिह्यातील लसीकरणापासून वंचित 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांचा सर्व्हे करून त्यांच्यासाठी अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
   या मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत आज 20 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे, यांचे अध्यक्षतेखाली नियमित लसीकरण सक्षमीकरण जिल्हा कृती समितीची सभा घेण्यात आली.  जिल्हाधिकारी यांनी जिह्यातील लसीकरण कार्यक्रमाचा यावेळी आढावा घेतला.
   जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र गोफणे यांनी विशेष इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. सदर मोहिमेचे प्रभावी नियोजन करून सर्व विभागांच्या समन्वयातून मोहीम यशस्वी करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी आरोग्य विभागाचे विविध अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) अरविंद रामरामे याचेसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर होते.
                                                                                    ******
 एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्याचे 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
बुलडाणा, दि. 20 : शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत जिल्ह्याकरीता 18 दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 28 नोव्हेंबर पासून करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असून प्रशिक्षणाकरीता मुलाखतीअंती 40 प्रशिक्षणार्थिंची निवड कार्यबल समितीमार्फत केली जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्याकरीता 21 नोव्हेंबर 2019 रोजी मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्याचे आयोजन पवार सायन्स/ चव्हाण कॉमर्स क्लासेसच्या सभागृह, गजानन महाराज मंदीराजवळ, विष्णुवाडी, बुलडाणा येथे आयोजित करण्यात येत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील बेरोजगार इच्छूक तथा गरजवंत युवक युवतींनी मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्यास उपस्थित रहावे. अधिक माहितीकरीता मिटकॉन किंवा जिल्हा उद्योग केंद्र, बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन मिटकॉनच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
                                                                        ********
कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करावे
·        कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 20 :  यावर्षी सुरूवातीच्या काळात चांगला पाऊस असल्यामुळे पिक चांगले होते. मात्र परतीच्या जास्तीच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास येते. मात्र काही भागामध्ये निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीमध्ये कापसाला फुले, पाते व बोंडे लागलेली आढळतात. अशा पिकावर गुलाबी बोंडअळी येण्याची दाट शक्यता आहे.
   पेरणी झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा 5 ते 10 टक्के पर्यंत प्रादुर्भाव फुलामध्ये ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडयात दिसुन आला. सद्यस्थितीत हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी फेरोमोन सापळे, डोमकळया वेचुन नष्ट करणे, निंबोळी अर्काची फवारणी व लक्षणीय प्रादुर्भावाच्या ठिकाणी रासायनिक किटकनाशकांचा वापर इत्यादीचा पिकाचे अवस्थेनुसार वेळीच वापर करून या किडीच्या प्रादुर्भावावर आवर घालण्यात आला. यासाठी सर्व कृषि विभागाची विस्तार यंत्रणा अशासकीय यंत्रणा, तसेच कृषि विद्यापीठाचे वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन व बोंड अळीच्या नियंत्रणाची व्युहरचना आखून अंमलबजावणी सुरु आहे.
    गुलाबी बोंड अळीचे प्रादुर्भाव सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा ऑक्टोंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवडयात सरासरी 29 ते 33 अंश से. तापमान असताना आढळून येतो. मात्र यावर्षी पावसाळा वाढल्यामुळे व पोषक हवामान असल्यामुळे गुलाबी बोंड अळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर निघाले. हीच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या कोषातून बाहेर निघालेले पतंग मिलन होवून अंडी टाकल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी त्यांचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवे बोंडे व पात्या आहेत अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    शेतकरी बांधवांनी त्वरित कापूस पिकात त्वरीत किमान एकरी दोन फेरोमन सापळे लावून त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली/10लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बोंडे/पात्या/फुले यामध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यापर्यंत आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी ग्रॅम किंवा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएम, 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
   गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्केपेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 4 ग्रॅम किंवा बाजारात उपलब्ध असलेली मिश्र किटकनाशके जसे, प्रोफेनोफॉस 40 टक्के अ सायपरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1 अ ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही 1250 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50  सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
   शेतकरी बंधुंनी पिकाचे नियमित निरिक्षण करुन कामगंध सापळ्यामधील पतंगाची संख्या/प्रादुर्भाव तसेच सध्याच्या कापूस पिकाच्या वाढलेल्या हंगामामध्ये कापूस पिकाची संपूर्ण वेचणी झाल्यानंतर एक ते दिड महिन्यामध्ये कापसावर असलेली बोंडाची संख्या व अपेक्षीत उत्पन्न यांचा अंदाज घेऊनच कीड व्यवस्थापनाची वरील प्रमाणे उपाय योजना करावी. सरसकट सर्व शेतकरी बंधुंनी कीड व्यवस्थापनाची उपरोक्त प्रमाणे उपाययोजना करावी. डिसेंबर 2019 नंतर कापूस पीक पूर्णत काढून टाकावे. कापूस फरदड घेण्याचा मोह टाळावा जेणेकरुन, किडीचे जीवनचक्र खंडीत होऊन येणाऱ्या पुढील खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रतिबंध करण्यास मदत होईल, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. 

                                                                                    *******