नशेची औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकू नयेत - सहाय्यक आयुक्त गजानन घिरके केमिस्ट-ड्रगिस्टांना कायदेशीर खबरदारीचे आवाहन
•
बुलढाणा, (जिमाका) दि. 9 : समाजाचे आरोग्य जपण्याची
महत्त्वाची जबाबदारी औषध विक्रेत्यांवर असून नवी पिढी नशेकडे वळू नये यासाठी नशेची
औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकू नयेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त
(औषधे) गजानन घिरके यांनी केले. एनडीपीएस अॅक्टच्या अनुषंगाने सर्व केमिस्ट व ड्रगिस्ट
बांधवांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
अन्न व औषध प्रशासनाच्या
वतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात गजानन घिरके यांनी ड्रग अँड कॉस्मेटिक्स
अॅक्ट, ड्रग अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट, मेडिकल डिव्हायसेस नियम 2017 तसेच नार्कोटिक
अँड सायकोट्रॉपिक संबंधित कायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. औषध विक्री करताना
संबंधित कायद्यांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मार्गदर्शनात त्यांनी
डॉक्टरांनी ‘शेड्युल-के’चे पालन करावे, घाऊक विक्रेत्यांनी कायद्याच्या चौकटीतच व्यवसाय
करावा व डॉक्टरांना थेट मोठ्या प्रमाणात औषध पुरवठा टाळावा, असे स्पष्ट केले. तसेच
डॉक्टरांनी आवश्यक औषधांची मागणी लिखित स्वरूपात नोंदवावी व बिलाप्रमाणेच औषधसाठा खरेदी
करावा. बिना बिल औषधे खरेदी करणे, विकणे किंवा साठवणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याची
जाणीव ठेवून समाजाला निकोप सेवा देण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी
केले.
या कार्यक्रमास प्रमोद
टाकळकर, पांडुरंग इंगळे तसेच इतर फार्मसिस्ट उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गोपाळ
गांधी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे तालुका
अध्यक्ष उमेश इंगळे यांनी विशेष सहकार्य केले.
00000
Comments
Post a Comment