अमृत दिनदर्शिकेला बुलढाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 13 : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून, संस्थेच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अमृततर्फे विशेष दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. या अमृत दिनदर्शिकेला बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शासनाच्या योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.

अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती देणारी ही दिनदर्शिका जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व स्तरांवर वितरित करण्यात येत आहे. या दिनदर्शिकेमध्ये अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती, पात्रतेच्या अटी, लाभ तसेच अर्ज प्रक्रियेविषयीचे स्पष्ट मार्गदर्शन देण्यात आले असून, ती सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरत आहे. अमृत दिनदर्शिकेच्या माध्यमातून शासनाच्या योजना घरोघरी पोहोचून त्यांचा लाभ गरजू घटकांना होत आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना आजवर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांचा लाभ मिळालेला नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार आदी जातींचा समावेश आहे. वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक श्री. जिग्नेश कमाणी (मो. 8308998922) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अमृत जिल्हा कार्यालय, फ्लॅट नं. 305, तिसरा मजला, बुलढाणा प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या