गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा

 


 दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे

‘हिंद दी चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० शहिदी समागम वर्षानिमित्त  नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने  'ट्रेन ऑन डिमांड' (TOD) अंतर्गत मुंबई, चंदीगड आणि दिल्ली (हजरत निजामुद्दीन) येथून नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी

दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरूनही २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता विशेष गाडी नांदेडसाठी  हजरत निजामुद्दीन, पानिपत, आग्रा कॅन्ट, विरांगणा लक्ष्मीबाई झांसी, बिना, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी १६.२० नांदेडला पोहोचेल .


चंदीगड ते नांदेड (गाडी क्र. ०४५२४/०४५२३) आणि हजरत निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) या दोन राखीव सुपरफास्ट विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. चंदीगडवरून २३ आणि २४ जानेवारी रोजी सकाळी ०५:४० वाजता सुटणारी गाडी अंबाला, पानिपत, दिल्ली सफदरजंग, आग्रा, विरांगणा लक्ष्मीबाई झाशी , भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे प्रवास करत दुसऱ्या दिवशी दुपारी १३:३० वाजता नांदेडला पोहोचेल. 


मुंबई येथून देखील विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड दरम्यान गाडी क्र. ०१०४१/०१०४२ ही विशेष रेल्वे २३ आणि २४ जानेवारी रोजी मुंबईहून दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता नांदेडला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी या स्थानकांवर थांबेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी नांदेडवरून २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री २३:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १३:४० वाजता मुंबईला पोहोचेल. या गाडीत १८ डब्यांची रचना असून यात स्लीपर, जनरल आणि एसी कोचचा समावेश असेल.


 या सर्व गाड्यांच्या नियोजनामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझेशनसह सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, गाड्यांच्या सुयोग्य संचालनासाठी संबंधित विभागांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या