Wednesday 28 December 2016

news 28.12.2016 dio buldana

बांधकाम सुरू असलेल्या मालकांनी विना रॉयल्टीची रेती घेवू नये
·        जिल्हाधिकारी यांचे आवाहन
बुलडाणा, दि.28 - बांधकाम सुरू असलेल्या घर मालकांनी रॉयल्टी नसलेली रेती घेवू नये. रॉयल्टीची तपासणी महसूल यंत्रणेच्या संबंधीत अधिकारी किंवा कर्मचारी, तलाठी यांच्याकडून करावी. अशाप्रकारे रेती खरेदी थांबल्यास चोरीची रेती विक्री करणाऱ्यांची धाडस वाढणार नाही. त्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या मालकांनी रॉयल्टीची रेती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले आहे.
    तहसीलदार यांनी बांधकाम सुरू असलेल्या स्थळी भेट देवून मालकाकडून रेती रॉयल्टीची घेत असल्याची खातरजमा करावी अन्यथा रेती जप्त करावी. रेती घाटांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले असून सीसीटीव्हीचे एक महिन्याचे फुटेज सांभाळून ठेवावे. या फुटेजमध्ये रेतीची चोरी करीत असल्याचे आढळल्यास त्या इसमावर एफआयआर दाखल करावा. पोलीसांनी चोरीची रेती वाहतूक करणारी वाहने पकडून पेालीस स्टेशनला जमा करावे.  वाहन आरटीओ यांच्या ताब्यात द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
*******
अपंगांच्या तीन टक्के निधीतून अनुदान योजनेचा लाभ घ्यावा
·        15 जानेवारी 2016 पर्यंत अर्ज करावे
बुलडाणा, दि.28 - जिल्हा परिषदेच्या समजा कल्याण विभागातंर्गत सन 2016-17 करीता अपंगांकरिता राखीव असलेल्या अपंग तीन टक्के निधीतून अपंग लाभार्थ्यांकरिता 100 टक्के अनुदान योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वउत्पन्नातील अपंगासाठी राखनू ठेवलेल्या तीन टक्के अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावयाचे आहे.
   अपंग लाभार्थ्यांनी 24 नोव्हेंबर 2015 च्या शासन निर्णयातील केवळ ब मध्ये नमूद करण्यात आलेल्या वैयक्तिक लाभाचे साहित्याची मागणी करून परिपूर्ण अर्ज आवश्यक प्रमाणपत्रासह (बँक पासबुक व आधारकार्ड छायाप्रतीसह) 15 जानेवारी 2017 पर्यंत पंचायत समिती स्तरावर सादर करावे. अर्ज सादर करताना परीपुर्ण आवश्यक प्रमाणपत्रासह व विहीत मुदतीत सादर करावे. सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व अपंग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प समाज कल्याण सभापती गणेश बस्सी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ यांनी केले आहे.
******
डाळींब निर्यातीसाठी अनारनेट प्रणालीवर नोंदणी करावी
·        31 जानेवारी 2017 पर्यंत मुदत
बुलडाणा, दि.28- महाराष्ट्र राज्य युरोपीयन युनियनला व अन्य देशांना ताजी फळे निर्यातीत आघाडीवर आहे. निर्यातीकरीता प्रामुख्याने किडनाशक उर्वरित अंश व किड रोग मुक्त उत्पादनाची हमी देणे आवश्यक असते. अपेडा व कृषि विभागाच्या समन्वयाने राज्यात रेसिड्यु मॉनीटरींग प्लॅनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामध्ये निर्यातक्षम बागांची नोंदणी, त्याची तपासणी तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आदी कामे कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
   जिल्ह्याचा समावेश अनारनेट अंतर्गत करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये डाळींब या फळपिकाची लागवड केली आहे. या कार्यक्रमातंर्गत बागांची तपासणी करून नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडून देण्यात येणार आहे. अनारनेट प्रणालीवर नोंदणी किंवा नुतनीकरण करावयाची अंतिम मुदत 31 जानेवारी 2017 पर्यंत आहे. तरी इच्छूक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधीत तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

अण्णाभाऊ साठे महामंडळात कर्ज मागणी अर्ज सादर करावे
·        जिल्हा कार्यालयाला 424 अनुदान योजनेचे उद्दिष्ट प्राप्त
बुलडाणा, दि.28 - साहित्यरत्न  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला    चालु आर्थिक वर्षात अनुदान 424 व बिज भांडवल योजनेतंर्गत 127 उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सुशिक्षीत व बेरोजगार, मातंग समाजातील 10 पोट जातीतील लोकांसाठी राष्ट्रीयकृत बँकेद्वारा महामंडळामार्फत व्यवसाय करण्यास कर्ज उपलब्ध करून देते. तरी गरजू व होतकरू लोकांनी 31 जानेवारी 2017 पर्यंत जिल्हा कार्यालयात येवून कर्ज मागणी अर्ज घेवून जावे. याबाबत इच्छूक लोकांनी अर्ज घेवून जावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
                                                                        ******
न्यायालयाने जामीनावर सोडलेले आरोपी फरार
बुलडाणा, दि.28 - न्यायालयाने जामीनावर सोडलेले आरोपी सुखलाल उर्फ सिकलाल मोतीराम पवार, रा. सुकळी,  ता. मेहकर आणि बाळ्या काळूराम भोसले रा. सवना, ता. सेनगांव, जि. हिंगोली फरार आहेत. त्यांचा निश्चित ठावठिकाणा मिळून येत नाही. तरी छायाचित्रात फरार आरोपी मिळून आल्यास संबंधीत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन, मंठा, जि. जालना यांनी कळविले आहे.
                                                                        ******
1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
बुलडाणा, दि.28 – मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2017 दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील कार्यालये, मंडळे, राज्य शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळ, खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, महाविद्यालये आदी ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे.
  तरी मराठी भाषा संवर्धनाबाबत विविध कार्यक्रमांची रूपरेषा तयार करून हा पंधरवडा साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                                        *****
                                                            रोख रहित प्रशिक्षणाचे आज आयोजन
            बुलडाणा दि 28-  शासनाने रोख रहीत व्यवहार प्रत्येक क्षेत्रात वाढविण्यासाठी कार्य सुरू केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यवहार हा कॅशलेस होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर योजनाही सुरू केल्या आहेत.   या रोखरहीत व्यवहारांसंदर्भात प्रशिक्षण आहरण व सवितरण अधिकारी यांच्यासाठी उद्या 29 डिसेंबर 2016 रोजी आयोजित करण्यात आले आहे.
   प्रशिक्षण  जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियोजन भवन,  येथे  29 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 4 वाजता  होणार आहे. तरी सदर्हु प्रशिक्षणास सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती  मिनाक्षी आर. पवार यांनी केले आहे.
                                                                        *****











Monday 26 December 2016

news 26.12.16 dio buldana

रब्बी हंगामासाठी विमा भरण्यास उरले काही दिवस..
·        31 डिसेंबर 2016 अंतिम मुदत
·        शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
बुलडाणा, दि.26 – पंतप्रधान पी‍क विमा योजना रब्बी हंगाम 2016-17 साठी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आता काही दिवस उरले आहेत. योजनेत 31 डिसेंबर 2016 ही सहभागाची अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित या योजनेत सहभाग नोंदवून पिकांच्या नुकसानीचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
   कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा बंधनकारक, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जात असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विहीत केलेल्या अर्जासह विमा हप्ता विहीत कालावधीमध्ये बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये भरावा लागणार आहे. रब्बी हंगामासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मंडळ कार्यालय, तिसरा मजला, स्टर्लिंग सिनेमा बिल्डींग, 65, मर्झबान रोड, मुंबई 400001 यांची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या यंत्रणेचा 18002007710 हा टोल फ्री क्रमांक असून अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा.
   पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्याय कालावधीत उत्पादनात येणारी घट, पिक पेरणी पुर्व/ लावणी पुर्व नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आदी बाबींमध्ये विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेसाठी अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित पिके घेणारे सर्व शेतकरी पात्र आहेत.
   या योजनेतंर्गत 70 टक्के जोखीम स्तर देय आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत जिल्ह्यातील सर्व अधिसूचीत पिकांकरीता 31 डिसेंबर 2016 आहे. शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात, बँक व संबधीत विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
                                       असे आहे पिकनिहाय विमा हप्ता व संरक्षीत विमा राक्कम
गहू बागायत : विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्टर 33 हजार रूपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 217.8, गहु जिरायत : विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्टर 30 हजार रूपये, शेतकरी हिस्सा 198, हरभरा : विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्टर 24 हजार रूपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 158.4, करडई : विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्टर 22 हजार रूपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 330, रब्बी कांदा : विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्टर 60 हजार रूपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 3000.
                                                                        **********
देशी, विदेशी दारू अनुज्ञप्त्या 31 डिसेंबर रोजी उशिरापर्यंत सुरू
·        विदेशी मद्य विक्री दुकाने पहाटे 5 वाजेपर्यंत
·        परवाना कक्ष पहाटे 5 वाजेपर्यंत
बुलडाणा, दि.26 - शासनाने नववर्षानिमित्त राज्यातील एफएल-2, एफएल-3, एफएल-4,एफएल/बीआर-2 व बिअरबार या अनुज्ञप्त्या त्यांच्या निर्धारीत वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी सुरू ठेवण्याबाबत परवानगी दिली आहे. विदेशी मद्य किरकोळ विकीचे दुकान 31 डिसेंबर 2016 च्या रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
   तसेच परवाना कक्ष रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, बिअरबार रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आणि सीएल-3 दुकाने क वर्ग नगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, त्याव्यतिरिक्त इतर क्षेत्रात रात्री 11.59 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. हा कालावधी शिथील करण्यात आला आहे, असे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कळविण्यात आले आहे.
                                                                        **********
शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज 31 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करावे
बुलडाणा, दि.26 – ई स्कॉलरशीप ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क योजनेचे अर्ज बऱ्याच मोठ्या प्रमाणावर महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. तरी महाविद्यालयांनी अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कचे अर्ज 31 डिसेंबर 2016 पूर्वी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करून प्रपत्र-ब व अर्जाच्या हार्ड प्रतीसह मंजुरीसाठी सादर करावे.

   अर्ज सादर न केल्यास सदर विद्यार्थी या योजनेस पात्र नसल्याचे गृहीत धरून अर्ज रद्द करण्यात येतील. तसेच ऑनलाईन संगणकीय प्रणालीमधूनही बाद करण्यात येतील. याची महाविद्यालयांच्या प्रचार्यांनी नोंद घ्यावी. कोणताही मागास प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी घ्यावी. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येवू नये अन्यथा सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची राहील, असे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

Tuesday 29 November 2016

news 29.11.2016 dio buldana

वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध जमिनीची माहिती  द्यावी
-         जिल्हाधिकारी
·        वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करावी
·        यावर्षी जिल्ह्याला 10.54 लक्ष वृक्षारोपणाचे उद्दिष्ट
बुलडाणा, दि. 29 : यावर्षी 1 जुलै रोजी सर्वांनी हिरीरीने सहभाग घेवून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहिम यशस्वी केली होती. त्यानुसार पुढील वर्षामध्ये सुद्धा आपणाला समन्वयाने वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करायची आहे. यावर्षी जिल्ह्याला 10.54 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून राज्यभर 4 कोटी वृक्षारोपण करावयाचे आहे. त्याकरिता प्रत्येक विभागाने आपल्याकडे वृक्षारोपणासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीची माहिती तात्काळ सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केल्या आहेत.
      वृक्षलागवडी बाबत बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, उपवनसंरक्षक बी. टी भगत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक श्री. मित्र आदींसह संबंधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
         प्रत्येक विभागाने आपल्याला मिळालेल्या उद्दिष्टाप्रमाणे कार्यवही करण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, जागा निश्चित झाल्यानंतर खड्डे खोदावी, अक्षांश व रेखांश देणे आदी करायची आहेत. मार्च 2017 पूर्वी सर्व जागांचे खड्डे खोदलेले असावे. मागील वर्षी केलेल्या वृक्षारोपणाचा जिवंतपणाची काळजी घ्यावी. जीवंत रोपांचे प्रमाण वाढवावे. त्याचप्रमाणे वन विभागाने रोपांची उपलब्धता ठेवावी.
  बैठकीत विभागनिहाय सूचना देण्यात आल्या. बैठकीत उपवनसंरक्षक बी.टी भगत यांनी माहिती दिली.  
                                                                                   ****
शिष्यवृत्तीचे 5 हजार 108 अर्ज महाविद्यांलयांकडे प्रलंबित
·        महाविद्यालयांनी तात्काळ अर्ज समाज कल्याण विभागाकडे सादर करावे
बुलडाणा दि‍. 29 - अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्काचे सन 2014-15 चे 1 हजार 710 अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत. तसेच सन 2015-16 चे 3 हजार 398 अर्ज प्रलंबित असून एकूण 5 हजार 108 अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत.
     सदर अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित असल्याचे डॅश बोर्डवरून निदर्शनास येत आहे. याबाबत सर्व महाविद्यालयांना यापूर्वी कळविण्यात आले होते. मात्र महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांचे स्तरावर अर्ज प्रलंबित ठेवले आहेत. प्रलंबित असलेले, पडताळणी न केलेले अर्ज छाननी व पडताळणी  करून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे तात्काळ सादर करण्यात यावे. शिष्यवृत्ती मिळण्यापासून विद्यार्थी वंचित राहील्यास व विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील. वारंवार सूचना देवूनही प्रलंबित अर्जांची संख्या प्रचंड असल्याचे दिसून आले आहे.
        सदर अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र असल्याची माहिती यामुळे कार्यालयाला मिळत नाही. पात्र असलेले अर्ज महाविद्यालयांनी तात्काळ विद्यार्थ्यांच्या पात्रतेची खात्री करून प्रपत्र ब तसेच प्रथम वर्षाचे आरक्षण प्रवर्गाच्या हार्ड प्रती, व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शासकीय कोट्यातील प्रवेश असल्याचे डी.टी.ई चे प्रमाणीत याद्यांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावे,  असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांनी केले आहे.
गावांच्या समृद्धीसाठी आता स्मार्ट ग्राम योजना..
·        तालुका स्मार्ट ग्रामला 10 लक्ष, तर जिल्हा स्मार्ट गावाला 40 लक्ष रूपये बक्षीस
·        ग्रामपंचायतींनी 8 ते 15 डिसेंबर 2016 पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा दि‍. 29 गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृद्ध, संपन्न गावांची निर्मितीसाठी शासनाने स्मार्ट ग्राम योजना आणली आहे. राज्यात सन 2010-11 पासून पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेतंर्गत  उद्दिष्टे साध्य ग्रामपंचायतींना निधीच्या स्वरूपात पुरस्कार दिला जातो. सदर योजना विकासाचे एक आदर्श स्वरूप असली तरी राज्यामध्ये एक समान स्वरूपाचे निकष दिले गेल्याने काही जिल्हे व विभागांना या योजनेचा व्यवस्थित रित्या लाभ घेता आला नाही.
   सर्व विभागातील आर्थिक व सामाजिक परिस्थिती विचारात घेवून पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेच्या निकष व स्वरूपात बदल करून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस योजनेत सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेकरीता निवडण्यात येणारी ग्रामपंचायत शासनाकडून देण्यात आलेल्या निकषांच्या आधारे गुणांकन पद्धतीने पारदर्शकता ठेवून निवडली जाणार आहे. त्याकरिता गावांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असलेल्या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, आदिवासी किंवा पेसा ग्रामपंचायती व उर्वरित ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक दृष्टीकोनातून खूप मोठी तफावत दिसून येते. त्यामुळे सदरील ग्रामपंचायतीला त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन देण्यात आले आहे. स्वच्छता (sanitation), व्यवस्थापन (management), दायित्व (accountibility), अपारंपारिक उर्जा आणि पर्यावरण (renewable energy & environment), पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर (transparancy & technology) अशा्रपकारे संक्षिप्तमध्ये SMART या आधारावर ही गुणांकन पद्धत आहे. त्याकरिता 100 गुण ठेवण्यात आले आहे.
   योजनेकरीता गावांची निवड सहभागी ग्रामपंचायतीने स्व मुल्यांकन करून त्यांचे प्रस्ताव तपासणीकरीता संबंधीत पंचायत समिती कार्यालयास 8 ते 15 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करावेत. सदर यादीपैकी सर्वाधिक गुण प्राप्त 25 टक्के ग्रामपंचायतीची यादी / प्रस्ताव तपासणीकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे पंचायत समितीद्वारे 8 ते 15 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करण्यात येणार आहे. संबंधीत तालुक्यातील प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या एकूण स्व मुल्यांकन प्रस्तावांपैकी अधिक गुण प्राप्त 25 टक्के ग्रामपंचातीची तालुका तपासणी समिती तपासणी करणार आहे. त्यानंतर त्यांना गुणांकन देण्यात येतील. तपासणी करण्याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर समितीचे गठण करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील तालुका तपासणी समिती अन्य तालुक्यातील तपासणी करणार आहे.
   तालुका स्तरावरील सर्वाधिक गुण प्राप्त झालेली ग्रामपंचायत तालुका स्मार्ट ग्राम असणार आहे. सदर ग्रामपंचायत जिल्हा स्तरावरील द्वितीय स्पर्धेकरीता पात्र असेल. जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका स्मार्ट ग्राम यांचे सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतर पुर्नमुल्यांकन करण्यात येणार आहे. यामधून सर्वाधिक गुण मिळालेल्या ग्रामपंचायतीस जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषीत करण्यात येणार आहे.
  तालुकास्तराव प्रथम निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीस 10 लक्ष, जिल्हास्तरावर निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीस 40 लक्ष आणि जिल्हास्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचातीस 50 लक्ष रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी या योजनेत सहभागी होवून दिलेल्या मुदतीमध्ये स्व मुल्यांकनाचा प्रस्ताव पंचायत समितीला सादर करण्याचे आवाहन जि.प अध्यक्षा श्रीमती अलकाताई खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ यांनी केले आहे.
                                                               ********







सन 2017-18 चे बाजारमुल्य  दरतक्ते तयार करणे सुरू
·        नागरिकांनी सुचना व अभिप्राय 7 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करावे
बुलडाणा दि 29- नोंदणी व मुद्रांक विभागाकडुन  जिल्ह्यातील  सर्व नगर परीषदा, नगर पंचायती  तसेच प्रभाव क्षेत्र , ग्रामीण क्षेत्राचे सन 2017-2018  या आर्थीक वर्षाचे  मुद्रांक शुल्क  आकारणीसाठी उपयोगात  येणारे बाजारमुल्य 2017-2018 चे दर तक्ते तयार करण्याचे काम सुरु आहे. प्रस्तावित होणाऱ्या बाजार मुल्य दर तक्त्याबाबतीत  नागरीकांच्या सुचना / अभिप्राय असल्यास आपल्या तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालया किंवा सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय ,बुलडाणा यांचेकडे 7 डिसेंबर 2016 पर्यत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                           **********
                महाविद्यालयाचे  प्राचार्य  व शिष्यवृत्ती संबंधीत लिपीक यांच्या कार्यशाळेचे आयोजन
             बुलडाणा दि 29- भारत सरकार  शिष्यवृत्ती  /शिक्षण फी  परीक्षा  फी प्रदानाबाबत व महाविद्यालय स्तरावर प्रलंबीत  असलेल्या अर्जाचा आढावा घेणेबाबत  महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्ती संबंधीत कामकाज सांभाळणारे लि‍पीक यांची कार्यशाळेचे आयोजन  1 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन चिखली रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे, तरी या कार्यशाळेला प्राचार्य व संबंधीत लिपिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

                                                                                   *****

Friday 25 November 2016

news 25.11.2016 dio buldana

मतदारांनी  निर्भिडपणे मतदान करावे
                                                                                    - विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता
·         मतदारांनी बुथ क्रमांक तसेच इतर माहितीसाठी True Voter या मोबाईल ॲप चा वापर करावा
·        निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या पोलीसांनाही मिळणार भत्ता
·        मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल सोबत नेण्यावर बंदी
बुलडाणा, दि. 25 :  जिल्हयात बुलडाणा, चिखली, मेहकर, मलकापूर, दे.राजा, शेगांव, जळगांव जामोद, नांदुरा व खामगांव या नऊ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणूकीकरीता रविवार, 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान व 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे. मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती, दबावाला बळी न पडता निर्भिड वातावरणात मतदान करावे, असे आवाहन विभागीय महसुल आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी केले आहे. 
    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात  नगरपालीका निवडणुकी संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना  ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, अति. मुख्यकार्यकारी अधिकारी बी.बी नेमाने, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदी मंचावर उपस्थित होते.
    प्रत्येक मतदाराला शासनातर्फे वोटरस्लीपचे वाटप होणे आवश्यक असुन वोटरस्लीपचा उपयोग मतदानाच्यावेळी  इतर अधिकृत ओळखपत्र उपलब्ध नसल्यास ओळखपत्र म्हणुन ग्राहय धरण्यात यावा अशा सूचना करीत विभागीय आयुक्त श्री. गुप्ता म्हणाले,  या वोटरस्लीपवर प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही व शिक्का आवश्यक आहे. मतदान केंद्रावर मतदान प्रक्रीयेत भाग घेत असलेल्या अधिकारी व कर्मचारी व्यतिरिक्त इतर कोणालाही मोबाईल सोबत ठेवण्यास  व त्याचा वापर करण्यास बंदी आहे.  सदर निवडणुकीमध्ये मद्यवाटप तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे तसेच भेट वस्तूचे वाटप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी  पोलीस विभागासह  इतर निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी  लक्ष ठेवुन कार्यवाही करणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमजबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे  व मतदारांवर प्रभाव टाकणा-या वस्तूंच्या  वाटपावर अंकुश ठेवणे याकरिता कार्यवाही करण्यात यावी. चलनातून रद्द करण्यात आलेल्या  500 व 1000 रूपयांच्या चलनी नोटांचे वितरण मतदारांना आकर्षीत करण्यासाठी  निवडणूक काळात  मोठया प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पोलीस विभागाने लक्ष ठेवून यावर अंकुश ठेवणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मतदारांना बुथ क्रमांक तसेच अन्य माहितीसाठी मतदारांकरीता  शासनाने True voter हे ॲप विकसित केले आहे. या ॲप्सच्या माध्यमातून मतदारांनी आपला बुथ क्रमांक आणि अन्य निवडणूक विषयक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही विभागीय आयुक्त यांनी यावेळी केले.
 जिल्हयात निवडणुकी दरम्यान अवैध मद्यविक्रीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेवून नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत ते म्हणाले,  महावितरणने  मतदानाच्या पहिल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीचे दिवशी संबंधीत भागातील विद्युत पुरवठा खंडीत न होण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच सध्या सायंकाळ लवकर होत असल्यामुळे मतदानाच्या दिवशी सायंकाळी प्रकाश व्यवस्था करावी. ऐनवेळी वीज पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी वीज पुरवठ्याची व्यवस्था करावी. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आता निवडणूकीचा भत्ता मिळणार आहे. त्यासाठी अशा पोलीस कर्मचाऱ्यांना नगर परिषद निवडणूकीचा भत्ता देण्यात यावा,  अशा सूचनाही विभागीय आयुक्त यांनी यावेळी दिल्या.
        ते पुढे म्हणाले, व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी  पथक, चेक पोस्टसाठी पथक, तक्रार निवारण कक्ष यांनी मतदान व मतमोजणी दिवशी सज्ज रहावे. प्रभागनिहाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र राखीव स्थितीत ठेवावे. ज्यादा यंत्रांची व्यवस्था करून ठेवावी. ऐनवेळी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यास 15 मिनीटात दुसऱ्या ईव्हिएम उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून मतदान थांबणार नाही. मतदान केंद्रामध्ये यापूर्वी उमेदवार किंवा त्यांनी नेमलेले इलेक्शन एजंट, पोलींग एजंट कितीही वेळा जायचे. या निवडणूकीला मात्र उमेदवार किंवा त्यांनी नेमलेले एजंट तीनपेक्षा जास्त वेळ मतदान केंद्रात जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
  याप्रसंगी संविधान शपथ देण्यात आली. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह संबंधीत यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  
डाव्या हाताच्या बोटांवर शाई असणाऱ्यांनी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे
डाव्या हाताच्या बोटांना  बँकेकडुन शाई लावली असेल, तर अशा मतदारांनी 26 नोव्हेंबर रोजी 5 वाजेपर्यंत आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन शाई लावलेले बोट दाखवुन त्यांच्या कडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. ते मतदानाकरीता आवश्यक आहे. बँकेमार्फत मतदारांच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली असल्यास काळजी नसावी.  असे मतदार थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान करु शकतात.
*****
नगर परिषद निवडणूकीरिता जिल्ह्यात दारूबंदी जाहीर
·        26, 27 व 28 नोव्हेंबर रोजी दारूबंदी
बुलडाणा, दि. 25 :  जिल्हयात बुलडाणा, चिखली, मेहकर, मलकापूर, दे.राजा, लोणार, जळगांव जामोद, नांदुरा व खामगांव या नऊ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणूकीकरीता रविवार, 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान व 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणकीदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात मतदानाच्या आदल्या दिवशी 26 नोव्हेंबर, मतदान दिवशी 27 नोव्हेंबर आणि मतमोजणी दिवशी 28 नोव्हेंबर 2016 रोजी दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे.
     मुंबई दारूबंदी कायदा, 1949 च्याय कलमान्वये जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवाना कक्ष व बिअर शॉपी अनुज्ञप्ती उपरोक्त दिवशी बंद राहतील. तरी सर्व संबंधी अनुज्ञप्तीधारकांनी आपल्या अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरूद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
********
मलकापूर व नांदुरा नगर पालिका क्षेत्रात कलम 144 लागू
·        मतदान व मतमोजणी केंद्र परीसरात जमाव करण्यास बंदी
बुलडाणा,दि. 25 -  मलकापूर व नांदुरा नगर परिषद मतदार संघाकरिता 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होत असून  28 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  या दोन्ही नगर परिषद क्षेत्रातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आणि निवडणूका निर्भयपणे, निपक्षपातीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परीसरात  कलम 144 लागू करण्यात आली आहे.
  त्यामुळे मतदानाचे दिवशी मतदान केंद्र व परीसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश यावर बंदी घालण्यात येत आहे.  या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे मलकापूरचे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

*******



राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा
बुलडाणा,दि. 25 -  जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त  नुकताच राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अलकाताई खंडारे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सर्व कमचाऱ्यांना यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी ए. बी अकाळ यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. यावेळी शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
****
जिल्हा स्तर युवा महोत्सवाचे 2 डिसेंबर रोजी आयोजन
·              18 प्रकारचे स्पर्धा प्रकार
·              युवकांनी 30 नोव्हेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करावा
बुलडाणा,दि.25 - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेद्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन 2 डिसेंबर 2016 रोजी करण्यात येणार आहे. महोत्सव सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार असून जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरून रोड, बुलडाणा येथे होत आहे.
   या महोत्सवात 18 प्रकारच्या बाबींवर स्पर्धा होणार आहे. प्रत्येक स्पर्धेत कलाकारांची संख्या व वेळ मर्यादा दिलेली आहे. त्याप्रमाणे सादरीकरण करावयाचे आहे. महोत्सवात लोकनृत्यसाठी 20 कलाकारांना 15 मिनीटांचा वेळ दिलेला असून लोकगित प्रकारासाठी 6 कलाकारांना 7 मिनीट वेळ राहील. त्याचप्रमाणे एकांकिका (हिंदी व इंग्रजी) 12 कलाकारांना 45 मिनीटे, शास्त्रीय गायन 1 कलाकाराला 15 मिनीटे, शास्त्रीय नृत्य एका कलाकाराला 15 मिनीटे, सितार एका कलाकार व 15 मिनीट वेळ, बासरीकरीता एका कलाकाराला 15 मिनीट, तबलासाठी 1 कलाकाराला 10 मिनीटे, विणा प्रकारासाठी एका कलाकाराला 15 मिनीट, मृदुंगकरीता एक कलाकार 10 मिनीट, हार्मोनियम एक कलाकाराला 10 मिनीटे, गिटारसाठी एका कलाकाराला 10 मिनीट, मणिपुरी नृत्य, ओडीसी नृत्य, भरतनाट्यम व कुचीपुडी नृत्याकरीता एका कलाकाराला प्रति स्पर्धा 15 मिनीटे आणि हिंदी, इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला 4 मिनीटांचा वेळ दिल्या जाणार आहे.
    त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, युवा मंडळे, संगीत विद्यालय, स्वयंसेवी संस्थेतील 13 ते 35 वर्ष वयोगटातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त संख्येने युवा महोत्सवात सहभाग घ्यावा. महोत्सवात आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत जन्मतारखेच्या दाखल्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नोंदवावा. अधिक माहिती, नियम व अटीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी केले आहे.    

******

Monday 26 September 2016

news 26.9.16 dio buldana

                                                     




जिल्ह्यातील 1551 पात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी
·        जिल्हास्तरीय समितीकडून 2 कोटी 90 लक्ष रूपयांच्या प्रस्तावांना मान्यता
·        755 शेतकऱ्यांना गहाण वस्तु परत मिळाल्या
   बुलडाणा, दि 26 -  शेतकऱ्यांसमोर बदलत्या हवामानाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. हवामान बदलामुळे पीक पद्धतीत बदल करून हवामानाशी सुसंगत पीक घेण्यासाठी शेतकरी सज्ज आहे. मात्र  कर्ज हा त्याच्यासमोरचा मोठा प्रश्न असून कर्जामुळे शेतकरी मेटाकुटीस येत असल्याचा अनुभव आहे.  शासनाने विदर्भ व मराठवाड्यामधील परवानाधारक सावकारांचे कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना व्याजासह कर्जमाफी दिली आहे. या दिलासा देणाऱ्या निर्णयामुळे निश्चितच जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरोखरच शासनाने दिलेली कर्जमाफी ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वचनपूर्ती ठरली आहे.
   शासनाने परवानाधारक सावकारांकडील विदर्भ मराठवाड्यातील  शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील परवानाधारक 50 सावकारांकडून कर्ज घेतलेल्या 1551 पात्र कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज त्यावरील व्याज शासनाने माफ केले आहे. जिल्हास्तरीय समितीने 2 कोटी 90 लक्ष रूपयांचे प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मुद्दल 2 कोटी 48 लक्ष आणि 42 लक्ष रूपयांच्या व्याजाचा समावेश आहे.  त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 36 सावकारांकडील 755 कर्जदार शेतकऱ्यांपोटी 1 कोटी 80 लक्ष रूपयांची रक्कम खर्च केली आहे. ही रक्कम परवानाधारक सावकारांना शासन कर्जाची व व्याजाची रक्कम अदा करणार असल्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे हलके होण्यास मदत मिळणार आहे.
       या योजनेनुसार 30 नोव्हेंबर 2014 रोजी परवानाधारक सावकाराकडून येणे असलेले आजमितीस परत फेड केलेली कर्ज, त्यावरील व्याजासह शासनाने माफ केले आहे. या कर्जमाफीसाठी कर्जदार हा शेतकरी अथवा शेतकरी कुटूंबातील असावा, परवानाधारक सावकाराच्या कार्यक्षेत्रातील रहीवासी शेती असणारा असावा. नोकरदार, निवृत्ती वेतन धारक, दुकान आस्थापना अधिनियमनातंर्गत परवानाधारक या कर्ज माफीसाठी अपात्र आहेत.
    जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या 30 नोव्हेंबर 2014 रोजी 158 होती. त्यापैकी या योजनेतंर्गत शेतकरी कर्जदारांचे कर्ज माफ करण्यासाठी तालुका स्तरीय समितीने छाननी करून 1551 कर्जदार शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यापैकी 755 शेतकऱ्यांना मुद्दल व्याज, असे 1 कोटी 80 लक्ष रूपयांचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची कार्यवाही सुरू आहे. कर्ज व व्याज माफीसोबतच शासनाने सावकारांकडे गहाण ठेवलेल्या वस्तु शेतकऱ्यांना परत देण्याची कार्यवाहीसुद्धा केली आहे. आतापर्यंत 755 शेतकऱ्यांना सावकारांकडे गहाण ठेवलेल्या वस्तु मिळाल्या आहेत.
       जिल्हाधिकारी यांनी या योजनेतंर्गत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यांच्या सावकाराकडील तारण वस्तू 7 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना परत करून देण्याची कार्यवाही करण्याच्या व या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांचे 12 हजार 93 कर्जदार शेतकऱ्यांच्या 13.40 कोटी रूपये कर्जाच्या याद्या तालुका स्तरीय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. या याद्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार तापासणी करून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. कर्जमाफी करण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू असल्यामुळे शेतकरी पुढील हंगामाला आशेने सामोरे जात आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीप्रमाणे राज्य सरकार बळीराजाला सुखी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. हा याच प्रयत्नांचा भाग आहे.
  कर्ज माफी दिलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रमाणपत्रही दिल्या जाणार आहे. यामुळे शेतकऱ्याला सदर सावकार पुढे कर्ज वसूलीचा तगादाही लावणार नाही. सावकारांचे कर्ज माफ होत असल्यामुळे शासनाचे शतश: आभार जिल्ह्यातील शेतकरी मानत आहे. शेतकऱ्यांचे सावकारांकडील कर्ज माफ झाल्यामुळे नव्या उमेदीने शेतकरी सज्ज झाला आहे. एवढे मात्र निश्चित.
****
नगर परिषद निवडणूकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
  • 7 ऑक्टोंबर 2016 पर्यंत हरकती, सूचना दाखल कराव्यात
बुलडाणा, दि. 26 - राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाप्रमाणे नगर परिषद निवडणूक -2016 करीता प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी नगर परिषद बुलडाणा, चिखली, दे.राजा, मेहकर, खामगांव, शेगांव, जळगाव जामोद, नांदुरा व मलकापूर येथील मतदारांची आहे. यादी संबंधित नगर पालिकांमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. तरी या नगर परिषदांमधील रहिवाशांनी प्रारूप मतदार यादीवर काही हरकती व सूचना असल्यास संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांचेकडे 7 ऑक्टोंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
----------------
पं. दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 26 पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला 25 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी पुष्प अर्पण केले.
याप्रसंगी जिल्हा पुनर्वसन अधिकारी एस.ए खांदे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चौधरी, अधिक्षक एन.डी कुळकर्णी, नायब तहसीलदार के.व्ही पाटील, एन.व्ही येलकर, एस.जी गिरी, श्री मोगल आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

*******