बुलढाणा जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना; शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध: आता 875 ग्रामपंचायती

 


बुलढाणा (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजात सुलभता यावी तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार व शासनाच्या निकषांची पूर्तता होत असलेले प्रस्ताव जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात नव्याने पाच ग्रामपंचायतींची स्थापना करण्याबाबत शासन राजपत्रात स्वतंत्र अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींपैकी संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत दोन तर सर्वसाधारण निकषांतर्गत तिन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत चिखली तालुक्यातील ग्रामपंचायत अंचरवाडीचे विभाजन करून वसंतनगर, मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत विश्विचे विभाजन करून राजगड येथे नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण निकषांअंतर्गत लोणार तालुक्यातील ग्रामपंचायत पारडाचे विभाजन करून धायफळ, जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत रसूलपूरचे विभाजन करून वायाळ (निमखेडी), तसेच ग्रामपंचायत सुनगावचे विभाजन करून चालठाणा खुर्द येथे नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या 870 वरून 875 झाली आहे. नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर त्या नियमानुसार गठित होतील.

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल वायाळ (निमखेडी) व चालठाणा खुर्द, तसेच लोणार तालुक्यातील मूळ ग्रामपंचायत पारडापासून तब्बल 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या धायफळ गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समितीचे अशासकीय सदस्य डॉ. प्रशांत गलसिंग राठोड(मेहकर) व दीपक शिवसिंग साबळे (तरोडा) यांच्या पाठपुराव्यामुळे बंजारा तांडा भागासाठी वसंतनगर व राजगड या नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती सुलभ झाली.

नवीन ग्रामपंचायतींच्या निर्मितीसाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्यामध्ये संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले असल्याचे मत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शिवशंकर भारसाकळे यांनी व्यक्त केले आहे. तसेच निकषांची पूर्तता होत असलेल्या ग्रामपंचायतींनी अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधित पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या