Friday 31 March 2023

DIO BULDANA NEWS 31.03.2023

 सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 31 : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मार्च महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 3 फेब्रुवारी  2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आला आहे.

लोकशाही दिनानंतर शासकीय योजनांची जत्रा, समन्वय समितीच्या अनुषंगाने विभागप्रमुखांशी चर्चा, आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचा निपटारा, लोकसेवा हक्क प्रकरणांचा आढावा, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष तक्रारींचा आढावा घेण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे.

00000

ढासाळवाडी, वरवंडसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, दि. 31 : बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी आणि वरवंड या दोन गावांसाठी पिण्याचे पाणी पर्याप्‍त प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.

ढासाळवाडी येथील लोकसंख्या 1 हजार 173 असून पशूधन 850 आहे. गावाला एका टँकरद्वारे दररोज 18 हजार 460 लिटर पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच वरवंड येथील लोकसंख्या 6 हजार असून पशूधन 325 आहे. गावाला एका टँकरद्वारे दररोज 1 लाख लिटर पाणी पुरवठा केला जाणार आहे.

पाणीटंचाई निवारणाच्या निकषानुसार सदर दोन गावास पशूधनासह लागणारा पाणी पुरवठा हा अस्तित्वात असलेली पाणी पुरवठ्याची साधने, स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेऊन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.

00000

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या

कर्जासाठी 12 एप्रिल रोजी सोडत

बुलडाणा, दि. 31 : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवार, दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या प्रकल्प मर्यादा एक लाख रूपयांपर्यंत थेट कर्ज योजनेंत दि. 26 डिसेंबर ते 24 जानेवारी दरम्यान कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आले. यात एकूण 190 अर्ज प्राप्त झाले. अपर जिल्हाधिकारी यांच्या बैठकीमध्ये यातील 158 अर्ज पात्र, तर 32 अर्ज अपात्र ठरले आहेत. कर्ज मागणी अर्जापैकी शहरी पुरूष 20, ग्रामीण पुरूष 97 तर शहरी महिला 11 आणि 30 ग्रामीण महिला आहेत.

पात्र अर्जदारांची यादी महामंडळाच्या कार्यालयात सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जदारांनी सोडतीच्या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

00000

शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा निकाल जाहिर

बुलडाणा, दि. 31 : पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरीता घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणीचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी दि. 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दि. 24 मार्च रोजी mscepune.in या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणपत्रिका ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या मुदतीनंतर सदर वेबलिंक बंद करण्यात येणार असल्याने उमेदवारांनी दि. 20 एप्रिल 2023 पर्यंत गुणपत्रक डाऊनलोड करून घ्यावे. गुणपत्रिकेची प्रत संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जपून ठेवावी, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी केले आहे.

000000

Tuesday 28 March 2023

DIO BULDANA NEWS 28.03.2023

 फेडरेशन कप स्पर्धेतील खेळाडूंना

अर्ज करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत

बुलडाणा, दि. 28 : फेडरेशन कप स्पर्धेत सहभागी खेळाडूंचे गुणांकन होत नसल्याने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता अर्ज सादर करु शकले नाहीत. त्यामुळे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता पात्र खेळांमधील ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात असे सहभागी, प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे प्रस्ताव आणि विहित नमुन्यातील अर्ज खेळाडूंनी दि. 31 मार्च 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार देण्यात येते.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील खेळाडू ज्या खेळाच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात, असे सहभागी, प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येतात. अर्जाचा विहीत नमूना sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत.

याबाबत अधिक माहिती sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्यामधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या खेळाडूंनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याबाबत क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

000000

Monday 27 March 2023

DIO BULDANA NEWS 27.03.2023

 


नव्या पिढीने संकल्प करुन कर्तव्यभावनेने शांतीदूत व्हावे

-अरुणभाई गुजराथी

*जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम संपन्न

बुलडाणा, दि. 27 : आजचा युवक अत्यंत हुशार आणि बुद्धिमान आहे.  त्यांच्यात प्रचंड शक्ती आणि उर्जा आहे. युवकांच्या हातात सर्व शक्ती, सर्व प्रेरणा, सर्व चेतना, सर्व उर्जा आहे. एकता आणि एकात्मता जपण्यासाठी नव्या पिढीने संकल्प करून कर्तव्यभावनेने जगात शांती नांदावी यासाठी शांतीदूत व्हावे, असे आवाहन विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी केले.

नेहरु युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम शनिवार, दि. 25 मार्च रोजी सहकार ऑडीटोरियम येथे पार पडला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, राधेश्याम चांडक, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेश बुरंगे, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. विष्णू पडवाल, प्राचार्य डॉ. विजय नागरे, नायब तहसिलदार कल्याण काळदाते उपस्थित होते.

श्री. गुजराथी म्हणाले, युवकांनी चांगल्या कार्यासाठी पुढे यावे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे एकच ध्येय ठेवावे. ते गाठण्यासाठी जिद्द, चिकाटीने सतत प्रयत्न करावे. जीवनात संधी ही अत्यंत महत्वाची आहे. युवकांनी श्वास, विश्वास, आणि आत्मविश्वास या तीन बाबी जपाव्यात, असे त्यांनी सांगितले.

खासदार श्री. जाधव यांनी, युवा संसदेच्या माध्यमातून चांगले युवा वक्ते तयार होत आहेत. यातून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बोलण्याची संधी मिळणार आहे. शिस्तबद्ध जीवन लोकांसाठी त्याग करणारा, नैसर्गिक आपत्ती आणि संकटाच्या वेळी धावून जाणारा युवक घडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्री. चांडक यांनी, युवकांनी स्वत:चे गुरु स्वत: व्हावे. आपल्याला भारतमातेचे काही देणे आहे. देशाने, निसर्गाची परतफेड म्हणून आपले ही काही देणे आहे, याचा विचार करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करताना वृक्ष जगविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

नांद्राकोळी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज संस्थेस वर्ष 2022-23चा जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष सतिष उबाळे यांना देण्यात आला. तसेच ‘कॅच द रेन पोस्टर’चे विमोचन करण्यात आले. वर्ष 2021-22 मधील उत्कृष्ठ स्वयंसेवक म्हणून शेगाव येथील सुरज बोरसे, लाखनवाडा, ता. खामगाव येथील सुमित वाकोडे, लोणार येथील शितल मुंडे यांना गौरविण्यात आले.

जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रास्ताविक केले. रणजितसिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर कांदे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी धनंजय चाफेकर, विलास सोनोने, देवानंद नागरे, अजय सपकाळ, विनायक खरात यांनी पुढाकार घेतला.

00000



विशेष लोक अदालतीमध्ये 13 लाखांची नुकसान भरपाई

बुलडाणा, दि. 27 : राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघच्या वतीने शनिवार, दि. 25 मार्च रोजी विशेष लोकअदालत पार पडली. यात 13 लाख 35 हजार रूपयांचा विमा दावा अदा करण्याबाबत आदेश देण्यात आले.

लोकअदालतीमध्ये 18 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील एक दावा निकाली काढण्यात आला. यात 13 लाख 35 हजार रूपयांचा नुकसान भरपाईचा दावा विमा कंपनीने अर्जदारास अदा करण्याबाबत आदेश देण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या अध्यक्षतेखाली पॅनेलप्रमुख म्हणून सहदिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर डी. बी. हंबीरे, सहायक पंच म्हणून ॲड. आर. ई. निकम होते. लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव हेमंत भुरे, अधीक्षक एस. एस. अवचार, व्ही. डी. बोरेकर, सुनिल मुळे, आकाश अवचार, गजानन मानमोडे, वैभव मिलके यांनी पुढाकार घेतला.

000000


DIO BULDANA NEWS 25.03.2023

 

 बचतगटांनी उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनीचे उद्घाटन

*महिला आर्थिक विकास महामंडळाचे आयोजन

बुलडाणा, दि. 25 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचतगटांनी उत्पादीत वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज जिजामाता प्रेक्षागार येथे पार पडले.

खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हाधिकारी डॉ. . पि. तुम्मोड यांच्या हस्ते भव्य प्रदर्शनी आणि विक्रीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विभागीय सनियंत्रण मूल्यमापन अधिकारी केशव पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे उपस्थित होते.

सुरवातीला माँ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

तीन दिवस चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनीमध्ये शंभराहून अधिक महिला बचतगटांनी सहभाग नोंदविला आहे. या बचत गटांनी स्वतः उत्पादित वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल याठिकाणी लावले आहेत. नागरिकांनी प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

*दि. 25 ते 28 मार्च 2023 या कालावधीत ऑनलाईन मुलाखती

बुलडाणा, दि. 25 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 25 ते 28 मार्च 2023 या कालावधीत करण्यात आले आहे

सदर रोजगार मेळाव्यामध्ये खामगाव येथील हिंदुस्थान लिव्हर कंपनीने रोजगार मेळाव्यासाठी पदे अधिसुचित केली आहेत. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.. या मेळाव्याद्वारे हिंदुस्थान लिव्हर कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू रोजगार इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड करतील. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी आणि बारावी पास पुरुष, महिला उमेदवारांनी आपले सेवासोजन कार्डचा आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइनमधून ऑनलाईन अर्ज (Apply) करुन यात सहभागी व्हावे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन (Employment) कार्डचा युझर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करुन आपल्या लॉगइनमधून ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतील.

पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता अर्ज करु शकतील. दि. 25 ते 28 मार्च दरम्यानच्या मेळाव्याबाबत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यश संपर्क साधावा, तसेच अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या (07262-242342) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.  

00000

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा

 

बुलडाणा, दि. 25 : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे रविवार दिनांक 26 मार्च रोजी सायंकाळी 6.45 वाजता शेगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल आणि त्यानंतर ते मुक्काम करतील. सोमवारी दिनांक 27 मार्च रोजी सकाळी आठ वाजता श्रींचे दर्शन घेतील. त्यानंतर नऊ वाजता शेगाव येथून अकोला कडे प्रयाण करतील.

00000