Friday 29 December 2023

जिल्ह्यातील 1420 गावांची 50च्या आत अंतिम पीक पैसेवारी

 

 बुलडाणा,दि.29(जिमाका):जिल्ह्यातील सन 2023-24 या खरीप हंगामातील एकूण 1420 गावांची अंतिम पीक पैसेवारी 50 पैशाच्या आत जाहीर झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 तालुक्यातील गावे आणि अंतिम पैसेवारी ही पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये नांदुरा तालुक्यातील 112 गावांची पैसेवारी ही 44 असून, जळगाव जामेाद तालुक्यातील 119 गावांची पैसेवारी 45 तर मलकापूर तालुक्यातील 73 गावांची पैसेवारी 46 आहे. बुलडाणा 98, मेहकर 161, मोताळा 120, खामगाव 146, शेगाव 73 आणि संग्रामपूर तालुक्यातील 105 गावांची पैसेवारी ही 47 आहे. चिखली तालुक्यातील 144, देऊळगाव राजा 64, लोणार 91 आणि सिंदखेड राजा तालुक्यातील 114 गावांची पैसेवारी ही 48 आली आहे. सर्व तालुक्यातील गावांची पैसेवारी सरासरी 47 असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी कळविले आहे.

*****

सामाजिक न्यायभवनात महामंडळांच्या कार्यालयांचे स्थलांतर

बुलडाणा,दि.29(जिमाका): महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि  लिंगायत समाजासाठी जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 9 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार झाली आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कार्यान्वित करण्यात आले आहे.            या मंडळमार्फत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, पहिला मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, त्रिशरण चौक, बुलढाणा दूरध्वनी क्र.07262-248285 येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. झेड. राठोड यांनी केले आहे.

*****


बुलडाणा येथे 5 जानेवारीपासून विविध प्रशिक्षणाचे आयोजन


बुलडाणा,दि.29(जिमाका): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रद्वारा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करू इच्छिणारा सुशिक्षित बेरोजगार युवक -युवतींसाठी बुलडाणा येथे 5 ते 9 जानेवारीदरम्यान शेळीपालन, कुक्कट पालन, गाय- म्हैस पालन अशा पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवक-युवतींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.

                      सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरु करावा हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असून, या कालावधीत शेळी, कुक्कुट आणि गाय-म्हशी पालनाचे तंत्र आणि प्रकार त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार व उद्योग सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन आणि सहकार्य  तसच विविध शासकीय योजनांची माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान 5 वी पास तसेच 18 ते 50 वर्षे वयादरम्यानचा असावा.  प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणारांनी 5 जानेवारी 2024पर्यंत कार्यलयीन वेळेत नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांनी केले आहे.

       अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रद्वारा जिल्हा उद्योग केंद्र, चिखली रोड, बुलडाणा येथे 8275093201 आणि 9011578854 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

*****


प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची संधी

 

बुलडाणा,दि.29(जिमाका): जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांनी काही कारणास्तव प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरले नाहीत, त्यांनी 1 ते 5 जानेवारी 2024 पर्यंत आपले अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा. 1 ते 5 जानेवारी 2024 या कालावधीत संबंधित योजनेसाठी पुन्हा खिडकी उघडण्यात येत असून, अर्ज न भरलेल्या माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमातांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉ.लिडर रूपाली सरोदे यांनी केले आहे.

******

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गंत जिल्ह्यात मेळाव्यांचे आयोजन

 

बुलडाणा,दि.29(जिमाका): विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालयाकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना गतिमानता पंधरवडा घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत सन 2023-24 या वर्षाच्या उद्दीष्टपूर्तीच्या उद्देशाने जिल्ह्यात तालुकानिहाय सीएमईजीपी मार्गदर्शन, माहिती मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

त्यानुसार संबंधित तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक युवती, संभाव्य नवउद्योजक, एफपीओ संघटना, बँकर्स, महिला बचत गटांना सहभागी होण्यासाठी आवाहन आले असून, या मेळाव्यामध्ये लाभार्थी निवड करुन सीएमईजीपी पोर्टलवर प्रस्ताव अपलोड करण्याची सुविधा ठेवण्यात आली आहे. आपली आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे.

हे मेळावे एमएसआरएलएम, रेसिडेन्सी आणि शाहु कॉलेज, बुलढाणा येथे तर आयटीआय कॉलेज संग्रामपूर, माविम सीएमआरसी केंद्र आणि इंजिनियअर कॉलेज शेगाव, एनयुएलएम नगर परिषद सभागृह खामगाव, आयटीआय कॉलेज सिंदखेड राजा, एमएसआरएलएम, पंचायत समिती सभागृह, मेहकर, आयटीआय कॉलेज चिखली, कोलते इंजिनिअरिंग कॉलेज मलकापूर, माविम सीएमआरसी केंद्र जळगाव जामोद, एनयुएलएम नगर परिषद सभागृह नांदुरा, आयटीआय कॉलेज दे. राजा, मोताळा  आणि आयटीआय कॉलेज लोणार येथे होणार आहेत. अधिक माहितीसाठी 07262-242367 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*****

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

 

 बुलडाणा,दि.29(जिमाका): राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्या  मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये 102 गुन्हे नोंदविण्यात आले असून,  101 वारस, एक बेवारस गुन्हे नोंदवून तब्बल 108 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 16 दुचाकी व एका ऑटोसह एकूण 28 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये देशी 615 तर विदेशी मद्य 78 लिटर, ताडी 42  आणि रसायन (सडवा) 28 हजार 486, हातभट्टी 1041 व बिअर 11.7 लिटर मद्य पकडण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत धामणगाव बढे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सिंदखेड लपाली येथील गोपाल दगडु मुंडाळे याच्या घरातून 10 किलो गांजा व गुगळी शिवारात अंदाजे 32 किलो गांजाची झाडे असा एकूण 42 किलोचा साठा पकडला. या प्रकरणी गोपाल मुंडाळे याला अटक केली असून, त्याला 4 जानेवारी 2024पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक नयना देशमुख यांनी नुकतीच मेहकर येथील हॉटेल कैलास ढाबा येथे तर दुसऱ्या एका प्रकरणात निरीक्षक श्री. रोकडे व श्रीमती नयना देशमुख यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील प्रविण मधुकर जाधव यांच्या हॉटेल निसर्ग धाब्यावर छापा टाकला असता दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन याप्रमाणे चार ग्राहकांविरोधात विनापरवाना मद्य सेवन करत असल्यावरून त्यांच्याविरुध्द दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.

 तसेच या कार्यालयाने नाताळ व नववर्षानिमित्त 24 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष मोहीम राबवत अवैध ढाबे तसेच अवैध मद्यविक्री करणा-या व्यक्तींविरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही विनापरवाना असलेल्या अवैध धाब्यांवर मद्यसेवन तसेच अवैध मद्यविक्री करू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पंडीत यांनी केले आहे. 

आपल्या परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास १८००८३३३३३ या निशु:ल्क क्रमांकावर किंवा व्हॉट्स ॲप ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाच्या पोर्टलवर तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*****

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेच्या विविध योजनांसाठी अर्ज करावेत

 

बुलडाणा,दि.29(जिमाका): केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनांचा सन 2022-23 व 2023-24 वर्षाच्या गट अ निहाय प्रारुप आराखडा वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचे अर्ज 1 ते 19 जानेवारी 2024 या कालावधी अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातील उमेदवारांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला येथे करावेत, असे आवाहन असे आवाहन मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.

  या योजनांची यादी व योजनानिहाय अर्ज प्रकल्प कार्यालय अकोला येथे उपलब्ध असून, वैयक्तिक लाभाच्या योजना 85 टक्के अनुदानावर काटेरी तार, खाद्य स्टॉल, पिठगिरणी, शिवणयंत्र, ताडपत्री, वनहक्क जमीन प्राप्त शेतकऱ्यांकडून तार जाळी, ताडपत्री इ. तसेच आदिवासी महिला व पुरष बचत गटांकडून रेडीमेट होजीअरी गारमेंट या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांकडे अनुसूचित जमातीचा दाखला, रहिवाशी दाखला, आधारकार्ड, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र व योजनेच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

शासनाकडून प्राप्त झालेल्या लक्षांक, निधी व आवश्यक कागदपत्राची पूर्तता विचारात घेऊन निवड समितीव्दारे लाभार्थी निवड करण्यात येईल, तरी योजनांचा पात्र व ईच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी श्री. व्यवहारे यांनी केले आहे.

*******

निवृत्तीवेतनधारकांनी करबचतीचा 10 जानेवारीपर्यंत तपशील सादर करावा

 

बुलडाणा,दि.29(जिमाका): सर्व निवृत्तीवेतन धारकांनी 2023-24 या आर्थिक वर्षात आयकर निर्धारण करण्यासाठी त्यांनी केलेल्या बचतीचा तपशिल दिनांक 10 जानेवारी 2024 पर्यंत कोषागार कार्यालय बुलढाणा येथे कळवावा अन्यथा आपल्या उत्पन्नानुसार कर निर्धारण करून टी. डी. एस. कपात करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. तरी सर्व निवृत्तीवेतन धारकांनी बचतीचा तपशील व पॅन कार्डची छायांकित प्रती जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

******

‘मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

 

 बुलडाणा,दि.29(जिमाका): दिव्यांगांनी स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र दिव्यांगांकडून 4 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.

 दिव्यांगांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांगांना, त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा योजनेचा मुख्य हेतू असून, दिव्यांगांना https://evehicleform.mshfdc.co.in येथे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी  योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे. 

******

नवमतदारांनी विशेष पुनरीक्षण यादी कार्यक्रमात नावनोंदणी करावी - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

नवमतदारांना नावनोंदणीसाठी आता 5जानेवारीपर्यंत सुवर्णसंधी

 बुलडाणा, दि.29(जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा सुधारित विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, आता यामध्ये नवमतदारांना नावनोंदणी करण्यासाठी 5 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र नवमतदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 

भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या 27 डिसेंबर 2023 च्या पत्रानुसार सुधारित पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार दिनांक 5 जानेवारी 2024 पर्यंत सर्व नागरीक आपले मतदार नोंदणी अर्ज Online स्वरुपात https://voters.eci.gov.in व voter helpline app चा वापर करून सादर करू शकतात किंवा ऑफलाईन स्वरूपात संबंधित केंद्र स्तरीय अधिकारी किंवा केंद्र स्तरीय एजंट (बीएलओ, बीएलए) व संबंधित तहसिल कार्यालयांशी  संपर्क साधून नावनोंदणी करता येणार आहे.

वरील दिनांकापर्यंत प्राप्त दावे व हरकती दिनांक 12 जानेवारी 2024पर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत. तसेच 22 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे वरील कार्यक्रमानुसार नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल, तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाणार आहे. सोबतच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सद्यस्थितीमध्ये मतदारांच्या छायाचित्र साधर्म्य आणि ठिकाण साधर्म्याबाबत सर्व दुबार नोंद असलेल्या मतदारांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्याबाबत संबंधित केंद्र स्तरीय अधिका-यांना कायम ठेवावयाची व वगळणी करावयाच्या नोंदीबाबत अचूक माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नागरिकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणा-या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र निःशुल्क क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालय, केंद्रस्तरीय अधिका-यांसोबत संपर्क साधून मतदार नोंदणी, वगळणी, दुरूस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

******

Monday 4 December 2023

कृषि विभागातंर्गंत साहित्य पुरवठ्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 ·         जिल्हा परिषद बुलडाणा सेसफंड योजना सन 2023-24

बुलडाणा, दि. 04(जिमाका): जिल्हा परिषदेच्या सेसफंड योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेतून 75 टक्के अनुदानावर 5अश्वशक्ती विद्युत मोटरपंप संच, पॉवर स्प्रेअर्स, मानवचलीत टोकनयंत्र तसेच रोटाव्हेटर, बीबीएफ प्लाटर, बियाणे खते पेरणी यंत्र आदी (40,000 रुपयांच्या मर्यादेत) साहित्य पुरविणे प्रस्तावित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज बोलावण्यात येत आहेत.

तरी इच्छुक शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमधील कृषि विभागात कृषि अधिकारी (सामान्य) तसेच विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या योजनेअंतर्गत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

***** 

मतदारयादीत नाव नोंदवून लोकशाही बळकटीकरणास हातभार लावा - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील

 बुलडाणा,दि.04(जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, लोकशाही तत्वावर आधारित देश आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यासाठी आपण सर्व मतदार बहुमूल्य मताच्या आधारे लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळकट करण्याचे काम करतात. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे काम केले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम मतदार यादीत नाव नोंदवून घेत लोकशाही बळकटीकरणास हातभार लावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

सध्या भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुरु असून, जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदार यादी पुनरिक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या युवक-युवतींनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदणी करावे जेणेकरून  आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी आवाहनातून सांगितले आहे.  

  आपले नाव आजच मतदार यादीमध्ये नोंदवावे. आपले नाव मतदार यादीत असेल, परंतु, चुकीचे नोंदविले गेले असेल, आपले छायाचित्र नोंदविले नसेल किंवा चुकीचे नोंदविले गेले असेल तसेच नाव नोंदविले गेले आहे. परंतु छायाचित्र नसेल तर अशा सर्वासाठी ही एक सुवर्ण संधी असून, भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमातंर्गत आपल्या स्मार्टफोनमध्ये www.voterportal.in या संकेतस्थळावर व voter helpline app वर भेट देऊन नाव नोंदणी व दुरुस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

            दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होणा-या सर्व युवक व युवतींना घर बसल्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणी स्मार्टफोनद्वारे करता येईल. तसेच ज्या युवक-युवतींना अशाप्रकारे नोंदणी करता येत नाही, अशा सर्व युवा वर्गाने आपल्या जवळच्या तहसील कार्यालयाशी किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क करावा. तसेच नोंदणी करता येते अशा युवा वर्गाने  नाव नोंदणी करता येत नाही अशांना मदत करावी व राष्ट्र सक्षमीकरण व लोकशाही बळकटीकरणाच्या या पवित्र कामात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

            लोकशाही मजबुतीकरणाच्या या प्रक्रियेत महिला, युवती, दिव्यांग अशा सर्वच घटकांचा सहभाग महत्त्वाचा असून, आपण सर्वांनी मतदार नोंदणी प्रक्रियेत तसेच मतदानाच्या पवित्र राष्ट्रीय कामात सहभागी व्हावे व खऱ्या अर्थाने लोकशाहीचे बळकटीकरण करावे. ‘मतदार म्हणजेच लोकशाहीचा आधारस्तंभ’ मतदान आपला अधिकार आहे तो बजावलाच पाहिजे. आपले मत बहुमूल्य आहे आणि त्यासाठी आपली मतदार नोंदणी झालीच पाहिजे. जेणेकरुन मतदान व लोकशाही बळकटीकरणाच्या पवित्र राष्ट्रीय कार्यात आपण सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.  

*****

 

फळ व रब्बीतील पिकांचा विमा काढण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ

 बुलडाणा, दि. 04(जिमाका): राज्यात विमा योजना अंतर्गत 2023-24मध्ये संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी आणि कोकणातील आंबा आणि काजू फळपिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कृषि विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता यावे, यासाठी कोकणातील आंबा, राज्यातील काजू, संत्रा आणि रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने 05 डिसेंबर2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे. आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी फळ पिकांसाठी 05 डिसेंबर 2023 पर्यंत विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. याचा राज्यातील आंबा, काजू, संत्रा व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरीत भागातील आंबा फळ पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 असा नियमित आहे तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम 15 डिसेंबर 2023 राहणार आहे, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले हे.

*****

 

Sunday 3 December 2023

राज्य शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी - पालकमंत्री दिलीप वळसे पाटील







 

• पालकमंत्री दिलीप वळसे पाटील शेतक-यांच्या थेट बांधावर

• कृषि विभागाकडून घेतला आढावा

• आसोला जहांगीर येथे छत उडालेल्या नागरिकांना सानुग्रह राशीचे वाटप

• नुकसानग्रस्त भागाचे ता़त्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

• आधार प्रमाणीकरण पुन्हा सुरु होणार

• पिक विम्याचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि.03(जिमाका): जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासन नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात अतिवृष्टी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील सावरगाव माळ, गोळेगाव, गिरोली, आसोला जहाँगीर आणि पळसखेड चक्का या नुकसानग्रस्त भागाचा पालकमंत्र्यांनी आज दौरा करून पाहणी केली. 

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी,  निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, उप विभागीय अधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार सचिन जैस्वाल, शाम धनमने जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोज ढगे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गारपीट व अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकविमा योजनेत समाविष्ट केलेल्या पिकांना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा शासनस्तरावर प्रयत्न करू, असा दिलासा पालकमंत्र्यांनी शेतक-यांना दिला. प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांनी योग्य समन्वय साधून अहवाल सादर केल्यानंतर मदत मिळवून देण्यात येईल,असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

द्राक्ष पिकासाठी अनेक शेतक-यांनी एकरी लाखो रुपये खर्च केला असून, बागेचे नुकसान झाले आहे. या भागात बीज उत्पादनाचे मोठे प्रमाण असून, कंपन्या शेतमालावर प्रोसेसींग करतात आणि शेतक-यांच्या मालाला चांगला भाव देतात. मात्र या पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतक-यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळासमोर अहवाल ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगीतले

 गारपिटीमुळे कापूस, द्राक्षे, तूर, ज्वारी, मका, शेडनेट, शेडनेटमधील मिरची आदी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी पिक अधिसूचित करण्यासाठी ७२ तासांची अट शिथिल करून पिक विमा प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी अडचण आल्यास‌ जिल्हा प्रशासन व कृषि विभागाशी संपर्क साधावा, त्यांना ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

            गोळेगाव येथे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधून, आधार प्रमाणीकरण करताना पोर्टल बंद असल्यामुळे अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर आता ती प्रक्रिया सुरु होत असून, मदत व पुनर्वसन विभागाकडून लवकरच मदत मिळेल असे त्यांनी सांगितले.

            शेतपिकांच्या नुकसानीचा अंदाज महसूल विभागाला काढण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असून, अधिका-यांनी शेतक-यांना जास्तीत जास्त मदत होईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत. घरांचे ही नुकसान झाले असून, बियाणे हब असलेल्या भागात अनेक कंपन्या काम करत आहेत. इंडियन कॉन्ट्रँक्ट अँक्ट लागू असल्यामुळे हा कायदा समजून घ्यावा लागेल; या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक असून, त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलवावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. त्याबाबत कंपन्यावर सरकार किंवा प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्या नियंत्रित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी लागेल. कंपन्यांकडून स्थानिक रोजगारात अडचणी येणार नाहीत, याचाही विचार करावा लागणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. त्यापूर्वी आपण मदत वाटपाचे निकष व नियम बदलून घ्यावेत असे सांगून शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. मात्र आता तांत्रिक अडचणी सुटल्या असून, लवकरच निधी शेतक-यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे श्री. वळसे पाटील म्हणाले.

 विदर्भातील काही भागात मोठ्या प्रमाणावर बीज उत्पादन घेतले जाते. त्यासाठी शेडनेट उभारणीला खर्च येतो त्याचे नुकसान झाले आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेत शेतक-यांना मदत करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणेला दिले. आसोला जहांगीर येथील घरांवरील छत उडालेल्या नागरिकांना धनादेश देत सानुग्रह मदत करण्यात आली. सोलार प्लेटचे नुकसान झाले; त्यांनाही मदत करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित विभागाला दिल्या.

*****

Saturday 2 December 2023

नागरिकांनी महा ई-सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करून घ्यावे - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 बुलडाणा,दि.02(जिमाका): राज्य शासनाच्या विविध सेवा, योजनांचा‌ लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी -विद्यार्थिनी, विविध शासकीय योजनांस पात्र लाभार्थी यांनी नजिकच्या आपले ई सेवा केंद्र, बँक, पोस्ट ऑफिस येथे जावून आपापल्या खात्यांचे मोबाईल नंबर, आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण (ईकेवायसी) करून घ्यावे; जेणेकरून विविध शासकीय योजनांचा लाभ थेट बँक खात्यात हस्तांतरित होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील शेतक-यांचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासन संबंधित यंत्रणेमार्फत त्यांचे पंचनामे करत आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त मदतीसाठी शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण (ekyc) करण्याकरिता जिल्ह्यातील कार्यान्वित तालुकानिहाय आपले सरकार सेवा केंद्रांची यादी खालील लिंक वर उपलब्ध आहे.  https://buldhana.nic.in/

तसेच DIT आधार केंद्र यादी सुद्धा उपलब्ध असून, जिल्ह्यात एकूण 680 आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित आहेत. तसेच 86 DIT आधार केंद्र कार्यान्वित आहे. तरी वंचित लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन प्रमाणीकरण प्रक्रिया करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 जिल्ह्यात तालुकास्तरावर आपले सरकार सेवा केंद्र ३०६ असून, ग्रामपंचायत स्तरावर ३७४ असे एकूण ६८० महा ई सेवा केंद्र आहेत. केवळ आधार, मोबाईल क्रमांकांचे प्रमाणीकरण न केल्यामुळे नागरिकांना लाभापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे त्यांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तात्काळ प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

          नागरिकांच्या सोईसाठी नजिकच्या आपले सरकार महा ई सेवा केंद्रांची यादी सोबत देण्यात आली असून, त्याचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. बुलढाणा शासनाच्या लाभासाठी शेतकरी, विद्यार्थी आणि इतर घटकांसाठी ई-केवायसी आवश्यक करण्यात आली आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना देण्यात येणार लाभ आणि मदत ही ई-केवायसीवर आधारीत करण्यात आली आहे. ई-केवायसी करण्यात अडचणी येत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील ई-केवायसी करणाऱ्या केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

बुलडाणा तालुक्यात प्रवीण पाटील (९४२२७४३९०८) तहसील कार्यालय, बुलडाणा, सतीश किलबि (९६८९३२९९८१) जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा, संजय तायडे (९९२२६८२२९१) ग्रामपंचायत कार्यालय, चांडोल, प्रवीण वाघ (९९२२६८२२९१) ग्रामपंचायत कार्यालय, तराडखेड, विशाल गावंडे (९७६३८१९५८७) ग्रामपंचायत कार्यालय, सावळी, अमोल तंबडे (८९७५६५५५९४) ग्रामपंचायत कार्यालय, धामणगाव, परमेश्वर ऊबरहांडे (९९२२६८२२९१), ग्रामपंचायत कार्यालय, हतेडी, बु. यांचा‌ समावेश आहे.

चिखली तालुक्यात अनिल इंगळे (९९२३६८६१११) नगर परिषद कार्यालय, चिखली, तेजराव शेजूळ (९६०४४९०८००) पंचायत समिती कार्यालय, चिखली, पुरुषोत्तम पडघान (९४२३०५३०७९) ग्राम पंचायत कार्यालय, मेरा खुर्द, 'नंदकिशोर गोडवे (९६५७३८३५२२) ग्रामपंचायत कार्यालय, बेराळा, राम चव्हाण (९०४९३०७०३०) ग्राम पंचायत कार्यालय, उंद्री, सुनील राठोड (९६०४४४३०४८) ग्राम पंचायत कार्यालय, महोदरी, पुरुषोत्तम चिंचोले (९३०७००६९१३) ग्रामपंचायत कार्यालय, एकलारा तर देऊळगावराजा सिद्धेश्वर नागरे (९७६७४५५१३३) तहसील कार्यालय, देऊळगाव राजा, संतोष डोंगरे (९६७३१३४८६४) उपनिबंधक कार्यालय, देऊळगावराजा, कृष्णा सोनुने (९६७३१३४७६८) पंचायत समिती कार्यालय, देऊळगावराजा, भारत कोल्हे (९६७३७२०२१२) नगर परिषद कार्यालय, देऊळगावराजा, सुरेश शेळके (९९२२८९९१३१) ग्रामपंचायत कार्यालय, देऊळगावमही, अनंता जायभाये (९१५८०९२१५३) ग्रामपंचायत कार्यालय, सावखेड नागरे यांचा‌ समावेश आहे.

          सिंदखेडराजा निलेश राठोड (९९२१२५१५५४) तहसील कार्यालय सिंदखेड राजा, जयश्री वाघमारे, (९७३०९८३१०२) पंचायत समिती कार्यालय, सिंदखेडराजा, संदीप नालेगावकर (९८६००६५४८४) ग्रामपंचायत कार्यालय, शेंदुर्जन, अमोल देशमुख (९७६६४२९४३७) ग्रामपंचायत कार्यालय, दुसरबीड, प्रताप जाधव (९४२०४५८१८२) ग्रामपंचायत कार्यालय, जांभोरा, शेख अन्सार शेख सत्तार (९५४५२३०००६) ग्रामपंचायत कार्यालय, साखर खेर्डा तर लोणार तालुक्यात भारत दराडे (९०११३६५००४) तहसील कार्यालय लोणार, श्रीराम गायकवाड (८००७५०८८४६) ग्रामपंचायत कार्यालय, किनगाव जट्टू, पंढरी वाघ (९६०४०५८८१९) ग्रामपंचायत कार्यालय, अंजनी खुर्द, विजय खेत्री (९८२२३०३२६४) ग्रामपंचायत कार्यालय, सुलतानपूर, आशिष चव्हाण (९६६५४०४९००) ग्रामपंचायत कार्यालय, तांबोळा, संदिपकुमार राठोड (९७६७४५४८३९) ग्राम पंचायत कार्यालय, देऊळगाव कुंडपळ, तसेच मेहकर तालुक्यात विश्वास वाघ (८६०००७३७७७) तहसील कार्यालय मेहकर, संतोष वाघ (९५११८९६५५५) नगर परिषद कार्यालय मेहकर, मनोहर सरोदे (९८२२३७३६१०) ग्रामपंचायत कार्यालय, चायगाव, राजकिरण खरात (९९२२१८२९४७) ग्रामपंचायत कार्यालय जानेफळ, योगेश बोंद्रे (९०११७१०५४१) ग्राम पंचायत कार्यालय, डोणगाव, संतोष वाघ (९५११८९६५५५) ग्रामपंचायत कार्यालय, उकळी, शिवांजी साबळे (९७६७२८५०७१) ग्रामपंचायत कार्यालय, हिवरा साबळे, पुरुषोत्तम नवले (९९२२०९६१९७) ग्रामपंचायत कार्यालय, घाटबोरी आशिष धारतरकर (९४२१४६१००६) ग्रामपंचायत कार्यालय, हिवरा आश्रम, रणधीर खरात (९९२२१८२९४७) ग्रामपंचायत कार्यालय, हिवरा खुर्द, भगवान चिखलकर (९४२२९४९७८५) जिल्हा परिषद केंद्रीय मराठी माध्यमिक शाळा, डोणगाव, अमोल ठाकरे (९८२३३७६२३३) जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा, डोणगाव तर खामगाव तालुक्यात प्रवीण खारोडे (९७६७६४४७११) उपविभागीय कार्यालय, खामगाव, प्रशांत पाचपोर (७३५०६१७१९४) उपविभागीय कार्यालय, खामगाव, प्रतिक खुपसे (८२७५२३२९१०) नगर परिषद कार्यालय, खामगाव; गजानन महाले (९८२२७२७६४९) ग्राम पंचायत कार्यालय, अटाळी, सुनिल गवारगुरु (७९७२०७६५३८) ग्राम पंचायत कार्यालय, पिंपळगाव राजा, पवन वेरुळकर (९४०४५५३३१५) ग्राम पंचायत कार्यालय, रोहणा, शेख राजू शेख - जहांगीर (९६८९३५०६७०) ग्रामपंचायत कार्यालय, गणेशपूर, निलेश सरदार (८६००६६९९६४) ग्रामपंचायत कार्यालय, लाखनवाडा आदी समाविष्ट आहेत.

शेगाव तालुक्यात अजित सानप (९४२२९९३९८३) तहसील कार्यालय, शेगाव, किशोर जुमले (७०२०३४५७०८) नगर परिषद कार्यालय, शेगाव, प्रकाश कळसकर (९८५०५२९८१८) ग्रामपंचायत कार्यालय, जवळा पळसखेड, सुनील  गावंडे (९७६३५६१८१०) ग्रामपंचायत कार्यालय, पहुरजीरा, जळगाव जामोद तालुक्यात झिकरुल्ला खान झियाउल्ला खान (९९२१९०१३९०) तहसील कार्यालय, जळगाव जामोद, योगेश राऊत (९७६३३१३३१०) ग्रामपंचायत कार्यालय, पिंपळगाव काळे, वैभव शेळके (९८६०२२३३८३) ग्रामपंचायत कार्यालय, खेर्डा खुर्द, अझरूद्दीन झियाउद्दीन शेख (९८८१५६४५६७) ग्रामपंचायत कार्यालय, माडाखेड बु. मलकापूर तालुक्यात दीपक तायडे (८६६८४३५२५०) नगर परिषद कार्यालय, मलकापूर, मोहन घाटे (७५८८८०४३९८) उपविभागीय कार्यालय, मलकापूर, नंदा क्षीरसागर (९८२२७७४७४१) नगर परिषद शाळा क्र. २, पारपेठ, मलकापूर, हरीदिगंबर हिवाळे (९८८१६२०४८१) पंचायत समिती कार्यालय, मलकापूर, गजानन प्रकाश गवई (९७६६१३१३७३) तलाठी साझा - भाग क्र. ३, मलकापूर, मनोज झनके (९५४५८०३७१२) नगर परिषद उर्दू कन्या शाळा, मलकापूर, राजेंद्र वाघाळे (९६०४५५६१०६) ग्राम पंचायत कार्यालय, जांभूळढाबा, विजय पाटील. (९६६५१७४३०६) ग्रामपंचायत कार्यालय, दाताळा समावेश आहे.

नांदुरा तालुक्यात प्रशांत दिवरे (९७३०१७४४१६) तहसील कार्यालय, नांदुरा, प्रशांत वाकोडे (९६८९७१७३५३) पंचायत समिती कार्यालय, नांदुरा, कैलाश साबे (९८८१३८३२४२) शासकीय रुग्णालय, नांदुरा, अक्षय हेलगे (९९२३९४७६१०) नगर परिषद कार्यालय, नांदुरा, विजय गणगे (९४२११०५५४६) ग्राम पंचायत कार्यालय, खैरा, योगेश शाळीग्राम खंदारे (९९२१४७३७२७) ग्राम पंचायत कार्यालय, निमगाव, कैलाश मानकर (९६८९३४७५०५) ग्राम पंचायत कार्यालय, चांदूर बिस्वा, दिलीप बावस्कर (९४०४४४३७५५) ग्रामपंचायत कार्यालय, वडनेर भोलाजी. मोताळा तालुक्यात अरुण वाघ (८७८८२६१९३८), तहसिल कार्यालय मोताळा, सय्यद वसीम सय्यद समद (८६००२१३१२४) नगर पंचायत कार्यालय मोताळा, नितीन फेंगडे (९९६०५८४७७०) ग्रामपंचायत कार्यालय, माकोडी, सागर हागे (९९६००८६१७४) ग्रामपंचायत कार्यालय, धामणगाव बढे, महादेव राहण् (९६५७४८६३४२) ग्रामपंचायत कार्यालय, पान्हेरा खेडी, रितेश जैन (९५०३१५९९१४) ग्रामपंचायत कार्यालय, शेलापूर समावेश आहे.

संग्रामपूर तालुक्यात शाम मिरगे (७५८८८०९८६८) तहसील कार्यालय, संग्रामपूर, शेख गुलाम मोहंमद अल्ताफ (९५०३१५९९०४) पंचायत समिती कार्यालय, संग्रामपूर, पवन खंडेराव (९६६५२९६१८३) ग्राम पंचायत कार्यालय, कवठळ, कुशल वडे (९९२३३०३१९८) ग्राम पंचायत कार्यालय, पातुर्डा या केंद्रावर जाऊन नागरिकांनी ई-केवासी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

*****