महिला बंदीवानांसाठी रोजगाराची नवी संधी ; कारागृहात पापड, लोणचे व मसाला पावडर निर्मिती प्रशिक्षणाचा शुभारंभ
बुलढाणा, (जिमाका) दि. 23 : कारागृहातून मुक्त झाल्यानंतर महिला बंदीवानांचे पुनर्वसन व स्वावलंबन साधावे, या उद्देशाने बुलढाणा जिल्हा कारागृहात महिलांसाठी पापड, लोणचे व मसाला पावडर निर्मितीचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या संकल्पनेतून व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलढाणा यांच्या सहाय्याने केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या पुरस्कृत जन शिक्षण संस्थान, बुलढाणा यांच्या वतीने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
दि. 19 जानेवारी 2026 पासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महिला बंदीवानांना पापड बनविणे, विविध प्रकारचे लोणचे तसेच मसाला पावडर तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान कच्चा माल निवड, स्वच्छता, प्रक्रिया पद्धती, साठवणूक तसेच विक्रीसाठी आवश्यक मूलभूत माहिती देण्यात येणार आहे.
महिला बंदीवानांना रोजगाराभिमुख कौशल्ये देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, भविष्यात समाजात पुनर्वसन झाल्यानंतर स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या उपक्रमात बुलढाणा जिल्हा कारागृहातील 13 महिला बंदीवान सहभागी झाल्या आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त गणेश बिटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास मार्गदर्शन अधिकारी संजीवनी नाईवाडे, जन शिक्षण संस्थान बुलढाणाचे अध्यक्ष भालचंद्र बापू देशमुख, प्रकल्प अधिकारी अरुण देशमुख, संचालक भागवत पेदे, प्रशिक्षिका मनिषा अरुण देशमुख यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास नायब तहसीलदार हिवाळे, पोलीस उपअधीक्षक बी. डी. पावरा यांच्यासह कारागृह अधीक्षक मेघा कदम-बाहेकर, तुरुंगाधिकारी उमेश नाईक तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अपर्णा आघाव, धनश्री डोंगरदिवे, श्रद्धा जाधव, संजय मदारकर, सोनाली पवार व अश्विनी भालके यांनी सहकार्य केले.
00000
Comments
Post a Comment