Friday 31 January 2020

DIO BULDANA NEWS 31.1.2020

जागतिक सुर्यनमस्कार दिवसाचे आज आयोजन
  • जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदानावर होणार कार्यक्रम
   बुलडाणा, दि. 31 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व क्रीडा भारती यांचे संयुक्त विद्यमाने, सामुहिक सुर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन दि.1 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 7.45 ते 8.30 वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदान येथे करण्यात येणार आहे.
      जागतीक सुर्यनमस्कार दिनाचे आयोजनासंदर्भात दि.30 जानेवारी 2020 रोजी जिजामाता प्रेक्षागार मैदानवरील कक्षात सभा पार पडली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे,क्रीडा भारतीचे श्रीकृष्ण शेटे, सदानंद काणे, बाळ आयचीत, आरोग्य भारतीचे डॉ. राजेश्वर उबरहंडे, आर्ट ऑफ लिव्हींगचे  प्रशांत लहासे, बी.डी.सावळे, सौ.अंजली परांजपे, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, पी.आर.वानखडे तसेच योग संदर्भात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
      जागतिक सुर्य नमस्कार दिनाच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच सर्व लोकप्रतिनिधी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी, एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पतंजली योग समिती, योग विद्या धाम, आर्ट ऑफ लिव्हींग, आरोग्य भारतीचे सर्व पदाधिकारी तसेच शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, औद्योगीक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी, समाजकार्य, आयुर्वेदीक महाविद्यालय, पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, क्रीडा मंडळे, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सर्व योगप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
   तरी बुलडाणा शहरातील सर्व योगप्रेमी नागरीकांनी, खेळाडूंनी, अधिकारी, कर्मचारी यांनी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे सकाळी 7.45 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी  केले आहे.
******
धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण मिळणार
  • इयत्ता पहिलीपासून ते 12 वी पर्यंतच्या शिक्षणाचा समावेश
   बुलडाणा, दि. 31 : राज्य शासनाने 6 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार विजाभज, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, इमाव व विमाप्र कल्याण विभागामार्फत धनगर समाजाच्या उत्थानासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. समाजातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण न घेतल्यामुळे मागे राहू नये, यासाठी शासनाने दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळण्याकरीता शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
   धनगर समाजातील विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत यामुळे शिक्षण घेता येणार आहे. इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता 12 वी पर्यंत या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. भटक्या जमाती – क प्रवर्गातील विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्त्या यांची मुले व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील मुलांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेचा धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *******

ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरोथॉन स्पर्धेनिमित्त बुलडाणा ते खामगांव मार्गावरील वाहतुकीत बदल
 बुलडाणा, दि. 31 : बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी म. बुलडाणा ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स व रनबडीज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बोरखेड फाटा ते बोथा खामगांव रस्त्याने आयोजीत आहे. या स्पर्धेनिमित्ताने 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 ते 11 या कालावधीत बुलडाणा-वरवंड-बोथा-खामगांव या रस्त्यावरील वातुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  
    मुंबई पोलीस कायद्याचे कलम 33 अन्वये जिल्हाधिकारी यांनी  बुलडाणा-वरवंड-बोथा-खामगांव रस्त्यावरील वाहतूक दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 5 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविली आहे. सध्याच्या प्रचलित मार्गानुसार  बुलडाणा-वरवंड- बोथा- खामगांव  या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्ग बुलडाणा-वरवंड-उंद्री- खामगांव, बुलडाणा-मोताळा-नांदुरा-खामगांव आणि बुलडाणा-मोताळा-तरवाडी-पिंपळगांव राजा-खामगांव या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 131 अन्वये उचित कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    *******
केंद्र शासन निवृत्ती वेतन धारकांच्या कायदेशीर वारसदारांनी कागदपत्रे सादर करावीत
  • 6 मार्च 2020 पर्यंत मुदत
 बुलडाणा, दि. 31 : सामान्य प्रशासन विभागाच्या 13 मार्च 2019 च्या शासन निर्णयाअन्वये राज्यातील केंद्र शासन स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन धारकांना 1 जुन 2004 ते 31 जानेवारी 2019 पर्यंतची त्या –त्या वेळी देय असलेल्या दराने थकबाकी अदा करावयाची आहे. तरी जिल्ह्यातील जे केंद्र शासन निवृत्त वेतन धारक शासनाकडून अतिरिक्त 500 रूपये बँकेमार्फत परस्पर निवृत्तीवेतन घेतात. तसेच जे केंद्र शासन निवृत्ती वेतन धारक आज रोजी हयात नाहीत, अशा केंद्र शासन निवृत्ती वेतन धारकांच्या कायदेशीर वारसदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत 6 मार्च 2020 पर्यंत कागद पत्रांसह अर्ज सादर करावा.
   या कागदपत्रांमध्ये केंद्र शासन निवृत्तीवेतन धारक यांचे हयातीचे प्रमाणपत्र, केंद्र शासन निवृत्ती वेतनधारक हयात नसतील, तर मृत्यू प्रमाणपत्र व त्यांचे कायदेशीर वारसदार असल्याचे प्रमाणपत्र, निवृत्तीवेतन मंजूरी आदेशाची प्रत, सदर निवृत्तीवेतन कधीपासून निवृत्तीवेतन घेत आहेत याबाबतचा पुरावा व दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक आदींचा समावेश आहे. तरी कागदपत्रांसह अर्ज सादर करून लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        ****
बाल न्याय मंडळाच्या बैठकीचे आज जळगांव जामोद येथे आयोजन
  बुलडाणा, दि. 31 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 रोजी आशा पंचायत समिती सभागृह, जळगांव जामोद येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    ******

Wednesday 29 January 2020

DIO BULDANA NEWS 29.1.2020


शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे
  • 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत मुदत
 बुलडाणा, दि. 29 : क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यान्वित आहे.  यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपी राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.  सन 2018-19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.
            या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील.  संबंधितांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या link वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी.  ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकीत प्रमणपत्रांसह अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावे.  तसेच ऑफलाईनद्वारे अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांनी आपला अर्ज संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 5 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत.  याबाबत अधिक माहिती, पात्रतेचे निकष व नियमावल इ. माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय 24 जानेवारी, 2020 चे अवलोकन करावे. जीवन गौरव पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात येत नसून अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीच माहिती नामांकनाद्वारे केंद्र शासनाचे पुरस्कारार्थी (महाराष्ट्रामधील) यांचेकडून तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर करतील.  अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय  पुणे, संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा, अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.  पुरस्कारासाठी विहीत मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  शेखर पाटील यांनी केले आहे.
                                                                                    *****
जिल्हास्तरीय बालमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा
 बुलडाणा, दि. 29 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यावतीने बाल विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय अथवा स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालमहोत्सव शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, शरद कला वाणिज्य महाविद्यालय, चिखली रोड, बुलडाणा येथे साजरा करण्यात आला.
  या महोत्सवात मुलांसाठी विविध खेळ, वर्क्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश साजीद आरीफ सय्यद, तर बाल न्याय मंडळाचे विशेष प्रमुख दंडाधिकारी अमोलकुमार देशपांडे, बाल कल्याण समिती अध्यक्षा श्रीमती कस्तुरे, बाल न्याय्य मंडळाच्या शरद कला महाविद्यालयाचे सचिव अजिंक्य पाटील, औरंगाबाद येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद येंडोले, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. बावस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, प्राचार्य, शिक्षकवृंद, महिला व बाल विकासचे अधिकारी  उपस्थित होते.
   सदर बाल महोत्सवात विभागाच्या संस्थांमधील तसेच इतर शाळेतील एकूण 400 बालके या कार्यक्रमात सहभागी होती. प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती बेबी सेानोने यांनी केले. तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले. संचलन प्रदीप सपकाळ यांनी व आभार प्रदर्शन श्रीमती खनपटे यांनी केले, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    ***
जिल्हाधिकारी कार्यालयात
3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि. 29 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन यावेळी सोमवार दि. 3 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
********
बाल न्याय मंडळाच्या बैठकीचे 1 फेब्रुवारी रोजी जळगांव जामोद येथे आयोजन
  बुलडाणा, दि. 29 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शनिवार, 2 फेब्रुवारी 2020 रोजी आशा पंचायत समिती सभागृह, जळगांव जामोद येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *******
आदिवासी विकास विभागातील कंत्राटी शिक्षक पदाच्या परीक्षेत बदल
  बुलडाणा, दि. 29 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रम शाळेवर शिक्षक/निर्देशक व कला कार्यानुभव शिक्षक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी 24 ऑगस्ट 2019 जाहीरात नुसार अर्ज मागविण्यात आले होते. सदर पद भरतीकरीता जाहीरातमधील अट क्रमांक तीनमध्ये कंत्राटी कला कार्यानुभव व कंत्राटी संगणक शिक्षक / निर्देशक या पदासाठी लेखी परीक्षा ही 50 गुणांची, तोंडी परीक्षा ही 10 गुणांची आणि स्कील टेस्ट 15 गुणांची अशी एकूण परीक्षा 75 गुणांची घेण्याचे नमूद होते.
  त्यामध्ये निवड समितीने बदल करण्याचा निर्णय घेवून संगणक शिक्षक / निर्देशक या पदासाठी 100 प्रश्नांसाठी 200 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. त्यामध्ये सामान्य ज्ञान 50 गुण, मराठी भाषा 50 गुण, इंग्रजी भाषा 50 गुण, अंकगणित 50 गुण तसेच कला / कार्यानुभव शिक्षक या पदासाठी 100 प्रश्नांना 200 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. त्यामध्ये 70 प्रश्न कला विषयाशी निगडीत असतील, तर 30 प्रश्न सामान्य ज्ञानावर आधारीत असतील. अशाप्रकारे बदल करण्यात येत असून सर्व पात्र उमेदवारांनी अथवा परीक्षार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे प्रकल्प अधिकारी आर. बी हिवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Sunday 26 January 2020

सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी शासन कटीबद्ध - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे





  • पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा थाटात
  • कर्जमुक्ती योजनेतून 2 लक्ष 940 पात्र शेतकऱ्यांना 140.74 कोटीचा लाभ
  • जिल्हा मुख्यालयी तीन ठिकाणी शिव भोजन थाळी सुरू
  • अवैध गुटखा विक्रीतून जिल्ह्याला मुक्त करण्याचा निर्धार
  • शिष्यवृत्ती योजनांमधून 9 कोटी 40 लक्ष रूपये शिष्यवृत्तीचे वाटप
बुलडाणा, दि. 26 -  जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाचा निधी खेचून खर्ची घालण्यात येणार आहे. जिल्हा हा राज्यामध्ये सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, यासाठी प्रयत्न केल्या जाणार आहे. जिल्ह्याला सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतीपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
    भारतीय प्रजासत्ताकाचा 70 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, माजी आमदार विजयराज शिंदे,  नगराध्यक्षा श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी श्री. दुबे आदींसह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक यांची उपस्थिती होती.
    जिल्ह्यात काढणीच्या वेळी आलेल्या परतीच्या व अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले,  अशा हवालदील परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आर्थिक मदत जाहीर केली. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्राप्त निधीपैकी 4 लक्ष 64 हजार 985 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 433 कोटी 49 लक्ष रूपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे.  राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करण्यासाठी शासनाने 1 एप्रिल 2015 पासून ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत व्याजासह मुद्दल असलेले 2 लाख रूपये पिक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्यात 2 लक्ष 940 लाभार्थी शेतकऱ्यांना 140.74 कोटी रूपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा होणार आहे. यामुळे बळीराजावरील कर्जाचे ओझे निश्चितच उतरणार आहे.
    ते पुढे म्हणाले, गरीब व आर्थिक दुर्बल घटकाला नाममात्र दहा रूपये दरात दर्जेदार जेवण मिळावे, यासाठी राज्य शासनाने शिव भोजन थाळी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत बुलडाणा जिल्हा मुख्यालयी तीन ठिकाणी आजपासून शिव भोजन योजनेला सुरूवात करण्यात आली आहे.  जिल्ह्यात रोजगार हमी योजनेमधून सन 2019-20 मध्ये आतापर्यंत 62 हजार 200 व्यक्तींना रोजगार देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात रोहयो अंतर्गत 1312 कामे सुरू असून त्यावर 6 हजार 845 मजूरांची उपस्थिती आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी राज्य शासन सिंदखेड राजा विकास आराखडा राबवित आहे. तसेच लोणार पर्यटन विकास आराखडाही राबविण्यात येत आहे.  पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात सन 2018-19 मध्ये 1 हजार 53 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. सद्य स्थितीत 3 हजार 989 घरकुलांचे काम मंजूर करण्यात आले आहे.  जिल्ह्यात  जिगांवसोबतच जिल्ह्यात अरकचेरी, चौंढी, आलेवाडी या लघु प्रकल्पांची कामे सुरू आहे. तसेच बोरखेडी, दुर्गबोरी, निम्न ज्ञानगंगा, दिग्रस लघु प्रकल्प पुर्ण करण्यात आले आहे. यामधून 3 हजार 541 हेक्टर सिंचन निर्माण झाले आहे.
     गुटखा बंदीचा निर्धार व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले, आरोग्यासाठी घातक असणारा गुटखा अवैधरित्या राज्यात विकल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत 17 लक्ष 96 हजार रूपये किमतीच्या प्रतिबंधीत गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात 3 लक्ष 51 हजार 917 कुटूंबांना वैयक्तिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  विविध मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येवू नये, म्हणून शिष्यवृत्ती योजनांमधून 9 कोटी 47 लक्ष रूपयांची शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली आहे. शासनाने महिलांना आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडता यावी, त्यांना निर्भिड वातावरणात तक्रार करता यावी, यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला पोलीस पिडीत महिलेची तक्रार ऐकून तिचे सांत्वन करतील. दोषींवर कठोर कारवाई करून पिडीतेला न्याय देतील. माझ्या माता – भगिणींना सुरक्षीत वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध  असल्याचेही त्यांनी सांगितले.
     राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने आजपासून लोकशाही व सुशासन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. हा पंधरवडा 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.  लोकशाही प्रक्रियेतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्थान, अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि त्यांच्या निवडणुकांचे गांभीर्य अधोरेखित व्हावे आणि लोकशाहीचा पाया मजबुत व्हावा, हा पंधरवाडा साजरा करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.   
  कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री यांनी परेड निरीक्षण केले. बुलडाणा पुरूष व महिला पोलीस दल, होमगार्ड पुरूष व महिला दल, वन रक्षक दल, पोलीस बँण्ड पथक तसेच शिघ्र कृती दल आदींनी मानवंदना दिली. यानंतर विविध विभागांच्या चित्ररथांचे सादरीकरण करण्यात आले.  विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी कराटे प्रात्याक्षिक, लेझीमचे सामुहिक संचलनाचे सादरीकरणह कार्यक्रमाप्रसंगी केले. कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र लांजेवार व अंजली परांजपे यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त,  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
                                                                        ********
                                    प्रजासत्ताक दिनी पोलीस कवायत मैदानावर विविध पुरस्कारांचे वितरण
       बुलडाणा, दि. 26 : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते आज 26 जानेवारी 2020 रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस कवायत मैदानावर विविध पुरस्कार, आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. सशस्त्र सेना ध्वजदिन 2018 चे उत्कृष्ट निधी संकलनाबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांना स्मृतिचन्ह देण्यात आले. पुलवामा व गडचिरोली येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या पत्नी श्रीमती सुषमा राजपूत व आई श्रीमती जिजाबाई राजपूत, गोवर्धन नगर ता. लोणार येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या पत्नी श्रीमती वंदना राठोड व आई सौ. सावित्रीबाई राठोड, गडचिरोली येथे शहीद झालेले  सर्जेराव खार्डे रा. आळंद ता. दे.राजा यांच्या पत्नी श्रीमती स्वाती खार्डे व आई सौ कमलबाई खार्डे, तसेच मेहकर येथील शहीद जवान राजु गायकवाड यांच्या पत्नी श्रीमती भारती गायकवाड व आई सौ. आसराबाई गायकवाड यांना प्रत्येकी 4 लक्ष 53 हजार 29 रूपयांचा धनादेश देण्यात आला. जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षलग्रस्त भागात खडतर व कठीण कर्तव्य बजाविल्याबाबत पो. नि गिरीष ताथोड, पो. कॉ प्रभाकर शिवणकर, संदीपसिंह राजपूत, अशोक गायकवाड, सुनील शेगोकार व मनोजकुमार  उमाळे यांना विशेष सेवा पदक देण्यात आले. तसेच पुरात जीव धोक्यात घालून मदत केल्याबद्दल पो. कॉ निवृत्ती सानप यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी कळी उमलताना प्रकल्प राबविल्याबाबत मुक्तेश्वर कुळकर्णी, कु. शिवगंगा सुरडकर, श्वेता भगत च सुरज खंडेराव यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले.
   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार राजेश्वर खंगार यांना, तर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार वैभव लोढे यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2018 मध्ये राष्ट्रीय स्तरावर गेलेल्या शेगांव येथील गजानन महाराज इंग्रजी शाळेचे विद्यार्थी ओंकार सोमानी, राघव मुरारका व कृष्णा सोमानी यांचा गौरव करण्यात आला.  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत सन 2018-19 चे ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये विभागून प्रथम क्रमांक अजिसपूर ता. बुलडाणा व पांगरखेड ता. मेहकर यांना देण्यात आला. तसेच सावळी ता. बुलडाणा ग्रामपंचायतीला द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक वझर आघाव ता. लोणार यांना देण्यात आले. गुणानुक्रमे पुरस्कार वझर ता. खामगांवया ग्रा.पं ला प्रदान करण्यात आला. राज्यस्तर शालेय तेंग- सुडो  स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून दिल्ली येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत वजन व वयोगटात देशातून तिसरा क्रमांक पटकाविणाऱ्या कु. मोहिनी समाधान राऊत व मार्गदर्शक किरण अंबुसकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काटा व फाईट या कराटे क्रीडा प्रकारात जिजाऊ ज्ञान मंदीर आणि कनिष्ठ महाविद्यालय, पळसखेड भट येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये भूषण सिरसाट, साद समीर खान, समर्थ देशमाने, आशिष दांडगे, शिवम उबाळे, प्रणव देशमाने, वेदांत खंडागळे यांचा समावेश आहे.  त्याचप्रमाणे शाळांना प्रथमोपचार पेटीचे वितरणही करण्यात आले.
                                                                                    ****


शिव भोजन थाळी योजनेला पालकमंत्री यांच्याहस्ते प्रारंभ
  • जिल्हा मुख्यालयी बस स्थानक, बाजार समिती व जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळ मिळणार थाळी
  • 10 रूपये नाममात्र दरात उपलब्ध
बुलडाणा, दि. 26 -  प्रजासत्ताक दिनी आज 26 जानेवारी रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळील राजर्षी शाहू महाराज पतसंस्थाद्वारा संचलीत भोजनालयात शिव भोजन थाळी योजनेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे, अर्जुन बोरसे, विजय अंभोरे आदींची उपस्थिती होती.
   शिव भोजन थाळी योजनेची सुरूवात जिल्हा मुख्यालयी तीन ठिकाणी करण्यात आली. याव्यतिरिक्त बस स्थानक व कृषि उत्पन्न बाजार समितीचा यामध्ये समावेश आहे. शिव भोजन थाळी योजनेतंर्गत दुपारी 12 ते 2 या वेळेत नाममात्र 10 रूपये दरात थाळी मिळणार आहे. जेवणाचा दर्जा चांगला ठेवून स्वच्छता राखावी, अशा सूचना यावेळी पालकमंत्री यांनी केल्या. कार्यक्रमानंतर शिव भोजन थाळीचा आस्वादही मान्यवरांनी घेतला. याप्रसंगी संबंधित अधिकारी, भोजनालयाचे मालक, कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        ******

Friday 24 January 2020

DIO BULDANA NEWS 24.1.2020

आयकरास पात्र असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी कागदपत्रे सादर करावीत
·        5 फेब्रुवारी 2020 अंतिम मुदत
·        जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन
  बुलडाणा, दि. 24 :   राज्य शासनाकडून जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारक किंवा कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांना वित्तीय वर्ष 2019-20 मध्ये आयकर भरण्यास पात्र असल्यास त्यांनी संबंधित कागदपत्रे सादर करावीत.  त्यामध्ये बचतीचा तपशील, अपंग प्रमाणपत्र, पॅन कार्ड याव्यतिरिक्त आयकराचा भरणा केला असल्यास गणनापत्रक, चलान आदी संपूर्ण तपशील 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावा. जेणेकरून आयकर भरण्यास पात्र असलेले निवृत्ती वेतन धारक अथवा कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांचे निवृत्ती वेतन आहरीत करून अदा करणे सोयीचे होईल. तसेच निवृत्ती वेतन अदा करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची नोंद घ्यावी. तरी आयकर भरणा करण्यास पात्र असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.
000000
चिखली येथे अवैधरित्या साठा केलेला गुटखा जप्त
·        1 लक्ष 24 हजार 720 रूपये किमतीचा साठा जप्त
  बुलडाणा, दि. 24 :  शासनाने राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखु व तत्सम अन्न पदार्थांना राज्यात विक्री, साठा, वाहतुक व वितरणावर प्रतिबंध घातलेला आहे. गुप्त माहिती मिळाल्यावरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अमरावती विभागातील अधिकारी व पोलीस अधिक्षक, बुलडाणा यांच्या चमुने चिखली येथे दोन ठिकाणी गुटख्याचा अवैधरित्या केलेला साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये मे. के. जी. एन पान मटेरीयल, बाबुलाल चौक, चिखली आणि पंकज जोशी यांचे राहते घर, गांधी नगर, चिखली या ठिकाणांचा समावेश आहे.  मे. के.जी.एन पान मटेरीयल यांच्याकडून 94 हजार 950 आणि पंकज जोशी यांचेकडून 29 हजार 777 रूपये असे एकूण 1 लक्ष 24 हजार 720 रूपये किमतीच्या साठा आढळून आला. सदर साठा अन्न सुरक्षा अधिकारी, नितीन नवलकार यांनी पुढील कार्यवहीकरीता जप्त केला. सदर साठ्यातुन प्रयोगशाळा पडताळणीकरीता नमुने विश्लेषणात्मक घेण्यात आले असून नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्तीनंतर पुढील कार्यवाही घेण्यात येईल.
   सदर मोहिमेत सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन, अमरावती सु. ग अन्नापुरे व जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील – भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल राठोड, अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे, गोपाल माहोरे, संदीप सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला, असे सहाय्यक आयुक्त अनिल राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                           *****
क्रीडा विभागाचे जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर
·        26 जोनवारी रोजी होणार वितरण
   बुलडाणा, दि. 24 : क्रीडा धोरण 2012 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनलाय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा क्रीडा क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक व संघटक / कार्यकर्ता यांना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा मार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.  जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, बुलडाणा मार्फत सन 2019-2020 या वर्षाकरीता गुणवंत क्रीडा कार्यकर्ता अथवा संघटक पुरस्कार राजेश्वर गोविंदराव खंगार व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी वैभव शेषनारायण लोढे यांची निवड करण्यात आली आहे.
            या पुरस्काराचे स्वरुप 10 दहा हजार रूपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असुन, दि. 26 जानेवारी 2020 या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे वेळी पोलीस कवायत मैदान, बुलडाणा येथे पालकमंत्री यांचेहस्ते व जिल्हाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. गुणवंत क्रीडा कार्यकर्ता अथवा संघटक पुरस्कासर प्राप्त राजेश्वर गोविंदराव खंगार   यांनी जिल्ह्यात विविध खेळांच्या संघटना स्थापन करणे, विविध खेळांचे प्रात्यक्षीके, इत्यादी संघटनात्मक कार्य केलेले आहे.  त्यांच्या कार्याचा गौरव होण्याचे दृष्टीने त्यांना गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
   तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी निवड झालेले वैभव शेषनारायण लोढे  यांनी तलवारबाजी या खेळात जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करुन, पदक विजेते खेळाडू घडविले आहे.  त्यांच्या कार्याचा गौरव होण्याचे दृष्टीने त्यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.

Thursday 23 January 2020

DIO BULDANA NEWS 23.1.2020

अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे
·        न्युक्लीयस बजेट योजनेतंर्गत मिळणार लाभ
·        7 फेब्रुवारी 2020 अंतिम मुदत
  बुलडाणा, दि. 23 :   प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील बुलडाणा जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकडून न्युक्लिअस बजेट योजना सन 2019-20 अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने गट अ- उत्पन्न वाढीच्या योजनांसाठीचे अर्ज समाविष्अ आहे. सदर अर्ज 7 फेब्रुवारी 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला  या कार्यालयाकडे सादर करावे.
 योजनेतंर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवतींना पिठगिरणी मशीन 85 टक्के अनुदान 38 लाभार्थ्यींना पुरविण्यात येणार आहे. तसेच 16 आदिवासी लाभार्थी बांधवांना 85 टक्के अनुदानावर कोंबडी शेड पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी लक्षांकानुसार पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थ्यी निवडीसाठी    अनुसूचित जमातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, यापुर्वी न्युक्लिअस बजेट योजनेतून वैयक्तीक योजनेचा लाभ घेतलेला नसावा, इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल  भवन, न्यु राधाकिसन प्लॉट, अग्रेसन भवन समोर, अकोला यांच्या कार्यालयास संपर्क साधावा. तसेच योजनेचे अर्ज सदर कार्यालयात उपलब्ध आहेत. या योजनेतंर्गत अर्जाची शेवटची मुदत दि. 7 फेब्रुवारी 2020 ही असून मुदतीनंतर अर्ज स्विकारण्यात येणार नाही,  असे आर. बी. हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
  राष्ट्रध्वजाचा राखा सन्मान.. वाढेल देशाचा अभिमान !...
·         हँण्ड स्पून राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नका
 बुलडाणा,दि.23 : दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. सदर कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टीकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले दिसतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.                               
    राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्ड स्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीमध्ये असावा. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती, त्याची उंची व रुंदी 3:2 असावी.
     भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेल्या, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. याठिकाणी पायदळी तुडविलेले राष्ट्रध्वज गोळा करून तालुका व जिल्हा स्तरावर निर्मित करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहे. त्यांनी असे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सुर्यास्तानंतर व सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावे. हे करताना उपस्थितांनी उभे रहावे व जाळून पुर्णपणे नष्ट होईपर्यंत जागा सोडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. 
                                                                                    ********
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे 25 जानेवारी रोजी आयोजन
 बुलडाणा, दि. 23 : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयेाजन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली 25 जानेवारी 2020 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे करण्यात आले आहे. बैठकीत सन 2020-21 वर्षातील प्रारूप आराखड्यावर चर्चा करण्यात येवून आराखडा मंजूर करण्यात येणार आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी कळविले आहे.
******
अल्पसंख्यांक खासगी व अपंग शाळांमध्ये मिळणार पायाभूत सुविधा
·                      5 फेब्रुवारी 2020 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत
·                    प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा, दि. 23 : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत इच्छुक शाळांकडून अर्ज मागविण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. शाळांनी 7 ऑक्टोंबर 2015 च्या शासन निर्णयामधील विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव  सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून सदर अंतिम मुदत 5 फेब्रुवारी 2020 आहे. तरी च्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे.
इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे दि. 5 फेब्रुवारी, 2020 पर्यंत सादर करावे.  तरी अंतिम मुदतीची प्रतिक्षा न करता इच्छूकांनी तात्काळ अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.  
                                                                        ******
डॉ झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करावे
·          5 फेब्रुवारी 2020 अंतिम मुदत
·          प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा, दि. 23 :  डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2019-20 अंतर्गत राज्यातील धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत मदरशांना पायाभुत सुविधांसाठी अनुदान देण्यात येत आहे. सदर अनुदान जास्तीत जास्त 2 लक्ष रूपये इतक्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे. तरी इच्छूक पात्र मदरशांनी पायाभू सुविधांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावे. सदर प्रस्ताव 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावे.
    प्रस्ताव 11.10.2013 च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सादर करावे. यामध्ये विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून हा प्रस्ताव 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत मागविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सदर योजनेतंर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या पात्र निवासी मदरसांनी दिनांक 11.10.2013 च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले प्रस्ताव कागदपत्रांच्या पुर्ततेसह अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावे व या योजनेचा लाभ घ्यावा. अंतिम दिनांकाची प्रतिक्षा न करता तात्काळ प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.  
                                                                        ******
जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
 बुलडाणा,दि.23 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने 23 जानेवारी रोजी अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी भुषण अहीरे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        ******

Saturday 18 January 2020

DIO BULDANA NEWS 18.1.2020

शरीराच्या तंदुरूस्तीसह पर्यावरण रक्षणासाठी नियमित सायकल चालवावी
                                                                               - जिल्हाधिकारी
·        फिट इंडिया मोहिमेतंर्गत सायकल रॅली
   बुलडाणा, दि. 18  : शरीराच्या तंदुरूस्तीकरीता नियमित्‍ व्यायाम करणे गरजेचे आहे. सायकल चालविणे हा सुद्धा व्यायामच आहे. सायकल केवळ शरीराच्या तंदुरूस्तीकरीताच नाही, तर पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे शरीराच्या तंदुरूस्तीसह पर्यावरण रक्षणासाठी नियमित सायकल चालवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले.
   भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यानिर्देशानुसार जिल्हा प्रशासन, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग व जिल्हा सायकलींग असोसिएशन व सायकल प्रेमी नागरिक  यांच्या संयुक्त   विदयमाने  फिट इंडिया मुव्हमेंट तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे 18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9 वाजता ‘फिट इंडिया सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
   यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजयभाऊ गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गिते, पोलीस निरिक्षक श्री. कांबळे उपस्थित होते.  प्रास्ताविकात  जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील म्हणाले,  शारीरिक सुदृढता, पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, शारीरिक सुदृढता, वाहतूक  नियंत्रण, आर्थीक बचत इत्यादी उद्देश डोळयासमोर ठेवून  या फिट इंडिया सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.  या प्रसंगी 17 देशांची सायकलवर यात्रा करणारे सायकल पटू संजय मयुरे यांचे  मान्यवरांच्या हस्ते झाडाचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले.  
   याप्रसंगी श्री.वरारकर, क्रीडा अधिकारी श्री. जाधव, जिल्हा शा.शि. संघटनेचे अध्यक्ष निलेश इंगळे, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था बुलडाणा येथील जयेश जोगदंड, ॲड.राजेश लहाने, आर्कीटेक जयंत सोनुने, आयएमए चे अध्यक्ष डॉ. महेर, श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक श्री. पाटील,  भारत विद्यालयाचे शिक्षक एस.डी. भटकर, एडेड हायस्कूलचे शिक्षक आर.एन. जाधव, शारदा ज्ञानपीठचे शिक्षक श्री. औशाळकर आदी उपस्थित होते.
     तसेच वरील विद्यालयातील व आय.टी.आय. चे विद्यार्थी व इतर सायकलपट्टू, क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
या वेळी अंदाजे 400 पर्यंत सायकलपटूंनी या रॅलीत आपला सहभाग नोंदविला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ
 करण्यात आला. या सायकल रॅलीकरीता पायलट म्हणून निलेश इंगळे, रविंद्र गणेशे, सुरेश मोरे, श्री. औशाळकर,  जयेश जोगदंड, गणेश जाधव, आर.आर. धारपवार आदींनी कामकाज पाहिले. संचलन क्रीडा अधिकारी श्री. धारपवार यांनी तर आभार प्रदर्शन नेहरु युवा केंद्राचे लेखापाल अजयसिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता धनंजय चाफेकर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक भागवत ‍ मोहिते, निलेश लवंगे, साधना मोरे, सिमा सोनोने, जिल्हा सायकल असो.चे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सुधीर मोरे, गणेश डोंगरदिवे, कृष्णा नरोटे, विनोद गायकवाड, प्रतिक मोरे, भिमराव पवार, कैलास डुडवा, श्री. माकोने, प्रशांत लहासे व प्रदीप डांगे यांनी प्रयत्न केले.  
******

जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओचा डोस पाजावा            -         जिल्हाधिकारी
·        पल्स पोलीओ लसीकरण मोहिम जनजागृती                                                      
   बुलडाणा, दि. 18  : जिल्ह्यात येत्या रविवार, 19 जानेवारी 2020 रोजी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलीओचा डोस पाजण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले.
   जिल्हा सामान्य रूग्णालय येथे पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीसाठी आज रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मकानदार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ गायके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे, डॉ. कुटूंबे, डॉ. कुळकर्णी, डॉ. वासेकर, डॉ. कदम, डॉ. जिवने, अधिसेविका श्रीमती राठोड, परिचर्या अधिकारी श्रीमती खेडेकर, श्रीमती कुरसुंगे, श्रीमती साखळीकर व श्रीमती शरीफा शेख उपस्थित होत्या.
   जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर स्वयंसेवकांनी सहभाग घ्यावा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत म्हणाले, जिल्ह्यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील अपेक्षीत लाभार्थी एकूण 1 लक्ष 42 हजार 173 बालकांना 19 जानेवारी रोजी पोलीओचा डोस देण्यात येणार आहे. सदर लसीकरण सकाळी 8 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच रेल्वे स्टेशन, बस स्थानके, विटभट्टी, रस्त्यावर काम करणारे व उसतोड काम करणारे यांना पोलीओ डोस देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
  याप्रसंगी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचलन आहारतज्ज्ञ श्री. सोळंकी यांनी केले, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                            ****
             वैयक्तिक वनहक्क प्राप्त धारकांना ट्युबवेल व पंपसेट मिळणार 
·        28 जानेवारी 2020 पर्यंत स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावे       
   बुलडाणा, दि. 18  : विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून वैयक्तिक वनहक्क प्राप्त धारकांना ट्युबवेल व पंपसेट मंजूर आहेत. अशा धारकांकडून 28 जानेवारी 2020 पर्यंत प्रकल्प अधिकारी कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयात अर्ज मागविण्यात आले आहे.
   अर्जासोबत आधार कार्ड, जातीचा दाखला, वनजमिनीचा पट्टा मिळाल्याचे प्रमाणपत्र, शेतात पाण्याचे स्त्रोत विहीर अथवा बोअर असल्याचे प्रमाणपत्र, रहीवाशी दाखला व पापोर्ट आकाराचे फोटो सादर करावे. वरील दस्तऐवजांसह स्वत: उपस्थित राहून सदर कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
--