सैलानी बाबा यात्रेच्या तयारीला वेग जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

 




बुलढाणा, दि.१४ बुलढाणा तालुक्यातील मौजे पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा दर्गा परिसरात साजऱ्या होणाऱ्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाच्या तयारीला गती आली आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची आढावा बैठक त्यांच्या कार्यालयात मंगळवारी घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सैलानी बाबा यात्रा महोत्सव २५ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. यात्रेदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ मार्च २०२६ रोजी नारळाची होळी पेटविण्यात येणार असून, त्यानंतर यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. ८ मार्च २०२६ (पंचमी) रोजी संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक ग्रामपंचायत पिंपळगाव सराई येथून मुजावर परिवाराच्या संदल घरातून रात्री ८ वाजता निघून गावातील प्रमुख मार्गांवरून परिक्रमा करत जंगलगाठ रस्त्याने सुमारे ४ किमी अंतर पार करून रात्री १२ वाजता सैलानी बाबा दर्गा येथे पोहोचेल. १२ मार्च २०२६ रोजी फातेखानी कार्यक्रमानंतर सैलानी बाबा ट्रस्टकडून प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता होईल.

सैलानी बाबा दर्गा हे सर्व जाती-धर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने यात्रेत बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदा अंदाजे ५ ते ७ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

यात्रा व्यवस्थापनासाठी महसूल विभाग, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, विद्युत वितरण कंपनी, सैलानी बाबा दर्गा ट्रस्ट, मुजावर, ग्रामपंचायत पिंपळगाव सराई व घाटनांद्रा, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद बुलढाणा/चिखली, पशुसंवर्धन विभाग, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील म्हणाले की, सैलानी बाबा यात्रा परिसराची अधिकाऱ्यांनी पाहणी करून रस्ते दुरुस्ती, कडेकोट पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही यंत्रणा, अखंड वीजपुरवठा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, दर्गा व शौचालयांसाठी पाणी-साफसफाई व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियोजन व बॅरिकेटिंगसह पार्किंग, भाविकांसाठी एसटीच्या अतिरिक्त बस सेवा, हाराशीद्वारे दुकानदारांना जागा, अन्न पदार्थ तपासणी, नारळ होळी व बळी प्रथेसाठी स्वतंत्र जागा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती फलक, आरोग्य शिबिरे (डॉक्टर, रुग्णवाहिका व औषधसाठा), अग्निशमन वाहने, मदत कक्ष व उद्घोषणा यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.

यात्रा शांततामय, सुरक्षित व सुव्यवस्थित पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

०००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या