जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय शुटींगबॉल स्पर्धांचे आयोजन

 


बुलढाणा, दि. 30 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विदर्भ रिजन शुटींगबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने दि. 2 ते 3 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे राज्यस्तरीय शालेय शुटींगबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांमध्ये 17 वर्षांखालील मुले व मुली सहभागी होणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी 10 मुले व 10 मुली सहभागी होतील. तसेच प्रत्येक विभागातून पुरुष व महिला संघ व्यवस्थापक, तज्ज्ञ पंचाधिकारी, स्वयंसेवक आदींची उपस्थिती राहणार आहे.

स्पर्धांचा उद्घाटन समारंभ दि. फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जांभरून रोड, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे मान्यवर अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषदेचे पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक, विदर्भ रिजन शुटींगबॉल संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुलींच्या संघांसाठी नवीन इमारतीत तर मुलांच्या संघांसाठी जुन्या इमारतीत निवास व्यवस्था करण्यात आली आहे. भोजन व्यवस्था देखील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातच करण्यात येणार आहे. संकुल परिसरात शुटींगबॉलचे दोन अद्ययावत मैदाने तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

स्पर्धा आयोजनासाठी विविध समित्या जसे की आयोजन समिती, तक्रार निवारण समिती, उद्घाटन समिती, तांत्रिक समिती, मैदान व्यवस्था, भोजन, निवास, वैद्यकीय, प्रसिद्धी व स्वच्छता समिती सक्रियपणे कार्यरत आहेत. निवास व्यवस्था व संकुल परिसराची स्वच्छता पूर्ण झाली असून निमंत्रण पत्रिका, प्रमाणपत्रे, भोजन पासेस व इतर दस्तऐवजांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

दरम्यान, दि. 2 ते 3 फेब्रुवारी 2026 या कालावधीत स्पर्धा असल्याने सैन्य व पोलीस भरती सरावासाठी जिल्हा क्रीडा संकुलातील मैदाने तात्पुरती बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच स्थानिक शाळांतील विद्यार्थ्यांनीही स्पर्धा पाहण्यासाठी नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी