Friday 29 May 2020

DIO BULDANA NEWS 29.5.2020

टेकडी तांडा गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : मोताळा तालुक्यातील टेकडी तांडा  गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. टेकडी तांडा येथील लोकसंख्या 350 असून टँकरद्वारे गावाला दररोज 12 हजार 50 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांनी कळविले आहे.                                                                                          *******
धाड नाका प्रतिबंधीत क्षेत्रासाठी होम डिलीवरीची व्यवस्था
·        नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : बुलडाणा शहरातील कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नुकतेच शहरात कोरोना संसर्गीत व्यक्ती  आढळून आली आहे. सदर व्यक्तीच्या घराच्या आजुबाजूचा धाड नाका परिसर सील करण्यात आला आहे. नगर पालिकेच्या आरोग्य विभाग व अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ या प्रभागाचे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच नपच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्रात दूध, भाजीपाला, किराणा यांच्या होम डिलीवरीची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
  त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या क्षेत्रातील नागरिकांनी नोडल  अधिकारी संदेश मोरे यांच्या 8149123090, पुरवठा व संपर्क अधिकारी विश्वास इंगळे यांच्या 9503041248 व सहा. पुरवठा अधिकारी गजानन गाढवे यांच्या 9767927839 या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे. या क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वेक्षणात कुटूंब प्रमुख, त्यांचा मोबाईल क्रमांक, कुणी बाहेरगावाहून आले असल्याची माहिती, घरातील दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती तसेच आरोग्य सेतू डाऊनलोड संदर्भातील माहिती घेण्यात येत आहे.
   सदर प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी श्री. वाघमोडे यांनी दिला आहे.
                                                                                    ******
कोरोना अलर्ट : आज प्राप्त 19 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 19 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. हे सर्व 19 अहवाल निगेटीव्ह आहेत.  आतापर्यंत 1072 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 53 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आतापर्यंत 29 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 29 आहे.  सध्या रूग्णालयात 21 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
   तसेच आज 29 मे रोजी 19 अहवाल प्राप्त झाले आहेत.सर्व अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 103 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1072 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
  


Thursday 28 May 2020

DIO BULDANA NEWS 28.5.2020

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत आता सर्वांना उपचाराचा लाभ
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार करोनाबाधित रुग्ण तसेच करोनाची लागण नसलेल्या राज्यातील 12 कोटी लोकांना या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.
       शासकीय व पालिका रुग्णालयांचे सध्या करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्यामुळे शासकीय व पालिका रुग्णालयांमध्ये गुडघेबदल शस्त्रक्रिया व अन्य 120 उपचारांसाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ यापुढे जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 996 आजारांवरील उपचाराची सोय असून पंतप्रधान जीवनदायी योजनेत 1209 आजारांवर उपचार केले जातात. राज्यातील जवळपास 85 टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र 23 मे रोजी आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार पांढरी शिधापत्रिका धारकांसह राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा मिळणार आहे. तो येाजनेचा लाभार्थी नसला तरी हा लाभ मिळणार आहे.
  युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून 31 जुलैपर्यंत या नव्या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील त्यातही मुंबईतील करोनाच्या रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन बहुतेक शासकीय व पालिका रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे.   करोना रुग्णांसाठी आगामी काळात खाटा कमी पडू नयेत व करोना नसलेल्या रुग्णांनाही व्यवस्थित उपचार मिळावे यासाठी सर्वच नागरिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.
   महत्वाचे शासकीय रुग्णालयांत 120 आजारांवर उपचार घेण्यासाठीचे तयार केलेल्या विशेष पॅकेज योजनेचा लाभ आता या योजनेतील अन्य खाजगी रुग्णालयातही घेता येणार आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली असली तरी राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन गरज वाटल्यास या योजनेला मुदतवाढ दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयान्वये कळविले आहे.
******
                        शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू नये
·        खतांच्या किंमती जाहीर
·        कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : खरीप हंगाम 2020 मध्ये शेतकऱ्यांना रास्त भावाने खते मिळावीत. त्यांची फसवणूक होवू नये, यासाठी खतांच्या प्रति बॅग किंमती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. याच किंमतीला शेतकऱ्यांना खत विक्री करावी. शेतकऱ्यांनी याच किंमतीला खत खरेदी करावे. कुठलाही गैरप्रकार आढळल्यास नजिकच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती, कृषि अधिकारी यांना अवगत करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे वतीने करण्यात आले आहे.
खताचे कंपनीनुसार प्रती बॅग दर :
कंपनी जीएसएफसी :  ग्रेड 20.20.0.13 - किंमत प्रति बॅग 975, ग्रेड 10.26.26 – प्रति बॅग 1175, ग्रेड 12.32.16 – प्रति बॅग 1185, डिएपी - प्रति बॅग 1200,  कंपनी कोरोमंडल : ग्रेड  डीएपी – 1250, ग्रेड 10.26.26- प्रति बॅग्‍ 1185, ग्रेड एमओपी – प्रति बॅग 950, ग्रेड 20.20.0.13-  प्रति बॅग 1000,  कंपनी स्मार्टटेक : ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 1065, ग्रेड 10.26.26- प्रति बॅग 1295, कंपनी आयपीएल : ग्रेड डीएपी- प्रति बॅग 1225,  ग्रेड एमओपी – प्रति बॅग 950, ग्रेड 16.16.16 – प्रति बॅग 1075, कंपनी आरसीएफ : ग्रेड युरीया – प्रति बॅग 266.50, ग्रेड 15.15.15- प्रति बॅग 1060, कंपनी इफको : ग्रेड 10.26.26 - प्रति बॅग 1200, ग्रेड 12.32.16- प्रति बॅग 1185, ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 975 रूपये, कंपनी झुआरी : ग्रेड डिएपी - प्रति बॅग 1255 रूपये, कंपनी जीएनव्हीएफसी : ग्रेड 20.20.0-  प्रति बॅग 950.   
                                                                        **********
डोंगरखंडाळा गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. डोंगरखंडाळा येथील लोकसंख्या 8630 असून टँकरद्वारे गावाला दररोज 1 लक्ष 66 हजार 400 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.                                                                                            *******

कोरोना अलर्ट : आज प्राप्त 38 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 3 पॉझीटीव्ह
·        आव्हा येथील एका रूग्णाला सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 41 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 38 अहवाल कोरोना निगेटीव्ह, तर 3 अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये रायगड कॉलनी, बुलडाणा येथील 24 वर्षीय तरूण, सावरगांव जहाँ ता. मोताळा येथील 35 वर्षीय पुरूष आणि येरळी ता. नांदुरा येथील 39 वर्षीय पुरूष आहे. सावरगांव जहाँ ता. मोताळा येथील तरूणाचा मुंबई प्रवास इतिहास आहे. तसेच येरळी ता. नांदुरा येथील पुरूषही मुंबई येथून आलेला आहे. मात्र सदर व्यक्तीला नांदुरा येथील आयटीआय येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे बुलडाणा येथील युवक हा फिलीपाईन्स येथून आलेला आहे.
    तसेच आव्हा ता. नांदुरा येथील एका 24 वर्षीय रूग्णाला आज कोविडचे मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षणे नसल्यामुळे  रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  आतापर्यंत 1053 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 53 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आतापर्यंत 29 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 29 आहे.  सध्या रूग्णालयात 21 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
   तसेच आज 28 मे रोजी 41 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 38 निगेटीव्ह, तर 3 पॉझीटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 91 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1053 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
****
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज 28 मे 2020 रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयात अभि‍वादन करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी  यांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभि‍वादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थित होती.
                                                                                                ******

Wednesday 27 May 2020

DIO BULDANA NEWS 27.5.2020

मेरा बु. व हनवतखेड गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड व चिखली तालुक्यातील मेरा. बु गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हनवतखेड येथील लोकसंख्या 397 असून मेरा. बु येथील 6500 आहे. टँकरद्वारे हनवतखेड गावाला दररोज 13 हजार 820 लीटर्स व मेरा बु. गावाला 1 लक्ष 47 हजार लीटार्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.                                                                                                             *******

कोरोना अलर्ट : आज प्राप्त 35 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 2 पॉझीटीव्ह
·        शेगांव येथील एका रूग्णाला सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 37 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 35 अहवाल कोरोना निगेटीव्ह, तर 2 अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये निमखेड ता. दे.राजा येथील 22 वर्षीय तरूण आणि मलकापूर येथील 38 वर्षीय पुरूष आहे. निमखेड ता. दे.राजा येथील तरूणाचा मुंबई प्रवास इतिहास आहे. त्याचप्रमाणे मलकापूर येथील पुरूष हा अकोला येथे जावून आला असल्याचा प्रवास इतिहास आहे. तसेच शेगांव येथील एका महिला रूग्णाला आज कोविडचे मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षणे नसल्यामुळे  रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  आतापर्यंत 1015 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 50 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आज शेगांव येथील 30 वर्षीय एका कोरोनाबाधीत रूग्णाला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.  आतापर्यंत 28 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 28 आहे.  सध्या रूग्णालयात 19 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
   तसेच आज 27 मे रोजी 37 अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 64 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1015 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Sunday 24 May 2020

DIO BULDANA NEWS 24.5.2020


पाच वर्षाच्या ‘गुडीया’ने दिली.. कोरोनाला मात..!
  • कोविड केअर सेंटरमधून मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या कोरोनाने लहानग्यांनाही सोडले नाही. एक वर्षाच्या बाळापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांचाच कोरोनाचा पिच्छा पुरविला आहे. मोठ्या शहरांमध्ये, तर कोरोनाचे साम्राज्य आहे. अशा परिस्थितीत मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील पाच वर्षाच्या ‘गुडीया’ ने कोरोनाशी चिवट झुंज दिली. मुंबई येथून गावाकडे आल्यानंतर कोरोना पॉझीटीव्ह आढळलेली ही मुलगी बुलडाणा येथे कोविड केअर सेंटरला दाखल होती. या गुडीयाने कोरोनावर मात करीत आज सर्वांना सुखद धक्का दिला. ही गुडीया आनंदाच्या भावमुद्रेत सेंटरच्या बाहेर पडली व टाळ्या वाजवून उपस्थितांनी तिचे स्वागत केले.  गुडीयाच्या सुट्टीमुळे सध्या तरी मलकापूर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यात यश आले आहे.
  आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 37 कोरोनाबाधीत रूग्ण आहेत. त्यापैकी 26 कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून आपल्या स्वगृही परतले आहे. एकूण रूग्णांपैकी 3 मृत आहेत. नरवलेच्या गुडीयाला केंद्र शासनाच्या नवीन निकषांनुसार कुठलेही कोरोनाचे लक्षणे आढळून न आल्यामुळे सुट्टी देण्यात आली. यानंतर घरी तिला विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर तालुक्यातील येथील पाच, खामगाव तालुक्यातील दोन, शेगाव येथील तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील 2, देऊळगाव राजा येथील दोन, चिखली येथील तीन, बुलडाणा येथील 8 व जळगाव जामोद येथील एक अशाप्रकारे 26 रुग्णांचा समावेश आहे. सध्या रुग्णालयात आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
   नरवलेच्या या चिमुकलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. त्यांनी पुष्पगुच्छ देवून चिमुकलीचे स्वागत केले.  यावेळी उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस व ब्रदर्स यांनी गुडीयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच गुडीलया मोठ्या आनंदाने निरोप दिला. शासनाच्या रुग्णवाहिकेतून तिला घरी सोडण्यात आले. यावेळी गुडीयाच्या पालकांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या काळजीबद्दल आभार व्यक्त केले. तसेच सर्वांना धन्यवादही दिले. 
                                              . ****""
कोरोना अलर्ट : आज प्राप्त 32 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर एक पॉझीटीव्ह
बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी  आज  33 अहवाल प्राप्त झाले आहेत.त्यापैकी 32 अहवाल निगेटीव्ह व एक अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. पॉझीटीव्ह अहवाल हा टुनकी, ता. संग्रामपूर येथील 17 वर्षीय युवकाचा आहे. मुंबई येथून परत आला असल्याचा प्रवास इतिहास आहे.  आतापर्यंत 906 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.  जिल्ह्यात एकूण 37 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. नरवेल ता. मलकापूर येथील पाच वर्षीय चिमुकलीला आज सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत 26 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 26 आहे.  सध्या रूग्णालयात 08  कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
   तसेच आज 24 मे रोजी 33 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 32 निगेटीव्ह, तर एक पॉझीटीव्ह आहेत.  तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 105 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 906 आहेत, अशी माहिती निवासी  उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Thursday 21 May 2020

लॉकडाऊन 4.0 ; अधिक सवलतींसह नवीन आदेश लागू


·        सर्व दुकाने सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत उघडण्यास मुभा
        ·       जिल्हा ‘नॉन रेड झोन’ मध्ये, कन्टेन्टमेंट झोन बाहेर परवानगी
·        आंतरजिल्हा बस वाहतूक, केशकर्तनालये, स्पा सुरू होणार
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशभर 31 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. राज्यात राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनबाबत आदेश लागू केले आहे. हे सुधारीत आदेश जिल्ह्यात 22 मे 2020 पासून  31 मे 2020 पर्यंत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लागू केले आहेत. सर्व दुकाने सकाळी 9 ते सायं 5 या वेळेत कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उघडी ठेवण्यास परवानगी आहे. दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान 6 मीटरचे अंतर ठेवावे, तसेच एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घेवू नये. सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनीटायझेशन या अटींसह आंतर जिल्हा बस वाहतूकीस 50 टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी आहे.  जिल्ह्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. त्यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
    जिल्ह्यात ह्या सेवा सुरू राहणार : जिवनावश्यक वस्तू विक्री ठिकाणे धान्य व किराणा, बेकरी, फळे व भाजीपाला, कृषि संबंधीत सर्व दुकाने, दुधाची दुकाने, पेट्रोल पंप, अंडी, मांस, मच्छी, पशुखाद्य व चारा विक्री दुकाने,  रूग्णालये, नर्सिंग होम, क्लिनीक, टेलिमेडीसीन्स सुविधा, केमिस्ट, औषधी दुकाने, वैद्यकीय साहित्याचे दुकाने, सर्व आरोग्य सेवा, वैद्यकीय प्रयोगशाळा व संग्रह केंद्रे, पशुवैद्यकीय रूग्णालये, दवाखाने, क्लिनीक, पॅथोलॉजी, औषधी विक्री व पुरवठा, रूग्णवाहिका निर्मितीसह वैद्यकीय आरोग्याच्या पायाभूत सोयी सुविधांचे बांधकाम, डायग्नोस्टीक रूग्णालये, पुरवठा साखळी पुरविणारे फर्म, कच्चा माल व मध्यवर्ती घटकांचे युनीट, शेतकऱ्यांद्वारे शेतकरी गटाद्वारे किंवा शासनाद्वारे होणारी थेट विपणन हमी भावाने खरेदी करणाऱ्या यंत्रणांची कामे सुरू राहतील. कृषि उत्पन्न बाजार समित्या, शेतीविषयक यंत्र व त्यांचे सुटे भाग विक्री दुकाने, दुरूस्ती करणारे दुकाने, शेतीसाठी भाडेतत्वावर अवजारे पुरवठा करणारे सेंटर्स, रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके यांचे उत्पादन वितरण व विक्री करणारी कृषि सेवा केंद्र, गॅस एजन्सी, इमारतींची बांधकामे सुरू राहतील. बँका, सर्व एटीएम, एलआयसी, पोस्ट ऑफीस संबंधीत सर्व सेवा सुरू राहतील. तसेच केशकर्तनालये, स्पा सुरू राहतील.
  विवाह समारंभ जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीने करता येईल, यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी राहील. मनरेगाची कामे करता येतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतूक वितरण व साठवणूकीस परवानगी राहील. वस्तू व सेवांसाठी ऑनलाईन सुविधांचा वापर व घरपोच डिलीवरी देता येईल. शासनाने ठरवून दिलेल्या किमान अंतरासह महामार्गावरील ट्रक दुरूस्तीचे दुकाने सुरू राहतील. खाजगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी करण्यास परवानगी आहे.
  इलेक्ट्रीशीयन, संगणक अथवा मोबाईल दुरूस्ती, वाहन दुरूस्ती, नळ कारागीर, सुतार यांच्या सेवा सुरू राहतील. नगर पालिका क्षेत्राचे हद्दीबाहेर व ग्रामीण भागातील उद्योग, बांधकामास परवानगी आहे. मान्सूनपुर्व संबंधीत सर्व कामे सुरू राहतील. त्याचप्रमाणे एका व्यक्तीसह दुचाकी, चालकासह दोन व्यक्तींसाठी थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांना परवानगी राहील.
   जिल्ह्यात ह्या सेवा प्रतिबंधीत असणार आहे : वैद्यकीय कारणा शिवाय किंवा या मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तींना आंतर जिल्हा व आंतर राज्य संचार करण्यास बंदी, अधिकृत परवानगी शिवाय परराज्यातून जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यातून प्रवासाच्या वाहतुकीस पुर्णपणे बंदी असेल, सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहील, सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार व तत्सम, व्यायामशाळा व सामुहिक खेळांसाठी क्रीडा कॉम्प्लेक्स बंद राहतील, सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे भविकांसाठी बंद राहतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा, मेळावे आदी बंद राहतील. पानटपरी, चहाचे स्टॉल्स, उपहारगृहे बंद राहतील.
तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, 10 वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील.
कामाच्या ठिकाणी पाळावयाचे नियम : कामाच्या ठिकाणी हॅण्ड वॉश, सॅनीटायझर, प्रवेश व जाण्याच्या ठिकाणी ठेवावे. तसेच कामाच्या ठिकाणी नियमित सॅनीटायझेशन, नागरिकांच्या प्रवेश ठिकाणी सर्व सुरक्षा बाळगावी. सोशल डिस्टसिंग, चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल ठेवावा.
   या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005,  भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
  
******
कोरोना अलर्ट : आज प्राप्त 24 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 24 अहवाल आज प्राप्त झाले असून सर्व 24 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 820 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच काल रात्री तीन पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांसह जिल्ह्यात एकूण 35 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आतापर्यंत 24 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 24 आहे.  सध्या रूग्णालयात 08 रूग्ण कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
   तसेच आज 21 मे रोजी 24 अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 94 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 820 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
****
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापूर्वी संस्थेच्या मान्यतेबाबत खात्री करावी
·        जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 :  महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांचे मार्फत नोंदणीकृत संस्थेमध्ये 6 महिने, 1 वर्ष व दोन वर्ष कालावधीचे मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात येते. मात्र असे निदर्शनास आले आहे, की काही संस्था परीक्षा मंडळाची रितसर पद्धतीने मान्यता न घेता अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांची व शासनाची दिशाभूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्व विद्यार्थ्यांनी कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापूर्वी सदर अभ्यासक्रमास व संस्थेला महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांची मान्यतेबाबत खात्री करावी. एखाद्या संस्थेने मान्यता नसताना विद्यार्थ्यांची प्रवेश देवून दिशाभूल करीत असल्याचे आढळून आल्यास जिल्हा व्यवसाय शिक्षण  व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, एच. पी गॅस गोडवून समोर, बुलडाणा यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.
                                                            ***
क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारांसाठी 26 मे पर्यंत नामांकन सादर करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 :  ध्यानचंद जिवन गौरव पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार सन 2019 करीता नामांकन सादर करावयाचे आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक मंत्रालय यांच्यावतीने सदर पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्काराबाबतची नियमावली www.yas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी सदर नामांकन / प्रस्ताव 26 मे 2020 पर्यंत क्रीडा संचालनालयाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
                                                           
महाडिबीटी प्रणालीतंर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास 26 मे पर्यंत मुदतवाढ
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 :  महाडीबीटी प्रणालीवर सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावर 1425 अर्ज प्रलंबित आहेत. सदर शिष्यवृत्ती, प्रथम हप्ता शिष्यवृत्ती , शिक्षण व परीक्षा शुल्क अर्ज महाविद्यालयास महाडीबीटी प्रणालीवर सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करण्यास 26 मे 2020 पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे.
  महाविद्यालय प्राचार्य यांनी अर्ज तात्काळ अंतिम तारखेपर्यंत महाविद्यालय स्तरावरील महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क पात्र अर्ज समाज कल्याण कार्यालयास ऑनलाईन सादर करावे. शासनाकडून अंतिम मुदतीनंतर प्रलंबित अर्ज ऑटो रिजेक्ट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाची राहील, असे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
--

Wednesday 20 May 2020

DIO BULDANA NEWS 20.5.2020


जळगांव जामोदच्या रूग्णाची कोरोनावर मात..!
·        खामगांव येथील रूग्णालयातून मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : कोरोनाच्या सावटापासून मुक्त असलेल्या जळगांव जामोद शहरात बऱ्हाणपूर येथून आलेला एक 45 वर्षीय व्यक्ती  11 मे रोजी कोरोना बाधीत आढळला. त्यानंतर या तालुक्यात सुन्न वातावरण निर्माण झाले. कोरोनाने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगांव जामोद तालुक्यात दस्तक दिली. प्रशासनाने गंभीरतेने परिस्थिती हाताळत रूग्णावर खामगांव येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.
     जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 32 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 रूग्ण मृत आहेत. तर जळगांव जामोद येथील सदर रूग्णासह 24 रूग्णांना कोविडचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.    प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे सदर रूग्ण निगेटीव्ह आला आहे. त्याला आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून घरी पाठविले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सदर तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने रुग्णाला डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णांचा चेहरा आनंदीत होता.
    या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज पेपर देण्यात दिला.
    त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या एका रूग्णामुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 24 झाली आहे.   सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवावे, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                                              ********
 कोरोना अलर्ट : आज प्राप्त 48 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर दोन पॉझीटीव्ह
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले 50 अहवाल आज प्राप्त झाले असून त्यापैकी 48 अहवाल निगेटीव्ह व दोन अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये शेगांव येथील 32 वर्षीय महिला व आव्हा, ता. मोताळा येथील 22 तरूण आहे. आतापर्यंत 796 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 32 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आतापर्यंत 24 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 24 आहे.  सध्या रूग्णालयात पाच रूग्ण कोरोनाबाधीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
   तसेच आज 20 मे रोजी 50 अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 90 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 796 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
                                                            *******
चार गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी, सावळा, पाडळी व चिखली तालुक्यातील कोलारा या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. ढासाळवाडी येथील 2343 लोकसंख्या, सावळा 797, पाडळी 3375 आणि कोलारा येथील 4890 लोकसंख्या आहे. या गावांना टँकरद्वारे अनुक्रमे दररोज 61 हजार 580, 31 हजार 840,1 लक्ष 8 हजार 100 आणि 1 लक्ष 73 हजार 400 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे
                                                            ******
पाणी टंचाई निवारणार्थ 48 विंधन विहीरी ; 9 कुपनलिका मंजूर
  • 51 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना
बुलडाणा, दि‍.20 (जिमाका) :  पाणीटंचाई निवारणार्थ  दे.राजा तालुक्यातील 7, मलकापूरमधील 2, मेहकर तालुक्यातील 13, लोणारमधील 4, सिंदखेड राजामधील एक, मोताळा तालुक्यातील 7, जळगांव जामोदमधील 15, शेगांव 1 व नांदुरा  तालुक्यातील एका गावासाठी 48 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच 9 कुपनलिकांची कामेही मंजूर आहेत. एकूण 51 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.
   विंधन विहीरी सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजामोताळा तालुक्यातील आडविहीर, तालखेड, महालपिंप्री, बोराखेडी, चावर्दा, धामणगांव बढे व पान्हेरा, जळगांव जामोद तालुक्यातील रायपूर, गोराळा, गोरखनाथ, गोराडा जुना पाणी, वडपाणी, सोनबर्डी, कुंवरदेव, गोराळा प.सु, नांदुरा तालुक्यातील पोटा, मलकापूर तालुक्यातील वाघुड व हरसोडा, दे.राजा तालुक्यातील टाकरखेड भागीले, गिरोली बु, जुमडा, सावखेड भोई, चिंचखेड, डोढ्रा व डिग्रस बु, मेहकर तालुक्यातील देऊळगांव साकर्षा, घाटनांद्रा, उटी, निंबा, अंबाशी, पारडी, शिवपुरी, उसरण, चिंचाळा, बेलगांव, भालेगांव, सुळा व आरेगांव, लोणार तालुक्यातील पहूर, सरस्वती, सुलतानपूर व वडगांव तेजन  या गावांसाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहेतर  जळगांव जामोद तालुक्यातील दाऊतपूर, काजेगांव, जामोद, टाकळी पारसकर, सुनगांव, चालठाणा, टाकळी खाती व शेगांव तालुक्यातील सगोडा  या गावांसाठी कुपनलिका मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
                                                                        *****
28 दिवसांत एकही नवीन रूग्ण नाही ; 7 कन्टेन्टमेंट झोन वगळले
बुलडाणा, दि‍.20 (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे साथरोग अधिनियम लागू करण्यात आला आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या 15 एप्रिल 2020 च्या पत्रानुसार मागील 28 दिवसापासून जर एकही नविन कोविडचा रूग्ण आढळून आला नाही, तर सदरचा कंटेन्टमेंट झोन कमी करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना रूग्ण आढळून आलेल्या क्षेत्रामध्ये कंटेन्टमेंट झोन जाहीर करण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण 13 झोन आहेत. त्यापैकी 7 झोनमध्ये मागील 28 दिवसांत एकही कोविडचा रूग्ण आढळून न आल्यामुळे हे झोन वगळण्यात आले आहेत. त्यामध्ये जुना गांव बुलडाणा, हकीम कॉलनी देऊळगांव राजा, चितोडा ता. खामगांव, इदगाह प्लॉट शेगांव, कुरेशी गल्ली सिंदखेड राजा, तहसिल कार्यालय परीसर मलकापूर आणि आंबेडकर नगर देऊळगांव राजा या झोनचा समावेश आहे.  
   या कंटेन्टमेंट झोनमधून वगळण्यात आलेले क्षेत्र पुढील आदेशापर्यंत ऑरेंज झोन म्हणून निश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने वेळोवेळी ऑरेंज झोनसाठी दिलेल्या आदेशामध्ये लागू असणारे सर्व नियम, अटी व शर्ती सदर क्षेत्रासाठी लागू राहणार आहेत, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.

Monday 18 May 2020

corona alert 18.5.2020

कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 57 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'
बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : जिल्ह्यात गत दोन दिवसानंतर आज दिलासादायक वृत्त आले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले तब्बल 57 अहवाल आज प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत 742 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 29 रुग्ण कोरोनाबधित रूग्ण आहेत. त्यापैकी एक मृत आहे.  आतापर्यंत 23 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23 आहे.  सध्या रूग्णालयात पाच रूग्ण कोरोनाबाधीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
   तसेच आज 18 मे रोजी 57 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 57 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 83 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 742 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Sunday 17 May 2020

DIO BULDANA NEWS 17.5.2020

कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 04 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 3 पॉझीटीव्ह
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : जिल्ह्यात आज प्राप्त 07 रिपोर्ट पैकी 04 अहवाल निगेटिव्ह असून 03 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत 685 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात तीन पॉझीटीव्ह अहवालासोबतच 29 रुग्ण कोरोनाबधित आहेत. त्यापैकी एक मृत आहे.  आतापर्यंत 23 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23 आहे.  सध्या रूग्णालयात पाच रूग्ण कोरोनाबाधीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
   तसेच आज 17 मे रोजी 07 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये प्राप्त तीन पॉझीटीव्ह अहवाल प्रत्येकी खामगांव येथील 60 वर्षीय महिला, शेगांव येथील 35 वर्षीय पुरूष आणि नरवेल ता. मलकापूर येथील 7 वर्षीय मुलीचा आहे.  तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 68 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 685 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
********
जिल्ह्यात टाळेबंदी 31 मे पर्यंत; दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडणार
·        जमावबंदी आदेश लागू
        ·       सलग पाचपेक्षा जास्त दुकाने एका ओळीत उघडता येणार नाहीत
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने 31 मे 2020 पर्यंत टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर केले आहे. तसेच राज्यात व जिल्ह्यात साथरोग अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुकानांच्या पूर्वीच्या सकाळी 7 ते सायं 7 या वेळेचा कालावधी दुकानांवरील एकाच ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी कमी करणे आवश्यक आहे.  जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यात 31 मे 2020 पर्यंत जमावबंदी आदेश लागू आहेत. तसेच मागील 7 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार परवानगी दिलेल्या व प्रतिबंधीत केलेल्या सर्व बाबींना बदल केलेला वेळ लागू करण्यात आला आहे. प्रतिबंधीत क्षेत्र अर्थात कंटेन्टमेंट झोनमधील सर्व दुकाने, आस्थापना बंद असणार आहे.  
  जिल्ह्यातील सर्व दुकाने आता सकाळी 8 ते दुपारी 2 यावेळेत सुरू राहणार आहेत. त्यामध्ये किराणा, भाजीपाला, दुध व तत्सम, कृषी व बांधकाम साहित्य, सिलबंद मद्यविक्री आदी दुकाने यावेळेत सुरू राहतील. तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय आस्थापना, मेडीकल, लॅब, दवाखाने, ॲम्बुलन्स सेवा आदी तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील नगर पालिका / परिषद क्षेत्राबाहेरील पेट्रोल पंप 24 तास सुरू राहणार आहेत. जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्रातील सर्व स्टँण्ड अलोन दुकाने (स्वतंत्र), कॉलनी व रहीवासी भागातील सर्व दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. परंतु या भागात सलग पाच पेक्षा जास्त दुकाने ओळीत उघडी राहणार नाहीत, याची संबंधीत नगर पालिका मुख्याधिकारी यांनी दक्षता घ्यावी. तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा परवागी प्राप्त व्यक्ती वगळून सर्व दुचाकी परिभ्रमणास प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
   जर ओळीत अशी पाच पेक्षा जास्त दुकाने असतील तर यापैकी केवळ अत्यावश्यक वस्तु व सेवांची दुकाने सुरू राहतील. तसेच ग्रामीण भागात सर्व दुकाने याच वेळेत सुरू राहतील. उपरोक्त परवानगी असलेली सर्व दुकाने प्रतिबंधीत क्षेत्रात सुरू राहणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग अधिनियम 1897, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम 188 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                    ************