श्री गुरू तेग बहादूर यांचे ३५० वे शहिदी समागम वर्ष नांदेडमध्ये होणार भव्य सोहळा

 




बुलढाणा, (जिमाका) दि. 14 : : 'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर' यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे. 

श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी कार्य करताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षा निमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने नागपूर व नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन झाले.  आता  २४ व २५ जानेवारीला नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचा मुंबई येथील कार्यशाळेने शुभारंभ करण्यात आला होता. श्री गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा आणि हौतात्म्याचा इतिहास सर्वदूर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे. तहसील, शहर जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात श्री गुरू तेग बहादूर यांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे.

या गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शीख, सिकलीगर, बंजारा,लबाना, मोहयाल, सिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून प्रचार व प्रसाराचे कार्य यशस्वीपणे पार पाडणार आहे. श्री गुरू तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे या सहा समाजाच्या गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या