Thursday 29 December 2022

DIO BULDANA NEWS 29.12.2022

 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या

प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

*10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत

बुलडाणा, दि. 29 : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी प्रवेश परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. या प्रवेश परिक्षेसाठी दि. 10 जानेवारी, 2023 पर्यत अर्ज प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सदर स्पर्धा परिक्षेसाठी पात्र आहेत.

सर्व मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पात्र विद्यार्थ्याकडुन भरुन घेऊन, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाकडे सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्ज शासकीय, अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध आहेत.

आवेदन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, पालक, विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला आवेदन पत्रासोबत जोडावा. सदर परीक्षा दि. 26 फेब्रुवारी, 2023 रोजी सहावीकरिता सकाळी 11 ते 13 या वेळेत आणि सातवी ते नववी करिता सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. ही परिक्षा शासकीय आश्रमशाळा, कोथळी, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला, शासकीय आश्रमशाळा, घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलडाणा येथे होणार आहे असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेद्रकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.

000000

सायलेज बेलर मशीन युनिट स्थापन्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : जिल्ह्याकरिता राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरापोळ, गोरक्षण संस्था यांना या योजनेचे लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी प्रति युनिट २० लाख रुपये खर्चापैकी ५० टक्के म्हणजेच १० लाख रुपये केंद्र शासनाचे अर्थसहाय्य असून उर्वरित ५० टक्के १० लाख रुपये संस्थेने स्वतः खर्च करावयाचे आहे. सदर निधी हा सर्वसाधारण योजनेतील आहे. तसेच जिल्ह्यातून एक युनिट स्थापन करावयाचे आहे. यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले यांनी केले आहे. 

00000

कुक्कुट विकास गट स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : जिल्ह्यातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यासाठी दि. 10 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेसाठी ५० टक्के अनुदानावर नांदुरा आणि मेहकर या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. योजनेतील उद्दिष्टानुसार निवड समिती मार्फत प्रति तालुका एका लाभधारकाची निवड करण्यात येणार आहे. यासाठी सर्व प्रवर्गातील इच्छुक पशूपालक, शेतकऱ्यांनी संबधित पंचायत समितीचे पशूधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याशी संपर्क साधावा.

इच्छुकांना अर्ज दोन प्रतीत सादर करावे लागणार आहे. अर्ज करणाऱ्यांकडे स्वतःची २ हजार ५०० चौरस फुट जागा, दळणवळण, पाण्याची व्यवस्था आणि विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असावी लागणार आहे. योजनेतील प्रकल्पाची किंमत १० लाख २६ हजार रूपये आहे. प्रकल्प शासनाच्या मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयानुसार पुर्णत: कार्यान्वीत झाल्यानंतर ५० टक्के अनुदान ५ लाख १३ हजार रूपये लाभार्थीच्या खात्यात थेट हस्तांतरण करण्यात येतील. या योजनेबाबतची सविस्तर माहिती संबधित तालुक्यातील पशूधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे उपलब्ध आहे. या योजनेचा पशुपालक, शेतकरी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले यांनी केले आहे.

000000  

Wednesday 28 December 2022

DIO BULDANA NEWS 28.12.2022

 









विभागस्तर शालेय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 28 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 28 ते दि. 29 डिसेंबर 2022 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित विभागस्तर शालेय 14, 17, 19 वर्षे मुले-मुली खेळाडूच्या किक बॉ‍क्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन मृत्युंजय गायकवाड यांच्याहस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिपक तुपकर, दिवानसिंग मानसिंग जाधव, ॲड. दिपकदादा पाटील, अरविंद अंबुसकर, अनिल अंबुसकर उपस्थित होते. श्री. गायकवाड यांनी क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन होण्यासाठी, तसेच युवकांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी स्पर्धा उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.

तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय अंबुसकर, रोशनी अंबुसकर, प्रविण राऊत, गायत्री दिग्रसकर, कृष्णा कथडे, रणजित कथडे हे पंचाधिकारी आहेत. स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, वरिष्ठ लिपिक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे यांनी पुढाकार घेतला.

00000

लम्पी चर्म रोगाचे पशूधनाचे नुकसान झाल्यास

पशूसहायता मोबाईल ॲपवर अर्ज करावेत

बुलडाणा, दि. 28 : लम्पी चर्मरोगाने मृत्यूमुखी पडलेल्या पशूधनास नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पशूपालकांनी पशूसहायता मोबाईल ॲपवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

लम्पी चर्म रोगाने मृत्युमुखी पडलेल्या पशुधन नुकसान भरपाई देण्यासंबंधी ऑनलाईन प्रणालीनुसार mhpashuaarogya.com  या संकेतस्थळावर किंवा गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ॲप पशूसहायता PASHUSAHAYATA वर नोंदणी करुन नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यात यावेत. पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वत:च्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्यामुळे अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. ऑनलाईन अर्ज तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, विस्तार, पंचायत समिती यांच्याकडून कार्यक्षेत्रातील संबंधित पशूधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1, यांना युजर आयडी पासवर्ड निर्धारित करुन फॉरवर्ड करण्यात यावेत. असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशूसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले यांनी केले आहे.  

0000000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 2 जानेवारी  2023 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा लोकशाही दिन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

लोकशाही दिनात जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतील. या महिन्यातील लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेद्वारे घेण्यात येणार आहे. लोकशाही दिनी तक्रारदाराला स्वत: उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारदारानी तक्रार रजिस्टर पोस्टाने प्रभारी अधिकारी, लोकशही दिन, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या नावे पाठवावे.

अर्जदाराने अर्ज करताना अर्ज विहित नमुन्यातील असावा, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, विहित अर्ज नमून्यात 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठवावेत. तालुकास्तरीय लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हा लोकशाही दिनात अर्ज करावा.

लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व व अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती जोडल्या नसल्यास असे अर्ज, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाची नसल्यास अर्ज स्विकारले जाणार नाही.

00000








विभागस्तर शालेय पेट्यांक्यु क्रीडा स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे वर्चस्व

खेळाडूंनी एक खेळ निवडुन प्राविण्य संपादन करावे.

 - श्री.दिनेश गिते, निवासी जिल्हाधिकारी

          बुलडाणा, दि. 28 :   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा व बुलढाणा जिल्हा पेट्यांक्यु असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे दि.27 डिसेंबर 2022 रोजी 19 वर्षाआतील मुले, मुलींच्या पेट्यांक्यु क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

            स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, बोलत होते.  यावेळी मंचकावर जिल्हा क्रीडा अधिकारी, गणेश जाधव, बुलढाणा, तहसिलदार, विजय पाटील. नायब तहसिलदार, हेमंत पाटील, एस.महानकर, मेश्राम यवतमाळ, इत्यादींची उपस्थिती होती.

            या स्पर्धेसाठी अमरावती विभागातुन पाच जिल्ह्याचे व दोन महानगर पालीका यांचे एकुण 60 खेळाडू सहभागी झाले होते.  आपल्या उद्घाटणीय मार्गदर्शन प्रसंगी मा.श्री.दिनेश गिते निवासी उपजिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी आपल्या खुमासदार शैलीत खेळाडूंना मार्गदर्शन करतांना आयोजकांनी खेळ समजुन सांगण्यासाठी आमची एक मॅच खेळवली असा उल्लेख केला.  ह्या खेळामुळे आम्हाला आमच्या बालपणीच्या रम्य आठवणींना उजाळा देत आला असा आवर्जुन उल्लेख केला.  तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा एक खेळ निवडून त्यात प्राविण्य संपादन करावे.  खेळ हा मानसीक, शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगला असुन, खेळामुळे मनाची प्रगती होते.  तसेच खेळाडूंनी मोबाईलपासुन दुर राहुन मैदानावर आले पाहिजे असेही सांगीतले.  तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध जिल्ह्यातुन आलेल्या खेळाडूंचे, क्रीडा शिक्षकांचे, पालकांचे स्वागत केले.  यावेळी मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांनी पेट्यांक्यु हा खेळ खेळून प्रशंसा केली. तसेच राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचे मा.गिते साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी राज्यस्तरावर एकुण 20 खेळाडूंपैकी 16 यवतमाळ जिल्हा, 03 वाशिम जिल्हा व 01 बुलढाणा जिल्हा पात्र ठरले.

            या स्पर्धेला पंच म्हणून प्रफुल्ल वानखेडे, विशाल खंडारे, प्रतीक राऊत, अमर सावळे, उपस्थित होते.  उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश इंगळे यांनी तर आभार अनिल इंगळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी आभार मानले.  सदर स्पर्धा मा.श्री.गणेश जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा यांचे कुशल मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनिल इंगळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा संयोजक, रविंद्र धारपवार, क्रीडा अधिकारी, विजय बोदडे, वरिष्ठ लिपीक, सुरेशचंद्र मोरे, व्यवस्थापक, जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती बुलढाणा, विनोद गायकवाड, कैलास डूडवा, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे यांनी परिश्रम घेतले असे गणेश जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा हे कळवितात.

 

000000



पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र होणार स्वच्छ

*जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम

बुलडाणा, दि. 28 : राज्याच्या ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने नदी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार येणार आहे. यातून जिल्ह्यातील पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात चला जाणूया नदीला उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 28 डिसेंबर 2022 रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, समन्वयक नंदकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 नद्यांच्या क्षेत्रात चला जाणूया नदीला उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आला आहे. पैनगंगा नदीसोबतच नळगंगा आणि ज्ञानगंगा या नदीक्षेत्रातही हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रामुख्याने नदी क्षेत्रातील नागरिकांमध्ये नदीचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. लोकसहभागाची ही चळवळ विविध घटकांना एकत्र करून राबविण्यात येणार आहे.

नदीक्षेत्र स्वच्छ करण्यासोबतच पूरक्षेत्र, नदीतील अतिक्रमण, पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपचारात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. नदी स्वच्छतेमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्यासाठी श्रमदानातून कामे करण्यात येणार आहे. नदीचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी कुटुंबासह एक दिवसभर श्रमदान करणार आहे. यात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, रोटरी क्लब, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी  यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.

नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे चला जाणूया नदीला या उपक्रमामुळे नदीकाठील गावांमध्ये जागृती होण्यास मदत होणार आहे. तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्या या उपक्रमातील सहभागामुळे नागरिकांपर्यंत नदीच्या स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यास मदत होणार असल्यामुळे जिल्हा आणि क्षेत्रियस्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांनी कुटुंबासह सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी केले.

000000



Tuesday 27 December 2022

DIO BULDANA NEWS 27.12.2022



 जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयात भाऊसाहेब ऊर्फ डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार शामला खोत आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000000

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

बुलडाणा, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणरे अर्ज, निवेदने आदींवर कार्यवाही करण्यात येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यासाठी जिल्हा मुख्यालयी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली  आहे. या कक्षासाठी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी, सहाय्यक करमणूक कर अधिकारी के. व्ही. पाटील, महसूल सहाय्यक राजशिष्टाचार कक्षाचे महसूल सहाय्यक शिवशंकर अशोक रिंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय मुंबई येथे स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडून कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.

शासकीय कामकाजात अधिकाधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने सदर कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुख, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने, ग्रामीण भागातील नागरिकांना प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु आले आहे.

          कक्षामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी मुख्यमंत्री यांना लिहिलेले अर्ज, निवेदने स्विकारतील. या अर्जावर जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी यांची बैठक घेऊन निकाली काढण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री सचिवालयास पाठविण्यात येणार आहे. वैयक्तिक आणि धोरणात्मक अर्ज अपर मुख्य सचिव यांना सादर करण्यात येणार आहे.

0000000






युवकांनी जिल्ह्याबाहेर काम करण्याची मानसिकता ठेवावी

-जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड

बुलडाणा, दि. 27 : रोजगार मेळावा हा उपस्थित उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी युवकांनी नेहमीच प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्याबाहेर जाऊन काम करण्याची मानसिकता युवा पिढीने ठेवावी. युवकांनी नोकरी मिळविण्यासोबतच व्यापक दृष्टिकोन ठेवून भविष्यात आपणच नोकरी देणारे उद्योजक  बनण्याची इच्छाशक्ती बाळगावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी  केले.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शेगाव येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने शेगाव येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला.

जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील, शेगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. पी. महाले, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर हे उपस्थित होते. यावेळी सुनिल पाटील, प्राचार्य एस. पी. महाले यांनी मार्गदर्शन केले.

मेळाव्याला संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य एस. डी. सोमाणी, प्रशिक्षण अधिकारी आदेश सोळंके, महात्मा गांधी नॅशनल फेलो शिवानी तावडे, कौशल्य विकास अधिकारी प्रमोद खोडे, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक नंदू मेहेत्रे,  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांच्यासह 14 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मेळाव्यासाठी जिल्ह्यातील 408 सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक युवक व युवती उपस्थित होते. सदर मेळाव्यात 600 पेक्षा अधिक ‍रिक्तपदे अधिसुचित करण्यात आली होती.

श्रीमती बारस्कर यांनी प्रास्ताविकातून रोजगार मेळाव्याची भूमिका मांडली. सचिन भगत यांनी सूत्रसंचालन केले. श्री. सोळंके यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संतोष पडघान, गोपाल चव्हाण, सचिन पवार, राहूल सुरडकर, तसेच संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

00000

राज्य वाङमय पुरस्कार योजनेसाठी

प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

          बुलडाणा, दि. 27 :  स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार योजनेसाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार योजनेंतर्गत निवडअंती सन 2022चे राज्य वाङमय पुरस्कार प्रदान करण्यासाठी दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रका‍शित झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकासाठी दि. 1 जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023 या विहित कालावधीत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त झालेल्या प्रवेशिका दि. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना पाठवावयाच्या आहेत. विहित कालावधीनंतर प्राप्त प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे.

0000000

मोताळा आयटीआयमध्ये भंगार साहित्य विक्रीसाठी निविदा आमंत्रित

बुलडाणा, दि. 27 : मोताळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील भंगार साहित्य विक्रीसाठी दि. 30 डिसेंबर 2022 पर्यंत निविदा आमंत्रित करण्यात आला आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यशाळेत प्रात्याक्षिकामधून निर्माण झालेला स्क्रॅप तसेच प्रात्याक्षिक करीत असताना तुटलेली हत्यारे व अवजारे यांची विक्री भंगार साहित्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहे. विक्री करावयाचे भंगार साहित्य, तसेच तुटलेले हत्यारे, अवजारांची यादी, निविदा अर्ज संस्थेच्या भांडार विभागात भांडारपाल यांच्याकडे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. निविदेची किंमत 100 रूपये असून खरेदीदारास दि. 30 डिसेंबर 2022 पर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. सीलबंद निविदा दि. 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता सर्वांसमोर उघडण्यात येतील, असे मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. डी. गंगावणे यांनी केले आहे.

00000000

Monday 26 December 2022

DIO BULDANA NEWS 26.12.2022

 गटई कामगारांनी स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 26 : जिल्ह्यातील अनुसुचित जातीच्या गटई कामगारांनी पत्र्याचे स्टॉल मिळण्यासाठी सन 2022-23 या वर्षाकरीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यानी आपले अर्ज दि. 5 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्जावर पासपोर्ट फोटो चिकटविलेला व परिपूर्ण अर्ज सादर करावा, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि अनुसुचित जातीचा असावा, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 40 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 50 हजार रूपयांपेक्षा अधिक नसावे. यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेला उत्पनाचा दाखला आवश्यक राहणार आहे. अर्जदार वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.

अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल, ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावनी बोर्ड (कॅटॉनर्मेन्ट बोर्ड) किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, करारनाम्याने, खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्व:मालकीची असावी इत्यादीपैकी एक प्रकारचे कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदाराचा स्वत:चा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्डची प्रत, आधार कार्डची प्रत, रहिवाशी दाखला इत्यादी स्वसाक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

या व्यवसाय योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरजू अर्जदारांनी विहित नमुना अर्ज विनामुल्य प्राप्त करुन घ्यावा. त्यासह आवश्यक कागदपत्रे, अर्जासोबत जोडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे दि. 5 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावेत. उशीरा आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. अर्जदारांनी आवश्यक त्या कागपत्रासह परिपूर्ण अर्ज सादर करावेत, तसेच अर्जदारास अर्जातील त्रृटी पुर्तताबाबत या कार्यालयातून व्यक्तिगतरित्या कळविल्या जाणार नाही. अपुर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्‍यावी, असे समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

00000

शेतकऱ्यांनी रब्बी पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

          बुलडाणा, दि. 26 :  जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रब्बी पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकता बाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांना गौरव  केल्यास, त्यांचे  मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच मार्गदर्शक परिसरातील इतर शेतकऱ्याना होवून जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून कृषि विभागामार्फत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येते.

सध्याच्या पिक स्पर्धेत जिल्ह्याकरिता रब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस ही पिके समाविष्ट करण्यात आली आहेत. स्पर्धेत प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या ही  सर्वसाधारण गटासाठी १० आणि आदिवासी गटासाठी ५ शेतकरी आहे. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखालील किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी ३०० रुपये  प्रवेश शुल्क राहणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. ३१ डिसेंबर २०२२ आहे.

पिकस्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, सात बारा, आठ अ चा उतारा व अनुसूचित जमातीचे असल्यास जात प्रमाणपत्र या कागदपत्रांची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. या स्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी असे दोन गट राहणार आहे.

तालुका पातळीवर पहिले पाच हजार, दूसरे तीन हजार, तिसरे दोन हजार रूपये बक्षीस राहणार आहे. जिल्हा पातळीवर पहिले दहा हजार, दूसरे सात हजार, तिसरे पाच हजार रूपये बक्षीस राहणार आहे. राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दूसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रूपये बक्षीस राहणार आहे.

पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ज्वारी, गहू, हरभरा, करडई,जवस या पिकासाठी दि. ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी अर्ज सादर करून पिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस.जी. डाबरे यांनी केले आहे.

00000

थेट कर्ज योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 26 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादितच्या थेट कर्ज योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्हा कार्यालयास सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजनेचे 20 उद्दिष्ट असून थेट कर्ज योजनेचे प्रस्ताव जिल्ह्यातील मातंग समाजातील 12 पोटजातीतील इच्छुक अर्जदाराकडून मागविण्यात आले आहेत.

यासाठी कर्जाचे अर्ज दि. 26 डिसेंबर 2022 ते दि. 24 जानेवारी 2023 पर्यंत दिले जातील. यात पुर्ण भरलेले कर्ज स्विकारले जातील. प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये, आर्थिक उद्दिष्ट 20 लाख रूपये आहे. जिल्ह्यातील मांग, मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कगदपत्राची पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा कार्यालयात स्वत: अर्जदाराने मुळ कागपदत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरण स्विकारण्यात येणार नाहीत.

कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचे आहे, त्या ठिकाणची भाडेपावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा (घर टॅक्स पावती), ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसाय संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोर किमान 500 असावा, अर्जदाराने आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. कर्ज प्रकारणासोबतची सर्व कागदपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीने साक्षांकित करावीत.

योजनेतील कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज दि. 24 जानेवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे अर्ज मिळतील आणि स्विकारले जातील. अंतिम तारीखेनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी कळविले आहे.

0000000

सेल्फी विथ पौष्टिक तृणधान्य थाळी उपक्रम

बुलडाणा, दि. 26 : संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी आणि त्यांचा आहारातील वापर वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.  यासाठी सेल्फी विथ पौष्टिक तृणधान्य थाळी उपक्रम राबविण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्याबाबत जिल्हास्तरीय कार्यकारिणीची सभा पार पडली. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने सुरुवात स्वतःपासून ही मोहिम घ्यावयाची आहे. त्याअंतर्गत प्रत्येक महिन्यामध्ये किमान एकदा पौष्टिक तृणधान्य थाळी आपण कुटुंबासमवेत आपल्या आहारात समावेश करावयाचा आहे. त्यासाठी आपण स्वतः किंवा कुटुंबासमवेत सदर थाळीसोबत सेल्फी, फोटो काढून स्वतःचे नाव, मुख्यालय व पदनाम प्रत्येक महिन्याच्या शेवटी या कार्यालयास dsaobuldana@gmail.com या मेलवर तसेच ९४०४९५३०५९ किंवा ९७६३९४११५२ या व्हाटस्ॲपवर पाठवावे. पौष्टिक तृणधान्य थाळीमध्ये इतर पदार्थांबरोबर किमान एक किंवा दोन पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ असावेत.

केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेल्या या महत्वकांक्षी मोहिमेमध्ये सक्रीय सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.

00000