सिकलसेल मुक्तीसाठी 15 जानेवारीपासून विशेष अभियान; 7 फेब्रुवारीपर्यंत जिल्हाभरात तपासणी व जनजागृती
बुलढाणा, (जिमाका) दि. 8 : जिल्ह्यात सिकलसेल अॅनिमिया
या आनुवंशिक आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून आरोग्य विभागाच्या
निर्देशानुसार दि. 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‘सिकलसेल अॅनिमिया
विशेष अभियान’ राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत 40
वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांची प्राथमिक सिकलसेल तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान
संशयित रुग्ण व वाहकांची नोंद घेऊन आवश्यकतेनुसार एचपीएलसी (HPLC) किंवा इलेक्ट्रोफोरेसिस
या प्रगत तपासण्या केल्या जाणार आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार
यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हा आरोग्य यंत्रणा या विशेष अभियानासाठी सज्ज झाली
आहे. जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे
तसेच आयुष्यमान आरोग्य मंदिरांमध्ये आवश्यक मनुष्यबळ व तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात
आल्या आहेत.
अशी राहील प्रक्रिया:
अभियानादरम्यान 40 वर्षांपर्यंतच्या नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल. संशयित
रुग्णांची पुढील सखोल तपासणी करून त्यांना औषधोपचार, समुपदेशन व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन
दिले जाणार आहे. भावी पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी विवाहपूर्व व प्रसूतीपूर्व
समुपदेशनावर विशेष भर देण्यात येणार आहे.
अभियान यशस्वी करण्यासाठी
शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती उपक्रम, प्रश्नमंजुषा, रांगोळी व निबंध स्पर्धांचे
आयोजन करण्यात येणार आहे. तसेच बॅनर, पोस्टर्स, सोशल मीडिया, गृहभेटी यांद्वारे सिकलसेल
अॅनिमियाबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ग्रामीण भागात महिला मंडळांच्या माध्यमातूनही
विशेष जनजागृती उपक्रम राबविले जाणार आहेत. सिकलसेल मुक्त बुलढाणा जिल्हा करण्यासाठी
सर्व नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. विशेषतः तरुणांनी तपासणी करून
प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी केले
आहे.
00000
Comments
Post a Comment