लेख : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी अर्थात हिंद दी चादर !
धर्म व मानवतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे नाव इतिहासात अजरामर होत असते. शीख गुरु परंपरेतील नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी धर्म रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ज्यांची ‘हिंद दी चादर’ म्हणजेच 'भारतभूमीचे कवच' अशी अभिमानास्पद ओळख आहे. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक गौरवास्पद अध्याय आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा आदर्श बाळगणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानामुळे धर्म अबाधित राहिला. त्यांच्या या महान बलिदानास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या बलिदान दिनानिमित्त नांदेड येथे विशेष सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.
अमृतसरमध्ये एप्रिल १६२१ मध्ये शिखांचे सहावे गुरू हरगोबिंद आणि माता नानकी यांच्या कुटुंबात श्री गुरू तेग बहादूर यांचा जन्म झाला. १६६४ मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली. गुरू तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहान वयातच एका घनघोर युद्धात अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना 'तेग बहादूर' असे गौरवाने संबोधले जाऊ लागले. 'तेग बहादूर' म्हणजे 'शूर, तळपती तलवार' होय ! श्री गुरु तेग बहादूर यांनी त्यांच्या नावाप्रमाणेच तळपत्या तलवारीसारखे शौर्य दाखवत धर्म रक्षणाचे पवित्र कार्य केले.
तो काळ क्रूर शासकांच्या राजवटींमुळे धार्मिक-राजकीय संघर्षाचा होता. समाजातील मोठा वर्ग विविध अत्याचारांना बळी पडत होता. धर्म, संस्कृती, श्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी अत्यंत वाईट मार्गांचा अवलंब करण्यात येत होता. लोकांचा केवळ छळच नव्हे तर त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्यात येत होते. बळजबरी करून लोकांचे धर्मांतर करण्याचा मार्ग या क्रूर शासकांनी अवलंबिला होता. यामुळे सर्वत्र हाहा:कार माजला होता, या साऱ्यांची इतिहासात नोंद आहे.
अशा आव्हानात्मक परिस्थितीत श्री गुरु तेग बहादुर शौर्याने अखेरपर्यंत लढले. समाजाची चेतना व संकल्पशक्ती जागवण्यासाठी प्रसंगी बलिदान दिले. औरंगजेबाच्या क्रूर राजवटीला त्यांनी आव्हान दिले. श्री गुरु तेग बहादुर जुलमी राजवटीसमोर झुकले नाहीत. त्यांचा तेजस्वी निश्चय मोडून काढण्यासाठी मुघल राज्यकर्त्यांनी त्यांच्या परिवारासही संपवले व क्रूरतेचा कळस गाठला. तरीही श्री गुरु तेग बहादुर यांचा संकल्प ढळला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत ते धर्म व मानवतेच्या रक्षणासाठी लढत होते. अखिल मानवजातीला चारित्र्य, सत्य, संयम, करुणेचा संदेश देत ते दिव्य ज्योतीत विलीन झाले. त्यांच्या आदर्शांचे स्मरण करीत आपण आपले आयुष्य घडवावे हाच आपला निर्धार असावा. भारतीय परंपरेतील अशा महान तेजस्वी ताऱ्याची शिकवण आणि बलिदानाचे महत्त्व बालक, तरुण व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
श्री गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. यानिमित्ताने त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीतर्फे राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हा शहीदी समागमाचा उपक्रम केवळ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना श्रद्धांजली नसून गुरु साहिबांची शिकवण, आदर्श आणि त्यांच्या बलिदानाच्या तेजस्वी परंपरेची ज्योत भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक सामूहिक प्रयत्न आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचे जीवन निर्भयता, धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी केलेल्या त्यागाचे प्रतीक असून त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपूर येथे ७ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानवता, सत्य आणि धर्म रक्षणाचा मार्ग दाखवणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनीही या सर्व कार्यक्रमांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला. येत्या २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या शौर्यावर आधारित गीतांचे गायन, अखंड जप तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरु तेग बहादूर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी विविध धार्मिक व सामाजिक संघटनांसह सर्वजण अनेक सामाजिक, प्रबोधनात्मक व जागृतीपर कार्यक्रम आयोजित करत आहेत. यात मॅरेथॉन, रॅली, भक्तीगीत, स्मरणिका प्रकाशन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
धर्माचे संरक्षक निर्माण करणे हा श्री गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्याचा उद्देश होता. ग्रंथाला गुरु मानावे ही त्यांची शिकवण ! येणाऱ्या पिढ्यांनी त्यांच्या शौर्य व बलिदानाचे स्मरण करून आयुष्य समृद्ध करावे, असे जणू इतिहास आपणा सर्वांना सांगत आहे. त्यांचे तत्त्वज्ञान व त्यांच्या शिकवणीचे पालन करणे हेच खरे धर्म कर्तव्य होय.
सहायक संचालक
माहिती व जनसंपर्क
नागपूर
Comments
Post a Comment