यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिकांचे आवाहन; 30 जानेवारीपर्यंत मुदत
बुलढाणा, (जिमाका) दि. 01 : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी
लेखक आणि प्रकाशकांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर
2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्तीच्या पुस्तकांसाठी ही स्पर्धा असून,
पात्र साहित्यिकांनी आपल्या प्रवेशिका 30 जानेवारीपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन
निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत सन 2025 च्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी
1 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 असा निश्चित करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील
इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका आणि पुस्तके या विहित कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय,
बुलढाणा येथे जमा करणे आवश्यक आहे. विहित कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिकांचा
विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या
सदरात 'स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली
व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award 2025
Rules Book and Application Form' या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका
उपलब्ध आहे.
00000
Comments
Post a Comment