Thursday 18 March 2021

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती
























" सातपुडा, अजिंठा रांगांनी सजले । 
निसर्गसौंदर्य अलौकिक हो लाभले ।। 
म्हणतात याला विदर्भाचे प्रवेशद्वार । 
लोणार सरोवर निसर्गाचा अद्वितीय आविष्कार ।। 
जन्मभूमी ही स्वराज्यजननी जिजाऊंची ।
भूमी ही पावन इतिहासाची साक्षीदार ।।
'विदर्भाची पंढरी' शेगाव नगरीला मान ।
पूर्णा, पैनगंगेने लाभले सुपीकतेचे वरदान ।।
बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती । 
बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती ।।" 

बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम,अमरावती जिल्हा, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून विदर्भात येण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातूनच यावे लागते म्हणून बुलडाणा जिल्ह्याला 'विदर्भाचे प्रवेशद्वार' देखील म्हंटल्या जाते. जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. चिखली-मेहकर, देऊळगाव राजा- चिखली- खामगाव, बुलढाणा-खामगाव, बुलढाणा-मलकापूर ई. राज्य मार्गामुळे जिल्ह्यातील दळणवळण सुविधा चांगली विकसित झालेली आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणार्‍या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत. 
• बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण बुधनेश्वर हे असून बुलढाणा अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे. 
• कसे याल? रस्त्याने: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.राष्ट्रीय महामार्ग 6 बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव, नांदुरा आणि मलकापूर तालुक्यांमधून जातो. 
• रेल्वेद्वारे: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मलकापूर येथे आहे जे जिल्हा मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर आहे. मलकपूर, शेगाव, नांदुरा रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येतात. तसेच जिल्हा मुख्यालयापासून भुसावळ (१०१ कि.मी) आणि अकोला(१०२ कि.मी) हे सर्वात जवळचे रेल्वे जंक्शन आहे. 
• हवाई मार्गा द्वारे सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे जे जिल्हा मुख्यालयापासून 150 किमी अंतरावर आहे.तसेच नागपूर येथील विमानतळ जिल्हा मुख्यालयापासून 350 किमी अंतरावर आहे.
• अजिंठा लेणी: स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध असलेली लेणी बुलढाणा जिल्हासीमेपासून अगदी जवळ आहे. अजिंठा लेणी ह्या इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. बुलढाणा शहरापासून ५९ कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरली आहेत. 

जिल्ह्यातील महत्वाची व पर्यटन स्थळे: 

लोणार सरोवर:  लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खार्‍या पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.
• ज्ञानगंगा अभयारण्य: ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात असलेले बोथा गाव जुने वनग्राम आहे. 

• अंबाबरवा अभयारण्य:अंबाबरवा नावाचे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सुमारे १२७ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. जिल्ह्य़ातील सातपुडा पर्वत रांगामध्ये, मध्यप्रदेश व मेळघाटच्या सीमावर्ती भागात असलेले अंबाबरवा अभयारण्य नैसर्गिक वैविध्यपूर्ण संपत्तीचे वरदान असून हे अभयारण्य जिल्ह्य़ातील प्रमुख वन पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. 

• राजूर घाट: शहराला लागून असलेल्या बुलढाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाट निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून परिसरातील असलेल्या विविध मंदिरे, नदी, नाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे. बुलढाणा शहरातून मलकापूरकडे जात असताना सर्वप्रथम व्यंकटगिरी बालाजीचे मंदिर आहे. तिरूमला येथील बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली असून परिसरात डोंगर आहेत. राजूर घाटात एका वळणावर संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या ठिकाणाहून बुलढाणा शहर परिसर तसेच राजूर घाटातील डोंगराचे सौंदर्य निहाळता येते. 

• गजानन महाराज समाधीस्थळ आणि आनंदसागर : शेगाव येथे श्री संत गजानन महाराजाचे मंदिर आणि समाधीस्थळ आहे. इसवी सन १९०८ साली गजानन महाराज यांनी शेगाव येथे समाधी घेतली. आज विश्वभरातून भाविक त्यांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. येथील संस्थानाचे दैनंदिन नियोजन हे एक आदर्श उदाहरण आहे. शेगाव येथील आनंदसागर हा प्रसिद्ध सुंदर बगीचा आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हा बगीचा खास करून उभारण्यात आला आहे. विवेकानंद ध्यान केंद्र, मध्यभागी असलेला तलाव, मत्सालय हे येथील विशेष आकर्षण आहेत. 

• सिंदखेड राजा : जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे गांव छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे. जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वास्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वास्तू आहे. येथील चांदणी तलाव विशेष प्रसिद्ध आहे. 

• मैलगड किल्ला: बुलडाणा जिल्ह्यात बरेच किल्ले आहेत, त्यापैकी मैलगड किल्ला हा विशेष आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श या किल्ल्याला लाभला असून, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनासाठी हा किल्ला उत्कृष्ट पर्यटनस्थळ आहे. उचंच उंच हिरव्यागार डोंगरावर वसलेल्या या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगर-दऱ्या पार कराव्या लागतात.  

• नांदुरा : येथे जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे. • देऊळगाव राजा हे गाव तेथील बालाजीच्या मंदिराला भक्तगणांमध्ये विशेष महत्त्व आहे. • बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये चिखली पासून फक्त १२ किलोमीटर च्या अंतरावर साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. • मोताळा तालुक्यातील तारापुर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र द्वारा स्थापित असुन नवरात्रोत्सव काळात मोठी गर्दी असते. 

• सुलतानपुर : येथील पुरातन वास्तू सिद्धेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम अविष्कार दर्शनीय आहे. 

• उंद्री : या गावापासुन 15 कि मी अंतरावर वडाळी नावाच्या गावामध्ये प्रसिद्ध शिवमंदिर आहे. • अमडापुर येथे प्रसिद्ध बल्लाळ देवी मंदिर.

• मर्दडी देवी: बुलढाणा तालुक्यात बुलढाणा ते औरंगाबाद रस्त्यावर धाड गावाजवळ मर्दडी देवी चे संस्थान डोंगरामध्ये वसलेले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणुन मर्दडी माताची ख्याती आहे. येथे नवरात्री मध्ये नऊ दिवस यात्रा असते. 

• गिरडा: अजिंठा पर्वत रागांमध्ये अध्यात्मिक पातळीवर नावाजलेला अन् निसर्गरम्य अशा डोंगरदऱ्यांमुळे गिरडा परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १६ कि.मी. अंतरावर अजिंठा लेणी मार्गावर गिरडा हे गाव आहे. प्राचीन महादेव मंदिरामुळे या गावाला जुनी ओळख आहे. पांडव वनवासात असताना अर्जुनाने बाण मारुन इथे पिण्याच्या पाण्याचा स्रोत निर्माण केला. त्यातून पाच झरे निर्माण झाले. तेच पाणी गोमुखातून आजपर्यंत अव्याहतपणे बाहेर पडते, अशी अख्यायीका सांगितली जाते. पंचझिरीचा निसर्गरम्य परिसर आणि त्याचे धार्मिक महत्‍त्व लक्षात घेत अध्यात्मिक केंद्राला पर्यटनाची जोड मिळाल्यामुळे आता या परिसरात सहलींचे आयोजनही केले जाते. 

• सैलानी बाबा दर्गा : आराध्यदैवत हजरत बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा दर्गा देवस्थान पिंपळगांव येथील धार्मिक स्थळ हे हिंदू व मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. मार्च महिन्यातील सैलानी (ऊरुस) यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड,आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातुन लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. याबरोबरच मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर मंदिर संस्थान, खामगाव तालुक्यातील गारडगाव, संग्रामपूर तालुक्यातील साडी इको-टुरिजम पार्क हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत., 

बुलढाणा जिल्ह्यातील धरणे :

• जिगाव प्रकल्प: बुलडाणा जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी महत्वाकांक्षी असा जिगाव साकारला जात आहे. जिगांव प्रकल्प तापी खोऱ्यातील पूर्णा नदीवर असून, या प्रकल्पाला सन १९९६ मध्ये प्रथम शासकीय मान्यता मिळाल्यानंतर सुधारीत मान्यता २००५ मध्ये मिळाली. सांडव्यासह धरणाची लांबी ८२४० मीटर आहे. या प्रकल्पात द्वारयुक्त जलोत्सारणी असून १५ बाय १२ मीटरचे १६ वक्रद्वारे आहेत. प्रकल्पाच्या संकल्पित एकुण जलसाठा ७३६.५०९ दलघमी तर पाणी वापर ५४८.२३ दलघमी आहे. १२ उपसा सिंचन योजनच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील तालुक्यातील २८७ गावातील ८४२४० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.  

• खडकपूर्णा धरण: देऊळगावराजा परिसरातील खडकपूर्णा नदीवर जिल्ह्य़ातील सर्वात मोठय़ा संत चोखा सागर प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे,  हे देउळगावमही या गावाजवळ असलेले पूर्णा नदीवरचे धरण आहे. हे देउळगावराजा ते चिखली रस्त्यावर लागते. हा एक सिंचन प्रकल्प आहे. 

• येळगाव धरण : येळगाव धरण हे पैनगंगा नदीवर असून, बुलढाणा शहराजवळ येळगाव गावी असलेले हे धरण संपूर्ण बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करते. 

• पेनटाकळी धरण: पेनटाकळी धरण हे पैनगंगा नदीवरील मेहकर तालुक्यातील एक मोठे धरण असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चिखली, मेहकर सह अनेक गावे येतात. 

• नळगंगा धरण: नळगंगा धरण हे नळगंगा नदीवरील मोताळा तालुक्यातील मोठे धरण आहे. हा एक सिंचन प्रकल्प असून, या जलाशयाची क्षमता ७६.५५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. याशिवाय जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा व गोराडा धरण देखील जिल्ह्यातील महत्वाची प्रमुख धरणे आहेत.अजिंठ्याच्या डोंगरात वसलेल्या बुलढाणा शहर परिसराला अलैकिक सौंदर्याची देण असल्यामुळे तसेच थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात येथूनच जिल्ह्याचा कारभार सुरू केला होता. दरम्यान स्वातंत्र्यानंतर बुलढाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळाला. आज रोजी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी शहर परिसरात असलेले नैसर्गिक सौंदर्य दरवर्षी परिसरातील पर्यटक प्रेमींना खुणवत असते.

No comments:

Post a Comment