Thursday 30 June 2022

DIO BULDANA NEWS 30.6.2022

 पंढरपूर यात्रेसाठी एसटी सज्ज; 210 बसेस धावणार

बुलडाणा, (जिमाका) दि.30 : आषाढी पंढरपूर यात्रा 6 जुलै ते 16 जुलै पर्यंत पंढरपूर जि. सोलापूर येथे असणार आहे. यात्रोचा मुख्य दिवस आषाढी शुद्ध एकादशी 10 जुलै 2022 रविवार राहणार आहे. तसेच बुधवार, 13 जुलै 2022 रोजी पौर्णिमा आहे. या यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे.

   पंढरपूर करीता जिल्ह्याच्या विविध आगारांमधून प्रवाशांसाच्या सोयीसाठी 210 बसेस धावणार आहे. कोणत्याही गावामध्ये कमीत कमी 50 प्रवाशी थेट मिळत असल्यास त्या प्रवाशांकडून प्रवास भाड्याची पूर्ण रक्कम आगाऊ भरणा करून त्या गावातून भाविकांना पंढरपूरकरीता थेट बसची व्यवस्था करण्यात येणार आहे.  प्रवाशांच्या सुरक्षित सेवेसाठी एसटी महामंडळ सर्व आगारातून खास पंढरपूर यात्रेकरीता जादा बसेस सोडण्याची व्यवस्थाही करीत आहे. तरी प्रवाशांनी पंढरपूर यात्रेसाठी अवैध, खाजगी वाहनातून जीव धोक्यात घालून प्रवास न करता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनेच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार व विभागीय वाहतूक अधिकारी अमृतराव कच्छवे यांनी केले आहे.

यात्रेकरीता आगारनिहाय अशा आहेत बसेस

बुलडाणा : 44, चिखली : 30, खामगांव : 32, मेहकर : 40, मलकापूर : 25, जळगांव जामोद : 24, शेगांव : 15 असे एकूण 210 बसेस आहेत.

*****

सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

बुलडाणा,(जिमाका) दि.30 : विश्वविख्यात संख्या शास्त्रज्ञ स्व. प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा सांख्यिकी कार्यालयात सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) ज्ञा.व आंबेकर यांनी दिपप्रज्वलन करून अध्यक्षस्थान भुषविले.

  प्रास्ताविक सांख्यिकी सहायक अमोल तोंडे यांनी केले. त्यांनी संख्याशास्त्राचे महत्व विषद केले.  यावर्षीच्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकन्ल्पना ‘शाश्वत विकास ध्येयाकरीता सांख्यिकी’ अशी होती.  या संकल्पनेवर आधारीत नवीन ध्येय-धोरणे ठरविण्यासाठी सांख्यिकीय माहितीची उपयुक्तता यावर संशोधन सहायक अनिल शेवाळे यांनी भर दिला.   जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आंबेकर यांनी स्व. महालनोबिस यांचे संशोधनात्मक अधिष्ठानाबाबत माहिती दिली. सांख्यिकी दिन म्हणजे सांख्यिकीचे जन्मदात्यांचा दिवस असल्याचे प्रतीपादन केले.

आभार प्रदर्शन संशोधन सहायक डी. पी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सांख्यिकी सहायक श्रीमती अ. म. तायडे, अ.रा. तोंडे, प्र.रा. बोदडे, उ.अ डाबेराव, अन्वेषक कि. भ. शिरसाट, लिपीक र.ना हातलकर, श्रीमती सु.सु पवार आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

                                                                        *********

आदिवासी मुला- मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

• पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

• http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.30: आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह बुलडाणा येथे आहे. या वसतिगृहासाठी शैक्षणिक सत्र सन 2022-23 करीता अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता इयत्ता 11 वी व पुढील शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाकरीता वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज भरून मुलींनी हार्डकॉपीसह शैक्षणिक कागदपत्रे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, राऊत मंगल कार्यालय, सर्क्युलर रोड, जिजामाता महाविद्यालयजवळ, बुलडाणा येथे सादर करावे. तर मुलांनी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, मॉडेल डिग्री महाविद्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावे.    

   प्रवेशीत विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डिबीटीद्वारे निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता, शैक्षणिक सहलभत्ता व इतर भत्ते देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक नोंद करावा. हा मोबाईल क्रमांक बँक खात्यासोबत तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना तेआधार कार्डवरील नावाप्रमाणे तंतोतंत असावे. आधार क्रमांकाची नोंद करताना तो स्थगित झाला नसल्याची खात्री करून घ्यावी. विद्यार्थ्यांनी बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर खाते कार्यरत असल्याची खात्री करून घ्यावी. प्रवेशासाठी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, वर्ग 10 वी चे बोर्ड प्रमाणपत्र, मेडीकल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड छायांकित प्रत, गुणपत्रिका, विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार संलग्न बँक खाते पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आदी अचूकपणे अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल आदिवासी शासकीय मुलींचे वसतिगृह, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                                        ***********

जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाचे 4 जुलै रोजी आयोजन

• मोबाईल क्रमांक 9021353670 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात

• व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि. 30: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. जुलै महिन्याचा लोकशाही दिन सोमवार दि. 4 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.

   या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 9021353670 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल तयार करून तक्रारी द्याव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांना दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

    तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                                ******

 

 


--

Wednesday 29 June 2022

DIO BULDANA NEWS 29.6.2022

 जिल्ह्यात 1 जुलैपासून सिंगल युज’ प्लॅस्टीकच्या वस्तू वापरावर बंदी

बुलडाणा, (जिमाका) दि.29 : केंद्रिय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाने सिंगल युज प्लॅस्टिक वस्तुंच्या वापरावर बंदी घातली आहे. जिल्हयात 1 जुलैपासुन या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, अशी माहीती निवासी उपजिल्हाधिकारी, दिनेश गिते यांनी दिली.

    निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत नुकतीच जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांच्यासह पालिका, नगरपंचयतींचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

  निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले, प्लॅस्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॅस्टिकच्या काडया, प्लॅस्टिकचे झेंडे, कँडी कांडया, आईस्क्रीम कांडया, सजावटीसाठी पॉलिस्टीरीन (थर्माकोल), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे चमचे, बाउल, डबे, बरणी, चमचे, चाकु, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टरर्स), हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ पॅक करुन देण्यासाठी डिश, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेटची पाकिटे यांची प्लॅस्टिक आवरणे, 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक किंवा पीव्हीसी बनर्स, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल व प्लॅस्टिक इ. वापरावर 1 जुलै पासुन बंदी घालण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी करण्याकरीता विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे आणि उल्लंघन करणाऱ्यांवर या पथकांमार्फत दंडनिय कारवाई केली जाणार आहे.

    प्लॅस्टिक कचऱ्याचे विलगीकरण, संकलन, साठवण, वाहतुक आणि विल्हेवाट यासाठी असणारी यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. सविस्तर कृती आराखडयास शैक्षणिक संस्था, व एन.सी.सी. एन.एस.एस. स्कॉउटस, युवा क्लब, ईको क्लब आणि सयंसेवी संस्थाचा समावेश करुन, दवंडी पिटवून प्लॅस्टिक प्रदुषण कमी करण्यासाठी सक्षम चळवळ उभारुन प्लस्टीक वस्तुंचा वापर करण्यास परावृत करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                                *****

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि.29 : भारतीय कल्याण परिषदेमार्फत दरवर्षी 6 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना कठीण प्रसंगात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. सदर अर्ज हा ICCW या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज डाऊनलोड करून 20 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुठ्ठे ले आऊट, बुलडाणा येथे सादर करावा.

 अर्जासोबत अर्जदार ज्या शाळेमध्ये शिकत आहे. त्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा पंचायत/जिल्हा परिषद प्रमुख, राज्य बालकल्याण परिषदेचे अध्यक्ष किंवा सरचिटणीस, जिल्हाधिकारी किंवा समकक्ष पदाचे सरकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक किंवा समकक्ष पदाचे पोलीस अधिकारी यांपैकी दोन सक्षम अधिकाऱ्यांची शिफारस आवश्यक आहे.  जन्माचा दाखला, वर्तमानपत्राचे कात्रण, किंवा प्रथम खबरी अहवाल, किंवा पोलीस डायरी नोंद, घटनेचा लेखा जोखा तसेच सहाय्यक दस्तऐवजसह प्रस्ताव तयार करावा.या पुरस्कारसाठी उल्लेखनिय कार्य केलेली घटना 1 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान घडलेली असावी. पुरस्कारासाठी निवड ही ICCW द्वारा निवड केलेल्या समितीमार्फत होणार आहे. कोणत्याही कारणास्तव नामंजुर केलेले अर्ज पुन्हा स्वीकारले जाणार नाही. पुरस्काराचे वितरण देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.   अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 आहे. इच्छुक अर्जदारांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे. 

                                                              पुरस्कार व स्वरूप

भारत पुरस्कार 1 लक्ष रूपये, धृव पुरस्कार, मार्कडेय पुरस्कार, श्रवण पुरस्कार, एकलव्य पुरस्कार व अभिमन्यु पुरस्कार 75 हजार रूपये, सामान्य पुरस्कार 40 हजार रूपये असे आहे. 

Tuesday 28 June 2022

DIO BULDANA NEWS 28.6.2022,1

 मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशिन युनीटकरीता अर्थसहाय्य मिळणार

  • राष्ट्रीय पशुधन अभियान

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्याकरीता राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत मुरघास निर्मिती करीता सायलेज बेलर मशिन युनीट स्थापन करण्यात येणार आहे. या युनीटसाठी जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गौरक्षण संस्था यांना सदर योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. या योजनेकरीता प्रति युनीट 20 लक्ष रूपये खर्चापैकी 50 टक्के 10 लक्ष रूपये केंद्र शासनाचे अर्थ सहाय्य राहणार आहे. उर्वरित 50 टक्के अर्थात 10 लक्ष रूपये संस्थेने स्वत: खर्च करावयाचे आहे. सदरचा निधी हा सर्वसाधारण योजनेतील असल्याने योजनेकरीता जिल्ह्यामध्ये एक युनीट स्थापन करावयाचे आहे. तरी सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनीच अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 5 जुलै 2022 आहे. अर्ज पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे, तरी पात्र संस्थांनी 5 जुलैपर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी. एस बोरकर यांनी केले आहे.

 *********

गायी म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम

  • कालवडींना संगोपनार्थ प्रोत्साहनपर 5000 रूपयाचे व नर वासरांना 25000 रुपये अनुदान

बुलडाणा,(जिमाका) दि.28 : सन 2022-23 मध्ये जिल्हयात गायी म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ही योजना सन 2015 च्या सेवा हमी कायदयामध्ये समाविष्ठ करण्यात आलेली आहे. तरी सन 2022-23 या वर्षासाठी या योजनेमध्ये पशुपालकांनी सहभाग घेवुन आपल्या दुधाळ जनावरांची नोंद करावी. ही नोंद नजिकच्या पशुवैदयकिय संस्थेस पुरविण्यात आलेल्या विहित नमुण्यात भरुन त्यांच्यामार्फत पशुसंवर्धन कार्यालयास त्वरीत सादर करावी.

   नोंद झालेल्या दुधाळ जनावरांच्या पशुपालकाने एक एसएमएस केल्यास त्यांच्या दुधाळ जनावरांना लगेच नजिकच्या पशुवैदयकीय दवाखान्यामार्फत दुधाळ जनावराचे कृत्रिम रेतन केल्या जाते. कृत्रिम रेतन केल्यानंतर जन्मलेल्या कालवडींना संगोपनार्थ प्रोत्साहनपर 5000 रूपयाचे व नर वासरांना 25000 रुपये अनुदान देण्यात येते. तरी या योजनेमध्ये समाविष्ठ होण्यासाठी अर्ज पशुवैद्यकिय दवाखान्यामार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यलयास दिनांक 10 जुलै 2022 पर्यंत देण्यात यावे.

      तरी जिल्हयातील सर्व पशुपालकांनी आपल्या दुधाळ जनावरांची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. ही योजना पशुसंवर्धन विभागा मार्फत राबविण्यात येते. या योजनेसाठी " गाय वाचवा व वंशावळ वाढवा व स्वस्थ पशु खुशहाल किसान, उत्पादक पशु संपन्न किसान "असे बोधवाक्य नेमले आहे. तरी जिल्हयातील शेतकरी अथवा पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. एस. बोरकर यांनी केले आहे.

                                                                                *********

हातमाग विणकरांसाठी केंद्र शासनाची समर्थ योजना कार्यान्वीत

बुलडाणा,(जिमाका) दि.28 : केंद्र शासनामार्फत हातमाग विणकरांचा कौशल्य विकास करण्यासाठी समर्थ योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. य योजनेच्या दिशा निर्देशाप्रमाणे हातमाग विणकरांचा कौशल्य विकास करण्यात येणार आहे. या योजनेबाबत तपशील व दिशा निर्देश Samarth-textiles.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी या योजनेतंर्गत समर्थ प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रतिष्ठीत प्रशिक्षण संस्था, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, ट्रस्ट, कंपनी, इतर सेवाभावी संस्था व वस्त्रोद्योग विभागातील संस्था पात्र असल्यास त्यांनी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त सीमा पांडे यांनी केले आहे.

                                                                                    *********

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करावे

  • कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.28 : राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना कृषि विभागामार्फत विविध पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण सेंद्रीय शेती, वसंतराव नाईक शेती मित्र, उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यपाल यांच्याहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येते. तसेच सन 2020 पासून राज्यात कृषि क्षेत्रात उल्लेखनिय व नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शेती व पुरक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याची माहिती आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गावातील कृषि सहायक यांच्याकडे 15 जुलै पर्यंत सादर करावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि उपसंचालक व्ही. आर बेतीवार यांनी केले आहे.

                                                                        ***** 

DIO BULDANA NEWS 28.6.2022

 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर

• जुलै ते डिसेंबर 2022 दरम्यानचा कार्यक्रम

बुलडाणा, (जिमाका) दि.28 : माहे जुलै ते डिसेंबर 2022 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत.

       शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – जुलै 2022 मध्ये : जळगाव जामोद 4 जुलै, शेगाव 6 व 25 , मेहकर 8 व 28, खामगांव 11 व 29, चिखली 13, नांदुरा 20, मलकापूर 12 व 26, सिंदखेड राजा 22, लोणार 18 व देऊळगाव राजा येथे 15 जुलै रोजी होणार आहे. ऑगस्ट 2022 मध्ये : जळगाव जामोद 3 ऑगष्ट, शेगाव 4 व 24, मेहकर 5 व 29, खामगांव 8 व 30, चिखली 12, नांदुरा 17, मलकापूर 10 व 25, सिंदखेड राजा 22, लोणार 18 व देऊळगाव राजा 17 ऑगष्ट रोजी होणार आहे. सप्टेंबर 2022 मध्ये : जळगाव जामोद 5 सप्टेंबर, शेगाव 6 व 23, मेहकर 8 व 27, खामगांव 12 व 29, चिखली 14, नांदुरा 21, मलकापूर 13 व 26, सिंदखेड राजा 22, लोणार 19 व देऊळगाव राजा 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. ऑक्टोंबर 2022 मध्ये : जळगाव जामोद 3 ऑक्टोंबर, शेगाव 4 व 20, मेहकर 6 व 21, खामगांव 7 व 31, चिखली 11, नांदुरा 17, मलकापूर 10 व 28, सिंदखेड राजा 19, लोणार 14 व देऊळगाव राजा 13 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये : जळगाव जामोद 4 नोंव्हेबर, शेगाव 7 व 24, मेहकर 9 व 25, खामगांव 11 व 29, चिखली 14, नांदुरा 21, मलकापूर 10 व 28, सिंदखेड राजा 23, लोणार 18 व देऊळगाव राजा 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये : जळगाव जामोद 5 डिसेंबर, शेगाव 7 व 26, मेहकर 9 व 27, खामगांव 13 व 30, चिखली 15, नांदुरा 21, मलकापूर 12 व 28, सिंदखेड राजा 23, लोणार 19 व देऊळगाव राजा 16 डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                                    **********

सायबर गुन्हा घडलाय… 1930 हेल्पलाईनचा आधार घ्या..

बुलडाणा, (जिमाका) दि.28 : गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे. सायबर गुन्हेगारी वाढली आहे. सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर होत आहे. महिला व बालकांच्या बाबतीत सर्वसमावेशक पद्धतीने सायबर गुन्ह्यांचे आव्हान पेलण्यासाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारत सरकारने इंडियन सायबर को-ऑर्डीनेशन सेंटर स्कीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल व टोल फ्री क्रमांक 1930 हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यामुळे यापुढे सायबर गुन्हा घडल्यास मदतीसाठी हेल्पलाईनचा आधार मिळणार आहे. सायबर  गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनी या पोर्टलचा व हेल्पलाईन क्रमांकाचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                        *********

 

 प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीमध्ये अशासकीय सदस्यांची होणार निवड

बुलडाणा, (जिमाका) दि.28 : जिल्ह्यामध्ये प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी स्थापन करण्यात आली होती. मात्र सदर समितीचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपलेला असल्यामुळे सोसायटीचे पुर्नगठण करणे नियमानुसार आवश्यक आहे. त्याकरिता अशासकीय सदस्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे .सदर सोसायटीमध्ये संबंधित जिल्ह्यातील गोशाळा / पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशीत केलेल्या दोन व्यक्ती, संबंधित जिल्ह्यातील मानव हितकारक कार्य करणारे / प्राण्यांवर प्रेम करणारे, प्राणी कल्याणासाठी काम करणारे पाच ते सहा कार्यतर्के यांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश असतो. या अशासकीय सदस्यांची निवड दर तीन वर्षांनी करावयाची असते. तरी नविन सदस्यांची निवड करावयाची असल्याने इच्छुकांनी अर्ज व संपूर्ण बायोडाटा संबंधित पंचायत समिती स्तरावर पशुधन विकास अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे स्वीकारण्यात येत आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी.एस बोरकर यांनी कळविले आहे.                                                     

***

Monday 27 June 2022

DIO BULDANA NEWS 27.6.2022,1



पात्र मुलीचे खाते काढून डाक विभागाच्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्या

-          जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

  • सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बालिका सशक्तीकरण मोहिमेचे उद्घाटन

    बुलडाणा, दि. 27 (जिमाका): डाक विभाग हा गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेला आहे. या विभागाचा पोस्टमन सर्वांना परिचीत आहे. डाक विभागात आता केवळ डाकसंबंधीत कामकाज होत नाही, तर बँकिंग, विमाविषयक योजनाही राबविण्यात येतात. त्यामुळे 10 वर्षाच्या आतील मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते काढून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज केले.  ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बालिका सशक्तीकरण मोहिमेच्या उद्घाटनीय कार्यक्रमात बोलत होते. यावेळी डाक अधिक्षक राकेश एलोमल्ली उपस्थित होते.  

    दरम्यान जिल्हाधिकारी श्री. रामामूर्ती यांच्याहस्ते मुलींना प्रातिनिधीक स्वरूपात सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वितरीत करण्यात आले. त्यानंतर बुलडाणा डाक विभागाने तयार केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवरील जनजागृती पर लघु चित्रफीत दाखविण्यात आली. डाक अधिक्षक राकेश एल्लामेल्ली यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक डाक अधिक्षक गणेश अंभोरे यांनी केले.  या कार्यक्रमास सहाय्यक डाक अधिक्षक  नरेश शिंदे, उपविभागीय डाक निरीक्षक मेहकर निलेश वायाळ, पोस्टमास्तर रामप्रभू देशपांडे तसेच ग्रामीण डाक सेवक, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

अशी आहे सुकन्या समृद्धी योजना

    डाक विभागाने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने सुकन्या समृद्धी योजनेती अनजागृती करण्यासाठी बालिका सक्षमीकरण मोहिम 27 जून पासुन सुरु केली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश 10 वर्षाखालील प्रत्येक मुलीचे सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत खाते उघडून संपुर्ण जिल्हा ऑगस्ट 2022 पर्यंत 100 टक्के सुकन्या समृद्धी जिल्हा घोषित करणे असा आहे. सुकन्या खाते सर्व बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याज दर 7.6 टक्के देते. हे खाते किमान 250 रूपयाच्या ठेवीवर उघडले जाऊ शकते. या खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल रक्कम 1.5 लाख रूपये जमा केली जाऊ शकते.  जी कर सवलती साठी देखील पात्र ठरेल. या खात्याचा लॉक-इन कालावधी खाते काढलेल्या तारखेपासून 15 वर्षे व परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे. या खात्यातून 50 टक्के रक्कम ही मुलीच्या उच्च शिक्षणासाठी काढता येते. तसेच लग्नासाठी खाते बंद सुद्धा करता येते.

**********


राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा बडगा

* 10 गुन्हे नोंदवून आरोपींना अटक

* 9 लाख 16 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

पहिल्यांदाच ढाब्यांवर कारवाई

बुलडाणा, दि. 27 (जिमाका): राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री, निर्मिती व वाहतूक तसेच अवैध ढाबेविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. विभागीय उप-आयुक्त व्ही. पी चिंचाळकर व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात 24 व 25 जून रोजी धडक मोहिम राबविण्यात आली. या दोन्ही दिवशीच्या कारवाईत एकूण 10 वारस गुन्हे नोंदविण्यात आले असून 9 लक्ष 16 हजार 527 रूपये किंमतीचा दारू बंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

   धडक मोहिमेदरम्यान 24 जून रोजी भानखेड ता. चिखली येथील मेहकर फाट्यावर सापळा रचीत एक चार चाकी महिंद्रा बोलेरो पिकअप मद्यासह जप्त करण्यात आली. सदर कारवाईमध्ये देशी दारु 529.2 लिटर, विदेशी दारु 105.29 लिटर व एक चार चाकी वाहनासह 8 लक्ष 88 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या कारवाईत अक्षय पांडुरंग भोजने रा. तिंत्रव ता. शेगांव याला अटक करून  कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच 25 जून रोजी बुलडाणा शहरातील  भिलवाडा, कैकाडीपूरा व सुंदरखेड येथील कारवाईत अवैध हात भट्टी निर्मिती एकूण 6 गुन्हे नोंदविण्यात आली आहे. या ठिकाणी गावठी दारू 72 लीटर, सडवा 591 लीटर सह एकूण 19 हजार 64 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मलकापूर पांग्रा ता. सिं.राजा व लोणार येथील अवैध ढाबेवर तीन गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये लोणार शहरातील राजधानी ढाबा व हॉटेल सुजर, हॉटेल भारत यांचा समावेश आहे. यातील ढाबामालक बाबाराव बाजीराव बकाळ, पंढरी रामकिसन मुळे, शंकर मारोती बाजड, शिवानंद लक्ष्मण कायंदे यांच्यावर दारू पिण्याची सोय केल्याबद्दल दारू बंदी कायदा कलम 68 नुसार गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच या ढाब्यावर दारू पित असताना सुदाम देवराम खारोड, भास्कर रामकिसन तळेकर, आत्माराम अर्जुन गिरी, सुनील साहेबराव मापारी, कृष्णा मोतीराम मोरे, विजय सदाशिव गरूडकर यांच्यावर कलम 84 नुसार गुन्हा नोंदविण्यात आले.  या ग्राहकांची वैद्यकीय तपासणी केली असता दारू नशेत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत तीनही ढाब्यावरील देशी विदेशी दारूसह 28 हजार 817 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

   या मोहिमेत चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे, मलकापूर चे दुय्यम निरीक्षक पी. व्ही मुंगडे, बुलडाणा येथील ए. आर आडळकर, मेहकरचे एस. डी. चव्हाण, खामगांवचे एन. के मावळे,भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक आर.आर उरकुडे, दुय्यम निरीक्षक चिखली येथील हरी सोनवणे, मलकापूरचे पी. व्ही मुंगडे, सहायक दुय्यम निरीक्षक श्री. पहाडे, एन.ए देशमुख, जवान परमेश्वर चव्हाण, अमोल तिवाने, राजु कुसळकर, अमोल सोळंके, नितीन सोळंकी, प्रदीप देशमुख, अमोल अवचार, संजु जाधव, मोहन जाधव, शरद निकाळजे, विशाल पाटील, रामेश्वर सोभागे, गणेश मोरे, अमोल सुसरे, प्रफुल्ल साखरे, कु. सोनाली उबरहंडे यांनी सहभाग घेतला.   

   बनावट मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे जिवीतहानी  किंवा गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मद्यसेवन करणाऱ्या नागरिकांनी उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी व सेवन करावे. ढाबा, हॉटेल व रेस्टॉरंट किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी बसून दारू पिवू नये आढळल्यास संबंधितांविरूद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायदाचे 68 अंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सदर गुन्ह्यात 3 ते 5 वर्षाचा कारावास किंवा 25 ते 50 हजार रूपये पर्यंत दंडाची शिक्षा होणार आहे, असे  अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.

                                                                        ************

 

 

DIO BULDANA NEWS 27.6.2022


 आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठक

    बुलडाणा, दि. 27 (जिमाका): जिल्ह्यात काही भागात किंवा एखाद्या तालुक्यात आवडीने एखादा विशिष्ट खेळ खेळला जातो. अशा खेळांमध्ये जिल्ह्यातूनही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हायला पाहिजे. जेणेकरून जिल्ह्याचे नावलौकिक होई. त्यादृष्टीने नाविण्यपूर्ण योजनेतून दर्जेदार क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, कार्यकारी अभियंता रविकांत काळवाघे, शिक्षणाधिकारी श्री. मुकूंद आदी उपस्थित होते.

  क्रीडा संकुल समितीकडील क्लब हाऊसबाबत सुचना देताना पालकमंत्री म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेले भाड्यानुसार क्लब हाऊस भाड्याने चालविण्यास देण्यासाठी ई- निविदा सुचना प्रसिद्ध करावी. तालुका क्रीडा संकुल दे. राजा येथील कामे पूर्ण करण्यासाठी वाढीव निधीचा उपयोग करावा. याठिकाणी संरक्षक भिंत, 200 मीटर धावनपथाची दुरूस्ती व लेवलिंग करणे महत्वाची आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात यावी. तसेच ग्राम क्रीडा संकुल दे.मही व साखरखेर्डा येथील कामांकरीता निधी उपलब्ध करण्यासाठी आवश्यक ती कार्यवही करण्यात यावी.

  बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी माहिती दिली. तसेच यावेळी क्रीडा संकुल समितीकडील विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                        ************    

Sunday 26 June 2022

DIO BULDANA NEWS 26.6.2022

 




शाहू महाराज यांच्या विचारातच समाज कल्याण विभागाच्या योजनांचा पाया

  - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
* सामाजिक न्याय दिन कार्यक्रम उत्साहात
बुलडाणा, दि.२६  (जिमाका):  राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टीचे होते. त्यांनी त्या काळात शिष्यवृत्ती योजना केली.  तसेच मोठ्या शहरात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी निवासाची व जेवणाची व्यवस्था व्हावी, याकरिता वसतिगृह बांधले. त्यांच्या याच विचारांवर आधारित सामाजिक न्याय विभाग विविध योजना राबवित आहे. त्यामुळे निश्चितच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा पाया हा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांमध्येच आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. 
  डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एस रामामूर्ती उपस्थित होते. तसेच सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड, जि ल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. 
   पालकमंत्री पुढे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना व परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यान्वित आहे. या योजना सुध्दा राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा परिपाक आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा वैचारिक वारसा पुढे ठेवण्याची गरज आहे. 
   प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले. त्यांनतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनुसुचीत जाती मुलां/मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील या वर्षी इयत्ता १० वी मध्ये प्रथम आलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेतलेले, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार व गुणवत्ता शिष्यवृत्ती पात्र  असलेले,  राजर्षी शाहू महाराज जंयती निमित्त  महाविद्यालयामध्ये आयोजित निबंध, वक्तृत्व स्पर्धा मध्ये प्रथम आलेल्या विदयार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी एस रामा मूर्ती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सामाजिक पुरस्कार प्राप्त व्यक्ती पांडूरंग साबळे, माधव हुडेकर,डी. आर. इंगळे, ईश्वर मगर, पंढरीनाथ महाले, मधुकर पाटील, नारायण दाभाडे, भुजंगराव रिंढे, शालीग्राम सोनोने हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन सतिश बाहेकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होणेसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
                     समता दिंडीचे आयोजन 
 सामाजिक न्याय दिनानिमित्त जिल्हा परिषद येथून सकाळी ८.३० वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीला जिल्हाधिकारी एस  रामामुर्ती यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांची उपस्थिती होती.  समता दिंडीमध्ये समाज भुषण पुरस्कार प्राप्त शाहीर डी. आर. इंगळे  व त्यांचे कलापथक यांचे मार्फत राजर्षी शाहू महाराज यांचे जिवनावरील पोवाडे गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. समता दिंडीमध्ये बुलडाणा
शहरातील नर्सिंग कॉलेज, समाजकार्य महाविदयालय, शासकीय वसतिसगृह व शासकीय निवासी शाळामधील विदयार्थ्यांचा तसेच शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. सदर समता दिंडी जिल्हा परिषद बुलडाणा या ठिकाणाहून प्रारंभ होवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बुलडाणा या ठिकाणी  समाप्त झाली.
*****

नेहरू युवा केंद्रात राजर्षी शाहू महाराज जयंती
बुलडाणा , दि. २६ (जिमाका): भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र व्दारा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक  न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. यामध्ये नेहरू युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ.हरीश साखरे, नेहरू युवा केंद्राचे सहायक धनंजय चाफेकर, विलास सोनोने, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक  गणेश सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.
*****
जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
बुलडाणा , दि. २६ (जिमाका): राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला नायब तहसीलदार श्याम भांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी अधिकारी श्री. पद्मणे उपस्थित होते. 

Friday 24 June 2022

DIO BULDANA NEWS 24.6.2022,1

 डॉ झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करावे

· 30 ऑगस्ट 2022 अंतिम मुदत

बुलडाणा, दि. 24 (जिमाका) : डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने अंतर्गत राज्यातील धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत मदरशांना पायाभुत सुविधा, ग्रंथालय व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्यात येत आहे. सदर अनुदान जास्तीत जास्त 2 लक्ष रूपये इतक्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे. यापूर्वी ज्या प्रयोजनासाठी अनुदान देण्यात आले आहे. त्या प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान अनुज्ञेय असणार नाही.  तरी इच्छूक पात्र मदरशांनी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावे. सदर प्रस्ताव 30 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावे.

   मदरसा चालविणारी संस्था अथवा मदरसा, धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत, अशा मदरसांना सदर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ज्या मदरसांना स्कीम फॉर प्रोव्हाईडींग क्वालीटी एज्युकेशन इन मदरसा या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत लाभ मिळाला आहे, अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. शासन निर्णय तरतुदीनुसार जास्तीत जास्त 3 डीएड / बीएड शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, ऊर्दू यापैकी एका माध्यमाची निवड करून त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे अनिवार्य राहील. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

   प्रस्ताव 11.10.2013 च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सादर करावे. तरी जिल्ह्यातील इच्छूक मदरसांनी दिनांक 11.10.2013 च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले प्रस्ताव कागदपत्रांच्या पुर्ततेसह अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 30 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावे व या योजनेचा लाभ घ्यावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही, असे  जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                                    *********

 

अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सुविधांसाठी मिळणार अनुदान

  • इच्छुक शाळांनी 31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

बुलडाणा, दि. 24 (जिमाका ):  अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी 2022-2023 या वर्षाकरीता वार्षिक कमाल 2 लक्ष रूपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेकरीता इच्छुक शाळांनी 31 जुलै 2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावेत.

  या योजनेत अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांच्या इमारतींचे नुतनीकरण व डागडुजी, संगणक कक्ष उभारणे/अद्यावत करणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर, इंग्रजी लँग्वेज लॅब, पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था करणे, प्रयोगशाळा उभारणे/अद्यावत करणे, प्रसाधनगृह/स्वच्छतागृह उभारणे/डागडुजी करणे, झेरॉक्स मशीन/एल.सी.डी.प्रोजेक्टर, संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअर, ग्रंथालय अद्यावत करणे या सुविधांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

    या योजनेतंर्गत राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग या शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक समाजाचे शाळेत किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासनमान्य अपंग शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.

   ही अनुदान योजना 7 ऑक्टोबर 2015 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार राबविण्यात येणार आहे. या योजनेचा शासननिर्णय व अर्जाचा नमूना maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूक शाळांनी 31 जुलै  पर्यंत या योजनेसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये  केले आहे.

000

सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बेटी बचाओ-बेटी पढाओ सक्षमीकरण सप्ताह

  • 27 ते 29 जून दरम्यान आयोजन

बुलडाणा, दि. 24 (जिमाका ):  बुलडाणा डाक विभाग मार्फत 27 जून ते 29 जून 2022 या कालावधीत मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बेटी बचाओ-बेटी पढाओ सक्षमीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत 10 वर्षाखालील सर्व मुली भारत सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत खाते काढण्यासाठी पात्र आहेत.  या योजनेनुसार कमीत कमी 250 रूपये भरून आपण खाते उघडू शकता, 10 वर्षाखालील सर्व मुलींचे आई / वडील, पालक हे खाते उघडू शकतात. एका कुटूंबात केवळ 2 मुलींच्या नावे हे खाते उघडल्या जाते.

  एका वर्षात कमीत कमी 250 रूपये व जास्तीत जास्त 1 लक्ष 50 हजार रूपये या मध्ये जमा केल्या जावू शकतात. आयकर मध्ये 80 सी अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर सूट मिळते. योजनेची वयाची परिपक्वता 21 वर्ष आहे. मुलीच्या वयाच्या 18 वर्षानंतर शिक्षण किंवा लग्नाकरीता 50 टक्के रक्कम काढता येते. या खात्याला डाक विभागामार्फत सर्वाधिक 7.6 टक्के व्याज दर देण्यात येतो. तरी सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ देण्यासाठी जवळच्या डाक कार्यालयात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडावे, असे आवाहन डाक अधिक्षक राकेश येल्लोमेल्ली यांनी केले आहे.

                                                            *********

अनुसूचित जाती मुला-मुलींच्या शासकीय निवासी

शाळांचा इयत्ता 10 वीचा निकाल 100 टक्के

बुलडाणा, दि. 24 (जिमाका ):  जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागातंर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला-मुलींच्या 5 शाळांचा इयत्ता 10 वीचा निकाल 100 टक्के लागला आहे. या शाळांमध्ये अनु. जाती मुलांची शाळा कोलवड ता. बुलडाणा, अनु. जाती मुलांची शाळा वळती ता. चिखली, अनु. जाती मुलांची शाळा लोणार, अनु. जाती मुलींची शाळा घाटपुरी ता. खामगांव व अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगांव यांचा समावेश आहे. या पाचही शाळांमध्ये इयत्ता 10 वीला 166 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व 166 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या निकालाची टक्केवारी 100 टक्के आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                                                    **********

 

DIO BULDANA NEWS 24.6.2022

 



पीक कर्ज वितरणाची गती वाढवून उद्दिष्ट पूर्ण करा

-          दिनेश गिते

  • जिल्हास्तरीय बँकर्स समिती बैठक

    बुलडाणा, दि. 24 (जिमाका): सध्या पावसाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, तर उर्वरित पेरण्यांनी वेग घेतला आहे. अशा परिस्थितीत पीक कर्ज वितरण शेतकऱ्यांना तातडीने झाले पाहिजे. खरीप हंगामात पीक कर्ज वितरणाची गती वाढवून बँकांनी उद्दिष्ट पूर्ण करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी  आज दिल्या.

   जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेंद्र हेडाऊ, रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी राजकुमार जैस्वाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील, नाबार्डचे विक्रम पठारे, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे डॉ. अशोक खरात आदी उपस्थित होते.

  बँकांनी सेवा क्षेत्राबाबत स्पष्टता ठेवण्याचे सांगत श्री. गिते म्हणाले, कर्ज प्रकरणे मंजूर करताना बँकेचे सेवा क्षेत्र नसल्याचे कारण देत प्रकरणे नाकारण्यात येतात. याबाबत बँकांनी आलेल्या अर्जदाराचे समाधान केले पाहिजे. नाकारलेल्या अर्जांवर स्पष्ट कारण दिले पाहिजे. काही त्रुटी असल्यास त्या दूर करून अर्ज स्वीकृत केला पाहिजे. पीक कर्ज वितरणामध्ये आयडीबीआय बँकेचे कर्ज वितरण सर्वात जास्त आहे. त्यांनी काय पद्धत वापरली, हे तपासून तीच पद्धत वितरणात कमी असलेल्या बँकांनी वापरलेली पाहिजे.  

  जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ यांनी यावेळी बँकांच्या पीक कर्ज वितरण, शासन पुरस्कृत योजनांच्या कर्ज वितरणाची माहिती दिली.

   जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. पाटील म्हणाले, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येतो. बँकांनी मागील वर्षी सहकार्य केल्यामुळे जिल्ह्यात पीएमईजीपी योजनेत 166 टक्के काम झाले. शासनाने अनुसूचित जाती, जमाती व महिलांसाठी विशेष योजना सुरू केल्या आहेत. महिला उद्योजकांसाठी एमआयडीसीमध्ये राखीव भूखंड असून त्यांना खरेदीसाठी अनुदान दिल्या जाते. तसेच महिला उद्योजकांच्या मालाला प्रदर्शनात ठेवण्यासाठी येण्या व जाण्याचा खर्च शासन करते. उत्कृष्ट माल असल्यास जागतिक स्तरावरील प्रदर्शनासाठीसुद्धा शासन या योजनेनुसार सहकार्य करते. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामुहिक प्रोत्साहन योजना राबविण्यात येते. या योजनेनुसार लाभार्थ्याने यापूर्वी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला असला तरी योजनेचा लाभ देण्यात येतो. वीज दरात सवलत देण्यात येते. जीएसटी कराच्या रकमेची 10 वर्षापर्यंत परतफेड दिल्या जाते. तरी बँकांनी या योजनांच्या प्रस्तावांना मंजूरी द्यावी.

  प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेतंर्गत आता 20 हजार रूपयांचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी बँक व स्वनिधी पोर्टलवर अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच केवायसी बँकांनी करून देणे गरजेचे आहे. अशी माहिती बैठकीत देण्यात आली. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत सादर प्रकरणांनासुद्धा मंजूरी द्यावी. ही योजना जिल्ह्यात रोजगार निर्मिती व जिल्ह्याचा विकासासाठी आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक यांनी  दिली.  बैठकीला बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

                                                                        ********

सामाजिक न्याय दिनाचा मुख्य कार्यक्रम 26 जुन रोजी

  •  समता दिंडीचेही आयोजन

  बुलडाणा, दि. 24 (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करावयाचा आहे. त्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली 26 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.   या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी खासदार व सर्व आमदार उपस्थित राहणार आहे. तसेच जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, प्रादेशित उपायुक्त सुनील वारे, उपायुक्त विजय साळवे उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी सत्कार व विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

   त्याअनुषंगाने 26 जुन रोजी सकाळी 8.30 वाजता विद्यार्थी व कर्मचारी यांच्या समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी जिल्हा परिषद कार्यालय, बाजारपेठ लाईन, कारंजा चौक, त्रिशरण चौक ते सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अशी निघणार आहे.  तरी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राठोड यांनी केले आहे.

                                                            ******