Monday 24 February 2020

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणास प्रारंभ



महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणास प्रारंभ
·         सुनगांव व साखळी येथे प्रात्याक्षिकाद्वारे सुरूवात
            बुलडाणा, दि. 24 :  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास बुलडाणा तालुक्यातील साखळी बु व जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथून आधार प्रमाणीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सुनगांव येथे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या हस्ते, तर साखळी बु. येथे जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्याहस्ते  करण्यात आला.
            जिल्ह्यातील 1 लक्ष 95 हजार 56 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुनगांव व साखळी येथील अनुक्रमे 364 व 192 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाली. ही यादी संबंधित बँक व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दोन्ही गावातील एकूण 404 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरळीतपणे सुरु आहे.  शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या दृष्टीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना सुरु करण्यात आली.
       या योजनेनुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठित कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम दोन लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे ही कर्जमुक्ती देताना शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नाही याचाच अर्थ अल्पभूधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहेच शिवाय जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
            साखळी बु व सुनगांव येथील 556 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण सुरळितपणे सुरु आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची त्रुटी पूर्तता केली जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक श्री चव्हाण यांनी दिली. कर्जमुक्ती योजनेबद्दल प्रतिक्रीया देताना साखळी बु. येथील शेतकरी लक्ष्मण लहासे म्हणाले, ही कर्जमाफी काही कागदपत्रे न भरता प्रत्येक शेतकऱ्याला दिली. याबद्दल मी या सरकारचा फार फार ऋणी आहे.तसेच सुनगांव येथील शेतकरी अनिल भगत प्रतिक्रिया देताना माझे कर्ज 2016 मधील होते. आधी माफ झाले नव्हते. मात्र आता काही अडचण न येता मी यादीमध्ये नाव बघितले . या शिबीरात आल्यानंतर येथे उपस्थित कर्मचाऱ्यांना माझे आधार कार्ड दिले त्यांनी ते तपासले. अशाप्रकारे माझे कर्ज माफ झाले त्याबद्दल धन्यवाद.                      
*******

Tuesday 18 February 2020

अत्याचारग्रस्त महिला व मुलांना मनोधैर्यचा ‘आधार’


·        जिल्ह्यात 68 प्रकरणांचा निपटारा, 98 लाख 30 हजार रूपयांचे अनुदान वितरीत
·        पिडीतांनी योजनेचा लाभ घेण्याचे न्यायाधीश साजिद आरिफ सैय्यद यांचे आवाहन
बुलडाणा, दि. 18 : गुन्हेगारांना गंभीर शिक्षा देणे आवश्यक असतानाच या गुन्ह्यातील पिडीत महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास परत मिळवून देणे हे तितकेच आवश्यक आहे. अशा महिला व बालकांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे, वित्तीय सहाय्य देणे, तसेच समुपदेशन, निवारा, वैद्यकिय व कायदेशीर मदत इत्यादी आधारसेवा तत्परतेने उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. यासाठी मनोधैर्य योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात सन 2018 पासून 68 प्रकरणांमध्ये पिडीतांना सुमारे 98 लाख 30 हजाराचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. पिडीतांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव साजिद आरिफ सैय्यद यांनी केले आहे.
   जिल्ह्यात एकूण 92 प्रकरणे दाखल झालेली आहेत. त्यापैकी 68 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये पॉस्को कायद्यान्वये 50 आणि बलात्कार गुन्ह्यातील 18 प्रकरणांचा समावेश आहे.  या योजनेमुळे सर्व पिडीता सबळ होत आहे. सर्व पिडीतांना या योजनेचा लाभ घेता येतो, मात्र कलम 134 फौजदारी प्रक्रिये संहितेप्रमाणे न्यायदंडाधिकारी समक्ष नोंदविलेल्या जबाबाप्रमाणे न्यायालयात साक्ष द्यावी लागते. जर पिडीतेने आपली साक्ष न्यायालयात फिरविली आणि ती फितुर झाली, तर तिच्याकडून महसूल कायद्यातंर्गत मिळालेले अर्थसहाय्य व्याजासह वसूल करण्यात येते.
    बलात्कार/बालकांवरील लैंगिक अत्याचार/ॲसिड हल्ला यामध्ये पिडीत महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य ही योजना राज्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.  शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्याऐवजी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत पिडीतांना अर्थसहाय्य मंजूर केले जाणार आहे. या शासन निर्णयानुसार बलात्कार/ बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ल्यामधील पिडीतांना कमाल 10 लाखांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. केंद्र शासनाने निर्भया योजना सर्व देशात लागू केली आणि त्याबरोबर पिडीतांना नुकसान भरपाई चा कायदा सुद्धा लागू केला. सन 2018 पासून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा येथे सचिव्‍ म्हणून रूजु झाल्यानंतर न्यायाधीश साजिद आरिफ सैय्यद यांनी मनोर्धैय योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता गावागावात जनजागृतीचे कार्यक्रम घेतले आहे.
     बलात्कार घटनेचा परिणाम स्वरूप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिमंदत्व, अपंगत्व आले तसेच सामुहिक बलात्कार अशाप्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाली असेल तर 10 लाख रूपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते. बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास, मयत महिला कुटुंबातील कमावती महिला असेल तर 10 लाख रूपये अर्थसहाय्य देण्यात येते. बलात्काराच्या गुन्ह्यातील अन्‍ घटनांमधील पिडीत महिला असेल, तर 3 लाख रूपयापर्यंत अर्थसहा्य देण्यात येते.
     पॉस्कोअंतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचार घटनेमध्ये पीडित बालकास अल्पवयीन मुलीस कायमस्वरूपी मतिमंदत्व /अपंगत्व आल्यास 10 लाख रूपयापर्यंत अर्थसहाय्य, घटनेच्या परिणामस्वरूप बालकास/अल्पवयीन मुलीस गंभीर स्वरूपाची शारीरिक इजा झाली असेल तर 10 लाख रूपयापर्यंत अर्थसहाय्य, घटनेमध्ये पीडित महिला/बालकाचा चेहरा विद्रुप झाल्यास, शरीराच्या दृष्य भागाची हानी झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रूपयापर्यंतचे अर्थसहाय्य, ॲसिड हल्ल्यात जखमी झाल्यास तीन लाखापर्यंत अर्थसहाय्य, ॲसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप झाल्यास करावयाची प्लास्टिक सर्जरी शासनाने निश्चित केलेल्या रूग्णालयात करण्यात यावी व त्यासाठी येणारा पूर्व खर्च मंजूर करण्याचे आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण देते.
                                                                                    असा मिळतो योजनेचा लाभ
अशा घटनेची एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर ताबडतोब तीची प्रत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला पाठविली जाते. पिडीतेचे कलम 134 फौजदारी प्रक्रियेसंहितेनुसार बयान व वैद्यकीय प्रमाणपत्रसुद्धा प्राधिकरणाकडे पाठविले जाते. त्यानंतर प्राधिकरण सदर प्रकरण समिती समक्ष ठेवते. या समितीचे अध्यक्ष हे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत, तर  सदस्य जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व एक समाजसेविका असते.समिती समक्ष पिडीतेचा अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पिडीतेला जर वैद्यकीय सेवेसाठी खर्चाची आवश्यकता असल्यास तीला 30 हजार रूपये खर्च समिती 7 दिवसांच्या आत अंतरिम नुकसान भरपाई म्हणून मंजूर करते. एकूण मंजूर झालेल्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम पिडीतेला तात्काळ धनादेशाने 120 दिवसांच्या आत आणि  उर्वरित 75 टक्के रक्कम तिच्या किंवा आई वडीलांच्या एकत्रित खात्यात 10 वर्षांसाठी मुदती ठेव म्हणून ठेवण्यात येते, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
                                                                                    *****
  

पुढील वर्षीच्या हंगामासाठी स्थानिक पातळीवर सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता करावी
·        बियाणे उगवणक्षम राहण्यासाठी काळजी घ्यावी
·        कृषि विभागाचे आवाहन
   बुलडाणा, दि. 18 : सोयाबीन पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 14.51 लाख हेक्टर असून या पिका खालील पेरणी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाढाणाऱ्या क्षेत्रासाठी जास्तीच्या बियाण्याची गरज भासणार आहे. राज्यामध्ये सन 2019 मध्ये उशिरा पाऊस व सोयाबीन पिकाच्या काढण्याच्या कालावधीतील अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे व तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी मागील दोन हंगामामध्ये प्रमाणित बियाण्याची पेरणी करुन उत्पादीत केलेले बियाणे हे पुढील खरीप 2020 साठी व्यवस्थितपणे राखून ठेवणेसाठी करुन ठेवणे गरजेणे आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो.
   प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची चाळणी करुन निवड करावी, सोयाबीन बियाण्याची बाह्यवरण कवच नाजूक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपुर्वक करावी. साठवण करण्यापुर्वी बियाणे हे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ताडपत्री, सिंमेंटच्या खळयावर पातळ पसरुन चांगले वाळवावे व बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण 9 ते 12 टक्क्यापर्यं आणावे. सोयाबीन बियाणे साठवणूक करण्यासाठी बियाण्याची घरगुती पद्धतीने  उगवणशक्ती तपासावी आणि किमान 70 टक्के उगवणीशक्ती असलेले बियाणे योग्य पध्दतीने साठवणूक करावे. वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे, काडीकचरा, माती खडे इत्यादी काढून ते स्वच्छ करावे. स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या, नविन पोत्यात साठवून ठेवावे, सोयाबीन बियाणे  हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते त्यामुळे साठवणीचे ठिकाण थंड ओलविरहीत व हवेशीर असले पाहीजे.
 साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करु नये, बियाणे साठवतांना त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त असणार नाही, याची काळजी घ्यावी. बियाणे 100 किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करतांना 4 पोत्यांपेक्षा जास्त व 40 किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास 8 पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवण शक्ती कमी होते. पोत्यांची थप्पी जमिनीपासून 10 ते 15 सेंटीमिटर उंचीवर लाकडी फळ्यावर लावावी. पोत्याची रचना उभ्या आडव्या पध्दतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्यांची गुणवत्ता व उगवण शक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते.
    आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये किटकनाशक व बुरशीनाशकचा वापर करावा. तसेच उंदरांचा उपद्रव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. सोयाबीनच्या पोत्यांची हाताळणी व वाहतुक काळजीपुर्वक करावी. पोती उंचावरुन आदळली जाणार नाही याची काळजी घ्यावी. खरीप हंगाम 2020 मध्ये सोयाबीन उपलब्धतेची व्याप्ती वाढवावी व सोयाबीन बियाण्यांचा तुडवडा निर्माण होऊ नये. यासाठी शेतकरी बांधवांनी उपरोक्तप्रमाणे काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, सुभाष नागरे  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0000000
                            भारतीय डाक विभागाकडून पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
·        इच्छूकांनी जवळच्या पोस्ट ऑफीसमध्ये संपर्क साधावा
   बुलडाणा, दि. 18 : भारतीय डाक विभागाने 15 वर्षापर्यंतच्या युवांसाठी ‘write a message to an adult about the world we live in (व्राईट अ मेसेज टु ॲन अडल्ट अबाऊट द वर्ल्ड वी लीव्ह ईन)’ या विषयावर 2020 आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा 1 मार्च 2020 रोजी आयोजित होणार आहे. या स्पर्धेसाठी इच्छूक मुला – मुलींनी इंग्रजी, हिंदी किंवा मराठी यापैकी कुठल्याही एका भाषेत पत्रलेखन लिहायचे आहे.
  सदर स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक 5 हजार रूपये, द्वितीय 3 हजार रूपये आणि तृतीय पारितोषिक 2 हजार रूपये तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक 1 हजार रूपये आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त युवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन डाक अधिक्षक, बुलडाणा विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        ******

Monday 17 February 2020

शिवभोजन थाळीची ‘लज्जत’ वाढता वाढे..!




  • शिवभोजन थाळीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
बुलडाणा, दि. 17 : राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेच्या ल्ज्जतदार थाळीमुळे जिल्ह्यात नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीची लज्जत वाढतच आहे. शिवभोजन केंद्रांवर दुपारी 12 ते 2 या वेळेत नागरिक थाळीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसतआहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या शहरात सर्वप्रथम शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार बुलडाणा शहरातही तीन ठिकाणी शिवभोजन योजना सुरू आहे. यामध्ये बसस्थानक, जिजामाता प्रेक्षागार परीसर व कृषि उत्पन्न बाजार समिती या ठिकाणांचा समावेश आहे.
    शिव भोजन थाळी योजनेला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. शिवभोजनाचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नागरिकांनी योजनेच्या केंद्रांवर तोबा गर्दी केली होती.  बस स्थानकांवरील केंद्रात 150 थाळी आहे. तसेच बुलडाणा शहरात तीन केंद्र मिळून 400 थाळी सुरू आहेत. बस स्थानकांवर नेहमीच नागरिकांची वर्दळ असल्यामुळे या केंद्रातील थाळी अवघ्या 1 तासातच संपून जात असल्याचे कृष्णा उपहार गृह, एस टी कँटीन केंद्राचे संचालक भारत शेळके यांनी सांगितले.   गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त 10 रुपये इतक्या कमी दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ही शिवभोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे.
    शासनातर्फे सुरु करण्यात शिव भोजन थाळी योजनेत प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात व 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट आहे. ही शिवभोजनाची थाळी 10 रुपयात देण्यात येते. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत आहेत. ‘शिवभोजन’ थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येवून त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येते. शहरी भागासाठी प्रतिथाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी 25 रुपये अनुदान आहे.
   योजनेच्या पारदर्शीपणासाठी एक ॲप्स विकसित करण्यात आले आहे. या ॲप्समध्ये दररोजची ग्राहकांची माहिती भरण्यात येते. त्यानुसार राज्यातील सर्व शिव भोजन थाळी येाजनेतील भोजनालयांमध्ये या ॲप्सच्या माध्यमातून थाळी विक्रींची संख्याही पाहता येते.  योजनेमुळे गरीब, कामासाठी बाहेरगावावरून आलेले नागरिक, विविध रूग्णालयांमध्ये आलेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी भोजनाची उत्तम व्यवस्था झाली आहे. शिवभोजन थाळीबाबत बस स्थानकांवरील भोजनालयात जेवन केलेले संजय तुकाराम सवडतकर म्हणतात, जेवनाचा दर्जा एकदम चांगला आहे. हे जेवन करून पोटाला आधार, तर होतोच, त्याच सोबत आमच्या सारख्या गरीब लोकांची मदत होते. ही योजना चांगली असून अशीच सुरू रहावी. तसेच प्रल्हाद नामदेवराव लोखंडे, कोलवड योजनेविषयी बोलताना म्हणाले, या जेवनात भात, पोळी, वरण, भाजी असे घरच्यासारखे जेवन आहे. गरीब जनतेला या जेवनामुळे खुप मदत होत असून हा उपक्रम राबविण्यासाठी शासनाने आभार.
                                                            ******
  जिल्ह्यात स्थानिक तीन सुट्ट्या जाहीर
बुलडाणा, दि. 17 : राजनैतिक सेवा विभाग, क्रमांक पी – 13, 2- बी या 16 जानेवारी 1958 व 6 ऑगस्ट 1958 च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात स्थानिक तीन सुट्टया जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये सोमवार, दि. 3 ऑगस्ट 2020 रोजी रक्षाबंधन, बुधवार दि. 26 ऑगस्ट 2020 रोजी ज्येष्ठ गौरी पुजन आणि गुरूवार दि. 17 सप्टेंबर 2020 रोजी सर्वपित्री अमावस्या या स्थानिक सुट्टयांचा समावेश आहे. सदर सुट्टया सन 2020 वर्षासाठी संपूर्ण बुलडाणा जिल्हा क्षेत्रासाठी लागू राहणार आहेत. हा सुट्टी आदेश जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.             

Friday 14 February 2020

DIO BULDANA NEWS 14.2.2020

परीक्षा : 18 फेब्रुवारीपासून इयत्ता 12 वीची ; 3 मार्चपासून दहावीची
·        कॉपीमुक्त अभियान राबविणार, 10 भरारी पथके
·        इयत्ता 12 वी परीक्षेला 32 हजार 284 परीक्षार्थी
·        इयत्ता 10 वी ला 43 हजार 806 परीक्षार्थी
·        परीक्षा केंद्र आवारात कलम 144 लागू राहणार
बुलडाणा, दि. 14 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12 वीची परीक्षा मंगळवार दि. 18 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होत आहे. ही परीक्षा 18 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे. माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी च्या परीक्षेला 3 मार्च 2020 पासून  प्रारंभ होणार आहे. परीक्षेमध्ये होणारे कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभाग यावर्षीसुद्धा कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविणार आहे. याबाबत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व केंद्रचालकांची सभा घेण्यात आली असून शाळा-शाळांमधून पालक सभा घेवून जनजागृती करण्यात आली आहे. याबबत 11 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या जिल्हा दक्षता समितीची सभेत कॉपीमुक्त वातावरण परीक्षा पार पाडण्यासाठी  उपाययोजना करण्यात आल्या.
   इयत्ता 12 वी परीक्षेसाठी जिल्ह्यात 32 हजार 284 परीक्षार्थी आहेत. त्यामध्ये 30 हजार 986 नवीन परीक्षार्थी व 1298 पुर्नपरीक्षार्थी यांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी 109 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून उपद्रवी केंद्र एस.ई.एस कनिष्ठ महाविद्यालय, साखरखेर्डा ता. सिं.राजा आहे. इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 43 हजार 806 परीक्षार्थी असणार आहेत. त्यामध्ये नवीन परीक्षार्थी 40 हजार 336 व पुर्नपरीक्षार्थी 3470 यांचा समावेश आहे. या परीक्षेकरीता 159 परीक्षा केंद्र असणार ओहत. जनता हायस्कूल, कोथळी, ता. मोताळा हे परीक्षा केंद्र उपद्रवी केंद्र आहे.  
   या परीक्षांसाठी 16 परीरक्षक केंद्र आहेत. त्यामध्ये बुलडाणा, चिखली, अमडापूर, दे.राजा, साखरखेर्डा, मेहकर, लोणार, खामगांव येथे दोन, नांदुरा, मोताळा, मलकापूर, जळगांव जामोद, शेगांव, संग्रामपूर, धाड यांचा समावेश आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी 10 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. भरारी पथकामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), विशेष महिला भरारी पथक, प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचा समोवश असलेले विशेष भरारी पथक, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल विभाग), तहसिलदार व गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.
    परीक्षा केंद्र आवारात कलम 144 लागू करण्यात येणार असून परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राचे 100 मीटर परीसरात पालक व अनधिकृत व्यक्तींना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीस ॲक्ट युनीव्हरसिटी बोर्ड ॲण्ड ऑदर एक्झामिनेशन ॲक्ट 1982 चे कलम 8 आणि भादविचे कलम 34 (188) आणि 217 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येतील. तसेच उपद्रवी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.  प्रत्येक केंद्रावर नेमूण दिलेल्या पेपरचे दिवशी बैठे पथक स्थापित करून दररोज परीक्षेचा अहवाल जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहे. या परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असा निर्णयही दक्षता समितीने घेतला आहे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    ****

माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांची सवलत
  • एकविध क्रीडा संघटनेमार्फत अहवाल 10 मार्चपर्यंत सादर करण्याचे आवाहन
 बुलडाणा, दि. 14 :  राज्याचे क्रीडा धोरण 2012 नुसार माध्यमिक शालेय प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (12 वी) च्या परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याचे कार्यपध्दतीबाबत सुधारीत शासन निर्णयामधील परिशिष्ठ 4 व 5 अन्वये एकविध खेळाच्या जिल्हा व राज्यसंघटनांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांना स्पर्धा विषयक अहवाल दि. 10 मार्च 2020 पर्यंत सादर करावे.
     धर्मदाय आयुक्त यांच्याकडे संस्था नोंदणी अधिनियम 1860 किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये नोंदणी प्रमाणपत्र, जिल्हा क्रीडा संघटना राज्य क्रीडा संघटनेस संलग्न असले बाबतचे पत्र, जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेचा संपुर्ण अहवाल, सहभागी संघाची यादी, सहभागी खेळाडूंची यादी.  (शासन निर्णयामधील परिशिष्ठ 10 नुसार), स्पर्धेची भाग्यपत्रीका, स्पर्धेचे अंतीम निकाल, स्पर्धा आयोजनाचे परिपत्रक, राज्य संघटनेचे अध्यक्ष / सचिव यांची सही व शिक्क्यासह नमुना स्वाक्षरी असलेले पत्र आदी प्रमाणे सर्व कागदपत्र एकविध क्रीडा संघटनांनी वेळेत सादर न केल्यास संबंधीत खेळाडूंचे प्रस्ताव गुणांकनास अपात्र राहतील व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत क्रीडा संघटनेची राहील. 
    गुण सवलतीकरीता आर्चरी, ॲथलेटीक्स, बॅडमिंटन, वेटलिफ्टींग, बास्केटबॉल, बॉक्सींग, सायकलींग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टीक्स, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, व्हॉलीबॉल, लॉनटेनिस, रायफल शुटींग, टेबल टेनिस, तायक्वांदो, जलतरण, कुस्ती, कबड्डी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, नेटबॉल, कराटे, स्क्वॅश, वुशू, नेहरु हॉकी, फुटबॉल, रग्बी, सेपक टकरा, मॉडर्न पेन्टॅथलॉन, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, खो-खो, बॉल बॅडमिंटन, कॅरम, बुध्दीबळ, क्रीकेट, थ्रोबॉल, रोलर स्केटींग/हॉकी, योगासन, किक बॉक्सींग, सिकई, रोलबॉल, डॉजबॉल, शुटींगबॉल, टेनिक्वाईट, आट्यापाट्या या खेळाच्या जिल्हा राज्य संघटनांनी अहवाल सादर करावे, असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *******
खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलतीसाठी  शाळांनी प्रस्ताव सादर करावे
·        31 मार्च 2020 पर्यंत मुदत
बुलडाणा, दि. 14 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग अथवा राज्य स्तरावरील तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या, सहभागी झालेल्या खेळाडु विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात सुधारीत शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे.  त्यानुसार शालेय स्पर्धेतील खेळाडूंकरीता विहित नमुना अर्ज, आडवा चार्ट परिशिष्ट-ई, प्रत्येक खेळाडूंचे स्वतंत्र हॉल तिकीट, खेळाचे प्रमाणपत्र तसेच एकविध क्रीडा संघटनामार्फत खेळाडू असल्यास विहीत नमुना अर्ज, आडवा चार्ट परिशिष्ठ ई, प्रत्येक खेळाडूंचे स्वतंत्र हॉल तिकीट, मान्यता प्राप्त खेळाचे प्रमाणपत्र, शासन निर्णय दि. 20 डिसेंबर 2018 अन्वये परिशिष्ठ क्र.10 अन्वये वैयक्तीक व सांघिक खेळाडूंची माहिती जिल्हा अथवा राज्य संघटनेमार्फत सादर करणे आवश्यक आहे.  संबंधित शाळा/ कनिष्ठ महा विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांनी खेळाडूंचे परिपुर्ण प्रस्ताव विहीत नमुण्यात 31 मार्च 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. 
     गुण सवलतीकरीता आर्चरी, ॲथलेटीक्स, बॅडमिंटन, वेटलिफ्टींग, बास्केटबॉल, बॉक्सींग, सायकलींग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टीक्स, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, व्हॉलीबॉल, लॉनटेनिस, रायफल शुटींग, टेबल टेनिस, तायक्वांदो, जलतरण, कुस्ती, कबड्डी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, नेटबॉल, कराटे, स्क्वॅश, वुशू, नेहरु हॉकी, फुटबॉल, रग्बी, सेपक टकरा, मॉडर्न पेन्टॅथलॉन, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, खो-खो, बॉल बॅडमिंटन, कॅरम, बुध्दीबळ, क्रीकेट, थ्रोबॉल, रोलर स्केटींग/हॉकी, योगासन, किक बॉक्सींग, सिकई, रोलबॉल, डॉजबॉल, शुटींगबॉल, टेनिक्वाईट, आट्यापाट्या या खेळांचा समावेश राहील.
            त्याअनुषंगाने सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात खेळाडूंनी क्रीडा सवलतीचे वाढीव गुण सवलत मिळण्याकरीता ऑनलाईन प्रस्ताव तयार करुन, त्या प्रस्तावाची हार्ड कॉपी दोन प्रतीत प्राचार्य/मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीसह तसेच प्रमाणपत्र साक्षांकीत करुन शारीरिक शिक्षक यांचे मार्फतच 31 मार्च 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    ******
बाल न्याय मंडळाच्या बैठकीचे आज लोणार येथे आयोजन
  बुलडाणा, दि. 14 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 रोजी आशा बालकाश्रम, हिरडव रोड, लोणार येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे
                                                                                    *****
महिला लोकशाही दिनाचे 17 फेब्रुवारी रोजी आयोजन
बुलडाणा, दि.14 : महिलांना त्यांच्या तक्रारी दाखल करता याव्या म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी करण्यात येत असते. त्यानुसार सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
        ज्या महिलांना लोकशाही दिनात तक्रारी दाखल करावयाच्या आहेत त्यांनी बचत भवन येथे तक्रारी दाखल कराव्यात. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरुपाची तक्रार निवेदन अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे. ज्या महिलांचे तालुकास्तरावर लोकशाही दिनात तक्रारीचे निरसन झाले नाहीत, त्याच तक्रारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी सादर कराव्यात. तक्रार सादर करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात सादर केलेला अर्ज व टोकन क्रमांकही दाखल करावा, असे प्रसिद्धी पत्रकान्वये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी  कळविले  आहे.
                                                            *****
श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त शेगांव येथे आज मद्यविक्री बंदी
बुलडाणा, दि.14 : शेगांव शहर व शहराच्या सभोववतालच्या 5 कि.मी परीसरातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवाना कक्ष व बिअरबार श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त शनिवार, दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी बंद राहणार आहेत. मुंबई दारूबंदी कायदा, 1949 चे कलम 142 अन्वये कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधीत रहावी म्हणून हा आदेश लागू करण्यात आला आहे. तरी शेगांव परीसरातील मद्य विक्री बंद ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा उत्पादन शुल्क विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.
                                                                        *****
 ‘नोव्हेल करोना’ विषाणूचा कुक्कुट पक्षी व उत्पादनांशी काहीही संबंध नाही
  • अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पशुसंवर्धन उपायुक्त यांचे आवाहन
बुलडाणा, दि.14 : मागील काही दिवसात चिन देशात आलेल्या नोव्हेल करोना विषाणूचा प्रादुर्भावाने हजारो नागरिक मरण पावले आहेत. या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सामाजिक माध्यमांद्वारे समाजात कुक्कुट मांस व इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात आहे. तरी या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. नोव्हेल करोना या विषाणूचा कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांच्याशी कुठलाही संबंध नाही. याचा मानवीय आहारामध्ये उपयोग पुर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे.
   कुक्कुट मांस व उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये नोव्हेल करोना विषाणू संक्रमीत झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटन उकळून, शिजवून सेवन केले जात असल्यामुळे त्या तापमानात कुठल्याही प्रकारचे विषाणू जिवंत राहत नाही. तरी ग्राहकांनी सोशल मिडीयावर विपर्यास केलेल्या बातम्या, माहिती व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी.जी बोरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****
गांव आपत्ती व्यवस्थापन आराखडा प्रशिक्षण उत्साहात
  • यशदाकडून देण्यात आले प्रशिक्षण
बुलडाणा, दि.14 : यशवंतरावज चव्हाण विकास प्रशासन प्रबोधीनी (यशदा) पुणे येथील आपत्ती व्यवस्थापन केंद्र व जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने गांव आपत्ती व्यवस्थापन आराखडा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाभर नुकताच राबविण्यात आला. या कार्यक्रमातंर्गत मलकापूर, खामगांव, सिंदखेड राजा, जळगांव जामोद, मेहकर, बुलडाणा, चिखली, नांदुरा, शेगांव, लोणार, मोताळा तहसिल कार्यालयात प्रशिक्षण उत्साहात पार पडले.
   हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदा पुणे येथील संचालक कर्नल व्ही. एन सुपनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी डॉ. सतीश पाटील, विवेक नायडू, लखन गायकवाड, अक्षय यांनी राबविला.  घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्याठिकाणचे तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, महसूल कर्मचारी आदींना प्रशिक्षीत करण्यात आले. या प्रशिक्षणात प्रात्याक्षिके, आराखडा, गटचर्चा, आपत्ती व्यवस्थापन आराखडा, धोका असुरक्षा व जोखीम मूल्यांकन, गाव आपत्ती व्यवसथापन आराखडा, आपत्ती व्यवस्थापन प्रात्याक्षिके यांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी प्रयत्न केले, असे प्रकल्प अधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.
                                                                                    ********

Thursday 13 February 2020

DIO BULDANA NEWS 13.2.2020

‘पाच दिवसांचा आठवडा’ निर्णयाचे राजपत्रित अधिकारी महासंघाकडून स्वागत
  • प्रलंबित मागणी पुर्ण झाल्याचे समाधान
बुलडाणा, दि. 13 : राज्य शासनाने राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रलंबित असलेली पाच दिवसांच्या आठवडा करण्याची मागणी काल 12 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेवून पूर्ण केली. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी  महासंघाने स्वागत केले आहे.
    राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदसिद्ध अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी या निर्णयाचे स्वागत करीत म्हणाले, राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना आदी संघटनांची बऱ्याच दिवसांची पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी होती. ही  प्रलंबित मागणी पुर्ण झाल्याचे समाधान आहे. पाच दिवसांचा आठवडा करताना शासनाने मुंबई व मुंबई बाहेरील कार्यालयांसाठी एकच वेळ ठेवली आहे. आठवड्यातील अन्य चार दिवसांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत वाढ केलेली आहे. या वाढीव कामकाजाच्या वेळेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्ष राहून कामकाज करावे. सामान्य नागरिकांच्या हिताची कामे करताना वेळ कमी पडणार नाही, यावर कटाक्ष द्यावा. दिवस कमी असले तरी कामकाजाची वेळ वाढवलेली असल्याने नियमित कामेही अधिक मार्गी लागू शकतील.
   महासंघासोबतच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीसुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे. आठवड्याच्या कामकाज केल्यानंतर कामाचा ताण कमी करण्यास निश्चितच मदत मिळणार आहे. कुटूंबाला जास्त वेळ देवून जीवनमान आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. दिवसाच्या कामाची वेळ वाढल्याने पाच दिवसांचा आठवडा झाल्यानंतरही एकूणच कामाच्या तासांमध्ये वाढ झाली असल्याने कामावर परिणाम होणार नाही, अशा प्रतिक्रियाही कर्मचाऱ्यांमधून आल्या आहेत.
****
   आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत मालाची वाहतूक कंत्राटदाराने प्रमाणीत मार्गानेच करावी
  • पुरवठा विभागाने दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे
बुलडाणा, दि. 13 : सन 2016-17 पासून धान्य व भरडधान्यासाठी विकेंद्रीत खरेदी योजना राबविण्यात येत आहे. सन 2019-20 मध्ये काही जिल्ह्यात धानाची खरेदी होत असल्याने त्या धानापासून प्राप्त होणाऱ्या तांदुळाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा जास्त असून अतिरिक्त तांदुळाचे नियतन इतर जिल्ह्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यालाही मार्च 2020 साठी अंत्योदय योजनेसाठी 1330 मे.टन व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजनेकरीता 3039 मे.टन नियतन प्राप्त झाले आहे. या नियतनातील तांदुळाची उचल भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आमगांव गोदाम येथून करावयाची आहे. ही वाहतूक करताना कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणीत केलेल्या जवळच्या मार्गाव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने अथवा आडमार्गाने धान्याची वाहतुक करू नये.
   वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्यास सदरचे वाहन काळ्या बाजारात जाण्याच्या उद्देशाने जात असल्याचे मानून वाहतुक दारावर कारवाई करण्यात येईल. आपत्कालीन परिस्थितीतील नियोजीत मार्गाव्यतिरिक्त अन्य पर्यायी मार्गाने वाहतुक करावी लागल्यास वाहतुकदाराने जिल्हाधिकारी यांची लेखी परवानगी घ्यावी. वाहतुकीदरम्यान वाहतुक कंत्राटदाराचे प्रतिनिधी, चालक, वाहक यांचेकडून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अफरातफर / काळ्या बाजारास सर्वस्वी वाहतुक कंत्राटदारास जबाबदार धरण्यात येईल. वाहतुक कंत्राटदाराने त्यांच्या विश्वासातील प्रतिनिधी, परवानाधारक वाहन चालक, वाहक यांची नेमणूक करावी. अन्नधान्य व इतर जिवनावश्यक वस्तुंचा अपहार, चोरी, काळाबाजार याची रक्कम वाहतुक कंत्राटदाराकडून बाजार भावाच्या दुप्पट किंमतीने वसूल करण्यात येईल.  वाहतुक कंत्राटदारास उपकंत्राटदाराची नियुक्ती करता येणार नाही.
     वाहन वापराबाबत आणि वाहनांचे कर, विमा, प्रदुषण आदीबाबत शासनाच्या अस्तित्वात असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यास कंत्राटदार बांधील राहील. तसेच वाहतूक करतांना भरावे लागणारे विविध मार्गावरील पथकर, जकात कर, प्रवेश फी, एस्कॉर्ट फी तसेच वाहतुकीसंदर्भात वेळोवेळी शासनाकडून लावण्यात येणारे कर वाहतूक कंत्राटदारास भरणे बंधनकारक राहणार आहे.  तरी आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत सीएमआर तांदुळाची वाहतूक करताना जिल्हा पुरवठा विभागाने दिलेल्या अटी व शर्तींची पुर्तता वाहतुक कंत्राटदाराने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिल्या आहेत.
                                                                        *****  
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी गहु धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,दि‍ 13 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत मार्च 2020 चे नियतनातील प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजनेकरीता गहू धान्याची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत करावी लागणार आहे. प्रती लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये प्रतिकिलो व परिमाण 3 प्रति किलो आहे.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.   चिखली गोदामासाठी गहू 4222 क्विंटल, बुलडाणा : गहू 5124  क्विंटल,  दे.राजा गोदामाकरीता गहू 1965, अमडापूर : गहू 1373 क्विंटल, मोताळासाठी गहू 3100 क्विंटल, नांदुरासाठी गहू 3081 क्विंटल, खामगांव गोदामकरीता गहू 4701, शेगांवकरीता गहू 2625, जळगांव जामोदकरीता गहू 2954, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 2467,  मेहकरसाठी गहू 3401 , लोणारकरीता गहू 1964, सिंदखेड राजाकरीता गहू 1597 क्विंटल,  मलकापूर : गहू 3040, साखरखेर्डा गहू 1212, आणि डोणगांव करीता गहू 1204  क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण 44030 क्विंटल गव्हाचा  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा दौरा
बुलडाणा,दि‍ 13 - राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी दु. 1 वाजता अकोला येथून देऊळगांव घुबे ता. चिखलीकडे प्रयाण, दु. 3.30 वाजता दे. घुबे ता. चिखली येथे आगमन व आयोजित सत्कार कार्यक्रमास उपस्थिती, सोयीनुसार बुलडाणाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम करतील.
                                                                        ******

--

Wednesday 12 February 2020

DIO BULDANA NEWS 12.2.2020

शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढवावे
-         एकनाथ डवले
  • चिखली येथे गटशेती प्रोत्साहन व सबलीकरण कार्यक्रम
बुलडाणा, दि. 12 : पारंपारीक पध्दतीने पिके न घेता गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कंपनी स्थापन करावी. कंपनीच्या माध्यमातून विशिष्ट पिकांची लागवड करुन त्यावर प्रक्रीया करुन आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे व गट शेतीमधून एकत्र येवून विकास साधावा, असे आवाहन कृषि विभागचे प्रधान सचिव एकनाथराव डवले यांनी केले आहे. यावेळी जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी नरेंद्र नाईक, पैनगंगा शेती उत्पादक व प्रक्रिया उद्योग शेतकरी गट कंपनीचे अध्यक्ष सचिन देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ अकोला कार्यकारी समिती सदस्य विनायक सरनाईक, कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे, सिताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, तालुका कृषि अधिकारी अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
   तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चिखली अंतर्गत गटशेती प्रोत्साहन व सबलीकरण योजना सन 2017-18 अंतर्गत चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील पैनगंगा शेती उत्पादक व प्रक्रिया उद्योग शेतकरी गट कंपनी, खंडाळा मकरध्वज या कंपनीचे उद्घाटन  प्रधान सचिव (कृषी) एकनाथराव डवले यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
    याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. नाईक यांनी गटशेती ही काळाची गरज असून  गटशेतीच्या माध्यमातून आपल्या शेतमालाचे मुल्यवर्धन करावे.  कार्यक्रमाचे प्रस्ताविकमध्ये कंपनीचे अध्यक्ष सचिन गोंविदराव देशमुख म्हणाले,  सन 2019-20 या वर्षी हळद पिकावर प्रक्रीया करुन हळद पावडर, मिरची पावडर, विविध मसाले निर्मिती करुन बाजारात विक्रीस आणणार आहेत. जागतिक कडधान्य दिनानिमित्त मान्यवरांचे हस्ते उन्हाळी मूग बियाणे, किट चे वाटप याप्रसंगी करण्यात आले व लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि यांत्रकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गोपाल जाधव यांनी केले.  कार्यक्रमाला मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक, पैनगंगा शेती उत्पादक व प्रक्रीया उद्योग कंपनीचे संचालक, भागधारक, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, आत्मा विभागाचे कर्मचारी, शेतकरी गटाचे अध्यक्ष, सचिव व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते, असे तालुका कृषि अधिकारी, चिखली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
आदिवासी मत्स्य संस्थांना मस्त्य व्यवसायासाठी जाळे पुरवठा करण्यात येणार
  • 11 मार्च 2020 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 12 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला, यांचे कार्यक्षेत्राअंतर्गत विशेष केंद्रीय सहाय्य योजना सन 2011-12 नुसार आदिवासी मत्स्य संस्थांना मत्स्य जाळे पुरवठा करण्यासाठी योजना मंजूर आहे.  त्याअनुषंगाने वैयक्तीक स्वरुपात नदया, नाले, तलावात मासेमारी करुन आपली उपजिवीका चालविण्यासाठी अर्थाजन करीत असणाऱ्या तसेच मत्स्य संस्थेचे सभासद असणाऱ्या लाभार्थ्यांकडून 17 फेब्रुवारी ते 11 मार्च 2020 पर्यत अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी येथे सादर करावा.
  तसेच आर्जसोबत आधार कार्ड, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, वैयक्तीक स्वरुपात छोटया नदया, नाले, तलावात मासेमारी करुन आपली उपजिवीका चालवित असल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, मत्स्य संस्थेचे सभासद असल्याबाबत संस्थेचे पत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडावे. तसेच मत्स्य संस्थेचे सभासद असणाऱ्या लाभार्थ्यांनी कार्यालयीन काम कामकाजाच्या दिवशी स्वत:उपस्थित राहून अर्ज सादर करावा. जेष्ठतेनुसार व जिल्हानिहाय लक्षांकानुसार लाभार्थी निवड करण्यात येणार असून मत्स्य संस्थेचे सभासद असणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे, असे प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****
  अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ धान्याचे वाहतूक आदेश पारीत
बुलडाणादि‍ 12 -  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत मार्च 2020 चे नियतनातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना तांदुळाची वाहतुक भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आमगांव गोदामातून शासकीय गोदामात करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत माहे मार्च 2020 साठी तांदुळाची अंत्योदय योजनेचे एकूण 1330 मे.टन व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजनेकरीता एकूण 3039 मे.टन एवढे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. प्राप्त नियतनाच्या धीन राहून ही उचल करावयाची आहे.  अंत्योदय योजना लाभार्थ्यांसाठी वाटपाचे परिमाण 20 किलो प्रति कार्ड व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी  2 किलो आहे.
     गोदामनिहाय तांदुळ धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी अंत्योदय योजना  685 व प्राधानय कुटूंबातील लाभार्थी योजना 2846 क्विंटल, बुलडाणा : अंत्योदय योजना  1399 व प्राधानय कुटूंबातील लाभार्थी योजना 3351 क्विंटल,  दे.राजा गोदामाकरीता अंत्योदय योजना  569 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1392 क्विंटल, अमडापूर : अंत्योदय योजना  233 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 925 क्विंटल,मोताळासाठी अंत्योदय योजना  1174 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1973 क्विंटल, नांदुरासाठी अंत्योदय योजना 1215 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1998, खामगांव गोदामकरीता अंत्योदय योजना 1007 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 3643 क्विंटल, शेगांवकरीता अंत्योदय योजना  608 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1754 क्विंटलजळगांव जामोदकरीता अंत्योदय योजना  1008 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1832 क्विंटल, संग्रामपूर गोदामाकरीता अंत्योदय योजना 1217 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1702 क्विंटल, मेहकरसाठी अंत्योदय योजना 846 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 2481 क्विंटल, लोणारकरीता अंत्योदय योजना 1299 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1648 क्विंटल, सिंदखेड राजाकरीता अंत्योदय योजना  558 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1112 क्विंटल, मलकापूर : अंत्योदय योजना  907 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 2011 क्विंटल, साखरखेर्डा : अंत्योदय योजना 309 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 844 क्विंटल आणि डोणगांवकरीता अंत्योदय योजना  266 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 878 क्विंटल क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण अंत्योदय योजनेकरीता तांदूळ 13 हजार 300 क्विंटल व  प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजनेकरीता 30390 क्विंटल क्विंटल पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
****
तांदुळ वाहतुकीसाठी जिल्हा वाहतुक प्रतिनिधी पदावर बी. एस जुमडे यांची नेमणूक
बुलडाणादि‍ 12 -  जिल्ह्यासाठी पणन हंगाम 2019-20 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत माहे मार्च 2020 साठी तांदुळाचे अंत्योदय योजनेकरीता 1330 मे.टन व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजनेकरीता 3039 मे.टन नियतनाची उचल भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आमगांव गोदाम येथून करावयाची आहे. त्याअनुषंगाने माहे फेब्रुवारी 2020 या महिन्यासाठी जिल्हा वाहतुक प्रतिनिधी पदावर पुरवठा निरीक्षक बी. एस जुमडे यांची नमेणूक करण्यात आली आहे.
   या वाहतुकीकरीता ट्रक चालकाने कंत्राटदाराचे लेटर हेडवर विशिष्ट ट्रक भरून घेण्याबाबतचे प्राधीकारपत्र सादर केल्यानंतरच ट्रक भरून देण्यात येईल. ही वाहतूक जिल्हा पुरवठा कार्यालयाने मान्यता दिलेल्या वाहनातून करावी. वाहनांची आरसी बुक, फिटनेस प्रमाणपत्र तसेच विहीत आशयाची शपथपत्रे, वाहने नियंत्रणाखालील असल्यास वाहन मालकांचे शपथपत्र आदी कागदपत्रे तपासून वाहनात धान्य भरून देण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या वाहनांना हिरवा रंग तसेच वाहनांवर सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारीत धान्य वितरण पद्धत महाराष्ट्र शासन असे स्पष्टपणे लिहावे.
   वाहतुक पासवरील अनुक्रमांक 10 मध्ये धान्याने भरलेल्या वाहनाची दिनांक व वेळ न चुकता भरावी. तरी नेमणूक करण्यात आलेल्या वाहतुक प्रतिनिधी यांनी नेमलेल्या कालावधीत भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आमगांव गोदाम वेळप्रसंगी धान्य उचलीचे गोदाम बदलल्यास त्याठिकाणी दिलेल्या निर्देशानुसार हजर राहून कार्यालयीन कामकाज पार पाडावे, असे जिल्हा पुरवठा विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    *****
‘सर्वांना लाभ सर्वांचे कल्याण’ या ब्रिदनुसार कामगार विभागाचे काम
बुलडाणादि‍ 12 -  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्ह्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या कामगार व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांच्या विविध कल्याणकारी योजना जाहीर आहेत. मंडळ अस्तित्वात आले तेव्हापासून दरवर्षी कामगारांना विविध योजनांतर्गत लाभ दिल्या जात असून यावर्षी जास्तीत जास्त संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येईल. अटल विश्वकर्मा सन्मान योजनेतंर्गत माहे जुन 2019 ते सप्टेंबर 2019 पर्यंत बांधकाम कामगारांकरीता नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली असून ‘सर्वांना लाभ सर्वांचे कल्याण’ या ब्रिद नुसार कामगार विभाग व मंडळाचे काम होत आहे.
    हे सर्व काम करीत असताना मंडळाच्या कामकाजासाठी अपुरा कर्मचारी वर्ग असतांनासुद्धा हजारोंच्या संख्येने आलेल्या कामगारांचे समाधान केल्या जात आहे. कामगारांची अडचण लक्षात घेवून त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन केल्या जाते.  हे सर्व करीत असताना कोणत्याही एका विशिष्ट पक्षाला लाभ व्हावा, या दृष्टीकोनातून कोणतेही काम सरकारी कामगार कार्यालयाद्वारे अथवा मंडळाद्वारे केल्या जात नाही.
   नोंदणीकृत सर्व जिवीत सक्रीय बांधकाम कामगारांना तातडीने सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप करण्याचे कार्य सुरू करण्यात आले होते. परंतु मध्यंतरीच्या काळात विधानसभा निवडणूक आचार संहीता लागू होवून कंत्राटदाराचा कंत्राट संपुष्टात आलेला होता. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांना सुरक्षा संच व विविध योजनांचे लाभाचे वाटप थांबविण्यात आले होते. सदर लाभ हे डीबीटी पद्धतीने बँकेद्वारे संबंधित बांधकाम कामगारांच्या खात्यात  आरटीजीएस करण्यात येतात. तरी ‘सरकारी कामगार अधिकारी धात्रक यांना निलंबित करण्याची मागणी’ या मथळ्याखाली प्रकाशित वृत्ताचे खंडन सरकारी कामगार अधिकारी सं. वा. धात्रक यांनी खुलासा प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.