Friday 27 April 2018

जिल्ह्यात राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन राबविणार..



·        30 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये माहिती देण्याचे आवाहन
·        लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलनासाठी मोहिम
 बुलडाणा,दि.27 : जिल्ह्यात राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन राबविण्यात येणार आहे.  सदर अभियान यशस्वी करण्यासाठी व लाभार्थ्यांपर्यंत परिणामकारक रितीने पोहोचविणेकरीता योजनेच्या तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक रितीने राबविणेकरीता प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे. त्याची पहिली पायरी म्हणून सध्या सुरू असलेल्या ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान 30 एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस साजरा केल्या जाणार आहे. या दिवशी आयोजित ग्रामसभांमधून लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. याकरीता 21 मे 2018 पर्यंत जिल्ह्यात मोहिमच राबविण्यात येणार आहे.
   या मोहिमेत योजनेचा लाभाबद्दल माहिती देणे, विद्यमान लाभार्थ्यांच्या यादीचे प्रमाणीकरण करणे व जेथे ग्रामसेवक, एएनएम व आशा आहेत तेथे त्यांच्या माध्यमातून अतिरिक्त माहितीचे संकलन करणे. यामध्ये लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक व कुटूंबाच्या सद्यस्थितीमधील बदल या माहितीचा समावेश असणार आहे. सदर ग्रामसभांमध्ये उपस्थित न राहीलेल्या लाभार्थ्यांची माहिती 1 ते 8 मे 2018 दरम्यान गृहभेटीद्वारे आशा / आरोग्य सेविकांच्या माध्यमातून संकलीत होणार आहे. याकरीता आशा, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी यांची प्रशिक्षणे घेण्यात येणार आहे. ही माहिती 8 ते 21 मे 2018 दरम्यान संकेतस्थळावर अपलोड केल्या जाणार आहे. लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटूंबास प्रतिवर्ष 5 लक्ष रूपये आरोग्य विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगीकृत रूग्णालयात विनामुल्य शस्त्रक्रीया व उपाचाराचा लाभ मिळणार आहे.    तरी नागरिकांनी 30 एप्रिल 2018 रोजी आयोजित ग्रामसभांमध्ये माहिती संकलीत करण्यास सहकार्य करावे. जेणेकरून अधिकाधिक कुटूंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेचा लाभ देता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.
                                                            ******
              वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षितता पाळावी
-         संदीप डोईफोडे
·        रस्ता सुरक्षा अभियान
 बुलडाणा,दि.27 : राज्यभरात सुरक्षित रस्ता वाहतूकीसाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न केल्या जातात. सध्या रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्त्यावर चालताना वाहतूकीचे नियम पाळले पाहिजे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून रस्तयावर सुरक्षितता पाळावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे यांनी केले. जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
  यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे वाहतुक अधिकारी ए. यु कचवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी. के तडवी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात श्री. तडवी म्हणाले, रस्त्यामध्ये अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ध्वनी प्रदुषणावरही लक्ष केंद्रीय केले पाहीजे. त्यासाठी नो हॉन्गिंग डे साजरे केले पाहिजे. यावेळी वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्यात आलया. कार्यक्रमाचे आभार गतानन तनपुरे यांनी मानले. कार्यक्रमाला परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
                                                                                    *********
चार गावांसाठी टॅंकर मंजूर
  • चिखली, शेगांव व सिं.राजा तालुक्यातील  गावांचा समावेश
बुलडाणा, दि.27 -  सिं.राजा तालुक्यातील किनगांव राजा, शेगांव तालुक्यातील गव्हाण व  चिखली  तालुक्यातील पळसखेड सपकाळ, धोडप येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या चार गावांसाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे.  कि.राजा गावाची लोकसंख्या 5500 असून येथे दोन टँकर दररोज 1 लक्ष 54 हजार लीटर पाणीपुरवठा करणार आहे.  तसेच गव्हाण गावची लोकसंख्या 1700 असून येथे एक टँकर मंजूर आहे. त्याचप्रमाणे चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ गावची लोकसंख्या 700 आहे. या गावासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. धोडप येथील 1600 लोकसंख्येकरीता एक टॅंकर दररोज 38 हजार लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे.  या सर्व टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
**********
अवैध दारू विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी गावागावात ग्रामरक्षक दल
  • ग्रामसभेमध्ये अधिसूचनेचे होणार वाचन
  • ग्रामपंचायतींनी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, दि.27 -  महाराष्ट्र दारूबदी (सुधारणा) अधिनियम 2016 अन्वये गावागावात  ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मद्यपींची वाढती संख्या व त्याचे समाजावर होणारे दुष्परीणाम, तसेच मद्यपींच्या गैरवर्तणुकीमुळे महिलांना होणारा त्रास, युवा पिढीच्या मनावर होणार परिणाम यावर उपाययोजना म्हणून शासकीय यंत्रणेसोबत जनसहभागाची साथ घेवून अवैध मद्य निर्मिती व विक्री यावर प्रभावी नियंत्रण राखण्यासाठी ग्रामरक्षक दल महत्वाची भूमिका अदा करणार आहे.  त्याचप्रमाणे अवैध दारू निर्मिती व विक्री यावर सुद्धा प्रभावी नियंत्रण या दलाच्या माध्यमातून ठेवण्यात येणार आहे.
   महाराष्ट्र दिनी 1 मे 2018 रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये  ग्रामरक्षक दल स्थापण्याबाबतच्या अधिसूचनेचे वाचन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार अवैध दारू विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग घेवून ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे. ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे किंवा ग्रामसभेच्या 25 टक्क्याहुन कमी नसतील इतक्या महिला मतदारांनी स्वाक्षरीत केलेल्या अर्जाद्वारे ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलाविण्याकरीता संबंधित उपविभागीय अधिकारी यांना विनंती करावी. ग्रामसभेस ग्रामरक्षक दलाचे सदस्य म्हणुन नियुक्त करावयाच्या व्यक्तीची शिफारस करता येणार आहे. दलाच्या सदस्याची मुदत 2 वर्ष इतकी असणार आहे. ग्रामरक्षक दल ग्रामपंचायतीच्या सदस्यसंख्येएवढे असणार आहे. मात्र त्यांची संख्या 11 पेक्षा कमी असणार नाही.  दलात महिलांची व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे पुरेसे प्रतिनिधीत्व असावे लागणार आहे.
  ग्रामरक्षक दलामध्ये सदस्य असणारी व्यक्ती त्या गावची मतदार असली पाहिजे, दारूबंदीच्या संदर्भात उल्लेखनिय कामगिरी असणारी पाहिजे, तसेच ती व्यक्ती दारू पिणारी नसावी, अशा व्यक्तीवर 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षेची तरतुद असेल, असा भारतीय दंड संहीता किंवा इतर कोणत्याही अधिनियमाखाली कोणताही गुन्हा, त्या व्यक्तीविरूद्ध भुतकाळात नोंदविलेला नसला पाहिजे, अशी पात्रता धारण करणारा व्यक्ती ग्रामरक्षक दलामध्ये सहभागी होवू शकतो. ग्रामरक्षक दलाचे महत्वपूर्ण कर्तव्य म्हणजे गावात बेकायदेशीरपणे दारू तयार करणे, वाहतूक करणे, जवळ बाळगणे, विक्री करणे या विषयी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना लेखी कळविणे. दारूच्या सेवनामुळे सार्वजनिक ठिकाणी उपद्रवास कारणीभूत ठरणाऱ्या आणि उपद्रव निर्माण करणाऱ्या लोकांना प्रतिबंध करणे, अशा व्यक्तींचे समुपदेशन करावे किंवा ग्रामरक्षक दलाच्या तीन सदस्यांच्या सहीने लेखी इशारा द्यावा. व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करावे. मद्याच्या प्रतिकूल परिणामाविषयी जनजागृती निर्माण करावी. राज्य पोलीस विभाग किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर कायदेशीर कार्यवाहीमध्ये सहकार्य करणे व खटल्याच्या वेळी पंच/साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याचे जबाबदारी ग्रामरक्षक दलाची असणार आहे.   
  या दलाचा प्रत्येक सदस्य कोणताही अपराध घडल्याबाबतची आणि कोणताही अपराध करण्याचा हेतू असल्याबाबतची, तयारी होत असल्याची त्याला कळेल अशी माहिती त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा याबाबत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला देण्यास बांधील असणार आहे. तरी ग्रामपंचायतींनी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी केले आहे.
                                                            ******

Tuesday 24 April 2018

जिल्ह्यातील 39 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका जाहीर


·        नामनिर्देशन पत्र 7 ते 12 मे दरम्यान दाखल करता येणार
·        27 मे 2018 रोजी मतदान
·        72 जागांसाठी होणार मतदान, आदर्श आचारसंहीतेचे काटेकोर पालन करावे
बुलडाणा, दि. 24 : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील माहे जुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 39 ग्रामपंचायतींच्या 72 रिक्त पदांकरीता पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  या ग्रामपंचायतींमध्ये 23 एप्रिल 2018 च्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
  आयोगाच्या आदर्श आचार संहीता त्या-त्या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहीता कालावधीत कुठेही करता येणार नाही.
  निवडणूकीची अधिसूचना 27 एप्रिल 2018 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र 7 मे ते 12 मे 2018 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 4.30 वाजेदरम्यान  स्वीकारले जाणार आहे. या निवडणूकीचे मतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी 28 मे 2018 रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी  कार्यालयाने  कळविले आहे.
*******
बाल विवाह मुक्तीसाठी जनजागृती पर कार्यक्रम
·        जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा उपक्रम
बुलडाणा, दि. 24 : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्यावतीने समाजातील बाल विवाह प्रथा संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि या कलंकापासून समाजाला मुक्त करण्यासाठी नुकतेच देऊळघाट, बुलडाणा येथे जनजागृतीपर कार्यक्रम पार पडले. देऊळघाट येथे अंगणवाडी केंद्रामध्ये आणि बुलडाणा येथे दिपस्तंभ करीअर ॲकेडमीमध्ये सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
  देऊळघाट येथे कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बाल संरक्षण समिती सदस्य व शिक्षकवृंद आदीमध्ये बालविवाहाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी गजानन कुसुंबे व सामाजिक कार्यकर्ता प्रदीप सपकाळ यांनी मार्गदर्शन केले. बुलडाणा येथे विद्यार्थ्यांमध्ये या कुप्रथेविषयी जनजागृती करण्यात आली. बाल संरक्षण कक्षाचे कायदा व परिविक्षाधिकारी ॲड गणेश देशमुख, श्री सपकाळ यांनी उद्बोधन केले. या कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रमोद येंडोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले.

Monday 23 April 2018

सिंचनाची मिळतील गोड फळे.. शेतात घ्यावे शेततळे..!



·        भोसा ता. मेहकर येथील प्रभाकर खुरद यांची शेततळ्यावर फळबाग लागवड
·        शेततळ्याच्या पाण्यावर संरक्षित सिंचनसेंद्रीय कलिंगडाचेही उत्पादन
  बुलडाणा, दि. 21 :   सिंचनाची मिळतील गोड फळे.. शेतात घ्यावे शेततळे.. या उक्तीचा प्रत्यय बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात भोसा येथे येत आहे. या उक्तीनुसार भोसा येथील शेतकरी प्रभाकर खुरद यांनी शेततळ्याच्या पाण्यावर तब्बल 30 एकरावर फळबाग लागवड केली आहे. राष्ट्रीय फळबाग मिशन अंतर्गत 45 बाय 45 आकाराचे शेततळ्याचे निर्माण त्यांनी केले आणि कायापालट झाला.  सन 2016-17 या आर्थिक वर्षात शेततळ्याची निर्मिती झाली व त्यांचे जीवनमान समृद्धीच्या मार्गावर वेगाने धावू लागले. 
  राष्ट्रीय फळबाग मिशनच्या शेततळ्यावर आज 30 एकर शेतावर डाळींब, संत्र्याची फळबाग ते घेत आहेत. त्याचप्रमाणे सेंद्रीय पद्धतीने कलिंगडाची लावगड करून लाखो रूपयांचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. शेततळ्यापूर्वी केवळ 1200 संत्रा झाडे असणाऱ्या प्रभाकररावांनी त्यांच्या शेतात शेततळ्याच्या पाण्यावर आणखी 1600 झाडांची वाढ केली. आजरोजी त्यांच्या 20 एकर शेतावर 2800 संत्रा फळपिकाची झाडे आहेत. संत्रा फळपिकामध्ये दोन ओळीतील अंतर 18 बाय 18 मीटर ठेवले आहे. ते केवळ संत्रा फळपिकावरच थांबले नाही, तर त्यांनी  त्यासोबतच डाळींब फळबागेची लागवडही केली आहे.  डाळींबाची पाच एकर शेतावर 1400  झाडांची लागवड केली. तसेच या फळपिकासोबतच हंगामी पिक असलेल्या कलिंगडाचीही त्यांनी लागवड केली आहे. पाच एकर शेतावर मल्चिंग पद्धतीने कलिंगड पिक घेवून संपूर्ण फळपिकाची शेती करण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे.  अशाप्रकारे संपूर्ण 30 एकर शेतावर शेततळ्याच्या पाण्यावर त्यांच्याकडून फळबाग लागवड करण्यात आली आहे.
  पारंपारिक शेतीला फाटा देत प्रभाकर खुरद यांनी  अन्य पिकांच्या शेतीला फळबागेची जोड दिली आहे.  इयत्ता 12 वी शिक्षण घेतलेल्या श्री. खुरद यांचे शेतीतील ज्ञान मात्र शेतीमधील पीएचडी धारकालाही लाजवेल असे आहे. शेततळ्यातील पाणी विहीरींमध्ये सोडून विहीरीतून ठिबकद्वारे फळबागांना देण्याची सुविधा त्यांनी निर्माण केली आहे. त्यामुळे शेततळ्यातील पाण्याचे संरक्षित सिंचनासाठी मोलाची साथ मिळत आहे. पावसाळ्यात शेततळ्यात साठविलेले पाणी या फळबागांना उन्हाळ्यात संजीवनीपेक्षा कमी ठरत  नाही. शेततळ्याने दिलेले ही मोलाची साथ त्यांच्या समृद्धीला निश्चितच कारक ठरत आहे.
  केवळ पारंपारिक पिके घेणारा मेहकर तालुक्यातील भोसा पट्टा आज फळबगांकडे वळला आहे. त्यामध्ये कुठेतरी शेततळ्याची भूमिका मोलाची ठरते. फळबाग शेतीमधील उत्पन्नामुळे श्री. खुरद यांची मुले शिक्षणासाठी पुणे येथे ओहत. दोन मुलापैकी एक मुलगा पुण्यातील सिंहगड शैक्षणिक संकुलामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे, तर दुसरा मुलगा एमआयटीमध्ये आहे. शेततळ्यातील पाण्यावर प्रभाकर खुरद यांनी  फळबाग फुलवित यशाचा मार्ग मिळविला आहे. तब्बल 1 करोड लीटर पाणीसाठा असलेले शेततळे केवळ पिकांची तहान भागवित नाही, तर त्यांच्या गोठ्यातील मुक्या जनावरांचीसुद्धा तृष्णातृप्ती करीत आहे. त्यामुळे जनावरांना उन्हाळ्यातील भोसा गावशिवारातील पाणी टंचाईचा सामना करावा लागत नाही.  राष्ट्रीय फळबाग मिशनमधील हे शेततळे अन्य शेतकऱ्यांनासुद्धा खुणावत आहे. फळबागांकडे आकर्षित करीत आहे. संत्रा, डाळींबासोबतच हंगामी पिक असलेल्या कलिंगडाचे उत्पादनही श्री. खुरद मोठ्या प्रमाणावर घेत आहे. मल्चिंग पद्धतीने कलिंगडाची लागवड करून त्यांनी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या पद्धतीमुळे आणि शेततळ्यातील पाण्यामुळे लाखो रूपयांचे उत्पन्न या कलिंगड शेतीने प्रभाकर खुरद यांना मिळवून दिले आहे. संत्रा फळपिकापासून सन 2017 मध्ये जवळपास 12 लक्ष रूपयांचे प्राप्त झाले असून यावर्षीच्या हंगामात पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये काढणी सुरू होत आहे. केवळ पाणी नाही.. पाणी नाही म्हणून शेतीबाबत ओरडणाऱ्यांना प्रभाकर खुरद यांच्या शेततळ्याने निराशा झटकून कामाला लागण्याचा संदेशच दिला आहे. शेततळ्यासाठी शासनही अनुदान देते. या अनुदानाचा लाभ घेत शेतकऱ्यांनी शाश्वत सिंचन देणाऱ्या शेततळ्यांकडे वळले पाहिजे.  श्री. खुरद यांना 3.60 लक्ष रूपये अनुदान शेततळ्याच्या निर्मितीनंतर मिळाले आहे. केवळ संरक्षित सिंचनाची सुविधाच नाही.. तर शेतीमधील मिळकतीचा जब्बर स्त्रोतही शेततळे निर्माण करून देते.. याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे भोसा येथील प्रभाकर खुरद यांचे शेततळे ठरले आहे. 
     *******
मेहकर उपविभागातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये  महाराष्ट्र भुजल अधिनियम लागू
  • मेहकर तालुक्यातील 75 व लोणार तालुक्यात 82 गावांमध्ये पाणीटंचाई घोषीत
बुलडाणा, दि.23 -  मेहकर तालुक्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता असणाऱ्या 75 व लोणार तालुक्यातील 82 गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषीत केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भुजल अधिनियम 2009 लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे 500 मिटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहीरीचे खोदकाम करणार नाही.
  भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्चित व अधिसुचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहीरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीयम करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होईल अशी कोणतहीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरीता संबंधित तहसिलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्त्रेातांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे मेहकर उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            *****
                   गाळ उपसा करणा-या जे.सी.बी. ऑपरेटर्सच्या भोजनाची केली व्यवस्था
·                    सिंदखेड राजा तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिला एक दिवसाचा पगार
    बुलडाणा, दि. 23 :  जिल्‍हा दुष्‍काळ मुक्‍त करण्‍यासाठी व सुजलाम सुफलाम बनविण्‍यासाठी भारतीय जैन संघटना व जिल्‍हा प्रशासन यांच्‍या मार्फत सिंदखेडराजा तालुक्यात गाळ उपासण्‍याचे काम सर्वत्र सुरू आहे.   या कामाला आपलाही खारीचा वाटा असावा म्‍हणून उपविभागीय अधिकारी विवेक काळे यांच्‍या आवाहनानुसार तहसिलदार संतोष कणसे यांच्‍यामार्गदर्शनाखली  सिंदखेडराजा तहसिल कार्यालया मधील सर्व कर्मचा-यांनी आपला एक दिवसाचा पगार हा जे.सी.बी. ऑपरेटरांना भोजना करीता दिला आहे
    त्‍या मुळे गाळ उपसण्‍याच्‍या कामाला गती आली असून या कर्मचा-यांनी केलेल्‍या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 सिंदखेडराजा तालुक्‍यात 10 जे.सी.बी.च्‍या मदतीने तलाव आणि नदीतील गाळ उपसण्‍याचे काम दिवस रात्र सुरू आहे. गाळ उपसल्‍यामुळे भविष्यात मोठा जलस्‍त्रोत वाढणार आहे. आणि पाण्‍याची पातळी हि वाढणारआहे. सदर गाळ उपसांचे काम हे भारतीय जैन संघटना व महसूल प्रशासनाच्‍यावतीने होत आहे. हे काम करतांना सामाजीक जानीव ठेउन महसूल कर्मचारी  संघटनेच्‍या वतीने जे.सी.बी. ऑपरेटर यांना जेवनाची व्‍यवस्‍था व्‍हावी आणि हे काम सातत्‍यांने सुरू रहावे या करीता एक दिवसाचा पगार हा कर्मचा-यांनी जमा केला असून तहसिलदार संतोष कणसे यांच्‍या  मार्गदर्शनाखाली जे.सी.बी. ऑपरेटर यांना भोजन व्‍यवस्‍था दररोज करण्‍यात येत आहे.

Saturday 21 April 2018

प्रशासकीय सेवेत सामान्यांची सेवा करण्याची संधी - प्रमोदसिंह दुबे

प्रशासकीय सेवेत सामान्यांची सेवा करण्याची संधी
-         प्रमोदसिंह दुबे
·        नागरी सेवा दिन साजरा
बुलडाणादि. 21 प्रशासनात कार्य करणारा प्रत्येक जण अधिकारी व कर्मचारी यांच्या रूपामध्ये लोकसेवक आहेत. लोकसेवकाचे काम अन्यायग्रस्त व समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत विकास पोहोचवि‍णे आहे. राज्यसरकार विविध योजनांच्या माध्यमातुन जनकल्याणाचे कार्य करते. हया योजना यशस्वी करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची असते. या योजनांच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करण्याची संधी प्रशासनातील सेवेमुळे मिळते, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज 21 एप्रिल 2018 रोजी नागरी सेवा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपिठावर निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे., जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. चव्हाण, प्र. उपजिल्हाधिकारी सुनील शेळके,जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती सावंत,  प्र. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे,  समृद्धी महामार्ग प्रशासक दिनेश गिते, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. काळे आदी  उपस्थित होते.
   याप्रसंगी नागरी सेवा दिनाच्या औचीत्याने उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे यांनी केले. ते म्हणाले, नागरी सेवा दिन हा प्रशासनातील कार्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. याठिकाणी गौरवांकित होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा आदर्श अन्य कर्मचाऱ्यांनी घेतला पाहिजे. असे झाल्यास खऱ्या अर्थाने नागरी सेवा दिन साजरा होईल.  विज्ञान भवन दिल्ली  येथील नागरी सेवा दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशुन भाषणाचे थेट प्रक्षेपण सुध्दा यावेळी दाखवण्यात आले.  कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*****
सात गावांसाठी टॅंकर मंजूर
  • लोणार, दे.राजा, खामगांव व मोताळा तालुक्यातील  गावांचा समावेश
बुलडाणा, दि.21 -  लोणार तालुक्यातील मातमळ, पिंपळखुटा, मोताळा तालुक्यातील वडगांव खंडोपंत,  खामागांव  तालुक्यातील निरोड, कदमापूर, दे. राजा तालुक्यातील कुंभारी व पिंपळगाव बु येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या सात गावांसाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे.  मातमळ गावाची लोकसंख्या 995 असून येथे एक टँकर दररोज 18 हजार 840 लीटर पाणीपुरवठा करणार आहे.  तसेच पिंपळखुटा गावची लोकसंख्या 1214 असून येथे एक टँकर मंजूर आहे. त्याचप्रमाणे दे.राजा तालुक्यातील कुंभारी गावची लोकसंख्या 1030 आहे. या गावासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. पिंपळगांव बु येथील 2530 लोकसंख्येकरीता एक टॅंकर, वडगांव खंडोपंत येथील 1642 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.  निरोडच्या 1709 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर आहे. कदमापूर येथील 2600 लोकसंख्येकरीता एक टँकर दररोज 48 हजार लीटर पाण्याचा पुरवठा करणार ाअहे.  या सर्व टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
**** 
     शिकावू उमेदवारी योजनेतंर्गत परीक्षेचे आयोजन
बुलडाणा, दि.21 -  शिकावू उमेदवारी योजनेतंर्गत 107 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मे  2018 चे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा सुधारीत वेळापत्रकानुसार 9 मे ते 11 मे 2018 या कालावधीत घेतल्या जाणार आहे. त्यामध्ये ट्रेड थेअरी, एम्प्लायबीलीटी स्कील अँड डब्ल्यूएससी या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र खामगांवच्या सुचना फलकावर लावलेले आहे. याची सर्व शिकावू उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण संस्था, खामगांव यांनी केले आहे.

Friday 20 April 2018

चिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील भिक्षेकरी मुलांचे केले पुनर्वसन


महिला व बाल संरक्षण विभागाच्यावतीने भिक्षेकरी मुलांचे पुनर्वसन
·        रस्त्यावर भिक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी मोहिम
·        चिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील भिक्षेकरी मुलांचे केले पुनर्वसन
  बुलडाणा, दि. 20 : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने जिल्ह्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत भिक्षेकरी मुलांच्या पुनर्वसनासाठी मोहिम सुरू केली आहे. रस्त्यावरील भिक मागणाऱ्या मुलांना पकडून त्यांच्या पुढील उज्जवल भविष्यासाठी प्रथमत: त्यांच्या कुंटूबात, कुटूंब नसल्यास बाल गृह व निरीक्षण गृहात पुनर्वसन केल्या जाते. चिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील कुटूंबात वय वर्ष 3-6 वयोगटातील मुले सिल्वासा (दादर नगर हवेली ) सिल्वासा येथे  एससीपीएस, आयसीपीएस व डिसीपीयु अंतर्गत कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी यांना भिक मागताना आढळले.  त्यानंतर त्यांनी या मुलांना बुलडाणा येथे आणून जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलडाणा यांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलडाणा यांच्या माध्यमातून भिक मागतांना आढळून आलेल्या कुटूंबातील सदर बालकांची शासकीय रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या बालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर करून त्यांची सविस्तर विचारपूस करण्यात आली. त्यांच्या कुटूंबियांकडून लेखी स्वरूपात ह्यानंतर बुलडाणा जिल्हा सोडून जाणार नसून कोणत्याच प्रकारे बालकाकडून भिक्षा मागवणार नाही, असे लिहून घेण्यात आले.
    त्याचप्रमाणे धानोरी गावचे पोलीस पाटील प्रेमचंद हिवरकर यांच्याकडूनही जबाब लिहून घेण्यात आला. तसेच भिक्षेकरी मुलांना त्यांच्या कुटूंबापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद येंडोले, बाल संरक्षण कक्षातील अविनाश चव्हाण, बाल संरक्षण अधिकारी गजानन कुसुंबे, सामाजिक कार्यकर्ता प्रदीप सपकाळ, ॲड गणेश देशमुख, कु. शारदा पवार, सचिन देशमुख, रामेश्वर जाधव, जिल्हा बाल संरक्षण कक्ष सिल्वासाचे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी मधु चौधरी, संरक्षण अधिकारी सिल्वासा  विश्वनाथ देवरे,सामाजिक कार्यकर्ता उषा पटेल, पोलीस हवालदार तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. ü
*********
अंमलबजावणी यंत्रणांनी समन्वयाने जलसंधारणाची कामे पूर्ण करावी
-         एकनाथ डवले
·                    जलसंधारण कामांची आढावा बैठक
·                    मागेल त्याला शेततळे, मृदसंधारणाची कामे विहीत कालावधीत पूर्ण करा
·                    झालेल्या कामांचे जिओ टँगिंग करावे
  बुलडाणा, दि. 20 :  राज्यामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तसेच मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानतंर्गतही कामे होत आहेत. सध्या या कामांसाठी अत्यंत महत्वाचे दिवस आहेत. त्यामुळे सहभागी अंमलबजावणी यंत्रणांनी समन्वयाने जलसंधारणाची सुरू असलेली व सुरू होणारी कामे त्वरित पूर्ण करावी, अशा सूचना जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आज दिल्या आहेत.
   जलसंधारण विभागाच्या विविध येाजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, प्र. मुकाअ राहूल चाकोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे आदी उपस्थित होते.
    जलयुक्त शिवारमधील पाणी ताळेबंद पुर्ण असलेल्या गावांचा आढावा घेताना सचिव एकनाथ डवले म्हणाले, मागील वर्षातील  कामे त्वरित पूर्ण करा. निधी आवश्यक असल्यास निधीची मागणी करावी.  तसेच यंत्रणांनी प्रशासकीय मान्यता तात्काळ देवून कामांची पूर्तता कालावधीमध्ये पूर्ण करावी. मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टानुसार काम करावे. सर्व यंत्रणा व तालुक्यांनी  या योजनेतील उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लाभार्थ्यांचे अनुदानाची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी. सन 2018-19 या वर्षासाठी उद्दिष्टानुसार जिल्ह्यात 255 गावांची निवड करावी. गावे प्रत्यक्ष परिस्थिती बघून निवडण्यात यावीत.
    ते पुढे म्हणाले, सर्व यंत्रणांनी शेततळे, सिमेंट नाला बांध, खोलीकरण आदी कामांचे जिओ टँगिंग करावे. जिओ टॅगिंग झाल्याशिवाय सदर काम पूर्ण झाले असल्याचे समजण्यात येणार नाही. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर त्वरित जिओ टॅगिंगसाठी फोटो अपलोड करावे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानातील कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना गाळ उपलब्ध करून द्यावा. तसेच भारतीय जैन संघटनेच्यावतीने जिल्ह्‌यात सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम मोहिमेतंर्गत गाळ काढण्याचे काम युद्ध्‍ पातळीवर सुरू आहे. प्रशासनाच्यावतीने या कामामध्ये डिझेलचा पुरवठा करण्यात येत आहे. या कामात प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य देणार आहे.
  याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. फुलंब्रीकर, उपवनसंरक्षक बी.टी भगत आदींसह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी आदींसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                            ********
जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन
·        23 एप्रिल ते 7 मे पर्यंत चालणार अभियान
  बुलडाणा, दि. 20 :  जिल्ह्यामध्ये अप्पर परिवहन आयुक्त यांच्या निर्देशानुसार 23 एप्रिल ते 7 मे 2018 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हाभर मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.
  जिल्ह्यात 23 एप्रिल रोजी बुलडाणा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खासदार प्रतापराव जाधव यांच्याहस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी वाहनधारकांना वाहतूक नियम व प्रवाशांची सुरक्षितता आदींची माहिती देण्यात येणार आहे. मलकापूर येथे चौकात सभा घेवून रस्ता सुरक्षा विषयक बॅनर्स लावण्यात येणार आहे. तसेच 24 एप्रिल रोजी विभाग नियंत्रक एस.टी कार्यशाळा येथे वाहन चालकांकरीता रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शनपर सभा आयोजित केल्या जाणार आहे. तसेच वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 25 एप्रिल रोजी दे. राजा येथे चौक सभा घेवून रस्ता सुरक्षा विषयक हॅन्डबिलचे वाटप करण्यात येणार आहे. दे. राजा शहरातील ऑटोरीक्षा चालक व टॅक्सीचालकांना मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. पुढे 26 एप्रिल रोजी बुलडाणा येथे प्रजापिता ब्रह्याकुमारी यांचेकडून वाहन चालकांना सुरक्षेबाबत व  मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
   त्यानंतर 27, 28 व 29 एप्रिल रोजी खामगांव येथील शिबिर कार्यालयात रस्ता सुरक्षा विषयक बॅनर्स प्रदर्शित करणे, जनतेस रस्ता सुरक्षा विषयी माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली या वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहन चालकांना हेलमेट, सिटबेल्ट, ओव्हरलोड तपासणी आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 30  एप्रिल रोजी  नांदुरा येथे बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे, ऑटोरीक्षा चालक व टॅक्सीचालकांना मार्गदर्शन करणे व वाहन चालकांना रस्ता सुरक्षा विषयक माहितीपत्रके वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर 1 मे 2018 रेाजी मेहकर येथे महामार्गावरील वाहन चालकांना हेलमेट, सिटबेल्ट, ओव्हरलोड तपासणी आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
     तसेच 2 मे 2018 रेाजी बुलडाणा येथे शिकाऊ अनुज्ञप्ती करीता येणाऱ्या अर्जदारांना रस्ता सुरक्षिततेबाबत माहिती देणे व तपासणीकरीता कार्यालयात येणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात येणार आहे. पुढे 3 मे 2018 रेाजी बुलडाणा येथे सकाळी 7.30 वाजता रस्ता सुरक्षेविषयी वॉकेथॉन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. दि 4 व 5  मे रोजी जळगांव जामोद येथे शिबिर कार्यालयात रस्ता सुरक्षा विषयक बॅनर्स लावण्यात येणार आहे. तसेच अवैध प्रवाशी वाहतुकीबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. सिटबेल्टशिवाय वाहन चालविणे, विहीत मर्यादेपेक्षा जास्त गतीने वाहन चालविणे व योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी मोहिम राबविण्यात येणार आहे.  शेगांव येथे 6 मे रोजी अशाचप्रकारे मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच 7 मे रेाजी मेहकर येथे बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे, महामार्गावरील वाहन चालकांना हेलमेट, सिटबेल्ट, ओव्हरलोड तपासणी आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                        *****
नागरी सेवा दिनाचे आज आयोजन
बुलडाणा, दि. 20  : दरवर्षी जिल्हा मुख्यालयात नागरी सेवा दिनाचे आयोजन करण्यात येते.त्या अनुषंगाने यावर्षी सुध्दा नागरी सेवा दिन कार्यक्रमाचे आयोजन उद्या 21 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या दिनाचे औचि‍त्य साधून मा.पंतप्रधान,विज्ञानभवन, नवी दिल्ली येथे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण  जिल्हा पातळीवर नियोजन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात येणार आहे. नागरी सेवा दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय,बुलडाणा येथे 21 एप्रिल 2018 रोजी 3 ते 4.30 या वेळेत  नियोजन सभागृह येथे करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी  नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व अधिकारी वर्गांनी उपस्थि‍त रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
                                                            *********
विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांचा दौरा
बुलडाणा, दि. 20  : महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे दि. 22 एप्रिल 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 22 .4. 2018 रोजी सकाळी 10 वाजता यवतमाळ येथून मेहकरकडे प्रयाण, दु. 2 वाजता मेहकर येथे आगमन व शाम उमाळकर यांच्या निवास्थानी राखीव, दु. 3 वाजता मेहकर येथून चिखली-धाड-भोकरदन मार्गे सिल्लोड जि. औरंगाबादकडे प्रयाण करतील.
                                                            *******

Monday 16 April 2018

कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जासाठी 1 मेपर्यंत मुदतवाढ


कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जासाठी 1 मेपर्यंत मुदतवाढ
  • अर्ज सादर न करू शकलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी
  • एकरकमी कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 30 जूनपर्यंत मुदत
  बुलडाणा,दि. 16 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – 2017 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या कालावधीत शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली असून अर्ज सादर करण्यास 1 मे 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  तसेच दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी योजनेत अर्ज सादर करण्यास 30 जुन 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
   त्यानुसार सदर अर्ज भरण्याची सेवा महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम केंद्रावरून नि:शुल्क पुरविण्याबाबत त्यांना निर्देशित करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत:सुद्धा http://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येईल. उपरोक्त कालावधीत आपले सरकार सेवा केंद्र, सर्व महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम यांनी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज नि:शुल्क भरून द्यावे, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने निर्देशीत केले आहे.
                                                            ***********
अनधिकृत होर्डींग्ज व जाहीरातींवर प्रतिबंधासाठी नोडल अधिकारी नियुक्त
बुलडाणा,दि. 16 : शासन निर्णयानुसार नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्र वगळून अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहीराती, घोषणा फलक, होर्डींग्ज, पोस्टर्स यावर कारवाई करण्याच्या तसेच अनधिकृत जाहीरातीवर प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय व तहसलि कार्यालय येथे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत काहीही तक्रार असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करता येणार आहे.
   जिल्हाधिकारी कार्यालयात सहा. करमणूक कर अधिकारी के.व्ही पाटील नोडल अधिकारी असून त्यांचा क्रमांक 7773970909 व 07262-242411, टोल फ्री क्रमांक 100 वर संपर्क करावा. त्याचप्रमाणे तहसिल कार्यालयांमध्ये पुढीलप्रमाणे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलडाणा : निवासी नायब तहसिलदार जी.टी माळी संपर्क क्रमांक 8668811664  व 07262-242283, चिखली :  निवासी नायब तहसिलदारआर.एस कानडजे संपर्क क्रमांक 7350688852  व 07264-242068, खामगांव : निवासी नायब तहसिलदार वाय. एस देशमुख संपर्क क्रमांक 9890566240 व 07263-252138, शेगांव : निवासी नायब तहसिलदार डी. एल मुकुंदे संपर्क क्रमांक 9637252237 व 07265-202008, मलकापूर : निवासी नायब तहसिलदार जी. ई राजगडे संपर्क क्रमांक 9527557271 व 07267-222041, मोताळा : निवासी नायब तहसिलदार जे.डी देशमुख संपर्क क्रमांक 9921596555 व 07267-245231, नांदुरा : निवासी नायब तहसिलदार एन.आर पाटील संपर्क क्रमांक 9764341922 व 07265-220300, मेहकर : निवासी नायब तहसिलदारकु. मीरा जाधव संपर्क क्रमांक 8698221884 व 07268-244524, लोणार : निवासी नायब तहसिलदार आर. डी. डाके संपर्क क्रमांक 9922330658  व 07260-221358, सिंदखेड राजा : निवासी नायब तहसिलदार डॉ. आस्मा मुजावर संपर्क क्रमांक 8805509491 व 07269-234236, दे. राजा : निवासी नायब तहसिलदार मदन जाधव संपर्क क्रमांक 9422516277 व 07261-232068, जळगांव जामोद : निवासी नायब तहसिलदार एन. जी घट्टे संपर्क क्रमांक 9766422598 व 07266-221426 आणि संग्रामपूर : निवासी नायब तहसिलदार डी. ए पवार संपर्क क्रमांक 9767453515 व 07266-232226 आहे. तरी नागरिकांनी संबंधित विषयाशी तक्रार असल्यास या नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            ******
होमगार्ड सदस्य नोंदणीच्या शारिरीक चाचण्यांमुळे रस्ता वाहतुकीमध्ये बदल
बुलडाणा,दि. 16 : होमगार्ड कार्यालय, बुलडाणा यांचे अधिनस्त असलेल्या पथक निहाय अनुशेष भरून काढण्यासाठी होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम 17 एप्रिलपासून सुरू होत आहे. सदर नोंदणी कार्यक्रमानुसार पात्र पुरूष उमेदवारांची 1600 मीटर, महिला उमेदवारांची 800 मीटर धावण्याची चाचणी त्रिशरण चौक ते एडेड हायस्कूल चौक या मार्गाने उजव्या बाजूवर घेण्यात येणार आहे. जवळपास एवढ्या लांबीचा सरळ मार्ग चाचणीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे वाहतूक उजव्या बाजूवरील बंद ठेवून ती पर्यायी त्रिशरण चौक ते एडेड हायस्कूल चौक या डाव्या बाजूने सुरू राहणार आहे. तरी 18 व 19 2018 रोजी सकाळी 6 ते 11 या कालावधीत त्रिशरण चौक ते एडेड हायस्कूल चौक या मार्गाने उजव्या बाजूवरील वाहतूक बंद ठेवून ती पर्यायी त्रिशरण ते एडेड हायस्कूल चौक या डाव्या बाजूने सुरू राहणार आहे. त्यानंतर हा आदेश रद्द होवून वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 33 अन्वये उचित कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                        ******
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा समारोप
बुलडाणा,दि. 16 : जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल 2018 दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम नुकताच सामाजिक न्याय भवन बुलडाणा येथे पार पडला. समारोपीय कार्यक्रमादरम्यान सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मलकापूर रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस बँडच्यावतीने शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सज्जाद,  जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, सहायक आयुक्त मनोज मेरत, जि.प सदस्या जयश्रीताई शेळके, शाहीर डी. आर इंगळे,  आशिष खरात, प्रदीप बोरडे आदी उपस्थित होते.    
      त्यानंतर सामाजिक सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये वसतिगृहातील विद्यार्थीनींनी गीत गायन सादर केले. तसेच काही विद्यार्थीनींनी भाषणांद्वारे आपले मत मांडले. यावेळी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार पात्र विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी संपूर्ण सामाजिक समता सप्ताहाच्या अहवालाचे वाचन केले. संचलन सतीश बाहेकर यांनी, तर आभार प्रदर्शन संदीप कपले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्धव गायकवाड, अश्विन हिवाळे, गजानन धोटे, संदीप घाटोळे, दिपक मेश्राम, शंकर गोमलाडू, अशोक भडके, श्रीमती प्रणिता बावनकर, श्रीमती रेखा बांगरे, राहुल माने, जयेश जाधव, राजू सुरळकर, श्री. खोंडे, श्री. जाधव यांनी प्रयत्न केले.
                                                                        *****
महेश पवार यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन
बुलडाणा,दि. 16 : ई- ग्रंथालय येथे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. दरम्यान 19 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे परिविक्षाधिन तहसिलदार महेश पवार यांचे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 व अन्य स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने व्याख्यान आयोजित केले आहे. तरी कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी 19 एप्रिल रोजी 10.30 वाजता उपरोक्त ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
                                                            *********
जिल्हास्तर युवा पुस्काराकरीता प्रस्ताव प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
 बुलडाणा, दि. 16 : राज्याचे युवा धोरण 2012 अन्वये जिल्ह्यातील युवांनी व संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येत असतो. हा पुरस्कार जिल्हयातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतो.     
        त्यानुषंगाने सदर पुरस्काराकरीता या कार्यालयाच्या वतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु सदर कार्यालयास प्राप्त झालेल्या प्रस्तावांची प्राथमिक छाननी केली असता सदर प्रस्ताव पात्र नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर या कार्यालयाव्दारे पूनश्च प्रस्ताव मागविण्यात येत आहे.  तरी खालील प्रमाणे मुल्यांकनासह व पात्रतेचे निकष पूर्ण करणा-या  बुलडाणा जिल्हयातील युवक,युवती व संस्थांनी या कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन घेवून विहीत नमुन्यातील आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज 19 एप्रिल  2018 पर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावा. तसेच अधिक माहितीकरीता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 12 नोव्हेंबर 2013 रोजीचा शासन निर्णयाचे अवलेाकन करावे व कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी कळविले आहे.
युवक व युवतींसाठी पात्रतेचे निकष-
अर्जदार युवक/युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षे पर्यंत असावे.  जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्हयात सलग 5 वर्ष वास्तव्य असावे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेंस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही.  केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ.) अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रीयाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्हयात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.  केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच विदयापीठ अंतर्गत महाविदयालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
संस्थांसाठी पात्रता निकष -
पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ.) अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रीयाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लीक ट्रस्ट अँक्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्हयात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.अर्जदार/ संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.
पुरस्कारासाठी मुल्यांकन - 
युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य दि. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामिण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य. राज्यात साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य. समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य.शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभून, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य. नागरी गलीच्छ वस्ती सुधारणा, झोपडपटटी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण आदीबाबत कार्य, साहस, इ. बाबतचे कार्य. 
                                                                                    ******




18 एप्रिल रोजी होणारे अपंग तपासणी शिबिर रद्द
बुलडाणा,दि. 16 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी अपंग तपासणी बोर्डात शिबिर सुरू असते. मात्र या बुधवारला दि. 18 एप्रिल 2018 रोजी अक्षय तृतीया सणानिमित्त स्थानिक सुट्टी असल्यामुळे सदर अपंग तपासणी बोर्डातील शिबिर रद्द करण्यात आले आहे. या  शिबिरात अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण / मतिमंद अपंग तपासणीा होत असते. तरी नागरिकांनी जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथील सदर अस्थिव्यंग व नेत्र अपंग तपासणीस येऊ नये. आल्यास झालेल्या गैरसोयीला प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
                                                                        ******
गोदामामधून गहू नेणाऱ्या वाहनाच्या गंतव्य स्थानाची नोंद घेण्यात आली
  • जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा खुलासा
  बुलडाणा,दि. 16 : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, वरखेड पीपीपी टेंभूर्णा, खामगांव येथील गोदामामधून वाहनांमध्ये प्राधान्य कुटूंब योजनेचा गहू भरण्यात आला. तसेच टी.पी वर गंतव्य बुलडाणा हे स्थान नमूद करण्यात आले. या वाहनांचा क्रमांक एमएच 28 एबी 8230 व एमएच -19 झेड 2097 असे आहेत.  वखार महामंडळाच्या स्टेटमेंटमध्ये या वाहनांच्या गंतव्य स्थानाची नोंद नसल्याचे व सदर धान्याचे वाहन काळ्या बाजारात जात असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र या वाहनांच्या गंतव्य स्थानाची नोंद घेण्यात आल्याचा  खुलासा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सादर केला आहे.
   खुलाशानुसार, वाहतुक प्रतिनिधी यांचेकडे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, वरखेड, पीपीपी टेंभूर्णा, खामगांव या दोन्ही गोदामांवर धान्य भरणे सुरू असते.  तसेच दोन्ही गोदाम हे एका ठिकाणी नसल्यामुळे दोन्हीमध्ये जवळपास 7 ते 8 किलोमीटरचे अंतर असल्यामुळे  अनावधानाने बुलडाणा गोदामाला उक्त वाहन पाठवित असल्याची स्टेटमेंटमध्ये घाईगडबडीने नोंद घेण्याचे राहून गेले. तरी नोंद घेवून सुधारीत स्टेटमेंट वाहतूक प्रतिनिधी यांनी सादर केला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                        *****
खरीप हंगामासाठी महाबिजच्या बिजोत्पादनाचे आरक्षण सुरू
  • अंतिम मुदत 10 मे 2018
  बुलडाणा,दि. 16 : खरीप 2018-19 मधील हंगामासाठी बिजोत्पादन कार्यक्रमाचे आरक्षण सुरू झाले आहे. या आरक्षणाची अंतिम मुदत 10 मे 2018 आहे. बिजोत्पादन कार्यक्रमातंर्गत आरक्षणाकरीता 8-अ, चालु वर्षाचा 7/12, आधार कार्ड  व बॅक पासबुकची छायांकितची प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. बिजोत्पादन कार्यक्रम घेण्याकरीता संबंधित बिजोत्पादक स्वत: हजर राहणे बंधनकारक आहे. बिजोत्पादन कार्यक्रमाचे आरक्षणामध्ये महाबीज भागधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर महाबीजचे नियमांचे अधीन राहून बिजोत्पादन कार्यक्रमाचे आरक्षण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी नजीकचे महाबीज तालुका कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा, असे जिल्हा व्यवस्थापक, महाबीज यांनी कळविले आहे.