भूजल व्यवस्थापन आणि साठा विषयावर कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन

 




बुलढाणा, (जिमाका) दि. 9 : जल शक्ति मंत्रालय,जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण यांच्या निर्देशानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील भूजल साठ्याची सद्यस्तिथी, त्यांचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि भूजल माहितीचा प्रभावी वापर या विषयावर केंद्रीय भूमिजल बोर्ड, नागपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दि. 7 जानेवारीला कार्यशाळा संपन्न झाली. तसेच भूजल माहितीचे प्रसारण आणि उपयोग व राष्ट्रीय जलभृत मानचित्रण आणि प्रबंधन कार्यक्रम यावर आधारित या कार्यशाळेतून जलसंधारणाचा आराखडा मांडण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यशाळेची सुरुवात केंद्रीय भूमिजल बोर्ड, नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.एस. पुरती यांच्या उदघाट्नपर भाषणाने झाली. त्यानंतर वैज्ञानिक प्रिती डी .राऊत यांनी बुलढाणा जिल्ह्यासाठीच्या "राष्ट्रीय जलभृत मानचित्रण आणि प्रबंधन कार्यक्रम" यावर सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील जलभंडाराची वैशिष्ट्ये, उपलब्ध भूजल संसाधने आणि भविष्यातील पाणी व्यवस्थापन धोरणांचा आढावा घेण्यात आला. कार्यशाळे दरम्यान, ‘राष्ट्रीय भूजलस्तर नकाशा अहवाल-बुलढाणा जिल्हा’ आणि देशातील कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथांवरील कॉफी टेबल बुकचे औपचारिकपणे प्रकाशन करण्यात आल.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भूजल माहितीच्या प्रसारासाठी सीजीडब्ल्यूबीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. शेतकरी आणि विविध संस्थांना माहितीची सुलभ उपलब्धता आणि प्रभावी वापरासाठी, सीजीडब्ल्यूबी आणि जीएसडीएच्या भूजल डेटाबेसचे संयोजन करणारे एकच व वापरण्यास सोपे एकात्मिक पोर्टल किंवा मोबाइल अँप्लिकेशन असण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. जिल्हास्तरीय नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये या संसाधनांचा सक्रियपणे वापर करण्याचा सल्लाही त्यांनी सर्व संबंधित विभागांना दिला. त्यानंतर एका संवादात्मक अभिप्राय सत्राने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

एका क्लिकवर माहिती

भूजल विषयक डेटाची माहिती सर्वसामान्यांना आणि प्रशासनाला सहज उपलब्ध व्हावी यासाठी वैज्ञानिक प्रिती राऊत यांनी ग्राऊंडवॉटर डेटा डाउनलोड पोर्टल आणि इनग्रेस, इंडिया वारीस सीजीडब्लूए या पोर्टलच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखवले आणि त्रि-स्तरीय नियोजन आणि निर्णय घेण्यासाठी त्यांच्या व्यावहारिक उपयोगावर भर दिला. त्यामुळे आता एका क्लिक वर जिल्ह्याच्या भूजल पातळीची माहिती, जिल्ह्याशी निगडित अहवाल मिळणे सुलभ होईल.

 तज्ज्ञांची उपस्थिती

याप्रसंगी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमानी जोशी आणि भूवैज्ञानिक हरीश कठाळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद, मृद व जलसंधारण, जलसंपदा, लघुपाठबंधारे, कृषि अशा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या