जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ; 30 जानेवारीपासून 'कुसुम' सर्व्हेक्षण मोहिम
बुलढाणा,
दि. 30 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 'स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान' आणि
'कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र' (कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहीम 30 जानेवारी ते
13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा
एक भाग म्हणून 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हाभर कुष्ठरोग
निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.
26 जानेवारी रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील
ग्रामीण व शहरी भागात शपथ कार्यक्रम पार पडला. यामध्ये सर्व ग्रामपंचायती, प्राथमिक
आरोग्य केंद्रे आणि उपजिल्हा रुग्णालये, नगरपालिका व महानगरपालिका दवाखाने, शाळा, महाविद्यालये,
आश्रमशाळा आणि अंगणवाड्या, शासकीय व निमशासकीय कार्यालय सहभागी झाले होते. ग्रामपंचायत
स्तरावर सरपंचांच्या भाषणाचे वाचन करण्यात आले, ज्यामध्ये कुष्ठरोगाचा कलंक पुसून टाकण्याचे
आवाहन करण्यात आले.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान आणि कुष्ठमुक्त सुरक्षित
महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या
कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या 15 दिवसांच्या पंधरवड्यात आरोग्य
विभागामार्फत विशेष सर्व्हेक्षण केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विविध उपक्रमांद्वारे
कुष्ठरोगाबद्दलची भीती व गैरसमज दूर करणे. दुर्गम भाग, वीटभट्ट्या, खाणी आणि स्थलांतरित
वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तपासणी करणे. नवीन रुग्ण शोधून त्यांना तात्काळ उपचाराखाली
आणणे, जेणेकरून संसर्गाची साखळी खंडित होईल. कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार
आहे. त्यामुळे या पंधरावड्यात कुष्ठरोग जनजागृती अभियान आणि कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र
(कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले आहे.
000000
Comments
Post a Comment