Friday 17 May 2024

DIO BULDANA NEWS 17.05.2024









 आंबा महोत्सवात 40 आंब्याच्या प्रजातींचे प्रदर्शन

*नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलडाणा, दि. 17 : कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवा आंब्याच्या विविध 40 प्रजातींचे प्रदर्शन ठेवण्यात आले. या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या प्रदर्शनी आज उद्घाटन केले.

जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि नागरिकांना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी, यासाठी अजिंठा रोडवरील कृषि विज्ञान केंद्रात शुक्रवार, दि. १७ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्री पार पडली. या महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ४० जातींचे आंबे प्रदर्शनीमध्ये विक्रीसाठी ठेवले होते. तसेच आंब्यावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केलेल्या विविध खाद्य पदार्थांचे महिला बचतगटांचे ७ दालन होते.

आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सावजी, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश कानवडे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र जाधव, माविमचे सहजिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, विनायक सरनाईक उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आंबा घन लागवड पद्धतीचे फायदे सांगितले. तसेच भारतीय आंबा फळाला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत बाजारपेठेत प्रचंड मागणी असल्याने त्याच्या लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आंबा महोत्सव आयोजनाबाबत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू यांनी माहिती दिली. पुरुषोत्तम उन्हाळे यांनी आंब्याच्या स्थानिक जाती व जैवविविधतेची सांगड घालून शेतकऱ्यांनी आंबा लागवड करावी असे आवाहन केले. मनोजकुमार ढगे यांनी आंबा फळबाग लागवड आणि शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले. डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी जिल्ह्यात आंब्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

महोत्सवात स्थानिक आंबा जातींची ओळख, आंबा फळाच्या विविध वाणांची प्रदर्शनी व विक्री, आंबा लागवड व व्यवस्थापनासाठी तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन आणि आंब्याच्या वाणांची कलम विक्री, तसेच आंब्यापासून बनविलेले विविध प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले.

मनेश यदुलवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भारती तिजारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अनिल तारू, डॉ. एन. एस. देशमुख, डॉ. भारती तिजारे, प्रवीण देशपांडे, मनेश यदुलवार, कृतिका गांगडे, कोकिळा भोपळे. अनुराधा जाधव, अनिल जाधव, शिवाजी पिसे, नयन चव्हाण यांनी पुढाकार घेतला.

00000

चिखली, शेगाव येथील वसतीगृहातील प्रवेश प्रक्रियेस सुरवात

बुलडाणा, दि. 17 : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अधिनस्त वसतीगृह मागास व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चिखली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, शेगाव येथील वसतीगृहातील शैक्षणिक वर्ष 2024-2025 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्‍यात आली आहे.

मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र राहणार आहेत. शालेय, कनिष्ठ महाविद्यालय व महावि‌द्यालयीन, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता चिखली व देऊळगाव राजा येथील नगरपालिकेच्या हद्दीतील शाळा, वि‌द्यालय, महावि‌द्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रथम व द्वितीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र आहेत. प्रवेश अर्ज करण्याची अंतिम दि. 18 मे 2024 असून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी दि. 25 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरावेत. असे आवाहन चिखली वसतिगृहाचे गृहपाल व्ही. एस. शिंदे भ्रमनध्वनी क्रमांक 985046436 आणि शेगाव वसतिगृहाचे गृहपाल श्रीमती आर. जे. लेंडे भ्रमनध्वनी क्रमांक 9420433974, 9284041108 यांनी केले आहे. आधिक माहिती करिता भ्रमनध्वनीवर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वसतीगृहाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरींना मंजुरी

बुलडाणा, दि. 17 : पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात 28 गावांसाठी 23 कुपनलिका आणि 14 गावात 18 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.

पाणीटंचाई निवारणार्थ जळगाव जामोद तालुक्यातील 7 गावात, शेगाव तालुक्यातील 21 गावात, 23 कुपनलिका व 18 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विंधनविहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, यांनी करावयाचा आहे. जळगाव जामोद तालुक्यातील इस्लामपूर आदिवासी वस्ती, मैलगड पायथ्यासी, निमखेडी रेलास चोंगळटापरी, डुक्करदरी घोघरा धनसिंग महाराज, वाडी बु, पारधी वाडा, गोमाळ, चाळीस टापरी आणि शेगाव तालुक्यातील लासुरा बु., चिंचोली, नागझरी, वरखेड बु., कालखेड, येउलखेड, हिंगणा वैजनाथ, जलंब, निंबी, माटरगाव बु,, माटरगाव खु., डोलारखेड, भास्तन, कालवड, सगोडा, कठोरा, भोनगाव, बोंडगाव, खातखेड, पहूर पुर्णा, तरोडा डी, मनसगाव येथे विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावामधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चित मदत मिळणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

00000

पाणीटंचाई निवारणार्थ टँकर मंजूर

बुलडाणा, दि‍. 17 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. डोंगर खंडाळा, ता. बुलडाणा येथे एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. डोंगरखंडाळा गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.

000000


Thursday 16 May 2024

DIO BULDANA NEWS 16.05.2024

 शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी

*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा, दि. 16 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासह अतिवृष्टी आणि इतर कारणांमुळे मिळणाऱ्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी. ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय लाभाची रक्कम बँक खात्यात जमा होणार नसल्याने शेतकऱ्यांनी प्राधान्याने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन‍ जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात सध्यास्थितीमध्ये 94 हजार 628 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. यात बुलडाणा 10,454, चिखली 17,507, देऊळगाव राजा 7,894, सिंदखेड राजा 7,455, मेहकर 10,637, लोणार 11,463, मोताळा 2,493, मलकापूर 3,511, नांदुरा 6,271, खामगाव 1,772, शेगाव 2,772, जळगाव जामोद 5,897, संग्रामपूर 6,502 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित असलेली ईकेवायसी केल्यास त्यांच्या बॅंक खात्यात तातडीने मदतीची रक्कम जमा करण्यात येते.

जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख 42 हजार 824 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. यातील 8 लाख 24 हजार 831 शेतकऱ्यांची माहिती मंजूर करण्यात आली आहे. 2 लाख 36 हजार 277 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करणे बाकी आहे. विविध योजनांतर्गत 7 लाख 16 हजार 830 शेतकऱ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत 94 हजार 628 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे त्यांना लाभाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ई-केवायसी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र आणि महाऑनलाईन केंद्रांची यादी buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलबध आहे. यात बुलडाणा 94, चिखली 103, देऊळगाव राजा 50, सिंदखेड राजा 84, मेहकर 124, लोणार 63, मोताळा 83, मलकापूर 57, नांदुरा 73, खामगाव 119, शेगाव 58, जळगाव जामोद 50, संग्रामपूर 55 या केंद्रावर शेतकऱ्यांना ईकेवायसी करता येणार आहे.

शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून विविध योजनेत दिली जाणारी मदत, अनुदान ई-केवायसी प्रलंबित असल्याने ती मिळण्यास अडचण जाते. ही प्रक्रिया प्रलंबित असल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी अभावी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय व तालुक्यातील कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000



दहिद येथे बीजोत्पादन कार्यक्रम

बुलडाणा, दि. 16 : कृषि संपन्न शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे दहिद खु. येथे बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

माजी सरपंच प्रकाश कळवाघे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील श्री. सुरगडे उपस्थित होते. कलश सीड कंपनीचे रिजनल मॅनेजर अमोल शिंगणे यांनी बीजोत्पादन कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक श्री. अंभोरे यांनी सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविले. यामध्ये सेंद्रीय अमृत शेतकरी उत्पादक कंपनी बुलढाणा, कृषि संपन्न शेतकरी उत्पादक कंपनी दहिद खु., जिजाऊ शेतकरी उत्पादक कंपनी अंभोडा, गोसंवर्धन शेतकरी उत्पादक कंपनी सोयगाव आदी कंपनीचे शेतकरी सभासद उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी ए. टी. सुरडकर यांनी प्रास्तविक केले. गजानन इंगळे यांनी आभार मानले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक उपस्थित होते.

00000

Wednesday 15 May 2024

DIO BULDANA NEWS 15.05.2024



 मतमोजणीचे कार्य जबाबदारीने पार पाडावे

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 15 : लोकसभा निवडणूकीचा अंतिम टप्पा हा मतमोजणी हा आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी ही संवेदनशील बाब आहे. त्यामुळे मतमोजणीमध्ये प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना नेमून दिलेली कामे जबाबदारीने पार पाडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज अधिकारी आणि कर्मचारी यांचे निवडणुकीच्या मतमोजणीबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, अजिंक्य गोडगे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, डॉ. रामेश्वर पुरी, शैलेश काळे, संजय खडसे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, मतदार नोंदणी, त्याची पडताळणी, मतदान आणि मतमोजणी हे चार टप्पे निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानापर्यंतची प्रक्रिया पार पडली आहे. आता मतमोजणी हा अतिशय संवेदनशील टप्पा पार पाडावयाचा आहे. मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. सर्व्हीस वोटर, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे पोस्टल मतदान आणि इव्हीएमवरील मतदान मोजण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी सर्वांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नेमून दिलेली कामे जबाबदारीने वेळेत पार पाडावी. मतमोजणीच्या दिवशी वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, तसेच मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेता येणार नसल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबतच्या निर्देशाचे पालन करावे. मतमोजणीचे कार्य अत्यंत संवेदनशील असल्याने कर्मचाऱ्यांनी पूर्ण वेळ सजगतेने कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

यावेळी डॉ. पुरी आणि श्री. पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबत प्रशिक्षण दिले.

000000

पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाण्यांसाठी अर्ज घेण्यास सुरवात

बुलडाणा, दि. 15 : महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून पीक प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाण्यांसाठी अर्ज घेण्यास सुरवात झाली आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२४-२५ मध्ये अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके, नगदी पिके कापूस व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य अंतर्गत खरीप  हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्याक्षिके वैयक्तिक शेतकरी, गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करून नोंदणी करावी लागणार आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके, नगदी पिके कापूस व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीत धान्य कार्यक्रम जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो. यात कडधान्य पिकामध्ये तूर, मुंग, उडीद, सोयाबीन अधिक तूर, भरडधान्य पिकात मका, पौष्टिक तृणधान्यात खरीप ज्वारी, गळीत धान्य व तेलताडामध्ये सोयाबीन, भुईमूग, तीळ, व्यापारी पिकात कापूस यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

शेळी, कुक्कुट, गाय, म्हैस पालन प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 15 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे शेळी, कुक्कुट, गाय आणि म्हैस पालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळी, कुक्कट, गाय, म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. २१ ते २५ मे २०२४ या पाच दिवसाच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा हा आहे.

सदर प्रशिक्षणात शेळी, कुकुट आणि गाय म्हैस पालनाचे तंत्र आणि प्रकार त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्यनिर्मिती व चार्याचे प्रकार व उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण सहकार्य त्यासोबतच उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, सहकार्य, शासकीय योजनांची माहिती आदी प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे.

प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार किमान पाचवी पास, वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल, प्रशिक्षण नोंदणीसाठी दि. २१ मे २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा संपर्क क्रमांक ८२७५०९३२०१, ९०११५७८८५४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.

00000

Tuesday 14 May 2024

DIO BULDANA NEWS 14.05.2024

 


राजे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

बुलडाणा, दि. 14 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज राजे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

राजे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त तहसीलदार माया माने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार संजीवनी मुपळे, नायब तहसीलदार प्रमोद करे, विधी अधिकारी गजानन पदमने, नाझर गजानन मोतेकर, सुरेश खोडके, नंदकुमार येसकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी राजे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

000000

शेगाव जवाहर नवोदय विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

बुलडाणा, दि. 14 : इयत्ता दहावी व बारावीच्या केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) परीक्षेत पीएम श्री स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, शेगावने उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. इयत्ता बारावी विज्ञान शाखेमधून 37 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात प्रथम स्थान ओम जयवाल 91.60 टक्के, द्वितीय आदित्य दांडगे 86.40 टक्के, तृतीय रोहिनी इखारे 85.60 टक्के प्राप्त केले.

इयत्ता बारावी कला शाखेतून 21 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात प्रथम शरयू शांताराम पाटील 94.80 टक्के, द्वितीय श्रद्धा क्षीरसागर 91 टक्के, तृतीय पुजा मुन 85.80 टक्के प्राप्त केले.

इयत्ता दहावी मधून 78 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. प्रथम पीयूष खडके 98 टक्के, द्वितीय समीक्षा धुरंधर 94.60 टक्के, श्रद्धा मांटे 94.60 टक्के, तृतीय कुणाल किन्होळकर 93.80 टक्के गुण मिळविले.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. कसर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर, कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

000000

कृषी विज्ञान केंद्रात शुक्रवारी आंबा महोत्सव

*नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 14 : बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शुक्रवारी, दि. 17 मे रोजी एक दिवसीय आंबा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात आंबा प्रदर्शनी आणि विक्री करण्यात येणार आहे. नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी विज्ञान केंद्र नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याचे कार्य विविध माध्यमातून करीत आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि आंबा प्रेमींना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी, यासाठी अजिंठा रस्त्यावरील कृषि विज्ञान केंद्रामध‌्ये कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग आणि आत्माच्या वतीने सकाळी 9 वाजता आंबा महोत्सव, प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील आंबा सदर महोत्सवात विनाशुल्क विक्रीसाठी ठेवता येईल.

आंबा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अधिष्ठाता श्यामसुंदर माने, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळपांडे उपस्थित राहणार आहेत.

तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश कानवडे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र जाधव, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवात स्थानिक आंबा जातींची ओळख, आंबा फळाच्या विविध वाणांची प्रदर्शनी व विक्री, आंबा लागवड व व्यवस्थापनासाठी तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन आणि आंब्याच्या वाणांची कलम विक्री, तसेच आंब्यापासून बनविलेले विविध प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. महोत्सवात शेतकरी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अनिल तारू यांनी केले आहे.

000000

चिखली, देऊळगाव राजा येथील वसतीगृहातील प्रवेश प्रक्रियेस सुरवात

बुलडाणा, दि. 14 : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अधिनस्त वसतीगृह मागास व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, चिखली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह देऊळगाव राजा येथील वसतीगृहातील शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्‍यात आली आहे.

मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र राहणार आहेत. शालेय, कनिष्ठ महाविद्यालय व महावि‌द्यालयीन, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता चिखली व देऊळगाव राजा येथील नगरपालिकेच्या हद्दीतील शाळा, वि‌द्यालय, महावि‌द्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रथम व द्वितीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र आहेत. प्रवेश अर्ज करण्याची अंतिम दि. 18 मे 2024 असून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी दि. 25 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरावेत. असे आवाहन चिखली वसतिगृहाचे गृहपाल पी. टी. राठोड भ्रमनध्वनी क्रमांक 9503228982 आणि देऊळगाव राजा वसतिगृहाचे गृहपाल व्ही. आर. सोनवाल भ्रमनध्वनी क्रमांक 9921831277 यांनी केले आहे. आधिक माहिती करिता भ्रमनध्वनीवर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वसतीगृहाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000


Monday 13 May 2024

DIO BULDANA NEWS 13.05.2024

 


ब्युटीपार्लर प्रशिक्षणास सुरूवात

बुलडाणा, दि. 13 : सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे 30 दिवसीय मोफत निवासी ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यात 35 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून रुपाली शिंदे ह्या आहेत.

आरसेटीचे संचालक संदीप पोटे यांनी, सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था परिवर्तनशील हब म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण तरुणांना कौशल्य, ज्ञान आणि उद्योजकीय प्रवास सुरू करण्यासाठी आत्मविश्वासाने सक्षम करीत असल्याचे मार्गदर्शन करताना सांगितले.

00000

शेगाव येथील वसतीगृहातील प्रवेश प्रक्रियेस सुरवात

बुलडाणा, दि. 13 : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह शेगाव, जि. बुलढाणा येथील वसतीगृहातील शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्‍यात आली आहे.

मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या, तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र राहणार आहेत. शालेय, कनिष्ठ महाविद्यालय व महावि‌द्यालयीन, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता व शेगाव येथील नगरपालिकेच्या हद्दीतील शाळा, वि‌द्यालय, महावि‌द्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र आहेत. प्रवेश अर्ज वसतिगृहात विनामुल्य उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरावेत. असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल व्ही. ल. बघे यांनी केले आहे. आधिक माहिती करिता भ्रमनध्वनी क्रंमाक 8208661488 यावर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वसतिगृहाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Friday 10 May 2024

DIO BULDANA NEWS 10.05.2024

 


जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

बुलडाणा, दि. 10 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, नाझर गजानन मोतेकर, अपेक्षा जाधव, वर्षा मुळे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले.

000000

शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

बुलडाणा, दि. 10 : बुलडाणा जिल्ह्यात खरीप 2017 च्या हंगामात शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. खरीप 2018 ते 2023 मध्ये राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला आहे.  येत्या खरीप 2024 च्या हंगामामध्ये शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी क्षेत्रिय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे.

शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत झाला नसल्यास प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते.  हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता खरीप 2024 मध्ये शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी अनेक उपाययोजनांपैकी एक उपाययोजना म्हणून हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही, यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मान्सूनपूर्व लागवड टाळण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

उपाययोजना म्हणून दि. 16 मे 2024 पासून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून प्रत्यक्ष लागवड ही दि. 1 जून 2024 नंतरच केल्यास शेंदरी, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होईल. याकरिता क्षेत्रीय स्तरावरील कटाक्षाने पालन करण्याबाबत तंत्र अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, सर्व पंचायत समिती यांच्यामार्फत काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येत आहे. उपविभागीय कृषि अधिकारी यांच्यामार्फत सनियंत्रण ठेवण्यात येणार आहे. शेंदरी बोंड अळीचे चक्र भेदण्यासाठी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड थांबविण्याबाबत कापूस बियाणे पुरवठा करण्याबाबत दि. 1 ते 10 मे 2024 दरम्यान उत्पादक कंपनी ते वितरक, दि. 10 मे 2024 नंतर वितरक ते किरकोळ विक्रेता, दि. 15 मे 2024 नंतर किरकोळ विक्रेता ते शेतकरी आणि दि. 1 जूननंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

या निर्देशाचे उल्लंघन झाल्यास संबंधीत कंपनी, वितरक, किरकोळ विक्रेता यांच्यावर महाराष्ट्र कापूस बियाणे पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किंमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन अधिनियम 2009 नुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी कळविले आहे.

00000

शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 10 : विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळविण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षासाठी ऑफलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हास्तरावरील मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन २०२४-२५ करीता ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी स्थानिक वसतीगृहात प्रवेशाकरीता सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, बुलडाणा येथे अर्ज उपलब्ध असून सदर अर्ज कार्यालय सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, बुलडाणा येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरीता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

संबंधित जिल्हास्तरावरील वसतीगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन सदर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कार्यालय सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

मलकापूर, नांदूरा तालुक्यात कलम 144 लागू

बुलडाणा, दि. 10 : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी, दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्याचा समावेश असल्याने याठिकाणी दि. 11 मे च्या सायंकाळी 6 वाजल्यापासून दि. 13 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदूरा तालुक्याचा समावेश असल्याने येथे दि. 13 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यत मतदान होणार आहे. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात कोणताही भंग होऊ नये, सदर आचार संहितेचे यथायोग्य पालन होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध लागू केले आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्‍या परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात दि. 11 मे 2024 च्या सायंकाळी 6 वाजल्यापासून दि. 13 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध लागू केले आहे.

यामुळे सदर कालावधीत बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहील. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता मतदान पथके मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये ध्वनीक्षेपकांच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध राहणार आहे. तसेच मतदान केंद्राच्या 200 मीटर त्रिज्येच्या परिसरात कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणाऱ्या किंवा जसाच्या तसा ऐकविणारे उपकरण संच लावणे, वापरणे आणि चालविण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे.

मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठया साध्या पांढऱ्या कागदावर असाव्यात व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रित करण्यावर बंदी राहणार आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनांना बंदी राहणार आहे. मतदान केंद्रात मतदार, उमेदवार आणि त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळवलेल्या व्यक्तीनाच प्रवेश राहणार आहे. या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मतदानकेंद्रात प्रवेशावर बंदी असेल. मतदारांना लाच देणे, मतदारावर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपट दाखविणे, तोतयेगिरी करणे, तसेच मतदान केंद्राचे 100 मीटर परीसरात प्रचार करण्यास बंदी राहणार आहे.

मतदारांना मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावर ने-आण करण्याचे प्रथेस पायबंद घालण्यासाठी टॅक्सी, खासगी कार, ट्रॅक, ऑटो रिक्शा, मिनी बस, स्टेशन व्हॅन, स्कूटर, मोटार सायकल आदी सर्व प्रकारच्या वाहनावर बंदी राहणार आहे मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान केंद्राचे परिसरात भित्तीपत्रके, ध्वज, चिन्ह आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करण्यास बंदी राहणार आहे. ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेल, अशी कोणतीही व्यक्ती त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदारकेंद्राचे 100 मीटर परिसरात प्रवेश करणार नाही. तसेच अशी व्यक्ती मतदार असली तरी निव्वळ मतदान करण्याकरिता सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदार केंद्र परिसरात ये-जा करण्यावर निर्बंध राहील. विशेष सुरक्षा व्यवस्था प्रदान केल्या व्यक्तीच्या विशेष सुरक्षा पथकास शस्त्रांसह मतदान केंद्राचे केवळ दारापर्यंत संरक्षित व्यक्तीसोबत जाता येईल. एका वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यास शस्त्राचे प्रदर्शन न करता, तसेच मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे अडथळा न करता संरक्षीत व्यक्तीस मतदान केंद्रात सोबत करता येईल.

ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेल किंवा त्या व्यक्तीकडे खासगी सुरक्षारक्षक आहेत, अशा कोणत्याही व्यक्तीस निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंदी राहील. मतदान केंद्रात मतदानाचे दिवशी मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट आदी नेण्यास प्रतिबंध राहिल. मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख, निवडणूकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी यांना सदर प्रतिबंध लागू राहणार नाही.

निर्बंधांचे कालावधीत रावेर लोकसभा मतदारसंघातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्यामधील निवडणूक प्रचार दि. 11 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद होत असला तरी घरोघरी जाऊन प्रचारावर निर्बंधाचे कालावधीत प्रतिबंध असणार नाही. परंतू 5पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. दवाखान्याच्या गाड्या, अॅम्बुलन्स, दुधगाड्या, पाण्याचे टँकर्स, विद्युत विभाग, पोलीस, निवडणूक कर्मचारी यांच्या वाहनावर बंदी राहणार नाही. विहित मार्गाने जाणाऱ्या बस गाड्यावर बंदी राहणार नाही. टॅक्सी इत्यादी वाहने बस स्टेशन, रेल्वे स्टेशन हॉस्पीटलकडे जाणारी वाहने यावर बंदी राहणार नाही. दिव्यांग, आजारी व्यक्तीस मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणे-येण्याकरीता आजारी, दिव्यांग व्यक्तीचे वैयक्तीक वाहनास बंदी असणार नाही.

सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

00000

पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 10 : शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन 2024 मध्ये जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी बियाण्याची पेरणी करू नये, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेत जमिनीची ओल 4 ते 6 इंच किंवा 100 मीमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी कोणत्याही बियाण्याची पेरणी करू नये, जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसताना पेरणीची घाई केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेले बियाण्यांचे अंकुरण होणार नाही किंवा अंकुरण होऊन जळण्याची भिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शेतकऱ्यांचा वेळ व आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या संदेशानुसार 100 मीमी पाऊस पडल्यानंतरच किंवा जमिनीची ओल 4 ते 6 इंच किंवा जमिनीमधील उष्णता जाईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाची धूळपेरणी करू नये. खरीप हंगामातील सर्व पिके जमिनीत पुरेशी ओल म्हणजेच जमीन 4 ते 6 इंच ओल झाल्याची खात्री करूनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

00000

बाल शक्ती पुरस्कार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 10 : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ५ वर्षे पेक्षा अधिक आणि १८ वर्षापर्यंतच्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज awards.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहे. यासाठी मुलांचे वय दि. ३१ जुलै २०२४ रोजी ५ वर्षापेक्षा अधिक आणि १८ वर्षांपेक्षा कमी आहे, अशा मुलांनी त्यांचे प्रस्ताव संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आदी अर्ज करु शकतील. जास्तीत जास्त मुलांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण कक्षाने केले आहे.

00000

Thursday 9 May 2024

DIO BULDANA NEWS 09.05.2024

 अपघातामध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू अधिक

*परिवहन विभाग उपाययोजना करणार

बुलडाणा, दि. 9 : जिल्ह्यातील अपघाताच्या आकडेवारीमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने हेल्मेटचा वापराची सक्ती करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. गेल्या जानेवारी ते डिसेंबर 2023 मध्ये एकूण 628 अपघात झाले आहेत. यातील 308 अपघातात 387 मृत्यू झाले आहे.  यावर्षी जानेवारी ते मार्च 2024 या तीन महिन्याच्या कालावधीत 192 अपघात झाले असून 101 जणांचा मृत्यू झाला आहे. 192 अपघातांमध्ये सर्वाधिक 83 अपघात दुचाकीचे झाले आहेत. तसेच 34 चारचाकी वाहन, 69 जड वाहने, 6 तीनचाकी वाहनांचा अपघात झाला आहे. गेल्या वर्षीच्या तीन महिन्याच्या तुलनेत यावर्षी 39 अपघात, तर 21 मृत्यू वाढले आहेत.

टिप्परच्या धडकेने मृत्यू होत असल्याने टिप्परची तातडीने तपासणी करावी. याबाबत सातत्याने कार्यवाही करण्यात यावी. विना क्रमांकाच्या टिप्परवर तातडीने कार्यवाही करावी. अपघात रोखण्यासाठी गतिरोधक, माहितीसाठी फलक, वेगमर्यादेचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. यासाठी बांधकाम विभागाने मोहिम घेऊन गतीरोधकांवर पांढऱ्या पट्ट्या आखाव्यात, रस्त्याच्या कडेला फलक लावून संदेश देण्यात यावे. तसेच फलकावर मदतीसाठी पोलिस, रुग्णालयाचे संपर्क क्रमांक. जवळच्या रुग्णालयाची माहिती देण्यात यावी. अपघात प्रवण क्षेत्रात सूचना देणारे फलक लावण्यात यावे. तसेच रस्ता सुरक्षेसाठी उजव्या बाजूने चालावे, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

दुचाकीच्या वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यात सुरवातीला एक महिना हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच वेगमर्यादा पाळणे, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे, मादक पदार्थाचे सेवन करून वाहन चालवू नये याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील अपघातामध्ये दुचाकीचे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. अपघातात घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंब उध्वस्त होते. तसेच महिलांवर जबाबदारी येते. त्यामुळे दुचाकी चालकांनी स्वत: आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी हेल्मेट वापरावे. दुचाकी चालविताना मोबाईलचा वापर टाळून बेकदारपणे वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना लागू

*बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद

बुलडाणा, दि. 9 : राज्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ लागू करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. 10 मे रोजी अक्षय तृतीया असल्याने या दिवशी बाल विवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ लागू असून याचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २०२२ देखील लागू आहेत. या अधिनियमानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी, तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच ग्रामीण भागाकरीता अंगणवाडी सेविका, तसेच शहरी भागाकरिता पर्यवेक्षिकांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

अक्षयतृतीया या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होऊ शकतात. यास प्रतिबंधक म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास सदर पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाह झाल्यास, संबंधित वर-वधूंचे आई-वडिल किंवा पालक व अन्य नातेवाईक, मित्र परिवार, मंदिरातील विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटिंग प्रेस, वाजंत्री, सभागृह व्यवस्थापक, कॅटरिंग अशा सर्वांनी बालविवाह घडविण्यास प्रत्यक्ष मदत केली किंवा तो रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, जे अशा विवाहात सामील झाले होते, अशा सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. सोबत ग्रामसेवकांनी जन्म दाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.

दि. १० मे २०२४ रोजीच्या अक्षयतृतीयेला संभावित बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी बालविवाह प्रतिबंधात्मक अधिनियमातील तरतुदीनुसार बालविवाह रोखण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

00000







उन्हाळी प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास शिबीराचा समारोप

बुलडाणा, दि. 9 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, तसेच जिल्ह्यातील एकविध खेळांच्या संघटनांतर्फे दोन सत्रात जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आणि व्यक्तीमत्व विकास शिबीर पार पडले. शिबीराचा समारोप शनिवार, दि. 4 मे रोजी करण्यात आला.

शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षक तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी चंद्रकांत इलग, महाराष्ट्र राज्य ॲथलेटीक्स असोसिएशन उपाध्यक्ष गोपालसिंग राजपूत, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, नेहरु युवा केंद्राचे अजयसिंह राजपूत, मुख्याध्यापक गजानन इंगळे, प्रशिक्षक विजय वानखेडे, सागर उबाळे आदी उपस्थित होते.

यावेळी अजयसिंह राजपूत आणि गोपालसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले. शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शिबीरात राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली विविध एकविध खेळ संघटनेचे तज्‍ज्ञ मार्गदर्शक, राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले. विजय वानखेडे यांनी मैदानी खेळ, उज्वला लांडगे, मनोज श्रीवास, अनिल चव्हाण यांनी हॅण्डबॉल, मोहम्मद इद्रीस यांनी कबड्डी, सागर उबाळे यांनी खो-खो, चंद्रकांत इलग यांनी आर्चरी, राहुल औशलकर यांनी फुटबॉल खेळाचे मार्गदर्शन केले.

बी. एस. महानकर यांनी प्रास्ताविक केले. मनोज श्रीवास यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विनोद गायकवाड, सुहास राऊत, कृष्णा जाधव, तेजस्वीनी घाडगे यांनी पुढाकार घेतला.

00000