Wednesday 27 April 2022

DIO BULDANA NEWS 27.4.2022,1

 शिक्षण विभागाला 1 मे पासून सेवा हमी कायदा होणार लागू

  • सेवा हमी कायद्यातंर्गत 105 सेवांचा असणार समावेश

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : राज्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कलम 3 मधील पोट कलम 1 लोकसेवा घोषीत करण्यात येते. त्यानुसार सेवा हमी कायदा 1 मे 2022 पासून शिक्षण विभागास लागू करण्यात येत आहे. या सेवांमध्ये शिक्षण विभागातंर्गत 105 सेवांचा समावेश असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांकरीता 35 सेवा व शिक्षकांकरीता 70 सेवांचा समावेश आहे. तरी नागरिकांनी याबाबत नोंद घेवून शिक्षण विभागाकडील सेवांचा सेवा हमी कायद्यानुसार लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद यांनी केले आहे.

                                                                        *********

पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावाणी

  • जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम योजनातंर्गत अंमलबजावणी
  • 4 मे ते 13 मे दरम्यान अर्ज देवून स्वीकारणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत सन 2021-22 या वर्षात मंजूर निधीतून पारधी समाजाच्या विकासासाठी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमध्ये पारधी / फासेपारधी समाजाच्या जमातीकडून योजनांसाठी अर्ज 4 मे ते 13 मे 2022 दरम्यान सुटीचे दिवस वगळून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला कार्यालयातून छापील अर्ज विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच अर्ज सदर कार्यालयामध्ये स्वीकारण्यात येणार असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारिख 13 मे 2022 रोजी कार्यालयीन वेळ असणार आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. योजनांमध्ये पारधी समाजाच्या 50 शेतकरी लाभार्थ्यांना शेतीकरीता 100 टक्के अनुदानावर काटेरी तार कुंपन खरेदी करण्यासाठी डीबीटीद्वारे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.  तसेच पारधी समाजातील शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 50 महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदानावर डीबीटीद्वारे अर्थसहाय्य  देण्यात येणार आहे. पारधी समाजाच्या 100 युवक/ युवतींना 30 दिवस कालावधीचे अनिवासी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून सोबत परवानाही देण्यात येणार आहे, तरी इच्छूक पारधी समाजातील लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांनी केले आहे.

                                                                                *******

चिखली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भरती मेळाव्याचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली येथे महींद्रा अँन्ड महींद्रा लिमीटेड, चाकण, पुणे या कंपनीकरीता 4 मे 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता ट्रेनी पदांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर पदाकरीता एसएससी, एचएससी, आयटीआय उत्तीर्ण व वयाची 18 ते 29 वर्ष पुर्ण झालेले असावे. उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ असावा. कंपनीतर्फे बस, कँटीन, मेडीकल इन्शुरन्स, युनिफॉर्म आदी सुविधा उपलब्ध असून वेतन दरमहा 12 हजार ते 13 हजार 500 देण्यात येणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी 2 मे 2022 रोजी सायं 5 वाजेपर्यंत शासकीय आयटीआय बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, दे.राजा, सिं.राजा येथे नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी शासकीय आयटीआय चिखली येथे श्री. कुलथे यांच्या 9822780535, श्री. बेदरकर यांच्या 9405105884 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य व्ही. बी बचाटे यांनी केले आहे.

                                                *****

DIO BULDANA NEWS 27.4.2022



 उमंग ॲपसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामित्त 26 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात डिजीटल इंडिया मोहिमे अंतर्गत उमंग ॲपबाबत प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेला जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सुनील खुळे यांनी उमंग या मोबाईल ॲपबाबत विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, उमंग हे एक केंद्र शासनाचे अॅप असून या ॲपमध्ये शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध प्रकारचे अॅप एकच ॲपमध्ये समाविष्ट केले आहेत. या सोबतच ज्येष्ठ पनागरिकां सर्विस किंवा नागरिकांसाठी जीवन प्रमाण तसेच इतर युटिलिटी बिल पेयमंट करता येते. हे ॲप 13 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून त्याचे 3.25 कोटी युजर्स आहेत. या कार्य शाळेसाठी महसूल, पुरवठा, पंचायत समिती व कोषागार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.   

                                                            ***********

मुद्रांक शुल्काच्या दंडाबाबत दंड सवलत अभय योजना जाहीर

  • योजनेचा लाभ घेण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 :  मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावरील शास्तीची कपात करण्याकरीता मुद्रांक शुल्क आकारण योग्य आहे. अशा संलेखाच्या बाबतीत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध कलमातील तरतुदीनुसार मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमधील 31 मार्च 2022 पुर्वी नोटीस मिळाली आहे. अशा प्रकरणांवरील देय असणारी शास्तीच्या रक्कमेवर सुट देण्यात आली आहे.  सदर योजनेतंर्गत अर्ज दाखल करण्याची मुदत दिनांक 1 एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2022  असणार आहे. तसेच 1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीसाठी दंड सवलत ही दंड रकमेच्या 90 टक्के असणार आहे.  त्याचप्रमाणे 1 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कलावधीसाठी दंड सवलत ही दंड रकमेच्या 50 टक्के असणार आहे. सदर योजनेचा अर्ज www.igrmaharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या ऑनलाईन अर्जातील परिपूर्ण माहिती संकेतस्थळावर भरल्यानंतर त्याची छापील प्रत अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. तरी या दंड सवलत अभय योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि. शं भोसले यांनी केले आहे.

                                                                        ********                                             

Tuesday 26 April 2022

DIO BULDANA NEWS 26.4.2022


 अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी

-          जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया

  • जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 :  जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री, पुरवठा अथवा साठा करणाऱ्यांचा शोध घेण्यात यावा. कुठेही अंमली पदार्थांबाबत विक्री, पुरवठा किंवा साठा निदर्शनास आल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी. गुन्हे दाखल करून आरोपींवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी आज दिल्या.  

    जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या दालनात आज 26 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना जिल्हा पोलीस अधिक्षक बोलत होते.  यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त श्री. राठोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक भाग्यश्री जाधव, सहाय्यक आयुक्त (औषधे) अतुल बर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी बळीराम गिते आदी उपस्थित होते.

  शेड्युल्ड ड्रग्ज विक्री करणाऱ्या औषधी दुकानांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना देत जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणाले, शेड्युल्ड ड्रग्ज दुकांने तसेच याबाबत माहिती देण्यासाठी ड्रग्ज असोसिएशनची बैठक बोलवावी.  जिल्ह्यात अफु किंवा गांज्याची लागवड होत असल्याची माहिती आल्यास, निदर्शनास आल्यास तातडीने कारवाई करावी. त्यासाठी पोलीस स्टेशननिहाय आढावाही घेण्यात यावा. कुरीअर किंवा पोस्टाच्या माध्यमातून येणाऱ्या पार्सलची कसून तपासणी करावी. विदेशातून येणारे पार्सल किंवा विदेशात पाठविण्यात येणाऱ्या पार्सलच्या तपासणीसोबतच देणाऱ्या तसेच घेणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रेसुद्धा तपासावीत.

ते पुढे म्हणाले, जिल्हास्तरावर अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे  उत्पादन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. तसेच कारखाने बंद असल्यास त्यावर विशेष लक्ष ठेवावे. एनडीपीएस अंतर्गत गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांच्याकरीता प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात यावे. यावेळी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा सुचना केल्या.

                                                                                ***********

                  पेरणीसाठी सोयाबीनचे स्वत:कडील चांगले बियाणे उपयोगात आणावे

  • कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षापर्यंत वापरात येते.  शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतक-यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासुन उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरु शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्याक्षिक योजनेतंर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.

    प्रमाणित बियाण्यांपासून वरीलप्रमाणे आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्याची उगवणक्षमता

अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्कयांपेक्षा जास्त नसावे. साठवणूकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्‍यावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रति हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी.

    सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे.तसेच 75 ते 100 मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.  बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी. तरी पेरणीसाठी सोयाबीनचे स्वत:कडील चांगले बियाणे उपयोगात आणावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

                                                                                                ***********

 

पाच गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : बुलडाणा तालुक्यातील चौथा, गिरडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गोंधनखेड, डोंगरखंडाळा, वरवंड ग्रा.पं अंतर्गत असलेल्या गोंधनखेड व चिखली तालुक्यातील कोलारा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. चौथा येथील लोकसंख्या 2250 असून येथे दररोज 64 हजार 920 लीटर्स पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. गोंधनखेड ग्रा.पं गिरडा येथील लोकसंख्या 445आहे. येथे दररोज 23 हजार 400 लीटर्स पाणी पुरविण्यात येणार आहे. तसेच डोंगरखंडाळा येथील लोकसंख्या 7544 असूल येथे दररोज 1 लक्ष 60 हजार 970 लीटर्स पाण्याचा पुरवठा होणार आहे.  गोंधनखेड ग्रा.पं वरवंड येथील लोकसंख्या 102 आहे. येथे दररोज 12 हजार 40 लीटर पाणी पुरविण्यात येईल. तसेच कोलारा येथील 4640 लोकसंख्येला दररोज 1 लक्ष 72 हजार 800 लीटर पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी,  बुलडाणा यांनी कळविले आहे.

*********

 

Monday 25 April 2022

DIO BULDANA NEWS 25.4.2022,1

 आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रीया सुरू

  • 29 एप्रिल 2022 पर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम सन-2009 अन्वये दरवर्षी संपुर्ण राज्यामध्ये RTE25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2022-23 या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सदयस्थितीत सुरु असून आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाबाबतची लॉटरी(सोडत) बुधवार 30 मार्च 2022 रोजी राज्यस्तरावर काढण्यात आलेली आली आहे.  आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेशपात्र व प्रतिक्षा यादीवरील विदयार्थ्यांची यादी शासनाची अधिकृत वेबसाईट www.25admission.maharashtra.gov.in जाहीर करण्यात आली असून पालकांना वेबसाईसला भेट देवून यादी पाहता येईल.

  निवडपात्र ठरलेल्या पालकांना मोबाईलवर मेसेज पाठविण्यात आलेले आहेत. आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंर्गत निवड झालेल्या विदयार्थ्यांना शासन निर्देशानुसार 20 एप्रिल 2022 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. मात्र शासनाने सन 2022-23 वर्षातील आरटीई 25 टक्के प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याकरीता दि.29 एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी याबाबत जिल्हयातील सर्व शाळा, पालक व तालुकास्तरावरील संबधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी. तसेच जिल्हयातील पालक, शाळा, तालुकास्तरावरील संबधित यंत्रणा यांनी जास्तीत जास्त बालकांना प्रक्रियेमध्ये सहभागी करण्याचे दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, बुलडाणा कार्यालयाचे वतीने करण्यात येत आहे.

**********

 

एसटी महामंडळाची संपूर्ण वाहतुक सुरू; लांब पल्याच्या बसेस सुरळीत

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाची संपूर्ण वाहतुक 22 एप्रिल पासून सुरू झालेली आहे. तसेच लांब, मध्यम – लांब पल्ला व आंतरराज्य बसेस आगार निहाय सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या फेऱ्यांचे आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरीता प्रवाशांनी https://msrtc.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर व मोबाईलचे  MSRTC Mobile Reservation App  द्वारे सुद्धा आरक्षण सुविधेचा लाभ घेवून महामंडळाच्या सुरक्षित व किफायतशीर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, रा.प यांनी केले आहे.

अशा आहेत आगारनिहाय लांब, मध्यम लांब पल्ला व आंतराज्य बसफेऱ्या

बुलडाणा : अमरावती सकाळी 6.30, 8, 10.15, दु. 12 व सायं 4. औरंगाबाद सकाळी 7, सायं 4.45 वा, दु. 3.30 वा. धुळे सकाळी 7.15, परतवाडा दु 1, लातुर सकाळी 8.30 वा, नागपूर सकाळी 9, 11 वा, दु 1.30, रात्रौ 9 वा, यवतमाळ दु 3.30 वा, पुणे स 9.15 , रात्रौ 9.15 वा, बऱ्हाणपूर सकाळी 7.15, 11.15. चिखली : जळगांव खां सकाळी 6, 9.15, 11.45, नागपूर सकाळी 9.15 वा, पुणे स 7.30 वा, सायं 6.30 वा शिवशाही, शिर्डी स. 6,मुंबई दु 4, त्र्यंबकेश्वर सकाळी 9.30, बऱ्हाणपूर स.9 व 11, नाशिक स. 8.15, खामगांव : अमरावती सायं 4 व 5.30, औरंगाबाद स. 9.30, धुळे दु 12.30,  नांदुरीगड स. 8.30, शिर्डी स. 7 व 10.30, नाशिक स 9.45,  मेहकर : जळगांव खां स. 6, 9, व 9.15, औरंगाबाद स. 6 व 9, 10, 11, दु 2, पुणे स 6.30, 7, 8 व रात्रौ 8 वा, आंबेजोगाई स. 6.30 वा, पंढरपूर स. 8.15वा, लातूर स. 9.45 वा, नागपूर स. 7.30, बऱ्हाणपूर स. 7.30 वा, मलकापूर : औरंगाबाद सकाळी 4.45 वा, 5.15, 6, 7, 7.30, 7.45 , 8.15, 8.45, 9.30, 10.15, 11,  दु. 12 व 2, वाशिम स. 7.30, वझर सरकटे स. 8, सोलापूर स. 7.45, नांदेड स. 9, पुणे स. 6.45 वा, सायं 6.30, जळगांव जामोद : अमरावती स. 6, 6.30, 7.30, औरंगाबाद स. 5.30, 7.30, दु. 2.30. नागपूर स. 7, 10, पुणे स. 8 व 9.15 वा, बऱ्हाणपूर स. 7.05, दु. 1.30 वा. शेगांव : यवतमाळ दु. 1.15 वा, औरंगाबाद स. 6.15 वा, 8.30 वा, शिर्डी स. 9.15, पंढरपूर स. 7.30, चंद्रपूर स. 9, पुणे स. 7, नागपूर दु. 2, उज्जैन स. 7.45, बऱ्हाणपूर सायं 5 वा.

                                                            **********       

 

जिल्ह्यातील नवोदीत व ‘स्टार्ट अप्सनी स्टार्ट- अप आणि नाविन्यता

आधारित ज्ञान’ कार्यक्रमात सहभागी व्हावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागातंर्गत स्थापना झालेल्या महाराष्ट्र नाविन्यता सोसायटी मार्फत नाविण्यपूर्ण दृष्टीकोनांना व प्रयत्नांना उत्तेजन देणे, राज्यात नाविण्यपूर्ण उद्योगांसाठी पुरक असे वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. या दृष्टीकोनातून सिस्को लॉचपॅड यांचे सहाकार्याने भारताच्या टेक्नोप्रेन्यारशिप मालिकेच्या महाराष्ट्र आवृत्तीचे आयोजन करत आहे. त्यानुसासर सुरूवातीच्या टप्प्यात तरूण विद्यार्थ्यांसाठी स्टार्ट अप, व्यवसाय – उद्योजकांसाठी आधारित ज्ञान सत्र आयोजित करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील नवोदीत व ‘स्टार्ट अप्सनी स्टार्ट- अप आणि नाविन्यता आधारित ज्ञान’ कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 जेथे जिल्ह्यातील नवोदीत आणि स्टार्ट-अप्संना त्यांची कल्पना कशी तयार करावी, टिकवून ठेवावी,  विस्तारीत व्हावे आणि मोठे कसे करावे याबाबत ज्ञान दिले जाणार आहे. या कार्यक्रमात उत्पादन विकास, डिझाईन विचार, तंत्रज्ञान व आर्थिक व्यवस्थापन व्यवसाय ज्ञानाचा एक भाग म्हणून निधी कसा उभारावा यासारख्या विविध विस्तृत विषयांचा समावेश आहे. यासांबधी बिझीनेस सेशसनचे सर्व सत्र 25 ते 29 एप्रिल दरम्यान सायं 5 ते 6 वाजेदरम्यान व टेक्नॉलॉजी सेशनचे सर्व सत्र 2 मे ते 6 मे दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार 26 एप्रिल रोजी प्रोडक्ट डेव्हलपमेंट, 27 एप्रिल रोजी क्रिएटींग अँण्ड सेफ गार्डींग आय.पी, 28 एप्रिल फायनान्स फंडामेंटल्स, 29 एप्रिल रोजी फंड रेझिंग, टेक्नॉलॉजी सेशनमध्ये 2 मे रोजी ए.आय व एम. एला, 3 मे रोजी एंटरप्राईज क्लाऊड सोल्युशन्स- मोराकी, 4 मे रोजी सिस्को डिजीआइजेस अँण्ड सेक्युअरस ओ.टी एन्व्हायरमेंट्स, 5 मे रोजी आय.ए.सी ॲण्ड हायब्रीड क्लाऊड, 6 मे रोजी ब्लॉक चेन विषय असणार आहे. तरी या विविध सत्रांत सहभागी होण्यासाठी https://cs.co/CLAPMAHARASHTRA  वेबपोर्टलवर विनाशुल्क पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यायोगे आपणास विविध सत्रात सहभागी होता येईल तसेच यासंबधीच्या अधिक माहितीकरीता technopreneurship@cisco.com या ई-मेलचा वापर करावा, असे आवाहन  सहायक आयुक्त श्रीमती बारस्कर यांनी केले आहे.

                                                            ***********  

DIO BULDANA NEWS 25.4.2022

 


जागतिक मलेरीया दिनानिमित्त जनजागृती रॅली व कर्मचाऱ्यांचा गौरव

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  जागतिक मलेरीया दिनानिमित्ताने आज 25 एप्रिल रोजी जिल्हा हिवताप कार्यालय व आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती रॅली व उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानुसार सुरूवातीला जिल्हा सामान्य रूग्णालय येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. गोफणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते,  जिल्हा परीचारीका प्रशिक्षण केंद्राच्या श्रीमती खेडेकर व श्रीमती उईके, नितीन श्रीवास्तव,श्री. हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   या प्रसंगी जिल्हयातील बहुतांश: आरोग्य कर्मचारी व प्रशिक्षणार्थी परीचारीका रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जिल्हा हिवताप अधिकारी एस.बी. चव्हाण यांनी जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्याचा उद्देश जिल्हयातील हिवतापा संबधीची परीस्थिती सांगीतली व लवकरच जिल्हा मलेरिया मुक्त होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असून मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे सांगितले. याप्रसंगी उत्कृष्ठ कार्य करणा-या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी नर्सींगच्या

विद्यार्थींनी किटकजन्य रोगाविषयीचे पथनाटय सादर केले. तसेच वन्य जीवसोयरे परीवाराने तयार केलेल्या किटकजन्य आजाराविषयीच्या लघुपटाचे विमोचन करण्यात आले.

     तद्नंतर मान्यवरांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी जिल्हा हिवताप दुरीकरण लवकरच करेल अशी आशा व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांनी हिवतापाचा प्रतिबंधात्मक उपाययोजना करतांना जास्तीत जास्त सामाजिक सहभाग कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उकृष्ट कार्य करणा-या आरोग्य कर्मचा-यांचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या कर्मचा-यांमध्ये सर्वोत्कृष्ट आरोग्य पर्यवेक्षक  प्रथम पुरस्कार एल.आर. पांडे खामगांव, विशेष पुरस्कार श्रीमती निता अवचार, मंगेश दलाल डेंग्यू सेंटीनल सेंटर बुलडाणा, सर्वोत्कृष्ट प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रथम पुरस्कार एस.बी. पुंडकर, प्रा.आ.केंद्र भोनगाव, द्वितीय पुरस्कार ओ.डी.तिवारी, प्रा.आ. केंद्र,पि.गवळी व  तृतीय पुरस्कार श्रीमती ए.एन.जाधव प्रा.आ.केंद्र दे.माळी व जी के बैरी  यांना तसेच उत्कृष्ट आरोग्य सहाय्यक प्रथम पुरस्कार व्ही.जे.हूंबड प्रा.आ.केंद्र नरवेल, जी.एस नागरे, प्रा.आ केंद्र आडगांव राजा, द्वितीय पुरस्कार एम.एस.चिंचोळकर, प्रा.आ.केंद्र सोनाळा, तृतीय पुरस्कार पी.डी.जाधव बुलडाणा उत्कृष्ट आरोग्य कर्मचारी  प्रथम पुरस्कार व्ही.टी.वायाळ, प्रा.आ.केंद्र डोणगांव, द्वितीय पुरस्कार सुशिल एन.वाघ चिखली शहर तृतीय पुरस्कार, पी.एच.वैराळकर प्रा.आ.केंद्र गणेशपूर व विलास घुगरे प्रा.आ.केंद्र मडाखेड यांना प्रथम पुरस्कार तसेच प्रोत्साहनपर  के. पी. आनंदे, आरोग्य कर्मचारी प्रा.आ.केंद्र रोहणा, आरोग्य सेविका श्रीमती रुपाली तांबेकर, प्रा.आ.केंद्र दे.माळी, द्वितीय श्रीमती शिवगंगा आघाव प्रा.आ.केंद्र अंढेरा, तृतीय पुरस्कार श्रीमती प्रतिभा चव्हाण प्रा.आ.केंद्र अटाळी, जयश्री भगत, कमल उबाळे व अलका डोंगरदिवे आशा वर्कर या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. रॅलीमधील कर्मचाऱ्यांचे टी-शर्ट व कॅप यावरील आरोग्य संदेश यांनी सर्वाचेच लक्ष वेधून घेतले.

   जिल्हा मलेरिया पतसंस्था व जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या सौजन्याने सदर टी-शर्ट व कॅप पुरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाल हिवाळे, एस.एस.गडाख, पी.डी.जाधव, श्रीमती.टी.आय.शेख, मनोज जगताप, प्रवीण सपकाळ, डी.सी जाधव, अनिल बिलारी,आर.जी.पाखरे, जी. एन. साळोख,श्री. वनारे, श्री. काकडे, एल.एस.साळोख, प्रवीण धुळधर, श्री. बेंडवाल, श्री. सरदार, श्री. सवन, श्री. गवळी आदींनी प्रयत्न केले. संचालन सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पी.बी होगे यांनी तर आभार प्रदर्शन आरोग्य पर्यवेक्षक एल.आर. पांडे यांनी केले.

*********

शिष्यवृत्तीचे 2198 अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित

  • अर्ज निकाली काढण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण, इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत

असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परिक्षा शुल्क या योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजने अंतर्गत महाडिबीटी प्रणालीवर विदयार्थ्यांनी ऑनलाईन केलेले अर्ज महाविदयालय स्तरावर पाठविले जातात. महाविदयालयाने त्यांच्या स्तरावर प्राप्त अर्जांची तपासणी करून शिष्यवृत्तीकरिता पात्र अर्ज या कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे. तसेच त्रृटी असलेले अर्ज विदयार्थ्यांच्या लॉगीनला परत करणे आवश्यक आहे. मात्र वारंवार सुचना देवुनही बुलडाणा जिल्हयातील 2198 विदयार्थ्यांचे अर्ज महाविदयालय स्तरावरच प्रलंबित आहेत.

   त्यानुसार प्रलंबित अर्ज असलेल्या महाविद्यालयांनी अनु जती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे महाविदयालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तपासणी करून पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बुलडाणा यांच्या लॉगीनला तात्काळ पाठविण्यात यावे व त्रुटी असलेले अर्ज त्रुटींची पुर्ततेकरिता विदयार्थी लॉगीनला परत करावे, अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवल्याप्रकरणी 50 हजार रूपये दंड व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

     तरी जिल्हयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालयांनी आपल्या महाविद्यालयातील मागासवर्गीय विदयार्थी शिष्यवृत्ती लाभापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी. महाविदयालयांनी त्यांच्या स्तरावरिल प्रलंबित अर्ज संख्या तात्काळ निकाली काढण्याचे आवाहन डॉ.अनिता राठोड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, बुलडाणा यांनी केले आहे.

 *****



पालकांनी खेळाडूंना उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्याकरीता प्रोत्साहीत करावे

-        आमदार संजय गायकवाड

  बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनातुन खेळाडूंनी खेळ संस्कृती जोपासुन, योग्य खेळाची निवड करुन, सराव केल्यास, जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू जिल्ह्याचे, राज्याचे, राष्ट्राचे नावलौकीक करतील. अशा उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात येत असलेले उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर हे मोलाचे ठरत आहे तालुका क्रीडा संकुल, बुलडाणा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची आर्चरी रेंजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आहे.  शरीराच्या शारीरिक, मानसिक व बौध्दीक प्रगतीसाठी खेळासारखा उत्तम पर्याय नाही.  प्रत्येकाने कोणताही एक खेळ खेळला पाहिजे, त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतीपादन आमदार संजय गायकवाड यांनी आज केले.

      जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयबुलडाणा व जिल्हा क्रीडा परिषदबुलडाणा तसेच  जिल्ह्यातील विविध खेळांच्या एकविध संघटना यांचे संयुक्त विद्यमाने उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे जिल्हास्तरावर मैदानीआर्चरीकबड्डीखो-खोहॅण्डबॉलफुटबॉलबास्केटबॉलकराटेबॉक्सिंगजिम्नॅस्टीक आदी खेळाचे प्रशिक्षण शिबीर 22 एप्रिल ते 12 मे या कालावधीतजिल्हा क्रीडा संकुलक्रीडानगरीजांभरुन रोडबुलडाणा येथे सकाळी 6 ते 8.30 व सायंकाळी 5 ते 7.30 या दरम्यान आयोजन सुरु आहे.  सदर शिबीरामध्ये बुलडाणा शहरातील व आजु-बाजुच्या परिसरातील सुमारे 200 ते 300 खेळाडू सहभागी झाले असुन प्रशिक्षणार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांकडून नियमित मार्गदर्शन सुरु आहे. आज 25 एप्रिल रोजी आमदार संजय गायकवाड यांनी प्रशिक्षण शिबीराला भेट दिली. सकाळच्या सत्रात प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्याहस्ते सकस आहाराचे वाटप करण्यात आले.  याप्रसंगी आंतरराष्ट्रीय सायकल पटू संजय मयुरे यांचेसुध्दा स्वागत करुन करण्यात आले.

संचालन हॅण्डबॉल प्रशिक्षक मनोज श्रीवास यांनी तर आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी मानले.  याप्रसंगी गजानन घिरके, विजय वानखेडे, रवि भगत, अरविंद अंबुसकर, संजय चितळे, प्रा. रिंढे, मोहम्मद सुफीयान, सुहास राऊत उपस्थित होते.  शिबीरा दरम्यान सकाळच्या सत्रात सर्वप्रथम राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली.  सहभागी खेळाडूंना रोज सकाळच्या सत्रात अल्पोपहार, खाऊ वाटप जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येते.

    शिबीराचे यशस्वी आयोजनाकरीता कार्यालयातील क्रीडा अधिकारी बी.के.घटाळे आर.आर.धारपवारविजय बोदडेए.एच.चांदुरकर, विनोद गायकवाडकैलास डुडवाभिमराव पवारकृष्णा नरोटेगणेश डोंगरदिवे यांनी प्रयत्न केले.   शिबीरामध्ये अधिकाधिक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

                                                **********

Friday 22 April 2022

DIO BULDANA NEWS 22.4.2022,1

 



आरोग्य सुविधांची पुर्तता करून रूग्णांचे जीवन सुकर करा

-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

चिखली येथे आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : शासकीय रूग्णालयांमध्ये गोर गरीब उपचारासाठी येतात. त्यांना आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडू नयेत. प्रत्येक आरोग्याची सुविधा ही शासकीय रूग्णालयांमध्ये असायला पाहिजे.  तरी आरोग्य यंत्रणेने शासकीय रूग्णांलयांमध्ये आरोग्य सुविधांची पुर्तता करून रूग्णांचे जीवन सुकर करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज दिल्या. 

  चिखली येथील स्वरांजली हॉटेलच्या सभागृहात आरोग्य व संबंधित यंत्रनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी आमदार श्वेताताई महाले, आमदार ॲड आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन एम राठोड उपस्थित होते.  

   जिल्ह्यातील माता मृत्यूंची कारणे शोधण्याच्या सूचना करीत डॉ. पवार म्हणाल्या, बाल मृत्यू दर कमी होत आहे. मात्र माता मृत्यू दर वाढत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळवावे. रूग्णालयांना आवश्यक असलेल्या साहित्याची मागणी नोंदवावी. आलेल्या साहित्याचा रूग्णसेवेत उपयोग करावा. जिल्ह्याला प्राप्त झालेली सर्व व्हेटींलेटर सुरू ठेवावी. एकही व्हेंटीलेटर बंद असता कामा नये. बंद असल्यास संबंधितांवर कारवाई करावी. चिखली रूग्णालयाला सिटी स्कॅन मशीन देण्यात यावा. त्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. जिल्ह्यात 44 डायलिसीस युनीट पाच केंद्राच्या माध्यमातून सुरू आहेत. जिल्ह्यात किडनी आजाराच्या रूग्णांची संख्या लक्षात घेता हे सर्व युनीट व्यवस्थित सुरू ठेवावे. त्याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. डायलीसीसचे वेटींग रूग्ण कमी करावे. तसेच रूग्णालयात ग्लुकोमीटरसह सर्व आवश्यक सुविधा द्याव्यात. नसलेलया ठिकाणी एक्स रे मशीन, इसीजी मशीन द्याव्या. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तेथील आवश्यक औषधे व तपासण्यांची यादी लावावी.   

   याप्रसंगी राष्ट्रीय आरोग्य मिशनची तरतूद  व खर्च, आयुष्यमान भारत योजना, प्राथमिक व उपकेंद्र इमारती, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदींचाही आढावा घेण्यात आला. बैठकीला संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. 

DIO BULDANA NEWS 22.4.2022

 



आरोग्य यंत्रणेच्या सक्रिय सहभागाने कोविड लसीकरण मोहीम यशस्वी

-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

धाड येथील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन व आरोग्य शिबिर

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : भारतात कोरोनाचे 187 कोटी लसीकरण करण्यात आले आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. कठीण परिस्थितीवर मात करत मोठ्या प्रमाणावर लसीकरण हे केवळ वैद्यकीय यंत्रणेने सतत घेतलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे लसीकरण मोहिम यशस्वी होऊ शकली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज केले.

   धाड ता. बुलडाणा येथे ग्रामीण रूग्णालयात आयोजित आरोग्य मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार श्वेताताई महाले, सरपंच सावित्री बोर्डे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांच्यासह विजयराज शिंदे, देवीदास पाटील आदी उपस्थित होते.

    सुरूवातीला धाड येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.   केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, देशात चार हजार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे येत्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही. कोरोनाच्या काळात शासनाने कोणालाही वाऱ्यावर सोडले नाही. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना घरपोच राशन दिले गेले. जनधन, शेतकरी सन्मान योजना, उज्वला योजना, तसेच आरोग्याच्या विविध योजना राबविल्यामुळे कठीण परिस्थितीतही नागरिकांचे जीवन सुखी झाले.

     त्या पुढे म्हणाल्या, मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर आरोग्य यंत्रणा आणि आशा कार्यकर्त्यांमुळे गावापर्यंत शासन पोहोचू शकले. सध्या 12 वर्षावरील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. लसीकरणाचे कार्यक्रम यशस्वीपणे घेऊन आरोग्य सेवा देण्यासाठी यंत्रणेने सतत प्रयत्नशील असावे. आज शासन ई-संजीवनी आणि मोफत औषधांच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा देत आहे. आरोग्य सेवा ही मानवतेची सेवा आहे, ही जाणीव ठेवून कार्य करण्यात येत आहे.  धाड येथील ग्रामीण रुग्णालयात एक्स रेची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पामुळे येथील नागरिकांना सुविधा मिळाली आहे, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

आमदार श्वेताताई महाले यांनी आरोग्य यंत्रणेने उत्कृष्ट कार्य केले. त्यामुळे कोरोनाच्या लाटांवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. येत्या काळात महिलांमध्ये वाढीस असलेल्या गर्भाशय कर्करोगावरील लसीकरण अभियान राबविण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी डॉक्टर फोर यू च्या डॉ. वैशाली वेणू, देविदास पाटील, सुनील देशमुख, विजयराज शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच डॉक्टर फोर यू च्या डॉ. वैशाली रेणू आणि साकेत झा यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला धाड भागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

                                                                ***************

 



मातृशक्ती सक्षम करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी

-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

  • चिखली येथील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन व गरोदर माता आरोग्य तपासणी शिबिर

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : मातृत्व हे स्त्रीला लाभलेले वरदान आहे. त्यामुळे गरोदर माता व स्तनदा मातांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सजगतेने काम करीत आहे. देशातील ही मातृशक्ती सक्षम करण्यासाठी शासन पातळीवरून विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचा निश्चितच लाभ मातांना होत असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज व्यक्त केला. चिखली येथील मुकूल वासनिक सांस्कृतिक भवन येथे गरोदर माता तपासणी शिबिर व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी आमदार श्वेताताई महाले, आमदार ॲड आकाश फुंडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन एम राठोड आदींसह मान्यवर उपस्थित होते.

   कार्यक्रमाच्या सुरूवातीला 1 कोटी रूपये खर्च करून निर्मित केलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. पवार यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच चिखली मतदार संघातील जलजीवन मिशन, केंद्रीय मार्ग निधी, पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत होणाऱ्या 42.12 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपुजन कार्यक्रमस्थळी करण्यात आले.

  गरोदर मातांनी नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन करीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, गरोदर मातांच्या तपासणीचा खर्च व औषधे पुरविण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविते. यामध्ये शासन अर्थसहाय करते. तसेच जननी सुरक्षा योजना, बाल सुरक्षा योजना, आयुष्यमान भारत, पंतप्रधान जनआरोग्य योजना राबविते. आयुष्यमान भारत योजनेसाठी लाभार्थी चिन्हीत करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना वर्षाला पाच लक्ष रूपयांचे आरोग्य विमा कवच देण्यात येते. त्यामुळे आरोग्यावरील खर्च लाभार्थ्याला करण्याची गरज पडत नाही. पॅनलवरील रूग्णालयातून उपचार करण्यात येतात. जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून औषधांवरील खर्चही कमी करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे.  देशात 12 वर्षापुढील बालकांनाही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.    

   आमदार श्वेताताई महाले यावेळी म्हणाल्या, चिखली येथील रूग्णालय 50 बेडचे असून ते 100 बेड करण्यात यावे. तसेच चिखली येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात यावे. उंद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून अद्ययावत करावे. तालुक्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच आमदार ॲड आकाश फुंडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पंडीत देशमुख यांनीसुद्धा आपले विचार यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी गरोदर माता तपासणी शिबिर आयोजनामागील भूमिका विषद केली. शिबिरात गरोदर मातांची तपासणी करण्यात येवून त्यांना औषधे देण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, परीसरातील गरोदर मातांची उपस्थिती होती.

                                                            ***********

Thursday 21 April 2022

DIO BULDANA NEWS 21.4.2022

 नागरिकांच्या मागास प्रवर्ग आरक्षणासाठी स्थापित समर्पित आयोगास सूचना सादर कराव्यात

  • 10 मे 2022 शेवटची मुदत

बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : मा. सर्वोच्च न्यायालयन रिट याचिका क्रमांक 980 / 2019 मध्ये 4 मार्च 2021 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी समर्पित आयोग स्थापन करण्‍याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 11 मार्च 2022 रोजीच्या अधिसुचनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग गठीत करण्यात आला आहे.  

    सदर आयोग दिलेल्या कार्यकक्षेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्याच्या अनुषंगाने नागरिकांकडून, संस्थांकडून, संघटनांकडून व नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून अभिवेदन, सुचना मागवित आहे. त्यानुसार आपले अभिवेदन, सुचना लेखी स्वरूपात dvbccmh@gmail.com या ईमेल आयडीवर, +912224062121 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा आयोगाच्या कक्ष क्र. 115, पहिला माळा, ए 1 इमारत, वडाळा टर्मिनल, वडाळा आरटीओ जवळ, वडाळा, मुंबई 400037 या पत्त्यावर 10 मे 2022 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                                    ******

नरवेल गावात 29 एप्रिल रोजी मद्य विक्रीची दुकाने बंद राहणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : मलकापूर तालुक्यातील नरवेल गावात शुक्रवार, 29 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 व्या जयंतीनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक निघणार आहे. तरी सदर उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधीत रहावी, यासाठी मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 142 अन्वये शुक्रवार 29 एप्रिल रोजी एक दिवस नरवेल ता. मलकापूर येथील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवाना कक्ष व बिअर बार अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहे. त्यानुसार नमूद दिवशी नरवेल येथे मद्य विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकांविरूद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद आहे.  

*****

एकलव्य निवासी शाळेतील प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

  • प्रवेश परीक्षेसाठी अर्ज 5 मे पर्यंत सादर करावे

बुलडाणा,(जिमाका) दि. 21 : सन 2022-23 शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यान्वीत इंग्रजी माध्यमाच्या  एकलव्य मॉडेल रेसीडेन्सीयल स्कुलमधील प्रवेशासाठी 5 जुन 2022 रोजी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगर पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये 5 वी, 6 वी, 7 वी व 8 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमाती विद्यार्थी पात्र असतील

   या सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पात्र विद्यार्थ्यांकडून भरून घेवून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाकडे सादर करावे. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय अथवा अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचेकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. सदर अर्ज 5 मे 2022 पर्यंत प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकामार्फत सादर करावे. सदर प्रवेश परीक्षा 5 जुन रोजी सकाळी 11 ते दु 1 वाजेदरम्यान शासकीय आश्रमशाळा कोथळी ता. बार्शिटाकळी जि अकोला व घाटबोरी ता. मेहकर येथे घेण्यात येणार आहे,  असे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.

                                                                                *****

Wednesday 20 April 2022

DIO BULDANA NEWS 20.4.2022


 किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियानातंर्गत किसान क्रेडीट कार्डचे वितरण

•      24 एप्रिल ते 1 मे दरम्यान राबविले जाणार अभियान

·                     24 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्रालयाच्यावतीने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्डचे वितरण करण्यासाठी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियान 24 एप्रिल ते 1 मे 2022 या कालावधीत राबविण्यात येणार असून यासाठी रविवार 24 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजनही करण्यात येणार आहे, अशी माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आज दिली. अभियानाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्री. पठारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा उपनिबंधक भुवनेश्वर बदनाळे, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे डॉ. खरात, नायब तहसिलदार संजय बनगाळे आदी उपस्थित होते.

     या अभियानातंर्गत ज्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड मिळालेले नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्डचे वितरण करावयाचे आहे. त्यासाठी 24 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधीत करणार आहे. सदर अभियान जिल्हा प्रशासन, नाबार्ड, बँका यांच्या सहकार्याने राबवायचे आहे. ग्रामपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, बँकेचे प्रतिनिधी यांनी ग्रामसभेत उपस्थित राहून पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड वितरणासाठी सक्रीय सहभाग घ्यावयाचा आहे.  पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी बँकनिहाय उपलब्ध करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तरी पीएम किसान योजनेच्या ज्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड मिळालेले नसेल, त्यांनी या अभियानाच्या माध्यमातून 24 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभेला उपस्थित रहावे, असे आवानही यावेळी करण्यात आले.

*****

                            चिखली येथे आयोजित जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर उत्साहात

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या सुचनेनुसार 6 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह राबविण्यात आला. सदर सप्ताहात 12 एप्रिल रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलडाणा कार्यालयामार्फत श्री. शिवाजी महाविद्यालय, चिखली येथे स 11 ते सायं 5 पर्यंत एकदिवसीय विशेष शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात इयत्ता 11 व 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेले तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित असलेले विद्यार्थी, सीईटी परीक्षा देणारे विद्यार्थी, पदविका तृतीय वर्षात शिकत असलेले विद्यार्थी यांना जात प्रमाणपत्र पडताळणी संबंधी परिपूर्ण ऑनलाईन अर्ज करणे व त्यासोबत जाती दाव्यानुसार आवश्यक कागदपत्रे सोबत जोडणे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच यावेळी ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्यात आले. समितीने निकाली काढलेल्या प्रकरणांच्या जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय साळवे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन केले.

                                                            ***********


चिखली तालुका स्तरीय खरीप पूर्व आढावा बैठक उत्साहात

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : चिखली तालुका स्तरीय खरीप पूर्व आढावा सभा पंचायत समिती सभागृह, चिखली येथे 18 एप्रिल रोजी आमदार श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.  सदर सभेची सुरुवात भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे उपस्थित होते.

   आमदार श्वेता ताई महाले यावेळी म्हणाल्या,  घरचे बियाणे वापरणे, बीज प्रक्रिया, बीबीएफ पेरणी, पट्टा पद्धतीने पेरणी, टोकण पद्धतीने पेरणी, वाढीच्या अवस्थेत सोयाबीन पिकाला युरिया खत न देणे, तूर पिकाचे शेंडे खुडणे, 10 टक्के खत बचत, खतांचे नियोजन, बियाणे उगवण क्षमता इत्यादी मोहिमा गावा-गावात कृषी सहाय्यक यांनी प्रभाविपणे राबवाव्यात. त्यासाठी त्यांनी गावामध्ये खरीप पूर्व सभा आयोजित कराव्यात त्याच बरोबर शेतकऱ्यांचे खरीप हंगाम चांगला जाण्यासाठी बियाणे खतांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

   तालुका कृषी अधिकारी खरीप हंगाम 2022 मध्ये तालुक्याचे पेरणी, निविष्ठा व विविध मोहिमांबाबत सादरीकरण अमोल शिंदे म्हणाले, खरीप हंगाम 2022 मध्ये एकूण 87 हजार 767 हेक्टर पेरणीचे नियोजन केले असून त्यामध्ये सोयाबीन 68 हजार हेक्टर, तूर 12 हजार हेक्‍टर, कापूस 1200 हेक्टर, मुंग 2300 हेक्टर, उडीद 3500 हेक्टर व इतर पिके असे नियोजन आहे. सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी उपलब्ध असल्याने बियाणे टंचाई राहणार नाही. सदर सभेमध्ये प्रति हेक्‍टरी उत्पादकता लक्षांक सोयाबीन 22 क्विंटल प्रति हेक्‍टर, मुंग 10.50 क्विंटल प्रति हेक्‍टर, उडीद 11 क्विंटल प्रति हेक्‍टर,0कापूस 17.50 क्विंटल प्रति हेक्‍टर व तूर 9.50 क्विंटल प्रति हेक्‍टर असा निश्चित केलेला आहे.

   सदर लक्षांक साध्य करण्यासाठी प्रभावी शेतीशाळा, योग्य पेरणी पद्धत, निविष्ठांचा नियोजन, कीड-रोग नियंत्रण इत्यादी विविध मोहिमा प्रभावी जनजागृती करून साध्य करण्याचे निश्चित केले आहे. महाडीबीटी द्वारे यांत्रिकीकरण, फलोत्पादन, पी एम के एस वाय योजनांमधून सन 2021-22 मध्ये 4.90 कोटी अनुदान वितरित करण्यात आले. तसेच पोकरा योजनेमधून आज पर्यंत 16.38 कोटी अनुदान वितरित केल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले. सदर सभेस विविध विभागांचे तालुकाप्रमुख, कृषी निविष्ठा विक्रेते संघ चिखली चे पदाधिकारी उपस्थित होते.  संचालन श्री. खान यांनी तर आभार प्रदर्शन संदीप सोनुने यांनी केले, असे तालुका कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        **********

 केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री 21 व 22 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 21 एप्रिल रोजी औरंगाबाद येथून चिखली येथे रात्री 8 वाजता आगमन व मुक्काम, दि. 22 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वा चिखली येथून वाहनाने धाड ता. बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता धाड येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती, स 11 वाजता धाड येथून चिखलीकडे प्रयाण, स 11.30 वा चिखली येथे आगमन व चिखली येथे जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठकीस उपस्थिती, दु 2.30 वा चिखली येथून वाहनाने नाशिककडे प्रयाण, सायं 5.30 वा नाशिक येथे आगमन होईल.  

                                                            ********

बुलडाणा व मोताळा तालुकास्तरीय खरीप हंगाम पुर्व आढावा सभा

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : बुलडाणा व मोताळा तालुकास्तरीय खरीप हंगाम पुर्व आढावा सभा जिल्हा प्रशिक्षण केंद्र, बुलडाणा येथे 19 एप्रिल रोजी आमदार संजय गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, मोताळा तहसिलदार श्रीमती सारीका भगत आदी उपस्थित होते.

  यावेळी आमदार संजय गायकवाड सूचना देत म्हणाले,  शेतकऱ्यांनी राखून ठेवलेले सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता तपासणी व बिज प्रक्रीया करणे आवश्यक आहे.  जमिन सुपिकता निर्देशांकाप्रमाणे खतांची मात्रा वापरणे, 10 टक्के खतांची बचत करणे ही बाब शेतकऱ्यांना समजवून सांगितली पाहिजे.  बिबीएफ व पट्टा पध्दतीने करावयाची पेरणी, पिक विमा योजना, मग्रारोहयो व पोकरा फळबाग लागवड योजना, तुरीचे शेंडे खुडणे, कापुस एक गाव एक वाण निवड, सर्व बाबीं शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याकरीता मोठया प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी करण्यात यावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

   खरीप हंगाम 2022 करीता तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत गाव पातळीवर केलेल्या नियोजनाबाबतची माहीती  तालुका कृषि अधिकारी डी.एम. मेरत यांनी बुलडाणा तालुक्याची व तालुका कृषि अधिकारी पुरुषोत्तम अंगाईत यांनी मोताळा तालुक्याची सादर केली. यामध्ये मागील 5 वर्षातील झालेला सरासरी पाऊस व पावसात पडलेला खंड तसेच अतिवृष्टीमुळे झालेले पिक नुकसान व त्याअंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेली नुकसान भरपाईची माहिती दिली. तसेच  खरीप 2022 चे पिक पेरणी बाबत नियोजन व शेतकऱ्यांनी राखुन ठेवलेले सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता तपासणीसह बिज प्रक्रीया करण्याबाबत माहिती दिली.

  महाडिबीटी व पोकरा योजनेबाबत केलेली व करावयाच्या बाबतची कार्यवाही, क्रॉपसॅप अंतर्गत किड व रोगाबाबत घ्यावयाची निरीक्षणे व त्यानुसार शेतकऱ्यांना करावयाचे मार्गदर्शन, शेतीशाळा, बिबीएफ व पट्टा पध्दतीने करावयाची पेरणी, पिक विमा योजना, मग्रारोहयो व पोकरा फळबाग लागवड योजना, तुरीचे शेंडे खुडणे, कापुस एक गाव एक वाण निवड आदीबाबत माहीती आढावा सभेत देण्यात आली. यावेळी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष संजय पाटील, बोरखेड सरपंच प्रविण जाधव, अजय बिल्लारी, विश्वासराव नारखेडे, तालुक्यातील कृषि निविष्ठा विक्रेते तसेच तालुक्यातील कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

                                                                                **********