Saturday 31 October 2020

DIO BULDANA NEWS 31.10.2020

 सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान

  • चार महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद
  • शेंदूर्जन महसूल मंडळात चार वेळा अतिवृष्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.31:  जिल्ह्यात माहे जून ते सप्टेंबरच्या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान सिंदखेड राजा तालुक्यात झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात 7 महसूल मंडळे आहेत. तालुक्यात पूर्णा नदी काठच्या साठेगाव, निमगाव वायाळ, हिरवखेड पुर्णा, तढेगाव, राहेरी खु, राहेरी बु, पिंपळगाव कुंडा, ताडशिवणी, लिंगा, देवखेड, तांदुळवाडी, येथील क्षेत्र पाण्याखाली आले होते.

   तसेच पाताळगंगा नदीकाठावरील सिंदखेड राजा शिवार, आलापूर, सवखेड तेजन, पळसखेड चक्का, पिंपळगाव लेंडी, या गाव शिवारात पाणी साचून जमीन देखील खरडून गेली आहेयामुळे पिकांचे नुकसान झाले. बेलगाव नदीकाठावरील सोयंदेव,  सोनोशी, वर्डदी, रुमना या गावांच्या शिवारात नदी दुधडी वाहून पिके पाण्याखाली गेली. त्याचप्रमाणे वाघोरा नदीकाठी बोरखेडी जलाल, तांदुळवाडी, महारखेड, पांगरखेड, हनुवतखेड येथे पावसाच्या पाण्यामुळे पिके पाण्याखाली गेली.

  सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा महसूल मंडळात 21 सप्टेंबर रोजी 24 तासात 96 मि.मी पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद झाली, तर साखरखेर्डा मंडळात 21 सप्टेंबर रोजीच 24 तासात 65 मि.मी, सिंदखेड राजा मंडळात 21 सप्टेंबर रोजीच 24 तासात 87.75 मि.मी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे शेंदूर्जन महसूल मंडळात 26 जून रोजी 87.75 मि.मी, 3 ऑगस्ट रोजी 82.75 मि.मी, 11 ऑगस्ट रोजी 87.25 मि.मी व 21 सप्टेंबर 2020 रोजी 73.25 मि.मी पाऊस पडला. या मंडळात चार वेळा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

    या चारही महसूल मंडळात एकाच दिवशी 21 सप्टेंबर 2020 रोजी अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी साचून काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतात पाणी घुसून एकाच दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी राहून हाती आलेल्या 59096 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या 13 मे 2015 च्या निर्णयानुसार पुर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून शासनास नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आला आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

****************

             शिथील करण्यात आलेले निर्बंधासह टाळेबंदीचा कालावधी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविला

बुलडाणा,(जिमाका) दि.31:  राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार जिल्ह्यात कोविड या संसर्गजन्य साथरोगाच्या नियंत्रणासाठी अधिसूचना निर्गमीत करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या 1 ऑक्टोंबर 2020 च्या आदेशानुसार जिल्ह्यात टाळेंबंदीचा कालावधी 31 ऑक्टोंबर 2020 पावेतो वाढविण्यात आला होता. तसेच जिल्ह्यासाठी शासनाकडून वेळोवेळी शिथील करण्यात आलेले निर्बंध व सुट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेवून टाळेबंदीचा कालावधी शासनाच्या आदेशानुसार 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

    कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात आलेले आदेश, नियमावली अर्थात एसओपी नुसार जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात आलेले आदेश लागू राहणार आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस राममूर्ती यांनी कळविले आहे.

                                                                        *************


जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल, महर्षी वाल्मिकी व इंदिरा गांधी यांना अभिवादन

बुलडाणा,(जिमाका) दि.31:  देशाचे पहिले गृह मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 145 वी जयंती आहे. तसेच महर्षी वाल्मिकी यांची सुद्धा आज जयंती आहे. तर देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल, महर्षी वाल्मिकी व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी या तीनही प्रतिमांना पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना पुष्प अर्पन करून अभिवादन केले.

**********

जिल्ह्यातील एकूण 1419 गावांची सुधारीत पैसेवारी जाहीर

  • 366 गावांची 50 पैशांच्या आत, तर 1053 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर

बुलडाणा,(जिमाका) दि.31:  सन 2020 -21 या खरीप हंगामातील जिल्ह्याची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.  ही सुधारीत पैसेवारी जिल्ह्यातील एकूण 1419 गावांची आहे. यामध्ये 366 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या कमी  आली असून 1053 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आली आहे.

  तालुकानिहाय 50 पैशांपेक्षा जास्त व 50 पैशांपेक्षा कमी सुधारीत पैसेवारी पुढीलप्रमाणे : बुलडाणा – एकूण गावे 98, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांच्या पेक्षा जास्त, सुधारीत  पैसेवारी 74, चिखली : एकूण गावे 144, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 63, दे. राजा : एकूण गावे 64, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 57, मेहकर : एकूण गावे 161, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 47, लोणार : एकूण गावे 91, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांच्या कमी, सुधारीत पैसेवारी 47, सिं. राजा : एकूण गावे 114, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 46, मलकापूर : एकूण गावे 73, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 69, मोताळा : एकूण गावे 120, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 71, नांदुरा : एकूण गावे 112, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त्‍, सुधारीत पैसेवारी 65, खामगांव : एकूण गावे 145, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 64, शेगांव : एकूण गावे 73, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 65, जळगांव जामोद : एकूण गावे 119,  सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 54 आणि संग्रामपूर तालुक्यात एकूण गावे 105 असून या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आहे. तर सुधारीत पैसेवारी 52 आहे.

   तरी जिल्ह्यातील एकूण 1419 गावांपैकी मेहकर, लोणार व सिंदखेड राजा तालुकयातील सर्व एकूण 366 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. तसेच उर्वरित तालुक्यांमधील सर्व 1053 गावांची सुधारीत पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त्‍ आहे. संपूर्ण जिल्ह्याची सुधारीत पैसेवारी 59 आहे, असे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी कळविले आहे.   

Thursday 29 October 2020

DIO BULDANA NEWS 29.10.2020,1

 


खडकपूर्णा प्रकल्प पुर्नवसित गावांमध्ये दर्जेदार नागरी सुविधा द्याव्यात

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

·        खडकपूर्णा प्रकल्प पुर्नवसित गावांमधील प्रश्नासंदर्भात आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : खडकपूर्णा प्रकल्प पुर्ण होवून महत्तम क्षमतेने सिंचन होत आहे. खडकपूर्णा प्रकल्पातंर्गत काही गावांचे पुनर्वसन करण्यात आले. प्रकल्पातंर्गत पुनर्वसन केलेल्या दे. राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण, सिनगांव जहांगीर, सुलतानपूर, मंडपगांव, गारखेड व चिखली तालुक्यातील इसरूळ या गावांमध्ये अंतर्गत रस्ते व अन्य दर्जेदार नागरी सुविधांची आवश्यकता आहे. तरी यंत्रणांनी या पुनर्वसित गावात दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.

   दे. राजा येथील खडकपूर्णा प्रकल्प कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाच्या आवारात  खडकपूर्णा प्रकल्प पुर्नवसित गावांचे प्रश्न, भूसंपादनाची प्रकरणे आदींबाबत आढावा बैठकीचे आयोजन 27 ऑक्टोंबर रोजी केले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. दळवी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अनिल माचेवाड, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नलावडे, तहसीलदार सारीका भगत, सिं. राजा तहसिलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी श्री. कांबळे, तालुका कृषि अधिकारी श्री. म्हसाळकर, श्री राठोड आदी उपस्थित होते.

  शेतीचे शेतरस्ते अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, या गावांमधील अपूर्ण असलेले शेतरस्ते पुर्ण करावेत. शेतरस्त्यांच्या अभावी शेतकऱ्यांना शेतीची मशागत करणे अवघड जाते. त्यामुळे शेतरस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करावीत. खडकपूर्णा प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा मोबदला राहीला असल्यास देण्यात यावा. तसेच वाढीव मोबदला व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी यांचे न्यायालयात प्रलंबित असलेले भूसंपादनाचे प्रकरणे, घरांचे अनुदान प्रकरणे व फळबागांचे प्रकरणे याबाबत तातडीने कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे या गावांमधील विद्युत वाहिन्या, रोहीत्र, कृषी वीज जोडण्यांसाठी वाहिनी आदींचे प्रश्न निकाली काढावेत.

   ते पुढे म्हणाले, या गावांधील राहीलेल्या प्लॉटचे वाटप करण्यात यावे. तसेच या गावांमधील पाणी पुरवठ्याच्या सुविधा आणी पाईप लाईनचे कामे पुर्ण करण्यात यावीत. प्रत्येक गावात पाणी पुरवठ्याच्या सुविधा दर्जेदार असाव्यात. नागरीकांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. फळबाग योजनांचा लाभ या गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांना  देण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी दिल्या.  याप्रसंगी संबंधीत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

                                                            **********

कोरोना अलर्ट : प्राप्त 1235 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 129 पॉझिटिव्ह

  • 78 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.29: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1364 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1235 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 129 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 98 व रॅपीड टेस्टमधील 31 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 743 तर रॅपिड टेस्टमधील 492 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1235 अहवाल निगेटीव्ह आहेत. आजपर्यंत प्राप्त झालेले सदर निगेटीव्ह अहवालांमध्ये आज प्राप्त निगेटीव्ह अहवाल सर्वात जास्त आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : जळगांव जामोद शहर : 4, जळगांव जामोद तालुका : खेर्डा 1, वाडी खुर्द 1,  खामगांव शहर : 6, खामगांव तालुका : घाटपुरी 1, निमकवळा 6, वझर 9, झोडगा 3, शिरला 4, पिंप्री देशमुख 5,  बुलडाणा शहर : 12, बुलडाणा तालुका : चौथा 1, चांडोळ 1,   लोणार तालुका : पळसखेड 10, सुलतानपूर 2, वझर आघाव 1, जांभूळ 1,   लोणार शहर : 13, मेहकर शहर : 2,  मेहकर तालुका : धानोरा 1, लोणी काळे 1, दे. साकर्षा 1, लोणी गवळी 2, दे. माळी 2,  गोहेगांव 3, हिवरा आश्रम 1, दादुल गव्हाण 5, चिखली तालुका : रायपूर 1, मुरादपूर 1, शेलसूर 1, चिखली शहर : 6,  मोताळा तालुका : सिंदखेड 4, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : वाकोडी 1, नांदुरा तालुका : भोटा 2, दे. राजा शहर : 6,  दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 1, सावखेड 1,असोला 1,  मूळ पत्ता जाफ्राबाद जि. जालना  येथील 4 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 129 रूग्ण आढळले आहे. उपचारादरम्यान कोविड रूग्णालय, खामगांव येथे जळगांव जामोद येथील 83, स्त्री रूग्णालय बुलडाणा येथे शास्त्री नगर मलकापूर येथे 82 वर्षीय महिला, सव ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय पुरूष  रूग्णाचा मृत्यू झाला आहे.   

      तसेच आज 78 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मोताळा : 1, दे. राजा : 3, मेहकर : 18,मलकापूर : 12, खामगांव : 5, सिं. राजा : 8, चिखली : 5, बुलडाणा : अपंग विद्यालय 20, आयुर्वेद महाविद्यालय 6.       

   तसेच आजपर्यंत 44152 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8547 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8547 आहे. 

  आज रोजी 2604 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 44152 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9303 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8547 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 631 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 125 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

   

DIO BULDANA NEWS 29.10.2020

 मागासवर्गीय शेतकरी, महिलांना 100 टक्के अनुदानावर साहित्य वाटप

·        अर्ज करण्यास मुदतवाढ, 10 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे 20 टक्के सेसफेड योजनेअंतर्गत सन 2020-21 या वित्तिय वर्षासाठी मागासवर्गीय शेतकरी तसेच मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर 5 एचपी विद्युत मोटार पंप देण्यात येणार आहे.  मागासवर्गीय महिलांकरीता शिलाई मशीन आणि 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांकरीता मिनी पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय शेतकरी, महिला व दिव्यांग लाभार्थ्यानी अर्ज दि. 23 आक्टोबर 2020 पर्यत संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे सादर करावयाचे होते. या योजनेच्या अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता 10 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.

   सदर योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहे. योजनेचा लाभ मागासवर्गीय शेतकऱ्यांनी, महिलांनी अपंग लाभार्थ्यानी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. पुनमताई विजय राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

********

नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन

  • कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय
  • मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी  कराव्यात
  • व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि.29: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते.   या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑक्टोंबर महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवार 2 नोव्हेंबर रोजी ई लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

         तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

*****

प्रारूप मतदार यादी 17 नोव्हेंबर रोजी  प्रसिद्ध होणार

बुलडाणा,(जिमाका) दि.29: छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षीप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ही मतदार यादी दिनांक 1.1.2021 या अर्हता दिनांकावर आधारीत आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी दिनांक 16 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येणार होती. मात्र उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी यांचे पत्रानुसार सदर प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी 16 नोव्हेबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली असल्यामुळे ही यादी दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या दिनांकामध्ये बदल झाल्याची नोंद घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भिकाजी घुगे यांनी केले आहे.

                                                                        **********

ईद -ए- मिलाद साध्या पद्धतीने साजरा करावा

·         जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.29: कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर ईद ए मिलाद हा इतर धार्मिक सणांप्रमाणे आपआपल्या घरात राहून साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी एस राममूर्ती यांनी केले आहे.

   राज्य शासनातर्फे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे ईद ए मिलाद मिरवणूकीला परवानगी देता येत नाही. तथापी जिल्ह्यात ईद ए मिलाद मिरवणूका शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे  पोलीस प्रशासनाची पुर्वपरवानगी घेऊन 10 व्यक्तींच्या उपस्थितीत प्रतिकात्मक स्वरूपात काढण्यात याव्यात.  प्रवचनाचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावा. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही. मिरवणूकीच्या दरम्यान मिरवणूकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधावयाचे असल्यास शासनाच्या नियमानुसार पोलीस व संबंधीत स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, सदर पंडालमध्ये एकाचवेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नसावी. ईद ए मिलाद निमित्त मुस्लीम वस्तीत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबीन (पाणपोई) लावण्यात येतात. सबी बांधण्या संदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्याठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. सदर ठिकाणी सिलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात यावे. सबीनच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी व सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. कोविडच्या अनुषंगाने प्रतिकात्मक मिरवणूकीदरम्यान रस्त्यावर पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येवू नये.

   शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून हा सण घरी राहून साधेपणाने साजरा करावा. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित येवून सण साजरे करू नये. तसेच संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यांसारखे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. कोविडच्या अनुषंगाने शासनाच्या विविध विभागांनी, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालनकरणे बंधनकारक आहे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रतिकात्मक स्वरूपातील मिरवणूक सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत  शासनाकडून, जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून आणखी काही सुचना आल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.   सदर सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. जेणेकरून कोविड 19 या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असे जिल्हादंडाधिकारी एस राममूर्ती यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.

*******

 

 

 

 

 

 

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या शाश्वत सुविधांसाठी अनुदान मिळणार

·         20 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन

·         बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या शाश्वत सुविधांसाठी अनुदान मिळणार आहे. त्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येत आहे.  जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत सन 2020-21 या वर्षात या योजनेतंर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण या पॅकेजचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत असे, आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.

    अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत पुढील घटकाचा लाभ द्यावयाचा आहे. या अंतर्गत देण्यात येणाऱ्या बाबी व उच्चत्तम अनुदान मर्यादा रुपये पुढीलप्रमाणे असणार आहे. नवीन विहीर - 2 लाख 50 हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्ती- 50 हजार, शेततळयांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण-1 लाख रुपये, वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये, सुक्ष्म सिंचनसंच यामध्ये ठिंबक सिंचन-50 हजार रुपये तर तुषार सिंचन- 25 हजार रुपये, विद्युत पंप संच – 20 हजार रुपये,  याप्रमाणे उच्च्त्तम अनुदान मर्यादा आहे.

    बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत लाभार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असला पाहिजे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नवीन विहीरीचा लाभ घेण्यासाठी स्वत:चे नावे किमान 0.40 हेक्टर, तसेच अन्य बाबींचा लाभ घ्यावयाचा असल्यास किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. योजनेतंर्गत सर्व बाबींसाठी कमाल क्षेत्र मर्यादा 6.00 हेक्टर शेतजमीनीची आहे. तसेच आदिवासी शेतकरी बांधवांच्या शेतजमिनी दुर्गम भागात विखंडीत असल्याने 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन धारण असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमीन किमान 0.40 हेक्टर इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहतो. तयाचप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल 6 हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू असणार नाही.

   शेतकऱ्यांच्या नावे जमीनधारणेचा सातबारा दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.(नगर पंचायत, नगरपरिषद व महानगर पालिका क्षेत्राबाहेरील) लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. अनुसूचित जमातीचे शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न  1 लाख 50 हजार रूपयांपेक्षा जास्त नसावे. तरच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. या करीता सन 2019-20 या वर्षाचा संबंधीत तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. परंपरागत वननिवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत प्राधान्याने लाभार्थी म्हणून निवड करण्यात येईल. त्यानंतर उर्वरीत शेतकरी अर्जदारांची लाभार्थी निवड करण्यात येणार आहे.  

   या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत या कालावधी करीता महा डीबीटी चे संकेतस्थळ  mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर विहीत मुदतीत अर्ज करावे व ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेकडे अर्जदार शेतकऱ्यांनी स्वत: जमा करावे. तसेच योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पंचायत समितीच्या कृषि विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

0000


--

Wednesday 28 October 2020

DIO BULDANA NEWS 28.10.2020

 निवृत्ती वेतन धारकांनी हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी

·        जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.28: राज्य शासनाकडून जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारक, कुटूंब निवृत्ती धारक, माजी आमदार, इतर राज्य निवृत्ती वेतन धारकांनी माहे नोव्हेंबर 2020 पासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत बँकेमध्ये जावून विहीत नमुन्यातील हयात प्रमाण पत्रावर स्वाक्षरी करावी. संबधीत बँकेत विहीत नमुन्यातील हयात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.  त्या शिवाय त्यांचे माहे जानेवारी 2021 निवृत्ती वेतन काढता येणार नाही, याबाबत कृपया निवृत्ती वेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.

*****

कोरोना अलर्ट : प्राप्त 553 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 21 पॉझिटिव्ह

  • 51 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.28: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 574 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 553 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 190 तर रॅपिड टेस्टमधील 363 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 553 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूर तालुका : तामगांव 1, पातुर्डा 3, चांगेफळ 1, बावनबीर 1, शेगांव तालुका: जवळा 1, शेगांव शहर : 3, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : बरफगांव 1,  खामगाव शहर : 3, दे. राजा शहर : 2,  लोणार तालुका : पिंपळनेर 1, लोणार शहर : 1, जळगांव जामोद शहर : 1, मेहकर तालुका : मोळा  येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 21 रूग्ण आढळले आहे. उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे नांद्राकोळी ता. बुलडाणा येथील 70 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.   

      तसेच आज 51 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 1, बुलडाणा : अपंग विद्यालय 6, आयुर्वेद महाविद्यालय 1, सिं.राजा : 3, शेगांव : 11,   नांदुरा : 10, चिखली : 4, लोणार : 8, मलकापूर : 4, दे. राजा : 3,      

   तसेच आजपर्यंत 42917 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8469 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8469 आहे. 

  आज रोजी 2715 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 42917 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9174 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8469 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 583 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 122 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*********

कर्जमाफी योजनेत त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेत आधार कार्डची प्रत जमा करावी

  • स्टेट बँक ऑफ इंडियाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्रुटी असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. यादीमध्ये नाव असलेल्या मात्र कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी  संबंधीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आपले आधार कार्डची प्रत जमा करावी. जर यादीमधील व्यक्ती मयत झाली असल्यास, मयताचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसाचे आधार आणि बचत खाते क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संबंधीत शाखेत जमा करावी. आधार प्रमाणीकरण बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर आधार कार्ड व पासबुक घेवून जात आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. तरी त्वरित आधार कार्डची प्रत जमा करावी. अन्यथा कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहील्यास ती जबाबदारी बँकेची राहणार नाही, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने कळविले आहे.

                                                                        **********

सततच्या पावसामुळे बाधित क्षेत्रासाठी सर्व

आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी

-         पालकमंत्री डॉ शिंगणे

बुलडाणा,(जिमाका) दि. 28 :  जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ मदत करावी असे पत्र  पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. याबाबतीत पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी पुढाकार घेऊन  शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणे बाबत मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे.

   जिल्ह्यात एकूण 7 लक्ष 36 हजार 382 हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. जिल्ह्यात माहे ऑगस्ट मध्ये दि 11 व 12 आणि सप्टेंबर मध्ये दि 11 ते 21 दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मूग व उडीद ही पिके काढणीच्या वेळेसच सतत पाऊस झाला .तसेच  सततच्या पावसाने सोयाबीन पिकाच्या दाण्यास मोड आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जून ते सप्टेंबर या कालावधीत सततच्या पावसाने 98 हजार 537 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, मका, तूर, ज्वारी, ऊस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

   तरी यासंदर्भात प्रशासनास विशेष निर्देश देऊन पंचनामे करण्यासाठी आदेश द्यावेत व बाधित झालेल्या क्षेत्रांसाठी सर्व आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ  मदत देणेबाबत  ना. डॉ राजेंद्र शिंगणे  यांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार याना विनंती केली आहे, असे पालकमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        *******

                      ग्रामपंचायतींचे प्रभाग रचना व आरक्षण 2 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार जुलै 2020 ते डिसेंबर 2020 कालावधीत मुदत संपणाऱ्या किंवा नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत (सदस्यांची संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियम 1966 मधील नियम 2- अ नुसार प्रारूप प्रभाग रचना, आरक्षणाबाबत नियम 5 मधील पोट नियम (1) च्या नमुना अ अन्वये दिनांक 27 ऑक्टोंबर 2020 पर्यंत  उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अंतिम प्रभाग रचना व आरक्षणाला (नमुना अ मध्ये) मान्यता देवून तहसिलदार, पंचायत समिती कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात 2 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबतची नोंद सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्ष, सर्व लोकप्रतिनिधी तसेच नागरीकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी केले आहे. 


Tuesday 27 October 2020

DIO BULDANA NEWS 27.10.2020

 तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे

  • कृषि विभागाचे आवाहन
  • शेंगा पोखरणारी हिरवी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीमध्ये हिरवी अळी अर्थात घाटे अळी, पिसारी पतंग, शेंग माशी या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेंगा पोखरणाऱ्या किडीस हिरवी अळी, घाटेअळी आदी नावांनी संबोधण्यात येते. ही किड बहुभक्षी कीड असून हरभरा, वाटाणा, सोयाबीन, चवळी आदी कडधान्य पिकांवर फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवायी कपाशी, ज्वारी, टमाटे, सुर्यफूल, करडई या पिकांवरसुद्धा आढळून येते.

     शेंगा पोखरणाऱ्या किडीची पतंग शरीराने दणकट व पिवळसर रंगाचा असतो. पंखाची लांबी सुमारे 37 मी. मी असते. पुढील तपकीरी पंख जोडीवर काळे ठिपके असतात. तर मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या असतात. पुर्ण वाढ झालेली अळी 37-50 मी.मी लांब असून पोपटी रंगाची असली तरी विविध रंग छटा असलेल्या अळ्याही दृष्टीस पडतात. अळीच्या शरीराच्या बाजुवर तुटक तुटक करड्या रंगाच्या उभ्या रेषा आढळतात. अंडी पिवळसर पांढऱ्या रंगाची व गोलाकार असतात. या अंडीचा खालील भाग सपाट असून पृष्ठभाग घुमटकार असतो. मादी नरापेक्षा मोठी असून तिच्या शरीराच्या मागील भागांवर केसांचा झुपका असतो.

     या किडीची मादी सरासरी 600 ते 800 अंडी तूरीची कोवळी पाने, देठ अथवा कळ्या, फुले तसेच शेंगांवर वेगवेगळी घालत असते. अंडी अवस्था 3 ते 4 दिवसांची असते. अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरूवातीस सुस्त असून प्रथम कोवळी पाने व देठ कुरतडून खातात. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आभाळ आभ्राच्छादीत असल्यास या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. ही अळी सहा अवस्थांमधून जावून 18-25 दिवसांनी जमिनीत मातीच्या वेष्ठनात अथवा झाडाच्या पालापाचोळ्यात कोषावस्थेत जातात. कोषअवस्था 7 ते 14 दिवसांची असते. या किडीचा जिवनक्रम 4-5 आठवड्यात पूर्ण होतो.

   तूर पिकावर येणारी दुसरी महत्वाची किड पिसारी पतंग आहे. हा पिसारी पतंग नाजूक निमुळता 12.5 मि.मी लांब करड्या/भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले व मागील पंख तीन भागात विभागलेले असतात. त्यांच्या कडांवर नाजूक केसांची दाट लव असते. पुढील पंख खूप लांब असून त्यांचे पाय लांब व बारीक असतात. त्यामुळे त्यांना पिसारी पतंग म्हणतात. अळी हिरव्या रंगाची, मध्ये फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती होत गेलेली असते. तिचे शरीर केस व लहान लहान काट्यांनी आच्छादलेले असते. कोष लालसर, तपकीरी रंगाचे असून अळीसारखे दिसतात.  अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्रे पाडून खाते. पुर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरडून खाते व नंतर शेंगेला शेंगेच्या बाहेर राहून खाते. समागमानंतर मादी कोवळी देठे, कळ्या, फुले व लहान शेंगावर रात्रीच्या वेळी अलग अलग अंडी घालते. अंडी 3 ते 5 दिवसात उबून त्यातून बाहेर पडलेली अळी शेंगेवर अथवा शेंगेवरील छिद्रात कोषावस्थेत जाते. कोषावस्था 4 ते 7 दिवसांची असून ह्या किडीची एक पिढी 18 ते 28 दिवसात पुर्ण होते. ही कीड पावसाळा संपल्यानंतर तुरीवर मोठ्या प्रमाणात क्रियाशील असते.

   शेंगमाशी ही आकाराने फारच लहान 1.5 मि.मी लांब असते. माशीचा रंग हिरवट असतो. मादी नरापेक्षा किंचीत मोठी असते. पुढील पंखाची लांबी 4 मि.मी असते. अळी बारीक, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तिचा तोंडाकडील भाग निमुळता असतो.  शेंगमाशीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही. मात्र जेव्हा पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात. मादी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते. ही अंडी 3 ते 8 दिवसात उबून त्यातून निघणारी अपाद  अळी सुरूवातीस दाण्याचा पृष्ठभाग कुरतडून खाते, त्यामुळे दाण्यावर नागमोडी खाचा तयार झालेल्या दिसतात. एक अळी एका दाण्यावरच दरभरण करून जिवनक्रम पुर्ण करते. जिवनक्रम पुर्ण होईपर्यंत अळी शेंगेतच राहते. अळी अवस्था 10 ते 18 दिवसांची असून पुर्ण वाढ झालेली अळी शेंगेतच राहते. कोष दाण्याच्या बाहेरपण शेगंगेतच असतो. कोषावस्था 4 ते 9 दिवसांची असते. माशीची अळीने शेंगेत जाण्यापूर्वी तयार केलेल्या छिद्रावरील पातळ आवरण फोडून कोषामधून निघालेली माशी शेंगेच्या बाहेर पडते. शेंग माशीचा जीवनक्रम 3 ते 4 आठवड्यात पूर्ण होतो.

   या किडींच्या नियंत्रणासाठी तृणधान्य व तेलबिया पिकांबरोबर पिकांची फेरपालट करावी, पेरणीपूर्वी मशागत खोल नांगरणी व वखरणी करावी, वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी, अळ्या वेचून त्यांचा नाश करावा, हेक्टरी 20 पक्षीथांबे पिकात उभारावीत, घाटे अळीच्या नियंत्रणाकरीता त्या अळीचा विषाणू (एचएनपीव्ही) प्रति हेक्टर 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा, शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरीता 5 टक्के निंबोळी अर्क फवारावा.

  तसेच या किडीच्या नियंत्रणाकरीता 50 टक्के फुलोऱ्यावर असताना पहिली फवारणी करावी.  आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास अझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मि.ली किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मि.ली किंवा एचएनपीव्हीएच (1 x 100 पीओबी / मिली) 500 एल ई / हेक्टर किंवा  बॅसिलस थुरीजीएंसिस 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली  प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. इमामेक्टीन बॅन्झोएट 5 टक्के 3 एसजी 4.4 ग्रॅम किंवा लॅमडा सायहेलेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 15.5 एससी प्रवाही 2.5 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी,   असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

                                                                        **********

जवळा बु. येथील परिचराविरूद्ध प्रशासकीय कार्यवाही

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : शेगांव तालुक्यातील जवळा बु. येथील जिल्हा परीषद हायस्कूलमधील कार्यरत परिचर श्रीमती अंबिका ज्ञानदेव बावणे 3 जुलै 2018 पासून सदर कार्यालयास कोणताही अर्ज सादर न करता अनधिकृत गैरहजर आहेत. त्यांच्याविरूद्ध सदर गैरहजेरीच्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, 1964 (6) नुसार खाते चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सदर कार्यवाही अंतर्गत श्रीमती अंबिका ज्ञानदेव बावणे यांना ज्ञापन व जोडपत्र 1 ते 4 त्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात आले आहे. मात्र त्यांनी दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याने सदर ज्ञापन व जोडपत्र पोच करता आलेले नाही. सबब त्यांना एतद्वारा सुचीत करण्यात येते की, त्यांनी सदर प्रकटनाचे प्रसिद्धीचे दिनांकापासून 10 दिवसाचे आत त्यांचे कार्यालयास उपस्थित होवून सदरचे ज्ञापन व जोडपत्र 1 ते 4 स्वीकारावे अन्यथा सेवेतून बडतर्फ करण्यासाठी त्यांच्याविरूद्ध एकतर्फी कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        **********

माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना लागू

  • लाभ घेण्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे आवाहन
  • 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व अवलंबित यांच्या पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. योजनेनुसार उच्च माध्यमिक परीक्षा अर्थात इयत्ता 12 वी, पदवी या परीक्षेमध्ये 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन सन 2020-21 या वर्षात बीई, बीटेक, बी आर्च, बीडीएस, एमबीबीएस, बी एड, बीबीए, बीसीए, बी फार्मा, एमबीए, एमसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या पाल्यांना लाभ देण्यात येतो. तसेच इतर अभ्यासक्रमांची यादी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्या माजी सैनिकांची पाल्ये वर्ष 2020-21 या सत्रात शिक्षण घेत आहेत, अशा पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज व इतर माहिती सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    या संकेतस्थळामध्ये नमूद केलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या वरील अटी पुर्ण करीत असलेल्या माजी सैनिक / विधवा यांचे पाल्यांनी सर्व कागदपत्रांची  पुर्तता करून त्यांचे अर्ज www.ksb.gov.in या संकेतस्थळावर  ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर संकेतस्थळामध्ये दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे तपासणी करीता सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत आहे. तरी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरीता सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुर्यकांत सोनटक्के यांचेशी संपर्क साधावा. किंवा 07262-242208 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

                                                *********

                शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावे

·        समाज कल्याण विभागाचे आवाहन

·        विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक दिला नसल्यास आधार अपडेट करावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : महाडीबीटी पोर्टलवरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2018-19, 2019-20 मधील प्रलंबित शिष्यवृत्ती, फ्रीशीपचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

  मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज भरत असताना आधार नोंदणीकृत अर्ज भरणे आवश्यक आहे. सन 2018-19, 2019-20 मध्ये ज्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक नसलेले अर्ज भरले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रोफाईलमध्ये जावून आधार क्रमांक तसेच आधार संलग्नीकृत बँक खात्याची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न आहे की नाही याची पडताळणी आधार पोर्टलवरील https://resident.uidai.gov.in/bankmapper या लिंकवरती जावून करावी. विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील प्रणालीद्वारे निर्गमीत झालेले पेमेंट व्हाऊचर विद्यार्थी लॉग इनमध्ये जावून त्वरित रीडीम करावेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला युजर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवणे आवश्यक आहे. महाडीबीटी प्रणालीमध्ये नोंदणीकृत होत असताना जे लॉगीन आयडी विद्यार्थ्याने तयार केलेला आहे. तोच लॉगीन आयडी विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवून वापरावा. जेणेकरून भविष्यात याबाबत कोणताही लॉगीन आयडी दुबार तयार होणार नाही. तसेच आपला लॉगीन आयडी व सापवर्डची माहिती गोपनीय ठेवल्यास दुरूपयोग होणार नाही.

                                                                        महाविद्यालयांनी करावयाची कार्यवाही

    महाविद्यालय स्तरावरील स्क्रुटीनी पर्यायाचा वापर करून प्रलंबित अर्ज फॉरवर्ड करत असताना प्रणालीमध्ये दर्शविण्यात आलेल्या सर्व बाबींची खात्री करून तपासूनच पात्र अर्ज मंजूरीकरीता विहीत मुदतीत जिल्हा कार्यालयास प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात यावेत. ज्या विद्यार्थी व महाविद्यालय यांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता मिळालेला आहे, त्यांनी दुसऱ्या हप्त्याकरीता महाविद्यालय लॉगीनमधून द्वितीय सत्राची उपस्थिती अद्ययावत करूनच अर्ज मंजूरीकरीता विहीत मुदतीत पाठवावेत. महाविद्यालयाच्या लॉगीनमध्ये अलॉटमेंट डेट वाईज रिपोर्ट या पर्यायाचा वापर करून अर्ज अलॉट झाला की नाही, याची महाविद्यालयाने वेळोवेळी पडताळणी करणे आवश्यक आहे व नॉट अलोटेड अर्जाबाबत त्रुटी पुर्तता करण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्याला त्वरित याबाबत अवगत करावे. महाविद्यालयांनी संबंधीत लॉगीनमधील डिबीटी डॅशबोर्ड या पर्यायाचा वापर करून शिष्यवृत्ती बाबतचा महाविद्यालय निहाय तपशील अहवाल दिसून येतो. तसेच लॉगीनमध्ये इन्स्टीट्युट डिस्बरमेंट रिपोर्ट, स्टुडन्ट डिस्बरमेंट रिपोर्ट व स्टेटस वाईज अप्लीकेशन डिटेल रिपोर्ट या तीनही पर्यायामध्ये विद्यार्थी व महाविद्यालय यांना शिष्यवृत्ती वितरण झालेल्या स्थितीचा अहवाल दिसून येतो. महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीन सपोर्ट डेस्कमध्ये अर्ज क्रमांक निहाय शोध घेतल्या अर्ज क्रमांकाला क्लिक केल्यानंतर सदर अर्जासंबधीत पीएफएमएस पोर्टल बाबतच्या त्रुटींची माहिती महाविद्यालय लॉगीनमध्ये विद्यार्थीनिहाय प्रणालीमध्ये दर्शविण्यात येत आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचे आधार अथवा बँक खात्या संबंधीत त्रुटी असल्यास संबधीत विद्यार्थ्याला याबाबत अवगत करावे.

   तरी सन 2018-19, 2019-20 या वर्षातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता योजनेतंर्गत सदर कार्यवाही न केल्यास कोणताही मागासवर्गीय पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहल्यास त्यास महाविद्यालयाचे प्राचार्य व्यक्तीश: जबाबदार राहणार आहेत, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी कळविले आहे.

                                                            ********

 

Monday 26 October 2020

DIO BULDANA NEWS 26.10.2020

 


मोजणीतून सुटलेल्या घरांचा मोबदला देण्यात यावा

-         पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

 

  • जुनी येरळी गावातील जिगांव प्रकल्पग्रतांना न्याय द्यावा
  • पुनर्वसनासाठी आवश्यक असणारी जमिन उपलब्ध करून घ्यावी

बुलडाणा,(जिमाका) दि.24:  जिगांव प्रकल्पासाठी टप्पे निहाय भूसंपादन व पुनर्वसनाची कामे सुरू आहेत. या प्रकल्पामध्ये बुडीत क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला विहीत पद्धतीनुसार भुसंपादन केल्याचा मोबदला मिळाला आहे. प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात येणारे व पुनर्वसन करावे लागणारे जुनी येरळी हे मोठे गाव आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. संयुक्त मोजणीतून सुटलेल्या घरांचा मोबदला यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करून विहीत कालमर्यादेत देण्यात यावा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

    जिगांव प्रकल्पातील जुनी येरळी गावातील घरांच्या मोबदल्यासंदर्भातील विविध विषयासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मलकापूरचे आमदार राजेश एकडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उप जिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. तर सभागृहात जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर, उप जिल्हाधिकारी भुषण अहीरे, उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे आदी उपस्थित होते.  

  मोबदला देताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, गावात मोजणीत सुटलेल्या घरांची तातडीने मोजणी करावी. भूमि अभिलेख विभागाने यासाठी आवश्यक ती कार्यवाही  तातडीने करावी. अशा घरांसाठी सरळ खरेदीने भूसंपादन करून विहीत कालमर्यादेत प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात यावी. यंत्रणांनी समन्वयाने काम करीत तातडीने प्रस्ताव सादर करावे. अतिक्रमीत घरांसाठी यापूर्वी एखाद्या प्रकल्पामध्ये दिलेल्या मोबदल्याची प्रकरणे तपासावी. त्यानुसार कारवाई करावी. तसेच अशा घरांचे भूसंपादन सरळ खरेदी मार्गाने करण्यात यावे.  

  ते पुढे म्हणाले, बांधकाम क्षेत्रफळ शून्य आलेल्या घरांबाबत वेगळी चौकशी लावण्यात यावी. अशा घरांबाबत मोबदल्यासाठी तातडीने सरळ खरेदीचा प्रस्ताव सादर करावा. मोबदल्यासाठी झाडांची सध्याची परिस्थिती व संयुक्त मोजणी अहवालातील मुल्यांकन त्यानुसार योग्य निर्णय घेवून मुल्यांकन करावे. तसेच भूसंपादन झालेल्या बुडीत क्षेत्रातील घरांचा मोबदला दिवाळीपूर्वी देण्यात यावा. येरळी हे पहिल्या टप्प्यातील गाव असल्यामुळे पुनर्वसन करण्यात आलेल्या जागेवर प्लॉट वाटप करावे. जमिनीची आवश्यकता असल्यास पर्यायी जमिनीची व्यवस्था करून ठेवून ती उपलब्ध करून घ्यावी. यावेळी संबंधीत गावातील सरपंच, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

                                                                        ******    

अनुसूचीत जमातीच्या बांधवांना खावटी अनुदान योजनेचा लाभ द्यावा

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • खावटी अनुदान योजना आढावा बैठक

बुलडाणा,(जिमाका) दि.24:  शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरीकांना अर्थसहाय्य देणाऱ्या खावटी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरीक, आदिवासी बांधवांना लाभ देण्यात येतो. तरी यंत्रणांनी तातडीने याबाबत आदिवासी बांधवांना योजनेचा लाभ द्यावा, अशा सूचना  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

    खावटी अनुदान योजनेबाबत आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

  योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण व्यवस्थित करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा. योजना ही कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे राबविण्यात येत आहे. त्यामुळे गांभीर्य लक्षात घेवून योजनेचा लाभ पात्र शेवटच्या घटकाला देण्यात यावा. हा समाज अजूनही अज्ञानी व अशिक्षीत आहे. आपल्यावर अन्याय होत असल्याचे त्यांना हेदेखील कळत नाही. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरून काम होत आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून समाज उत्थानासाठी वेगळे बजेटची तरतूद असते. या योजनेच्या लाभाबाबत समाजात जनजागृती करण्यात यावी. त्यासाठी समाजातील सुशिक्षीत युवकांच्या चमू तयार कराव्यात.

    ते पुढे म्हणाले, आदिवासी भागात असणाऱ्या दवाखान्यांमध्ये नियमित डॉक्टर देण्यात यावे. जेणेकरून आरोग्य सुविधेसाठी लांबवर जाण्याची गरज पडणार नाही. वनहक्क पट्टे वाटप संदर्भात विहीत कालमर्यादा आखून कारवाई करावी. तसेच लाभ देण्यासाठी संबंधीत उपविभागीय अधिकाऱ्यांनी विशेष शिबिरे आयोजित करावी. त्यामध्ये आदिम समाजाचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात यावेत.

  यावेळी उपविभागीय अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व आदिवासी समाजातील मान्यवर, संबंधीत यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                    ******

कोरोना अलर्ट : प्राप्त 685 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 55 पॉझिटिव्ह

  • 64 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.24: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 740 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 685 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 55 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 620 तर रॅपिड टेस्टमधील 65 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 685 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 6, खामगांव तालुका : गोंधनपूर 4,  बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : सातगांव म्हसला 1, चांडोळ 2,  मेहकर शहर : 1, मोताळा शहर : 3,  मोताळा तालुका : पिंपळगांव 1, वाघजई 1, जयपूर 2, लोणार शहर : 3, लोणार तालुका : गायखेड 1,  नांदुरा तालुका : टाकरखेड 1, चिखली तालुका : खैरव 2, कोलारा 1,  चिखली शहर : 5, सिं. राजा तालुका : रूम्हणा 5, सिं.राजा शहर : 1, पळसखेड चक्का 1, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : आसलगाव 2, दे. राजा शहर : 3   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 64 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे.राजा : 4, मेहकर : 5, सिं. राजा : 10, मलकापूर : 11, शेगांव : 12, मोताळा : 2, खामगांव : 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 13, स्त्री रूग्णालय 1.   

   तसेच आजपर्यंत 41645 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8369 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8369 आहे. 

  आज रोजी 2125 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 41645 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9055 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8369 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 565 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 121 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*********

 

दक्षता जागरूकता सप्ताहाचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.24:  केंद्रीय दक्षता आयोगाच्या सुचनेनुसार सर्वत्र दक्षता जागरूकता सप्ताहाचे आयोजन 27 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येत आहे. या कालावधीत भ्रष्टाचार विरोधातील कारवाई संबंधी नागरीकांना संपर्क साधून माहिती देण्यात येणार आहे. तसेच शासकीय कार्यालयांचे ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी घोषवाक्याचे बॅनर्स, स्टीकर्स लावण्यात येणार आहे.

   शासनाचे सर्व विभाग, शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या सर्व संस्था व शैक्षणिक संस्था या सर्व शासकीय कार्यालये तसेच अन्य सर्व महामंडळे, सहकारी पतसंस्था आदींविरोधात भ्रष्टाचाराबाबतची तक्रार करता येते. त्याचप्रमाणे भ्रष्टाचारी मार्गाने अधिकारी, कर्मचारी यांनी बेहीशोबी संपत्ती जमविण्याची तक्रारही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करता येते. तक्रार दिल्यानंतर त्यातील सत्यता व विश्वासर्हतेची पडताळणी केल्यानंतर कार्यवाही करण्यात येते. तक्रार कर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते.

    जनतेमध्ये भ्रष्टाचार विरोधी जागरूकता करण्याच्या उद्देशाने भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी बाबत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा कार्यालयात किंवा 07262-242548, टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा यांनी केले आहे.

 

************