Wednesday 26 July 2017

news 26.7.2017 dio buldana

राष्ट्रीय निवृत्ती वेतन येाजनेचा प्रशिक्षण कार्यक्रम
·        जिल्हा कोषागार कार्यालयाचा उपक्रम
बुलडाणा, दि. 26 -  राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व अंशदाय निवृत्ती वेतन योजना प्रशिक्षणाचा कार्यक्रम आज 26 जुलै 2017 रोजी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पार पडला. या प्रशिक्षण कायर्क्रमाला आहरण व सवितरण अधिकारी उपस्थित होते. यावेळी दिप प्रज्वलन करून प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे प्रशिक्षक दत्तात्रय काळे,  जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर, स्थानिक निधी लेखा विभागाचे सहायक संचालक श्री. झुंजारे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे, अप्पर कोषागार अधिकारी श्री. मडावी व श्रीमती स्मिता तिमसे आदी उपस्थित होते.
   प्रशिक्षण वर्गामध्ये प्रशिक्षक श्री. काळे यांनी सादरीकरणाद्वारे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे लाभ सांगितले. तसेच यामध्ये लाभार्थ्यांची होत असलेली गुंतवणूक समजवून सांगितली. विमा छत्र योजनेचे लाभ विषद करून सेवानिवृत्त होत असलेल्या प्रत्येक कर्मचारी व अधिकारी यांनी विमा छत्र योजनेत समाविष्ट होण्याचे आवाहन त्यांनी केले.
  प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी आर.ए. पाटील, श्री. मुंडोकार, श्री. निखारे, पंकज गवई आदींसह कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
                                                                        *******
इयत्ता 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावे
·        ऑनलाईन अर्ज  barti.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर सादर करावे
·        प्रिंट आऊट कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रावर कागदपत्रांसह द्यावी
बुलडाणा, दि. 26 -  इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहे. सन 2017-18 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनी सदर अर्ज barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सीसीव्हीआयएस प्रणालीवर ऑनलाईन सादर करावे. ऑनलाईन द्वारे भरलेले अर्जाची प्रिंट अर्जदाराने आवश्यकतेनुसार राहीलेली कार्यवाही पूर्ण करूनच आवश्यक कागदपत्रांसह स्वत: अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत समिती कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात विहीत शुल्क भरून सादर करावी.
   अर्ज सादर केल्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग अधिनियम 2000 व जाती पडताळणी नियमावली 2012 नुसार अर्जावर कार्यवाही करण्यात येते. अर्जाच्या प्रिंटवर अर्जदारांनी प्राचार्यांची सही, शिक्का व शिफारस पत्र घ्यावे. तसेच चालू वर्षाचे चारित्र्य प्रमाणपत्र घ्यावे. जात पडताळणी नियमावली मधील नमुना क्रं 3 व 17 हा 100 रूपयांच्या स्टँम्पवर प्रतिज्ञापत्र सादर करावे. चालु वर्षातील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील अर्जदारांनी माहे नोव्हेंबर 2017 पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज वरीलप्रमाणे आवश्यक ती कार्यवही पुर्ण करून व पुराव्यांसह सादर करावे.
   पुराव्यांमध्ये अनुसूचित जातीसाठी 10.8.1950 पूर्वीचे महाराष्ट्रातील रहीवास व जातीचे पुरावे, विजाभज जातीसाठी 21.11.1962 पूर्वीचे महाराष्ट्रातील रहीवास व जातीचे पुरावे आणि इमाव व विमाप्र जातींसाठी 13.10.1967 पूर्वीचे महाराष्ट्रातील रहीवास व जातीचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्रांची सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त केले असल्याची स्वत: खात्री करावी, खोटी माहिती सादर करून किंवा खोटे दस्ताऐवज  दाखल करून त्यांच्या वैधतेचे खोटे प्रमाणपत्र मिळविणे हा दंडणीय अपराध आहे. असा गुन्हा हा दाखलपात्र व अजमानती आहे. अशा व्यक्तींना दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व 20 हजार रूपये पर्यंत दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
 


     जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी व त्यांच्या पडताळणीकरीता लोकसेवकांकडून पैशाची मागणी होत असेल, त्यासाठी अडवणूक करणे, दिरंगाई करणे असे प्रकार आढळून येत असल्यास अशा लोकसेवकांविरूद्ध संबंधीत जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे त्वरित तक्रार करावी. प्रस्तावासोबत कुठल्याही प्रकारचे बनावट कागदपत्रे जोडू नये, मध्यस्थ व दलांलापासून सावध रहावे,  असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी केले आहे. 

Tuesday 25 July 2017

NEWS 25.7.2017 DIO BULDANA

जिल्ह्यात ‘त्या’ एकाच मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड
बुलडाणा, दि. 25 -  जिल्ह्यात फेब्रुवारी 2017 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक पार पडली. यावेळी लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावात मतदान केंद्र क्रमांक 57/6 वर मतदानादरम्यान मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सुलतानपूर येथील मतदान केंद्रावरील केवळ ‘त्या’ एकाच मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता. मतदान प्रक्रियेत वापरलेले इतर सर्व मतदान यंत्र योग्य होते. सर्व ठिकाणी प्रत्येक मतदान यंत्राची तपासणी करून ते सर्व यंत्र योग्य असल्याची खातरजमा करण्यात आलेली होती. त्यानंतरच मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
     या मतदान केंद्राचे फेरमतदान घेण्यात येवून 23 फेब्रुवारी 2017 रेाजी निकाल घोषीत करण्यात आला. जिल्ह्यात 60 जिल्हा परिषद व 120 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक झाली होती. या निवडणूकीकरीता 1691 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच 3 हजार 382 मतदान यंत्र उपयोगात आणण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाकरीता स्वतंत्र मतदान यंत्र होती. त्यापैकी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी उपयोगात येणारी सुलतानपूर येथील 57/6 मतदान केंद्रामधील मतदान यंत्रात बिघाड समोर आला. छेडखानी करण्यात आलेली नाही.  याच ठिकाणी पंचायत समिती मतदारसंघाकरीता उपयोगात येणाऱ्या मतदान यंत्रात कुठलाही बिघाड नव्हता. तसेच जिल्ह्यात उर्वरित 1690 मतदान केंद्रांमधून अशाप्रकारची कुठलीही तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली नाही. सुलतानपूरच्या प्रकरणाविषयी कुठलीही निवडणूकीविषयक याचिका दाखल झालेली नाही, असेही पत्रकात नमूद आहे.  
                                                                        *******
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 100 रूपयांचे अनुदान मंजूर
·                    मलकापूर व नांदुरा बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेले शेतकरी
·                    शेतकऱ्यांनी बँकेचा तपशील तात्काळ बाजार समिती कार्यालयात सादर करावा
बुलडाणा, दि. 25 -  सहकार विभागाच्या 3 जुलै 2017 च्या शासन निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 100 रूपये अनुदान शासनाने मंजूर केले आहे. शेतकऱ्यांनी त्यांचेकडील कांदा जुलै व ऑगस्ट 2016 मध्ये या दोन महिन्याच्या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती मलकापूर व नांदुरा येथे विक्री केलेला आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना  सदर अनुदान मंजूर झाले असून ही रक्कम थेट पात्र शेतकरी यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याकरिता पात्र शेतकरी यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड व आधार क्रमांक आदी तपशील संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यालयात जमा करावा. जेणेकरून अनुदानाची रक्कम तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे शक्य होईल. तरी सदर पात्र कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ बँकेचा तपशील संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
                                                                        *******
जिल्ह्यात 27 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान मौखिक कर्करोग सप्ताहाचे आयोजन
बुलडाणा, दि. 25 -  राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमातंर्गत 27 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 दरम्यान मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान 27 जुलै रोजी जागतिक मौखिक कर्करोग दिन साजरा केल्या जाणार आहे. सप्ताहादरम्यान तंबाखू नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीकरीता तंबाखूच्या दुष्पपरिणामाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांविरोधात जास्तीत जास्त चलान भरण्याबाबत गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रवृत्त करण्यात येणार आहे.  सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आरबीएसके च्या मदतीने जनजागृती करून तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारी पोष्टर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच कॅन्सर वॉरिअर्सच्या मदतीने मौखिक आरोग्य शिबिर आयोजित करणे, कर्करोगावर समुपदेशन व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणे, आदी उपक्रमही राबविण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
यशकथा

‘स्टॅण्ड अप इंडिया’..ने दिले ट्रॅव्हल्स व्यवसायाला बळ..
·                    सुवर्णा भालेराव यांची भरारी
   बुलडाणा, दि. 25 -  केवळ पांरपारिक व्यवसायांच्या साचेबद्ध कामांत महिला आघाडी घेत नसून आधुनिक व्यवसायाच्या जगातही आपला ठसा उमटवित आहे. अशा महिलांच्या कर्तबगारीला शासन विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य करते. केंद्र शासनाने महिलांना भरारी मिळवून देवून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद करण्यासाठी स्टँण्ड अप इंडिया ही येाजना सुरू केली आहे. या योजनेतून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिला यांना 10 लक्ष रूपये ते 1 कोटी रूपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील व्यवसायांकरीता कर्ज प्रकरण मंजूर करण्यात येते. स्टँण्ड इंडिया या योजनेमध्ये जिल्ह्यात बुलडाणा येथील सुवर्णा धनजंय भालेराव यांचे पहिलेच कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे. हे कर्ज प्रकरण बँक ऑफ इंडियाने मंजूर केले आहे.
     या योजनेचा लाभ घेत त्यांना 30 लक्ष रूपयांचे कर्ज प्राप्त झाले आहे. त्यांनी या पैशांमधून पतीचा आधीचा असलेला ट्रॅव्हल्स व्यवसायाला बळ देण्याचे ठरविले आणि बघता.. बघता एक ट्रॅव्हल्स.. आरामदायी बस खरेदी केली. त्यामुळे एका नवीन व्यवसायात त्यांना कर्तृत्व  सिद्ध करण्याची  संधी मिळाली. महिलेने पतीच्या ट्रॅव्हल्स व्यवसायामध्ये सहभाग घेवून संपूर्ण व्यवसाय स्वत: सांभाळत असल्याचे उदाहरण पाहावयास मिळाले. या पैशांमधून त्यांनी संपूर्ण सोयीयुक्त अशी प्रवाशांना आकर्षित करणारी बस सुरू केली. केंद्र शासन किंवा राज्य शासन महिलांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवितात. या योजनांचा अनुकूल परिपाक म्हणजे सौ. सुवर्णा भालेराव यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय.. चाणक्य ट्रॅव्हल्स या समूहाचे नावाने त्यांनी ट्रॅव्हल्स सुरू केल्यात. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध संकल्पना त्या राबवितात.
   कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर बँक ऑफ इंडियाच्यावतीने त्यांचे सदर योजनेची पहिलेच प्रकरण मंजूर झाल्याबद्दल अभिनंदन केले. स्टँण्ड अप इंडियाच्या प्रोत्साहानामुळे बसचे चेसीज खरेदी करून आकर्षक बस बनविण्याचा निर्णय सुवर्णा भालेराव यांनी घेतला. बसचे चेसीज लखनऊ (उत्तर प्रदेश) येथून खरेदी करण्यात आले. त्यानंतर कर्नाटकातील बंगलोरजवळील जिगनी येथे बसची बांधणी करण्यात आली. जिगनी येथे कर्नाटक औद्योगिक वसाहतीमध्ये वीरा बॉडीजचा प्लँण्ट आहे. या प्लँण्टमधून बसची आकर्षक स्वरूपात निर्मिती करण्यात आली. एका आधुनिक व्यवसायाशी जुळल्यामुळे श्रीमती भालेराव यांनी सर्व सुविधांनीयुक्त एम . एच 28 एबी 9090 या क्रमांकाची बस बनविली.  हे सर्व काही निर्मिती झाली ती केवळ स्टँण्ड अप इंडिया योजनेमुळेच, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
    केवळ व्यवसाय करायचा म्हणून नाही, तर व्यवसाय आगळा ठरावा यासाठी बसमध्ये वाय फाय सुविधा, स्वत:च्या चाणक्य ब्रँण्डचीच पाण्याची बाटली, टि.व्ही सेट, स्वच्छ पांढरे ब्लँकेट आदी विनामूल्य सुविधा देतात. त्यामुळे बसकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. एवढेच नव्हे, तर प्रवाशांना सुविधेबरोबरच सुरक्षा पुरविल्या जाते. सुरक्षीतेकरीता बस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सज्‍ज आहे. तसेच चालकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या सुरक्षेची काळजीही घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. आज बुलडाणा येथून त्यांची पुणे, मुंबई येथे नियमित बस सुरू आहे. आपत्या पतीच्या व्यवसायात केवळ हातभार लावून कार्य करणाऱ्या महिला आपणास दिसतात. मात्र संपूर्ण व्यवसायच आपल्या खांद्यावर घेवून यशस्वीरित्या चालविणाऱ्या महिलांचे उदाहरणे एखादेच असते. त्यामध्ये निश्चितच सुवर्णा भालेराव यांचे नाव घेतल्या जाईल.
  बॅंकेत कागदपत्रांची जमवा-जमव करून प्रकरणाचा पाठपुरावा करणे. स्टँण्ड अप इंडिया योजनेची माहिती घेवून प्रकरण तयार करणे, बस खरेदी करणे, ट्रॅव्हल्स व्यवसायामध्ये असलेल्या नवीन ट्रेंण्डची माहिती घेवून त्या पद्धतीने अंमलात आणणे, परिवहन विभागाकडील बसची नोंदणी, कर भरणा व अन्य कामकाज सांभाळणे आदी कामे त्यांनी यशस्वीरित्या केली. त्यांच्या या यशामध्ये केंद्र सरकारची स्टँण्ड अप इंडिया योजना, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी श्री. पिंप्रीकर, शाखा प्रबंधक विलास बावस्कर आदींचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात मोठ्या  ट्रॅव्हल्स  कंपनीमध्ये या व्यवसायाचे रूपांतरण करून देशात टुर पॅकेजेस सुरू करणे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवासी पॅकेज देवून आकर्षक पर्यटन स्थळी पर्यटकांना नेणार असल्याचे त्यांचे नियोजन आहे. एका महिलेने पतीच्या व्यवसायात झोकून देवून काम करत आपला ठसा उमटविणारा सौ. भालेराव यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

                                                                            ************                    

Monday 24 July 2017

news 24.7.2017 dio buldana

अवैध सावकारीच्या 13 प्रकरणांमध्ये 20 अवैध सावकारांवर गुन्हे दाखल
·        जिल्हाधिकारी यांची धडक कारवाई
·        महाराष्ट्र सावकारी अधिनियमातंर्गत कारवाई
बुलडाणा, दि. 24 -  अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. या कायद्याच्या कलम 18 अंतर्गत अर्जदार शेतकरी यांच्या शेत जमिनी ताब्यात देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. अशा 17 प्रकरणांपैकी 13 प्रकरणात संबंधीत अवैध सावकारांवर सावकारी कायद्याच्या कलम 39 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
   जिल्ह्यातील जळगांव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत प्रकाश वल्लभदास मुधडा, संतोष मदनलाल चांडक, सुमित प्रकाश मुंधडा, श्रीमती उषा प्रकाश मुंधडा, सुपडा रामभाऊ इंगळे, श्रीमती अंबाबाई रामभाऊ इंगळे, शेगांव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत शिवकुमार श्रीराम अग्रवाल, लालचंद विश्वंभर अग्रवाल यांचेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये धामणगांव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत पुंडलीक बाबुराव पाटील व निवृत्ती मांगो बावस्कर, चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत संजय माणिकराव गाडेकर, अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत लक्ष्मण शामराव घुबे, श्रीमती शारदा लक्ष्मण घुबे, जगन्नाथ शामराव घुबे, श्रीराम शामराव घुबे, रामेश्वर कडुबा घुबे, श्रीमती विजया साहेबराव पंडीत, डोणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत ज्ञानेश्वर बाळकृष्ण त्रिकाळ व साहेबराव तुळशीराम त्रिकाळ यांचा समावेश आहे. या सर्वांवर संबंधीत सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली आहे.
      तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, दे.राजा यांनी तालुक्यातील सावकार बद्रीनाथ आत्माराम निलख यांचेविरूद्ध पोलीस स्टेशन दे.राजा येथे गुन्हा दाखल नोंदविण्याची कार्यवाही केली आहे. या कायद्यानुसार अवैध सावकारांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीसुद्धा गठीत करण्यात आली आहे. या समितीची सभा 30 जून 2017 रोजी पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी तातडीने अवैध सावकारी तक्रारी प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनामध्ये ही कारवाई करण्यात आली, असे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी कळविले आहे.
                                                                        *****

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा संवेदीकरण कार्यक्रम
·        कृषी सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज भरून द्यावे
·        आपले सरकार केंद्र चालकांनी कर्जमाफीचे अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना सहकार्य करावे
बुलडाणा, दि. 24 -  छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना – 2017 च्या संवेदीकरण कार्यक्रम सहकार विद्या मंदीराच्या सभागृहात नुकताच पार पडला. या कार्यक्रमात व्ही.एल.ई केंद्र चालकांना कृषी सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना भरून देण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. हे अर्ज जास्तीत जास्त  पात्र शेतकऱ्यांनी भरून द्यावेत, असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रभाकर श्रोते, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. अशोक खरात, आपले सरकार पोर्टलचे जिल्हा व्यवस्थापक प्रविण वानखडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. चव्हाण,  जिल्हा कृषि विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
   यावेळी उपनिबंधक श्री. चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेची संपूर्ण माहिती विषद केली आणि संबंधित यंत्रणांची भूमिका सांगितली. तसेच पात्र/अपात्रतेचे निकषांबाबत मार्गदर्शन केले.  श्री. वानखडे यांनी याप्रसंगी कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जाविषयी माहिती दिली. त्यांनी आपले सरकार वेबपोर्टलवरील अर्जाच्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. अशोक खरात यांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आपले सरकार केंद्र चालकांना येणाऱ्या अडचणींचे समाधान केले. ऑनलाईन कामकाज करताना नेटवर्कमधील अडचणींबाबत स्वप्नील कुंवर यांनी उपाययोजना सांगितल्या. यावेळी नाबार्डचे श्री. बोंदाडे व श्री. श्रोते यांनी योजनेच्या अंमलबजाणीमधील आपले सरकार केंद्र चालकांची व बँकांची असलेली महत्वपूर्ण भूमिका विषद केली.    केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना योजेनेचे विनामूल्य ऑनलाईन अर्ज भरण्यास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रशासन अधिकारी श्री. घोंगे, सहकार विभागातील अधिकारी, जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राचे अधिकारी यांनी प्रयत्न केले.
                                                                        ****
संत श्री गजानन महाराज यांची पालखी 29 जुलै रोजी खामगावात
  • खामगांव ते शेगांव रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने
  • 30 जुलै रोजी पालखीचे 5 वाजता शेगांवकडे प्रस्थान
बुलडाणा, दि. 24 -  श्री. संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथून शेगांवच्या परतीच्या मार्गावर आहे. पालखीचे  23 जुलै 2017 रोजी सिंदखेड राजा येथे आगमन झाल्यानंतर पालखी शेगांवकडे मार्गस्थ झाली आहे. पालखी 29 जुलै 2017 रोजी खामगांव येथे येत असून  सकाळी 10 ते सायं 7 वाजेपर्यंत खामगांव शहरातून प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. पालखीचा मुक्काम श्री. देवजी खिमजी मंगल कार्यालय, खामगांव येथे राहणार आहे. त्यानंतर 30 जुलै 2017 रोजी सकाळी 5 वाजता पालखीचे शेगांवकडे प्रयाण होणार आहे.  तरी पालखीतील भाविकांची संख्या व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी बघता खामगांव ते शेगांव, खामगाव- नांदुरा व बाळापूर नाका ते एसटी स्टँण्ड या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
    बाळापूर नाका ते एसटी स्टँण्ड या मार्गावरील 29 जुलै 2017 चे सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक बाळापूर नाका- जनुना ढाबा- घाटपुरी- नांदुरा रोड- एमआयडीसी टर्निंग- सुटाळा बु.- जलंब नाका व बसस्टँण्ड या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच खामगांव ते नांदुरा  रस्त्यावरील वाहतूक 29 जुलै 2017 चे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत खामगांव बसस्टँण्ड- बाळापूर नाका- जनुना ढाबा- घाटपुरी- नांदुरा रोड- एमआयडीसी टर्निंग- पुढे नांदुराकडे, जलंब जाण्याकरिता पुढे सुटाळा खुर्द व जलंब नाक्यापासून पुढे पर्यायी  मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.   खामगांव ते शेगाव रस्ता 30 जुलै 2017 चे सकाळी 4 ते दुपारी पालखी संपेपर्यंत खामगांव बसस्टँण्ड ते शेलोडी, तिंत्रव मार्गे शेगांव,  खामगांव बसस्टँण्ड ते जलब नाका- पुढे शेगांवकडे वाहतूक या पर्यायी मार्गाने राहणार आहे. खामगाव ते शेगाव रस्ता 12 तासापर्यंत संपूर्ण वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
    मुंबई पोलीस कायद्याचे कलम 33 सह कलम 36 अन्वये जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी ही अधिसूचना काढली आहे. या आदेशातून सर्व शासकीय वाहने, सर्व अतिमहत्वाच्या/महत्वाच्या व्यक्तींची वाहने, तात्काळ सेवेची रूग्णवाहिका, शववाहिनी, अग्नीशमन दलाची वाहने वच जिवनावश्यक वस्तूंची वाहने वगळण्यात आली आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांनी कळविले आहे.
******
 सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचे आज आयोजन
बुलडाणा, दि. 24 -  फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन मार्फत 17 वर्षांखालील खेळाडूंसाठी फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा देशात आयेाजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा 6 ते 28 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत होणार आहे. स्पर्धेच्या एकूण सामन्यांपैकी 6 सामने नवी मुंबई येथे डी. वाय पाटील स्टेडीयम येथे भरवण्यात येत आहेत. या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र फुटबॉल मिशन एक मिलीयन हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.त्यानुसार जिल्ह्यात या कार्यक्रमाची सुरूवात करण्यासाठी जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम व फुटबॉल सेल्फी पॉईंटच्या प्रमोशन कार्यक्रमाचे आयोजन उद्या 25 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकूल, क्रीडा नगरी, जांभरून रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
                                                            ********
     



                जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 24 :  लोकमान्य बाळ गंगाधार टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त 23 जुलै 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तर उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिपक सिडाम, तहसीलदार श्री. शेळके आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Friday 21 July 2017

news 21.7.2017 DIO BULDANA

शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी)चे  22 जुलै रोजी आयोजन
  • पेपर 1 साठी 4732, तर पेपर 2 करीता 3300 परीक्षार्थी
  • 21 परीक्षा केद्रांचे नियोजन
बुलडाणा दि. 21जिल्ह्यात शनिवार 22 जुलै 2017 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा – 2017 आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे दोन पेपर होणार आहेत. पहिला पेपर सकाळी 10.30 ते 1 या वेळेत  होणार आहे. तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 या कालावधीत होणार आहे. या परीक्षेत पेपर 1 करीता 4732 व पेपर 2 साठी 3300  विद्यार्थी बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा, भादोला व कोलवड येथील एकूण 21  परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
    यामध्ये पेपर 1 साठी विद्याविकास विद्यालय कोलवड,महात्मा फुले प्राथमिक शाळा मुठ्ठे ले आऊट बुलडाणा, पंकज पद्धड अभियांत्रिकी महाविद्यालय बुलडाणा, शाहू अध्यापक विद्यालय सुंदरखेड, जिजामाता महाविद्यालय बुलडाणा, गांधी प्राथमिक शाळा एचडीएफसी चौकाजवळ बुलडाणा, गोडे डिएड महाविद्यालय जुना अजिसूपर रोड बुलडाणा महात्मा फुले विद्यालय नांद्राकोळी परीक्षा केंद्र आहेत. तसेच पेपर 1 व पेपर 2 करीता शिवाजी विद्यालय सुवर्ण नगर मंदीराजवळ बुलडाणा, राजीव गांधी सैनिकी शाळा अजिंठा रोड बुलडाणा, सहकार विद्या मंदीर चिखली रोड बुलडाणा,  उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इक्बाल चौक बुलडाणा,  प्रगती बीएड महाविद्यालय येळगांव बुलडाणा, मुलांची जिल्हा परिषद हायस्कूल बुलडाणा, सेंट जोसेफ हायस्कूल खामगांव रोड बुलडाणा, श्री शिवाजी हायस्कूल भादोला, शारदा ज्ञानपीठ बुलडाणा, भारत विद्यालय चिखली रोड येथील ए केंद्र व बी केंद्र,  राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीयरींग व कॉलेज पॉलीटेक्नीक पाळणा घराजवळ बुलडाणा परीक्षा केंद्र असणार आहेत.
     परीक्षा केंद्रांची जिल्ह्यात पाच झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून पाच झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेस उपस्थित रहावे, असे आवाहन सदस्य सचिव टीईटी परीक्षा आयोजन समिती तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे.
******
शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाचे धडे मिळणार विदेशात
·         विदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज आमंत्रित
·         इस्त्राईल, जर्मनी, नेदरलँड व ऑस्ट्रेलिया दौऱ्यांचे नियोजन
·         31 ऑगस्ट 2017 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावे
बुलडाणा दि. 21विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब याची माहिती होण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषि विभाग विदेशात पाठविणार आहे. संबंधित देशातील शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पन्नात आधुनिक तंत्रज्ञान वापरून वाढ केली आहे. अशाप्रकारचे तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करून शेतमालामध्ये वृद्धी करता येईल, याबाबत अभ्यास करण्यासाठी सदर विदेश दौरे काढले जाणार आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षात दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
    इस्त्राईल, जर्मनी, नेदरलँड व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये नियोजन आहे. या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 1 लक्ष रूपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान शासनामार्फत देण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याची निवड सोडत पद्धतीने होणार आहे.  शेतकऱ्यांनी विहीत प्रपत्रातील परिपूर्ण प्रस्ताव 31 ऑगस्ट 2017 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

-प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक अटी-
प्रस्तावासोबत लाभार्थीकडे स्वत:च्या नावाचा 7/12 व नमुना 8-अ उतारा असणे आवश्यक आहे. उताऱ्यावर नोंदविलेले क्षेत्र पिकाखालील असावे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावी. शेतकऱ्याचे वय वर्ष 25 ते 60 दरम्यान असावे, त्यासाठी पुरावा म्हणून जन्मदाखला किंवा तत्सम प्रमाणपत्र सोबत असावे. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीला नसावा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार आदी व्यावसायिक नसावा. शेतकरी वैद्य पारपत्रधारक असावा. पारपत्राची वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत सेाबत जोडावी. पारपत्राची मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान 6 महिने असावी. शेतकरी कुटूंबातून केवळ एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. शेतकऱ्याने सलग 10-15 दिवस कालावधीचा परदेश दौरा संबधित देशामध्ये करण्यास शेतकरी पात्र आहेत. याबाबतचे तालुका / जिल्हा स्तरावरील आरोग्य अधिकारी किंवा तत्सम दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
                                                                *************
ई-स्कॉलरशीपबाबत प्राचार्यांच्या बैठकीचे 25 जुलै रोजी आयोजन
बुलडाणा दि. 21 भारत सरकार ई-स्कॉलरशीप योजनेबाबत महाविद्यालयांचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम सांभाळणारे  लिपीक यांच्या बैठकीचे आयोजन 25 जुलै 2017 रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले आहे.
  या शैक्षणिक वर्षात ई-स्कॉलरशीप संगणकीय प्रणालीमध्ये शासनामार्फत आमुलाग्र बदल करण्यात येणार आहे. सन 2011-12 ते 2016-17 या कालावधीत ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रणाली मास्टेक लिमिटेड पुणे या कंपनीकडून कार्यान्वीत करण्यात येत होती. मात्र या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना कार्यान्वीत होणार आहे.  सदर पोर्टलवरील विद्यार्थी नोंदणी, महाविद्यालयीन कार्यप्रणाली या विषयी कंपनीचे प्रतिनिधी सदर नविन प्रणालीतील बदल तसेच प्रात्याक्षिक बैठकीत दाखविणार आहे. बैठकीकरीता प्राचार्य व शिष्यवृत्ती कामकाज सांभाळणारे लिपिक यांनी न चुकता दिलेल्या वेळे  बैठकीस उपस्थित रहावे,  असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.
                                                          **********
शबरी आदिवासी व वित्त विकास महामंडळामार्फत अल्प व्याजदरात कर्ज वाटप योजना
·         शबरी आदिवासी महामंडळाच्या यावल जि. जळगांव येथे प्रकरण सादर करावे
बुलडाणा दि. 21 शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक अंतर्गत यावल जि. जळगांव शाखेमार्फत आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांना स्वयंरोजगार करता यावा, यादृष्टीकोनातून त्यांना भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कर्जासाठी अल्प व्याजदर आकारण्यात येणार आहे. सक्षम महिला बचत गट व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना गोदाम बांधकाम व दुरूस्ती, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, खते व बि-बियाणे विक्री दुकान, किराणा दुकान, बंदिस्त शेळीपालन यासारख्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधव व सक्षम महिला बचत गट, विविध कार्यकारी संस्था यांनी सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता शबरी आदिवासी महामंडळाच्या यावल जि. जळगांव शाखेत कर्ज प्रकरण सादर करावे.
   महामंडळाला निधी व इरादा पत्र प्राप्त झाल्यानंतर मिळालेल्या लक्षांकानुसार पात्र अर्जदारांना कर्जवाटप शाखास्तरावरून करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक आदिवासी बांधव, कार्यकारी संस्था व महिला बचत गट यांनी आपले कर्ज प्रकरणे आपले क्षेत्रातील प्रादेशिक शाखा कार्यालयास सादर करून सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
*****
वाहनधारकांनी वाहनाबाबतची कामे स्वत: येवून करावे
·         उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
·         विभागाच्या  http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करावा
बुलडाणा दि. 21 वाहनधारकांनी त्यांचे वाहनाबाबत, अनुज्ञप्तीबाबत किंवा इतर कामकाज स्वत: येवून करावे. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस आपले कामकाज देवू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी. के. तडवी यांनी केले आहे.
   नागरिकांना कार्यालयातील कामकाजाबाबात कुठलीही तक्रार असल्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. या विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विविध अर्ज, शुल्क, कर आकारणी, अपराध व दंड, खाजगी वाहन कर, कर गणना, कर सवलत, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आदी उपलब्ध आहेत. तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
                                                                        ******
      12797 अर्जांमध्ये अस्वच्छ व्यवसायात असणाऱ्या
पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती प्रदान
बुलडाणा दि. 21 सामाजिक न्याय विभागामार्फत अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना देण्यात येते. त्यानुसार सन 2015-16 मध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयास 13 हजार 371 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 12 हजार 797 अर्जांमध्ये शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. तसेच एप्रिल 2017 पासून mahaeschol. maharashtra.gov.in  सदर संकेतस्थळ बंद असल्याने शिल्लक अर्ज पुढील वर्षातील प्राप्त तरतुदीमधून निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच 2016-17 मध्ये कमी तरतुद प्राप्त झाल्यामुळे जिल्ह्यातील कुठल्याही शाळेतील विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती देता आलेली नाही. तरी सदरची शिष्यवृत्ती ही सन 2017-18 या आर्थिक वर्षात प्राप्त  होणाऱ्या तरतुदीमधून निकाली काढण्यात येईल, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा यांनी केले आहे.
                                                                        *******
माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
बुलडाणा,दि. 21 - माजी सैनिक, युद्ध विधवा, विधवा व अवलंबित यांच्या पाल्यांकरिता शिष्यवृत्ती व विद्यावेतन योजनेतंर्गत कल्याणकारी निधीतून शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेतंर्गत इयत्ता 10 वी, 12 वी पदविका व पदवी परीक्षेत 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देता येते. अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणेबाबतचा अर्ज, सोबत लागणारी सर्व कागदपत्रे लवकरात लवकर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बस स्थानकाजवळ, बुलडाणा येथे सादर करावेत.
   या कागदपत्रांमध्ये पाल्याला जर अन्य महाविद्यालयाकडून किंवा कोणत्याही योजनेतंर्गत शिष्यवृत्ती मिळत असेल, तर त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी माजी सैनिकांचे / विधवेचे पाल्य 15ऑगस्ट 1968 पर्यंत जन्मलेले चवथे व त्या नंतरच्या केवळ तीन पाल्यांनाच लागू राहणार आहे. तसेच ज्या पाल्यांनी सीईटी किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे, अशा पाल्यांच्या प्रकरणात गॅप प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.  
   तरी जास्तीत जास्त माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी व अवलंबित यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
                                                                                                ********                             

Thursday 20 July 2017

news 20.7.2017 DIO BULDANA


शेतकऱ्यांचे समाधान करुनच समृद्धी महामार्गासाठी जमिनीची खरेदी
- एकनाथ शिंदे
·        समृद्धी महामार्गासाठी थेट जमीन खरेदीस जिल्ह्यात प्रारंभ
·        शिवणी पिसा गावातील पाच शेतकऱ्यांनी दिली जमीन
बुलडाणा, दि. 20 :  महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्याच्या कृषी व औद्योगिक विकासाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे शासनाने या प्रकल्पाला प्राधान्यक्रम दिला आहे. या प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांचे संपूर्ण समाधान करण्यात येवूनच कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिल्या जाणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
      लोणार तालुक्यातील महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करण्यात आली. त्याप्रसंगी  लोणार येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदीचे कागदपत्रे वितरण करताना श्री.शिंदे बोलत होते. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा गावातील पाच शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या दरानुसार शेत जमिनीची नोंदणी करुन दिली. तसेच समृद्धी महामार्गासाठी शेतजमीन उपलब्ध करुन दिल्याबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
    यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खेातकर, आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, रस्ते विकास महामंडळाचे अप्पर  जिल्हाधिकारी जगदीश मुनीयार,  जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. देशमुख, महामंडळाचे तहसीलदार श्री. जाधव, लोणारचे तहसीलदार सुरेश कवळे आदी उपस्थित होते.    
    थेट खरेदी व्यवहारानंतर शासनाने निश्चित केलेला शेतीचा दर लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार असल्याचे सांगत मंत्री श्री. शिंदे म्हणाले, हा समृद्धी महामार्ग दहा जिल्ह्यांना जोडणार असून या महामार्गावरुन 26 तालुके हे विकास मार्गावर येणार आहेत. हा प्रकल्प लवकर सुरु व्हावा यासाठी शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच थेट जमीन खरेदीचा निर्णय घेतला आहे.     
पाच शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनींची खरेदी

  सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री श्री.शिंदे यांच्या उपस्थितीत लोणार तालुक्यातील शिवणी पिसा गावच्या पाच शेतकऱ्यांची सुमारे 1.05 हेक्टर  आर  जमिनीची रजिष्ट्री करण्यात आली. यापोटी जवळपास 92 लक्ष रूपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. जमिन दिलेल्या शेतकऱ्यांमध्ये निवृत्ती नामदेव पिसे, परमेश्वर नामदेव पिसे, श्रीमती मालताबाई बाळकिसन पिसे, केशव आश्रुजी पिसे व श्रीमती कावेरी अशोक पिसे यांचा समावेश आहे. सदर जमिनी शिवणी पिसा गावच्या गट क्रमांक 249, 250, 253 व 254 गट क्रमांकामधील आहे.

Wednesday 19 July 2017

news 19.7.2017,1 dio buldana

टाकळी हट ते खेर्डा रस्त्याच्या डांबरीकरणाचे  काम पूर्ण
·        पुर्ण झालेल्या कामाचेच देयक कंत्राटदारास अदा
·        अदा केलेल्या देयकात 4.24 लक्ष रूपये कामाचे देयकाची अदायगी
बुलडाणा, दि. 19 -  कार्यकारी अभियंता, खामगांव यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेगांव तालुक्यातील टाकळी हट ते खेर्डा या रस्त्याच्या सुटलेल्या लांबीचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू होते.  यासंदर्भात 16 व 17 जुलै 2017 रेाजी काम न करताच सदर रस्त्याच्या कामाचे देयक काढल्याची बातमी प्रकाशित झाली. या वृत्ताचे कार्यकारी अभियंता यांनी खंडन करीत खुलासा केला आहे. टाकळी हट ते खेर्डा ता. शेगांव या रस्त्याचे काम सन 2015-16 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 23.57 लक्ष एवढ्या किंमतीस  मंजूर होते. सद्यस्थितीत रस्त्याचे डांबरीकरणाचे व क्राँक्रीट रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे. रस्ता सद्यस्थितीत सुस्थितीत आहे. तसेच पुर्ण झालेल्या कामाचेच देयक कंत्राटदारास अदा करण्यात आले आहे. अदा करण्यात आलेल्या देयकामध्ये डांबरीकरण कामाचे केवळ 4.24 लक्ष एवढीच रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यामुळे या कामात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, असे कार्यकारी अभियंता, सार्व. बांधकाम विभाग, खामगांव यांनी कळविले आहे.
                                                ******
गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांविरूद्ध कठोर कारवाई
-         जिल्हाधिकारी
·        सोनोग्राफी केंद्रधारकांची एकदिवशीय कार्यशाळा
बुलडाणा दि. 19 – वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसायासोबत समाजामध्ये मुला-मुलींच्या नैसर्गिक समानता ठेवण्यासाठी सहकार्य करावे. आपली सामाजिक बांधिलकी समजून डॉक्टरांनी गर्भलिंग निदान करणाऱ्या जोडप्यांना मुलींच्या जन्माचे महत्व पटवून द्यावे. तसेच त्यांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणावेत. समाजात चांगल्याप्रमाणे काही वाईट प्रवृत्तीही कार्यरत असतात. त्यामध्ये वैद्यक व्यवसायही सुटला नाही. कुणी वैद्यकीय व्यावसायिक अवैध गर्भलिंग निदान अथवा कायद्याचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांचेवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिला.
   पीसीपीएनडीटी कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय/खाजगी सोनोग्राफी केंद्रधारकांच्या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन आय.एम.ए सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती रेवती देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोफणे, सरकारी अभियोक्ता ॲड. संतोष खत्री, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. आर मकानदार, आयएमए अध्यक्ष डॉ. एल. के राठोड, फॉग्सीचे अध्यक्ष डॉ. डी.डी कुळकर्णी, रेडीओलॉजीस्ट  डॉ. राजीव भागवत आदी उपस्थित होते.
   प्रास्ताविकामध्ये  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन म्हणाले, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि जन्मदर वाढविण्यासाठी विविध उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहेत. प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती देशपांडे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत श्री. गोफणे यांनी आईसी ॲक्टीव्हीटीबाबत सादरीकरण करून जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराबाबत माहिती दिली. तसेच डॉ. राठोड, डॉ. भागवत, डॉ. कुळकर्णी यांनी सोनोग्राफी केंद्रधारकांच्यावतीने आपले मनोगत व्यक्त केले.
    कार्यशाळेत उपस्थित सोनोग्राफी केंद्रधारकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. कार्यशाळेला डॉ. वैशाली पडघान, डॉ. एम. ए चाटे, डॉ. बोथरा, डॉ. भवटे, डॉ. एस.आर मनवर, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एम कुटूंबे, जिल्ह्यातील स्त्री रोग तज्ज्ञ, सोनोग्राफी केंद्रधारक, एमटीपी केंद्रधारक, तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. संचलन एस. बी सोळंकी यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. वंदना काकडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता पीसीपीएनडीटी विभागातील कर्मचारी के. पी भोंडे व अन्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
                                                                        *****
अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्वयंम’ योजना
  • 25 जुलै 2017 पर्यंत अर्ज करावे
  • swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज
बुलडाणा, दि.19 -  स्वयंम योजनेतंर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या-ज्या विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहाचे किंवा स्वयंम योजनेचे ऑनलाईन अर्ज भरावयाचे राहून गेले असतील, त्यांनी लगेचच www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहे.अर्ज भरावयाची शेवटची तारिख 25 जुलै 2017 आहे. यानंतर संकेतस्थळ लॉक होणार असल्यामुळे एकाही विद्यार्थ्यास अर्ज भरता येणार नाही.  
   सन 2016-17 मध्ये स्वयंम योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर त्वरित renew बटन दाबून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावा. जेणेकरून सन 2017-18 या वर्षात त्यांना स्वयंम योजनेचा लाभ घेता येईल. जे विद्यार्थी 25 जुलै 2017 च्या आत ऑनलाईन अर्ज भरणार नाहीत. त्यांना सन 2017-18 च्या स्वयंम योजनेचा लाभ घेता येणार नाही. स्वयंम योजनेच्या अर्जांच्या छाननीची जबाबदारी संपुर्णरित्या त्या-त्या महाविद्यालयाची आहे. त्याकरीता सर्व विद्यार्थ्यांनी आपआपल्या महाविद्यालयाकडून सदरील योजनेची अंमलबजावणी त्वरित व्हावी. याकरीता महाविद्यालयाच्या स्वयंम योजना सांभाळणाऱ्या संबंधिताच्या संपर्कामध्ये रहावे. जे विद्यार्थी सन 2016-17 मध्ये शासकीय वसतिगृहात प्रवेशित होते. त्यांनी त्वरिात उपरोक्त संकेतस्थळावरील renew  बटन दाबून शासकीय वसतीगृहाचा ऑनलाईन अर्ज भरावा. जेणकूरन सन 2017-18 या वर्षात त्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश घेता येईल. जे विद्यार्थी 25 जुलै 2017 च्या आत ऑनलाईन अर्ज भरणार नाहीत. त्यांना 2017-18 च्या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर तात्काळ संपर्क करून ऑनलाईन अर्ज सादर करावे. ऑनलाईन अर्ज नोंदणीस काही अडचणी येत असल्यास त्यासाठी नजीकच्या वसतीगृहाचे गृहपाल यांचेकडे संपर्क करावा, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी कळविले आहे. 
                                                           *****
पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा दि. 19 - राज्याचे कृषि‍ व फलोत्पादन मंत्री, तथा पालकमंत्री  पांडुरंग  फुंडकर आज जिल्हा  दौऱ्यावर   आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम  पुढीलप्रमाणे :- गुरूवार, 20 जुलै 2017 रोजी  सकाळी  10 वाजता  खामगांव येथून शासकीय मोटारीने बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता  बुलडाणा  येथे  आगमन व नगर परिषद, बुलडाणा यांचेद्वारा आयोजित विविध कामांच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, सोयीनुसार बुलडाणा  येथुन  शासकीय  मोटारीने नांदुराकडे प्रयाण, रात्री 9.18 वाजता नांदुरा रेल्वे स्थानकावर आगमन व हावडा-मुंबई मेलने मुंबईकडे प्रयाण करतील.
                                                *****

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा
बुलडाणा दि. 19 - राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे आज जिल्हा  दौऱ्यावर   आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम  पुढीलप्रमाणे :- गुरूवार, 20 जुलै 2017 रोजी  दुपारी  12.15 वाजता कडवंची, जि. जालना येथून लोणारकडे प्रयाण, दुपारी 1 वाजता लोणार तहसिल कार्यालय येथे आगमन व समृद्धी महामार्गावरील संपादीत केलेल्या जमिनींची नोंदणी कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 1.30 वाजता लोणार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 2.30 वाजता सिंदखेड राजाकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता सिंदखेड राजा येथे आगमन व समृद्धी महामार्गबाधीत शेतकऱ्यांशी चर्चा, दुपारी 3.30 वाजता सिंदखेड राजा येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.  
                                                *****


news 19.7.2017 dio buldana


 
बँकांनी शेतकऱ्यांना दहा हजार रूपयाचे अग्रीम त्वरित द्यावेत
-         जिल्हाधिकारी
·        जिल्हा बँक प्रतिनिधींची बैठक
·        पिक विमा योजनेच्या लाभासाठी तलाठ्यांनी पेरेपत्रक द्यावेत
·        नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप
बुलडाणा, दि. 19 -  शासनाने कर्जमाफी दिल्यानंतर कर्जमाफीची प्रशासकीय कार्यवही होईस्तोवर शेतकऱ्यांना खरीपाच्या तयारीकरीता 10 हजार रूपयांचा अग्रीम देण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँकांना आदेशही प्राप्त झाले आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी खातेदार शेतकऱ्यांना त्वरित 10 हजार रूपयांचे वितरण करावे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप तयारीकरीता पैसे उपलब्ध होतील, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.
      जिल्हा बँक समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रभाकर श्रोते, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खरात, स्टेट बँक ऑफ इंडियाचे राजेश परब, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री. झनकर आदी उपस्थित होते.
    पिक विम्यासंदर्भात आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, तलाठ्यांनी पिक विम्यासोबत पेरेपत्रक सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना पेरेपत्रक द्यावीत. प्रशासकीय कारणे न दाखविता ही कार्यवाही करावी. बँकांनी शेतकऱ्यांना दहा हजार रूपयांचा अग्रीम देताना पीक विमा योजनेचा विमा हप्ता भरण्यासंदर्भात घोषणापत्र घ्यावीत. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विनाविलंब दहा हजार रूपयांच्या अग्रीमचे वाटप करावे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने 15 ते 25 हजार रूपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन 2016-17 मधील पिक कर्ज 31 जुलै 2017 पर्यंत शेतकऱ्यांनी भरावे. जेणेकरून त्यांना हा लाभ मोठ्या संख्येने देता येईल. सन 2016-17 चे थकीत कर्ज असल्यास अनुदानाचा लाभ देता येणार नाही.  ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 1 लक्ष रूपयांपर्यंत आहे. त्यांनी त्वरित ही रक्कम भरावी. जेणेकरून त्यांना जास्त लाभ घेता येईल.
  ते पुढे म्हणाले, नागरी व ग्रामीण जीवन्नोनती अभियानातील बचत गट, आत्मा यंत्रणेकडील शेतकरी बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामीण विकास यंत्रणेकडील बचत गट यांची बँक खाती उघडून त्यांना कर्ज मंजूर करावे. तसेच या गटांचे कर्ज प्रकरणे मंजूर केल्यास बचत गटांची मोठी चळवळ जिल्ह्यात उभी राहील. तरी बँकांनी अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून कर्ज मंजूर करावे. यावेळी सुभाष बोंदाडे यांनी बँक प्रतिनिधींच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच एकंदरीत कृषि पिक कर्ज, 10 हजार रूपये अग्रीम वितरण, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप आदी विषयांची माहिती दिली. यावेळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                                    ******
नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांवरील एकरकमी करामध्ये वाढ
  • शुल्कवृद्धी  14 जुलै 2017 पासून लागू

     बुलडाणा, दि. 19 : महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम 1958 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार 14 जुलै 2017 पासून नविन दुचाकी खाजगी चारचाकी वाहनांवरील एकरकमी मोटार वाहन करामध्ये वाढ करण्यात आली आहे.  
       इंजिन क्षमतेनुसार दुचाकी वाहनांचे पूर्वीचे एकरकमी कराचे दर व नविन लागू करण्यात आलेला एकरकमी कराचा दर पुढीलप्रमाणे : इंजिन क्षमता 99 सीसी पर्यंत असलेले वैयक्तिक नावाने असलेली दुचाकी वाहने – पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 8 टक्के दराने व किमान 1500 रूपये होता. नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 10 टक्के दराने व किमान 1500 रूपये करण्यात आला आहे.  इंजिन क्षमता 99 सीसीच्या वर 299 पर्यंत असलेले वैयक्तिक नावाने असलेली दुचाकी वाहने – पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 9 टक्के दराने व किमान 1500 रूपये होता. नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 11 टक्के दराने व किमान 1500 रूपये करण्यात आला आहे. इंजिन क्षमता 299 सीसी च्या वरील वैयक्तिक नावाने असलेली दुचाकी वाहने – पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 10 टक्के दराने व किमान 1500 रूपये होता. नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 12 टक्के दराने व किमान 1500 रूपये करण्यात आला आहे.
    इंधनाच्या प्रकारानुसार वापरण्यात येणारी खाजगी चारचाकी वाहनांचे दरांमध्ये वृद्धी करण्यात आली आहे. इंजिन क्षमतेनुसार खाजगी चारचाकी वाहनांचे पूर्वीचे एकरकमी कराचे दर व नविन लागू करण्यात आलेला एकरकमी कराचा दर पुढीलप्रमाणे : पेट्रोलवर चालणारी 10 लक्ष रूपये किंमती पर्यंतची वाहने - पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 9 टक्के, नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 11 टक्के, पेट्रोलवर चालणारी 10 ते 20 लक्ष रूपये किंमती पर्यंतची वाहने - पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 10 टक्के, नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 12 टक्के, पेट्रोलवर चालणारी 20 लक्ष रूपयापेक्षा जास्त किंमतीची वाहने - पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 11 टक्के, नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 13 टक्के, डिझेलवर चालणारी 10 लक्ष रूपये किंमती पर्यंतची वाहने - पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 11 टक्के, नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 13 टक्के, डिझेलवर चालणारी 10 ते 20 लक्ष रूपये किंमती पर्यंतची वाहने - पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 12 टक्के, नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 14 टक्के, डिझेलवर चालणारी 20 लक्ष रूपये पेक्षा जास्त किंमतीची वाहने - पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 13 टक्के, नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 15 टक्के, सीएनजी /एलपीजी चालणारी 10 लक्ष रूपये किंमती पर्यंतची वाहने - पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 5 टक्के, नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 7 टक्के, सीएनजी /एलपीजी चालणारी 10 ते 20 लक्ष रूपये किंमती पर्यंतची वाहने - पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 6 टक्के, नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 8 टक्के, सीएनजी / एलपीजी चालणारी 20 लक्ष रूपयेपेक्षा जास्त  किंमतीची वाहने - पूर्वीचा दर : वाहन खरेदी बिजकावर 7  टक्के, नवीन दर : वाहनाचे खरेदी बिजकावर 9 टक्के करण्यात आला आहे.
   हे तरी या वाढीव कराची वाहन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
********
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आज आयोजन

     बुलडाणा, दि. 19 :  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या 20 जुलै 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता  करण्यात आले आहे. तरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारी पुराव्यासह दोन प्रतीत लेखी स्वरूपात बैठकीत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
                                                        *****
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या प्रशिक्षणाचे आयोजन
·                    26 ते 28 जुलै 2017 दरम्यान प्रशिक्षण
बुलडाणा दि.19 - पेन्शन फंड रेग्युलेटरी ॲण्ड डेव्हलपमेंट ॲथोरीटी यांनी नियोजित केल्यानुसार आहरण व संवितरण अधिकारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन येाजनेसंबंधी माहिती आणि तक्रार निवारण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण आय एल ॲण्ड एफ एस स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमीटेड यांच्याकडून तज्ज्ञ प्रशिक्षक देणार आहे. त्यानुसार 26 जुलै ते 28 जुलै 2017 दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन प्रशासकीय इमारतीचे सभागृह, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे करण्यात येणार आहे.
  कार्यक्रमानुसार 26 जुलै रोजी सकाळी 10 ते 1 दरम्यान बुलडाणा कोषागार कार्यालयातंर्गत डि.डि. ओ कोड 6301000131 ते 6301002457 असणाऱ्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे सकाळी 10 ते 1 व दुपारी 2 ते 5 दरम्यान डिडीओ कोड 6301002460 ते 6301903421 या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होईल. तसेच 27 जुलै 2017 रोजी सकाळी 10 ते 1 दरम्यान चिखली, मोताळा व मेहकर उपकोषागार कार्यालयातंर्गत येणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होईल. तसेच याच दिवशी दुपारी 2 ते 5 पर्यंत लोणार, सिं.राजा व दे.राजा उपकोषागर कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. त्याचप्रमाणे 28 जुलै 2017 रोजी मलकापूर, खामगांव व नांदुरा उपकोषागार कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सकाळी 10 ते 1 दरम्यान आणि दुपारी 2 ते 5 दरम्यान जळगांव जामोद, शेगांव व संग्रामपूर उपकोषागारातंर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे.
   तरी उपरोक्त ठिकाणी प्रशिक्षणासाठी आपल्या वेळेनुसार आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.
                                                                        ******